Friday, December 21, 2007

400 हून अधिक डिश

खवय्यांची तबीयत "खूष' करणारे "खुशबू'!
खवय्यांना खूष ठेवण्यासाठी वेगळ्या डिश तयार करणारे रेस्तरॉं, अशी "खुशबू'ची ओळख करून द्यावी लागेल. वैविध्यपूर्ण व चविष्ट खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतरही खिशाला जास्त चाट बसत नाही, असा अनुभव आपल्याला "खुशबू'तून बाहेर पडताना येतो. काही वर्षांपूर्वी हिराबाग येथे सर्वप्रथम "खुशबू' सुरू झाले. नंतर "खुशबू'ने धनकवडीला स्थलांतर केले. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर "खुशबू रेस्तरॉं'ची शाखा आहे.

"खुशबू'मध्ये जसे वेगळ्या डिशचे पर्याय उपलब्ध आहेत, तसे जेवण्यासाठी बसायचे कुठे, यासाठीही तीन पर्याय आहेत. पहिला म्हणजे हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतरचा "गार्डन'चा! आजूबाजूला शोभेची झाडे व एका कडेला पावभाजी व तवा पुलाव यांचा स्टॉल, छताला टांगलेल्या फळांच्या माळा व प्लॅस्टिकच्या लाल-पिवळ्या खुर्च्या असे अगदी "टिपिकल' वातावरण "गार्डन'मध्ये आहे. थंडगार हवेत बसून गरमागरम जेवण घ्यायचे असेल तर "गार्डन' एकदम "बेस्ट'!

नाहीतर मग आतमध्ये जाऊन "कुशन'चा सोफा अथवा खुर्च्यांवर आरामत बसून निवांत आस्वाद घ्या. "इंटेरिअर' देखील एकदम झकास आहे. लाकडी कलाकुसर, वेगवेगळ्या विषयांवरील पेंटिंग आणि आपल्याला हवा तितका उजेड ठेवता येईल, अशी प्रकाशरचना यामुळे आतही "बोअर' होत नाही. मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाइकांना "पार्टी' द्यायची असेल तर मग वातानुकूलित हॉलच बुक करून टाका! तेथे 28 जण एकावेळी जेवू शकतात.

सदाशिव सॅलियन हे "खुशबू'चे मालक. सॅलियन मूळचे उडुपीचे; पण लहानपणापासून वास्तव्याला पुण्यात. त्यांनी "रेस्तरॉं'मध्ये पडेल ते काम करण्यापासून सुरवात केली. विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे "रेस्तरॉं' थाटले.

"खुशबू'मध्ये मुळातच गरम मसाला व तेल कमी टाकून खाद्यपदार्थ तयार केले जातात. भाज्या शिजविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी फेकून न देता ग्रेव्ही, करी अथवा सूप तयार करताना ते वापरले जाते. त्यामुळे भाज्यांमधील सत्त्व वाया जात नाही. पदार्थ तयार करताना कृत्रिम रंग न वापरता भाज्यांपासूनच हिरवा, लाल किंवा तपकिरी असे रंग तयार करतात, असे सॅलियन यांनी स्पष्ट केले.

चायनीज, पालक आणि बेबीकॉर्न सूप अशा अनेक "व्हरायटी' येथे उपलब्ध आहेत; पण सॅलियन यांच्या आग्रहावरून आम्ही जिंजर लेमन हे पचनास उपयुक्त आणि "ऍसिडिटी' घटविणारे पेय घेऊन उदरभरणाची सुरवात केली. थोडासा बदल म्हणून असा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही.

