Wednesday, October 15, 2008

शिवसेनेचा चेहरा बदलणारा नेता...


संघटक आणि शिस्तप्रिय कार्याध्यक्ष
ठाकरे हे आडनाव ऐकलं की, कोणत्याही मराठी माणसाचे कान टवकारणच! मग ते बाळासाहेब असोत, राज असो किंवा उद्धव. अगदी स्मिता ठाकरे हे नाव ऐकलं तरी टवकारणारे कान आहेतच. ठाकरे घराण्याबद्दल मराठी माणसाला पहिल्यापासून आकर्षण आहे. आदित्य ठाकरे एक अल्बम बाजारात आणतो आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहतो. ही आहे ठाकरे या आडनावाची जादू.

उद्धव हे नाव अगदी अलिकडेच पुढे आलेलं. नाही म्हटलं तरी पाच वर्ष झाली. महाबळेश्‍वर इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात उद्धव यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. तेव्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेला मी होतो. तेव्हापासून त्यांच्यात होत गेलेला बदल, घडत गेलेला कुशल संघटक आणि परिपक्व राजकारणी मी पाहतो आहे.

उद्धव हा कारकुनांचा नेता आहे, तो बाळासाहेबांइतका प्रभावी वक्ता नाही, उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मवाळ होतेय... असे एक ना अनेक आरोप उद्धव यांच्या होत राहिले. ते राजकारणीच नाहीत, असंही काही जण म्हणत होते. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत उद्धव यांची वाटचाल सुरुच होती. नारायण राणे गेले, राजही सोडून गेला, अनेक छोटे-मोठे नेते उद्धव यांच्यावर आरोप करुन निघून जात होते. पण उद्धव त्यांच्या कार्यपद्धतीवर ठाम होते.

"फर्स्ट क्‍लास' कारकिर्द!
लागोपाठ दोन वेळा मुंबई महापालिकेवरची सत्ता अबाधित राखून त्यांनी कुशल संघटकाची आणि कार्याध्यक्षपदाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली होती. राणेंचा अश्‍वमेध रायगडमध्येच रोखून तुकाराम सुर्वे यांना विधानसभेत पोहोचविले होते. रामटेकमध्येही सुबोध मोहिते हे प्रकाश जाधव यांच्यापुढे चारी मुंड्या चीत झाले. ठाण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आख्खी राष्ट्रवादी कॉंग्रेस ठाण्यात एकवटली होती. पण तिथंही उद्धव यांची मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली. राज आणि राणे बाहेर पडले तरी उद्धव यांनी हळूहळू संघटना इतकी उत्तम रितीने बांधली होती की, त्याला अधिक तडे गेले नाहीत. त्यांनी शिवसेनेला दिशा दिली.

बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आणि उद्धव यांच्या काळातील शिवसेना पूर्णपणे वेगळी आहे. एका अर्थानं तिला "कॉर्पोरेट लुक' आला आहे. पण दुसरीकडे तळागाळातल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी "राडा' करण्याची रगही शिवसैनिकांमध्ये आहे. ऊस, कापूस आणि भारनियमनासारख्या प्रश्‍नांवर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत हिंडणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे, झोपडपट्टीवासियांसाठी मुंबईत रस्त्यावर उतरणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आणि मराठीच्या फेऱ्यात अडकवून न ठेवता सर्व मुंबईकरांमध्ये शिवसेनेला नेण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळेच उद्धव यांच्या कार्यपद्धतीबद्दल, निर्णयक्षमतेबद्दल आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला आकर्षण होतं. त्यांना अगदी जवळून न्याहाळण्याची आणि मनसोक्त गप्पा मारण्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच ही इच्छा पूर्ण झाली.

"डिट्टो' कॉपी
दसरा मेळाव्याच्या निमित्तानं "साम मराठी' वाहिनीसाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घ्यायची होती. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी ही मुलाखत घेतली. पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं. शिवसेना भवनात सैनिकांचा राबता कायमच. साहेबांना भेटण्यासाठी आलेले असंख्य कार्यकर्ते. उद्धव यांचे निकटवर्तीय विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची सुरु असलेली धावपळ. अशा परिस्थितीत बाळासाहेब आणि राज यांची डिट्टो कॉपी वाटावी, अशा पद्धतीनं उद्धव यांचं आगमन झालं. आज काय, पेपरमध्ये काय वगैरे माहिती घेऊन साहेब आले. मध्येच कार्यकर्त्यांची चौकशी करुन मग मुलाखतीसाठी तयार झाले. बोला, विचारा प्रश्‍न असं म्हणून थेट सुरवात. त्यामुळे कॅमेरामन व लाटकर यांची थोडी धावपळ. माध्यमांना एकदमच किरकोळीत काढण्याची ठाकरे घराण्याची सवय उद्धव यांच्यामध्येही दिसून येते.

