Thursday, March 27, 2014

ब्राह्मण महासंघाचा तमाशा

कसला आलाय समाजावर अन्याय


सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराधिकाराचा (नोटा) वापर करावा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या गोविंद कुलकर्णी, विश्वजित देशपांडे आणि शाम जोशी यांनी असे आवाहन नुकतेच केल्याचे वाचनात आले. कारण काय, तर महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या टक्केवारीच्या प्रमाणात कोणत्याच पक्षाने समाजाला प्रतिनिधीत्त्व दिलेले नाही. कोणत्याच पक्षाने असे म्हणताना त्यांना भारतीय जनता पक्ष असेच म्हणावयाचे आहे, असे ठामपणे दिसून येते. कारण ब्राह्मण समाज हा मागील काही काळात नेहमीच भाजपसोबत राहिला. मात्र, त्यांनीही समाजाला गृहित धरून निवडणुकीची आखणी केली आहे काय… अशी शंका पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

मुळात कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी यांनी यांच्या ब्राह्मण संघामागे पुण्यातील १८-१९ टक्के ब्राह्मण समाजापैकी किती लोक आहेत, याचा खुलासा झालेला नाही. त्यामुळे अशा ब्राह्मण संघटनांबद्दल सहानुभूती असली तरीही त्यांचे आवाहन ऐकण्याऐवजी केराची टोपली दाखविणारे ब्राह्मणच पुण्यात अधिक मिळतील. मात्र, तरीही ब्राह्मण समाजावर अन्यायाचा टाहो फोडून ‘नोटा’चा वापर करण्याचे आवाहन करणे, म्हणजे ब्राह्मण मतदारांना विनाकारण संभ्रमात टाकण्यासारखे आहे. आता ही मंडळी हे आवाहन तिकिट नाकारलेल्या कोणाएकाच्या सांगण्यावरून करीत आहेत की स्वतःहून करीत आहेत, ते माहिती नाही. मात्र, अशा पद्धतीने ‘नोटा’ वापरण्याचे आवाहन करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.


मुळात ब्राह्मण समाजाला टक्केवारीच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, हा ब्राह्मण महासंघाचा दावाच चुकीचा आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करून त्यांनी हे निवेदन दिले आहे. शिवाय पुण्यातील भाजपच्या उमेदवारीवरूनच हे पत्रक जारी केले आहे. त्यामुळे त्याच पक्षाविषयी बोलणे अधिक संयुक्तिक ठरेल. काँग्रेस, मनसे आणि इतर पक्षांबद्दल इथे बोलण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्रात साडेतीन टक्के ब्राह्मण समाज आहेत, असे ढोबळपणे बोलले जाते. म्हणजे महाराष्ट्रात शंभर जागा असतील, तर भाजपने ब्राह्मण समाजाला साडेतीन जागा दिल्या पाहिजेत. अर्थात, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत आणि भाजप फक्त २४ जागा लढवित आहे. समीकरण सोडविले, तर तो आकडा ०.८४ इतका येतो. म्हणजे भाजपने महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला फक्त एक जागा द्यायला हवी. ती त्यांनी मुंबईत दिली आहे, पूनम महाजन-राव यांना. मग ब्राह्मण महासंघाचा हा अनाठायी टाहो कशासाठी? टक्केवारीनुसार वाट्याची एक जागा पदरात पडल्यानंतरही पुण्यात टक्केवारीची सौदेबाजी करणाऱ्यांच्या मागे कोण आहे, हे पुढे आले पाहिजे. 


पुण्यात साधारण तीन ते साडेतीन लाख ब्राह्मण मतदार असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे पुण्यात पक्षांनी ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुळात अशी मागणी करणाऱ्या ब्राह्मण संघटनांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.

