Saturday, December 27, 2008

बंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न


"तहान' पाणी प्रश्‍न सोडवण्याची...

पाणी हाच धर्म... हे संत गाडगेबाबांचं ब्रीद शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या नावानं राज्य करणारी मंडळी विसरली आहेत की काय, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती नक्कीच आहे. निदान महाराष्ट्राच्या काही भागात तरी आहे. पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. भारनियमनाची बोंबाबोंब तर सगळीकडेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी आत्महत्यांचं लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही पसरलंय. आबांच्या "सो कॉल्ड' कडक शासनानंतरही सावकारीचा पाश कायम आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाण्यावरुन दलित-सवर्ण वाद धगधगतोय. पाण्याच्या खासगीकरणाचा मुद्दा येत्या काही वर्षांत वादग्रस्त बनण्याची चिन्हे आहेत. पण या सर्व परिस्थितीकडे माध्यमांचं विशेषतः चित्रपट माध्यमवाल्यांचं फार कमी लक्ष जातं.

मुळातच या विषयात काही सनसनाटी नाही. शहरी मध्यमवर्गाला आकर्षून घेण्याजोगा हा विषय नाही. शहरी मध्यमवर्गानं पाठ फिरवणं म्हणजे चित्रपट आपटण्याची हमखास हमी. त्यामुळं अशा गंभीर आणि धगधगत्या वास्तवाकडे वळण्याचं धाडस कोणी करताना दिसत नाही. पण हा किचकट आणि चित्रपटासाठी कंटाळवाणा ठरु शकणारा विषय हाताळण्याचं धाडस एका दिग्दर्शकानं केलंय. महाराष्ट्रातली समस्या मांडणारा हा माणूस मराठी नाही. हा माणूस आहे बंगाली. दासबाबू असं त्याचं नाव. गेली अनेक वर्षे दासबाबू यांनी "दूरदर्शन'साठी काम केलंय. "हे बंध रेशमांचे', "एक धागा सुखाचा', "वाजवा रे वाजवा' आणि "श्रीमंताची लेक' असे अनेक चित्रपट-मालिका दासबाबू यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.

दासबाबूंचा "अशी ही तहान' हा चित्रपट सांगली आणि सातारापाठोपाठ आता मुंबईत प्रदर्शित झालाय. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुनील बर्वे, अश्‍विनी एकबोटे, विजय चव्हाण, कुलदीप पवार अशी स्टार कास्ट आहे. विषय चांगला आहे. पण विविध शहरांमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अनेक अडचणी आहेत. चित्रपटगृह हा चित्रपट लावून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं या चित्रपटातून मला फार काही पैसा मिळणार नाहीये. पण मी झगडतोय ते शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी. आत्महत्या न करता समस्यांच्या विरोधात पेटून उठा, असा संदेश देण्याचा प्रयत्न दासबाबू "तहान'च्या माध्यमातून करताहेत. मुळात म्हणजे एका बंगाली माणसानं हा विषय हाताळला हीच गोष्ट कौतुकास्पद आणि काहीशी आश्‍चर्यकारक आहे. हा चित्रपट पाहताना तेलुगू चित्रपटांची आठवण येते. जमिनीच्या मुद्‌द्‌यावरुन शेतकऱ्यांना छळणारा सावकार किंवा जमीनदारांच्या विरोधात उभी राहणारी आंदोलनं हे विषयही तिथं चित्रपटात दिसायचे. त्याचीच आठवण "तहान' पाहताना होते.

किशोर नांदलस्करला कर्जासाठी छळणारा सावकार, दलित असल्यामुळे अश्‍विनी एकबोटेला घरच्या विहिरीवर पाणी भरु न देणारी सावकाराची बायको, एक घागर पाण्यासाठी अश्‍विनी एकबोटेला आपल्याबरोबर शय्यासोबत करायला लावणारा सावकार (शरद समेळ), नदीचं खासगीकरण करुन गावकऱ्यांना पाण्याला मोताद करणारं सरकार, "फिल्टर वॉटर'च्या कंपनीला नदी विकणारे आणि त्या कंपनीमध्ये भागीदारी करणारे मुख्यमंत्री असे अनेक प्रसंग वास्तवाची दाहकता दाखवून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्‍नी कसं राजकारण होतं, सरकार किंवा मंत्री जनतेची आणि पत्रकारांची कशी फसवणूक करतात हे अगदी योग्य रितीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लोकसत्ताचे पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. त्यामुळे ते "दोन फुल एक हाफ' इतकेच दर्जेदार आहेत. जगदीश खेबुडकरांच्या गीतांनी (आणि एका लावणीनं...) चित्रपटात धमाल आणलीय. चित्रपटातली तीन गाणी पाणी या विषयाभोवतीच आहेत. "टाकी तुडुंब भरा...' अशी लावणी दिलखेच आहे.

