शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Saturday, December 27, 2008
बंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न
Monday, December 08, 2008
शूरा मी वंदिले...
प्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...
Monday, November 17, 2008
उसळ आणि शिकरणीचे दिवस संपले...
Saturday, November 15, 2008
Wednesday, October 29, 2008
राज यांचे राजकारण...!
Wednesday, October 15, 2008
शिवसेनेचा चेहरा बदलणारा नेता...
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर प्रचंड पकड मिळविली आहे. शिवसेनेला एका दिशेने आणि एका विचाराने नेण्याचा त्यांचा मानस आहे. जुन्या नेत्यांना न दुखावता त्यांनी स्वतःचं स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन केलं आहे. विनायक, संजय आणि भारतकुमार ही राऊत मंडळी, मिलिंद नार्वेकर, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या सहा सल्लागारांच्या सहाय्याने त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांनी संघटना मुळापासून बांधून काढली आहे. भविष्यात त्यांना कितपत यश प्राप्त होतं त्याचं भाकित आताच करणं अवघड आहे. पण शिवसेना संपली, असं म्हणणाऱ्यांना या "कारकुनांच्या नेत्या'नं चोख उत्तर दिलंय...
Monday, August 04, 2008
शास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा
सांगायची गोष्ट अशी की, शास्त्री रस्त्यावर तेव्हा फार कमी हॉटेल्स किंवा रेस्तराँ होती. अर्थात, आजच्या घडीला खूप आहेत अशातील काही गोष्ट नाही. पण तेव्हा चॉईसच नव्हता. पण त्यावेळीही जे काही तीन-चार स्पॉटस होते त्यात अजंठाची अगदीच न्यारी होती. शास्त्री-खर्डेकर यांच्याबरोबर गेल्यानंतर चव अजूनही कायम राखली असल्याचे जाणवले. गरमागरम वडा आणि इडली सांबार ही अजंठाची वैशिष्ट्य. पण इथे मिळणारी दहा पंधरा प्रकारची श्रीखंड, भेळ-मिसळ आणि फक्कड चहा यांचीही तोड नाही. पण वडा द बेस्ट.
अजंठाचा वडा
वड्याचा आकार म्हणाल तर इतर ठिकाणच्या वड्यांच्या तोंडात मारेल असा. आणि चव थोडीशी झणझणीत. सोबतीला त्यापेक्षा झणझणीत हिरवी चटणी. हवी असेल तर चिंचगूळ आणि खजूर यांची चटणीही आहेच एकावेळी कमीत कमी दोन वडे खाल्ल्याशिवाय पठ्ठा उठणारच नाही. बाहेर मिळत असलेल्या वड्यांच्या तुलनेत अजंठाच्या वड्याची किंमत थोडी अधिक असेल पण चव चांगली असेल तर खवय्यांची कोणतीही किंमत मोजायची तयारी असते
काही दिवसांपूर्वी अजंठाच्या बरोबर समोर जोशी वडेवालेची शाखा सुरु झाली होती. तेव्हा अजंठाचा खप कमी होणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. पण अजंठाची चव आणि त्यामुळे विक्री आहे तशीच आहे. त्यामुळे जरा बरं वाटलं.
इडली सांबारमध्ये बुडली
वड्याप्रमाणेच इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे इडली सांबार. आता इडली सांबारमध्ये काय आहे खाण्यासारखं आणि ते देखील एका मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण एकदा खाऊन पहाच. आकाराने मोठी आणि तरीही हलकी अशी वाफाळलेली इडली तुमच्यासमोर असेल तर काय हिंमत तुम्ही इडली गट्टम करणार नाही. कोणत्याही अण्णाच्या तोंडात मारेल अशी इडली हे अजंठाचं वैशिष्ट्य आहेच.
पण सांबार ही इथली दुसरी खासियत. पूर्वी कुमठेकर रस्त्यावर असलेल्या स्वीट होममध्ये (आणि आताही) सांबारची जी चव होती तीच चव अजंठामध्ये आहे. तूरडाळीचं वरण, त्याला सांबारची चव आणि वरुन झणझणीत तर्री असा सांबार खाताना अक्षरशः घाम निघतो. पण चव कायम लक्षात राहते अर्थातच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परिणामामुळे नव्हे.
श्रीखंडाची रेलचेल
श्रीखंड म्हटलं की एक-दोन प्रकार आपल्याला आठवतात. वेलची, आम्रखंड आणि फारफार तर केशरबदाम किंवा केशर पिस्ता. पण तुम्ही स्ट्रॉबेरी, पायनापल, चॉकलेट आणि असे काही एकदम हटके प्रकार कधी ऐकले आहेत का. नाही ना मग तुम्ही एकदा तरी अजंठाला भेट द्यायलाच हवी. कारण इथे मिळणारी ही व्हरायटी तुम्हाला दुसरीकडे क्वचितच मिळेल.