पहिले म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या ब्राह्मण उमेदवारांच्या विजयासाठी तुमच्या संघटनेने आणि महासंघाने काय आणि किती प्रयत्न केले, याचे स्पष्टीकरण कृपया द्या. मनिषा घाटे, मेधा कुलकर्णी, नीलम कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, मुक्ता टिळक, श्याम देशपांडे यांच्या पत्नी, उदय जोशी, उज्ज्वल केसकर आणि जर कोणत्या ब्राह्मण उमेदवाराचे नाव चुकून घ्यावयाचे राहिले असेल, तर ते सर्व. या उमेदवारांच्या विजयासाठी ब्राह्मण संघटनांनी काय प्रयत्न केले. आमच्या महासंघाचा या उमेदवारांना पाठिंबा आहे आणि ब्राह्मण मतदारांनी त्यांनाच मतदान करावे, असे पत्रक तरी तुम्ही काढले होते का? मी घेतलेल्या माहितीनुसार शून्य. तशी खंत काही ब्राह्मण नगरसेवकांनी सत्कार समारंभात बोलूनही दाखविली होती.

मुद्दा दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सातत्याने प्रहार करणारी आणि समाजाबद्दल, ब्राह्मण महिलांबद्दल अतिशय वाईट पद्धतीने अपप्रचार करणारी, साहित्य प्रसूत करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना अधूनमधून डोके वर काढीत असते. तेव्हा या ब्राह्मण संघटना कोणत्या बिळात तोंड खुपसून बसलेल्या असतात. ब्रिगेडच्या विखारी प्रचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही काय पावले उचललीत सांगणार का? न्यायालयाचा दरवाजा ठोठावला की प्रत्युत्तर देणारे साहित्य निर्माण केले, की रस्त्यावर उतरून मोर्चा काढला… सांगा काय केले.

छत्रपती शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्याचे षडयंत्र रचले जात असताना कुठे होते हे ब्राह्मण महासंघाचे देशपांडे, कुलकर्णी आणि जोशी. पुण्यात १८ ते १९ टक्के ब्राह्मण आहेत ना, पुण्यात मग त्यावेळी विरोध करण्यासाठी किती हजार ब्राह्मण लोक रस्त्यावर उतरले होते. पुतळा हटविण्यास का नाही ताकद लावून विरोध केला. तेव्हा रस्त्यावर कोण उतरले होते, शिवसेना-भाजपवालेच उतरले होते ना. रात्रभर जागून तिथे ठिय्या मांडून कोण बसले होते. शिवसेना-भाजपवालेच बसले होते ना. तेच ब्रिगेडवाल्यांना आव्हान देत होते ना. जेव्हा जेव्हा ब्रिगेडने दहशत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आवाज टाकला ना. शिवाय ज्यांची वकिली करण्यासाठी तुम्ही पत्रक काढले आहे, ते मात्र, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा तिथे नव्हते. ब्राह्मण असूनही. तेव्हा तुमची बोलती बंद झाली होती का? 

(दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यात आल्यानंतर लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


शिवशाहीर आणि छत्रपती शिवरायांवर अधिकारवाणीने बोलू शकतील, असे व्यक्तिमत्त्व असलेल्या माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना धमकी देण्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची मजल गेली होती. तेव्हा सर्व ब्राह्मण संघटना मिठाची गुळणी धरून का बसल्या होता. बाबासाहेबांच्या समर्थनार्थ का रस्त्यावर उतरल्या नाहीत. ‘आम्ही आहोत त्यांच्या पाठिशी, हा दिलासा का दिला नाहीत तुम्ही.’ बोला उत्तर द्या. 

चिपळूणच्या साहित्या संमेलनात परशुरामाच्या परशूचा आणि चित्राचा मुद्दा उपस्थित करून संभाजी ब्रिगेडने अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात ब्राह्मण महासंघाने आवाज उठवून जोरदार आंदोलन का उभारले नाही. का दिले नाही रस्त्यावर उतरून आव्हान. गल्लीतील एखादी किरकोळ संघटनाही पत्रकबाजी करते आणि पेपरमध्ये बातमी छापून आणते. तुमच्या संघटनेची ताकद आहे ना, मग नेमक्या वेळी मूग गिळून गप्प का बसता.

