ताहराबादचा खान्देशी पाहुणचार..
सचिनच्या लग्नामध्ये शेव-जिलेबीचा पाहुणचार स्वीकारुन आम्ही पुन्हा बेलापूरच्या दिशेने निघालो. खान्देशमध्ये येऊनही वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, भाकरी आणि खिचडी असा खास खान्देशी पाहुणचार न घेतल्याचं सल आमच्या मनात होतं. त्यामुळं जाता जाता एखाद्या हॉटेल किंवा ढाब्यावर या पदार्थांचा आस्वाद घेता येतोय का, याचा शोध घेत निघालो.
साक्रीतनं बाहेर पडताना एक-दोन ठिकाणी चौकशी केली. पण त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं जेवावसंच वाटलं नाही. त्यामुळं पुढे निघालो. वाटेत ताहराबाद इथं साई गार्डन नावाचा ढाबा आहे. तिथं चांगल्या पद्धतीनं खान्देशी जेवण मिळेल, असं एकानं सांगतिलं. चला तिथं ट्राय मारु, असा विचार करुन आम्ही साई गार्डनमध्ये पोचलो.
बरं हा ढाबा आंध्र प्रदेशातल्या एका साईभक्त अण्णाचा होता आणि काम करायला (आचारी, वेटर, वाढपी वगैरे वगैरे) उत्तर प्रदेशी तसंच बिहारी. तिथं आम्ही खान्देशी पदार्थांची चव चाखण्यासाठी थांबलो. एकापेक्षा एक खवय्ये आणि खादाड असल्यामुळं चांगली दणकून ऑर्डर दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे शेवभाजी, बैंगन मसाला, बैंगन भरता, ज्वारीची भाकरी, मिरचीचा खर्डा आणि सरतेशेवटी दाल खिचडी. स्टार्टर म्हणून मागावले नाचणीचे (नालगीचे) पापड. नाचणीच्या पापडाचा आकार नेहमीच्या पापडापेक्षा जरा जास्तच मोठा होता. पण कांदा-टोमॅटो किंवा चाट मसाला न टाकताही नाचणीचा पापड मसाला पापडपेक्षा अधिक चविष्ट लागत होता.
साधारण दहा-पंधरा मिनिटं वाट पहायला लावल्यानंतर जेवण आलं. बैंगन मसालामध्ये झणझणीतपणा आणि चव यांचा सुवर्णमध्य साधण्यात आला होता. त्यामुळं भाजी काहीशी तिखट वाटत असली तरी मसाल्याची चव बिघडली नव्हती. शिवाय तर्री देखील जास्त नव्हती. काटेदार देठांसह वांग्याची भाजी करण्यात आल्यामुळं वांग्याची भाजी अगदी `टिपिकल` वाटत होती.
पण अशा ढाब्यांमध्ये भाज्या एकाच पद्धतीनं तयार केल्या जातात, असं ऐकलं होतं. एकच करी असते आणि त्यामध्ये हवी ती भाजी टाकली जाते. त्यामुळं बैंगन मसाला चांगला होता. त्याचं मला काही विशेष वाटलं नाही. पण वांग्याचं भरीत खाल्लं आणि चवीचं महत्व पटलं. वांग्याच्या भरतामध्ये कांदा आणि दाण्याच्या कुटाचा इतका अफलातून वापर करण्यात आला होता की विचारता सोय नाही. जेवता जेवता वांग्याचं भरीत आणि बैंगन भरता याच्या एक-दोन एक्स्ट्रा डिशेस मागवल्या. जोडीला मिरचीचा खर्डा होताच. अगदी झणझणीत. व्वा. व्वा...
दुर्गेश सोनार यांचा जोर शेवभाजीवर होता. पूर्वी एकदा खाल्लेली शेवभाजी त्यांच्या अजूनही स्मरणात होती. तेव्हा ते शेवभाजीवर तुटून पडले. शेवभाजीही अप्रतिम होती. काहीशी घट्ट आणि बैंगन मसालाचीच करी वापरल्यामुळं दोन्ही चवींमध्ये फारसा फरत वाटत नव्हता. पण तरीही शेवेची स्वतःची चव होतीच. मला वाटतं की शेवभाजीची डिशही आम्ही एक्स्ट्रॉ मागवली.
इतके सगळे चविष्ट पदार्थ असताना एक-दोन भाक-यांवर आम्ही थोडेच थांबणार होतो. दोनच्या चार भाकरी कधी झाल्या कळलंच नाही. सगळ्यांनी तीनपेक्षा जास्त भाक-या तोडल्या. इतकं सगळं ओढल्यानंतर खिचडी मागवायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झालाच नाही. एक प्लेट खिचडी मागावली. दुर्गेश आणि अमोल हे अगदी थोडा हातभार लावणार होते. माझ्यावर आणि संदीपवर खिचडी संपवण्याची जबाबदारी होती. पण सर्वांनी समान वाटा उचलला. त्यामुळं खिचडी पण उत्तम असल्याचं स्पष्ट झालं.
सहा जण अगदी रेटून जेवल्यानंतरही आमचं बिल अगदीच माफक होतं. तीनशे की सव्वातीनशे फक्त. इतकं चविष्ट आणि भरपूर जेवण फक्त काही रुपयांमध्ये ही चैन पुण्या-मुंबईला करता येत नाही. साक्री किंवा एखाद्या आडगावातच ही सोय आहे. नाशिक-सटाणा मार्गे कधी धुळे-साक्रीला जाण्याचा योग आला तर ताहराबादच्या साई गार्डनमध्ये जरुर स्टॉप घ्या आणि आडवा हात माराच...