Thursday, July 12, 2018

गोविंदाचार्यांबरोबर ‘चाय पे चर्चा’

गोविंदजी म्हणतात, २०१९ ला भाजपा स्वबळावर अवघड

अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठांच्या नि मान्यवरांच्या गाठीभेटी होतील, छान काहीतरी ऐकायला मिळेल, या आशेनं मी आणि विश्वनाथनं भोपाळला जाण्याचा निर्णय निश्चित केला. कार्यक्रम पत्रिकेत जी नावं वाचल्यानंतर खूप आनंद झाला होता, त्यापैकी एक नाव म्हणजे गोविंदाचार्य. कोडिपाक्कम नीलमेघाचार्य गोविंदाचार्य…

भोपाळला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदाचार्य यांचा दोन सत्रांमध्ये सहभाग होता. एका सत्रात ते काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यासमवेत चर्चासत्रात होते. तर समारोपाच्या सत्रात (हिंदीतील उल्लेख पूर्णाहुति सत्र) त्यांचे प्रमुख भाषण होते. दोन दिवसांच्या कार्यक्रमात अनेकांच्या गाठीभेटी झाल्या. पण सर्वाधिक संस्मरणीय ठरली ती गोविंदाचार्य यांच्याबरोबर रंगलेली चाय पे चर्चा.

सकाळचं सत्र संपल्यानंतर गोविंदाचार्य यांना उपस्थितांचा गराडाच पडला. अनेक जण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी उत्सुक होते. अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढायचा होता. माध्यमांना त्यांचे बाइट्स हवे होते. काही पत्रकारांनी विशेष मुलाखतीसाठी गळ घातली. नव्याने प्रकाशित होत असलेली पुस्तकं आणि नियतकालिकं त्यांना भेट दिली जात होती. अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून आणि टीव्हीपासून दूर असलेल्या व्यक्तीभोवती पडलेला चाहत्यांचा गराडा त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा होता. 


घराघरांत पोहोचलेल्या टीव्हीवर विविध वृत्तवाहिन्या दिसायला अगदी सुरुवात झाली होती. भारतीय जनता पार्टीची बाजू मांडणारे गोविंदाचार्य तेव्हापासून अगदी छान लक्षात राहिलेले आहेत. कृष्णवर्णीय वामनमूर्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाला साजेसा अगदी साधा पेहराव, अत्यंत मधुर हिंदी, भाषेवर उत्तम प्रभुत्व, कानावर पडल्यानंतर गोड वाटणारं मृदू बोलणं आणि अभ्यासू राजकारणी ही त्यांची प्रतिमा अगदी तेव्हापासून मनामध्ये कायम आहे. त्यामुळेच गोविंदाचार्य प्रत्यक्ष भेटल्यामुळं आनंद झाला. एका राजकारण्याला भेटल्याचा तो आनंद नव्हता. तर एका प्रचंड अभ्यासू नेत्याला भेटल्याचा तो आनंद होता.

सकाळच्या सत्रामध्ये गोविंदाचार्य यांना फारसे प्रश्नही विचारले गेले नाहीत किंवा त्यांना बोलण्याची फारशी संधीही मिळाली नाही. तेव्हा काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्यावरच सर्वांचा निशाणा होता आणि त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती होत होती. अर्थात, चोख उत्तरे देऊन आणि अचूक दाखले देऊन प्रियांका चतुर्वेदी यांनी सर्वाधिक टाळ्या मिळविल्या. कार्यक्रमानंतर गोविंदाचार्य यांच्याभोवती चाहत्यांची जी गर्दी जमा झाली ती हटायला तयार नव्हती. अखेर सर्वांना विनंती करून नंतर मग त्यांना जेवायला न्यावे लागले. इतके सर्व जण त्यांच्याबरोबर फोटो, सही, बाइट, मुलाखती घेण्यात आणि गप्पा मारण्यात दंग होते.


दुपारी जेवणावर ताव मारल्यानंतर मग पुढच्या सत्रामध्ये सर्व जण रमले असताना मी एक संधी घ्यावी म्हणून गोविंदाचार्य विश्रांती करीत असलेल्या खोलीजवळ गेलो. त्यांच्याबरोबर आलेला एक कार्यकर्ता बाहेर उभा होता. त्याला म्हटलं गोविंदजी काय करतायेत. (संघ परिवार आणि जवळचे लोक त्यांना याच नावाने संबोधतात.) तो म्हणाला, की लिहितायेत काहीतरी. आणखी दहा मिनिटांनी त्यांना चहा लागेल. अगदी कमी साखरेचा एकदम फिक्का… तुम्ही व्यवस्था करता का, अशी विचारणा त्यानं मला केली. आता मी काय व्यवस्थेमधला नव्हतो. पण ते काम मला फारसं कठीण वाटलं नाही. दोन-तीन जणांशी बोलल्यानंतर त्यांच्या चहाची व्यवस्था झाली. आणि माझ्या भेटीची बेगमी देखील.

