Monday, August 04, 2014

कसब्यात उमेदवार ‘भाजपा’चा की ‘बाजपा’चा?

भाजपा, संघविचार नि हिंदुत्त्वापेक्षा कोण मोठा आहे

लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘संघ परिवारानेच कापला गिरीषबापट यांचा पत्ता’ हा ब्लॉग लिहिल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अर्थात, बहुतांश प्रतिक्रिया बापटांच्या विरोधातच होत्या. लोकांच्या मनातील खदखदीला वाचा फोडल्याबद्दल अनेकांनी फेसबुकवर नि ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच काहींनी प्रत्यक्ष फोन करूनही संवाद साधला. बापट यांच्यामुळे दुखावल्या गेलेल्या अनेकांनी त्यांच्याबद्दलची माहिती अधिक सविस्तरपणे सांगितली. त्याबद्दल मुद्दाम येथे उल्लेख करणे उचित नाही. कारण ते सर्व मुद्दे वैयक्तिक स्वरुपाचे होते. मुस्लिमांचे लांगुलचालन करतानाच परिवारातील कार्यकर्त्यांची हेटाळणी कशा पद्धतीने झाली, याबद्दलही अनेकांचे फोन आले. सर्वांचा रोष गिरीष बापट या व्यक्तीबद्दलचा नव्हता, तर गेल्या दहा-पंधरा वर्षातील कार्यशैलीबद्दलचा आणि वर्तणुकीबद्दल होता, असे मला जाणवले.



गिरीष बापट हे पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. त्यामुळे लोकसभेत तिकिट का मिळाले नाही, याचा सारासार विचार करून ते पुढील गोष्टी कशा पद्धतीने स्वीकारतात ते पहावे लागेल, असे मत मी मांडले होते. मात्र, बापट यांनी कार्यशैलीमध्ये कोणताच फरक घडवून आणला नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. अर्थात, वीस वर्षांत जे घडले नाही, ते चार महिन्यांत कसे घडणार, हेही ओघाने आलेच.

आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. वास्तविक पाहता, बापट यांना चार टर्म आमदारकी, एसटी महामंडळ, कृष्णा खोरे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद अशी अनेक मानाची पदे मिळाली आहेत. महापालिकेतही विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करणे आवश्यक होते. तशी घोषणा त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी (तिकिट मिळेल, असे गृहित धरून) केली होती. मात्र, लोकसभेला तिकिट न मिळाल्यामुळे बापटसाहेब पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘बापटसाहेब ब्राह्मण आहेत, त्यामुळे पुण्यातून ब्राह्मण उमेदवार म्हणजे बापटच पाहिजे,’ अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यामध्ये विशेषतः कसबा मतदारसंघात फेरफटका मारल्यानंतर किंवा काही लोकांशी चर्चा केल्यानंतर ऐकू येत होती. आता बापटसाहेब ज्येष्ठ आहेत. मंत्रिपदाची संधी चालून आली असताना त्यांचे तिकिट कापणे योग्य नाही किंवा लोकसभेला कापले, आता विधानसभेला पण कापून अन्याय करणार का, अशी चर्चा ऐकू येते आहे. बापट समर्थक नेते नि कार्यकर्ते तर ‘कितीही करा आदळआपट, कसब्यातून फक्त गिरीष बापट’ ही घोषणा ऐकविण्यात मग्न आहेत. पक्षापेक्षा नेत्याला मोठे समजणाऱ्या नेत्यांबद्दल नि कार्यकर्त्यांबद्दल न बोललेलेच बरे.

गिरीष बापट यांच्याबद्दल वैयक्तिक राग असण्याचे काहीच कारण नाही. उलट एकाच पेठेत राहणाऱ्या बापट आणि चांदोरकर या घरांचे खूप जुने संबंध आहेत. मात्र, विचारांना हरताळ फासणाऱ्या नेत्याला वारंवार संधी का दिली जाते, याबद्दल मला तीव्र आक्षेप आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग लिहिण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार, हिंदुत्त्व आणि खुद्द भारतीय जनता पार्टीशी प्रतारणा करणाऱ्या ज्येष्ठ आमदाराला तिकिट द्यावे का किंवा का द्यावे, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पक्षश्रेष्ठी अशा चर्चांना भीक घालत नाहीत, हे मलाही माहिती आहे. मात्र, तरीही माझे म्हणणे मांडण्याचा मला अधिकार असल्यामुळे मी हा ब्लॉग लिहित आहे. आपल्याला जर माझे म्हणणे पटत असेल तर तो शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे किमान बापट यांच्याबद्दल फक्त माझ्या मनातच खदखद नाही, हे नेत्यांना समजेल.



भाजपाच्या पक्षशिस्तीला हरताळ…
लोकसभा निवडणुकीतील बापट यांच्या भूमिकेबद्दल प्रचंड नाराजी आहे. केवळ दाखविण्यासाठी बापट हे शिरोळे यांच्यासोबत फिरत होते, की काय अशी शंका येण्याइतकी परिस्थिती आहे.  बापट समर्थकांनी केलेली कृत्ये तर पक्षशिस्तीमध्ये बसतात का, हा प्रश्न आहे. शिरोळे यांचे नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर शास्त्री रोडवरील आमदारसाहेबांचा एक समर्थक ‘निषेध, निषेध, निषेध’ हे शब्द सूचना फलकावर लिहितो हे पक्षशिस्तीत बसते का?

लोकसभेसाठी कसबा मतदारसंघाच्या नियोजनाची बैठक ‘गिरीष बापट यांना उमेदवारी न दिल्याबद्दल दुःख, खेद आणि निषेध’ व्यक्त होऊन सुरू होते, ही भाजपची पक्षशिस्त आहे का? कसब्यातील भाजपचे काही नगरसेवक, पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते शिरोळेंच्या प्रचारापासून अलिप्त राहतात, मुद्दाम उलटसुलट निरोप देतात, पदयात्रा किंवा प्रचारफेरी रद्द झाल्याचे खोटेच मेसेज पाठवितात हे पक्षाला अपेक्षित आहे का? मतदारांपर्यंत भाजपच्या स्लिपा पोहोचणार नाहीत, याची खबरदारी कसब्यातील काही पक्ष कार्यकर्तेच बाळगतात ही पक्षनिष्ठा आहे का?

बापटांचे ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव, विधीमंडळातील कामगिरी असे मोठे-मोठे शब्द फेकून बापट यांच्या उमेदवारीचे समर्थन करणारे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कसब्यातील भाजप नेत्यांच्या या कृत्यांचा जाब विचारणार आहेत की नाहीत?


रा. स्व. संघाच्या विचारांशी घटस्फोट…
‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे,’ हे बापट आवर्जून सांगतात. दसऱ्याच्या संचलनात काय उभेही राहतात. मात्र, संघ स्वयंसेवक असूनही ते ‘संभाजी ब्रिगेड’ला पोषक अशी भूमिका का घेतात? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याच्या विरोधात ठामपणे भूमिका का घेत नाहीत? आदमबाग मशिदीच्या अतिक्रमणाविरोधातील हिंदुत्त्वावाद्यांच्या आंदोलनात मुस्लिम लांगुलचालनाची भूमिका का घेतात? कोंढव्यातील यांत्रिक कत्तलखानाविरोधी आंदोलनापासून स्वतःला बाजूला का ठेवतात? डेक्कनवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग मशिदीच्या विरोधात संघर्ष सुरू असताना त्यापासून चार हात दूर थांबण्याचे धोरण का स्वीकारतात? कसबा मतदारसंघातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन मुस्लिम मंडळींशी हितसंबंध का जोपासतात? कसबा मतदारसंघातील प्रत्येक मशिदीत स्वतःहून बोअरवेल मारून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार का घेतात? तुमच्याकडून याबद्दलही सविस्तर उत्तर हवे आहे बापटसाहेब.

प्रदीप रावत आणि दोनवेळा अनिल शिरोळे यांच्या निवडणुकीत गिरीष बापट आणि त्यांचे समर्थक प्रचारापासून हटकून दूर थांबले, असा आरोप पक्षवर्तुळात जोरात आहे. त्याबद्दलही बापट यांनी कधीच उत्तर दिलेले नाही. शिरोळे यांना कसब्यातूनही घसघशीत लीड मिळाले आहे. मात्र, त्या लीडशी बापट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नाही. नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडून मोदी यांच्यासाठी केलेल्या मतदानामुळे हे लीड मिळाले, हे मी मुद्दामून वेगळे सांगण्याची गरज नाही.


राष्ट्रवादीच अधिक जवळची…
गिरीष बापट हे आमदार भाजपचे. मात्र, भाजपवरील निष्ठेऐवजी त्यांनी ‘राष्ट्रवादी’ विचार आपलासा केल्याचे वारंवार जाणवते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष असूनही बापट यांनी अजितदादांच्या घोटाळ्यांना हात घातला नाही. सिंचन घोटाळ्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. ते काम केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी. टोलच्या गडबड घोटाळ्याबाबत जनतेमध्ये आक्रोश असतानाही लोकलेखा समिती अध्यक्षांनी त्याला वाचा फोडली नाही. अजित पवार यांनी पुणेकरांच्या दोनवेळच्या आंघोळीवर टीका केली. तर गिरीषरावांनी पण अगदी त्याची री ओढली. कारण लोकसभेला ‘राष्ट्रवादी’ आपल्या बाजूने उभी ठाकेल, अशी त्यांची आशा असावी.