"" "इडली चिली फ्राय' हा पदार्थ पुण्यात सर्वप्रथम आम्ही तयार केला आणि नंतर मग इतर रेस्तरॉंमध्ये तो मिळू लागला. मग आम्ही "इडली शेजवान' या आणखी एका नव्या पदार्थाची निर्मिती केली. आम्ही नेहमीचे पदार्थ देत असतानाच अशा पद्धतीने नव्या "डिश' तयार करतो,'' असे सॅलियन सांगतात. "इडली शेजवान'मध्ये इडलीचे छोटे तुकडे "कॉर्न फ्लॉवर'मध्ये "डिप' करून तपकिरी होईपर्यंत तळून घेतले जातात. मग ते "शेजवान सॉस'मध्ये घोळून इतर सॉसेस टाकून "सर्व्ह' केले जातात. "स्टार्टर'मध्ये ही "खुशबू'तील सर्वात वेगळी डिश!

"व्हेज मुमताज', "व्हेज लाहोरी', "व्हेज मिलीजुली' व "मेथी चमन' यांच्यासह एकूण 45 वेगवेगळ्या पंजाबी डिश येथे उपलब्ध आहेत. पनीर व मश्रुमचे पदार्थ स्वतंत्रपणे "मेनूकार्ड'मध्ये देण्यात आले आहेत. शेजवान सॉस वापरून तयार केलेली "पनीर शेजवान चिलीमिली' ही लालभडक मिक्‍स भाजी, काजू तसेच "व्हाईट ग्रेव्ही'सह "सर्व्ह' केला जाणारा पनीर तवा स्पेशल व पनीरचे बारीक तुकडे "कॉर्नफ्लॉवर'मध्ये "डिप' करून नंतर ते तळून "स्पायसी ग्रेव्ही'सह वाढला जाणारा "पनीर घुंगरू' विशेष लोकप्रिय.

मश्रुमच्या यादीत "मश्रुम शबनम', "मश्रुम बटर मसाला', "मश्रुम हंडी', "मश्रुम पालक', "मश्रुम पनीर', "मश्रुम करी' व "बेबी कॉर्न मश्रुम मसाला' अशी "व्हरायटी' आहे. आम्ही "व्हेज मराठा' आणि "व्हेज गार्डन' या वेगळ्या भाज्या खाण्यासाठी उत्सुक होतो. त्यामुळे "स्टाटर' न मागविता आम्ही "मेन कोर्स'कडे वळलो.
"व्हेज कोल्हापुरी'चे नाव बदलून "व्हेज मराठा' असे बारसे केले आहे की काय, अशी शंका आपल्याला येते; पण तसे नाही. "व्हेज मराठा' म्हणजे सर्व भाज्या उकडून त्यांचे पकोडे तयार केले जातात. मग ते "ग्रेव्ही'मध्ये "डिप' करून त्यावर लाल मिरचीचा तडका मारला जातो. "व्हेज कोल्हापुरी'इतकीच तिखट पण एकदम वेगळी पद्धत त्यामुळे ही "डिश' आम्हाला प्रचंड आवडली. आम्ही मागविलेली "व्हेज गार्डन' ही "डिश' देखील पसंतीस पडली. हिरवा, तपकिरी आणि लाल अशा तीन रंगांमधील तीन वेगळ्या चवींच्या भाज्या एकाच "डिश'मध्ये मिळतात.

पंजाबी, चायनीज, इडली, डोसा, उत्तप्प्याचे विविध प्रकार, पिझ्झा, पास्ता आणि सॅंडविच यांच्यासह आइस्क्रीम, मिल्कशेक, ज्यूस आणि फालुदा यांच्या 400 हून अधिक डिशमधून आवडीचे पदार्थ निवडता येतात. शिवाय चौघांच्या कुटुंबाला सूप, "स्टार्टर', रोटी-सब्जी, राइस व आइस्क्रीम अशा भरगच्च जेवणाचे बिल तीनशे ते साडेतीनशे रुपये येते.

खुशबू फॅमिली रेस्तरॉं
बिबवेवाडी-कोंढवा रस्ता,
पुणे - 411037.
020-24275573, 24275266

No comments:

Post a Comment