Wednesday, July 23, 2008
तिसऱ्या आघाडीसाठी सुगीचे दिवस
पंतप्रधानापदाचे बाशिंग बांधून बसलेल्या लालकृष्ण अडवानी यांच्या भारतीय जनता पक्षाची अवस्था फारशी काही चांगली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि सध्याची "रालोआ' यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल कॉंग्रेस व चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम "रालोआ'बरोबर नाही. जयललितादेखील भाजपबरोबर येण्याच्या मनःस्थितीत नाही.
बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या संयुक्त जनता दलात प्रचंड धुसफूस सुरु आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचे फारसे सख्य नाही. तिकडे अकाली दलाचे नेतेही पंजाब प्रदेश भाजप नेत्यांवर खार खाऊन आहेत. पण तरीही अकाली दल भाजपची साथ सोडणार नाही, हे निश्चित. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना, ओरिसात बिजू जनता दल व पंजाबमध्ये अकाली दल हेच खरेखुरे साथीदार भाजपच्या मदतीला असतील. शिवाय अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा हुकुमी एक्का या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सक्रिय नसेल, ही गोष्ट कुंपणावरच्या मतदारांना आकृष्ट करताना महत्त्वाची ठरणार आहे. तसेच निवडणुकीच्या व्यवस्थापनात हातखंडा असलेल्या प्रमोद महाजन यांचीही उणीव पक्षाला जाणवेल.
सध्यातरी लालकृष्ण अडवानी यांच्याइतका दुसरा सर्वमान्य नेता भाजपकडे नाही. राजनाथसिंह, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद आणि दुसऱ्या फळीतील इतर नेत्यांमध्ये सुरु असलेले हेवेदावे देखील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम करु शकतात. पक्षांतर्गत धुसफूस लक्षात घेता 134 चा आकडा पुन्हा गाठणे हे देखील भाजपपुढे आव्हान असेल. मित्रपक्षांची घटती संख्या पाहिली तर "रालोआ'चे बळ देखील वाढणे अवघडच वाटते आहे.
कॉंग्रेसची गोची
प्रचंड वाढलेली महागाई हा एकच मुद्दा कॉंग्रेसला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कारणीभूत आहे. विरोधक जर संघटित आणि शक्तिशाली असते, तर पुढील निवडणुकीत कॉंग्रेसला नक्कीच शंभरचा आकडा गाठता आला नसता. पण सोनिया गांधींचे नेतृत्व आणि कमकुवत विरोधक यामुळे कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागणार नाही. अणुकरार झाला काय किंवा नाही झाला काय, याचा विचार सामान्य नागरिक मतदान करताना करणार नाही. तेव्हा आमच्यामुळे अणुकरार झाला किंवा विरोधकांमुळे अणुकरार रखडला, असा कोणत्याही स्वरुपाचा मुद्दा कॉंग्रेसने पुढे केला तरी त्याला भारतीय नागरिक कितपत साथ देतील, याबाबत साशंकता आहे.
महागाईचा भस्मासूर रोखण्यासाठी तुम्ही काय केले, पेट्रोल आणि घरगुती गॅसचे दर आटोक्यात ठेवण्यात तुम्ही अपयशी का ठरला, असे प्रश्न नागरिकांनी विचारले, तर त्याचे फारसे समाधानकारक उत्तर कॉंग्रेसकडे नसेल आणि जे उत्तर कॉंग्रेस पक्ष प्रचारादरम्यान देईल, त्यामुळे नागरिकांचे समाधान होईल, असे काही वाटत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला "अँटीइन्कम्बन्सी'चा फटका बसणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सरकारविरोधी वातावरणाचा फटका कमी बसावा यासाठी कॉंग्रेस कोणती उपाययोजना करते आणि त्यात त्यांना कितपत यश येते, यावर कॉंग्रेस कितपत मजल मारेल, हे ठरणार आहे. पण भाजपप्रमाणेच कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता धूसरच वाटते आहे.
नव्या पर्यायांचा विचार
अशा परिस्थितीत पुन्हा तथाकथित तिसरी आघाडी आणि डावी आघाडी यांना सरकार स्थापनेची सर्वाधिक संधी असेल. केंद्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या प्रादेशिक पक्षांचा राज्यांमध्ये क्रमांक एकचा शत्रू कॉंग्रेसच आहे. त्यामुळे तेलुगू देसम पक्ष, अण्णा द्रमुक, लोकदल किंवा बहुजन समाज पक्ष असे पक्ष कॉंग्रेसला दूर ठेवण्यासाठी एकत्र येऊ शकतात. हे पक्ष पूर्वी भाजपच्या तंबूत होते. पण तेव्हा नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांचे होते. आता तसे नाही. त्यामुळेच ही मंडळी भाजपबरोबर निवडणूकपूर्व युती किंवा निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्यता फारच थोडी आहे.
प्रादेशिक पक्षांना शक्यतो कॉंग्रेसबरोबर युती नको आहे. त्यामुळेच भाजप आणि कॉंग्रेस यांना समान अंतरावर ठेवणारा एखादा पर्याय पुढे येत असेल, तर त्याला या पक्षांची पसंती असेल. अण्णा द्रमुक व तेलुगू देसम या पक्षांना गेल्या निवडणुकीत जबर फटका बसला होता. मात्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील राजकारणाची सद्यस्थिती पाहता यंदाच्या निवडणुकीत जयललिता व चंद्राबाबू यांचे पक्ष पुन्हा बहरात येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी जर "क्लिन स्वीप' मिळविला, तर 65 ते 70 खासदारांचा एक गट तयार होईल व हाच गट सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावेल.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा विविध निवडणुकांमधून त्याचा प्रत्यय आला आहे. शिवाय हा पक्ष फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिला नसून, शहरी मतदारांनाही त्यांनी आकर्षित केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तर त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. अशा परिस्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पंधराचा आकडा ओलांडेल, अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. भाजप आणि कॉंग्रेस यांना बाजूला ठेवून नवा पर्याय अस्तित्वात येत असेल, तर राष्ट्रवादीही त्यात सहभागी होऊ शकते.
हरियाणात लोकदल, आसाममध्ये आसाम गण परिषद, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष या पक्षांची भूमिका काही प्रमाणात अशीच असेल. शिवाय लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, देवेगौडांचा धर्मनिरपेक्ष जनता दल व शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्षही तिसऱ्या पर्यायाला समर्थन देऊ शकतात.
पश्चिम बंगाल आणि केरळ हे डाव्यांचे बालेकिल्ले. शिवाय तमिळनाडू, आंध्र प्रदेश व देशाच्या इतर राज्यांमधून एखाद दुसरा खासदार निवडून आणण्याची ताकद डाव्यांमध्ये आहे. सध्या डाव्यांचा आकडा साठपर्यंत पोचतो. यंदाच्या निवडणुकीत डाव्यांना हा "जॅकपॉट' लागण्याची शक्यता कमीच. तरीही डावे 45-50 पर्यंत नक्की पोचतील, अशी परिस्थिती आहे.
अशा परिस्थितीत तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीचे सरकार व त्याला कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा हा पर्यायही निवडणुकीनंतर अस्तित्वात येऊ शकतो. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचे खासदार जवळपास समान झाले आणि दोघांनाही दीडशे-पावणेदोनशेचा आकडा ओलांडता आला नाही तर पुन्हा एकदा एच. डी. देवेगौडा किंवा इंद्रकुमार गुजराल यांच्याप्रमाणेच नवा पंतप्रधान देशाला मिळण्याची शक्यता निश्चित आहे.
Friday, June 13, 2008
चविष्ट कोल्हापूर
कुस्ती असो किंवा मिसळ, फेटा असो किंवा तांबडा-पांढरा रस्सा, दागिन्यांचा साज असो किंवा धारोष्ण दूध कोल्हापूरची आठवण अगदी प्रकर्षानं होते.
कोल्हापूरमधील आमच्या खाद्ययात्रेची सुरवात झाली ती फडतरेंच्या मिसळनं. कोल्हापुरी मिसळ म्हणजे झणझणीत आणि जाळ हा माझा समज पुण्यातील काटा किर्रर...नादच खुळा या उपहारगृहानं यापूर्वीच खोडून काढला होता. पण काटा किर्रर...ला मिळणारी मिसळ ही फडतरेंच्या मिसळची चक्क कॉपी असल्याचं अगदी पहिला चमचा घेतल्यानंतर जाणवलं.
एका स्टीलच्या वाडग्यात मिसळ देण्याची परंपरा फडतरेंनी 1991 मध्ये सुरु केली. मूग किंवा मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, कांदा, बारीक शेव आणि त्यावर तर्री असलेला रस्सा. रस्सा रंगावरुन खूप जाळ असेल असं वाटत असलं तरी तसं नाही. आपण अगदी सहजपणे खाऊ शकू असा हा रस्सा असतो. चवीला काहीसा कडवट. अर्थात, ही कडवट चव तिखटाची आणि ती देखील गूळ न घातल्यानं आलेली. रस्सा घालून झाला की त्यावर एक चमचा दही घालून मिसळची डिश तुमच्यासमोर ठेवली जाते. सोबतीला लादी पाव. रस्सा कितीही खा दुसऱ्या दिवशी कोणताच त्रास होणार नाही याची हमी. घसा धरणार नाही किंवा जास्त धावपळही करावी लागणार नाही.
सकाळी चार वाजल्यापासून रस्सा (पातळ भाजी किंवा कट) तयार करण्यास प्रारंभ होतो. रोज साधारणपणे अडीचशे डिश जातात, असं प्रवीण फडतरे सांगतात. कोल्हापूरमध्ये चोरगे, दत्त आणि इतरही अनेक मिसळवाले आहेत. पण फडतरे ते फडतरेच असं इथले खवय्ये सांगतात. आता माझाही त्यावर विश्वास बसलाय.