गोविंदजी काही वेळानं लिहिणं थांबवतील मग तुम्ही आत जा, असं सांगून हा पठ्ठ्या दुसरीकडे कुठेतरी निघून गेला. मी दर दोन मिनिटांनी त्यांचं लेखन थांबलं का, हे हळूच आत डोकावून पाहत होतो. एक दहा मिनिटांचा कालावधी लोटला असेल. अखेरीस त्यांनी लेखन थांबविलं आणि डायरी मिटली. हीच संधी साधून मी आत घुसलो. मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं. वेळ आहे का बोलायला वगैरे विचारून सुरुवात केली. वास्तविक माझं बोलणं अर्धवट वगैरे काहीही राहिलं नव्हतं. पण काहीतरी बोलणं आवश्यक होतं. त्यांनीही मला या बसा वगैरे म्हणून माझं स्वागत केलं. दहा मिनिटांत चहा येतोय, अशी वार्ताही त्यांना दिली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.


अर्थातच, माझा पहिला प्रश्न होता भारतीय जनता पार्टी आणि पक्षातील सध्याच्या पहिल्या दोन क्रमाकांच्या नेत्यांबद्दल… गोविंदाचार्य अर्थ विषयातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. संघ परिवार किंवा भाजपाची आर्थिक धोरणाबद्दल निश्चित भूमिका काय आहे, याबाबत पूर्वी गोविंदाचार्य बोलत असत. भाजपाच्या आर्थिक धोरणांचा आणि वैचारिक भूमिकांचा ते ज्ञानकोश आहेत, असंच त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं. देशात एकहाती सत्ता आहे. आर्थिक विकास नि प्रगतीच्या मार्गावर आपला देश तुफान वेगाने विकास करत असल्याचा दावा केला जातोय. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा यावर तोडगा निघाल्याचाही दावा होतोय. त्यामुळं आर्थिक धोरणांबाबत, एखादा निर्णय घेण्यापूर्वी किंवा अगदी सहजपणे तुमच्याशी चर्चा होते का… नरेंद्रभाई मोदी किंवा अमितभाई शहा तुम्हाला एखादा फोन करतात का कधी किंवा भेट होते का?

माझ्या या प्रश्नावर गोविंदजी फक्त हसले… मनमोकळेपणानं हसले. तेव्हाच खरंतर प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. वास्तविक मला वाटत होतं, की मतभेद वगैरे काहीही असले तरीही मनभेद नसतात ना. (म्हणजे नसावेत अशी अपेक्षा असते...) त्यामुळं एखाद्या विषयावर काय मत आहे विचारत असतील तज्ज्ञ म्हणून. मागे असं एका खात्रीलायक सूत्रानं सांगितलं होतं, की चीनसंदर्भात कोणतीही भूमिका किंवा धोरण ठरवायचं असेल किंवा चीनचा दौरा असेल तर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी आवर्जून चर्चा करीत. त्यांचं म्हणणं काय आहे, असं डॉ. मनमोहनसिंग जाणून घेत. किंवा माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी काश्मीर प्रश्नी भारताची भूमिका मांडण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रांमध्ये शिष्टमंडळ पाठविलं होतं. तसं काही असावं, असं मला उगाच वाटलं होतं. पण गोविंदजींच्या हसण्यामुळं तसं काही नव्हतं हे पटकन समजलं. पण ते हळूहळू मोकळे झाले. आर्थिक धोरण, नोटाबंदी, भाजपमधील इनकमिंग याबद्दल ते भरभरून बोलले.


