Saturday, November 20, 2010

सामनातले दिवस...

अविस्मरणीय आणि अतुलनीय...

सचिन आणि सेहवाग सातच्या आत घरात, खल्लास, राजीनामा, लालूच, बारवाल्यांचे मापात पाप, शिक्षणाच्या आयचा घो..., ना-या बोल मुंबई कोणाची, येड्याच्या ढुंगणावर उगवलंय बाभूळ... अशी एक से बढकर एक दिलखेच आणि धक्कादायक हेडिंगं वाचून कोणीही पत्रकार सामनाच्या प्रेमात नाही पडला तरच नवल. रोखठोक भूमिका आणि आक्रमक भाषा यांच्यामुळे हा पेपर सदैव केंद्रस्थानी असतो. ज्या पेपरची पानं वाहिन्यांसाठी नियमितपणे बातम्या घेऊन येतात, असा हा एकमेव मराठी पेपर. त्यामुळं पहिल्यापासून मला सामनाविषयी प्रेम, जिव्हाळा आणि ऍट्रॅक्शन होतं. ये लोग कौनसी चक्की का आटा खाकर पेपर निकालते है, असं गंमतीनं आम्ही बोलायचो. इतकं वेगळेपण त्या पेपरमध्ये होतं. (ये आटा भांडुप, परळ और डोंबिवली में मिलता है, ही गोष्ट मला तिकडे गेल्यावर कळली.)



थँक्स टू राऊत साहेब...

मी सामनामध्ये काम करेन, अशी कल्पना स्वप्नातही केली नव्हती. पण योगायोग जुळून आला आणि संजय राऊत साहेबांनी स्वतः लक्ष घालून मला काम करण्याची संधी दिली. फक्त नऊच महिने मी सामनात काम केलं आणि नंतर पुन्हा पुण्यात जायचं असल्यामुळं मला मुंबई सामनाचा राजीनामा द्यावा लागला. पण ते नऊ महिने कधीही विसरु शकणार नाही, असे ठरले. सामनात जाताना अनेकांनी सांगितलं होतं की, बाबा सांभाळून रहा, तो सामना आहे. इतर वृत्तपत्रांपेक्षा तिथलं वातावरण वेगळं आहे. तिथल्या राजकारणाचा तूही बळी जाशील, असंही काहींनी सांगितलं होतं. अनेकांनी तर न जाण्याचा सल्लाही दिला होता. काहींनी तर पगार वेळेवर मिळत नाही, अशी भीतीही घातली होती. पण मी सामनात जाणार होतो, ते सामनानं मला दिलेल्या संधीमुळं, माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि माझ्या सामनावरील प्रेमामुळे. अनेकांनी दाखविलेली भीती खोटी ठरली आणि सामनातले दिवस हे माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस ठरले.



साम सोडताना जितकं वाईट वाटलं होतं तितकंच किंवा त्यापेक्षाही जास्त वाईट मला सामना सोडताना वाटलं होतं. सामनामध्ये मी फक्त नऊ महिनेच काम केलं. पण हे नऊ महिने कायम लक्षात राहतील असेच होते. सामनामधलं वातावरण, तिथली काम करण्याची पद्धत आणि वृत्तपत्राचा स्वभाव लक्षात घेतला तर मला राहून राहून केसरीशी तुलना करण्याचा मोह आवरता येत नाही. अगदी घरगुती वातावरण, हिंदुत्त्ववादी विचार, आक्रमक भूमिका, रोखठोक भाषा आणि बरंच काही...

सामना, सामना आणि सामना...
पहिल्या दिवसापासून पान एकवर काम करण्याची संधी भल्या भल्या दैनिकांमध्ये दिली जात नाही. पण राऊत साहेबांनी तो विश्वास दाखविला. मी संस्थेत नवीन आणि अननुभवी आहे, संस्थेमध्ये ज्युनिअर आहे, अशा पद्धतीने ते कधीच वागले नाही. प्रसंगी रोखठोक शब्दात कानउघाडणी केली. पण ती देखील अत्यंत योग्य आणि मनाला डाग देणारी नव्हती. जेव्हा चूक व्हायची तेव्हाच ते बोलायचे, हे माहिती असल्यामुळेच त्याचं वाईट वाटायचं नाही. शिवाय ते स्वतः सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपयंत शिवसेना आणि सामनाचाच विचार करत असायचे. त्यांची तळमळ लक्षात घेतली तर त्यांनी काहीही म्हटलं तरी वाईट वाटायचं नाही. मुख्य म्हणजे राऊत साहेब अंक छपाईला जाण्याआधी बोलायचे. अंक छापून आल्यानंतर दुस-या दिवशी संध्याकाळी सात वाजता बैठकीमध्ये बोलायचे नाहीत.

एखादी बातमी चुकली असेल तर ते वैतागून बोलायचे. एखादी बातमी किंवा फोटो चुकला की, माझा जीव अक्षरशः तळमळतो. तुम्हाला मात्र, काहीच कसे वाटत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जरा गंभीरपणे अंकाचा विचार करा. (हा आशय आहे, अगदी शब्दशः देता येणार नाही) राऊत साहेबांच्या फेसबुक अकाऊंटवर एकदा त्यांनी लिहिलं होतं की, सामना आणि शिवसेना हा माझ्या प्राण आहे. हे अगदी तंतोतंत खरं आहे.

स्वतः सदैव काही ना काही लिहित असायचे. एक टाकी लिहायचे आणि दुसरीकडे संस्थेतल्या लोकांनाही लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कागदाला पेन लागू द्या, हा त्यांचा अगदी सुप्रसिद्ध डायलॉग. काही ठिकाणी जसे संपादक स्वतःही लिहित नाही आणि लिहिणा-या उपसंपादकांचाही हिरमोड करतात. अशाच मंडळींना मोठमोठी पदंही मिळतात. पण राऊत साहेबांचं तसं नाही. सामनामध्ये माझी जेव्हा पहिली बायलाईन आली होती, तेव्हा स्वतःहून त्यांनी कौतुक केलं होतं आणि असंच लिहित रहा, अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनीही चांगल्या बातम्या स्वतः केल्या पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा आणि ते स्वतःही बातम्या लिहिण्यास मागेपुढे पहायचे नाही.

थांबा, घाई करु नका...
ओघवत्या शैलीत एकटाकी लिहिणारा, सातत्याने तसेच रोखठोकपणे आपली मते मांडणारा, सहका-यांनाही लिहिण्यास प्रोत्साहन देणारा, सहका-यांबरोबर हास्यविनोदात सहभागी होणारा, ट्रीट मागितली तर सहजपणे हजार दोन हजार रुपये खिशातून काढून देणारा, दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या ऑफिस स्टाफला स्वतःच्या पैशातून गिफ्ट देणारा, बदलत्या जमान्यातही मॅनेजमेंटला तोडीस तोड उत्तर देणारा, शब्द दिलेल्या पगाराचा आकडा नंतर न फिरविणारा व पगाराच्या आकड्यांमध्ये कोणतीही गोलमाल न करणारा, असा संपादक विरळाच. मराठीतील शेवटचा संपादक कोण, असं ठरविण्याची अहमहमिका सध्या सुरु असली तरी संजय राऊत आणि इतर काही जण आहेत, तोवर कोणीही शेवटचा संपादक ठरविण्याची घाई करु नये.



संजय राऊत हे जसे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द जसेच्या तसे मांडतात. तसेच राऊत साहेबांना काय हवे, त्यांना काय म्हणायचंय हे तंतोतंत माहिती असणारी दोन मंडळी म्हणजे विद्याधर चिंदरकर साहेब आणि अतुल जोशी साहेब. चिंदरकर साहेब हे सामन्यातील बातम्यांचे प्राण आहेत तर जोशी साहेब हे सामनाच्या संपादकीय पानाचे आधारस्तंभ आहेत. या तीन मंडळींशिवाय सामनाचा विचार होऊच शकत नाही. ते तिघे आहेत म्हणूनच सामनाचे सध्याचे स्वरुप आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या तीन असामान्य क्षमतेच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच.

नो मिटिंग्ज, नो व्हीसी...
सामनातील वातावरणही लय भारी होतं. अत्यंत कमी साधनसामुग्रीमध्येही सामना ज्या पद्धतीने काढतात, ते चकित करुन टाकणारं आहे. फक्त खंडित अखंडित पद्धतीने पीटीआयची सेवा असूनही सामनामध्ये एकही बातमी चुकलेली नसते, हे विशेष. दीड सालाचं नियोजन नाही, दिवसाला चार-चार बैठका नाही, व्हिसी नाही ऑडिओ कॉन्फरन्सिंग नाही, एटीसी-बीटीसी-सीटीसी नाही. काही काही नाही. पण पेपरमध्ये दिवसभरातील सगळ्या बातम्या मात्र आहेत. सामनातले सगळे पत्रकाराच इटंरनेट, वेबसाईट्स, टीव्ही चॅनल्स, एसएमएस सेवा आणि बातम्यांच्या सगळ्या स्रोतांवर गरुड दृष्टी ठेवून असतात. दिसली बातमी की उचल. दिसली बातमी की उचल. त्यामुळेच अगदी अपवादात्मक परिस्थितीत सामनामध्ये बातमी चुकते.

