ब्रेकिंग न्यूज अगेन...स्वतःच्या कद्रूपणावर झालेली टीका सहन न झाल्यामुळे काही नतद्रष्ट लोकांनी लेट्स भंकस आणि बातमीदार (कळते-समजते आणि सहयोगी बातमीदार) असे ब्लॉग्ज बंद केले. पण बंदी घालून असे प्रकार थांबत नाहीत आणि कायमचे बंद तर होतच नाहीत. ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली असून
ब्रेकिंग न्यूज नावाचा ब्लॉग पत्रकारितेतील गॉसिप करण्यासाठी सुरु झाला आहे. लेट्स भंकस आणि बातमीदार चालविणारी मंडळीच हा ब्लॉग चालवित आहेत की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण तीच ही मंडळी आहेत, असे म्हणायला भलताच वाव आहे. प्रहार करण्याची स्टाईल, भाषेचा लहेजा, लोकसत्ताचे प्रचंड कौतुक आणि सर्व पेपर तसेच चॅनेल्समधील इत्थंभूत खबरा यामुळे ब्रेकिंग न्यूजही हीच मंडळी चालवित आहेत, अशा संशयास पुरेपूर वाव आहे. बापू अत्रंगे, अरुंधती पुणेकर, विसोबा खेचर आणि चांगदेव पाटील आर बॅक असं म्हणायला हरकत नाही.
मुळात टाईमपाससाठी असे ब्लॉग्ज चालविले जातात. पत्रकारितेतील काही लोकच हे ब्लॉग्ज चालवितात. एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतात, कौतुक-अभिनंदन करतात, चुका दाखवितात आणि वेगवेळ्या वृत्तपत्रांमध्ये-चॅनेल्समध्ये घडणाऱ्या गोष्टींवर कॉमेंट्स करतात. आपल्या प्रश्नांची-समस्यांची कोणीच दखल घेत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर लोक शेवटचा उपाय म्हणून अशा ब्लॉग्जवर त्या गोष्टी येतात. ब्लॉग्जवर अशा गोष्टी आल्यामुळे विशेष कोणताच फरक पडत नाही. मालक लोक त्याची फारशी दखलही घेत नाहीत. पण आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्याचा आनंद लोकांना मिळतो आणि मिडियातील इतर लोकही त्यावर खमंग चर्चा करतात. असो.
अर्ध्या पॅटिसची गंमत, ओ मी गार्शियावाला आर्टिस्ट आहे, लोकसत्ताची जाहिरात असल्यामुळे कालनिर्णयवर लावलेली पांढरी पट्टी, पवार पंचविशी, साममध्ये पगारावरुन रंगले शीतयुद्ध, वृत्तगंधर्व इइ एकाहून एक सरस ब्लॉगहून तमाम पत्रकारांना हसवून हसवून लोळविणारे ब्लॉग्ज बंद झाले असले तरीही भविष्यात ब्रेकिंग न्यूजकडून तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्शा आहे. बेस्ट लक टू ब्रेकिंग न्यूज!