केवळ नोटाबंदी केली म्हणजे काळा पैसा संपला किंवा भ्रष्टाचार संपला, दहशतवाद संपला असं मला वाटत नाही. एक हजारची नोट रद्द करून यांनी दोन हजारची नोट आणली. मग भ्रष्टाचार संपला असा दावा कसा करता येईल. मुळात किती टक्के काळा पैसा नोटांमध्ये होता, याचा अभ्यास केला तरी भ्रष्टाचार आणि गैरमार्गांनी जमविलेली संपत्ती या बाबतचे उत्तर मिळेल. शिवाय नोटाबंदी हे नक्षलवाद आणि दहशतवादावर उत्तर असूच शकत नाही, हे माझं मत आहे. सरकार काळ्या पैशाबाबत गंभीर आहे आणि काही ठोस उपाययोजना करते आहे, हे दाखविण्याचा मार्ग म्हणून मी नोटाबंदीकडे पाहतो. त्यातून फारसं काही हाती येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संघाचे सध्याचे अर्थतज्ज्ञ एस. गुरूमूर्ती हे तर नोटाबंदी आणि सरकारच्या आर्थिक धोरणांवर खूष आहेत, असं हळूच मी म्हटलं. किंचित हसले… अरे, उसका मत पूछो. एकूण सात गोष्टींपैकी पाच प्रमुख गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि दोन दुय्यम गोष्टी मान्य केल्या तरी त्याला खूप आनंद होतो. तो पहिल्यापासून असाच आहे, असं सांगून गोविंदाचार्यांनी त्यांच्या पट्टशिष्याचा वेगळ्या पद्धतीनं कान पकडला.

भाजपमधलं इनकमिंग हा त्यांच्यासाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. माझ्यासाठी नाही. आणि तसंही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका फॉरवर्ड संदेशात कुणीतरी म्हटलंच आहे, की कमळं जास्त उमलवायची असतील तर चिखल अधिक हवा. तेच अधिक चिखल करण्याचं काम इनकमिंगच्या माध्यमातून सुरू आहे, अशी मार्मिक टिप्पणी गोविंदजींनी केली आणि खळाळून हसले. सत्ता आहे तोपर्यंत सगळे सोबत राहतील. भाजपाची सत्ता गेल्यावर ते पुन्हा ज्यांची सत्ता आहे, त्यांच्याकडे जातील, असंही त्यांनी सांगितलं. 

   (गोविंदाचार्य यांची संपत्ती... एक बॅग आणि कुशाग्र बुद्धी...)

संघटना श्रेष्ठ आहे व्यक्ती नव्हे, हा विचार मानणारा संघ आहे, भाजपा आहे. मात्र, सध्या व्यक्तीचं उदात्तीकरण होतंय असं नाही का वाटत, यावर सही बात है म्हणाले गोविंदजी. सध्याची परिस्थिती पाहिली तर व्यक्तीचा उदोउदो केला जातोय हे पटतंय. पण परिस्थितीच तशी आहे. सध्या सगळं नरेंद्रभोवतीच फिरतंय. अर्थात, त्याच्या प्रयत्नांमुळेच सत्ता आली आहे. त्यामुळं असं होणं स्वाभाविक आहे. पण सध्या पूर्वीसारखा मोकळेपणा राहिला नाही, हे देखील मान्य करायला पाहिजे. नरेंद्रला विरोधात ऐकून घ्यायची सवय नाही, असंच म्हणा ना. गोविंदाचार्य हे नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नरेंद्र असाच करतात.

गोविंदाचार्य हे राष्ट्रीय सरचिटणीस असताना नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये संघटनमंत्री असावेत. नंतर काही काळ हिमाचल प्रदेशातही त्यांची बदली झाली होती. त्यामुळं गोविंदजींना नरेंद्र असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. नरेंद्र मोदींचा विषय निघाल्याने मग ते मोदींवर बराच वेळ बोलले. नरेंद्र कोई भी बात हो दिमाख में रखता है. आदमी हो या बात. तुम्ही जर त्याच्या विरोधात काही बोलला किंवा काही कृती केली, तर तो लक्षात ठेवतो. आणि संधी मिळाली की मग सोडत नाही तुम्हाला. सुदैवाने मी नेहमीच धोरणांबद्दल बोलतो. व्यक्तीवर वैयक्तिक टीका करीत नाही. त्याच्यावर तरी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे मी बचावलो. नाहीतर मलाही त्याने सोडले नसते, असं गोविंदजी मिश्किलपणे म्हणतात.

