Thursday, January 07, 2016

हस्तस्य भूषणं दानं


‘सोशल’ची रक्कम ‘सोशल’साठी

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे चहुबाजूंनी माझ्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत होता. अनेकांनी फोन करून, एसएमएस पाठवून नि सोशल मीडियावर बरंच काही चांगलंचुंगलं लिहून माझं कौतुक केलं. असं बरंच काही सुरू असताना एक डिसेंबर रोजी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक्केचाळीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


बाबा आणि बहीण यांना व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली, ही गोष्ट मला पुरस्कारा एवढीच महत्त्वाची वाटते. अन्यथा आमचे बाबा आणि बहीण कधी मुख्यमंत्र्यांना इतक्या जवळून पाहणार. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, या गोष्टीच माझ्यासाठी खूप काही होत्या. पुरस्काराच्या रकमेपेक्षा या गोष्टीच मला अधिक आनंद देणाऱ्या ठरल्या. 


आता हा जो ब्लॉग लिहितो आहे, तो मी त्याच दिवसासाठी लिहून ठेवला होता. कदाचित तिथं पुरस्कारार्थींचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी मिळाली, असती तर हाच ब्लॉग मी काही बदल करून भाषण स्वरुपात वाचणार होतो. पण आधीच एका पत्रकाराला मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितल्यामुळं मला तिथं बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यावेळी लिहिलेले भाषण थोड्या प्रमाणात फेरफार करून ब्लॉग स्वरुपात मांडत आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर ४१ हजार रुपयांचे काय करणार, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. काहींनी सल्लेही दिले होते. अर्थातच, गमतीगमतीत. वास्तविक पाहता, यंदाच्या वर्षी पुरस्कार मिळणे आणि त्याच्या अनुषंगाने काही रक्कम मिळणे ही गोष्ट किती दिलासादायक आणि महत्त्वाची आहे, हे मला ओळखणारे जाणतातच. मात्र, तरीही पहिल्यापासूनच माझा निर्णय हा मिळालेली रक्कम चांगल्या कामासाठी मदत म्हणून देण्याचाच होता.


पुरस्कारासाठी जेव्हा अर्ज केला होता, तेव्हाच मी ही गोष्ट निश्चित केली होती. यदा कदाचित पुरस्कार मिळालाच तर त्यातील काही रक्कम दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन्मानाने सुपूर्त करावयाची. पुरस्कारासाठी जेव्हा अर्ज केला, तेव्हा मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण होणार, अशीच चिन्हे होती. मध्यंतरीच्या मराठवाड्याच्या एक-दोन जिल्ह्यात थोडा पाऊस झाला असला, तरीही परिस्थिती बदललेली नाही. अजूनही दुष्काळाची भीती आहेच. त्यामुळे अजूनही तिथे मदतीचा हात हवाच आहे.

काही गोष्टी आपसूक घडत जातात, असे म्हणतात. दररोज सकाळी व्हॉट्सअपवर ढिगाने मेसेज येत असतात. सूर्य, नवा दिवस, प्रेरणा आणि असं बरंच काही. बहुतांश मेसेज तद्दन फालतू याच कॅटॅगरीतील असतात. अनेकदा ते मेसेज न पाहताच डिलीट होतात. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनीच व्हॉट्सअपवर अशाच स्वरुपाचा एक मेसेज आला. विशेष म्हणजे तो कशाबद्दल आहे, हे माहिती नसूनही माझ्याकडून तो मेसेज नेमका पाहिला गेला. तो मेसेज अमेरिकेतील एक ख्रिश्चन धर्मगुरु आणि लेखक मार्क बॅटरसन यांचा होता. त्या मेसेजमध्ये म्हटले होते, ‘When God Blesses you Financially, Don’t Raise your Standard of Living. Raise ur Standard of Giving.’ काही घटना परिस्थितीला पूरक अशा स्वरुपाच्या आपोआप घडतात, असं मी म्हटलं ते असं. 

दोन दिवस जात नाहीत, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शरदभाऊ खाडिलकर चहापानासाठी घरी आले होते. सध्या त्यांच्याकडे जनकल्याण समितीची जबाबदारी आहे. मराठवाड्यातील परिस्थिती कशी आहे, या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यांनी काही देणगीदारांचे किस्से ऐकविले आणि चांगले-वाईट अनुभवही सांगितले. बोलण्याच्या ओघात एका संस्कृत सुभाषिताचा उल्लेख त्यांनी केला. 

हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम्
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम्
 
अर्थात, हाताचे भूषण हे दान आहे. सत्य हे कंठाचे आभूषण आहे. शास्त्र किंवा ज्ञान हे कानांचे भूषण आहे… अशी सर्व आभूषणे असताना मग इतर आभूषणांची गरजच काय… 

मिळालेल्या पुरस्काराचा मान ठेवण्यासाठी काही रक्कम ठेवायची आणि बाकी बहुतांश रक्कम मदत म्हणून देऊन टाकायची, हा माझा निर्णय आधीच ठरला होता. मात्र, या दोन घटनांमुळे तो अधिक पक्का झाला. मग काय फक्त निर्णयाची अंमलबजावणीच बाकी होती. 


सामाजिक कर्तव्य म्हणून आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेपैकी काही रक्कम ही दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी देण्याचे मी ठरविले होते आणि सात जानेवारी २०१६ रोजी ती रक्कम मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी मदत म्हणून देऊन टाकली. आमचे चुलत बंधू शिरीष चांदोरकर आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीषजी बापट हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुमीतजी वानखेडे यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री  यांचे फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि त्यांचा ई-मेल या सर्वांवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळेना. अखेर सुमीतजी वानखेडे धावून आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. त्यामुळेच त्यांचे खूप खूप आभार.

‘जलयुक्त शिवार’ या प्रकल्पाप्रमाणेच काही रक्कम मी पुण्यातील सामाजिक संस्था असलेल्या स्वरुपवर्धिनीला दिली आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशा पथक असलेली संस्था ही स्वरुपवर्धिनीची माझ्यासाठीची अगदी पहिली ओळख. अर्थात, ती अपुरी असल्याचे नंतरच्या काळात समजले. आमचे मित्र आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील सहअध्यायी संजय तांबट यांच्यामुळे स्वरुपवर्धिनीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती मिळत गेली आणि तेथील अपडेट्स समजत गेल्या. ज्ञानेश पुरंदरे यांच्याकडूनही नियमितपणे येणारे ई-मेलही वर्धिनीच्या नित्यनूतन उपक्रमांबद्दल माहिती देत असतात. 


स्वरुपवर्धिनी ही संस्था सेवावस्ती किंवा झोपडपट्टीमधील गरीब विद्यार्थ्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटते आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, पैशांमुळे शिक्षण अडू नये, या हेतूने त्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला आणि सिद्धीस नेला. स्वरुपवर्धिनीच्या सहकार्यवाह श्रीमती पुष्पाताई नडे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. आमचे मित्र संजय विष्णू तांबट हे छायाचित्र टिपण्यात व्यस्त होते, त्यामुळे ते छायाचित्रात आले नाहीत. 



‘सोशल मीडिया’ या क्षेत्रात केलेल्या पत्रकारितेसाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच त्या पुरस्काराची रक्कम ‘सोशल’ कामांसाठीच वापरले जाणे, हे अधिक योग्य आहे, असे मला वाटते. त्यामुळेच पुरस्काराची बहुतांश रक्कम या दोन्ही उपक्रमांसाठी दिली आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला आणखी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले, कौतुकाचा वर्षाव केला, त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. 

3 comments:

  1. वा... वा... आशिष... तुझ्या या सामाजिक जाणिवेला सलाम... पैसे खूप जणांना मिळतात... अनेकांना त्याचं काय करावं तेही कळत नाही. पण तू मात्र तसं केलं नाहीस. आपल्या विचारांवर आणि तत्त्वांवर ठाम असलेला माणूसच हे करू शकतो... सो, पुन्हा एकदा अभिनंदन...

    ReplyDelete
  2. सलाम आशिषभाऊ सलाम !!!

    ReplyDelete
  3. अभिनंदन...पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि त्याचा अशा प्रकारे विनियोग करून त्याला 'अर्थ' प्राप्त करून दिल्याबद्दल!

    ReplyDelete