दो ही मारा लेकिन कैसा मारा...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जाहीरपणे केलेलं एक वक्तव्य! लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळालेलं यश पाहिल्यानंतर "मनसे'चे समर्थक आणि कार्यकर्ते अक्षरशः हुरळून गेले होते. वास्तविक पाहता "मनसे'चा जन्मच शिवसेनेला संपविण्यासाठी किंवा त्यांची ताकद कमी करण्यासाठी झालाय. त्यामुळे "मनसे'चा एकही खासदार नवी दिल्लीत पोचला नसला तरीही त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या सहा ते आठ जागा पडल्या, हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. राज यांचा सुप्त हेतू लोकसभा निवडणुकीत साध्य झाला आणि त्यामुळंच त्यांनी कुत्सितपणे हे वक्तव्य केलं. काही जणांना वाटलं की, आता सारं संपलं. शिवसेनेच्या पडझडीला पुन्हा सुरवात होणार. उद्धव यांना राजकीय संन्यास घ्यायला लागून फक्त फोटोग्राफीच करावी लागेल, इथपर्यंत मत व्यक्त केली जात होती.
पण पण आणि पण "मनसे' स्थापन झाली तेव्हापासून ते आतापर्यंत (लोकसभा निवडणुकीनंतरही) माझं ठाम मत आहे की, शिवसेना संपणार नाही. राज ठाकरे यांची तसंच त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती पाहता "मनसे'ला लोकसभेत यश मिळालं. कदाचित पुढच्या दोन-तीन निवडणुकांमध्येही असंच घडेल. पण हीच अंतिम स्थिती नक्कीच असणार नाही. शिवसेनेला मरण नाही आणि "मनसे'ला भवितव्य नाही. "मनसे' हा झंझावात नाही. ती वावटळ आहे. त्यामुळं ती फार काळ टिकणार नाही. त्यामुळं फारशी पडझड होणार नाही आणि शिवसेनेवर फारसा परिणामही होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर माझं हेच मत होतं. काहींनी मला वेड्यात काढलं. पण मी ठाम होतो आणि आहे.
उद्धव व राज यांच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील. शिवसेनेच्या पडत्या काळातही उद्धव हे खचून गेले नाहीत. उलट त्यावेळी त्यांची खंबीर वृत्ती दिसून आली. मग ते नारायण राणे किंवा राज ठाकरे यांचा पक्षाला "जय महाराष्ट्र' करणं असो किंवा लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश असो. लोकसभेनंतर उद्धव यांची चिडचिड झाली होती. वादच नाही. पण त्यानंतर खचून न जाता रिलायन्स एनर्जी विरोधातील आंदोलन असो किंवा "म्हाडा'ची घरं मराठी माणसांना मिळणं असो शिवसेना सतत आंदोलनं करीतच राहिली. उलट पक्षी रमेश किणी याचा नामोल्लेख झाल्यानंतर राज ठाकरे यांची बोलतीच बंद झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये "मनसे'ला मिळालेलं यश हे उद्धव यांच्या "त्या' उत्तरानंतर फिकं पडलं. मराठीच्या तापल्या तव्यावर पोळी भाजून तर झाली. पण प्रत्येक निवडणुकीपूर्वी हा तवा तापवायचा आणि पोळी भाजून घ्यायची ही काही खायची गोष्ट नाही. लोकोपयोगाची कामं केल्याशिवाय मतांचे सातत्य रहात नाही, हे मी सांगण्याची गरज नाही. हाच मुद्दा "मनसे'च्या भवितव्याचा विचार करताना महत्वाचा ठरतो.
शिवसेनेनेही सुरवातीच्या काळात राडाबाजी केली. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय किंवा परप्रांतियांविरुद्ध आंदोलन उभारले. मराठी माणसांचा मुद्दा लावून धरला. मुस्लिम, बांग्लादेशी आणि पाकिस्तीनी घुसखोरांच्या निमित्तानं भगवा विचार मांडला. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे त्यांनी अगदी प्रखरपणे मांडले. कशाचीच हयगय केली नाही. तोडफोड, राडा, पेटवापेटवी आणि बरंच काही. पण हे करताना शिवसेनेनं रचनात्मक कार्यही केलं. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातनं मुंबईतल्या बॅंका, हॉटेल्स, विमानतळ आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये स्थानिक मराठी माणसाला स्थान मिळवून दिलं. नोकऱ्या लावल्या. शिवसैनिकांच्या आधारावर लोकहिताची कामं केली. जिथं जिथं मराठी माणसावर अन्याय झाला तिथं तिथं सेनेनं आवाज उठविला. मुंबईनंतर ग्रामीण भागातही हळूहळू पाय पसरले. तिथं शिवसेनेनं अगदी चलाखपणे हिंदुत्वाच्या मुद्द्याचा वापर केला. मराठवाड्यात जिथं निजामाचं राज्य होतं तिंथं "खान हवा की बाण हवा' अशा वृत्तीतून प्रचार करुन सेनेनं घट्ट पाय रोवले. त्यामुळंच आज इतके हादरे बसूनही सेनेचा गड शाबूत आहे आणि उद्याही राहिल.
