डेक्कनच्या "सौंदर्य'ला चवीची जोड!
जंगली महाराज रस्ता आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) "रेस्तरॉं'ची काही कमी नाही. अगदी चायनीजपासून पंजाबीपर्यंत आणि पिझ्झा-पास्तापासून सिझलर्सपर्यंत सर्व पदार्थ आपल्याला या दोन रस्त्यांवरील "रेस्तरॉं'मध्ये मिळतात. पण अस्सल मराठी पद्धतीने बनविलेले घरगुती चवीचे मांसाहारी पदार्थ देणारे एकही "रेस्तरॉं' या ठिकाणी नाही. ही कसर भरून काढली आहे मुरकुटे बंधूंच्या "सौंदर्य'ने.
लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील "सौंदर्य'ची नवी शाखा नुकतीच रानडे इन्स्टिट्यूटसमोर सुरू झाली आहे. अगदी नावापासून वेगळेपण जोपासणाऱ्या "सौंदर्य रेस्तरॉं'ने दहा वर्षांपूर्वी शास्त्री रस्त्यावर शाकाहारी व मांसाहारी "रेस्तरॉं'ची सुरवात केली. खवय्यांच्या जिभेवर "सौंदर्य'ची चव रुळल्यानंतर त्यांनी डेक्कन परिसरात आणखी एक शाखा सुरू करण्याचा विचार केला व कल्पना प्रत्यक्षात उतरविली.
साधारण 90 ते 100 जण बसू शकतील इतकी प्रशस्त जागा व डेक्कनच्या परिसराला शोभेल अशी अंतर्गत सजावट या गोष्टी "सौंदर्य'च्या सौंदर्यात भर घालतात. शिवाय वातानुकूलित दालनाचा पर्यायही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे डेक्कनवर आल्यानंतर ग्राहकांना भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न बाळासाहेब मुरकुटे यांनी सोडविला असून "सौंदर्य'मध्ये पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. "सौंदर्य'चे व्यवस्थापन सागर व सूरज मुरकुटे यांच्याकडे आहे.
चिकन, मटण आणि माशांचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. असे असले तरी तितकेच चविष्ट शाकाहारी पदार्थ "सौंदर्य'मध्ये मिळतात. शाकाहारी-मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळी भांडी वापरतात, हे सर्वज्ञात आहे. पण येथे दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी आचारीही स्वतंत्र आहे. त्यामुळे शाकाहारी मंडळी अगदी निर्धास्तपणे येथील जेवणाचा आस्वाद लुटू शकतात. शास्त्री रस्त्यावरील "सौंदर्य' डेक्कनवर आले तरी चवीमध्ये फरक पडलेला नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य!
मटण ही "सौंदर्य'ची खासीयत! त्यातही मटण केशरी बिर्याणी आणि पुणेरी मटण हे दोन पदार्थ "मेन्यू कार्ड'मध्ये अगदी वेगळे वाटतात. मटण केशरी बिर्याणी तयार करण्याची पद्धत अगदी नेहमीसारखीच. ही बिर्याणी करताना साजूक तुपाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, हे "सौंदर्य'चे वेगळेपण. शिवाय या बिर्याणीमध्ये शेवटचा थर हा काजू, मनुका, बेदाणे आणि केशर यांचा असतो. त्यामुळे याला आपण "मटण ड्रायफ्रूट बिर्याणी' असेही म्हणू शकतो.
पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात.
"चायना राईस' हादेखील कमी ठिकाणी मिळणारा पदार्थ येथे मिळतो. मटण खिमा आणि अंडा भुर्जी तयार करून एकत्रितपणे परतली जाते. त्यानंतर त्यात बासमती राईस टाकून "चायना राईस' तयार होतो. काही ठिकाणी याला "छिना राईस'ही म्हणतात.
अस्सल शाकाहारी असाल तरी तुमच्यासाठी काही खास डिशेस येथे आहेत. पनीर बटर मसाला, बैंगन मसाला, बैंगन भरता, पनीर मटर मसाला आणि पालक पनीर अशा नेहमीच्या पदार्थांच्या जोडीला तंदुरी आलू, नसीली भेंडी आणि पनीर राजवाडी हे पदार्थ काहीसे वेगळे आहेत. नसीली भेंडी ही लालभडक "ग्रेव्ही'मधील भाजी अगदीच "टेम्प्टिंग' दिसते. तेलामध्ये भेंडी "फ्राय' करून घेतात. मग "फ्राय पॅन'मध्ये कांदा, टोमॅटो, ओले खोबरे, मसाला व ब्याडगी मिरचीपासून तयार केलेली "पेस्ट' हे पदार्थ एकत्र करतात. त्यामध्ये "फ्राय' केलेली भेंडी टाकून हे एकजीव होईपर्यंत परततात.
"पनीर राजवाडी'मध्ये पनीरचे मोठे तुकडे केले जातात. पनीरचे हे तुकडे कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळले जातात. तपकिरी रंगाचे झाल्यानंतर हे तुकडे बाहेर काढतात. मग "फ्राय पॅन'मध्ये कांदा-टोमॅटो, मसाल्याचे वाटण टाकून "ग्रेव्ही'चा बेस तयार केला जातो. मग पुन्हा एकदा पनीरचे तुकडे "शॅलो फ्राय' करून त्या "ग्रेव्ही'मध्ये टाकले जातात. वरून पुदिना पेस्ट आणि सिमला मिरचीचे बारीक तुकडे टाकून ते मिश्रण उकळले जाते. अशी ही "पनीर राजवाडी'देखील विशेष लोकप्रिय आहे.
सौंदर्य रेस्तरॉं,
लॅंड स्क्वेअर इमारत,
नामदार गोखले रस्ता,
डेक्कन जिमखाना,
पुणे.
वेळ स. 11.30 ते दु. 4 आणि सायं. 7 ते रा. 11.30.
No :- 9823034452
No comments:
Post a Comment