शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Friday, January 08, 2010
मायेच्या हाताची मराठी चव...
श्रीयोग डायनिंग हॉल (डोंबिवली)
मुंबईमध्ये आल्यानंतर काही वेळचा अपवाद वगळला तर रोजरोज अण्णाकडे खाऊन ('साम'चा कॅन्टिनवाला) वैताग आला होता. मग महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि अगदी घरच्यासारखं जेवण जेवायची खूप इच्छा झाली होती. एकदम साधं, शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवण जेवायला कुठंतरी जायला हवं, असं कित्येक दिवसांपास्नं वाटत होतं. दोनवेळा अचानक हा योग जुळून आला. पहिला योग म्हणजे डोंबिवलीमधल्या श्रीयोग डायनिंग हॉलमधलं (आईच्या हाताची चव...) जेवण आणि दुसरं म्हणजं गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळच्या तांबे उपहारगृहामधलं जेवण. दोन्ही ठिकाणचं जेवण म्हणजे लय भारी. पहिल्या ठिकाणी मराठी पद्धतीनं तयार केलेली थाळी तर दुसरीकडे टिपिकल मराठी पद्धतीचं बिसमिल्लाह जेवण!
श्रीयोग डायनिंग हॉल...!
मध्यंतरी ई टीव्हीतला माझा जुना सहकारी आणि सध्या आयबीएन-लोकमतचे निखिल वागळे यांच्यानंतरचे आधारस्तंभ श्री.राजेंद्र हुंजे याच्या घरी गेलो होतो. तरी साधारणपणे दोन महिने उलटले. तेव्हा रात्री कुठंतरी 'कार्यक्रम' करायचा आणि थोडंसं जेवायचं, असं ठरलं होतं. पण नेमके एक-दोन जण आलेच नाहीत. मग उरलो फक्त मी आणि राजेंद्रच. मग 'कार्यक्रम' करायचं रद्द झालं आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवायचं ठरलं. राजेंद्रनं आई भोजनालयात जाऊ असं म्हटलं. मी पण होकार दिला. स्टेशनजवळच (पूर्वेला) आई भोजनालय म्हणजेच श्रीयोग डायनिंग हॉल आहे. अगदी पाच मिनिटांवर.
आईच्या हाताची चव...
मायेच्या हाताची मराठी चव... अशीच जाहिरात करण्यात आल्यामुळं जेवण कसं असणार याची उत्सुकता होतीच. शिवाय श्रीकांत मोघे, सुनील बर्वे, प्रशांत दामले आणि इतर अनेक नेते-अभिनेते तिथं जेवून गेले असल्यामुळं उत्सुकता अधिकच ताणली गेली. मेन्यू कार्ड न पाहताच दोन थाळीची (अनलिमिटेड हे आलंच!) ऑर्डर दिली. सुरळीच्या वड्या, बिटाची कोशिंबीर, छोल्यांची उसळ, टॉमेटो-बटाटा रस्सा भाजी, आळूची भाजी, मऊसूद घडीच्या पोळ्या, एक मोठी वाटी श्रीखंड, ताक आणि सरतेशेवटी मस्त सोलकढी... सोबतीला इतर काही पदार्थ असतील तर ते लक्षात नाही. पण ताट एकदम खचाखच भरलेलं आणि वाढपाची सेवाही अगदी शिस्तीत. (आखडता हात न घेता...)
घरचं जेवण...
पोळ्या म्हणजे अगदी घरच्या सारख्या. मऊ आणि तेल लावलेल्या. इतर ठिकाणी मिळणा-या वातड पोळ्या खाऊन इतका कंटाळा आला होता की, मायेच्या हाताच्या मराठी चवीमुळं दोन काय चांगल्या चार पोळ्या जास्त गेल्या. शिवाय सोबतीला आळूची भाजी (काही जण त्याला छद्मीपणे फदफदं असं म्हणतात) असल्यामुळं व्वा! क्या बात है... आळूची भाजी माझी मोस्ट फेव्हरेट असल्यामुळं मला वेड लागलं होतं. पुण्यात श्रुती मंगल कार्यालयात किंवा पूना गेस्ट हाऊसमधल्या चवीला थोडीशी गुळचट असणा-या आळूच्या भाजीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. छोले, आमटी आणि टोमॅटो-बटाटा रस्सा भाजीही चवीला घरच्यासारखीच. तिखट बेताचंच. गूळही थोडा सैल हातानंच वापरलेला. भातही मोकळा आणि गरमागरम. भात मोकळा असला तरी त्यामध्ये सोडा मात्र नव्हता. कारण नंतर पोट डब्ब होत नाही.
ताकही घट्ट आणि गोड. इतर अनेक ठिकाणी ताकाच्या नावाखाली पांढरं पाणी देण्याची वाईट खोड असते. पण इथलं ताक म्हणजे एकदम घट्ट आणि गोड. जेवताना अधूनमधून ताक पिऊन संपवलं तरी हरकत नाही. जेवणानंतर अपेटायझर म्हणून सोलकढी आहेच. ती पण एखाद्या मालवणी रेस्तरॉच्या तोंडात मारेल अशी. ताटात स्वीट म्हणून दोन-तीन ऑप्शन्स. गुलाबजाम, अंगूर मलाई, श्रीखंड आणि एखाद दुसरा... तुम्हाला आवडेल ते घ्या. स्वीटपेक्षा या सर्व गोष्टींचीच चव इतकी तोंडावर राहते की विचारता सोय नाही. सर्व पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर आपण अगदी तृप्त भावनेनं बाहेर पडू लागतो. इथं एका थाळीचा भाव १३० रुपये इतका आहे. पण स्वीट नको असेल तर किंवा इतर दिवशी हा दर कमी असतो. साधारण शंभर रुपयांच्या आसपास. पण पैसा वसूल जेवण आहे. सो डोन्ट वरी एन्जॉय इट!!!
श्रीयोग डॉयनिंग हॉल
(मायेच्या हाताची मराठी चव... श्रीयोग)
पी. मालवीय मार्ग, रामनगर,
डोंबिवली (पूर्व) – ४२१२०१.
२८६०८७१, (फॅक्स) – २८६१६०३
sachin_bodas@yahoo.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
नेते, झकास झालंय जेवणं. वा क्या बात है.. अहो रोज बोडसांचं हे भोजनालय जाता येताना दिसतं. पण म्हणतात ना पिकतं तिथे विकत नाही.. मी अजून गेलेलो नाही तिथे. पण आता केव्हा जातोय असं झालंय. नेते आमच्या डोंबिवलीतल्य़ा एका सुंदर भोजनालयावर लिहील्याबद्दल धन्यवाद..
बाय द वे.. निखिल वागळे यांच्यानंतरचे आयबीएन लोकमतचे आधारस्तंभ श्री.राजेंद्र हुंजे यांचं काय म्हणणं पडलं.. नेते, मान्यवरांत तुम्ही त्यांचंही नाव घ्या अशी एक सुधारणा सुचवतो.
Ye jadya jevan tu barobar shodhun kathtos re Jara jevna shivaay pan kahi shod.
Shriyas Jadhav...
Jadu Article mahanje bharleli Thalich...pan maze varnan thode jastch zaley...articlela mayechya hatachi chav aaliy...
Post a Comment