धान्य पोहोचले, समाधान लाभले...
साने गुरूजी तरुण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. परममित्र धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोहीम राबविली गेली. त्या मोहिमेच्या निमित्ताने नोंदविलेली काही निरीक्षणे आणि आलेले काही अनुभव…
धान्य दान मोहिमेची
अगदी प्राथमिक चर्चा सुरू असते. अजून काहीच नक्की
असे झालेले नसते घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या कानावर ती चर्चा पडते. ती दुसऱ्या दिवशी तिच्या घरातून एक किलो धान्य दुष्काळग्रस्तांसाठी
घेऊन येते आणि ‘बाईसाहेब, तुम्ही काल बोलत होता ना, त्यासाठी माझं हे एक किलो धान्य...’
दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी केलं पाहिजे, या विचारातून साकारलेल्या धान्यदान मोहिमेमध्ये पहिलं माप टाकणारी व्यक्ती असते एक मोलकरीण. त्यानंतर मग धान्याच्या राशीच्या राशी जमा होतात आणि हजारो दुष्काळग्रस्तांपर्यंत त्या पोहोचविल्याही जातात. दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी नुसतेच उसासे टाकत बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे, या विचारातून या मोहिमेला सुरूवात झाली. मग कुठं कशाची मदत लागेल वगैरे याची चाचपणी सुरू झाली.
बालपणीपासूनचा मित्र
धीरज घाटे हा पाच वर्ष संघाचा पूर्णवेळ प्रचारक असताना काही काळ बीड जिल्ह्याला प्रचारक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये
काय मदत करता येऊ शकेल, याचीच चाचपणी केली. पाणी आणि चारा या गोष्टींची प्रामुख्याने
गरज आहे, हे स्पष्ट होतेच. पण अनेक तालुक्यांमध्ये पुढील काही महिने धान्याचीही अडचण
भासणार आहे, हे तिथं जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला
समजलं आणि मग त्यातून धान्यदान मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला.
शहरातील बड्या व्यक्ती,
संस्था आणि संघटना यांना अॅप्रोच न होता घराघरातून मदत गोळा करायची आणि अधिकाधिक नागरिकांना
यात सहभागी करून घ्यायचं हे सुरूवातीपासूनच ठरलं होतं. त्यानुसार प्रत्येक इमारती,
वाडे, सोसायट्या, चाळी, शाळा आणि महाविद्यालयांमधून या मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात
आली. काही आय टी कंपन्यांमध्येही मोहिमेचा प्रसार करण्यात आला. फेसबुक आणि ई-मेलच्या
माध्यमातूनही धान्यदान मोहीम सर्वदूर पोहोचविण्यात आली.
आशिष शर्मा यांनी त्यांच्या परदेशातील मित्रांपर्यंत ही योजना पोहोचविली आणि त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. काही दानशूर नागरिकांनी विशिष्ट दुकानांमधून पाच किंवा दहा हजार रुपयांपर्यंत धान्य खरेदी करण्यास सांगितले. अनेक शाळांमधून एक मूठ धान्यदान संकल्पना राबविली गेली. त्यातून प्रत्येकी सातशे ते आठशे किलो धान्य गोळा झाले. हास्यसंघासारख्या संघटनांनीही मदतीचा हात पुढे केला. कर्वेनगर-कोथरुड सारख्या भागात संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये धान्य गोळा करण्याची यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे या भागातूनही जवळपास वीस ते पंचवीस हजार किलो धान्य जमा झाले. नियोजनबद्धरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल ६० ते ६५ हजार किलो धान्य जमा झाले. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी असे धान्य लोकांकडून दान म्हणून स्वीकारण्यात आले. आमचे प्रयत्न २१ हजार किलोंसाठी सुरू होते. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो…’ हा अनुभव आला आणि पाहता पाहता ६० हजार किलोचा आकडा कधीच ओलांडला गेला.
