Tuesday, October 14, 2014

माझे मत शिवसेनेलाच... आजही आणि उद्याही...

नाही जातपात, हिंदुत्वाचा उघड स्वीकार...

शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंत तू कुणाला मत देणार, असे प्रश्न अनेकांनी विचारले. आजही विचारत आहेत. कारण शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विचारांनी जवळचे. एकीकडे खुद्द हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून स्थापन झालेला आणि त्याच विचारांवर वाटचाल करणारा पक्ष. (आणि महाराष्ट्रात जरी नसला तरीही राष्ट्रीय पातळीवर)

मात्र, अनेक जणांशी बोलून, आतली-बाहेरची माहिती जाणून घेतल्यानंतर मी ठाम भूमिकेपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आज लोकसत्तामध्येही तीच बातमी आली आहे. शिवसेनेला संपविण्याचा विडा घेऊनच अमित शहा आले होते आणि आहेत. त्यांना शिवसेनेला संपवायचेच आहे आणि बाळासाहेबांच्या भाषेत सोन्याची कोंबडी असलेल्या (आर्थिक राजधानी हा सभ्य शब्द) मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे. म्हणूनच त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातील सेनेचे अस्तित्त्व नष्ट करायचे असून एकहाती सत्ता उपभोगायची आहे.

शिवसेनेने १५१ जागांचा हट्ट सोडला नाही, म्हणून युती तुटली वगैरे भाजप नेते सांगत असले तरीही ते साफ झूट आहे. शिवसेना १५१ किंवा १५०, भाजपा १३० आणि मित्रपक्ष आठ असे गणित सहजपणे सुटू शकले असते. मात्र, मित्रपक्षांना कमी जागांचा बाऊ करीत भाजपाने युती तोडली. प्रत्यक्ष माहिती कोणीही घ्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांची ताकद (खरं तर औकात) दोन ते तीन जांगापेक्षा अधिक नाही. शिवसंग्रामच्या मेटेंना विधान परिषदेवर नेता आले असते. त्यामुळे हा तोडगा दृष्टीपथात असतानाही भाजपने मित्रपक्षांच्या नथीतून तीर मारत युती तोडली.

असो. झालं गेलं गंगेला मिळालं. यावर अधिक लिहिण्यात हशील नाही. मुळात लिहिण्याची इच्छाच नव्हती. मात्र, संघाचे अनेक स्वयंसेवक, भाजपाचे चाहते, मोदींचे आंधळेभक्त वाट्टेल ते लिहित आहेत. काश्मीरमधलं ३७० कलम हटविण्यासाठी राज्यसभेत बहुमत पाहिजे, म्हणून महाराष्ट्रात भाजपला मत द्या वगैरे वगैरे. त्यामुळं मला हे लिहावंसं वाटतंय. माझं मत शिवसेनेला का तेवढंच सांगतो. इतर गरळ ओकण्यात उपयुक्तता नाही.

१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून हिंदुत्वाचा विचार हा अस्तित्वात असला तरीही तो अधिक प्रखरपणे आणि वारंवार मांडला शिवसेनेनं. बाबरी मशीद पडल्यानंतरही ‘माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमानच आहे,’ हे विधान न डगमगता आणि बिनधास्तपणे जाहीर केलं, ते बाळासाहेबांनी. भाजपाचे नेते आणि संघाचे पदाधिकारी जाहीरपणे बोलण्यास आणि उघडपणे जबाबदारी स्वीकारण्यास किती तयार होते, हा संशोधनाचा विषय.
तसेच १९९२ च्या दंगलीमध्ये मुंबईत हजारो हिंदूंचे प्राण वाचले आणि मुस्लिम दंगेखोरांना प्रत्युत्तर दिले ते शिवसेनेनेच. शिवसैनिकांनीच.

२) आजही साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या बाजूने सर्वप्रथम आवाज टाकला उद्धव ठाकरे यांनी. सर्व प्रकारचे कायदेशीर आणि इतर सहकार्य करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. भाजपाचे नेते त्यावेळी कुठं तोंड खुपसून बसले होते, हा देखील अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे.

३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जातपात मानत नाही, यावर माझा ठाम विश्वास असून तेच सत्य आहे. मात्र, संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाजपाचे महाराष्ट्र युनिट राष्ट्रवादी काँग्रेसइतकेच जातीयवादी आहे. हा धनगर, तो वंजारी, हा तेली, तो मराठा किंवा कुणबी अशी जातीयवादी विभागणी करण्यात भाजपाचा हात कोणीच धरणार नाही.

