Monday, July 09, 2007

लक्षात राहणारे चंद्रशेखर...

प्रभावी वक्ता आणि साधा नेता

अर्थसंकल्पावरील चर्चा असो, विश्‍वासदर्शक किंवा अविश्‍वासाचा ठराव असो अथवा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित विशेष अधिवेशनातील मंथन असो... दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे देशातील अनेक नेत्यांची भाषणे घरबसल्या ऐकायची संधी प्रत्येकाला प्राप्त झाली. त्यात लहानपणापासून राजकारणात रस असल्यामुळे ही भाषणे ऐकणे हा माझा आवडता उद्योग झाला होता. पण याचा निश्‍चितच खूप फायदा झाला.

इंद्रजित गुप्त आणि सोमनाथ चॅटर्जी यांचे ओघवत्या इंग्रजीतील काहीसे बोजड पण प्रचंड माहितीपूर्ण भाषणे ऐकता आली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सुमधूर हिंदीमधील आवेशपूर्ण भाषण टीव्हीवरुन ऐकण्या-पाहण्याची संधी मिळाली. जॉर्ज फर्नांडिस पुराव्याच्या आधारे कसे आसूड ओढतात आणि लालू प्रसाद त्यांच्या बिहारी ढंगामध्ये विरोधकांची कशी दांडी गुल करतात, याचे प्रत्यक्ष दर्शन दूरदर्शनवर घडले. या साऱ्या गदारोळात दूरदर्शनमुळे आणखी एक फायदा झाला आणि तो म्हणजे चंद्रशेखर यांच्यासारख्या महान नेत्याची उंची अनुभवता आली.

सुरवातीला अनेक कंटाळवाणी भाषणे झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मोठ्या नेत्यांची भाषणे हा संसदेचा पायंडा ठरलेला. त्यामुळे अखेरची काही भाषणे हटकून ऐकायची हे ठरलेले. बहुतेक वेळा राजेश पायलट किंवा रघुवंश प्रसाद यांची भाषणे झाल्यानंतर चंद्रशेखर भाषणाला उभे रहायचे. एकदा का चंद्रशेखर भाषणाला उभे राहिले की, सभागृहात निरव शांतता पसरायची. प्रत्येक जण चंद्रशेखर काय म्हणतात ते ऐकण्यासाठी उत्सुक असायचा.

अशा परिस्थितीत एकेका मुद्‌द्‌याला हळूहळू हात घालत चंद्रशेखर यांची गाडी पुढे सरकायची. चंद्रशेखर यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीही हातात कागद घेऊन बोलले नाहीत. कधीही कागदावर मुद्दे काढून ठरवून मुद्देसूद भाषण केले नाही. पण चंद्रशेखर यांची वक्तृत्वावरील पकड इतकी जबरदस्त होती की कोणतीही परिस्थिती असली तरी त्यांचे भाषण मुद्देसूद व्हायचेच. चंद्रशेखर मुद्‌द्‌याला सोडून भरकटले आहेत, असे कधी झाले नाही. किमान माझ्या "ऐकिवात' नाही. त्यांचे भाषण केवळ सर्वसामन्यांना ऐकण्यासाठी उपयुक्त होते असे नव्हे. तर खासदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विचार चंद्रशेखर भाषणातून मांडत. पण, फक्त माल आणि मलिदा यांच्याशीच इमान ठेवणाऱ्या खासदारांनी त्यांची भाषणे कधीच गांभीर्याने घेतली नाहीत, हा भाग अलहिदा. पण पुन्हा पुढच्या वेळी भाषणाला उभे राहिल्यानंतर चंद्रशेखर तितक्‍याच पोटतिडकीने बोलायचे.

चंद्रशेखर यांचे भाषण कितीही गंभीर विषयावर असले तरी त्यांची गाडी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिशेने हमखास वळणारच. मग वाजपेयी विरोधी बाकांवर असो किंवा सत्ताधारी बाकांवर. वाजपेयीदेखील चंद्रशेखर यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थिती असायचे. ""वाजपेयीजी तुम्ही माझे गुरु आहात. आपणासारख्या नेत्यांच्या मार्गावर व मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करीत आहोत,'' हे चंद्रशेखर यांचे वाक्‍य तर भाषणात ठरलेले असे. मग आपल्या शिष्याला उद्देश्‍यून वाजपेयी म्हणत,""मी तुमचा गुरु आहे तर गुरु एका पक्षात आणि शिष्य दुसऱ्या पक्षात हे कसे चालायचे. तुम्ही माझ्या पक्षात या. म्हणजे तुम्ही माझे शिष्य शोभून दिसाल.'' त्यावर चंद्रशेखर प्रत्युत्तर देत की, अटलजी तुम्हाला तर माहिती आहे. तुमच्या पक्षाचे आणि माझे जमणे शक्‍य नाही. पण तरीही तुम्ही माझे गुरु होता, आहात आणि रहाल. त्याला तुम्ही बाधा पोचवू शकत नाही. चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर मग सभागृहात हास्याची कारंजी उडायची.