आशिष शर्मा यांनी त्यांच्या परदेशातील मित्रांपर्यंत ही योजना पोहोचविली आणि त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. काही दानशूर नागरिकांनी विशिष्ट दुकानांमधून पाच किंवा दहा हजार रुपयांपर्यंत धान्य खरेदी करण्यास सांगितले. अनेक शाळांमधून एक मूठ धान्यदान संकल्पना राबविली गेली. त्यातून प्रत्येकी सातशे ते आठशे किलो धान्य गोळा झाले. हास्यसंघासारख्या संघटनांनीही मदतीचा हात पुढे केला. कर्वेनगर-कोथरुड सारख्या भागात संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये धान्य गोळा करण्याची यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे या भागातूनही जवळपास वीस ते पंचवीस हजार किलो धान्य जमा झाले. नियोजनबद्धरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल ६० ते ६५ हजार किलो धान्य जमा झाले. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी असे धान्य लोकांकडून दान म्हणून स्वीकारण्यात आले. आमचे प्रयत्न २१ हजार किलोंसाठी सुरू होते. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो…’ हा अनुभव आला आणि पाहता पाहता ६० हजार किलोचा आकडा कधीच ओलांडला गेला.
अर्थात, चांगल्या योजनेला
अपशकुन करण्याची मराठी माणसाची परंपरा या वेळी पाळली गेली नाही असं नाही. विघ्नांशिवाय उत्तम कामे पार पडल्याचं ऐकिवात नाही, अन अनुभवानतही. मुळात दुष्काळग्रस्त भागांमध्ये फक्त
पाणी आणि चाऱ्याची आवश्यकता आहे. तेथे धान्य मुबलक आहे, धान्याची अजिबात जरूरी नाही,
असे ई-मेल फिरविण्यात आले. ‘व्हिस्परिंग कॅम्पेन’ करण्यात आले. धान्य जमा करणारे कसे मूर्ख आहेत, अशी चर्चा घडविण्यात आली. पण तेथे धान्याची आवश्यकता
आहे, याची आधीच खात्री करून घेतल्यामुळे आंम्हाला असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे फरक पडत
नव्हता. आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मग्न होतो. (उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला
प्रतिसाद देत २५ हजार नागरिकांनी रक्तदान केले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांनी अपशकुन
करीत या उपक्रमावर अत्यंत वाईट शब्दात टीका केली होती.)
बीड जिल्ह्यातील आष्टी,
पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे.
तुलनेने अंबाजोगाई, परळी, खुद्द बीड शहर आणि केज वगैरे भागांत दुष्काळाच्या झळा कमी
आहेत. आष्टी तालुक्यातील कडा, दादेगाव, बीड सांगवी, नांदूर आणि इतर दोन-पाच गावांमध्ये
आम्ही मदत करण्याचे निश्चित केले होते. मात्र, २१ हजार किलो धान्य गोळा करण्याचे निश्चित
केले होते, तेव्हा या गावांची निवड करण्यात आली होती. पण आमच्याकडील धान्य ६० हजार
किलोंच्या पुढे गेलो होते. त्यामुळे आणखी अनेक गावांना देता येईल एवढे धान्य आमच्याकडे होते. अर्थात, अशा गावांची यादी
बीडमधील कार्यकर्त्यांकडे तर तयारच होती. त्यामुळे त्याचाही प्रश्न उरला नव्हता.
गुरूवारी सकाळी आम्ही
आष्टीच्या दिशेने निघालो. चार ट्रक भरतील इतके धान्य गोळा झाले होते. जवळपास ७०-८०
कार्यकर्ते आणि धान्याचे चार ट्रक असे मार्गस्थ झालो. ‘मोबाईल किंग’ आणि ‘टेलिफोन शॉपी’चे मालक आशिष शर्माही आमच्या सोबत आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही
कडा येथे पोहोचलो. अॅडव्होकेट बाबूराव अनारसे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमसह
आमची वाट पाहत होते. बीडमधील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधरपंत सहस्रबुद्धे देखील
आवर्जून उपस्थित होते. वय वर्षे ७७. झुपकेदार मिशा, ठणठणीत तब्येत आणि खणखणीत आवाज,
ही वैशिष्ट्ये. गोपीनाथ मुंडे हे अजूनही ज्या मोजक्या लोकांच्या पाया पडतात आणि मान
देतात, त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधरपंत. कडक शिस्तीचे पण तितकेच सहजपणे
लोकांमध्ये मिसळून जाणारे.
पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या
गाठीभेटी आणि ओळखी झाल्या. मग धान्याचे कोणते ट्रक कुठे न्यायचे, कुठं किती धान्य उतरवून
घ्यायचं याचं नियोजन करण्यात आलं. एक ट्रक आष्टी गावात पाठविण्यात आला. काही धान्य
कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात उतवरून घेण्यात आलं. काही धान्य दादेगाव आणि नांदूरमध्ये
पाठविण्यात आलं. नियोजनानुसार सर्व काही पार पडल्यानंतर आम्ही दादेगावच्या दिशेनं निघालो.
तिथं धान्य वाटपाचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मला सर्वाधिक उत्सुकता
होती, ती हे धान्य वाटप करण्याची काय यंत्रणा लावण्यात आली आहे, हे जाणून घेण्याची.
मुळात पाऊसच झाला नसल्यामुळे आसपासच्या तीन-चार तालुक्यांमध्ये शेतीची कामे नव्हतीच.
शेतकाम नसल्यामुळे मजुरांच्या हाताला काहीच काम नाही. दुष्काळामुळे बांधकामे करण्यास
बंदी घातलेली. त्यामुळे बांधकामावरील मजुरांच्या (विशेषतः वडार समाज)
रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला. अनेक गावांतील तरुण मंडळी कामं शोधण्यासाठी
इतर गावांच्या दिशेने गेलेली. त्यामुळे शेकापूरसारख्या अनेक गावांमध्ये फक्त म्हातारे-कोतारे आणि लहान मुलं एवढेच शिल्लक राहिलेले. बाकी गाव ओसाड. आता तर रेशनवर मिळणाऱ्या
गव्हाचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. शिवाय रेशनवर धान्य मिळण्यात येणाऱ्या अनेक
अडचणी आणि अनियमितता यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी गत झाली आहे. अशा सर्व लोकांपर्यंत
जमा केलेले धान्य पोहोचणार होते. त्यामुळे रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना वणवण
करीत दुसऱ्यासमोर हात पसरायला लागणार नव्हते.
वडार, वैदू, शेतमजूर,
मागासवर्गीय, दलित आणि रोजचे रोज कमावून खाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असलेली जवळपास
तीस गावे निश्चित करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक गावामध्ये खरोखरच धान्य वाटप करण्याची
आवश्यकता कोणाला आहे, याची यादी गावातील प्रमुख मंडळींनीच तयार केली होती. जेणेकरून
हे धान्य गरज नसलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊ नये. इतकी यंत्रणा लागल्यानंतर आमचे काम
होते, ते फक्त गावांमध्ये जाऊन गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्याचे.
त्यानुसार आम्ही दादेगाव
आणि नांदूर या गावांमध्ये गेलो. दोन्ही ठिकाणी दीडशे ते दोनशे लोक उपस्थित होते. दोन्ही
गावांमध्ये ७० ते ८० जणांची यादी सर्वानुमते तयार करण्यात आलेली. त्यापैकी प्रत्येकी
दोन जणांना जाहीर कार्यक्रमांमध्ये पन्नास-पन्नास किलो धान्य देण्यात आले आणि उर्वरित
सर्वांना घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात येणार होते. एव्हाना ते झाले असेलही. इतर गावांमध्येही
संपर्क सुरू झाला आहे. गरजूंपर्यंत धान्य पोहोचते आहे.
ज्या लोकांना दादेगावमध्ये
धान्य दिले त्यापैकी एक म्हणजे तुळसाबाई. जख्खड म्हातारी. वय वर्षे साधारण ७५ पेक्षा
अधिक असेल. मुलगी नगरमध्ये स्थायिक झालेली आणि आतापर्यंत तिच्याजवळ राहणारा तिचा नातू
लग्नानंतर आष्टीमध्ये रहायला गेलेला. त्यामुळे म्हातारी दादेगावमध्ये एकटीच.
इतके दिवस तिला नातवाचा आधार होता. पण आता तोही नाही. त्यामुळे लोक
त्यांच्याकडे उरलेलं शिळंपाकं अन्न तिला आणून द्यायचे आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा.
पूर्वी ती लोकांकडे जाऊन पडेल ते काम करायची. आता वयोमानाप्रमाणे तेही जमत नाही. पण
आता तिला धान्य मिळाल्यामुळं ती स्वतःचं स्वतः करून खाऊ शकते. ‘तुमचे खूप उपकार झाले
भाऊ. तुमच्यामुळं मला लोकांपुढं भीक मागायची वेळ येणार नाही…’ हे तिचे उद्गार.
