सवाई व्हेज...
सवाई हे नाव उच्चारताच सर्वप्रथम पुणेकरांच्या डोळ्यासमोर येतो तो सवाई गंधर्व महोत्सव. इतिहासात माधवराव पेशवे यांच्या नावामागे सवाई पदवी असल्याचे आपल्याला माहीत असते; पण तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) नित्यनियमाने ये-जा करणाऱ्या पुणेकरांसाठी मात्र "सवाई' हे नाव आणखी एका गोष्टीशी जोडले गेले आहे. ते म्हणजे "सवाई व्हेज'. सात महिन्यांपूर्वी सुरू झालेले सवाई आता नावारूपाला येत असून, खऱ्या अर्थाने "सवाई' होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
तानाजी मालुसरे रस्त्याला (सिंहगड रस्ता) लागल्यानंतर पु.ल. देशपांडे उद्यानाच्या थोडेसे अलीकडे सवाई व्हेज रेस्तरॉं आहे. "हॉटेल मॅनेजमेंट'चे धडे घेतलेल्या अमित शिंदे या युवकाने "सवाई'ची सुरवात केली. शाकाहारी पदार्थांच्या "रेस्तरॉं'ला साजेसे व एकदम वेगळे नाव ठेवण्याची इच्छा अमितची होती. शिवाय "रेस्तरॉं' ज्या परिसरात आहे तेथील नागरिकांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी विचारात घेऊन नाव निश्चित करावयाचे होते. त्यामुळे बऱ्याच विचारांती सवाई नाव निश्चित झाले. अर्थात, एकदमच "हटके' असलेले हे नाव "क्लिक' झाले हे सांगणे नकोच.
सिंहगड रस्त्यासारख्या विस्तारणाऱ्या पट्ट्यात "सवाई'चा प्रशस्तपणा नजरेत भरणारा आहे. अगदी दोनशे-सव्वादोनशे मंडळी एका वेळी बसू शकतील इतकी मोठी जागा. त्यातही गार्डनमध्ये निवांतपणे बसण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शिवाय 40-50 जणांच्या ग्रुपसाठी स्वतंत्र व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. "रेस्तरॉं'मध्ये प्रवेश करताच नजरेस पडते ते फेटा बांधून अगदी थाटात बसलेल्या मराठी सरदाराचे तैलचित्र.
"सवाई'मध्ये पंजाबी, चायनीज, पिझ्झा, सिझलर्स, पावभाजी, ज्यूस आणि डेझर्ट अशी खाद्य पदार्थांची मोठी रेंज उपलब्ध आहे. पण त्यातही पंजाबी व पावभाजी यांनाच नागरिकांची सर्वाधिक पसंती. इतर ठिकाणी मिळणारे पदार्थ व "सवाई'ची खासीयत यांची माहिती घेतानाच कोणत्या "डिश' मागवायच्या हे निश्चित केले होते.
"सवाई'चे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेतच, पण सिंहगड रस्त्यावरील पूर्वीपासून राहणारी मंडळी आणि शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांमधून स्थलांतरित झालेली मंडळी, अशा दोघांनाही सवयीची वाटणारी चव जपण्याचा प्रयत्न "सवाई'मधील विविध "डिश'मधून करण्यात आला आहे.
"स्टार्टर्स'मध्ये "स्पीनच मलेशिया' व "व्हेज सीक कबाब'ची ऑर्डर दिली. बारीक चिरून घेतलेल्या पालकामध्ये तिखट-मीठ व मसाले टाकून त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतात. हे गोळे तळून घेतल्यानंतर ते टोमॅटो व चायनीज सॉसमध्ये परतून घेतले जातात. सजावटीसाठी काजू-बदाम यांचा वापर होतो. पालकाचे हे "स्टार्टर्स' आवर्जून घ्या. "व्हेज सीक कबाब' हे ऐकायला थोडेसे विचित्र वाटते; पण त्याची चव अगदी उत्तम आहे. सर्व भाज्यांचा खिमा करून मग त्यात विशिष्ट मसाले टाकून थोडीशी तिखटाच्या बाजूला झुकणाऱ्या या कबाबचा आकार अगदी "सीक कबाब'सारखाच!
"मेन कोर्स'मध्ये पारंपरिक भाज्या आहेतच, पण व्हेज मराठा, व्हेज लाजवाब व पनीर जंगी ही "सवाई'ची खासीयत. पण आम्ही मात्र व्हेज मालवणीची "ऑर्डर' दिली. मालवणी चवीत पनीर मालवणी हा "ऑप्शन'ही आहे. भाज्या व पनीरचा वापर इतर "डिश'मध्ये होतो तसाच असला तरी मालवणी मसाले वापरून "ग्रेव्ही' तयार होते. त्यामुळे चव आणि रंग या गोष्टी अगदी "मालवणी करी'च्या जवळ जाणाऱ्या.
वेगळी "डिश' चाखायची असेल तर "व्हेज बगदादी'चा जरूर विचार करा. सर्व भाज्या एकत्रित करून थोडीशी घट्ट "ग्रेव्ही' असलेली ही डिश सर्व्ह करण्याची पद्धत अगदी निराळी आहे. "सिझलर्स' जसे बिडाच्या पात्रात कोबीच्या पानात "सर्व्ह' करतात, त्याप्रमाणे भांड्यामध्ये "टोमॅटो ऑम्लेट'मध्ये बगदादी "सर्व्ह' करण्याची पद्धत आहे. पण असे करताना भाजीची "क्वांटिटी' घटते. त्यामुळे भाजीवर "टोमॅटो ऑम्लेट'चे टॉपिंग करून दिले जाते.
"व्हेज हिंडोल' ही अशीच हटके डिश! सर्व भाज्यांना साथ मिळते ती पनीर व मशरूम यांची. कोथिंबीर व पुदिना यांचा वापर "ग्रेव्ही'मध्ये जास्त असतो. त्यामुळे भाजीला हिरवा रंग तर येतोच, पण त्याचबरोबर पुदिन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाजीला हलकी "मिंट'ची चवही येते. त्यामुळे ही भाजीही काही जण आवर्जून मागतात, अशी माहिती व्यवस्थापक विजय पुजारी यांनी दिली.
पावभाजीतही कोल्हापुरी पावभाजी ही वेगळी चव "सवाई'ने जपली आहे. मुळातच भाजी तयार करताना त्यात मसाल्यांचे प्रमाण अधिक टाकून ही भाजी तिखट केली जाते. तिखट टाकून जाळ करणे वेगळे व मसाले वापरून झणझणीत करणे निराळे. दुसरा प्रकार "सवाई'ने स्वीकारला आहे. झणझणीतपणाला या ठिकाणी मागणी मिळणे साहजिकच आहे. त्यामुळे "कोल्हापुरी पावभाजी' येथे चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.
"सवाई'पासून तीन-चार किलोमीटरच्या आत राहणाऱ्या मंडळींना घरपोच सेवाही पुरविली जाते तीही अगदी "फ्री ऑफ चार्ज'! "सवाई'चे आणखी एक वेगळेपण म्हणजे अमितने "ऑर्कुट'वर "सवाई व्हेज' नावाची "कम्युनिटी'च तयार केली आहे. या "कम्युनिटी'च्या माध्यमातून नव्या "डिश' सुरू करणे अथवा सुरू असलेल्या पदार्थांमध्ये ग्राहकांनी सुचविलेले बदल करून पाहणे, अशा गोष्टी होतात. "सवाई'चे निस्सीम चाहते "कम्युनिटी' आवर्जून "जॉईन' करतात व इतरांना "सवाई'बद्दल सांगतात. चार जानेवारीलाच सुरू झालेल्या "कम्युनिटी'चे 24 जण सदस्य झाले आहेत. तेव्हा तुम्हालाही "सवाई' पसंत पडले तर तुम्हीही "कम्युनिटी' "जॉईन' करायला विसरू नका!
"सवाई व्हेज'
देवगिरी अपार्टमेंट,
ए विंग, तानाजी मालुसरे रस्ता,
पुणे 411030.
सकाळी 11 ते रात्री 11.30