फक्त पत्रकबाजी करून बोलबच्चन करायला फारशी ताकद लागत नाही. मात्र, समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायला, प्रतिकार किंवा विरोध करायला संघटनेची ताकद लागते, अंगात दम लागतो. ती ताकद आणि तो दम तुमच्याकडे आहे का, याचा विचार करा. भाजप आणि शिवसेनेकडे तो दम, ती ताकद आणि ती हिंमत आहे. त्यामुळेच बहुतांश ब्राह्मण समाज याच युतीच्या पाठिशी आहे. मध्यंतरी मनसेनेही ब्राह्मण मतदारांना पळविले. मात्र, राज ठाकरे हे सुद्धा फक्त बोलघेवडे आणि कृतीशून्य असल्याचे स्पष्ट होत चालल्यानंतर हळूहळू हा समाज पुन्हा पारंपरिक पक्षांकडे परतू लागला आहे. त्यामुळे नेमक्या वेळी अपशकुन करण्यासाठी तुम्ही कोणाची सुपारी घेऊन हे पत्रक काढले, याचा खुलासा व्हायला हवा.

राहता राहिला, प्रश्न अनिल शिरोळे यांचा. ते फक्त मराठा आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे, असा तुमचा समज असेल, तर या आधीचा ब्लॉग जरूर वाचा. मग तुम्हाला समजेल बापटांचे तिकिट कुणी आणि का कापले.

आणखी एक गोष्ट म्हणजे शिरोळे हे मराठा असले तरीही विचारांशी आणि संघटनेशी पक्के आहेत. संघ परिवारातील पतित पावन संघटना या आक्रमक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. १९७२ पासून ते एकाच विचारांशी एकनिष्ठ आहेत. संघबंदी आणि आणीबाणीच्या काळातमिसाखाली त्यांनी एक वर्षांचा तुरुंगवास भोगला. अयोध्येच्या आंदोलनातही ते सहभागी होते. १९९२ पासून भाजपतर्फे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा लाडका, स्पष्ट विचार, स्वच्छ प्रतिमा आणि अॅडजस्टमेंटला विरोध करणारा नेता म्हणून शिरोळे ओळखले जातात. 


बेचाळीस वर्षे एकच पक्ष आणि एकाच विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या नेत्याच्या उमेदवारीच्या आड जातीचा मुद्दा कसा काय येऊ शकतो, हे महासंघाचे पदाधिकार स्पष्ट करू शकतील काय. तुम्ही काहीच स्पष्ट केले नाही, तरी हरकत नाही. ब्राह्ण मतदार हा सूज्ञ, हुशार, विचार करून आणि सद्सद्विवेक बुद्धी वापरून मतदान करणारा समाज आहे. भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्यांच्या, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणाऱ्यांच्या आणि ब्राह्मण महिलांच्या लैंगिकतेबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लेखन करणाऱ्या प्रवृत्तींच्या पाठिशी उभे राहण्यात ब्राह्मणांचे हित आहे का, हे समाजातील सूज्ञ मतदार चांगले जाणतात.

हिंदू समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केले तसेच जातीभेद कधीच मानला नाही, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्यांच्या आणि राजकारणात ज्यांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारांच्या मागे ठामपणे उभे राहण्यात आपल्या समाजाचे हित आहे, न कळण्याइतका ब्राह्मण समाज, मतदार मूर्ख नाही.
त्यामुळे तुम्हाला काय पत्रकबाजी करायची ती करा. ब्राह्मण समाज नाराज आहे, असे म्हणायचे ते म्हणा. त्याचा ब्राह्मण मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही.

आणि हे कसे विसरलातः 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आयुष्यात जमणार नाही, असे मोठे काम बाळासाहेब ठाकरे यांनी करून ठेवले आहे. साडेतीन टक्के म्हणजेच खरं तर मूठभर असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनोहर जोशी यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. जातीची गणिते डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या कोणताही पक्ष ही कामगिरी करूच शकणार नाही. बाळासाहेबांनी ते करून दाखविले. जातीपातीचा विचार न करता.

