मंगेशकरांचे "फॅमिली रेस्तरॉं'
आपण आज आलो आहोत पुण्यातील पहिल्या "सेलिब्रिटी रेस्तरॉं'मध्ये! पण औंध भागात बरोबर 11 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या "सर्जा'ची ओळख "सेलिब्रिटी रेस्तरॉं' पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. चविष्ट पदार्थ आणि कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पूरक वातावरण यामुळे "सर्जा' आता "फॅमिली रेस्तरॉं' बनले आहे.
लतादीदी येथील दाल-खिचडी आवडीने खातात. बाळासाहेबांना मांसाहारी पदार्थ एकदम वर्ज्य. उषाताईंचे जेवण मात्र "चिकन तंदुरी' किंवा "फिश फ्राय'शिवाय पूर्णच होत नाही. आशाताईंची "स्टाईल'च हटके. आशाताई तर भटारखान्यात जाऊन मालवणी पद्धतीने मासे कसे बनवायचे याचे धडे स्वयंपाकी मंडळीना देतात. हे "रेस्तरॉं' मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. त्यामुळेच त्यांची "सर्जा'वर इतकी मर्जी आहे.
सुरवातीला "सर्जा'चा नावलौकिक सर्वदूर पोचविण्यासाठी मंगेशकरांच्या पुण्याईचा उपयोग झाला. नंतर पदार्थांची चव व वातावरण यामुळे खवय्या ग्राहकांचा "फ्लो' टिकवून ठेवणे व्यवस्थापक रणजित शेट्टी यांना शक्य झाले. "सर्जा' म्हणजे सिंह. हे नाव स्वतः लतादीदींच्या आग्रहावरून देण्यात आले होते. अर्थात, हे "रेस्तरॉं' मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचे आहे, हे सांगितल्याशिवाय कळत नाही. लतादीदी किंवा इतर भावंडांची पेंटिंग्ज किंवा छायाचित्रे भिंतीवर न लावता आवर्जून मिलिंद मुळीक यांच्या निसर्गचित्रांना भिंतीवर स्थान देण्यात आले आहे. अर्थात, हा निर्णयही खुद्द दीदींचाच! "रेस्तरॉं'मध्ये कायम "वर्ल्डस्पेस' रेडिओवरील संगीत कायम सुरू असते.
"सर्जा' हे पूर्णपणे "नॉर्थ इंडियन' आहे. त्यामुळे व्यवस्थापन शेट्टी यांच्याकडे असले तरी येथे इडली-डोसा आणि तत्सम दक्षिण भारतीय पदार्थांना "मेन्यू कार्ड'मध्ये स्थान नाही. उत्तर भारतीय पद्धतीने तयार केलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थ हीच येथील खासीयत. चिकन, मटण व माशांचे विविध प्रकार येथे उपलब्ध असले, तरी "सर्जा' विशेष प्रसिद्ध आहे "पंजाबी डिशेस'साठीच!
"पालक सूप' हा सध्या अनेक ठिकाणी मिळणारा पदार्थ देण्यास आम्ही सुरवात केली, हे शेट्टी आवर्जून सांगतात. त्यामुळे "पालक सूप' घ्याच, असा त्यांचा आग्रह! पंजाबी पदार्थांमध्ये पनीरचे पदार्थ हे "सर्जा'चे वैशिष्ट्य. आपण पनीर खातो की बटर असा अनुभव पनीरची सब्जी खाताना आला नाही, तरच नवल. पनीरच्या जोडीला "सरसू का साग' आणि "मक्के की रोटी' हा अस्सल पंजाबी पदार्थही "झकास'.
आम्ही मात्र, "लसूनी तवा डिंगरी' ही मशरूमची डिश मागविली. लसूण म्हणजे उग्र. पण येथे मशरूमच्या भाजीला लसणाची अगदी हलकी फोडणी दिलेली असते. त्यामुळे लसणाची चव लागते; पण त्याच्या उग्रपणाचा त्रास होत नाही. "मकई मिर्च मसाला' ही डिशही विशेष लोकप्रिय आहे. स्वीट अमेरिकन कॉर्न व सिमला मिरची यांच्यापासून तयार केलेल्या व "रेड ग्रेव्ही'मधून "सर्व्ह' केल्या जाणाऱ्या या "डिश'चे "रेटिंग' प्रथमपासूनच "हाय' आहे.
दाल किंवा पालक खिचडी ही खुद्द लतादीदींची आवडीची "डिश'. अर्थात, इतर खवय्या मंडळींची मनेही या "डिश'ने जिंकली आहेत. पण "मेन्यू कार्ड'मधील "दहीभात तडकावाला' हा पदार्थ लक्ष वेधून घेतो व त्याचीच "ऑर्डर' करायला भाग पाडतो. साधा पातळ दहीभातच, पण त्याला लाल मिरचीचा तडका दिल्यामुळे भाताला एकदम वेगळीच चव प्राप्त होते. "दहीभात तडकावाला' ही सर्व मंगेशकरांची समान आवडती "डिश'. मंगेशकर मंडळींच्या जेवणाचा शेवट दहीभातानेच होतो, असे शेट्टी सांगतात.
बाकी मग "नॉनव्हेज'मध्ये चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत. "स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात. त्यामुळे मासा खायचा तर "फिश तवा'च!
सॅलड व रायताचे नऊ-दहा प्रकार, "आईस टी' व "लिची विथ क्रीम' तसेच "लिची विथ आईस्क्रीम' यांनाही विशेष मागणी असते. साधारणपणे शंभर जण एका वेळी बसू शकतात, अशी व्यवस्था येथे आहे. त्यामुळे "वेटिंग'चा प्रश्न उद्भवत नाही. औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत; पण तरीही एकदा का होईना, मंगेशकरांच्या या आवडत्या "रेस्तरॉं'मध्ये जायलाच हवे.
"सर्जा रेस्तरॉं',
127-2 सानेवाडी,
आयटीआय रस्ता,
औंध,पुणे - 411007.
वेळ ः दुपारी 12 ते 3.30
व सायंकाळी 7 ते 11.30
Hi I read u r article about sarja restaurant it was nice and cool.
ReplyDelete