राहता राहिला मुद्दा "मनसे'चा तर "मनसे' हा कोणताही विचार किंवा कोणतेही ध्येय-धोरण नसलेला पक्ष आहे. मुळात पक्ष स्थापन झाला तोच उद्धव यांच्या विरोधाची भूमिका घेऊन. त्यामुळेच शिवसेनेला (आणि उद्धव यांनाही) संपविण्याचा विडा उचलून "मनसे'ची वाटचाल सुरु आहे. पण महापालिका निवडणुकांमध्ये "मनसे' सपशेल आपटला. पण त्यानंतर राज्य सरकारच्या मदतीमुळं राज ठाकरे यांचा चांगलाच बोलबाला झाला. स्पष्टच बोलायचं झालं तर "मनसे' वाढविण्यासाठीच राज ठाकरे यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला. त्याचा फायदा राज यांना लोकसभा निवडणुकीत झाला. पण विधानसभेला असं होईलच असं नाही. कारण कोणताही मुद्दा न देता, कोणताही कार्यक्रम हाती न घेता आणि कोणत्याही प्रकारची वैचारिक बांधिलकी नसलेला पक्ष टिकूच शकत नाही. भैय्या टॅक्सीवाल्यांना फोडून काढणं, पाणीपुरीवाल्यांना पळवून लावणं, भैय्या मंडळींना मारहाण करणं आणि अमराठी पाट्या फोडणं म्हणजेच मराठीचा कळवळा हा गैरसमज आहे आणि ते येत्या काही निवडणुकांमध्ये (कदाचित विधानसभेलाच) स्पष्ट होईलच.
आणखी एक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेले आक्षेप. ""राजकीय पक्षाचं आणि सामाजिक काम करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावं लागतं,'' हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आक्षेप पुरेसा बोलका आहे. तसंच प्रत्यक्ष मैदानात न उतरता फक्त सभेच्या व्यासपीठावरुन राणा भीमेदवी घोषणा करण्यातच राज ठाकरे यांना रस आहे. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांप्रमाणे एखाद्या मोर्च्यात किंवा आंदोलनात राज प्रत्यक्ष सहभागी झालेले आठवत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर नक्कीच नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे "मनसे' हा पक्ष राज ठाकरे आणि त्यांच्याभोवतीची चौकडी यांच्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असा आरोप श्वेता परुळकर आणि प्रकाश महाजन यांनी केलाय. त्याच मुद्द्यावरुन हे दोन्ही नेते (नेते या शब्दाला आक्षेप असेल तर राजकारणी हा शब्द योग्य आहे) पक्षातून बाहेर पडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशाच स्वरुपाचे आरोप करुन राज यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केला होता. दुर्दैवाने तेच आरोप राज यांच्यावर होताहेत आणि तेही फक्त तीन वर्षांच्या कालावधीतच!
महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवित आहेत. प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, शिशिर शिंदे, अतुल सरपोतदार, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई. एखाद-दुसरा इकडे तिकडे. ही मंडळी सोडली तर राज यांच्याकडे नेत्यांची फौज नाही. कार्यकर्त्यांची फौज आहे, असं वाटतं. पण कोणताही ठोस कार्यक्रम नसताना फक्त बोलीबच्चन देऊन तरुणांना बांधून ठेवणं अवघड आहे. पोलिस आणि न्यायालयांचा फेरा मागे लागला की, हे तरुण पक्ष कामाकडे हळूहळू दुर्लक्ष करु लागतात. शिवाय "मनसे'तली धुसफूसही वाढू लागलीय. पुण्यातलं लोकसभेचं तिकिट रणजित शिरोळे यांना देण्यावरुन दीपक पायगुडे हे राज यांचे समर्थक खूप दुखावले गेले होते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. पण पायगुडे यांनी "मनसे'तच राहणं पसंत केलंय. पण आता ते फारसे सक्रिय नाही. आपलं मतही विचारात न घेता शिरोळे यांनी तिकिट दिल्यामुळं पायगुडे दुखावले आहेत. दुसरीकडे राज यांची पुण्यात पहिली सभा लावणारे गणेश सातपुते यांनीही "मनसे'ला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्वाच्या मुद्द्याला राज यांनी हरताळ फासल्यामुळं सातपुते शिवसेनेत गेले. पण पायगुडे आणि सातपुते यांचं जमत नसल्यामुळंच हे पक्षांतर झाल्याचं खरं वृत्त आहे. थोडक्यात म्हणजे "मनसे'तही सारं आलबेल आहे, असं नाही.
एकीकडे मराठीचा मुद्दा सारखा तापवता ठेवता येत नाती. दुसरीकडे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे वगळता इतर शहरांमध्ये "मनसे'चा फारसा प्रभाव नाही. ग्रामीण भागात तर "मनसे'ला कोणी ओळखतही नाही. मतं मिळणं तर दूरच. "मनसे'चे कार्यकर्ते सध्या जी आंदोलनं करत आहेत ती स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतःच्या निर्णयाने करीत आहेत. त्यात कोणतीही सुसूत्रता आणि भूमिका नाही. शिवाय महाराष्ट्राच्या विकासाची "ब्ल्यू प्रिंट' तयार असतानाही राज महाराष्ट्राच्या विकासावर काहीच का बोलत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे.
दुसरं म्हणजे शिवउद्योग सेनेच्या मार्फत राज ठाकरे यांनी किती तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि किती जणांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या कोण जाणे... (ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाच्या संदर्भानुसार राज यांच्यासाठीच उघडण्यात आलेल्या शिवउद्योग सेनेकडे जवळपास लाखभर तरुणांचे अर्ज आले होते. पण त्यापैकी फक्त अडीच हजार तरुणांनाच नोक-या दिल्या गेल्या.) सो राज ठाकरे यांनी आधी शिवउद्योग सेनेचा हिशेब द्यावा आणि मग महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटकडे वळावं...
शिवाय राज हे त्यांच्या "छानछौकी'साठीच अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादा मोर्चा काढलाय, वीजेच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरले आहेत, रिलायन्सच्या वीज दरवाढीविरोधात आंदोलन उगारलंय, कापूस दिंडी काढलीय किंवा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी संघर्ष यात्रा काढलीय? काही आठवतंय. नाही शक्यच नाही. राज ठाकरे हे "पोस्टरबॉय' आहेत आणि उन्हातान्हात फिरण्याची त्यांची वृत्ती नाही, हे उघड सत्य आहे. कोणीही कितीही अमान्य केलं तरी. अशा परिस्थितीत फक्त सभांच्या आणि तोडफोडीच्या जोरावर तरुणांना आणि मध्यमवर्गीयांनी किती दिवस खिळवून ठेवता येईल, हाच खरा प्रश्न आहे.
"मनसे'च्या मतं खाण्यामुळं युतीच्या "सिटा' पडल्या हे मरी माणसावर बिंबवणयात शिवसेना काही प्रमाणात नाही तरी यशस्वी झाली आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही "मनसे'ला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. तसंच राज ठाकरे हे सध्या शांत आहेत. ही मराठीच्या नावावर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या "तोडफोडी'सारख्या वादळापूर्वीची शांतता म्हणायची की, राज यांचे काही वेगळेच मनसुबे आहेत, हे कळायला मार्ग नाही. पण काहीही आणि कितीही झालं तरी "मनसे'ला भवितव्य आहे, यावर विश्वास बसत नाही. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेबद्दल शंका घेण्याची इच्छा नाही. खरं तर तो मुद्दाच नाही. राज यांचा करिष्मा बाळासाहेबांइतकाच आहे. ते बाळासाहेबांसारखेच फर्डे वक्ते आहे. त्यांची शैलीही बाळासाहेबांसारखीच आहे. शेवटी ते ठाकरेच. त्यामुळे ते लोकप्रिय असणारच.
पण त्या जोरावर "मनसे' वाढेल आणि शिवसेना संपेल किंवा "मनसे'च्या मतं खाण्याचा शिवसेनेला कायमच फटका बसेल असं नाही. आणखी एक म्हणजे विधानसभेला "मनसे' लोकसभेइतकी मतं खाईल का, हा देखील कळीचा मुद्दा आहे. (घेईल का शब्द मुद्दामून वापरलेला नाही.) घोडा मैदान जवळच आहे. पाहू या काय होतं ते!!!!!