केंद्रात भारतीय जनता पक्षाने अटलबिहारी वाजपेयी या ब्राह्मण माणसाला पंतप्रधानपदावर विराजमान केले. अर्थातच, विचारांवरील निष्ठा आणि अखंड तपश्चर्या लक्षात घेऊनच.

त्यामुळे कोणत्या पक्षांनी ब्राह्मण समाजावर अन्याय केला आहे किंवा नोटा वापरा. अमक्याला मत द्या. तमक्याला देऊ नका, हे सांगायला ब्राह्मण महासंघ आणि संघटनांची गरज नाही. ब्राह्मण मतदार सूज्ञ आहे. तो सारासार विचार करूनच निर्णय घेईल.

Monday, March 24, 2014

भाजप उमेदवारीचे राजकारण

परिवाराने कापला बापटांचा पत्ता

हुश्श्श… झालं अखेरीस पुण्यातून भारतीय जनता पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली. शिरोळे यांना उमेदवारी दिली, ते एकाप्रकारे बरेच झाले. भाजपच्या उमेदवाराची घोषणा थेट १७ मे रोजीच होते की काय, अशी हेटाळणीपूर्ण चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपने पुण्यातील उमेदवार जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला, असंच म्हटलं पाहिजे. 



वास्तविक पाहता, भाजपच्या उमेदवारीवरून इतका घोळ होण्याची काही गरजच नव्हती. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातील शीतयुद्धामुळे भाजपच्या उमेदवारीला मुहूर्त सापडत नव्हता. मुळात पुण्यातून गिरीष बापट की अनिल शिरोळे अशीच खरी लढत असली तरीही उमेदवारीची माळ शिरोळे यांच्याच गळ्यात पडणार, हे आधीच निश्चित झाले होते. फक्त गडकरी-मुंडे यांच्या शीतयुद्धामुळे त्याची घोषणा सातत्याने लांबणीवर पडत होती. अखेरीस त्याला रविवार दिनांक २३ मार्चचा मुहूर्त सापडला. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवाराची घोषणा झाल्याने अखेर गंगेत घोडे न्हाले.
पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार गिरीष बापट यांचे इलेक्टिव्ह मेरिट इतर सर्व उमेदवारांपेक्षा खूपच उजवे आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, कसबा मतदारसंघातून सलग चारवेळा आमदार आणि सध्या राज्याच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळणारे बापट हेच तूर्त तरी पुणे शहर भाजपमधील सर्वाधिक अनुभवी नेते आहेत, याला कोणाचाही आक्षेप नाही. शिवाय जातीचा मुद्दाही बापटांसाठीच अनुकूल ठरत होता. पुण्यातील मनसे आणि काँग्रेसचे उमेदवार हे मराठा असल्याने भाजपचा उमेदवार मराठा नको, ब्राह्मण हवा, असे जातीचे कार्डही चालविले जात होते. मात्र, अखेरीस बापट यांचे तिकिट बसलेच नाही. अर्थात, इतक्या सर्व जमेच्या बाजू असूनही ते बसणार नव्हतेच. त्याचे कारण बापट यांच्या गेल्या काही वर्षांमधील कार्यशैलीमध्ये दडले आहे.