शिवाय सामनामध्ये डिझाईन आणि ले-आऊट यांचे स्वातंत्र्य आहे. पाच-सात कोटी रुपये उधळून कोणतीही परकीय यंत्रणा न राबवूनही सामनाचा लेआऊट सगळ्यांच्या तोडीस तोड असतो. तो कलाकार आणि उपसंपादक यांना मिळणा-या स्वातंत्र्यामुळेच. कमीत कमी शब्दात हेडिंग हे सुद्धा सामनाचं वैशिष्ट्य. वेगवेगळ्या ऑप्शन्सचा विचार करुन मग कमीत कमी शब्दांचे हेडिंग दिले जातात. स्वतः राऊत साहेब, चिंदरकर साहेब, क्रीडा विभागातील मंगेश वरवडेकर, गजानन सावंत किंवा राजेश पोवळे ही मंडळी अशी काही सामनामय झाली आहेत, की ते अत्यंत अचूक आणि आक्रमक हेडिंग शोधूनच काढतात. त्यामुळे चांगले वृत्तपत्र काढण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांचे सल्ले, महागडे डिझाईन्स, पाने लावण्यांची नियमावली आणि तत्सम कोणत्याही गोष्टींची गरज नसते. बातमीसाठी तळमळ असली की झालं. हे सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट सामनात अधिक प्रकरषानं जाणवली.

सामनातील खाद्यसंस्कृती
सामनात मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे सामनातील खाद्यसंस्कृती. काँट्रिब्युशन काढून वडापाव, दालवडा, सामोसे, भजीपाव आणायचे आणि सगळ्यांनी त्यावर तुटून पडायचे हा नित्यक्रमच होता. मग कधी नवनाथ दांडेकर आणि राजन शेलार शेवबुंदी आणायचे, कधी डाएट चिवडा आणायचे. नितीन सावंत आले की, सँडविचची मेजवानी ठरलेली. चिंदरकर साहेब कधी सारंगचा वडापाव, मूँगभजी मागवायचे , कधी सब वे मधून बेकरी आयटम्स आणायला सांगायचे. अनेकदा (म्हणजे बरेचदा) प्रभाकर पवार साहेबही उदार व्हायचे आणि सब वे किंवा होम डेलीमधून मेजवानी यायची.

न करत्याच्या वारी म्हणजे शनिवारी हरषदा परब तिच्या पोतडीतून काही ना काही भरुन घेऊन यायचीच. गुरुवारी अरविंदभाई शहा आस्वाद किंवा प्रकाशमधून काहीतरी (म्हणजे बटाटे वडा, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा किंवा थालिपीठ) घेऊन यायचे. कधी देवेंद्र भोगले पापडी किंवा शेव-जिलेबी घेऊन यायचा. उन्मेष गुजराती किंवा भीमराव गवळी भेळ-उपरवाला किंवा खारे दाणे-फुटाणे घेऊन यायचे. वाढदिवसाचं कारण पुढे करुन कधी गणेश कदमला मुंडक्यावर टाकलं जायचं तर कधी बायलाईन आली की गवळीला कापलं जायचं. मग मी किंवा गजा सावंतही कधीकधी सगळ्यासांसाठी काहीतरी मागवायचो. अशी ही खाद्ययात्रा कायमच सुरु रहायची.

सामनातील ज्येष्ठ सहकारी नवनाथ दांडेकर आणि राजन शेलार यांचे डबे हे सामनातील खास वैशिष्ट्य. मी तर नऊ महिने त्यांच्याच डब्यावर होतो. माझ्यामुळे ते किती दिवस उपाशी राहिले हे माहिती नाही. पण त्यांच्या डब्याची चवच इतकी भन्नाट असायची की मी कंट्रोलच नाही करु शकायचो. आणखी एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे मंग्या आणि मेघा गवंडेची मेजवानी. स्पेनच विश्वकरंडक जिंकणार, ही पैज जिंकल्यानंतर मंग्या वरवडेकरनं सगळ्या सामनाला चिकन बियाणीची मेजवानी दिली होती. तर सामना सोडणार असल्यामुळे मेघा गवंडेनं सगळ्यांना कोंबडी-वडे आणि सोलकढीची मेजवानी दिली. इतकं इतकं प्रेम मिळाल्यानंतर संस्था कायमची सोडताना वाईट वाटणारच ना.

जिथं मला भरभरुन मिळालं. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. ती संस्था सोडताना वाईट वाटणार नाही तर काय. त्यामुळेच सामनाचे हे सोनेरी दिवस कधीही न विसरण्यासारखेच आहेत. कारण तिथला प्रत्येक दिवस मी मनापासून एन्जॉय केलाय.

(पुढच्या लेखात वाचाः नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं...)