पण नरेंद्र खूप मेहनती आहे. अपार कष्ट करण्याची त्याची तयारी असते. कष्ट करायला तो मागेपुढे पाहत नाही. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तो स्वतःला झोकून देतो. त्याचे कष्ट मी पाहिले आहेत. त्यामुळेच तो आज इथपर्यंत आला आहे. दुसरं म्हणजे राजकारणात पुढं काय होणार याची जाणीव सर्वप्रथम त्याला होते. गुजरातमध्येही आपला निभाव लागणार नाही, हे सर्वात आधी त्यालाच कळले. मग त्याने स्वतःचे दौरे आणि प्रचार सभा यांची संख्या वाढविली. पार झोकून दिले. त्याने जोर लावला नसता तर निकाल काय असता हे मी सांगायची गरज नाही. नरेंद्र सहजासहजी हार मानणारा नाही, हे मला माहितीये. त्यामुळे २०१९ला परिस्थिती थोडी बिकट असली, तरीही नरेंद्र सहजासहजी पराभव वा पिछेहाट स्वीकारणार नाही हे मी नक्की सांगू शकतो, असं सांगत गोविंदजींनी स्वतःहून २०१९च्या निवडणुकीचा मुद्दा माझ्यासमोर वाढून ठेवला.

एव्हाना चहावाला चहा घेऊन आला. आप भी लिजीए… म्हणत त्यांनी मलाही चहा द्यायला सांगितला. मग आमच्या गप्पांना चहाची साथ मिळाली. काय होईल २०१९च्या निवडणुकीत असं वाटतं तुम्हाला… तुम्ही देशभर हिंडत असता. लोकांशी बोलत असता. परिस्थिती जवळून अनुभवत असता. तेव्हा तुम्हाला काय वाटतं साधारण परिस्थिती कशी आहे, असं विचारून मी चर्चा त्या दिशेनं वळविली. पूर्ण अंदाज तर अजून आलेला नाही. निश्चित काहीच सांगू शकत नाही. पण एकमात्र नक्कीय, की परिस्थिती कठीण आहे. २०१४ इतकी सोपी नक्कीच नाही. पण कदाचित मध्येच अडकतील, असं वाटतं, असं ते म्हणाले. शायद बीच में अटक जाएंगे… हे गोविंदजींचे शब्द. २२०-२२५ वर थांबतील, असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा ते म्हटले, की नरेंद्र इतनी आसानी से हार नही मानेगा. फिर भी थोडा मुश्किल लगता है… 


गोविंदजींशी बोलताना आपण एका प्रचंड वाचन असलेल्या अभ्यासू माणसाशी बोलत आहोत, याची जाणीव सातत्याने होत होती. त्यामुळं एक वेगळंच दडपणही होतं. मी बाहेर वाट पाहत होतो, तेव्हा ते समारोपाच्या (पूर्णाहुती सत्र) भाषणाचे मुद्दे काढत होते. किती पूर्वतयारी नि बारीक गोष्टींचा विचार. अशा सर्व गोष्टींमुळे दडपण अधिकच वाढत होतं. पण हीच संधी आहे, असं समजून मी बोलणं सुरू ठेवलं. मग आमची गाडी वळली त्यांच्या पूर्वजीवनाकडे… गोविंदजी मूळचे बिहारचे. त्यांचे आई-वडील दोघेही तमिळ. त्यामुळे घरी तमिळ बोलतात. पण व्यवहारातील भाषा हिंदी असल्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे, असं ते सांगत होते. वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठातून एमएस्सी झालेले गोविंदजी हे १९६५मध्ये प्रचारक म्हणून बाहेर पडले. भविष्यात भागलपूरचे विभाग प्रचारक बनले.

आणीबाणीच्या काळात ते काही महिने तुरुंगात होते. अटक टाळण्याचे पुरेपूर प्रयत्न केल्याचे ते सांगतात. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मला आवर्जून सांगितले होते, की काहीही कर पण अटक होऊ नकोस. खूप प्रयत्न केले, पण शेवटी मला अटक झालीच. आणीबाणीनंतर मला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करायला सांगण्यात आले. मग पुढची दहा-बारा वर्षे तिथं होतो. दाक्षिणात्य पार्श्वभूमीमुळे दक्षिण भारतातही त्यांनी संघ परिवाराचे काम वाढविण्याचा प्रयत्न केला. नंतर १९८८ साली भारतीय जनता पार्टीचे काम कर, असे मला सांगण्यात आले. मग भाजपाचे काम सुरू केले. त्यानंतरची त्यांची कारकि‍र्द बऱ्यापैकी लोकांसमोर आहे. माहिती आहे.