बापट यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना उमेदवारी मिळूच नये, यासाठी पुण्यातून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी, अभाविपचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि खुद्द भाजपमधीलही बहुतांश कार्यकर्ते नि नेत्यांना बापट नको होते. बापट यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असूनही परिवाराला बापट का नको होते, याचा विचार करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बापट यांनी भाजपप्रमाणेच संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांना तसेच संघटनांना नाराज केले. त्याचाच फटका उमेदवारी न मिळण्यामध्ये झाला, असे तूर्त तरी म्हणायला हरकत नाही.
असे काय झाले, गेल्या काही वर्षांमध्ये… खूप काही झाले. मुळात गेल्या लोकसभा निवडणुकीत बापट यांच्या नाराजीमुळेच भाजपचा पराभव झाला, असे मत अनेक पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषकांचे होते आणि आजही आहे. ‘अजिबात जोर लावून काम करण्याची आवश्यकता नाही,’ असे निरोप फिरविण्यात आल्याचे भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवकही खासगीत मान्य करतात. ओंकारेश्वरच्या पुलाखालून पाच वर्षांत बरेच पाणी वाहून गेले असले, तरीही भाजप आणि संघ परिवाराच्या मनात ती गोष्ट अजूनही घर करून आहे.
दुसरे म्हणजे एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कारित स्वयंसेवक असल्याचे म्हणायचे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या हातात हात घालून वेळोवेळी वेगळी भूमिका घ्यायची, ही गोष्ट परिवारातील नेत्यांना स्पष्टपणे खुपत होती. लोकलेखा समितीचे अध्यक्ष असणाऱ्या बापटांनी सुरेश कलमाडी यांच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, सिंचन घोटाळ्याबाबत त्यांनी ‘ब्र’ देखील काढला नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते त्यात गुंतलेले असल्यामुळेच तसे झाले नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पुणेकर दोनदा आंघोळ करतात, जास्त पाणी वापरतात, अशी विधाने करणाऱ्या अजित पवार यांच्या सुरात सूर मिसळून बापट यांनी पुणेकरांवर सडकून टीका केली होती. पुणेकरांना दोनदा आंघोळ करून पाणी वाया घालविण्याची सवयच आहे, अशा आशयाचे विधान करून त्यांनी गोंधळ उडवून दिला होता. अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांना खूष ठेवायचे आणि खासदारकीच्या निवडणुकीत त्याचा फायदा उठवायचा, यापेक्षा कोणता तरी उदात्त हेतू त्यामागे असेल, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार? पक्षाच्या भूमिकेविरोधात निर्णय घेण्यास किंवा मतदानही करण्यास सांगणारे निरोप आमदारसाहेबांच्या मार्फत पाठविले जात. ‘वरून आदेश आला आहे,’ एवढेच स्पष्टीकरण त्याच्या समर्थनासाठी दिले जायचे. 