पांढरा-तांबडा रस्सा हा देखील तितकाच अप्रतिम. पुण्यात काही ठिकाणी पांढरा रस्सा मिळतो पण तो अस्सल नाही हे इथं आल्याशिवाय कळत नाही. तांबड्यापेक्षा पांढरा रस्साच अधिक चांगला वाटला. मिसळीचा कट आणि मटणाबरोबर मिळणारा तांबडा रस्सा यामध्ये थोडाफार फरक आहे. पण दोन्ही भाऊ भाऊच!
पांढरा रस्सा म्हणजे मटणाचं पाणी, नारळाचं दूध, थोडीशी हळद आणि मीठ. काही चतुर मंडळी यामध्ये "कॉर्न फ्लॉवर' किंवा इतर पदार्थ मिसळून बनवाबनवी करतात. पण आमचे मित्र चारुदत्त जोशी यांचे मित्र संजय निकम यांच्या वूडीज या हॉटेलमध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा पिऊन मन तृप्त झालं.
कोल्हापूरमध्ये आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे दीपकचा वडा. इतर ठिकाणी मिळते तशीच बटाट्याची भाजी किंवा सारण. पण वरील आवरण मूगाच्या पिठापासून तयार केलेले किंवा कदाचित हरभरा डाळच अधिक जाड दळून ते कालविले असावे. पण डाळ दाताखाली येईल अशी व्यवस्था त्यात होती. त्यामुळे फक्त सारणाची चव न लागता वरच्या आवरणाचीही चव लागावी अशी व्यवस्था. पुण्या-मुंबईत चार-पाच रुपयांत मिळणारा वडा येथे आठ रुपयांना ऐकून डोळेच चमकतात. पण आकार काहीसा मोठा आणि चवही अप्रतिम त्यामुळे "लेट्स एन्जॉय'! सोबतीला पावभाजीचा पाव न देता लादीपाव दिला जातो. त्यामुळे वडापाव घेण्याऐवजी नुसता वडाच घेण्यात हशील आहे.
शिवाजी चौकामध्ये मिळणारा दावणगिरी लोणी डोसा एकदा तरी खावाच. मी पुन्हा एकदा जाऊन खाणार आहे. नेहमीच्या डोसा पिठापेक्षा काहीसे पातळ पीठ. शिवाय नेहमीच्या डोशापेक्षा आकाराला वेगळा. हा डोसा पातळ नसतो आणि घावनसारखा असतो. पण त्यावर लोणी अक्षरशः ओतले जाते. अगदी मोकळ्या हाताने. शिवाय एकदा लोणी टाकल्यानंतर तो जेव्हा पलटी करतात तेव्हा तितकेच लोणी पुन्हा एकदा टाकून पाघळलेल्या लोण्यात तो डोसा अक्षरशः घोळविला जातो. "हेल्थ कॉन्शस' लोकांनी इकडे वळू देखील नये. मी हा डोसा दोनवेळा खाल्ला. लहान आकारामधील स्पंज डोसा (तीन) देखील "ट्राय' करायला हरकत नाही.
गुरुवारी सकाळी कोल्हापूर स्टेशनजवळ खालेल्ला भडंगचा प्रकारही चांगला आहे. स्टेशनपलिकडे जाधव चौकात लाड बंधू भडंगची गाडी आहे. त्यावर सात रुपयात एक प्लेट भडंग मिळते. लाड यांनी घरी तयार केलेलं झणझणीत भडंग. त्यावर कांदा, टोमॅटो, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून मिळणारं भडंग एकदम चटकदार. कोल्हापूरमध्ये राहून इतकं वैविध्यपूर्ण आणि चविष्ट खाल्लं आहे की विचारता सोय नाही. पुन्हा पुन्हा अशीच संधी मिळावी, अशीच अपेक्षा आहे. म्हणजे आता टेस्ट केलेले पदार्थ पुन्हा एकदा खाता येतील आणि जे राहिलं आहे त्यावर आडवा हात मारता येईल.
Saturday, May 24, 2008
वडापाव ते बर्गर...
गरमागरम पुरणपोळीपासून ते झणझणीत तांबड्या रश्श्यापर्यंत आणि पाघळणाऱ्या लोण्यामुळे लज्जत वाढणाऱ्या कांद्याच्या थालिपीठापासून ते वऱ्हाडी मंडळींच्या अभिमानाचा विषय असलेल्या वडाभातापर्यंत साऱ्या पदार्थांची नुसती नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटणारच. त्यात मालवणी मसाले वापरून केलेले पॉम्फ्रेट किंवा सुरमई मासे, सोलकढी, कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले झणझणीत चिकन-मटण, खानदेशचे वैशिष्ट्य वांग्याचे भरीत-भाकरी आणि खिचडी, सोलापूरचं सुकं मटण आणि शेंगादाण्याची चटणी, मराठवड्यात प्रसिद्ध असलेली शेंगाची पोळी आणि अस्सल ब्राह्मणी संस्कृतीमध्ये मुरलेले श्रीखंड, सोललेल्या वालाची (डाळिंब्यांची) उसळ व आळूची भाजी.
मराठी खाद्यपदार्थांची यादी करण्याचे ठरविले व प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची नावे काढण्यास सुरवात केली तर मग विचारता सोय नाही. अर्थात, महाराष्ट्राची खाद्यपताका महाराष्ट्राबाहेरही फडकत ठेवणारा एकमेव पदार्थ म्हणजे अस्सल मराठी वडापाव. महाराष्ट्राला वडापाव ही काही नवी गोष्ट नाही. शिवसेनेने मुंबईमध्ये वडापावला लोकमान्यता मिळवून दिली. हळूहळू मुंबईबाहेरही वडापावची लोकप्रियता वाढली व वडापाव ही महाराष्ट्राची ओळख बनली. पोहे, पुरी भाजी, कट वडा व वडा उसळ या नाश्त्यासाठीच्या अस्सल मराठी पदार्थांच्या यादीत वडापाव रुजू झाला.
महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकतापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसैनिकांच्या भाषेत मुंबई वडापाव) मिळू लागला आहे. प्रत्येक प्रांतामध्ये त्या ठिकाणच्या आवडीनिवडीनुसार चवीमध्ये बदल होत गेला पण वडापाव कायम राहिला.
झणझणीत मिसळ, पुरणपोळी आणि वडापाव यासारखे महाराष्ट्रीयन पदार्थ जसे महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरले तसेच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतही अनेक बदल होत गेले. सर्वसमावेशाची संस्कृती जोपासणाऱ्या महाराष्ट्राने परप्रांतामधील खाद्यपदार्थांनाही कधी दुय्यम वागणूक दिली नाही. नेहमी भरभरुन प्रेमच केले आहे.
गुजरातमधील कच्छी दाबेली, ढोकळा, फाफडा, खाकरा, ठेपला आणि उँधियो यांनी कधी "मेन्यू कार्ड'मध्ये आणि खवय्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळविले ते समजले देखील नाही. तीच गोष्ट दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदूवडा आणि सांबार-रस्समची! बंगालचा रसगुल्ला, केरळचा मलबारी पराठा, पंजाबची लस्सी आणि शेकडो प्रकारचे "स्टफ' पराठे, राजस्थानची दाल-बाटी, इंदूरची कचोरी, हैदराबादची चिकन-मटण बिर्याणी हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहेत की हे पदार्थ बाहेरचे आहेत यावर विश्वासही बसणार नाही.
परराज्यातीलच नव्हे तर परराष्ट्रातील खाद्यपदार्थांनाही मराठी माणसाने आपलेसे केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राईस-नूडल्स आणि सूप्स यांचा समावेश असलेली चायनीज खाद्यसंस्कृती, बर्गर, फ्रॅंकी, हॉटडॉग अशी "जंकफूड'ची संस्कृती जोपासणारे अमेरिकी खाद्यपदार्थ, पिझ्झा आणि पास्ता हे इटालियन खाद्यपदार्थ, नेपाळ, भूतान तसेच भारताच्या ईशान्य भागात लोकप्रिय असलेले मोमोज असे अनेकविध पदार्थ मराठी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवित आहेत.
मेक्सिकन, लेबनीज, थाई, जॅपनीज आणि कॉन्टिनेन्टल संस्कृतींमधील शेकडो खाद्यपदार्थ भारतात आणि महाराष्ट्रात कधीच दाखल झाले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ मिळणारी "मल्टिक्युझिन रेस्तरॉं'ची लोकप्रियता वाढू लागली आहे. अर्थात, परराज्यातील आणि परराष्ट्रातील खाद्यपदार्थ कितीही लोकप्रिय झाले तरी त्याचा फटका मराठमोळ्या खाद्यपदार्थांना कधीच बसला नाही आणि यापुढेही बसणार नाही.
मराठी माणसाच्या हृदयातील महाराष्ट्रीयन खाद्यपदर्थांचे स्थान अढळ आहे. पावसाचा वर्षाव सुरु असताना वाफाळलेला चहा व सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. रस्त्यावरुन जात असताना उकळत्या तेलात वडे सोडल्यानंतर सुटलेला घमघमाट तुम्हाला त्या गाडीपाशी खेचून नेतो. वरण-भात, पोळी भाजी व आमटी किंवा तिखट कालवण हे नेहमी साधंच वाटणारं जेवण महिनाभर घराबाहेर राहिल्यानंतर स्वर्गसुखासारखं वाटू लागतं.
जी गोष्ट शाकाहारी पदार्थांची तीच मांसाहारी पदार्थांची. बाहेर हॉटेलमध्ये कितीही उत्तम नॉनव्हेज मिळू दे पण घरगुती पद्धतीनं वाटण करुन तयार केलेल्या चिकन किंवा मटणाला वेगळीच चव असते. त्यामुळेच अनेकदा "रेस्तरॉं'मध्ये खास घरगुती पद्धतीने बनविलेले अमुक अमुक पदार्थ येथे मिळतील, अशा पाट्या लावाव्या लागतात. थोडक्यात काय तर महाराष्ट्राला समृद्ध व संपन्न करण्यासाठी जे प्रयत्न झाले किंवा होत आहेत त्यात महाराष्ट्राबाहेरुन आलेल्या व्यक्तींचाही महत्वाचा वाटा आहे. तसाच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती संपन्न करण्यात मराठमोळ्या पदार्थांप्रमाणेच महाराष्ट्राबाहेरील पदार्थांचाही खारीचा का होईना पण वाटा आहेच. सर्वसमावेशकता हा गुण महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा विसर न पडू देता पडला आहे, हे विशेष.
सरतेशेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे ती एकच गोष्ट महत्वाची. स्वातंत्र्यवीरांना मासे प्रचंड आवडायचे. त्यांना काही जणांनी विचारले की, तुम्ही तर ब्राह्मण मग तुम्ही मासे कसे काय खाता? सावरकरांनी त्यावेळी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. सावरकर म्हणाले, ""प्रत्येकाने आपल्याला रुचेल ते आणि महत्वाचे म्हणजे पचेल ते खावे.'' धर्म, संस्कृती, जात, देश, भाषा आणि वर्ण या गोष्टींचा संबंध खाद्यपदार्थांशी जोडला जाऊ नये हेच त्यांना सुचवायचे होते. सामाजिक क्षेत्रातही क्रांतिकारक विचार जोपासणाऱ्या सावरकरांचे खाद्यसंस्कृतीबद्दलचे हे विचारही आजच्या जमान्यात तितकेच उपयुक्त आहेत.
(This Article was Published in Sakal's SATARA editon on 25th May 2008)
Tuesday, March 11, 2008
अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी...
गरमागरम बटाटे वडा आणि फक्कड चहा
वडेवाले जोशी, रोहित वडेवाले, गोली वडापाव, जम्बो वडापाव आणि चौकाचौकांमध्ये गाड्यांवर मिळणाऱ्या वड्याची चव चाखून कंटाळा आला असेल तर शिवाजी रस्त्यावर असलेल्या "प्रकाश स्टोअर्स'च्या गल्लीत असलेल्या अन्नपूर्णाला एकवार जरुर भेट द्या.
आपण त्या गल्लीत शिरल्यानंतर जसजसे "अन्नपूर्णा'च्या जवळ जायला लागू तसतसा आपल्याला वडे तळण्याचा घमघमाट जाणवू लागतो. तेथेच आपली विकेट पडते. मग "एक प्लेट' वडा किंवा दोन वडापाव खाल्ल्याशिवाय आपला आत्मा थंड होत नाही. वास्तविक पाहता अन्नपूर्णा हे खरोखरच नावाप्रमाणे आहे. बटाटा वड्यापासून ते भाजणीच्या वड्यापर्यंत बऱ्याच "व्हरायटी' येथे मिळतात. मग त्यात उडीद वडा व साबुदाणा वडा हे प्रकारही आलेच. दक्षिणेकडील इडली-चटणी देखील आहे. मराठमोळी ओल्या नारळाची करंजीही आहे. पण बटाटा वड्याची चव म्हणाल तर काही औरच!
साधारणपणे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शिवाजी रस्त्यावरील गर्दी वाढू लागते आणि अन्नपूर्णासमोर उभे राहून खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांचीही. पूर्वी कुमठेकर रस्त्यावरील प्रभा विश्रांती गृहातील वडा हा इतरांपेक्षा वेगळा होता. तो अजूनही आहे. पण अनेक अटी आणि नियमांच्या चौकटीत अडकलेला तो वडा न खाल्लेलाच बरा अशी अवस्था होऊन जाते. अन्नपूर्णाचा वडा अगदी तसाच आहे. म्हणजे अटी व नियमांच्या चौकटीत अडकलेला नव्हे. तर चवीला अगदी हटके!
इथे गर्दीच इतकी असते की प्रत्येक घाण्यातील वडे अगदी हातोहात संपतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गरमगरम वडे हमखास मिळतात. वड्यातील सारणामध्ये बटाटा व कांदा यांच्या जोडीला लसूणाचाही हलका स्वाद असतो. शिवाय या सारणामध्ये लिंबाचीही थोडी चव जाणवते. त्यामुळेच हा वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. चणा डाळीच्या पिठातही मीठ व तिखट असते त्यामुळे तेही बेचव लागत नाही. शिवाय वड्याला चण्याच्या पिठाचे आवरण अगदी पातळ असते. त्यामुळे वडा आणखी लज्जतदार लागतो.
"अन्नपूर्णा'तील चटणीही अगदी चविष्ट. बटाटा वड्यासोबत मिळणारी हिरवी किंवा साबुदाणा वड्यासोबत मिळणारी दाण्याची चटणी दोन्ही चटण्या तितक्याच चवदार. "चटणी वड्यातच टाकली आहे' असे कुमठेकर रस्त्यावरील उपहारगृहात हमखास मिळणारे उत्तर येथे मिळत नाही. वड्याला पुरेशी चटणी येथे दिली जाते. आणखी हवी असेल तर परतही चटणी मिळते. साबुदाणा वडा तितकाच खमंग अन् भाजणीचा वडाही चांगलाच खुसखुशीत. पण माझे ऐकाल तर अनेकदा भेट दिल्यानंतर बटाटा वड्याची चव तुमच्या जिभेवर रुळली की मगच इतर खाद्यपदार्थांकडे वळा.
वडा खाल्ल्यानंतर चहा आलाच. अर्थात, वडा खाल्ला नाही तरी चहा आहेच पण खाल्ल्यानंतर आवर्जून आहेच. चहाची तल्लफ भागविण्यासाठी तुम्हाला खूप दूर जाण्याची गरज नाही. "प्रकाश स्टोअर्स'कडून "रॉंग साईड'ने (अर्थातच, चालत) तुम्ही नाना वाड्याकडे जाऊ लागा. नाना वाड्यासमोर कॉर्नरला महालक्ष्मी नावाचे अमृततुल्य आहे. दूध जास्त आणि पाणी कमी अशा द्रवापासून वेलचीयुक्त चहा प्यायल्यानंतर खाद्य यात्रेचे एक वर्तुळ पूर्ण होईल.
पेरुगेट जवळील "नर्मदेश्वर'सारखा चहा पुण्यातील असंख्य अमृततुल्यांमध्ये मिळतो. "महालक्ष्मी' येथील चहा त्याजवळ जाणारा पण अगदी तसा नाही. येथे दूधाचे प्रमाण पाण्यापेक्षा अधिक असल्यामुळे साधा चहाच अगदी "स्पेशल'सारखा वाटतो. "अन्नपूर्णा'चा वडा आणि "महालक्ष्मी'चा चहा यांच्यासाठी शिवाजी रस्त्यावर जाच!
Sunday, February 17, 2008
पत्र्या मारुतीजवळ मिळेल...
Sunday, February 03, 2008
शनिवारवाड्याजवळ "दिल्ली चाट'
Friday, January 25, 2008
नावाप्रमाणेच "सवाई'!
Saturday, January 19, 2008
सौंदर्य व्हेज नॉनव्हेज
Sunday, January 06, 2008
पुण्यातील "दक्षिण भारत"
सकाळीच काही कामानिमित्तानं कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळं येताना के.ई.एम. रुग्णालयासमोर (साऊथ इंडियन मेसजवळ) मिळणाऱ्या दाक्षिणात्य नाश्त्याचा आस्वाद घ्यावा, असा विचार आला. मग काय येतायेता एक चक्कर झालीच. तिथे गेल्यानंतर मला हैदराबाद, चेन्नई किंवा बंगळूरमध्ये गेल्यासारखंच वाटलं.
जवळपास सहा ते सात गाड्यांवर सांबार-चटणीच्या बरोबर इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा असे दक्षिणी पदार्थ खाण्यात पुणेकर मंडळी गुंग असल्याचे दिसेल. गाड्या जरी सहा-सात असल्या तरी प्रत्येक गाडीवर गर्दी जवळपास सारखीच! शिवाय प्रत्येक गाडीवरील ग्राहक रोजचे किंवा ठरलेले!! रास्ता पेठ, सोमवार पेठ आणि परिसरात दक्षिणी मंडळींचे प्रमाण तुलनेने अधिक. ज्यांना सर्वसाधारणपणे मद्रासी म्हणतात अशा मंडळींचे प्रमाण जाणवण्याइतपत असल्यामुळे या ठिकाणी अशा नाश्त्याच्या गाड्या लागणे नवीन नाही.
सांबार भात आणि रस्सम भात यांच्यासाठी प्रसिद्ध असलेली "मद्रासी मेस' याच ठिकाणी आहे. त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थांच्या प्रेमींनी इथे जायलाच हवे. असो. सांगण्याचा उद्देश्य असा की, मी तेथे गेलो आणि पुन्हा एकदा हैदराबादची चव अनुभवता आली. पुण्यातील अनेक उडुपी किंवा इतर "रेस्तरॉं"मधून इडली-डोसा मिळतो पण या ठिकाणी गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांची चव काही औरच.