गोविंदाचार्य यांना लालकृष्ण अडवाणी यांनीच भाजपामध्ये आणले आणि जबाबदारी दिली. अडवाणी यांच्या राम रथयात्रेच्या नियोजनात गोविंदाचार्य यांचाही सहभाग होता. पत्रकारांच्या भाषेत सांगायचं तर गोविंदजी अडवाणी गटाचे. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी केलेले वक्तव्य बरेच गाजले आणि सारे ग्रह फिरले. अटलजी हे फक्त चेहरा आहेत आणि बहुतांश निर्णय लालकृष्ण अडवाणीच घेतात, हे त्यांचे वक्तव्य बरेच गाजले. त्यावरून वादही झाले. वाजपेयी देखील बरेच नाराज झाले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला वगैरे खुलासा गोविंदजींनी केला. पण अटलजींना तो खुलासा रुचला नाही. अखेरीस भाजपामधून गोविंदजींची गच्छंती अटळ असल्याचे स्पष्ट झाले. मग त्यांनी दोन वर्षे स्टडी लीव्ह घेतली आणि राजकारणापासून दूर गेले. अर्थात, गोविंदजी त्या एपिसोडबद्दल बोलताना फारसे कम्फर्टेबल नव्हते. मी काहीच चूक बोललो नव्हतो, इतकेच बोलून थांबले. 


एव्हाना त्यांच्याबरोबरचा कार्यकर्ता रूममध्ये आला होता. तो चर्चेत सहभागी होत म्हणाला, अडवाणीजी ने आपका साथ नही दिया. आप के उपर अन्याय किया. उमाजी पे भी उन्होने अन्याय किया. मुख्यमंत्रीपद से हटा दिया. उनको आपकी कदर नही है… वगैरे वगैरे. त्याला गोविंदजींना मध्येच तोडले. अरे, भाई ऐसा मत कहो. अडवाणीजी ने मेरे लिए बहुत कुछ किया है. और तब उनका कोई कसूर नही था. उन्होने सारी जिंदगी पार्टी के लिए समर्पित की है. उनके बारे में ऐसा बोलने का हमे कोई अधिकार नही है. कृपा करके ऐसी बात ना करो… आपल्या मनात नेत्याबद्दल किंवा पक्षाबद्दल कोणतीच कटुता नाही, हे गोविंदजी स्पष्ट करत होते.  

भाजपच्या जबाबदारीपासून मुक्त झाल्यावर दोन वर्षे मी स्टडी लीव्ह घेतली. त्यात विविध विषयांवर अभ्यास केला. प्रामुख्याने भर होता जागतिकीकरणाचा भारतातील नागरिक, राजकारण, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यांच्यावर काय परिणाम झाला यावर. त्यासाठी देशभर हिंडलो. लोकांशी बोललो. नंतर तीन वेगळ्या संघटनांची स्थापना केली. भारत विकास संगम. ही संघटना स्वदेशी केंद्रित विकास आणि विकेंद्रीकरणाचे समर्थन करणाऱ्या आर्थिक व्यवस्थेची उभारणी करण्याचा विचार करते. कौटिल्य शोध संस्थान. भारताच्या अनुषंगाने विकास आणि खेड्यांचे सक्षमीकरण याबाबत इथे संशोधन होते. आणि तिसरे राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन. लोकविरोधी तसेच पर्यावरणविरोधी योजना नि निर्णयांचा विरोध या संघटनेमार्फत केला जातो. त्यासाठी निरनिराळ्या मार्गांचा वापर करण्यात येतो. कोणतीही राजकीय आकांक्षा न ठेवता हे राजकीय आंदोलन काम करते. राजकीय-सामाजिक आंदोलने, अभ्यास गट नि जनतेशी संवाद साधून विविध प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही सर्व कामे संघात राहून करणे शक्य नव्हते. संघ सांगेल ते काम मला करावे लागले असते. म्हणून मी प्रचारक म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला, असे ते सांगतात.


प्रचारक म्हणून थांबायचे असेल, तर मग तुम्हाला संघाकडून मिळणारा खर्च आणि बाकी व्यवस्था सोडाव्या लागतील, असं मला सांगण्यात आलं. मी प्रचारक म्हणून थांबलो आणि नंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. इतकी वर्षे संघातील विविध संस्थांचे काम केल्यानंतर आता काय वाटते. संघाबरोबरचे संबंध कसे आहेत. आज स्वतःला काय मानता तुम्ही… माझ्या प्रश्नावर उत्तरले, अरे भाई, मी संघाचा प्रचारक म्हणून काम करणे थांबविले आहे. पण आजही स्वयंसेवक म्हणून आहेच की. स्वयंसेवकत्व मी कुठे नाकारलं आहे आणि आजही संघाच्या काही अधिकाऱ्यांशी माझे बोलणे होत असते. माझा कोणावरही राग नाही. जे मला आजवर जे काही मिळाले, त्यात मी समाधानी आहे.