हाच जातीयवाद मनात असल्यामुळे भाजपाने देवेंद्र फडणवीस या हुशार, अभ्यासू आणि आक्रमक नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून भाजपाने जाहीर केलेले नाही. अन्यथा त्यांच्या तोडीचा एकही नेता भाजपमध्ये आजच्या घडीला नाही. मात्र, केवळ आणि केवळ ते ब्राह्मण असल्यामुळेच त्यांचे नाव जाहीर केलेले नाही.

दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी जातीपातीचा विचार न करता फक्त निष्ठा आणि काम हे पाहून पदे वाटली. म्हणूनच त्यांनी ‘भटा-बामणांच्या ताब्यात महाराष्ट्र देणार का,’ अशा आरोपांची तमा न बाळगता मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले.

४) भाजपाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचा आहे आणि शिवसेनामुक्त महाराष्ट्र. महाराष्ट्रातून शिवसेना संपू नये, यावर मी ठाम असल्यानेच शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत धनुष्यबाणावर मत टाकण्यावाचून मला पर्याय नाही.

५) उद्धव यांना काय अनुभव आणि उद्धव यांचे काय कौशल्य असे प्रश्न विचारणाऱ्यांना फक्त एकच सांगावसं वाटतं, की उद्धव यांनी शिवसेनेचा चेहरा मोहरा जसा बदलला, तशाच पद्धतीने ते सत्तेत आल्यानंतरही १९९४ची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत. (म्हणजे त्या काळात ज्या ‘चुका’ झाल्या त्याबद्दल बोलतो आहे मी...) चांगले प्रशासन देऊ शकतील, हा विश्वास असल्यामुळे शिवसेनेला मत देण्याची इच्छा आहे. नुसतीच इच्छा नाही, ठाम निर्धार आहे.

६) शेवटचा आणि सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी हे घसा फोडून सांगत असले तरीही ते महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना दिल्ली सांभाळायची आहे. महाराष्ट्रात त्याच कमी कुवतीच्या (अपवाद वगळता), जातीपातीचे राजकारण करणाऱ्या आणि स्वतःच्या विभागापुरत्या मर्यादित असलेल्या नेत्यांच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे एकच सन्माननीय अपवाद वगळता उद्धव ठाकरे यांचा पर्याय सर्वोत्तम आहे. जे अनेक सर्वेक्षणांमधून समोर आले आहे. शिवाय मोदींच्या आज्ञेनुसार शेपूट हलविणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको, या मताचा मी आहे.

७) मोदींच्या जीवावर उड्या मारणाऱ्या भाजपाच्या ऐतखाऊ नेत्यांना माझे मत नाही. बापाच्या जीवावर गाड्या उडविणारे तरूण आणि मोदींच्या जीवावर ‘मी मुख्यमंत्री, मी मुख्यमंत्री’ हा खेळ खेळणारे यामध्ये विशेष फरक जाणवत नाही. स्वतःची ताकद नसताना युती तोडली. नरेंद्र मोदींना गल्लीबोळात फिरवून सभा घ्यायला लावल्या. ५०-५५ उमेदवार आयात केले. आणि त्या जोरावर हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसायला मोकळे. अशा ऐतखाऊ भाजपवाल्यांना माझे मत देणार नाही.
(उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या जीवावर, कार्यावर उड्या मारतात, असे आरोप करणारे आणि भाजपाच्या ऐतखाऊ नेत्यांच्या बाबतीत गप्प का? उद्धव किमान काही वर्षांपासून महाराष्ट्र पिंजून तरी काढतो आहे. फिरतो आहे. संघटना बळकट करण्यासाठी कष्ट घेतो आहे.)

तेव्हा माझे मत बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच. फक्त आणि फक्त धनुष्यबाणालाच....

जय हिंद, जय महाराष्ट्र...

(आवडल्यास आवर्जून शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा... फिरवा.)

4 comments:

  1. लेख छान झालाय. तुमच्या मताच्या मी मुळीसुद्धा आड येणार नाही. पण माझा ब्लॉग कधी वाचण्यात आला नसल्यास गेल्या महिन्याभरात या विषयाला धरून लिहिलेय सगळ्या पोस्ट वाचाव्यात. आपली मते तिथेच नोंदवावीत.

    ReplyDelete
  2. uddhav thaakare vadilaamchyaa jeevavar udya maarat naaheet ase vaatate kaa?

    ReplyDelete
  3. Dear Ashish,

    Ha tuza pahila (ani bahuda shevatcha) lekh jo ki mala avadla nahi. Tuze sarva vichar ekangi ahet hya lekha madhle.

    Tuzya kadun asa ekach bajucha abhyas na karta lihina apekshit nhavta..

    Regards
    Mandar

    ReplyDelete
  4. ekdam manatale lihilet!! Jabardast!!

    ReplyDelete