दीड वर्षांनंतर आठवला भ्रष्टाचार
भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता
काडीचीही नीतीमत्ता
नसलेल्या, भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या आणि चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनाविण्यात
आलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी बिहारमधील जनतेच्या साक्षीने
संयुक्त जनता दलाच्या नितीशकुमार यांनी थाटलेला संसार अवघ्या दीड वर्षात संपुष्टात
आला आहे. स्वतःहूनच हा संसार मोडण्याचा निर्णय
घेतल्यामुळे नितीशकुमार हे भोंदू, आणि दुटप्पी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बरोबर चार वर्षांपूर्वी जेव्हा नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत
नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर असलेले सत्तासंबंध संपुष्टात आणले होते,
तेव्हाही याच शब्दांमध्ये नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी वापरलेले
भोंदू आणि दुटप्पी हे शब्द योग्यच असल्याचे नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले
आहे.
नरेंद्र मोदी यांनी
भारतीय जनता पक्षाने प्रचार समितीचे अध्यक्ष केले म्हणून नितीशकुमार यांचा प्रचंड जळफळाट
झाला असावा आणि म्हणून त्यांनी चार वर्षांपूर्वी भाजपबरोबरचा घरोबा संपुष्टात आणला.
कारण दिले होते गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीचे. २००२मध्ये झालेल्या गोध्रा
हत्याकांडाची नव्हे, तर त्यानंतरच्या उसळलेल्या दंगलीची दाहकता समजायला नितीशकुमार
यांना २०१३ उजाडले, ही त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करायला लावणारी गोष्टच म्हटली
पाहिजे. बरं, दरम्यानच्या काळात त्यांनी एकदा रेल्वेमंत्रीपद आणि दोनदा मुख्यमंत्रीपद
भूषवून घेतले होते. तेव्हा मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उसळलेल्या दंगलीची
धग नितीशना जाणवली नव्हती. अचानकपणे २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना
ही धग जाणवली आणि त्यांनी भाजपबरोबरचे संबंध संपुष्टात आणले.
नंतरच्या काळात पुलाखालून
बरेच पाणी वाहून गेले. स्वतःच्याच पक्षाचे जीनत राम मांझी यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदी
बसविले. मात्र, सूत्रे सर्व स्वतःच्याच हातात ठेवली. मांझी हे भाजपच्या बाजूला झुकत
आहेत आणि आपले ऐकेनासे होत आहेत, हे समजल्यानंतर नितीश यांनी स्वतः केलेली चूक सुधारली
आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वतःकडे घेतली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत
संयुक्त जनता दलाचा सुपडा साफ झाल्यानंतर मग नितीशकुमार यांनी महागठबंधनची स्वप्ने
पडू लागली. अर्थातच, स्वतःचे आणि स्वतःच्या राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी.
तेव्हा नरेंद्र मोदी
द्वेषाने पछाडलेल्या नितीशकुमार यांना भाजपला येनकेन प्रकारेण भाजपला अस्मान दाखवायचे
होते. त्यातूनच महागठबंधनची निर्मिती झाली आणि कधीकाळी काँग्रेसला शिव्या देणारे नितीशकुमार
काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. चारा घोटाळ्यात शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत त्यांनी निवडणूकपूर्व युती करण्याचे
निश्चित केले आणि बिहारमध्ये काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाची अभद्र
युती अस्तित्वात आली.
लालूप्रसाद यादव यांचे
हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, हे नितीशकुमार यांना दिसले नाही की त्यांनी त्याकडे
जाणूनबुजून दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद
यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी तीन ऑक्टोबर २०१३मध्येच पाच वर्षांसाठी कारावास ठोठावला
होता. म्हणजेच महागठबंधन अस्तित्वात येण्यापूर्वीच ही शिक्षा जाहीर झाली होती आणि लालूप्रसाद
यांच्या भ्रष्ट कृत्यांवर कायदेशीर शिक्कामोर्तबही झाले होते. मग असे असतानाही नितीशकुमार
यांनी लालूंच्या भ्रष्ट कारकिर्दीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दिशेने मैत्रीचा हात
पुढे केलाच का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या झंझावाताला रोखण्यासाठी आपण एकटे
पुरे पडणार नाही, हे त्यांना पुरेपूर माहिती होते. म्हणूनच त्यांनी काँग्रेस आणि लालूप्रसाद
यादव या एकेकाळच्या स्वतःच्या कट्टर विरोधकांच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला. काँग्रेस
ना धुतल्या तांदळासारखी होती ना लालूप्रसाद. हे माहिती असूनही नितीश त्यांच्यासोबत
गेले.
हेच नितीशकुमार यांचा
दुटप्पी आणि ढोंगीपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. आता तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराचा
मुद्दा पुढे करून स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी नितीशकुमार राजीनामास्त्राचा वापर करीत
आहेत. मात्र, भ्रष्ट लालूप्रसादांशी सलगी करताना तुम्हाला त्यांचा भ्रष्टाचार दिसला
नव्हता का? की ‘कंदिला’चा प्रकाश मंद असल्याने तुम्हाला त्याची जाणीव झाली नव्हती?
लालूप्रसाद यादव हे काय आहेत, हे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. मग असे असतानाही
फक्त सत्ता मिळविण्यासाठी तुम्ही लालूप्रसादांच्या पक्षाशी विवाह केला. दीड वर्षे मजा
मारली आणि आता स्वतःवर बदफैलीचे शिंतोडे उडू नये, म्हणून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत
आहात. मुळात ज्या व्यक्तीने स्वतःचे चारित्र्य बाजारात विकले आहे, अशा व्यक्तीसोबत
विवाह करण्याचा निर्णय घेणे हाच मूर्खपणा आहे. माहिती असतानाही अशा व्यक्तीशी विवाह
करायचा आणि दीड वर्षानंतर तो कसा चारित्र्यहीन आहे, याचा दाखला देत वेगळे व्हायचे,
हे एक तर मूर्खपणाचे लक्षण आहे. किंवा ढोंगी आणि दुटप्पीपणाचे. तुम्ही त्यापैकी दुसऱ्या
गटातील आहात, असे निश्चितपणे वाटते.
स्वतःची प्रतिमा विकासपुरुष
अशी रंगविण्यासाठी धडपडणाऱ्या नितीशकुमारांचे वर्णन ढोंगी पुरुष असेच करावेसे वाटते.
विचारांचा आणि तत्वांचा फारसा मुलाहिजा न बाळगता सत्तेसाठी किंवा वैयक्तिक इर्ष्येसाठी
राजकीय सोयरिक करणारा दुटप्पी राजकीय नेता हीच नितीशकुमार यांची ओळख असल्याचे दुसऱ्यांदा
स्पष्ट झाले आहे. फरक इतकाच की, तेव्हा भारतीय जनता पक्षाची आणि नरेंद्र मोदी यांची
साथ सोडल्यामुळे नितीशकुमार भाजप कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवकांच्या टीकेचे धनी झाले
होते. आज त्यांनी लालूप्रसादांना अलविदा केल्यामुळे ते राजदच्या आणि तमाम तथाकथित धर्मनिरपेक्ष
पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या टीकेचे धनी झाले आहेत.
नितीश हे भारतीय जनता
पार्टीच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत असून, गुरुवारी त्यांचा शपथविधी
पार पडणार आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संयुक्त बैठक
होत आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षांचा संसार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. गोध्रा हत्याकांड
आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर कोणताही आरोप नव्हताच.
तरीही त्या मुद्द्याचा थयथयाट करून नितीश यांनी मुख्यमंत्रीपद सोडले होते नि भाजपसोबतची
सोयरिक संपुष्टात आणली होती. मग आता नितीश हे कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखालील भाजपशी सूत जुळवून घेत आहेत. २०१३ आणि २०१७ च्या परिस्थितीत असा काय
बदल झाला आहे. गुजरात दंगल आणि मोदी यांच्या अनुषंगाने काहीही घडामोडी घडलेल्या नाहीत.
असे असतानाही नितीश
यांनी नरेंद्रच्या मोदींना मिठी मारण्याचे धाडस केले आहे.
वास्तविक पाहता, भाजपने त्यांच्या
मित्रपक्षांची अवस्था काय केली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. असे असतानाही नितीश
हे भाजपच्या गोटात सहभागी होत आहेत. मित्रपक्षांना संपविण्याचा विडा उचलणाऱ्यांच्या
कवेत स्वतःहून जाणाऱ्या नितीशकुमार यांना भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…
सरड्याइतकेच रंग बदलणारे नितीशकुमार उद्या फायद्यासाठी मोदींनाही टांग दिल्याशिवाय
राहणार नाहीत. त्यामुळे नितीशकुमार यांना आपल्या गोटात घेऊन काँग्रेसी आणि तिसऱ्या
आघाडीची कशी जिरविली, अशा भ्रमात भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी अजिबात राहू नये.
....
नितीश यांनी भाजपबरोबरचा संसार मोडल्यानंतरचा ब्लॉग वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा...