Thursday, July 02, 2009

लोभ असावा ही विनंती...


ओलांडला पंधरा हजारांचा टप्पा...

गेल्या तीन-चार वर्षांपासून मी हा ब्लॉग चालवितो आहे ब्लॉग जरी मी चालवित असलो तरी मला यामध्ये ओढण्याचं किंवा मला ब्लॉगचं व्यसन लावण्याचं काम केलंय ते देविदास देशपांडे यानं. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यानं सर्वप्रथम ब्लॉग सुरु केला. त्यावेळी तो इंग्रजी, मराठी, फ्रेंच आणि न जाणो किती भाषेत ब्लॉग लिहायचा. तीन ते चार ब्लॉग तर त्यानं नक्कीच सुरु केले होते. त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच किंवा त्यानं मदत केल्यामुळेच मी देखील ब्लॉग सुरु केला. मीच काय पण नंदकुमार वाघमारे, विश्वनाथ गरुड, नितीन ब्रह्मे, मुकुंद पोतदार, अभिजीत पेंढारकर आणि अशाच अनेक उपसंपादकांनी ब्लॉग सुरु केले. काहींचे ब्लॉग अजून सुरु आहेत. मी देखील त्यापैकीच एक.

गेल्या तीन वर्षांपासून कधी अधिक सातत्याने तर कधी कमी सातत्याने मी ब्लॉग लिहितो आहे. कधी खाद्यपदार्थांवर, कधी हॉटेल्सवर, कधी राजकारणावर, कधी क्रीडा घडामोडींवर किंवा कधी प्रवासावर. अगदी अलिकडे माझी आई गेल्यानंतरही मला ब्लॉगवर लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं होत. एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येकवेळी आपल्याला त्याबद्दल पेपरमध्ये लिहिता येतंच असं नाही. शिवाय आपण प्रत्येक गोष्टीतले एक्स्पर्ट नसतो. त्यामुळं आपल्या मताला पेपरमध्ये काय स्थान मिळणार. पण तरीही आपण आपलं मत रेटून मांडतो. कधी चहा पिताना, कधी मित्रांच्या घोळक्यात, तर कधी ऑफिसमध्ये बातम्यांवर चर्चा करताना. आता या पर्यायांमध्ये आणखी एकाची भर पडली आणि ती म्हणजे ब्लॉगची. मला जे हवं आणि जसं हवं तसं लिहिण्याची मोकळीक इथं मिळते. शिवाय उपसंपादकाची कात्री लागण्याची भीतीही नसते.

ब्लॉग लिहिताना आपला ब्लॉग किती दिवस चालेल, याबद्दल खरं सांगायचं तर शंकाच होती. शिवाय नव्याचे नऊ दिवस... या म्हणीप्रमाणे आपला ब्लॉग दोन-चार महिन्यांनी बंद तर पडणार नाही ना, हा विचारही मनात होता. पण येत्या सप्टेंबर महिन्यात ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. पंधरा हजार व्हिजिटर्सचा टप्पाही पार झालाय. तसंच स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळालं होतं. माझ्याप्रमाणेच अभिजीत पेंढारकरही त्याचा मानकरी ठरला होता. पारितोषिक हा काही ब्लॉगच्या लोकप्रियतेचा मापदंड नाही. पण ते मिळाल्यामुळं कदाचित मी अधिक हुरुपानं लिहू लागलो असेलही.

यापुढंही अधिक उत्साहानं, हिरीरीनं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं ब्लॉग लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरुच राहिल. तुम्हाला जर माझे लेख आवडत असतील तर शेजारच्या फॉलोअर्स या लिंकवर क्लिक करुन माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स बना. तसंच लेख आवडला असेल किंवा नसेल अथवा काही सूचना असतील तर कॉमेंटस हा ऑप्शन आहेच. कारण मला जसं माझं मत आहे. तसंच इतरांनाही मत आहे. त्यानं ते आपल्या ब्लॉगवर मांडलं तर ते हटविण्याचा अधिकार मला आहे. पण मी तो आतापर्यंत वापरलेला नाही. यापुढेही येऊ नये, हीच अपेक्षा आहे. (कॉमेंटवरुन आठवलं माझ्या ब्लॉगवर आलेल्या लेखाविरोधातल्या किंवा लेख न आवडल्याच्या कॉमेंटस देखील मी आहे तशाच ठेवल्या आहेत. हटविलेल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या लेखावरची एका बिहारी माणसाची जळजळीत प्रतिक्रियाही अगदी आहे तशीच छापली आहे.)

तेव्हा फ्रेंडस माझा ब्लॉग वाचाच पण तुम्हीही लवकर ब्लॉगर व्हा...
अगदी मनापासून धन्यवाद.

10 comments:

Onkar Danke said...

सर्वप्रथम तुमचं अभिनंदन..तुमचा ब्लॉग वाचल्यानंतरच मलाही ब्लॉगर व्हावसं वाटलं.खाद्यपदार्थ,राजकारण,प्रवासवर्ण या विषयावरचे तुमचे ब्लॉग मी अगदी सुरवातीपासून वाचले आहेत..तुमचं लिखाण आवडतं म्हणून तर मी एवढे ब्लॉग वाचले..अन्यथा पहिल्याच व्हीजटनंतर पुन्हा कधीही फिरकलो नसतो..फक्त तुमचे ब्लॉग लेखन हे नियमित नसतं ते नियमित व्हावे अशी माझी इच्छा आहे..तुमच्या या पुढच्या सर्व ब्लॉगला मनापासून शुभेच्छा

bhaanasa said...

अभिनंदन!!!:)

Devidas Deshpande said...

Hi Ashish, thanx for mentioning me and congrats for reaching this milestone. i still try to write Marathi blog but it is getting really difficult for me.

Majhe tujhya blogwar laksh asatech. tyamule chalu de. ani punha Khadyayatra kadhi suru honar?

अमोल परांजपे said...

मस्त... एक नंबर... १५ हजार हा आकडा तुझं सातत्य दाखवतो. तुझं सातत्य बघून मलाही ब्लॉग कायम अपडेट ठेवण्याची ऊर्जा मिळत राहो, अशी अशा...

nandu said...

Abhinandan Jadya. Nice... Tuzi lekhanshaili changalich baharat aahe. keep it Up. Maza blog var lihane kami zale aahe. pan Tuze jorat Chalu de. Nice to Read ur blog.

Mahendra said...

मनःपुर्वक अभिनंदन...

HAREKRISHNAJI said...

great

Somesh Bartakke said...

अभिनंदन,
आईवरील पोस्ट छान आहे. :)

सोमेश,
TheLife.in

balmukund said...

अरेव्वा!!! 15,0000 जबरदस्त!!! कीप इट अप!!! मात्र आपण मुंबईत गेला असल्यामुळे आणि मुंबईत अनेक घडामोडी घडत असल्यामुळे आपल्याकडून जास्त "पोस्ट'ची अपेक्षा आहे. "वाचणेबल' लिहीत असल्यामुळे ही अपेक्षा व्यक्त करून दाखवित आहे. त्यामुळे याचा विचार करा. लास्ट बट नॉट दी लीस्ट-माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल ऋणी आहे!!!

Manoj said...

फारच कमी मराठी ब्लॉग या सातत्यानं सुरु राहतात. त्यातही फार कमी जणांचे ब्लॉग इतक्या मोठ्या प्रमाणात वाचले जातात.आपलं मनःपूर्वक अभिनंदन. हे आपल्या लेखनाचं यश आहे.