पुण्यात नुकतीच राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा रंगली. स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजकांनी प्रत्येक जिल्ह्यात युथ बॅटन रिलेचं आयोजन केलं होतं. आता राज ठाकरे यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याराज्यात पोहोचावी म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांनी राज ठाकरे अटक बॅटन रिले आयोजित केलीय.
सुरवातीला विक्रोळी, नंतर वांद्रे, मग मानपाडा आता कल्याण आणि नंतर कदाचित जळगाव, सोलापूर, पंढरपूर ..... आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर अगदी छोटं छोटं गाव. हो कारणंच तसं आहे. राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची चढाओढ पोलिसांमध्ये लागलीय. जळगावमध्ये दहा ठिकाणी तर नाशिकमध्ये सात ठिकाणी गुन्हे नोंदले गेलेत. पुण्यातही कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला गेलाय. सोलापुरात आणि पंढरपुरात गुन्हा दाखल झालाय. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात असे गुन्हे नोंदतील. मग प्रत्येक ठिकाणीचे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी येतील आणि राज ठाकरे आणखी मोठे होतील. राज यांना आणखी मोठं करण्यासाठीच पोलिस प्रयत्नशील आहे. कदाचित त्यांना वरुन तसे आदेशही मिळाले असतील.
हो सरकारला आणि पोलिसांना राज यांना गावागावात पोहोचवायचंय. निवडणुका झाल्या तर राज्य सरकार गोत्यात येईल, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसनं राज्य कारभाराचा बट्ट्याबोळ केलाय. त्यामुळंच ते शिवसेनेची मतं फोडण्यासाठी राज यांना मोठं करताहेत. हे आम्ही नाही तर देशातला प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. अगदी भाजप, संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षही आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनीही अशाच प्रकारचं विधान केलंय.
मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी उभारलेलं आंदोलन योग्यच आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मराठी पाट्यांचा मुद्दा असो किंवा जया बच्चन यांनी मराठी भाषकांचा केलेला अपमान असो. राज ठाकरे अगदी शंभर टक्के मान्य. मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेणाऱ्या उत्तर भारतीयांना फटकावलंच पाहिजे. मग ते राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असोत, शिवसेनेचे असोत किंवा अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. राष्ट्रीय पक्षांनीही अशी भूमिका घेतली तरी कोणालाच वाईट वाटणार नाही.
सध्या तरी राज ठाकरेच आक्रमक भूमिका घेत आहेत. ती त्यांची गरज आहे, असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. म्हणजे राज यांचा मुद्याही योग्यच आहे. त्यांचा मार्गही काही प्रमाणात योग्य आहे. शिवाय राज्य सरकारचा त्याला आतून पाठिंबा आहे, अशीही चर्चा आहे. राज यांच्या आंदोलनाला हवा मिळाली तर त्याचा निवडणुकीत मनसेला फायदाच होईल. शिवसेनेची मतं फुटतील. शिवसेनेच्या मतफुटीमुळं सरकार तरुन जाईल, असे मनसुबे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधले आहेत. त्यामुळं राज ठाकरे यांच्या बाबतीत सरकार नरमाईचं धोरण स्वीकारत होतं.
कदाचित हेच कारण असल्यामुळं सरकारनं विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताना शंभरवेळा विचार केला होता. अन् राज ठाकरे यांना अटक लांबवली होती. पण ठाण्यातल्या घडामोडींनंतर राज यांना पहाटे पहाटेच उचलण्यात आलं. आता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदले जाताहेत. पोलिसही कधी नव्हे इतकी घाई करताहेत. इतकी तत्परता दाखवण्यात राज्य सरकारचा कोणताच छुपा हेतू नाही, यावर विश्वास बसणं कठीण जातंय.
राज यांचे आंदोलन त्यांच्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि पक्षविस्तार करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्यांच्या पक्षाचा पायाही विस्तारला जाईल. शिवाय मराठीच्या मुद्द्यासाठी लढणारा आणखी एक शिलेदार महाराष्ट्राला मिळेल. पण राज यांच्या संघटनेसमोरचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे नेत्यांची दुसरी फळी नाही.
शिशिर शिंदे, शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, अतुल सरपोतदार आणि दीपक पायगुडे... या पलिकडे नेत्यांची यादी जाणार नाही. शिवाय राज ठाकरे यांची पुण्यात पहिली सभा लावणाऱ्या गणेश सातपुते यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं मनसेला राम राम ठोकून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. हिंदुत्व सोडून काम करणं जमत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. इतर कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ना उद्या तशीच होणारेय.
पक्षापुढे कार्यक्रम नाही, कार्यकर्ते आहेत पण नेत्यांची दुसरी फळी नाही आणि मुख्य म्हणजे सभांना गर्दी मतांमध्ये रुपांतरित होत नाही, हा बाळासाहेब यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव पाहता राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान खूप मोठे आहे. त्यांचं भवितव्य खडतर आहे. नागरिक भावनिक होऊन मतदान करत नाही. हा प्रत्यय राज आणि राणे यांना मुंबईच्या महापालिका निवडणुकीत आलेलाच आहे.
तरुणांमध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता अफाट आहे. त्यांचे मुद्देही योग्य आहेत. पण तरीही पुढच्या निवडणुकीत राज यांचे भवितव्य खडतरच आहे.