उद्धव यांच्या मुलाखतीमध्ये जाणवलेल्या काही गोष्टी म्हणजे आपल्यात काय कमी आहे, याची उद्धव यांना चांगली जाणीव आहे. त्यावर मात करुन किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन उद्धव यांना पुढे वाटचाल करायची आहे. ""मी चांगला वक्ता नाही. मला बाळासाहेबांसारखं (आणि राजसारखंही) भाषण करता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब आणि माझी कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळेच शिवसेनेचा तोंडावळा वेगळा आहे,'' हे उद्धव अगदी स्वतःहून मान्य करतात. मी फर्डा वक्ता नाही, मला वक्तृत्व जमत नाही. पण त्यामुळं मी संघटना वाढवू शकत नाही, इतकंच त्यांचं म्हणणं आहे.

नवनिर्माणाचे वाटोळे
अगदी बरोबर राज हे बाळासाहेबांप्रमाणेच फर्डे वक्ते आहेत. त्यांच्यासारखेच उत्तम नकलाकार आहेत. फर्स्ट क्‍लास व्यंगचित्रकारही आहेत. पण "मनसे'चे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची कारकिर्द अगदीच व्यर्थ आहे. मराठीच्या मुद्‌द्‌यावर दहशत निर्माण करण्याची त्यांची वृत्ती म्हणजे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम नसल्याचे द्योतक आहे. गेल्या दोन वर्षांत जो उत्तम संघटन करु शकला नाही आणि कार्यकर्त्यांना चांगला कार्यक्रम देऊ शकला नाही, तो नेता महाराष्ट्राचे नवनिर्माण काय करणार, हा कोणालाच न सुटणारा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमध्येही आता तेच तेच मुद्दे येताहेत. नाविन्य संपले आहे. म्हणूनच लवकरच राज यांच्या नवनिर्माणाचे वाटोळे झाले नाही तरच नवल! त्या तुलनेत उद्धव यांचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होताना दिसतो आहे.

आहे हे असं आहे...
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या छंदांबद्दल प्रचंड अभिमान आहे. असतात एकेकाला महागडे छंद. आता मला मासे पाळण्याचा छंद आहे आणि माझ्याकडे काही लाखांचा मासा होता, त्याला माझा काय दोष? माझा त्याच्यावर जीव जडला होता आणि तो गेला म्हणून मला दुःख झालं. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल उद्धव कसलीच भीडभाड न बाळगता उपस्थित करतात. मासा मेला ही माध्यमांसाठी (लोकसत्ताच!) मथळ्याची बातमी होते पण दोन आठवड्यांपूर्वी चार दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची बातमी माध्यमांना महत्वाची वाटत नाही. हीच का तुमची बातमीदारी, असा सवाल उपस्थित करुन ते स्वतःची बाजू समर्थपणे मांडतात. लपवाछपवी करण्याची गरज त्यांना वाटत नाही. आहे हे असं आहे, पटत असेल तर या अन्यथा धन्यवाद हा सावरकरी विचारांचा वसा घेऊन ते पुढे निघालेत. (येतील त्यांच्या सह, नाही येणार त्यांच्याविना आणि आड येतील त्यांना पार करुन ः सावरकर)

शेतीतलं कळत नाही...
आपल्याला जे कळत नाही, ते स्पष्टपणे मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे दिसतो. म्हणूनच ते म्हणातात, मला शेतीतलं कळत नाही. कारण मी कधीच शेतात गेलो नाही. पण शेतकरी मरतो आहे, हे मी उघड्या डोळ्यानी पाहू शकतो. वीज मोफत, पाणी मोफत, कर्जही माफ पण तरीही शेतकरी आत्महत्या करतोय. कारण त्याला बी-बियाणं नाही, खतं वेळेवर मिळत नाही, पावसाचा पत्ताच नाही, पाणी मिळालंच तर पिक येतं. पण त्याला सरकार भावच देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पिकाला भरपूर भाव दिल्याखेरीज आत्महत्या थांबणार नाही, हे कळण्यासाठी शेतीतलं कळलंच पाहिजे, असं नाही. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा पटतोही. कारण शेतीतलं कळणारे सत्तेत असतानाही शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांचाच नेता कृषीमंत्री आहे. मग उपयोग काय
त्यांना शेतीतलं कळून?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर प्रचंड पकड मिळविली आहे. शिवसेनेला एका दिशेने आणि एका विचाराने नेण्याचा त्यांचा मानस आहे. जुन्या नेत्यांना न दुखावता त्यांनी स्वतःचं स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन केलं आहे. विनायक, संजय आणि भारतकुमार ही राऊत मंडळी, मिलिंद नार्वेकर, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या सहा सल्लागारांच्या सहाय्याने त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांनी संघटना मुळापासून बांधून काढली आहे. भविष्यात त्यांना कितपत यश प्राप्त होतं त्याचं भाकित आताच करणं अवघड आहे. पण शिवसेना संपली, असं म्हणणाऱ्यांना या "कारकुनांच्या नेत्या'नं चोख उत्तर दिलंय...

9 comments:

Unknown said...

NO, I DON`T LIKE ARTICLE ON RAJ THAKARE. BECAUSE RAJ THAKARE ALSO A BIG IDOL FOR YOUTH. SO,I WRITE MY OPINION HERE.

DON`T MIND.
GO AHED...
KEEP IT UP..
BEST LUCK

Devidas Deshpande said...

फोटो आणि पोस्ट चांगले आहेत. मात्र उद्वव ठाकरे यांच्याबद्दलच्या आदरामुळे इतर नेत्यांबद्दल, विशेषतः राज ठाकरे यांच्याबद्दल अनादर कशाला? राज ठाकरे यांची दिशा चुकल्याची चर्चा जानेवारी महिन्यापर्यंत सगळीकडे होत होतीच. परंतु फेब्रुवारी महिन्यात राजच्या एका पवित्र्याने महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलली. खुद्द शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची मराठी पाट्यांच्या आंदोलनाच्या वेळेस झालेली अगतिक अवस्था साऱया महाराष्ट्राने पाहिलेली आहे.

Anonymous said...

जोरदार आर्टिकल...विशेषत: राज ठाकरे यांच्या नवनिर्माण कसे फोल आहे हे सांगणारा मुद्दा मला शंभर टक्के पटला.21 व्या शतकातले महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता उद्धवमध्ये आहे हा मुद्दा याचून पुन्हा एकदा अधोरेखीत झालाय.माझ्या सारख्या नवख्या ब्लॉगर्संनी तर अभ्यास करावा असा लेख
ओंकार डंके

Mazemat said...

Hi.This is Vijay Lad. When your boss say Plz read this, it means you have to read it very carefully otherwise....!!!!
Forget it. I was jocking. First I would like to tell you that I am Raj Thakare's die-heart fan. I got an potential opportunity to talk to him for almost five to seven minutes when he came to Pune for inauguration of painting exhibition.
I like his personality and way of talking. His promptness to answer any sort of question in asker's way impress me lot. I love aggression, that may be as I am young, which is the sole capital of Raj. And he has good number of intellectuals advisers. He has capacity to be the next Balasaheb, if I am not wrong. Here I want to ask one thing that What were issues Sena had when Balasaheb launch the party and subsequently came to power...

Anonymous said...

वा! उद्धव आपला लाखमोलाचा मासा मेला म्हणून रडत बसला आहे.
आणि राज तिथे मराठी माणसांसाठी तुरुंगात गेलाय. सगळ्या जगाशी शत्रुत्व घेऊन बसलाय केवळ मराठीसाठी. आता त्याच्यावर किती केसेस होतील देव जाणे. त्याच्या घरच्यांना काळजी वाटत असेल.झेड सुरक्षा देखील काढली आहे. जो माणूस जिवावर उदार होऊन या मराठीसाठी लढतो आहे त्याला नावं कशाला ठेवता?
’तेच तेच मुद्दे’ बोलतो आहे कारण ’धरसोड’ राजकारण करत नाही तो. आणि आता ’ते मुद्दे आमचेच आहेत’ म्हणून उद्धव पुढे पुढे करतोय. पण राजसारखी जेलमधे जाण्याची हिम्मत आहे का?
भाजपचे नेते मराठी लोकांना शिव्या घालत आहेत- सुषमा स्वराज पासून राजनाथ सिंग पर्यंत. पण उद्धव NDA मध्ये नितिश कुमारच्या जोडीने उभा आहे. ’हिंदुत्व’ म्हणे, ’हिंदीत्व’ आहे ते फक्त. राज आणि मनसे शिवाय आज मराठी लोकांना पर्याय नाही. ते perfect नसतील, पण शिवसेनेपेक्षा खुप चांगले आहेत.

Anonymous said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

Abhi said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मला हा ब्लॉग आवडला मी माझ्या ब्लॉग वरील यादीत तुमचा ब्लॉग सामील केला आहे.
धन्यवाद!!!

Man of the seas. said...

vahhhh. Kya baat hai???
shivasenene pach varsh satta asattanna kay kele? tenvha Rajhi changala shivsenet hota va agadi mahatvyacha neta hota. Raj la marathi ha mudda tenvhahi rabvata aala asata. pan tyavelihi, biharinchi etaki paidas mubait lolat asattanna ya paiki ekahi mandalila ha mudda jamalach nahi kinvha tevha tyanna to nako hota. anyway aat tyanna marathi manasachi baju manane tyanchya garjeche aahe ho. te rajkarani aahet aani tyanna baki kashashi kahihi ghene nahiye. sarvasamnya mansanne petun uthalyashiyay tyachya hakkavarchya gada dur karanyche samrthya konachya bapat nahi. tyamule he Marathi Manasa UTH aani Jaga HO>>>>>>>>>>>>>

Unknown said...

Great..... Keep Going...Best Wishes....