उन्हाळ्यात मस्तानी किंवा आइस्क्रीम, पावसाळ्यात गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा; तर हिवाळ्यामध्ये घाम काढणारा झणझणीत तांबडा रस्सा ! थंडीचा कडाका जसजसा वाढेल, तसतशी झणझणीत रस्सा ही खासियत असणाऱ्या हॉटेलांमधील गर्दी दुणावत जाईल. त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळला असाल आणि यंदाच्या थंडीमध्ये गावाबाहेर जाऊन एखाद्या नव्या "स्पॉट'ला जाऊन आडवा हात मारण्याची तुमची इच्छा असेल, तर वाघोली गावातील "हॉटेल कावेरी' या अस्सल गावरान "रेस्तरॉं'ला भेट द्याच!
नरसिंग भाऊसाहेब सातव-पाटील यांनी 1996 मध्ये "कावेरी हॉटेल' सुरू केले. प्रारंभी फक्त मित्रांसाठी ते मटण बनवायचे; पण हॉटेल सुरू करावे, हा त्यांच्या मित्रांचाच आग्रह. सुरवातीच्या काळात ते स्वतः पदार्थ तयार करायचे. आताही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पदार्थ तयार होत असल्यामुळे जुनी चव कायम आहे, असे अनेक वर्षांपासून "कावेरी'त जाणारी मंडळी सांगतात. सकाळी 11 ते रात्री 11 या कालावधीत "कावेरी' सुरू असते, अशी माहिती व्यवस्थापक शरद द. पवार यांनी दिली.
वाघोलीसह आता "कावेरी'च्या एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे. राज्यातील इच्छुक तरुणांना एक वर्ष स्वतः मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या गावी "कावेरी'च्या शाखा उघडण्यासाठी साह्य करण्याची योजना आहे, असे सातव-पाटील सांगतात.
महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांपेक्षा "कावेरी'चा चेहरा काही फार वेगळा नाही. तेथे तुम्हाला पार्किंगची समस्या जाणवणार नाही. शिवाय "फॅमिली'साठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने सहकुटुंब जाण्यासही हरकत नाही. आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. एकाच वेळी शंभर जण बसू शकतील इतकी टेबले असल्यामुळे जास्त थांबावेही लागत नाही. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आणि "प्लेट' पद्धत नसल्यामुळे भरपेट जेवणाचा आनंदही लुटता येतो. मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या कावेरीत झणझणीत झुणका, भरलं वांगं आणि तर्रीबाज मटकीची उसळ हा अस्सल मराठमोळा "मेनू' असलेली शाकाहारी थाळीही मिळते.
"कावेरी'ची खासियत म्हणजे बोल्हाईचे मटण! मटण थाळीमध्ये मिळणारे रस्सा मटण हे त्यातही विशेष. रस्सा ओरपल्यानंतर भर थंडीतही घाम फुटला नाही तर बोला ! पण झणझणीत म्हणजे नुसताच "जाळ' नाही. तिखटापेक्षा मसाल्याचा वापर अधिक असल्यामुळे रस्सा खाल्ल्यानंतरही जळजळ किंवा इतर त्रास होणार नाही, याची काळजी सातव-पाटलांनी घेतली आहे. रस्सा मटण आणि ज्वारी किंवा बाजरीची भाकरी इतकेच जरी खाल्ले तरी तुम्ही खूष व्हाल. त्याच्या जोडीला सुकं किंवा अळणी मटण, मसालेदार मटण फ्राय व मसालेदार कलेजी फ्राय असे मटणाचे विविध प्रकार "कावेरी'मध्ये उपलब्ध आहेत. जोडीला आहे मटण सूप!
मटण शिजवतानाच त्यात मीठ आणि हळद घातली जाते. मटणाचे तुकडे शिजल्यानंतर ते पाणी "मटण सूप' म्हणून "सर्व्ह' केले जाते; तर हळद आणि मिठाची चव मुरलेले मटण अळणी मटण (सुकं) म्हणून दिले जाते. मसाल्यांचा वापर नसल्याने अळणी मटणात खरा स्वाद समजतो. हेच मटण मसाले घालून "फ्राय' केले, की झाले "मटण फ्राय.' "मटण फ्राय'ही तर्रीबाज आणि रसरशीत. इथला आणखी एक चविष्ट पदार्थ म्हणजे "कलेजी फ्राय.' मटण शिजवून घेतल्यानंतर त्यात असलेले कलेजीचे काही तुकडे वेगळे काढले जातात. ते मीठ, मसाला, तिखट घालून "फ्राय' केले जातात. ही "डिश'ही खाऊन बघण्यासारखी आहे. मटण रस्सा आणि भाकरी यावर कचकून ताव मारा; पण पोटात थोडी जागा ठेवा भातासाठी. बासमती तांदळापासून बनविलेला पांढरा भात, झणझणीत रस्सा आणि झणझणीतपणा वाढविणारा "कावेरी खर्डा' हे "कॉंबिनेशन' खाऊन बघितले नाही तर तुमची "कावेरी'ला भेट व्यर्थ!
नेहमी त्याच त्याच ठिकाणी जाऊन वैतागला असाल तर किमान एकदा तरी "कावेरी'त जायला करायला काय हरकत आहे ? एकदा का तेथे गेलात तर तुम्ही पुन्हा गेल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित!
चहाची टपरी ते "कावेरी'
नरसिंग सातव यांचे वडील वाघोलीच्या जुन्या एसटी स्टॅंडवर चहाची टपरी चालवायचे. टपरीवर गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांच्याकडूनच आगाऊ पैसे घेऊन मग चहा, साखर आणि दुधाची खरेदी व्हायची. वडिलांची इतकी हलाखीची परिस्थिती होती. आपल्या पोराने मोठे हॉटेल टाकावे, अशी वडिलांची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे, असे सातव-पाटील सांगतात.
chitra jabari ahe :)
ReplyDeleteजी ललचाये रहा नही जाये !
ReplyDeleteनका हो नका असे चवदार लिहीत जावुत, जीवाला त्रास होतो.