नायर नावाच्या एका व्यक्तीच्या नावे असलेल्या गाडीवर इडली-वडा सांबार मागितला. इडली-मेदूवड्याच्या वरती सांबार आणि सांबारच्याच वरती चटणी अशी डिश समोर आली. मेदूवडा एक नंबर. पण इडली मात्र म्हणावी तितकी मऊ किंवा हलकी नाही. शिवाय सांबारची चवही मद्रासी नव्हती. पण मेदूवड्याची कमाल होती. मेदूवडा इतका हलका होता की विचारु नका. सांबारमध्ये तर त्याची काही वेगळीच चव लागत होती. या गाड्यांवर सांबार आणि चटणी पुन्हा मागितली तरी मिळते. शिवाय जादा चटणी-सांबार देताना मालकाचा चेहराही उपकार केल्यासारखा नव्हता हे विशेष!
हे पदार्थ खाणाऱ्या मंडळींमध्ये अर्थातच दक्षिणी मंडळी कमी होती. जादा संख्या होती ती मराठी आणि गुजराती मंडळींची! ठेपले, खाकरा, फाफडा आणि पापडी यांच्यासारख्या पदार्थांना रविवारची सुटी देऊन गुजराती मंडळींनी गाड्यांभोवती गर्दी केली होती.
या गाड्यांवर आढळणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांवर चटणी आणि सांबारच्या बादल्या किंवा पातेली नसतात. तर हे पदार्थ स्टीलच्या बरण्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इडली किंवा मेदूवडा सांबार हवा असेल तर काही मिनिटे इडली किंवा मेदूवडा सांबारच्या बरण्यांमध्ये बुडवून ठेवला जातो. दोन-एक मिनिटे सांबारमध्ये राहिल्यानंतर मग तो वडा तुमच्या प्लेटमध्ये टाकून त्यावर सांबार आणि चटणी टाकली जाते. आहे की नाही गंमत!
नायर शेजारच्या गाडीवर डोसा, उत्तप्पा आणि हे पदार्थ मिळत होते. डोसा इतका पातळ की दोन मिनिटांमध्ये डोसा तव्यापासून अलग होऊन वर नाही आला तर शप्पथ. येथेही सांबारपेक्षा चटणीच अधिक चांगली. त्यामुळे चटणीला मागणी अधिक! या दोन गाड्यापासून थोडी दूर एका कडेला एक महिला गाडी लावते. तिच्याकडे आज गर्दी कमी होती. पण तिचे वैशिष्ट्य असे की, तिची गाडी संध्याकाळीही असते. इतर गाड्या फक्त सकाळी असतात. शिवाय त्या बाईकडील डोसाही अप्रतिम असतो. वैशाली-रुपालीच्या तोंडात मारेल असा कुरकुरीत डोसा तिच्याकडे मिळतो. कधी जर चुकून त्या भागात गेलात तर जरुर खा!
आणखी एक गाडी येथे आहे तिथे जायला विसरु नका. या गाडीचा परवाना चेट्टीयार नावाच्या माणसाकडे आहे. गाडीवर कदाचित तोच असावा. कपाळाला गंध लावून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरो नाही पण "व्हिलन' म्हणून शोभेल अशी एक व्यक्ती ही गाडी चालविते. चेट्टीयारच्या गाडीचे वैशिष्ट्य असे की, त्याच्याकडे मेदूवडा, इडली, सांबार आणि चटणी हे सर्वच पदार्थ एक नंबर! त्यामुळे तुम्ही जर कधी गेलात तर त्याच्याकडेच जा असा माझा सल्ला असेल. मी पण तेच करणार आहे.
मेदूवडा आणि इडली तितकेच मऊ आणि हलके. चटणी पण घट्ट, थोडी तिखट आणि अगदी थोडी आंबट. सांबारही मद्रासी चवीकडे झुकणारे. चेट्टीयारची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्याकडे तांदूळ आणि उडदाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेले घावन मिळतात. डोश्यापेक्षा थोडे जाड आणि उत्तप्पापेक्षा थोडे पातळ, अशा मधल्याच आकारातील. त्याला घरी आपण घावन म्हणतो त्याला गाडीवर डोसा म्हणतात. तो डोसा एका डिशमध्ये चतकोर आकारात घडी घालून ठेवला जातो. त्यावर नेहमीप्रमाणे चटणी आणि सांबार टाकून "सर्व्ह' केला जातो. तुम्हाला एक डोसा सांबार-चटणी टाकून दे, अशी ऑर्डर ऐकू आली तर घाबरुन जाऊ नका. तुम्हीही असा रगडा एकदा खाऊन बघा. खूष व्हाल.
शिवाय या पदार्थांचे दर फार अधिक नाहीत. इडली-चटणी-सांबार दहा रुपये, इडली-मेदूवडा आणि सांबार-चटणी अकरा रुपये तर मेदूवडा-सांबार-चटणी बारा रुपये. डोसा बारा रुपये आणि उत्तप्पा तेरा रुपये. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा हे अधिक स्वस्त आणि चविष्टही! तिथे गर्दी जमते ती काय उगाचच?