महाराष्ट्राच्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण
अमेरिकेच्या तुलनेत भारतातील नवोदित बास्केटबॉलपटूंचे कौशल्य आणि वेग कमी असेल; परंतु खेळाच्या ओढीमुळे ते तब्बल वीस-वीस तास प्रवास करून येथे आले आहेत, ही गोष्टच भारावून टाकणारी आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आणि प्रशिक्षक जे. डी. वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉलपटूंचे कौतुक केले.
महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 80 हून अधिक खेळाडू आणि 35 प्रशिक्षक उपस्थित आहेत. अमेरिका, इटली, चीन, इस्राईल येथे वॉल्श यांनी बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या खेळाडूंना पाच दिवस प्रशिक्षण देण्यास पुण्यात आलेले वॉल्श एकही रुपया मानधन म्हणून घेणार नाहीत. अपूर्व सोनटक्के याच्या प्रेमापोटीच आपण येथे आलो, असल्याचे वॉल्श यांनी आवर्जून सांगितले.
बॉस्केटबॉलपटूंची उंची किती व वजन किती आहे, यापेक्षाही खेळाडूंचे "बॉल हॅंडलिंग' कसे आहे, चेंडू "बास्केट' करण्याची पद्धत कशी आहे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. थोडेसे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले तर कमी उंचीचे खेळाडू घेऊनही सामने जिंकता येतात. त्यामुळेच येथे उंचीपेक्षा विविध कौशल्ये अधिक उपयुक्त आहेत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी बास्केटबॉलची मूलभूत कौशल्ये अंगी बाणवली पाहिजेत. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे वॉल्श यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण ठेवणे, पास देणे, चेंडू जाळीत टाकणे आदी मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षकांना संघनिवड कशी करावी, खेळाडू कसे बदली करावेत, खेळापूर्वी व सामना सुरू झाल्यानंतर रणनीती कशी आखावी, आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातील प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर काश्मीरमधील अनाथ मुलांना बास्केटबॉलची तोंडओळख करून देण्यासाठी वॉल्श हे जम्मू-काश्मीर येथे जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईच्या झोपडपट्टीमधील मुलांनादेखील बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्याची इच्छा वॉल्श यांनी व्यक्त केली.
दहाव्या मिनिटाला पाणी...
जेम्स डेव्हिड वॉल्श यांनी शिबिरासाठी आलेल्या खेळाडूंचा सराव घेण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या टप्प्यात खेळाडूंचे "वॉर्मअप' सुरू होते. त्या वेळी वॉल्श पाचव्याच मिनिटाला खेळाडूंचा घाम काढला. त्यानंतर आठव्या मिनिटानंतरच खेळाडूंचा "स्टॅमिना' संपला आणि त्यांनी पाण्याच्या बाटल्या मागण्यास सुरवात केली. दहाव्या मिनिटाला पाणी मागितल्यामुळे वॉल्श यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चाळीस मिनिटांच्या खेळासाठी किमान 80 मिनिटे सलग खेळण्याची तयारी ठेवावी लागते, असे सांगत वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना "स्टॅमिना' वाढविण्याचा सल्ला दिला.
मी स्वतः जवळ जवळ १२ वर्षे बास्केटबॉल खेळलो आहे. त्यामुळे बास्केटबॉलच्या प्रगतीसाठी होत असलेल्या या योजनेबद्दल ऐकुन मला बर वाटल. क्रिकेट कडे जाणार्या पैश्यांच्या नदीचा एखादा कालवा जरी इतर खेळांकडे वळवता आला तरी भारताला आंतर-राष्ट्रीय स्पर्धांमधे एखाद-दुसर पदक मिळु शकेल.
ReplyDelete