कड्यामध्ये पोहोचल्यानंतर रखरखीत दुष्काळात मदतीचा सुखद झरा सापडला. आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास
३८ चारा छावण्या आहेत. त्यांमध्ये ५६ ते ५७ हजार जनावरे आश्रयासाठी आलेली आहेत.
जनावरांसाठी एका व्यक्तीला या छावणीत २४ तास थांबावेच लागते. ही मंडळी सकाळी गावातून
निघतात. त्यांचे दुपारचे जेवण सोबत आणलेले असते. पण सकाळी घरातून निघताना बरोबर घेतलेली रात्रीची शिदोरी उन्हाळ्यामुळे
खराब होते. त्यामुळं धानोरा
येथील परमेश्वर शेळके या चारा छावणी मालकानं निवास करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रात्रीच्या
जेवणाची मोफत सोय केली आहे. २० जानेवारीपासून त्याने अन्नदानाचे पुण्यकर्म सुरू केले
आहे. नावातच परमेश्वर असलेले शेळके हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खऱ्याखुऱ्या परमेश्वरासारखे धावून आले आहेत.
रोज जवळपास ७०० शेतकरी रात्रीच्या वेळी जेवायला असतात. एकावेळी ७०० लोकांना भात देण्यासाठी त्यांना ७० किलोच्या आसपास तांदूळ लागतो. शेतकऱ्यांना आमटी-भात, कधीमधी
लापशी, भात-पातळ भाजी, क्वचित कधीतरी भाकरी असे जेवण दिले जाते. परमेश्वर शेळके यांच्यापासून
प्रेरणा घेऊन आता इतर दोन-चार चारा छावणी मालकांनीही रात्रीच्या जेवणाची सुविधा शेतकऱ्यांना
उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणारी ही देवमाणसंच म्हटली पाहिजेत.
शेतकऱ्यांना रात्रीचे
जेवण देण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या चारा छावणी मालकांनाही धान्य वाटप करण्यात येणार
आहे. पुढील दोन-तीन महिने लागेल तितके धान्य देण्याची आमची तयारी आहे. भविष्यात जर
त्यांना धान्याची कमतरता भासत असेल तर अजूनही धान्य गोळा करून देण्याचे आश्वासन आम्ही
त्यांना दिले आहे. शेवटी काय शेतकऱ्यांकडून आपल्याला जे मिळते आहे, तेच आपण त्यांना
परत करतो आहोत, हीच भावना मनात होती...
दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी करायचं हे मनात ठरवून आम्ही उपक्रमाला सुरूवात केली होती. यशस्वी होणार याची खात्री होतीच. पण प्रतिसाद कसा मिळेल, काय होईल, याबाबत काहीच सांगता येत नव्हतं. मात्र, ईश्वर कृपेने सर्व काही उत्तम झाले. गावांमध्ये धान्य वाटप केल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर असलेल्या समाधानापेक्षा अधिक समाधान आमच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तेच समाधान मनात ठेवून आम्ही पुन्हा पुण्याच्या वाटेने मार्गस्थ झालो...
दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी करायचं हे मनात ठरवून आम्ही उपक्रमाला सुरूवात केली होती. यशस्वी होणार याची खात्री होतीच. पण प्रतिसाद कसा मिळेल, काय होईल, याबाबत काहीच सांगता येत नव्हतं. मात्र, ईश्वर कृपेने सर्व काही उत्तम झाले. गावांमध्ये धान्य वाटप केल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर असलेल्या समाधानापेक्षा अधिक समाधान आमच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तेच समाधान मनात ठेवून आम्ही पुन्हा पुण्याच्या वाटेने मार्गस्थ झालो...
अधिक माहितीसाठी संपर्कः
धीरज घाटेः ९८२२८७१५३०
अॅडव्होकेट बाबूराव अनारसेः ९४२३१७२६८२
परमेश्वर शेळकेः ९४२१३३९५२२
अॅडव्होकेट बाबूराव अनारसेः ९४२३१७२६८२
परमेश्वर शेळकेः ९४२१३३९५२२