चंद्रशेखर यांची आणखी एक आठवण म्हणजे परंदवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता आलेला प्रत्यक्ष भेटीचा योग. समाजवादी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी परंदवाडी (ता. मावळ) येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराच्या उद्‌घाटनासाठी चंद्रशेखर येणार होते आणि त्या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी मला जाण्याची संधी मिळाली होती. माजी पंतप्रधान असलेला हा माणून खादीचा पांढरा सदरा, खादीचे धोतर आणि पायात साधी चप्पल अशा पोशाखात आला होता. बरं खादीचे कपडे असले तरी स्टार्च व कडक इस्त्री हे बहुधा चंद्रशेखर यांना मान्य नसावे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कपडे काहीसे चुरगळलेले होते.

चंद्रशेखर तेथे आल्यानंतर इतका साधा माणूस अपघाताने का होईना पण देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो, याचे प्रथमतः आश्‍चर्यच वाटले. इतकी वर्षे दूरदर्शनवर चंद्रशेखर यांचे भाषण ऐकलेले. पण त्यादिवशी त्यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्याचे योग आला आणि तेव्हाही त्यांचे भाषण तितकेच प्रभावी ठरले. कार्यकर्त्यांनी शिकल्यानंतर किमान काही वर्षे आपल्या देशासाठी सामाजिक काम करावे, हा त्यांच्या भाषणाचा सूर होता.

चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आणखी एक आठवण वृत्तपत्रातून वाचण्यात आली होती. त्यावेळी हवाला घोटाळ जोरात होता आणि अनेक राजकीय नेत्यांची नावे हवालातील एका डायरीत आढळली होती. त्या डायरीमध्ये एल. के. अशी दोन अक्षरे लिहिलेली होती. त्यामुळे एल. के. म्हणजेच लालकृष्ण (एल. के.) अडवानी यांनी हवालात पैसे घेतले असे आरोप त्यांच्यावर झाले. फक्त इतकेच कारण झाले आणि लालकृष्ण अडवानी यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला.

त्यावेळी चंद्रशेखर यांनी अडवानी यांच्याबद्दल म्हटले होते की, ""संसदेतील असे अनेक खासदार तुम्हाला मिळतील की ज्यांनी संसदेच्या कॅंटिनचे बिल थकविलेले आहे. पण अडवानी असे खासदार आहेत की ज्यांनी एकदाही कॅंटिनचे बिल थकविलेले नाही. जो माणूस कॅंटिनचे बिल भरण्यात इतकी तत्परता दाखवितो. दुसऱ्याकडून पैसे खाईल याच्यावर माझा तरी विश्‍वास नाही.''

पुढे अडवानी हवाला खटल्यातून निर्दोष मुक्त झाले देखील. पण माझ्यावरील ओरापांचे मळभ दूर होण्यापूर्वी चंद्रशेखर यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याने दिलेल्या प्रशस्तिपत्रामुळे मला खूप धीर आला, अशी प्रतिक्रिया खुद्द अडवानी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. प्रभावी वक्ते, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा विचार प्रत्यक्षात आणणारे आणि कधीही एखादे मत व्यक्त करण्यास न डगमगणारे चंद्रशेखर आता आपल्यात नाहीत. जेव्हा केव्हा संसदेचे अधिवेशन सुरु होईल तेव्हा त्यात चंद्रशेखर दिसणार नाहीत, ही खंत कायम मनामध्ये राहते.

5 comments:

  1. Dear Ashish
    right observations made by u.wonderful piece.
    nicely written..........

    - sunjay awate

    ReplyDelete
  2. Anonymous2:05 pm

    dear ashishji,
    read ur article on chandrasekharaji with whom i fortunately
    had an opportunity to spare more or less an hour. he was a man of sound academic capacity and wonderful memory.

    i am impressed by your lucid, graphic and succinct writing style.
    as well the hold over marathi language. such serious work gives
    immense satisfaction to the writer and reader too. its value as
    document of reference is the an added advantage.
    i feel honored that u referred it to me. Thanx.
    regards,
    pradeep Gawande

    ReplyDelete
  3. Anonymous2:06 pm

    Liked your blog. I have also liked blog of ravish kumar. Visit www.naisadak.blogspot.com. Highly recommended !

    Prakash Dandge

    ReplyDelete
  4. Anonymous2:07 pm

    KHARACH MALA EVADHE CHANDRASHEKHAR YANCHYA BADDAL MAHIT NAVATE
    TE APLYA BLOG MULE MAHIT ZALE
    THANK U FOR THIS INFORMATION!!!!!!!

    Chetan Vaishampayan

    ReplyDelete
  5. chaan...

    lekh ani mahiti avadali....mala chandrashekhar yanchyabaddal far mahiti navati pan te itar samajavadyanpeksha vegale bhasat he khare..

    ReplyDelete