ही "राजकीय फॅंटसी' आहे, असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यामध्ये कथा कशीही वळवली तरी ते विचित्र वाटत नाही. प्रत्यक्षात अनपेक्षित वाटणारे अनेक प्रसंग आणि घटना या चित्रपटामध्ये अगदी जोर देऊन चित्रित केले आहेत. शिवाय चित्रपटाचा वेग मंदावला आहे. हल्लीच्या वेगवान दुनियेत हा चित्रपट वेगाच्या दृष्टीनं म्हणजे "दूरदर्शन'च्या जुन्या काळातली "डॉक्‍युमेन्ट्री'च म्हटली पाहिजे. पण तरीही हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही. शहरी भागामध्ये पाण्याची समस्या इतकी जाणवत नाही. पण आपण जसजसं ग्रामीण भागात जातो तसतशी आपल्याला ही समस्या जाणवू लागते. त्यामुळंच ग्रामीण भागात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळेल, यात शंकाच नाही. समस्या आहे ती चित्रपटाला चित्रपटगृह मिळतील किंवा कसे याचीच. दासबाबू हे यासाठी प्रयत्नशील आहेत.

दासबाबू
(दिग्दर्शक, लेखक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक एमटीएनएल)
9869011212 आणि 9869281212
dasbabu_director@rediffmail.com

Monday, December 08, 2008

शूरा मी वंदिले...


माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु... जिंकू किंवा मरु... अनेक वर्ष फक्त टीव्ही वर पाहिलेलं हे समरगीत... या गीताचा प्रत्यक्ष अनुभव आला तो अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरल्यानंतरच... प्रत्यक्षात पुढं मृत्यू उभा ठाकल्यानंतरही निधड्या छातीनं फक्त आणि फक्त देशासाठी प्राण देण्याची तयारी म्हणजे काय हे मुंबईवरच्या हल्ल्यामुळं अगदी जवळनं अनुभवता आलं. मृत्युच्या गुहेत शिरुन मृत्यूचाच खातमा करणं प्रचंड अवघड, थरारक आणि जिगरीचं काम... पण एनएसजी कमांडो, लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलिस हे काम जीवावर उदार होऊन करत होते. अगदी दिवस-रात्र... तब्बल सलग सत्तावन्न तास...

अतिरेक्‍यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र सामुग्री नसेलही... पण आहे त्या शस्त्रांनिशी लढण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाच्या चर्चा आता खूप होतील. पण तक्रार न करता आहे त्या शस्त्रांनिशी युद्धभूमीवर जायला आणि शत्रूचा सामना करायला अंगात धमक लागते. ती महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना सलाम.

हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांनी आधी पूर्ण माहिती घेऊन नंतरच मैदानात उतरायला हवं होतं, असा सूर आता ऐकू येतोय. पण प्रतापराव गुजरांच्या या महाराष्ट्रात शत्रूला संपवण्यासाठी वेडात हे तीन वीर दौडले त्यांचा पराक्रम अगदी बिनतोड... संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आणि ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर फिल्मी मंडळींसह टूर काढायला पोलिस म्हणजे काही राजकारणी नाहीत. माझ्या मुंबईत काही तरी विपरित घडलंय आणि मला ते थांबवायचंय. त्यासाठी मला तातडीनं घटनास्थळी गेलंच पाहिजे, हेच अधिकाऱ्यांच्या डोक्‍यात होतं. हे प्रकरण आपल्या जीवावर बेतू शकेल, याचा अंदाज त्यांना कदाचित असेलही. पण असं असतानाही तातडीनं "फिल्ड'वर येऊन प्राणांची आहुती देणाऱ्या प्रतापराव गुजरांच्या या तीन सरदारांना सलाम.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसाठी आगीची धग तर नेहमीचीच. पण दहशतवादाची धग ते प्रथमच अनुभवत होते. युद्धभूमीप्रमाणे गोळीबार सुरु आहे. ग्रेनेड हल्ले होत होते. पण तरीही हॉटेलचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि लागलेली आग तातडीनं विझवायचीय हेच त्यांचं महत्वाचं काम होतं. त्यासाठी ते प्राणांची बाजी लावत होते. गोळीबार सुरु असताना ताजला लागलेली आग विझवण्यासाठी झटत होते. आपलं मरण डोळ्यासमोर असतानाही जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम.

अतिरेक्‍यांना संपवून टाकण्यासाठी युद्ध सुरु होतं. हे युद्ध कव्हर करण्यासाठी काही अतिउत्साही पत्रकारही आले होते. तसंच काही नागरिक क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येतात तसे ही लढाई पाहण्यासाठी आले होते. ही बघ्यांची गर्दी आवरण्याचं काम शीघ्र कृती दलाचे जवान, महाराष्ट्र पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या जवानांची होती. नेमून दिलेलं काम चोख पार पाडून ऑपरेशला मदत करणाऱ्या या सर्वांना सलाम.

राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजीचे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या अभिनंदनासाठी तर शब्दच अपुरे पडतील, अशी परिस्थिती आहे. अतिरेक्‍यांना कंठस्नान घालून त्यांनी मुंबईकरांसह सर्व भारतीयांना मोकळा श्‍वास घेण्याची संधी दिलीच. पण हे करताना हॉटेलमधल्या बंधकांना सोडविण्याची अवघड कामगिरीही त्यांनी पार पाडली. अतिरेक्‍यांचा खातमा करताना एकाही नागरिकाचा प्राण जाणार नाही, याची काळजी जवानांनी घेतली.

स्वातंत्रपूर्व काळात क्रांतिकारक जसे हातावर प्राण घेऊन इंग्रजांशी लढायचे. तशाच पद्धतीनं आधुनिक काळातले हे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु लढत होते. कुणासाठी फक्त देशासाठी... हल्ली देशासाठी काहीतरी करण्याची बोल बच्चनगिरी करणारे पुष्कळ आहेत. पण प्रत्यक्ष कृती करणारे अगदी थोडे. त्या यादीत लष्कराचे जवान किंवा एनएसजीचे कमांडो यांचं स्थान अगदी वरचं. ही यादी त्यांच्यापासूनच सुरु होते, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळंच कमांडो आणि जवानांना त्रिवार नव्हे, शतशः नव्हे, लाखो नव्हे अगदी अनंत अगणित सलाम.

अतिरेकी कितीही असो... आम्हाला कोणतंही काम अवघड नाही... जोपर्यंत एनएसजी आहे तोपर्यंत भारताकडे कोणीही वाकडा डोळा करुन पाहू शकत नाही, असं सांगणाऱ्या एनएसजी कमांडोजच्या आत्मविश्‍वासाला सलाम. सारं करुनही आपण काहीच न केल्याच्या आर्विभावात वावरणाऱ्या लष्करी जवानांच्या निरपेक्ष वृत्तीला सलाम. ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर प्रेमानं दिलेलं गुलाबाचं फुल स्वीकारण्यासाठी शंभरदा विचार करणाऱ्या जवानांच्या निस्वार्थी हेतूंना सलाम. काळ्या कपड्यात राहूनही पांढऱ्या कपड्यांमधल्या बगळ्यांपेक्षा अधिक स्वच्छ आणि शुद्ध असलेल्या जवानांच्या खऱ्याखुऱ्या देशभक्तीला सलाम. अतिरेक्‍यांशी लढण्यात इस्रायलचे जवान सर्वाधिक पटाईत. अशा इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या एनएसजी कमांडोजच्या शौर्याला आणि लढवय्या वृत्तीला सलाम.

अतिरेक्‍यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सलाम, जखमींना रुग्णालयात नेऊन माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देणाऱ्या मुंबईकरांना सलाम, जखमी रुग्णांवर अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्‍टर तसंच परिचारकांना सलाम, हल्ला झाल्यानंतर रक्तदानासाठी तातडीनं ब्लड बॅंक गाठणाऱ्या रक्तदात्यांना सलाम, दक्ष मुंबईकरांना सलाम, युद्धजन्य परिस्थितीतही प्रेक्षकांपर्यंत सर्व माहिती पोचवणाऱ्या पत्रकारांना सलाम, काही न्यूज चॅनेल्सच अफवा पसरवत होती. पण तरीही या अफवांवर विश्‍वास न ठेवणाऱ्या आणि स्वतः अफवा न पसरवणाऱ्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सलाम...

प्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...


अनुभवला थरार दहशतवादाचा ...

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं सारं जग हादरलं. भारत तर पुरता कोलमडून गेला. अशा पद्धतीनं हल्ला होईल, अशी अपेक्षाही कोणाला नव्हती. गुप्तचर संस्था आणि सुरक्षा रक्षकांचं अपयश किती महाग पडू शकतं, याचा अनुभव भारतानं घेतला. भारताची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली गेली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर अतिरेक्‍यांनी केलेला अंदाधुद गोळीबार, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय तसंच हॉटेल ताज इथं सुरु असलेली कारवाई चक्रावून टाकणारी होती.

मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी पुण्यात होतो. माझी सुटी संपत असल्यानं दुसऱ्या दिवशी बेलापूरला जायचं होतं. त्यानुसार मी 27 नोव्हेंबरला सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास बेलापूरला पोचलो. पण ही कारवाई संपण्याचं नाव घेईना. मी येण्यापूर्वी संपूर्ण रात्र आमच्या टीमनं तासातासाला अपडेट बुलेटिन काढली होती. तसंच कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोईसुविधा असतानाही आम्ही झगडत होतो. बेलापूरला पोचल्यानंतर तो संपूर्ण दिवस "डेस्क'वरच होतो. संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा असं साडेचार तास "लाईव्ह' करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्‍यक मुलाखती आणि इतर बातम्या मागावून घेतल्या. तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचे फोनो आणि अधूम मधून अँकरमध्ये डिस्कशन अशापद्धतीनं साडेचार तास अक्षरशः खेचून काढलं. पण मजा आली. अशा पद्धतीनं काहीही तयारी नसताना प्रथमच इतक्‍या मोठी "रिस्क' आम्ही घेतली होती. पण तरीही वेळ मारुन नेली.

रात्रभरात कारवाई संपेल आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं आमचे वार्ताहर सांगत होते. त्यामुळं मी रात्री ऑफिसमध्येच थांबलो होतो. कदाचित ऐनवेळी रात्री विशेष बातमीपत्र काढावं लागलं असतं. त्यामुळं मी ऑफिसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. पण तसं झालंच नाही आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजेच 28 तारखेलाही हे रण सुरुच होतं. मुंबईमध्ये चकमक सुरु आहे आणि मी तिथं जाऊ शकत नाही, हे माझ्या मनाला खटकत होतं. यावेळी मला ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचं एक वाक्‍य आठवतं. जगात जिथे जिथे काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडत असतील तिथं बातमीदार म्हणून मला जावंसं वाटतं, असं गडकरी म्हणायचे. ही गोष्ट कायम माझ्या मनात असते. त्यामुळंच मी परवानगी घेऊन मुंबईत रिर्पोंटिगसाठी गेलो.

प्रथम आनंद गायकवाड याच्यासह नरिमन हाऊस इथं जाऊन तिथं परिस्थिती कशी आहे, हे पाहून आलो. तिथली कारवाई सर्वाधिक अवघड होती. नरिमन हाऊस हे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांच्या वसाहतीमध्ये वसलेले आहे. त्यामुळं तिथं कारवाई सुरु असताना नागरिक क्रिकेटच्या मॅचला जमतात तसे जमले होते. शिवाय काही अतिउत्साही पत्रकार "लाईव्ह'चा थरार अनुभवण्यासाठी पुढे पुढे करत होते. इथली कारवाई लवकर संपेल, असं चित्र होतं. तसंच तिथं आनंद असल्यामुलं मी ताज इथं "रिर्पोटिंग'साठी गेलो. तिथं साधारण रात्री साडेसातच्या सुमारास पोचलो. तेव्हापासून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत अनुभवला थरार, थरार आणि फक्त थरार.

""माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु, जिंकू किंवा मरू...'' हे समरगीत मी फक्त ऐकलं किंवा पाहिलं होतं. ते अनुभवण्याची संधी मला त्या रात्री मिळाली. आपण जणू काही दिवाळीतल्या फटाक्‍यांचे आवाज ऐकतोय, अशा पद्धतीनं गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरु होते. रात्री बारा ते साडेतीन या कालावधीत सारं कसं शांत शांत होतं. त्यानंतर मात्र, पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु झाली. मध्यरात्रीनंतर चकमक थांबली असली तरी पत्रकारांचे गोळीबार सुरुच होते. एका पत्रकारानं तर फोनो देताना अकलेचे तारेच तोडले होते. ""ताजमध्ये सहा अतिरेकी आहेत. त्यापैकी दोन महिला अतिरेकी आहेत. त्यांनी नुकतंच रात्रीचं जेवण केलंय आणि आता पुन्हा एकदा ते चकमक करण्यासाठी सज्ज झाले आहेत...'' अशी बडबड ऐकल्यानंतर मला तर सुन्न व्हायला झालं. मुळात संबंधित पत्रकाराला ही माहिती दिली कोणी आणि इतकी "डिटेल' माहिती याच्याकडे असेल तर मग त्याला गुप्तचर खात्यातच नोकरी दिली पाहिजे, असा विचार माझ्या मनाला शिवला. पण अशी फेकचंदगिरी करणाऱ्या पत्रकाराला जोड्यानं का मारु नये, असंही मला वाटलं.

शायना एन. सी. नामक भाजपची एक चकमो नेता आहे. ती लग्नाला आल्यासारखी "गेट वे ऑफ इंडिया'जवळ आली होती, रात्री दीड वाजता. आपला कोणी बाईट घेईल किंवा मुलाखत घेईल का, याचा अंदाज शायना एन. सी. घेत होत्या. पण त्यांना फारसं कोणी विचारत नव्हतं. अखेर "लाईव्ह इंडिया' नामक वाहिनी तिच्या चमकोगिरीला बळी पडली आणि वाहिद खान नावाच्या अतिउत्साही पत्रकारानं तिची मुलाखत घेतली, अवघी पंधरा मिनिटं. ऍलेक पद्‌मसी हे ऍड विश्‍वातलं हे नामांकित व्यक्तिमत्व. हे महाशय पण रात्री अडीचच्या सुमारास तिथं आले. "बीबीसी'च्या एका पत्रकाराक डून त्यांनी आधी माहिती घेतली आणि मग तीच माहिती दुसऱ्या एका वाहिनीच्या मुलाखतीत सांगितली. त्यामुळं या महाशयांचे टीव्ही प्रेमही उघड झाले. हवशे, नवशे आणि गवशे असे असंख्य नागरिक-पत्रकार तिथं होते.

पहाटे साडेतीनच्या सुमारास चकमक पुन्हा सुरु झाली आणि आता ती वेगानं सुरु होती. अतिरेक्‍यांची एखादी गोळी आपल्या दिशेनं येऊ नये किंवा ग्रेनेडचे तुकडे फुटून आपल्या अंगावर येऊ नयेत, अशी प्रार्थना करुन आम्ही तिथं थांबलो होतो. माझ्या परिस्थितीवरुन तिथं लढणारे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या धैर्याची कल्पना मला येत होती. त्यामुळंच त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे, अशी माझी भावना आहे. सकाळी सकाळी म्हणजे साडेसातच्या सुमारास ही चकमक अंतिम टप्प्यात असल्याचं जाणवलं. कारण गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यांचा वेग वाढला होता. ताजच्या डाव्या कोपऱ्यातल्या तळ मजल्याला आगा लागली. ती प्रचंड वेगानं पसरत होती. पहिल्या मजल्याचा काही भागही आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. ही आग अतिरेक्‍यांनीच लावली, असा आमचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र, ही आग लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करुन लावली होती. पण तेव्हा साधारण अंदाज आला होता की, ही चकमक काही मिनिटांतच संपुष्टात येणार आहे. झालंही तसंच. साडेआठ पावणे नवाच्या सुमारास सारं काही शांत शांत झालं. एक व्यक्ती ताज हॉटेलच्या खिडकीतनं बाहेर पडताना सगळ्यांना दिसला. तोच ताजमधला शेवटचा अतिरेकी आणि त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं होतं.

त्यानंतर जवान आणि कमांडो अगदी रिलॅक्‍स दिसत होते. अग्निशामक दलाचे जवानही अगदी बिनधास्तपणे आग विझवत होते. शिवाय ज्या पहिल्या आणि तळ मजल्यावर संघर्ष सुरु होता, तिथं आता जवानांनी ताबा मिळवला होता. त्यामुळं कारवाई स्पष्ट झाल्याचं जाणवतं होतं. हो कारवाई संपलीच होती. कारवाई पार पडल्यानंतर विश्रांती घेत असलेल्या एका "एनएसजी' कमांडोशी गप्पा मारत असताना त्यांच्यातल्या आत्मविश्‍वाचा प्रत्यय आला. ही कारवाई थोडी अवघड होती, असं नाही वाटत का? या माझ्या प्रश्‍नावर त्यानं नकारार्थी उत्तर दिलं. "एनएसजी'साठी कोणतीच कारवाई अवघड नाही. आम्ही कोणाचाही सामना करु शकतो आणि देश वाचवू शकतो. हे अतिरेकी अद्ययावत आणि फिट होते, त्यामुळं आम्हाला अंदाज यायला थोडा वेळ लागला. पण अखेरीस ते संपलेच. आम्ही कोणापुढेही हार पत्करत नाही... असं त्या कमांडोनं सांगितल्यानंतर मला धन्य झाल्यासारखं वाटलं.