छत्रपती शिवरायांचे गुरू असलेल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असताना बापट हे प्रकरणापासून साफ अलिप्त होतं. वास्तविक पाहता, बापट यांचे कार्यालय लालमहालापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवसेना आणि भाजप युतीने तो मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. पुतळा हटविण्यात येऊ नये, म्हणून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि खुद्द आमदारही चार-पाच दिवस रात्रभर जागून त्या ठिकाणी पहारा देत असत. आपण त्या गावचेच नाही, असे दाखवित बापट यांनी एकूणच प्रकरणाकडे चक्क पाठ फिरविली. कसब्यातील मराठा किंवा बहुजन मतदार आपल्यापासून दुरावू नये, म्हणूनच कदाचित बापट यांनी प्रकरणापासून चार हात दूर राहणे पसंत केले असावे. त्यामुळे बापट हे निवडणुकीपुरते ‘ब्राह्मण कार्ड’ पुढे करीत असले, तरीही ब्राह्मण समाजाच्या मनातून ते कधीच उतरले होते. तसेही भाजपचा जो निष्ठावंत मतदार आहे, तो जातीकडे पाहून मतदान करतोच असे नाही. तो उमेदवाराचे इतर गुण, निष्ठा आणि कामही पाहतो, असे मला वाटते.
आदमबाग मशिदीच्या प्रकरणातही बापट यांनी अशाच पद्धतीने आश्चर्यकारक नि धक्कादायक भूमिका घेतली होती. धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटना नि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढला होता. महापालिकेने पर्यायी जागा देऊनही मशिदीचे अतिक्रमण हटविण्यास पालिका प्रशासन धजावत नव्हते. त्याचा निषेध करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत बापट यांनी केलेल्या भाषणात भलताच मुद्दा काढला. ‘आदमबाग मशिदीचे प्रकरण हा धार्मिक संघर्षाचा मुद्दा नसून त्यामागे काहींचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे याकडे धार्मिक वादाचा नव्हेत तर आर्थिक वादाचा मुद्दा म्हणून पाहिले पाहिजे,’ असा बापट यांच्या भाषणाचा रोख होता. कसब्यातील मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून घेतलेली बचावात्मक आणि हिंदुत्वविरोधी भूमिका होती. म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है,’ च्या विचाराला साफ हरताळच फासण्याचे काम. विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. डेक्कन कॉर्नरला उभ्या राहिलेल्या टोलेजंग मशिदीच्या आंदोलनाकडेही अशाच पद्धतीने डोळेझाक करण्यात आली होती.
मग विश्व हिंदू परिषदेनेही बापटांकडे डोळेझाकच केली. विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील एका नेत्याने थेट राजनाथसिंह यांच्याकडेच ‘बापट नको,’ अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. संघाच्याही भाग स्तरावरील अधिकारी आणि स्वयंसेवकांनी तसेच भाजपच्या नगरसेवक आणि शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा संघाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला होता. कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी जर बापटविरोधी भूमिका घेतली, तर त्यांना संपविण्याचे षडयंत्र कसे रचले जाते. त्यांना पराभूत करण्यासाठी कशी ‘फिल्डिंग’ लावली जाते, कार्यकर्त्यांच्या भरसभेत कसे अपमानित केले जाते, हे अनेकांनी अनुभवले होते. त्यामुळे गडकरी यांचे समर्थक असलेलेही अनेक जण बापटांपासून दुरावले.
संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि संघाकडून भाजपच्या बाबींमध्ये लक्ष घालणारे सुरेशजी सोनी यांच्यापर्यंत बापटांच्या कार्यशैलीचा इत्थंभूत सातबारा पोहोचविला होता. ते नकोच, अशी भूमिका ठामपणे मांडण्यात आली होती. भाजपच्या ज्येष्ठांच्या कानावरही या गोष्टी घातल्या गेल्या. ‘ते‘ नकोत म्हणून भाजपच्या प्रदेश स्तरावरील माजी पदाधिकाऱ्याने मुंडे यांच्याकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. वास्तविक पाहता, संबंधित अधिकाऱ्याचे आणि मुंडे यांचे संबंध फारसे मधुर नाहीत. तरीही त्यांनी मुंडे यांची खास भेट घेऊन साहेब, यावेळी मागे हटू नका. बापटांना तिकिट नकोच, अशी मागणी केली होती.
थोडक्यात, म्हणजे फक्त इलेक्टिव्ह मेरिट असून फायदा नाही. (शिरोळेंकडेही ते आहेच.) वारंवार धोरणाविरोधात भूमिका घेतली, परिवाराच्या कार्यकर्त्यांना फाट्यावर मारले, त्यांना अडचणीत आणणारी भूमिका घेतली तर संघ परिवार तुम्हाला कधीतरी धडा शिकवितोच, हाच संदेश पुण्यातील उमेदवारीच्या निमित्ताने दिसून आला आहे. भले उशिरा उमेदवारी दिल्यामुळे भाजपची नाचक्की झाली असेल, काही प्रमाणात टिंगल आणि थट्टाही उडविण्यात आली असेल. पण शेवटी पक्षापेक्षा, परिवारापेक्षा आणि विचारापेक्षा कोणी मोठा नाही, हेच यातून दिसून येते.
आमदार गिरीष बापट याकडे कोणत्या नजरेतून पाहतात आणि सर्व गोष्टी कशा पद्धतीने हे सर्व स्वीकारतात, ते पहावे लागेल.
शांत, संयमी, विचारांचे पक्के आणि पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने निभावणाऱ्या अनिल शिरोळे यांना भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा...