Wednesday, July 22, 2020

दवा, दुवा आणि देवा...


माझ्या करोना विजयाची त्रिसूत्री...

रविवार दिनांक १९ जुलै रोजी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येऊन बरोबर एक महिना एक दिवस झाला. एका महिन्यानंतर आता मी पूर्णपणे ठणठणीत असून, महिनाभरानंतर प्रथमच बाहेरही पडलो. १९ जून ते १९ जुलै हा महिना बरंच काही शिकवून गेला. त्या विषयी थोडंसं... (खरं तर ब्लॉग खूपच मोठा झालाय. तुम्ही तुमच्या सवडीनं वाचा...)
.....

मला करोना झाला आणि ठणठणीत बराही झालो. पण आयुष्यातील हा एक महिना कसोटी पाहणारा ठरला. करोनाची बाधा झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं, की साला हा चांदोरकर खूपच बाहेर भटकत होता, खायला फिरत होता म्हणूनच त्याला करोना झाला असावा... वास्तविक पाहता, परिस्थिती तशी नाही. कारण लॉकडाउन उठल्यानंतर मी जरूर काही ठिकाणी गेलो. पण फिरताना योग्य काळजी घेतच होतो. त्यामुळे त्या भटकण्यामुळे मला करोनाची लागण झाली नव्हती. मला करोनाची बाधा होण्याचं कारण हे पूर्णपणे वेगळं आहे.

झालं असं, की मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी एडमिट झालो, त्याच्या बरोबर आठवडाभर आधी गुरुवारी ११ जून रोजी मी, सुधीर म्हस्के, विजय गायकवाड आणि प्रणव शेवडे विजयच्या साने गुरुजी नगरमधील घरी भेटलो होतो. आम्ही चौघंही दोन-अडीच तास एकत्र होतो. एकत्रित खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला होता. त्यावेळी सुधीर पॉझिटिव्ह होता, पण असिम्प्टमॅटिक होता. त्यामुळं त्याला काहीच लक्षणं नव्हती. त्यामुळंच आम्ही भेटलो होतो. आणि तिथंच आमची करोनावारी निश्चित झाली.

शनिवारी सुधीर आणि नंतरच्या दोन-तीन दिवसांमध्ये आम्हाला तिघांनाही बारीक ताप, कणकण आणि थोडी अंगदुखी अशी लक्षणं दिसून आली. मला रविवारी ताप आला. सोमवारी सकाळी ताप उतरला होता. मात्र, अंगदुखी होती आण अशक्तपणाही जाणवत होता. वैद्य प्रसाद फाटक यांच्याकडून औषधंही घेऊन आलो होतो. त्यांनीही मला तेव्हा स्प्टपणे सांगितलं, की चार दिवसांचं औषध आहे. चार दिवसांनीही ताप उतरला नाही, तर करोनाची टेस्ट करून घे. डॉक्टरांच्या औषधाचा साधारण दीड दिवसांत मला गुण येतो. मात्र, तेव्हा औषधाचा गुण काही येईना. अंगदुखी नि कणकण कायम होती. तेव्हाच मला साधारण अंदाज यायला सुरुवात झाली होती. सोमवारी सुधीर प़ॉझिटिव्ह निघाल्याचा फोन विजयनं केला. तेव्हा मात्र, पक्कं झालंय, हे समजत होतं. 

तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर बहीण आणि दोन छोट्या भाच्या घरी रहायला आल्या होत्या. ताप असल्यामुळे त्यांच्यापासून शक्य तेवढं अंतर ठेवून होतोच. पण तरीही भीती ही होतीच. आपण गुरुवारपासून कोणाकोणाला भेटलो होतो, त्यांची नावं आठवायला लागलो. सुदैवाने मी अधिक लोकांना भेटलो नव्हतो. बाबा, बहीण, भाच्या, चुलत बहीण अर्चना, वहिनी शलाका, मेव्हणा मंदार, प्रशांत मोहोळकर, कमलेश पाठक भाग्यश्री, त्यांची कन्या श्रावणी नि आमच्या कामवाल्या मावशी यांच्याशी माझा संपर्क झाला होता. मला काय होणार याच्यापेक्षा त्यांची काळजी अधिक होती.

सोमवारी सुधीर पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी विजय आणि बुधवारी मी नि प्रणव सिंहगड रोडवरच्या रावसाहेब पटवर्धन प्रशालेत स्वॅब देऊन आलो. बुधवारी विजय आणि त्याचे तीन भाऊ पॉझिटिव्ह निघाले, तर गुरुवारी प्रणवचा आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. म्हस्के आणि गायकवाड बंधू यांच्याप्रमाणेच मी आणि प्रणवही महापालिकेच्या सणस स्पोर्ट्स ग्राउंड येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होणार होतो. त्यानुसार माझा मित्र आणि महापालिकेचा सभागृह नेता असलेल्या धीरज घाटेशी बोलणंही झालं होतं. खासगी लॅबमधून बाबांची स्वॅब टेस्ट करून घेऊ म्हणजे त्यांची व्यवस्था कशी करायचीहे ठरवू, असं धीरज म्हणाला. प्रायव्हेट लॅबवाला घरी येईपर्यंत तुम्ही दोघं घरीच थांबा नि स्वॅब देऊनच मग तुम्ही सणसला जा, असं धीरजनं सांगितल्यानं मी आणि प्रणव घरीच थांबलो. चहापाणी झालं. टीव्ही पाहून देखील कंटाळा आला होता.


ते चार तास...
सणसमध्ये रात्री आठ वाजता जेवण येत असल्यानं आम्हाला घरूनच जेवून जावं लागणार होतं. प्रणवनं पावभाजी, एक जोडी एक्स्ट्रॉ आणि एका आलू पराठा, अशी ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत मी जरा पडलो. स्वॅब घ्यायला आला, की मला उठव, असं सांगून मी झोपलो. खाली जाऊन प्रणवनं फूड पार्सल आणलं, हे देखील मला अर्धवट झोपेत पाहिल्याचं आठवतंय. पण त्यानंतरच मला काहीही आठवत नाही. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुममध्ये गेल्यानंतरच माझे डोळे उघडले. हा कालावधी होता साधारण चार तासांचा. रात्री पावणेनऊला मी झोपलो आणि मध्यरात्री पाऊणच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये होतो. चित्रपटांत दाखवतात तशीच माझीही प्रतिक्रिया होती, मैं कहा हूँ...

चार तासांमध्ये खूप काही घडलं होतं आणि मला त्याचा थांगपत्ताही नव्हता. नंतर नंतर मला एकेक गोष्टी समजत गेल्या. हॉस्पिटमध्ये असताना एकच ओळ धीरजला उद्देशून टाकली होती. तेव्हा तू होतास, म्हणून आज मी आहे.ती एक ओळ त्या चार तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे होती.

गुरुवारी रात्री मी झोपलो तो उठतच नव्हतो. मला गदागदा हलवून आणि पाणी मारूनही मी उठत नाही म्हटल्यानंतर प्रणव घाबरला. मला शुगर आहे, हे नेमकं त्याला माहिती नव्हतं आणि बाबांना विचारावं हे त्याला उमगलं नसावं. माझ्या माहितीनुसार, त्यानुसार तोपर्यंत बाबा झोपायला गेले होते. त्यांना उठवून त्रास देण्याऐवजी प्रणवनं धीरजला फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. धीरजनं तातडीनं एम्ब्युलन्स पाठवून दिली. एव्हाना कमलेश पाठक आणि सुजयेंद्र तथा हिरो पंचमुखी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली होती.

अडचण अशी होती, की आशिष चांदोरकर यांना उचलण्यासाठी किमान तीन ते चार लोक तरी लागणार ते इतक्या रात्री कुठून आणायचे. टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळं मदतीला येणार कोण, हा देखील प्रश्न होता. आमच्या क़ॉलनीतील निकेत देसाई, आतिश नेटके किंवा हिरो पंचमुखी हे मदतीला यायला तयार होते. मात्र, धीरजनं मुद्दामून कोणीही वर जाऊ नका, हे निक्षून सांगितलं होतं. आलेली एम्ब्युलन्स खासगी होती. ड्रायव्हर आणि सहाय्यकानं प्रणवच्या मदतीनं खाली नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना शक्य झाले नाही. मग ते खाली गेले आणि पाच दहा मिनिटं वाट पाहून निघून गेले.

दरम्यानच्या काळात कमलेश पाठक आणि धीरज यांचं फोनवरून बोलणं सुरूच होतं. पहिली एम्ब्युलन्स निघून गेल्यानंतर धीरजनं दुसरी एम्ब्युलन्स 108ची पाठविली. त्यातील ड्रायव्हर आणि डॉक्टर यांनीही मला खाली नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही जमेना. हे समजल्यावर धीरजनं काही मिनिटांतच तिसरी एम्ब्युलन्स पाठविली. दोन्हीचे ड्रायव्हर, डॉक्टर्स नि प्रणव अशा पाच जणांनी मला उचलून खाली नेलं.

घरामधून निघताना बाबांनी हातात घेतलेला माझा हात एम्ब्युलन्समध्ये ठेवेपर्यंत सोडला नाही, असं कमलेश सांगत होता. एका बापाच्या मनात तेव्हा काय विचार आले असतील, हे कोणीही समजू शकतं. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आणि काहीच कारण नसताना ते केवळ माझ्यामुळे करोनाच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकले. त्याचं सल कायम मनात राहील. पण वाईटात चांगलं असं, की ते असिम्प्टमॅटिक होते. त्यामुळे त्यांना सणस कोव्हिड सेंटर आणि घरी परतल्यावरही काहीच त्रास झाला नाही. आता ते एकदम व्यवस्थित आहेत. तरुणपणी केलेला प्रचंड व्यायाम आणि जबरदस्त जिगर या जोरावर त्यांनी आता पर्यंत अनेक संकटं परतवून लावली आहेत. तशाच पद्धतीनं आताही त्यांनी 
करोनाशीही दोन हात केले आणि यशस्वीपणे घरी परतले.

एम्ब्युलन्स रवाना होईपर्यंत धीरजनं दीनानाथ मंगेशकरमध्ये सचिन व्यवहारे आणि डॉ. माधव भट यांच्याशी उपचारांसदर्भात बोलून ठेवलं होतं. कमलेशनं दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी डॉक्टर, सिस्टर यांच्यापैकी कोणालाही जवळ येऊ देत नव्हतो. हातवारे करून दूर ठेवत होतो. अर्थातच, मला यापेकी काहीही आठवत नाही. पण आपल्याला करोना झाला आहे आणि त्यामुळं कोणीही आपल्याला स्पर्श करू नये, असा विचार कदाचित बॅक ऑफ द माइंड सुरू असावा. त्यामुळेच मी कोणाला जवळ येऊ देत नव्हतो, असं म्हणण्यास पूर्ण वाव आहे. त्यामुळं तुम्ही तातडीनं पोहोचा, असा निरोप देणारा फोन धीरजनं माझ्या भावाला केला. भाऊ शिरीष आणि वहिनी शलाका अवघ्या काही मिनिटांत तिथं पोहोचले. त्यानंतर माझी वहिनी शलाका (जी पूर्वी दीनानाथमध्येच होती.) इमर्जन्सी रुममध्ये आली, मी तिला पाहिलं आणि पूर्णपणे भानावर आलो. भानावर आल्यानंतर तिलाच तो ऐतिहासिक प्रश्न विचारला, की मैं यहा कैसे पहुँचा...

दीनानाथमध्ये माझी शुगर घेण्यात आली, तर ती तीस की पस्तीसच्या आसपास होती. आता दुपारी नेहमीच्याच गोळ्या आणि व्यवस्थित जेवण झाल्यानंतरही शुगर इतकी कमी कशी होऊ शकते, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. प्रा. रवी पत्की यांनं दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या विषाणूनं शरीरात प्रवेश केल्यानंतर शुगरची पातळी अचानकपणे कमी झाल्याच्या अनेक घटना आढळून येत आहेत. चीनमध्ये हे प्रमाण शंभरमागे दहा ते पंधरा रुग्ण असे आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कोविडमुळे अनेकांची शुगर प्रचंड वाढल्याचीही उदाहरणं समजत होती. त्यामुळेच पॉझिटिव्ह आलात आणि शुगर असेल तर नेमकं काय होऊ शकतं, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. विशेषतः होम क्वारंटाइन पेशंटपर्यंत. जेणेकरून पेशंट अधिक खबरदारी घेऊ शकतील. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास थोडा जरी उशीर झाला असता, तर माझं काय झालं असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळंच मी लिहिलं होतं,‘तेव्हा तू होतास, म्हणून आज मी आहे.
.....


आयसीयू ते सेमी प्रायव्हेट
दीनानाथ हॉस्पिटलचा माझा अनुभव चांगला आहे. त्यामुळं भानावर आल्यानंतर मी दीनानाथमध्ये असल्याचं समजल्यावर माझ्या जिवात जीव आला. इमर्जन्सी रुममध्ये काही प्राथमिक चाचण्या निप्राथमिक उपचार केल्यानंतर आयसीयूत पोहोचलो. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मी आयसीयूमध्ये दाखल झालो आणि कधी झोप लागली कळलं नाही. एव्हाना मी इंजेक्शन्स, सलाइन, वेगवेगळ्या गोळ्या, ऑक्सिमीटर, कन्टिन्युअस बीपी मॉनिटरिंग, ऑक्सिजन मास्क वगैरे गोष्टींनी मला पुरतं वेढलं होतं. सकाळपासून डॉक्टरांच्या व्हिजिट्स व्हायला लागल्या. नेमकं काय झालं, गोळी वगैरे जास्त घेतली होती का, मेडिकल हिस्ट्री काय, अशा प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली. आयसीयूमध्ये असेपर्यंत हे मेडिकल चक्रव्यूह कायम असल्यामुळे मी फारसा कम्फर्टेबलही नव्हतो. आपल्याला झालेला करोना गंभीर स्वरुपाचा आहे, की फक्त शुगर कमी झाल्याने आपण आयसीयूत पोहोचलो आहे, हे कळायला मार्ग नव्हता. अर्थात, मी पण फार लोड घेतला नाही. काय औषधं देतायेत वगैरे समजून घेण्याचाही मी जास्त प्रयत्न केला नाही.

साधारण अडीच दिवस मी आयसीयूमध्ये होतो. तिथं असेपर्यंत चहा, नाश्ता आणि जेवण या पैकी कशात मला विशेष रस वाटत नव्हता. जेवणावरची वासना उडणं, हे देखील करोनाचं प्रमुख लक्षण आहे. चव न कळणं आणि वास न येणं ही देखील लक्षणं आहे, असं म्हणतात. करोना झाल्यानंतरही देवकृपेने मला चव कळत होती. पण अन्न जात नव्हतं. रविवारी दुपारी म्हणजे अडीच दिवसांनंतर मला सेमीप्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर मी थोडा रिलॅक्स झालो. त्यामुळंच नाश्ता संपायला लागला. जेवणही जाऊ लागलं... जेवणाचं हे तंत्र जमलं म्हणजे आपण हळूहळू नॉर्मलकडे जातोय, याचा अंदाज येऊ लागला होता.

आर्थर एशची आठवण...
सेमीप्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट झाल्यानंतर आम्ही चौघे भेटलो तेव्हापासूनच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून जात होत्या. करोना का झाला, हे मला माहिती होतं. पण मलाच करोना का झाला, असा प्रश्न अजिबात पडला नाही. जे घडेल, त्याला स्वीकारणं ही माझी वृत्ती. अशी काही संकटं येतात, तेव्हा विंबल्डन विजेता आर्थर ऍशचे शब्द मला कायम आठवतात. आर्थर ऍश म्हणजे विंबल्डन जिकंणारा पहिला (कदाचित एकमेव) कृष्णवर्णीय टेनिसपटू. १९८३ मध्ये शस्त्रक्रियेदरम्यान त्याला अशुद्ध रक्त दिलं आणि त्याला एड्सची बाधा झाली. आर्थर ऍशला एड्स झाला, हे समजल्यावर त्याला चाहत्यांची हजारो पत्रं येऊ लागली. चाहत्यांचा एकच सवाल असायचा. तूच का... तुलाच का... देवानं अशा जिवघेण्या आजारासाठी तुझीच का निवड केली?

आर्थरनं त्या सर्व चाहत्यांना उद्देशून फार छान उत्तर दिलं. जगभरात जवळपास पाच कोटी मुलं टेनिस खेळण्यासाठी कोर्टवर येतात. त्यापैकी पन्नास लाख मुलं टेनिस खेळायला शिकतात. पाच लाख जण व्यावसायिक टेनिसपटू होतात. अवघे पन्नास हजार जण सर्किट टेनिसपर्यंत पोहोचतात आणि फक्त पाच हजार जण ग्रँडस्लॅमसाठी पात्र ठरतात. त्यातील निवडक पन्नास खेळाडूंना विंबल्डनमध्ये सर्व्हिस करण्याची संधी मिळते. त्यापैकी चार जण उपांत्य फेरीत आणि दोनच जण अंतिम फेरीत पोहोचतात नि फक्त एकालाच चषक उंचाविण्याची संधी मिळते... जेव्हा मी विंबल्डनचा चषक उंचाविला तेव्हा देवाला विचारले नाही, की मीच का? माझ्याच नशिबी हा सुवर्णक्षण का दिलास? त्यावेळी जर मीच का, असे विचारले नाही तर अशा संकटाच्या प्रसंगामध्ये देवाला प्रश्न का करू...

मला आर्थर ऍशची ही गोष्ट खूप आठवते. संकटसमयी तर कायमच. सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी देण्यात येणारा राज्य सरकारचा पहिलावहिला पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०१५मध्ये मला मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय वाटचाल आणि सरकारच्या योजनांचा आढावा घेणारं पुस्तक लिहिण्याची संधी मला मिळाली. पत्रकार म्हणून आणि वैयक्तिक आयुष्य समृद्ध करणाऱ्या अशा अनेक संधी मला मिळाल्या. तेव्हा मी देवाला कधीही मीच का, मलाच का, असे विचारले नाही. त्यामुळे मलाच करोना का, असा विचार करणं, मला अजिबात योग्य वाटला नाही. आपल्या नशिबी जे आलं आहे ते स्वीकारणं आणि कोणालाही दोष न देता पुढे जाणं, हीच माझी कायम भूमिका राहिली आहे.

घाबरू नका, सामना करा...
कोणाला करोना होऊ नयेच. पण दुर्दैवाने जर तुम्ही करोनाच्या फेऱ्यात अडकलात तर सत्य परिस्थिती पटकन स्वीकारा. मीच का, मलाच का, यात न अडकता तातडीने उपचारांना सामोरे जा. अनेक जण ही सत्य परिस्थिती स्वीकारण्यापासून दूर पळतात, लोकांना घाबरतात. आपल्याबद्दल काय चर्चा करतील सगळे, या विवंचनेत असतात. पण एक लक्षात ठेवा तुम्हाला करोना झालाय. असा आजार झालेला नाही, की लोकांना संशयानं तुमच्याकडे पहावं. तुम्ही खून, बलात्कार किंवा दरोडा असा मोठा गुन्हा केलेला नाही. जेणेकरून तुम्हाला मान खाली घालावी लागेल.

अजून एक म्हणजे दुखणं अंगावर काढू नका. अनेक जण दहा-बारा दिवस ताप अंगावर काढतात. मला काही होत नाही म्हणून... मला वाटतं जर लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचं औषध जरूर आणा. पण गुण येत नसेल तर लगेच टेस्ट करून घ्या. कारण सुरुवातीला करोनामुळं काही त्रास जाणवत नसला तरी करोना जेव्हा फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो गंभीर स्वरुप प्राप्त करतो. पहिले काही दिवस काही जाणवत नाही. पण अचानक नंतर आजार बळावू शकतो. जनरल वॉर्डमध्ये पंचवीस-तीस वयोगटातील तरूणही श्वास घेता यायचा नाही, म्हणून प्रचंड अस्वस्थ व्हायचे. ऑक्सिजन काढल्यानंतर चार पावलंही चालता यायचं नाही... नंतर प्रकृतीत सुधारणा व्हायची पण श्वास न घेता येणं, दम लागणं, छाती भरून घेणं हा त्रास अस्वस्थ करून टाकणारा असतो. त्यामुळं तुम्हाला काही झालं नसेल तर चांगलंच आहे. पण लक्षणं असतील तर टेस्ट करून घ्या.

सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे करोनाचे पेशंट्स बरे होऊ शकतात. करोना झाला म्हणजे माणूस मेलाच असे अजिबात नाही. त्यामुळे करोना अजितबात घाबरू नका. काळजी जरूर घ्या. पण करोना होईल किंवा करोना झाला, या भीतीने घाबरून जाऊ नका. टेन्शन तर अजिबात घेऊ नका.
.....


औषधे कमी, केअर अधिक...
सेमीप्रायव्हेर रुममध्ये शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला काय काय औषधं दिली जातायेत, नेमके काय उपचार सुरू आहेत, याची माहिती घ्यायला सुरुवात केली. सेमीप्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट केल्यानंतर सलाइन बंद झालं होतं. अँटिबायोटिक इंजेक्शन्स, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी इन्श्युलिनची इंजेक्शन्स, ताप कमी करण्यासाठी क्रोसिन ६५० मिलीग्रॅम, व्हिटामिन सी आणि डीची गोळी, खोकला कमी करण्यासाठी कफ सिरप, इटॉरिकॉक्सिब ही रिएक्शन येऊ नये, यासाठीची गोळी आणि बी-क़ॉम्प्लेक्सची कॅप्सुल इतकीच औषधं होती.  फुफ्फुसाला झालेला संसर्ग रोखण्यासाठी लेंटेक्लीन ही गोळी सुरु होती. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयव्हरमेक्टीन होती.  सुरुवातीच्या काही दिवसांत आणखी काही इतर औषधं असतीलही. पण शेवटपर्यंत फक्त हीच औषधं होती. नंतर खोकला गेल्यानंतर आणि ताप उतरल्यानंतर क्रोसिन आणि कफ सिरपही बंद झालं.

अजून एक म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तातडीनं माझा चुलतभाऊ डॉ. योगेश चांदोरकर यानं 'स्वयंपूर्ण उपचारपद्धती'द्वारे उपचार सुरू केले. त्याचे अप्पा बळवंत चौक येथे 'निरामय क्लिनिक' आहे. हे उपचार मोबाईलच्या माध्यमातून 'विनास्पर्श विनाऔषध' पद्धतीने होतात. त्याने आणि वहिनी अमृता यांनी पहिल्या दिवसापासून उपचार सुरू केले. सुरुवातीला शलाका त्यांना फोन करायची. नंतर माझ्याकडे फोन आल्यानंतर मी दिवसातून दोनदा फोन करायचो... नंतर नंतर फक्त एकदाच फोन करावा लागे. माझ्या तब्येतीचा दोघांनाही अंदाज येत होता आणि मी कसा.आहे, हे त्यांना न सांगताही समजत होते. त्या उपचारांचाही माझ्या रिकव्हरीत मोठा वाटा आहे, असं मला लाटतं.

पेशंट तपासण्यासाठी येणारे डॉक्टर, नर्स, मामा, मावशी आणि सफाई कर्मचारी सर्वच मास्क, गॉगल, डोक्यावर टोपी, हातात ग्लोव्हज आणि वेगवेगळ्या रंगांचे एप्रन घालून येत. सुरुवातीला कोण डॉक्टर आहे आणि कोण नर्स यांचा काय पत्ता लागायचा नाही. शिवाय नेहमी डॉक्टरच्या गळ्यात, हातात स्टेथोस्कोप तरी असतो. त्यामुळं तरी ही व्यक्ती डॉक्टर आहे, हे समजतं. पण इथं हृदयाचे ठोके तपासण्याचा विषयच येत नसल्यानं स्टेथोस्कोही नसायचा. मग अनेकदा गोंधळ उडायचा.पण काही दिवसांनंतर पीपीई किट किंवा एप्रनमधून आपल्याला तपासायला येणारे ड़ॉक्टर ओळखता येऊ लागले.

इतर वेळी सेमी प्रायव्हेट रुममध्ये पेशंटसाठी एक आणि नातेवाईकासाठी एक अशा दोन खाटा असतात. आताच्या परिस्थितीत मात्र, दोन खाटांवर दोन वेगळे पेशंट ठेवले जातात. सोबत नातेवाईक राहू शकत नाही. त्यामुळं करोना पेशंटचीच सोबत सुखावह ठरते. सेमी प्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला मोबाईल मिळाले. तोपर्यंत ते फोन हिरोकडेच होते. पाचव्या की सहाव्या दिवशी माझ्याकडे मोबाईल आले. फोन मिळाले त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. धीरजनं मला फोन करून त्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. दोन-तीन मिनिटंच बोलले. पण एकदम मस्त वाटलं. प्रेरक वाटलं.  

आश्चर्य... देवेंद्रजींचा फोन
आशिषजी, तुम्हाला कसा काय करोना झाला... काय केलंत. काळजी घ्या. तुम्ही लवकर बरे व्हा. तुम्हाला अजून खूप मोठी कामं करायची आहेत. कसलीही चिंता अजिबात करू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असं ते बोलत होते. देवेंद्रजी, धीरज होता म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलू शकतोय. त्यानं खूप धावपळ केली त्यादिवशी, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं. त्यावरही ते एकदम छान बोलले. म्हणाले, आशिषजी, एक लक्षात ठेवा. जो चांगलं काम करतो. त्याचं नेहमी चांगलंच होतं. चांगली लोक त्यांच्या पाठिशी कायम उभी राहतात. तुम्ही लवकर बरे होणार. चिंता करू नका.

देवेंद्रजींचा फोन झाला आणि त्याच संध्याकाळी मला सेमीप्रायव्हेट रुममधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचं ठऱलं. जनरल वॉर्ड कसा असेल, ही भीती होती. त्यामुळं माझी तिथं शिफ्ट व्हायची इच्छा नव्हती. पण तुम्हाला आता ऑक्सिजनची गरज नाहीये, म्हणून तुम्हाला तिकडे शिफ्ट करीत आहोत, असं मला नर्सनं सांगितलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असा विचार करून मी तयार झालो. चालतच जाऊ, व्हीलचेअर नको, असं मी नर्सला सांगितलं. सेमीप्रायव्हेट रूम ते जनरल वॉर्ड हे अंतर साधारण शंभर दीडशे पावलांचंच असेल. जाऊ आपण सहज असं मला वाटलं. पण ती पावलं चालल्यानंतर बऱ्यापैकी दम लागला होता. करोनाचे इफेक्ट्स जाणवू लागले होते. जनरल वॉर्ड म्हणजे एक मोठा ह़ॉल आणि त्यात साधारण बावीस ते पंचवीस पेशंट. त्या वातावरणामध्ये दमल्याचा त्रास थोडा अधिकच बळावला. पुढचे काही दिवस आपण कसे ढकलणार, अशी चिंताच वाटत होती.


तुम्हाला ऑक्सिजन लागणार नाही, म्हणून मला तिथं शिफ्ट केलं होतं. पण दुसऱ्या दिवसापासूनच मला ऑक्सिजनचा त्रास जाणवू लागला. श्वास घ्यायला त्रास होत होता. थोडं चालल्यानंतरही दम लागायचा. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अर्थात, एसपीओ२ ९०च्या पुढे पाहिजे, तो७५ ते ८०पर्यंत खाली आला होता. त्यामुळं दुसऱ्याच दिवशी मला जनरल वॉर्डात दुसऱ्या छोट्या हॉलमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या बेडवर शिफ्ट करण्यात आलं. तिथं तुलनेनं पेशंट कमी होते. त्यामुळं जरा बरं वाटत होतं. आणि ऑक्सिजन लावल्यामुळं त्रासही कमी जाणवत होता.

डॉ. भारत पुरंदरे, आमच्या शास्त्री रोडवरच्या पेट्रोल पंपाच्या अलिकडे क्लिनिक असलेल्या डॉ. बहुलीकरांचे चिरंजीव डॉ. यश, नंतरच्या टप्प्यात माझी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉ. प्रीती जोशी-घोलप आणि संध्याकाळच्या टप्प्यात येणारे डॉ. यश भलानी अशा सर्व डॉक्टरांनी माझ्या लवकर बरे होण्यात खूप मोलाची भूमिका बजावली. वरील आणि इतर सर्व डॉक्टर लोकांचं वैशिष्ट्य असं, की हे फक्त बोलण्यानं रुग्णाला निम्म बरं करायचे. आत्मविश्वास वाढवायचे. तुम्हाला एकदम कम्फर्टेबल करायचे. माझ्या डिस्चार्जच्या दिवशी एक ज्येष्ठ नागरिक एडमिट झाले. डॉक्टर आल्यावर ते रडायलाच लागले. डॉक्टर मला कसा काय करोना झाला... आता मी मरणार वगैरे म्हणू लागले. तेव्हा तिथं आलेले डॉक्टर त्यांना म्हणाले, अहो सकाळी आला तेव्हा बोलू शकत नव्हता. आता किती बोलताय बघा. म्हणजे किती सुधारणा आहे तुमच्यात. अजिबात चिंता करू नका. लवकरच तुम्ही तुमच्या पायावर घरी जाणार... करोनाचे इतके पेशंट, त्यांच्या वेगळ्या तऱ्हा, निराळी मानसिकता अशा परिस्थितीतही स्वतःला सकारात्मक ठेवून दुसऱ्यामध्ये प़ॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम डॉक्टर मंडळी करत होती.

जनरल वॉर्डमध्ये दुसऱ्या हॉलमध्ये शिफ्ट केल्यानंतर डॉ. यश बहुलीकर यांनी माझा एक एक्स-रे काढून घेतला नि रक्ताची एक चाचणी करायला सांगितली. दुसऱ्या दिवशी त्याचे रिझल्ट्स आले. रक्ताची चाचणी निगेटिव्ह आली होती. म्हणजे माझा करोना गंभीर स्वरुपाचा नव्हता. त्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल, असं त्यांनी मला सांगितलं. मात्र, फुफ्फुसांचा एक्स-रे नॉर्मल नव्हता. कदाचित काही प्रमाणात संसर्ग (इन्फेक्शन) झाला होता. त्यामुळंच मला दम लागत होता आणि रक्तातील ऑक्सिजन थोडा कमी झाला होता.

रक्तातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी ड़ॉ. यश बहुलीकर यांनी सांगितलेला सर्वात सोपा उपाय म्हणजे पालथं झोपायचं. पोटावर झोपायचं. पाठीवर झोपल्यामुळं फुफ्फुसांना सर्वात कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. कुशीवर थोडा अधिक किंवा पालथं झोपल्यानं सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे अर्धा तास पालथं झोपा आणि प्रत्येकी पंधरा मिनिटं डाव्या-उजव्या झोपा. पहा तुमचा एसपीओ२ वाढतो की नाही, असं डॉक्टर म्हणाले होते. जेव्हापासून मी पालथं झोपायला सुरुवात केली तेव्हापासून माझा एसपीओ२ वाढायला सुरुवात झाली. जेव्हा डिस्जार्च मिळाला त्या दिवशी चालून आल्यानंतर एसपीओ२ चं प्रमाण हे 99 होतं. म्हणजे चालण्यापूर्वी ९२ आणि चालल्यानंतर ९९... वास्तविक पाहता, चालल्यानंत एसपीओ२ प्रमाण कमी होतं. पण माझ्या बाबतीत ते वाढलं होतं. त्यामुळं डॉक्टरनाही त्याचं आश्चर्य वाटलं होतं.

मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सकाळी टीव्हीवर डॉ. धनंजय केळकर हे करोना रुग्णाने कशा पद्धतीने योगासने करावीत, श्वसनाचे व्यायाम करावेत, या बाबत सकाळी अर्धा तास मार्गदर्शन करत. त्याचाही मला खूप फायदा झाला. प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकाची व्यवस्था होती. रोज संध्याकाळी येऊन ती व्यक्ती पंधरा मिनिटे प्रत्येकाकडून छोटे-छोटे व्यायाम प्रकार करून घेत असे. मला वाटतं माझ्या रिकव्हरीमध्ये डॉ. केळकर यांचे व्यायामप्रकार आणि त्या श्वसनाचे व्यायाम करून घेणारे प्रशिक्षक यांचा मोठा वाटा आहे.

मला दीनानाथमधील नर्सिंग स्टाफचंही जाम कौतुक आहे. अगदी मी आधी एडमिट होतो तेव्हा किंवा बाबा कॅन्सर आणि हार्ट एटॅकच्या वेळी दीनानाथमध्ये होते, तेव्हा याचा अनुभव घेतलेला आहे. यावेळीही मला आलेला अनुभव अगदी तसाच होता. दादा, बाबा, काका करून या नर्सेस पेशंटची काळजी घ्यायच्या. एखाद्या पेशंटला जेवण जात नसेल, तर चार शब्द प्रेमाचे आणि समजुतीचे बोलून जेवायला बसवायच्या. प्रत्येक रुग्णाशी प्रेमानं संवाद साधायच्या. बाबा कसं वाटतंय आता. बरं वाटतंय ना वगैरे विचारपूस करायच्या. अनेक नर्सेसचा हात तर इतका हलका होता, की कधी इंजेक्शन दिलं कळायचंही नाही. माणूस औषधानं बरा होतोच. पण डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफकडून त्याला कशी वागणूक मिळते, यावरही त्याच्या प्रकृतीतील सुधारणा अवलंबून असते, असं मला कायम वाटतं. दीनानाथचा सर्वच स्टाफ त्याबाबतीत मला कायमच एक नंबर वाटत आलेला आहे.
.....


व्यक्ती तितक्या प्रकृती...
जनरल वॉर्डमधील पुढचे दहा-अकरा दिवस करोनाचं टेन्शन आणि सर्व शीण घालविणारे ठरले. नाना तऱ्हेचे लोक, त्यांची चित्रविचित्र वर्तणूक, सवयी अशा सर्व गोष्टींनी त्या रुक्ष वातावरणातही मनोरंजन केलं. आपण करोनाचे रुग्ण आहोत, याचं भानंही या रुग्णांना नसायचं.

माझ्या शेजारच्या बेडवर एक माजी पोलिस हवालदार होते. वय वर्षे ७५.मी पत्रकार आहे समजल्यावर त्यांनी कृष्णा कुलकर्णी यांचं नाव मला सांगितलं. मी त्यांना चांगला ओळखायचो, असं सांगायचे. त्या माजी पोलिसाला चालताना दम लागायचा. एसपीओ२ पुरेसा नव्हता. तरीही त्यांना घरी जायचं होतं. हॉस्पिटलचा कंटाळा आला होता. मी निवृत्त पोलिस आहे. मला काय होणार आहे, असं ते कायम डॉक्टरांना म्हणायचे. एकदा ते जाम वैतागले असताना एका महिला डॉक्टरला म्हणाले, की मला सोडा नाहीतर मी आज आत्महत्याच करणार आहे. मला काहीही झालेलं नाही तरीही मला थांबवून ठेवलंय वगैरे... कधी नर्सशी वाद घालायचे. आता या मंडळींशी वाद घालून काय फायदा. पण संध्याकाळ झाली की त्यांचे एकपात्री नाट्य ठरलेले असायचे. रोज संध्याकाळी बॅग घेऊन मी चाललो म्हणून निघायचे आणि दारापाशी जाऊन परत यायचे. त्यांचं नाट्य आम्हाला पाठ झालं होतं.

एक पस्तीशीतील तरुण माझ्या समोरच्या बेडवर होता. त्याच्या शेजारच्या बेडवरील ज्येष्ठ व्यक्तीला खोकला यायचा. कुशीवर झोपला असताना खोकला जास्त यायचा. त्या तरुणाकडे तोंड करून झोपल्यानंतर ते कायम खोकायचे. आता त्या तरुणानं गैरसमज असा करून घेतला, की बाबाजी माझ्याकडे तोंड केल्यावर मुद्दाम जोरजोरात खोकतात. त्यावरून जोरदार खटके उडायचे. एकदा काय झालं कोण जाणे पण तो तरुण जाम भडकला. तुम्ही मुद्दाम माझ्याकडे तोंड करून मुद्दाम खोकता. मी मेलो तर माझ्यामागे माझी बायको मुलं आहेत. ती उघड्यावर येतील. तुमचा सगळा संसार झाला आहे. परत तुम्ही माझ्याकडे खोकलात, तर मी तुमचा खूनच करीन... अरे डायरेक्ट खून... काय चाललंय काय. आपण करोना वॉर्डात आहोत, परिस्थिती काय आहे. याचं भानं उरत नसावं. कदाचित करोनामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूची भीती त्या भानाचा खून करीत असावी.

एका बापलेक आमच्या वॉर्डात दाखल झाले होते. पोरगा लवकर रिकव्हर झाला आणि बापाला आणखी चार दिवस हॉस्पिटलमध्ये रहावं लागणार होतं. आता बाप हट्ट करून बसला, की मी आणि मुलगा एकत्र आलो. एकत्रच बरोबर जाणार. मग मुलगाही म्हणाला, की बाबांना डिस्चार्ज मिळेपर्यंत मी रहायला तयार आहे. अरे, हे काय लग्नाचं रिसेप्शन आहे का? एकाच गाडीवरून आलोय एकत्रच परत जाणार... नर्स आणि डॉक्टरबरोबर त्यांनी वादही घातला. पण समजून काही घेतलं नाही. अशा अनेक अतरंगी पेशंट्सनी हॉस्पिटलमधील माझा स्टे अधिक मनोरंजक केला. तिथं राहण्याचा कंटाळा येऊ दिला नाही.

आमच्या वॉर्डात दत्तवाडीतील एक पेशंट होते. व्यवस्थित होते. काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. एक दिवस संध्याकाळी अचानक ते आवराआवरी करताना दिसले. म्हटलं यांना अचानक आज कसा काय डिस्चार्ज मिळाला. तेव्हा शेजारच्या पेशंटनं सांगितलं, की त्यांची आई गेली, असा फोन आता आला होता. एरव्ही हसतमुखानं खुशीत घरी जाणारे पेशंट आम्ही पाहिले. लोक तो चालला म्हणून टाळ्याही वाजवायचे. त्या दिवशी मात्र, दुःखद अंतःकरणानं रडतरडत घरी जाणारा पेशंट पाहून आम्हालाही कसंतरीच वाटलं.
.....

 

वैविध्यपूर्ण, चौरस आणि संतुलित...
दीनानाथमधील नाश्ता आणि जेवण हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. आतापर्यंत मी किंवा बाबा एडमिट असताना पेशंटसाठी तिथलं जेवण कधी घेतलं नव्हतं. कारण रोज कोण ना कोण डबा घेऊन तिथं यायचं. मात्र, यंदा डब्याचा विषयच नव्हता. कारण त्या वॉर्डात येण्याची कोणालाच परवानगी नसायची. आणि असती तरी कशाला दुसऱ्याचं आयुष्य धोक्यात घालायचं. त्यामुळं दीनानाथमधलंच जेवण, नाश्ता वगैरे होता.

दीनानाथमधलं जेवण हे वैविध्यपूर्ण, चौरस आणि अतिशय संतुलित अशा प्रकारचं होतं. तुमचे आजार पाहून त्यानुसार डाएट ठरवून जेवणाचं ताट समोर यायचं. कधी कोशिंबीर, सलाड तर कधी गाजर नि काकडीचे काप, मूग, हरभरा, छोले, चवळी आणि मिक्स कडधान्यांच्या उसळी, क्वचित कधीतरी एखादी घट्ट पालेभाजी... भेंडी, दुधीभोपाळा, पडवळ, तोंडली आणि इतर भाज्या... श्रावण घेवडा, गवार, पापडी अशा शेंगाच्या भाज्या, कधी सोयाबिन, डाळीचा भरपूर वापर असलेली आमटी यांनी ताट सजलेलं असायचं. क्वचित कधीतरी नाचणीचं सत्व, अगदी कमी साखर घातलेला गाजर हलवा आणि साखर नसलेली शेवयांची खीर हे पदार्थही आश्चर्यचकित करून जायचे. कधी पोळ्या तर कधी पालक पराठे असायचे.

  

सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, सांजा, शेवयांचा उपमा, दलियाचा उपमा, इडली, नाचणीच्या रव्याची इडली वगैरे पदार्थ असायचे. सोबत कलिंगड किंवा पपईच्या फोडी. शुगर नसलेल्यांना केळं. सोबत ग्लासभर दूध. रात्रीच्या जेवणानंतरही दुधाचा ग्लास यायचा. मला दूध हे विशेष आवडत नाही. विनासाखर आणि काहीही न घालता तर अजिबात नाही. सुरुवातीचे काही दिवस मी दूध पिलं नाही. भूकही नसायची आणि आवडतही नव्हतं. घेतलं तरी आजूबाजूच्या कोणाला तरी देऊन टाकायचो. पण नंतर नंतर माझी भूक वाढली आणि दूध प्यायला सुरुवात केली.

संध्याकाळच्या सुमारास सूप नावाचं एक पेय यायचं. एक दिवस पालक आणि एक दिवस टोमॅटो हा अपवाद वगळला तर उर्वरित दिवस ते सूप कशाचं आहे,  कोणालाच ओळखता यायचं नाही. फक्त गरम आहे, म्हणून ते झटपट संपायचं.
.....

सोळाव्या दिवशी डिस्चार्ज...
एडमिट झाल्यानंतर बरोबर सोळाव्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. थोडा लवकरही मिळाला असता. पण शुगर आणि एसपीओ2 ऑव्झर्व्हेशनसाठी त्यांनी ठेवलं असावं. घरी सोडताना स्वॅब टेस्ट करीत नाहीत. कारण बाराव्या किंवा चौदाव्या दिवसांनंतर शरीरीतील करोनाचा विषाणू ९९ टक्क्यांपर्यंत नष्ट होतो. त्याच्यामुळे दुसऱ्याला संसर्ग होण्याचा धोका अजिबात नसतो. करोनाग्रस्त व्यक्तीही पूर्णपणे बरी झालेली असते. मात्र, रुग्णाच्या घशात वा नाकामध्ये अत्यल्प प्रमाणात विषाणू आढळतात. त्यांच्यामुळे संसर्ग होत नाही. मात्र, स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह येते. आणि एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आली, की पेशंट घरी जाण्यासाठी टाळाटाळ करतात. त्या कारणामुळे हल्ली स्वॅब टेस्ट न करता पेशंटना घरी सोडले जाते. त्यात काहीही धोकादायक नाही. मात्र, हे करताना संबंधित पेशंट्सची एसपीओ2 लेव्हल, चालून आल्यानंतरची लेव्हल, तापमान, शुगर, बीपी आणि इतर पॅरामीटर्स चेक केले जातात. दम लागतोय का, हे तपासलं जातं. जेणे करून घरी गेल्यावर त्याला अडचण येऊ नये.

अशाच पद्धतीने मी देखील सोळाव्या दिवशी म्हणजे शनिवारी घरी परतलो. पाचव्या मजल्यावर असलेला माझा सी वॉर्ड ते लिफ्ट, दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमधून बिलिंग डिपार्टमेंट, तिथून परत, तळ मजल्यावर पोहोचल्यावर  लिफ्ट ते दीनानाथचा पोर्च ही जवळपास दीडशे ते दोनशे पावले आणि घरी आल्यानंतर २२ पायऱ्या या अगदी छोट्या अंतराने देखील माझा जीव काढला. बिलिंग डिपार्टमेंट मध्ये तर पंधरा-वीस मिनिटं थांबणंही जीवावर आलं होतं. आता विकेट पडतीय, अशीच माझी परिस्थिती घरी पोहोचेपर्यंत झाली होती. इतके दिवस चाल अगदी थोडी होती. त्यामुळं हे अंतरही खूप थकवणारं होतं.


मात्र, घरी आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर, टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतरही दमून जायला व्हायचं. क्वचित प्रसंगी थोडा दमही लागायचा. मात्र, श्वसनाचे व्यायाम मदतीला धावून आले. पोटावर झोपण्यानं खूप हातभार लावला. हळूहळू थकण्याचं आणि दम लागण्याचं प्रमाण कमी झालं. मग मी हळूहळू नाश्ता बनवू लागलो. कुकर लावू लागलो. वेगवेगळी काम करू लागलो. बरोबर अठऱा दिवसांनंतर मी पूर्णपणे ठणठणीत झालो आणि पहिल्यांदा घराबाहेर पडलो. म्हणजे सिम्प्टमॅटिक पेशंटसाठी पंधरा दिवसांचा जो क्वारंटाइन पिरियड तयार केला आहे तो आवश्यक असाच आहे.
.....


दवा चाहिये और दुवा भी...
डॉक्टरांचे प्रयत्न, औषधांचा गुण, सिस्टर मंडळींकडून घेतली जाणारी काळजी आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून करोना रुग्ण बरे व्हावेत, यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक जण यांच्यामुळे पेशंट बरे होऊन घरी जातात. मीही तसाच घरी आलो. मला वाटतं या सर्वांच्या बरोबरीनंच तुमच्या पाठिशी असलेल्या शुभेच्छांचं पाठबळही तुम्हाला बरं करण्यात मोलाची भूमिका बजावतं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीचा सिक्युरिटी गार्ड तुषार धुमाळ याचा एक दिवस फोन आला. साहेब, तुम्हाला करोना झाला समजल्यावर मला खूप वाईट वाटलं. मी गावालाच होतो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी मी गावच्या देवाला नवस बोललोय, साहेबांना लवकर बरं कर मी तुला नारळ नि साखर वाहीन. असेच आमचे शेखचाचा. हृद्यविकारातून बरे झाल्यानंतर बाबांसाठी घरी येणारे केअर टेकर. मला फोन करून ते रडायलाच लागले. थोडा वेळानंतर म्हणाले, की दादा तुम्हाला करोना झाल्यापासून आमच्या बायकोनं कुराण वाचायला घेतलंय. तुम्हाला काय होणार नाही. अल्ला तुम्हाला लवकर बरं करणार. नंतर घरी भेटायला आल्यावर बायकोनं दोनदा कुराण वाचून पूर्ण केल्याचं सांगितलं. माझा जिवलग दोस्त कमलेश पाठकनं मी एडमिट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली. क्वारंटाइन पिरियड संपल्यानंतर पारायण पूर्ण झालं. तुम्हाला बरं करण्यात या निरपेक्ष प्रेमाचा थोडातरी वाटा असणारच ना...

माझ्याकडे जेव्हापासून फोन आला तेव्हापासून प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांनी फोन केले. धीरजनं फेसबुकवर टाकल्यानंतर तर इतके फोन यायला सुरुवात झाली, की मला वाटलं आता सिस्टर सांगतायेत तुम्ही इतकं बोलू नका. व्हॉट्सअप, मेसेजेस, मेसेंजर, फेसबुक कॉमेंट्स नि ट्विटर यांच्यावर अनेकांनी माझी चौकशी केली. लवकर बरं होण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सदिच्छा व्यक्त केल्या. अनेक जण तर रोज मेसेज किंवा व्ह़ॉट्सअप करून आज कसा आहेस, सुधारणा होते आहे ना विचारायचे. लवकर बरा हो आपल्याला मिसळ खायला जायचंय, असंही गमतीनं म्हणायचे. अनेकांना वेगळे अनुभव असतील, पण माझ्या इमारतीमधील सर्व जण अगदी मनापासून माझ्या आणि बाबांच्या प्रकृतीची कायम विचारपूस करायचे. बरं होण्यासाठी शुभेच्छा द्यायचे.

हॉस्पिटलमध्ये आणि डिस्चार्जनंतर घरी पोहोचल्यानंतरही डबा आणून देऊ का, आज डब्याची काय व्यवस्था आहे की देऊ, अशी विचारणा करणाऱ्या फोनची गिनतीच नाही. लोकमान्य शाखेतील सर्व दोस्त, आमच्या भावे हायस्कूलमधील मित्र, एसपी कॉलेजमधील आणि रानडे इन्स्टिट्यूटमधील मित्र-मैत्रिणी तसंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून नव्याने भेटलेले भावे प्राथमिक शाळेतील दोस्त नि इतर अनेक दोस्त मंडळी...

तुझ्या बिलाचा काय विषय आहे... काही मदत लागली तर अगदी न लाजता सांग. मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलीन. निवृत्त झालेले बाबांचे एक मित्र केशव जोशी यांनी दोन-तीन वेळा मला फोन करून हे सांगितलं. आणखीही काही जणांनी तशीच विचारणा केली आणि मदतीची तयारी दर्शविली. गुरुवारच्या रात्री तुझी तशी अवस्था होती आणि आम्ही काहीच करू शकलो नाही, याचं खूप वाईट वाटतंय, असं म्हणून अनेक दोस्त फोनवर बोलताना ढसाढसा रडायला लागले... इतकं भरभरून व्यक्त होणारं हे प्रेम तुमच्या फास्ट रिकव्हरीमध्ये हातभर लावत असणार, याची मला खात्री आहे.


लोकांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा असतील तर तुम्ही नक्कीच लवकर बरे होता, असं मला तरी कायम वाटतं. आणि या बाबतीत मी भलताच नशीबवान आहे. दवाच्या बरोबरीनं देवाची कृपा आणि लोकांच्या दुवा देखील तुमच्या पाठिशी असायलाच हव्यात. कोणी मानो न मानो हर एक दुवा जरूरी होती है...यावर आपला ठाम विश्वास आहे. अवघडप्रसंगी मित्रांनी केलेली धावपळ, डॉक्टरांनी केलेले उपचार, दीनानाथमधील स्टाफनं अत्त्यंत प्रेमानं घेतलेली काळजी, माझे सर्व दोस्त, स्नेही आणि आप्तेष्टांच्या शुभेच्छा-सदिच्छा आणि लास्ट बट नॉट लिस्ट गणपती बाप्पाची कृपा या मुळेच मी आज ठणठणीत होऊन ब्लॉग लिहू शकतो आहे.

आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगामध्ये माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या आणि माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक धन्यवाद...

गणपती बाप्पा मोरया...

34 comments:

  1. योग्य वेळी योग्य माहीती

    ReplyDelete
  2. Waa ashish ji mast

    ReplyDelete
  3. देवाची कृपा हेच खरे.वाचून करोना ची. भीती गेली.

    ReplyDelete
  4. तुम्ही जे अनुभव लिहून ठेवले आहेत ते सर्वांनाच उपयोगी पडतील. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. Khuupch mst lihila ahes dada... Nehemipramane.. Actually I m waiting for this blog.. 😊😊👌👌

    ReplyDelete
  6. नेहमी प्रमाणे तुम्ही अनुभवा ची शिदोरी आम्हाला दिली ‌.

    ReplyDelete
  7. जिद्द, जिगर, चिकाटी आणि लोड न घेण्याचा स्वभाव उपयोगाला आला. लिखाण नेहमीप्रमाणे शैलीदार. सहजसोपे आणि रंजक

    ReplyDelete
  8. जिद्द, जिगर, चिकाटी आणि लोड न घेण्याचा स्वभाव उपयोगाला आला. लिखाण नेहमीप्रमाणे शैलीदार. सहजसोपे आणि रंजक

    ReplyDelete
  9. जिद्द, जिगर, चिकाटी आणि लोड न घेण्याचा स्वभाव उपयोगाला आला. लिखाण नेहमीप्रमाणे शैलीदार. सहजसोपे आणि रंजक

    ReplyDelete
  10. जिद्द, जिगर, चिकाटी आणि लोड न घेण्याचा स्वभाव उपयोगाला आला. लिखाण नेहमीप्रमाणे शैलीदार. सहजसोपे आणि रंजक

    ReplyDelete
  11. वाह मस्तच,तुम्ही लढवय्ये आहात...हे आधीही म्हणायचो आणि आताही. बरे होवून आलात खूप बरं वाटलं... उर्जा देणारं लिखाण

    ReplyDelete
  12. Mitra atta tuza anubhav anekana dhir deyil..

    ReplyDelete
  13. सर तो चार तासांचा पॅरेग्राफ वाचून धस्स झालं राव.....काळजी घ्या....तुम्ही घरी पोहोचल्यानंतर तुम्हाला कॉल केला होता त्यावेळीही तुम्हाला धाप लागत होती बोलताना.....पण काल बोललो तेव्हा तुम्ही नॉर्मल वाटलात....काळजी घ्या सर....
    - रविराज

    ReplyDelete
  14. खूप चांगले लिहिलेले आहे आणि बर्‍याच लोकांसाठी उपयुक्त ठरेल

    ReplyDelete
  15. जाड्या नेहमीप्रमाणे मस्त लिहिले आहेस रे, हे अनुभव दुसऱ्यांना स्फुर्ती देतील

    ReplyDelete
  16. जाड्या नेहमीप्रमाणे मस्त लिहिले आहेस रे, हे अनुभव दुसऱ्यांना स्फुर्ती देतील

    ReplyDelete
  17. आशिष,तू करोनातून बरा झालास ही खूप आनंदाची गोष्ट आहे! तुझ्या अनुभवांमधून खूप काही शिकायला मिळालं. लेखाचं शीर्षक अतिशय चपखल! तुझ्या आजाराचं समजल्यावर, तू लवकर बरा व्हावास म्हणून देवाला नवस करुन नारळ - साखर अर्पण करणारा आपला सुरक्षारक्षक, कुराणाचं दोनदा वाचन करणारी भगिनी आणि गुरुचरित्राचं पारायण करणारा मित्र यांच्याविषयी लिहिलेलं वाचताना डोळे भरून आले. खरंच लोकांच्या शुभेच्छा आपल्यासाठी खूप मदत करणाऱ्या असतात. त्याचबरोबर तुझ्यासाठी धावपळ करणारे तुझे मित्र डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्या बद्दल काय बोलावं समजत नाही. त्यांच्या कार्याला सलाम!!! हे सगळे जण आहेत आणि त्यांच्यासारखेही अनेक आज आहेत, म्हणून आजारी व्यक्तींना दिलासा आहे. तुझ्या लेखाचं शीर्षक म्हणूनच मला खूप समर्पक वाटलं. आता आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या भावनेनुसार नव्या उभारीने पुन्हा कामाला लाग! तुला मनापासून शुभेच्छा!

    ReplyDelete
  18. आशिष सर नेहमी प्रमाणे तुमच्या शैलीत खूपच छान लिहिले आहे. करोनाबद्दल उपयुक्त माहिती दिली आहे. त्यामुळे करोनाबद्दल जी मनात भीती होती ती कमी झाली.

    ReplyDelete
  19. Dear Ashish ,Very nicely written. It is very inspiring and also giving a lot of positivity.
    Thanks for sharing. You have given proper guidance and that too in very simple words👍

    ReplyDelete
  20. Ashish ji...nehmepramne 👌...

    ReplyDelete
  21. Sir you are a fighter , you succeeded. Your experience about this Corona treatment definelty inspires others. God Bless You.

    ReplyDelete
  22. आशिष तुला सलाम मित्रा!! तुझ्यासारखा खंबीर आणि कणखर माणूसच इतके धिरानी ह्या सर्व परिस्थितीला आणि प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. देवेन्द्र जी म्हणले ते अगदी बरोबर आहे तुझ्या सारख्या चांगल्या शांत आणि प्रेमळ माणसाचे माणूस दानव आणि देव काही वाकडं आणि वाईट करूच शकत नाही!! तू लवकरात लवकर ठणठणीत होऊन तुझे नेहमी सारखे वेगवेगळे खाण्याच्या पदार्थांचे फोटो टाकून आमच्या तोंडाला पाणी सुटावे हीच इच्छा!! सलाम मित्रा सलाम ☺️👍🙏

    ReplyDelete
  23. आपल्या ब्लॉगमधून आम्हाला कळालं की आपण कोरोनावर मात करून परतला आहात. ब्लॉग वाचताना आपण घेतलेले अनुभव आणि अनेक कोरोना पेशंटना झालेला त्रास यामुळे हा आजार कोणत्या थराला जाऊ शकतो हेही कळून चुकलं आहे. पण कोरोनाचा अति बाऊ न करता मदतीला धावून आलेल्या मित्रमंडळीना सलाम. आपलं पुढील आयुष्य निरोगी आणि ठणठणीत जावो या शुभेच्छा🙏

    ReplyDelete
  24. थरारक अनुभव...कोणाचाही आत्मविश्वास वाढवणारा!
    तुमच्या मानसिकतेला व लेखणीला प्रणाम!

    ReplyDelete
  25. सर, कोणत्या दिव्यातून तुम्ही गेलात..तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना, तुम्हाला योग्य वेळेत उपचारासाठी नेणाऱ्या देव माणसांना सलाम आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञाता...
    -जयदीप पाठकजी

    ReplyDelete
  26. खूपच महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद

    ReplyDelete
  27. छान लिहिले आहे,साहेब

    ReplyDelete
  28. बरे होऊन घरी आलात नेते यासारखा दुसरा आनंद नाही...

    ReplyDelete
  29. छान. लिहिले. आहे. साहेब

    ReplyDelete
  30. तसेच आवण स्वतः यातून अनुभव घेतल्या मुळे बाकी कॉमन माणसांसाठी काही सपोर्ट ग्रुप सारखे किंवा मदती साठी काही फोन न share करू शकाल काय ? जसे कॅन्सर किंवा ईतर patients जे बरे होतात तर सहसा एक अश्या patients साठी सपोर्ट ग्रुप करून common माणसांना मदत करतात . तुमचा कॉन्टॅक्ट फोन न देऊ शकलात तर वेळीअवेळी काही अडचण आली तर तुमची मदत होऊ शकते.आपाला आभारी आहे जर आपण या पोस्ट ला उत्तर देऊ शकलात तर त्याचा सर्वांना उवयोग होऊ शकतो.माझा न 9881308483 (wapp न 9518322141) आहे आणि मी law College road area मध्ये रहातो वय वर्षे 65 आहे आणि माझी आई 87 आणि बहीण 75 ची आहे म्हणून ही विनंती
    आपला प्रदीप लाखे

    ReplyDelete
  31. आशिष,तू करोनातून बरा झालास याचा खूप आनंद आहे.
    मोठे कार्य करण्यासाठी तयार हो.
    - निलेश पुणतांबेकर

    ReplyDelete
  32. खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या.
    JIo Marathi

    ReplyDelete