Sunday, November 10, 2019

रामरायाचे मनापासून आभार मानेन...

 कोठारी बंधूंच्या बहिणीला भावना अनावर...


भविष्यात रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा कोठारी बंधूंच्या बलिदानाचा कायमच आदराने आणि आठवणीने उल्लेख होईल... अयोध्येचे आंदोलन उभारण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे मोरोपंत पिंगळे, आंदोलनाची धग वाढविण्यासाठी देशभर रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी हयात खर्ची घालणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद, विनय कटियार आणि चेहऱ्याविना कारसेवेत सहभागी होणाऱ्या लाखो कारसेवकांचा बहुतांश हिंदू समाज ऋणी असेल. यांच्याबरोबरच कदाचित पहिली आठवण येईल, ती राममंदिरासाठी बलिदान देणाऱ्या रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी यांची... 

श्रीराम मंदिर निर्मितीसाठी १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा कारसेवा झाली तेव्हा कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे अयोध्येमध्ये पोहोचले. परिंदा भी पर नही मार सकेगा… अशी घोषणा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. मात्र, कोठारी बंधूंनी ३० ऑक्टोबर रोजी बाबरी मशि‍दीवर चढून भगवा झेंडा फडकविला. त्यावेळी कोठारी बंधूंना ताब्यात घेण्यात आले आणि फैजाबाद येथे नेऊन सोडून देण्यात आले. दोन नोव्हेंबर रोजी ते पुन्हा बाबरी मशि‍दीच्या परिसरात आंदोलनासाठी पोहोचले. त्यावेळी मुलायमसिंह यांच्या आदेशानंतर पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एकूण अकरा कारसेवकांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये कोठारी बंधूंचा समावेश होता… एकाच घरातील हाताशी आलेली दोन पोरं मारली गेली...

धर्मासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, त्यांची बहीण पौर्णिमा सध्या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. कोलकात्यामध्ये भाजपचे काम करते आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी बोलणं झालं... तिला दिवसभरात काही पत्रकारांचे फोन आले होते. बहुतांश फोन हे दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील पत्रकारांचे होते. माझ्याशी बोलताना पौर्णिमा अनेकदा भावनिक होत होत्या... त्यांचा स्वर दाटून येत होता.


कोठारी कुटुंबासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आहे. खरंतर सुवर्णदिन आहे. ज्या दिवसाची आम्ही सर्व आतुरतेनं वाट पाहत होतो, तोच हा दिवस. दुर्दैवाने आजचा दिवस पहायला माझे भाऊ नाहीत आणि आई-वडीलही नाहीत. आज जर आई-बाबा असते तर आपल्या मुलांच्या बलिदानाचे सार्थक झाले, अशी त्यांची भावना नक्कीच झाली असती. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ते खरं तर प्रभू श्रीरामांचे मंदिर कधी उभारले जाणार, यासाठीच आयुष्य जगत होते. माझ्या दोन्ही भावांना आणि त्यांच्या पश्चात अनेक वर्षांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या मृतात्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल… 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा प्रचंड आनंददायक आणि बलिदानाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा माझ्या भावांवर पगडा होता. संघाचे स्वयंसेवकच होते ते. त्यामुळेच हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राममंदिराच्या निर्मितीसाठी कारसेवेत सहभागी होण्याचे निश्चित केले आणि ते अयोध्येत पोहोचले. पुढे काय झाले, ते सर्वांना माहिती आहेच. हाताशी आलेली मुले गमाविल्यामुळे माझे आई-वडील त्यावेळी पार कोलमडून गेले होते. पण धर्मकार्यासाठी मुलांनी केलेले बलिदान वाया जाणार नाही, हा विश्वास आई-वडिलांमध्ये होता. तोच त्यांच्या जगण्याचा अधार होता. त्यामुळे त्यांनी भावांच्या मृत्यूचे दुःख कधीच व्यक्त केले नाही. जवळपास तीन दशके आम्ही जे सहन केले, त्याचे फळ आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे,’ हे सांगताना पौर्णिमा यांचा कंठ दाटून आला होता.

माझ्या भावांनी अयोध्येमध्ये बलिदान दिल्यानंतर आमच्या कुटुंबाचे आणि अयोध्येचे एका वेगळ्या प्रकारचे ऋणानुंबध निर्माण झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा माझे आई-वडील प्रत्येक कारसेवेत सहभागी होत असत. आम्ही दरवर्षी किमान तीन ते चारवेळा तरी अयोध्येला जायचोच. एकही वर्ष आमची अयोध्यावारी चुकली नाही. पुढच्या वेळी येऊ तेव्हा राममंदिराचा तिढा सुटलेला असू दे आणि श्रीराममंदिराची निर्मिती सुरू झालेली असू दे, हेच आमचे मागणे असायचे. आज माझे आई-वडील नाहीत. पण मी जेव्हा अयोध्येला जाईन, तेव्हा आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल रामरायाचे आभार नक्की मानेन, असं त्या आवर्जून सांगतात.



भावांच्या बलिदानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. कधीच कशाची कमी पडली नाही. आईला दोन्ही पुत्र गमवावे लागले असले, तरीही देशभरातून अनेक पुत्र आईला मिळाले. अनेक जण भावांच्या रुपाने माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये कायम मदतीला धावून आले. निधनापूर्वी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा रोज पन्नास-साठ जण आईची सेवा-सुश्रूषा करण्यासाठी असायचे. आम्हाला कधीच कशाची कमी पडली नाही. एखाद्या कुटुंबाला देशभरातून किती भरभरून प्रेम मिळावं, याचा अनुभव आम्ही कायम घेतला... पौर्णिमा सांगत होत्या...

दोन्ही भावांचं झालेलं बलिदान आणि राममंदिराबाबत काहीच तोडगा दृष्टीपथात नव्हता. तेव्हा कधी निराशा नाही आली का, असा माझा प्रश्न होता. मात्र, मला काय किंवा माझ्या आई-वडिलांना मी कधीच हताश झालेलं, निराश झालेलं पाहिलं नाही. आपण सर्वकाही गमाविलं असलं, तरीही आपल्या मुलांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची खात्री त्यांना पदोपदी होती. त्यामुळंच ते कधीही खचलेले मी पाहिले नाहीत, असंही पौर्णिमा आवर्जून सांगतात...

पाच-दहा मिनिटे सुरू असलेला संवाद संपल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून समाधान वाटले... माझ्याप्रमाणेच शेकडो नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधून कोठारी बंधूंच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला होता... माझे बंधू आणि आई-वडिलांबद्दल देशभरातील नागरिकांमध्ये असलेला आदरभाव पाहून मलाही खूप भरून येते आहे, अशीच भावना पौर्णिमा यांच्याकडून व्यक्त होत होती.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहीलच. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर मोहोर उमटविली आहे. राममंदिर उभारल्यानंतर त्याच परिसरात कोठारी बंधूंसह सर्वच्या सर्व अकरा जणांचे एक स्मारक उभारायला हवे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भाव यांचे प्रतीक म्हणून...