महापालिका निवडणुकीत विष्णू हरिहर यांच्या प्रभागात प्रचारासाठी येणार नाही, असे बापट यांनी थेट सांगितल्याचा दावा भाजपचेच काही वरिष्ठ नेते करतात. त्या प्रभागातील नारायण चव्हाण यांच्याशी बापट यांचे घनिष्ठ संबंध. कदाचित लोकसभा निवडणुकीत त्यांनी बापटसाहेबांना मदत करण्याचे आश्वासन दिले असावे. शिवाय तिथं मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय. त्यामुळेच बापट यांनी अशी भूमिका स्वीकारली असावी. भारत आणि पाकिस्तानी मल्लांमध्ये कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या विषयात पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी नगरसेवकांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांनी त्यावेळी बापट यांचे आदेश ऐकले नाही आणि पक्षाची भूमिकाच शिरोधार्य मानली. विष्णू हरिहर यांनी कोणाचे ऐकले माहिती नाही. मात्र, त्यांचा प्रकरणात बळी गेला, हे काहींच्या स्मरणात असेलच. कोंढवा येथील कत्तलखान्याच्या विषयात बापटांची नेमकी भूमिका काय होती? त्यांनी पक्षाच्या भूमिकेचे ठामपणे समर्थन केले होते, की विरोधात भूमिका घेतली होती? हे त्यांनीच सांगावे. बापटांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले किंवा त्यांची नेमकी काय भूमिका होती, ते मांडले तर हे आरोप पुन्हा होणार नाहीत. अन्यथा हे मुद्दे वारंवार निघतच राहतील.

आणखी एक मुद्दा बापट यांनी स्वतःला कसबा मतदारसंघापुरतेच मर्यादित ठेवले, हा आरोप त्यांच्यावर का करू नये. भाजपा सर्व शहरामध्ये विस्तारेल, सगळीकडे पक्ष मजबूत होईल, यासाठी बापट यांनी इतक्या वर्षांत काय केले, याचा जवाब पक्ष मागणार आहे की नाही? नागपुरात भाजपची सत्ता आणली, असे नितीनभाऊ गडकरी आनंदाने सांगतात. पुण्यातील या ज्येष्ठ नेत्याने भाजपला हे दिवस का दाखविले नाहीत, याबाबत ते चिडीचूप का बसतात? कसब्यातील भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आता बापट यांच्यापासून चार हात दूरच असतात, त्याचा फटका पक्षालाही बसतो. याबाबत कोणी आमदारसाहेबांना जबाबदार धरणार आहे की नाही?

घटत्या मताधिक्याचे कारण काय?
गिरीष बापट हे भले चारवेळा कसब्यातून विजयी झाले असतीलही. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे विजयाचे मताधिक्य घटले आहे. याचा पक्ष कधी गांभीर्याने विचार करणार आहे की नाही? १९९५ मध्ये गिरीष बापट यांनी सतीश देसाई यांचा वीस हजार ७६० मतांनी पराभव केला. (गिरीष बापट ५३,०४३ आणि सतीश देसाई ३२,२८३) पुढच्या म्हणजेच १९९९च्या निवडणुकीत बापट वीस हजार १६८ मतांनी विजयी झाले. (गिरीष बापट ३९,४१९ आणि अण्णा थोरात १९,२५१) २००४ च्या विधानसभेला बापटांचे मताधिक्य नऊ हजार ६१८ मतांवर आले. (गिरीष बापट ३८ हजार १६० आणि अण्णा थोरात २८ हजार ५४२) गेल्या निवडणुकीत तर रवींद्र धंगेकर यांनी बापटांना अक्षरशः घाम फोडला. गेल्यावेळी बापट अवघ्या आठ हजार १६२ मतांनी विजयी झाले. (गिरीष बापट ५४ हजार ९८२ आणि रवींद्र धंगेकर ४६ हजार ८२०)

कसबा मतदारसंघाला भवानी पेठेचा काही भाग जोडला गेला. मात्र, तशाच पद्धतीने नवीपेठ, दत्तवाडी, राजेंद्रनगर, दांडेकरपूल, विजयानगर कॉलनी तसेच भाजपला अनुकूल असा भाग जोडण्यात आला. मात्र, तरीही बापट यांचे मताधिक्य गेल्या निवडणुकीत का घटले? जुन्या कसब्यातून बापट यांना अपेक्षित लीड न मिळाल्यामुळेच बापटांवर ही नामुष्की ओढविली, असा दावा कोणी का करू नये. भाजपचा हक्काचा मतदारसंघ नि बालेकिल्ला असलेल्या कसब्यात बापट यांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत कमी होत गेले, याबद्दल पक्ष बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ नि अनुभवी नेत्यांकडे उत्तर मागणार आहे की नाही?

अहो, विधानसभेला जो ट्रेंड होता तोच ट्रेंड महापालिका निवडणुकीतही कायम राहिला आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेने मुसंडी मारून भाजपच्या कमळाच्या चिंधड्या चिंधड्या उडविल्या. सदाशिव पेठेमध्ये घुसून मनसेने भाजपची मुंडी मुरगाळली. बापटांचा तथाकथित बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेतील प्रभागात भाजपचे दोन्ही उमेदवार दणकून आपटले. हे कशाचे द्योतक आहे. याचं उत्तर भाजपाचे वरिष्ठ नेते आमदारसाहेबांकडे मागणार आहेत की नाही?
एकीकडे ‘शत प्रतिशत’ मतदान घडवून आणण्यासाठी खुद्द सरसंघचालक आदेश देतात. त्यानुसार संघाचे सर्व स्वयंसेवक घरोघरी फिरून जनजागृती करतात. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही मोहीम राबवितात. मोदींना निवडून आणण्यासाठी मनापासून मेहनत घेतात. मात्र, भाजपचे काही कार्यकर्ते शांत राहतात, प्रचारापासून दूर राहतात, हे उघड गुपित असूनही त्याच्यावर वरिष्ठांशी मेहेरनजर का असते? हे न उलगडणारे कोडेच आहे. संघ परिवारात सरसंघचालकांचा आदेश झुगारून संघ नि पक्षाविरोधात भूमिका घेण्याइतका कोणीही मोठा नाही, असे मला वाटते. 

मला तर अनेकदा वाटते, की कसबा पेठ मतदारसंघात दोन ‘बीजेपी’ कार्यरत आहेत. एक म्हणजे भाजपा अर्थात, भारतीय जनता पार्टी. दुसरी म्हणजे ‘बाजपा’ अर्थात, बापट जनता पार्टी. भाजपाच्या नेत्यांना आणि नागरिकांना यंदा ‘भाजपा’ की ‘बाजपा’ यापैकी एकाची निवड करण्याची योग्य संधी आहे, असे मला वाटते.

अहो, कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कुणा एका व्यक्तीचा नाही. त्यामुळे उद्या दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिली, तरी तो निवडून येणार हे हमखास धरून चाला. अशी परिस्थिती असतानाही भाजपाचे नेते बापट यांना इतके धरून का असतात. संघ, भाजपा नि हिंदुत्त्व यांना अव्हेरणाऱ्या नेत्याला ‘नाही’ म्हणण्याचे धाडस भाजपाचे वरिष्ठ नेते दाखविणार आहेत की नाही, याबद्दल उत्सुकता आहे.

गेल्या निवडणुकीपूर्वी गिरीष बापट यांचे माहितीपत्र घरी आले होते. त्यासोबत आंतरदेशीय पत्रही आले होते. त्यावर हेच सर्व मुद्दे उपस्थित करून मी त्यांना पाठवून दिले होते. मुद्दाम पत्रकार असा उल्लेख न करता फक्त नाव लिहून पाठविले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी बापट वहिनींनचा फोन आला होता. त्यांनाही मी तेच मुद्दे सांगितले. त्यांनी ऐकून घेतले आणि निवडून येण्यासाठी असं ‘कॉम्प्रमाइज’ करावं लागतं, असं सांगितलं होतं. त्यावेळी बापट यांना मत टाकलं होतं. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये बापट यांच्या कार्यशैलीत काहीही फरक पडलेला नाही.

विचार, ध्येयधोरणं आणि निष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड न करताही निवडून येता येतं आणि २८३ खासदारांसह स्वबळावर सरकारही स्थापन करता येतं, हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. तेव्हा यंदाच्या विधानसभेला यावेळी विचार, निष्ठा नि धोरणांशी तडजोड करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा उमेदवारी देण्याची चूक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते करणार आहेत का? नेत्यांनी धाडस दाखवावे, नाहीतर विचारांशी प्रतारणा करणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकविण्यासाठी जनता सूज्ञ आहे. हे लक्षात ठेवा.

तुम्हीच सांगा... तुम्हाला काय वाटतं. माझं म्हणणं पटतंय का? असेल तर ब्लॉग शेअर करा. पटत नसल्यास सोडून द्या…