आतापर्यंत तुम्हाला पुन्हा रचनेमध्ये काम करण्यासाठी सामावून घेण्याचा एकही प्रयत्न झाला नाही का, असं मी विचारलं. तेव्हा म्हणाले, की एकदा अडवाणी यांनी मला पुन्हा भाजपामध्ये येण्यासंदर्भात विचारले होते. एस. गुरूमूर्ती हे त्यावेळी मध्यस्थी करीत होते. ज्या दिवशी अडवाणी यांच्याशी माझी भेट होणार होती, त्याच दिवशी सर्व वाहिन्यांवर माझा बाईट झळकत होता. सर्वच पक्षाचे नेते एकसारखे आहेत. कोणीच वेगळा नाही. त्यात मी भाजपाच्या काही धोरणांवर टीका केली होती. विमानतळावर उतरल्यानंतर मीच तो वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला होता. कारण माझं ते मत होतं. त्या दिवशीची आमची (म्हणजे गोविंदजी आणि अडवाणी यांची) पूर्वनियोजित भेट झाली नाहीच. उलट गुरूमूर्तीने भेटीबाबत विचारायला मला फोन देखील केला नाही. मी काय समजायते ते समजून गेलो. मला देखील जे वाटते ते न बोलता राहून काम करण्याची आवश्यकता वाटत नव्हती.

एव्हाना आमची गाडी अडवाणींच्या ट्रॅकवर आली होती. अडवाणींची आजची हालत पाहवत नाही, अशी खंत गोविंदजी बोलून दाखवितात. मात्र, त्यांच्या या परिस्थितीला तेच जबाबदार आहेत. अगदी खरं सांगायचं तर २००५मध्येच मी अटलजी आणि अडवाणी यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा आणि पुढील पिढीकडे सूत्र सोपवावी, असं जाहीर आवाहन केलं होतं. तसं झालं असतं तर त्यांनी लोकमन जिंकले असते आणि वेळीच बाजूला झाल्याचा पक्षाला फायदा देखील झाला असता. पण अडवाणींनी तसे केले नाही. जिना प्रकरणानंतर त्यांना परिवारातून मिळालेली वागणूक फारशी चांगली नव्हती. पण तरीही अडवाणी राजकारणात कायम राहिले. वास्तविक पाहता, जिना प्रकरणात ते चुकीचे काहीच बोलले नव्हते. पण ते चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. पण तो इतिहास आहे. सांगायचा मुद्दा हा की त्यांनी थांबायला हवे होते. आज त्यांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत आहे ती न थांबल्यामुळेच. अडवाणींची आजची हालत पाहून खूप वाईट वाटते. एकेकाळचा अडवाणींचा खंदा समर्थक हतबलपणे सांगत होता.

जवळपास पाऊणतास गप्पा झाल्या होत्या. एव्हाना पूर्णाहुति सत्राचा निरोप आला होता. आमच्या गप्पा पुढे तशाच सुरू राहिल्या असत्या. पण कार्यक्रमाला जायचे होते. मग आम्ही थांबलो आणि कार्यक्रमाच्या दिशेने निघालो. कार्यक्रमात अत्यंत वरच्या दर्जाचं भाषण गोविंदजींनी भाषण केलं. मोजक्या शब्दात आणि नेमून दिलेल्या वेळेत. फक्त भारतातच नाही तर जागतिक स्तरावर बदलती परिस्थिती, आर्थिक विषमता, खेड्यांकडून शहरांच्या दिशेने होणारे स्थलांतर, सोशल माध्यमांचा वाढता प्रभाव, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, राजकीय इच्छाशक्ती आणि बरेच काही. समारोप झाल्यानंतरही लोकांचा त्यांच्याभोवतीचा घोळका आणि सेल्फीपुराण कायमच होते. संध्याकाळचा चहा-नाश्ता करायला ते थांबले होते. ते झाल्यानंतर मग रात्री त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्याकडे भोजनासाठी निघून गेले.


प्रवासादरम्यान वाट वाकडी करून पुण्याला जरूर या, असं आग्रहाचं निमंत्रण मी त्यांना दिलं आणि मी नि विश्वनाथनी त्यांचा निरोप घेतला.