शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Monday, September 27, 2010
प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक...
पुण्यातील लक्ष्मी-रस्त्यावर
गेल्या काही वर्षांपासून ऑर्कुट आणि फेसबुकसह विविध सोशल नेटवर्किंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा इतर ठिकाणचे जुने मित्र-मैत्रिणी भेटतात. एखाद्या सुटीच्या दिवशी मस्त जमण्याचं प्लॅनिंग होतं आणि मग जुन्या आठवणींनी गप्पांचा फड हमखास रंगतो. चॅटिंग, व्हर्च्युअल फार्मिंग, डाटा शेअरिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी या सोशल नेटवर्किंगचा उपयोग होतो. पण या साईटस आणि इथलं सगळं विश्व व्हर्च्युअल आहे. प्रत्यक्षात असं काही नाही.
पुण्यामध्ये मात्र, खरंखुरं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक अस्तित्वात आहे. इथं तुम्हाला नवे मित्र मिळतात, जुन्या मित्र-मैत्रिणींची पुनर्भेट होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुणेकरांचं काय मत आहे, वेगवेगळ्या विषयांना ते कसे रिएक्ट करतात, ते इथं समजतं. पण इथं दररोज लॉगईन होता येत. वर्षभरातून फक्त एकदाच लॉगईन होता येतं. अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला. हेच पुण्यातलं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक.
अनेक जण अनेक वर्षांपासून यामध्ये लॉगईन होताहोत. अनेक मंडळाचे कार्यकर्ते, पुणेकर, गणेशभक्त, पत्रकार, रंगावलीकार, कलाकार, आर्टिस्ट, गावोगावचे ढोलताशावाले, नव्याने उदयास आलेली पुणेरी ढोलताशा पथके आणि राज्यभरातले इतर नागरिक या ऑर्कुट-फेसबुकचे सदस्य आहेत. दरवर्षी तितक्याच उत्साहाने यामध्ये लॉगईन होताहेत. पोलिस आणि प्रशासनाला मात्र, इच्छा नसतानाही याचं सभासद व्हावं लागतं. पुण्याप्रमाणेच, आसपासच्या जिल्ह्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील, देशाच्या विविध भागातील मंडळी इथं लॉगईन होत आहेत. आता तर परदेशी पाहुण्यांनाही या ऑर्कुट-फेसबुकची भुरळ पडली आहे. गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून मी या ऑर्कुट-फेसबुकमध्ये लॉगईन होतोय. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत तब्बल २३ तास रस्त्यांवर फिरल्यानंतर मला विसर्जन मिरवणूक ही देखील एकप्रकारचं ऑर्कुट-फेसबुक असल्याचं जाणवलं.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी कसबा गणपती लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर रात्री दगडूशेठ गणपती विसर्जित होईपर्यंत तुम्ही याठिकाणी लॉगईन होऊ शकता. गणरायाला निरोप देण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. दरवर्षी वेगवेगळे संदेश देणा-या रांगोळ्या आणि अधिकाधिक रंगावलीकारांची यामध्ये भरच पडत जातेय. रंगावलीप्रमाणेच मानाच्या पाच गणपतींसमोर असणारे देखावे, प्रबोधनकार संदेशांचे फलक, नव्या तालांसह, नव्या वादकांसह आणि नव्या नावांसह मिरवणुकीत सामील होणारी ढोल-ताशा पथके, प्रत्येकाची पेहरावाची आणि वादनाचीही विशिष्ट पद्धत या गोष्टी फक्त इथंच लॉगईन केल्यानंतर पहावयास मिळतात. मग कोणी हौसेनं नथ-नऊवारी नेसून घोड्यावर बसलेली असते, तर एखादा रांगडा गडी खास मराठमोळ्या वेशात जीव तोडून ढोल वाजवत असतो. कोणीतरी भगव्याची शान राखत तो नाचवत असतो, कुणी तलवारबाजीतील मर्दानीपणा दाखवत असतो, कुठे वेत्रचर्माचे आणि लाठ्याकाठ्यांची लढाई सुरु असते, तर काही हौशी बच्चे कंपनी महापुरुषांच्या वेशभूषा करुन इथं वावरत असतात. प्रत्येकासाठी हा एक सणच असतो. नटण्याचा, नाचण्याचा आणि डोळ्यात साठवून ठेवण्याचा.
विसर्जन मिरवणुकीत जर टिळक चौक ते बेलबाग चौक असा फेरफटका मारला तर आपले जुने मित्र आपल्याला नक्कीच भेटतात. कुणी कधीतरी आपल्या शेजारी राहणारा असतो, कोणी शाळेतला किंवा कॉलेजमधला असतो, एखादा आपल्या कामाच्या क्षेत्रातला असतो. कधी कधी तर वर्षभर आपण ज्याला भेटत नाही, असा एखादा नातेवाईकही आपल्याला इथं भेटू शकतो. नुसते जुने मित्र भेटत नाहीत तर हा त्याचा मित्र, ती त्याची मैत्रिण, हा त्यांच्याबरोबर असतो, असं करत करत नव्यानव्या मित्र-मैत्रिणींची यादीच आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये ऍड होत जाते. त्यापैकी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायची आणि कोणाची धुडकावून लावायची, हे तुमच्या आणि त्याच्या हातात आहेच की. मला तर माझे अनेक जुने मित्र-मैत्रिणी, ओळखीचे-पाळखीचे या साईटवर भेटतात. अगदी परवाच्या मिरवणुकीतही जवळपास दहा ते पंधरा जुने मित्र-ओळखीचे याठिकाणी भेटले. तुम्हीही इथं नियमितपणे लॉगईन होत असाल तर तुमचाही हाच अनुभव असेल.
या ऑर्कुट-फेसबुकचे दोनच रंग. एक भगवा (सर्वधर्मसमभाववाले याला केशरी म्हणू शकतात) आणि दुसरा गुलाबी. पर्यावरणप्रेमींच्या ध्वनीप्रदूषणामुळे यातला गुलाबी रंग कमी होऊ लागला असला तरी भगव्याचे तेज दिवसेंदिवस वाढत जात आहे. नेटवरच्या ऑर्कुट-फेसबुकवर जशी टीका होते, तो फालतूपणा आहे, टाईमपास आहे, कुचाळक्या करणा-यांचा अड्डा आहे, असे ताशेरे ओढले जातात. तसेच ताशेरे या साईटवरही ओढले जातात. सगळ्याची वाट लावलीय, धंदा झालाय, परंपरेच्या नावाखाली धुडगूस घालतात, ध्वनीप्रदूषण तसेच वायूप्रदूषण आणि गर्दीमुळे जीव नकोसा होतो, अशी कितीही टीका झाली तरी दिवसेंदिवस या साईटची लोकप्रियता वाढतच जाते आहे. शिवाय जे मनापासून इथं एन्जॉय करतात, त्यांच्यावर असल्या टीकेचा फारसा परिणाम होत नाही. तिथं जसे काही आंबटशौकिन मज्जा करायला येतात, तसे इथंही काही असतात. काही मंडळी व्हायरससारखी असतात. पण काय पहायचं आणि व्हायरसला कसं रोखायचं हे आपल्याला माहिती असतं, ते इथल्या बाबतीतही अगदी तंतोतंत लागू पडतं.
काही जण मात्र, हे काय आहे, इथं काय काय चालतं हे प्रत्यक्ष न पाहता उगाचच घरात सोफ्यावर बसून मिरवणूक पाहतात आणि शिव्यांची लाखोली वाहतात. गर्दी दिवसेंदिवस वाढत जातेय, पुणेकरांपेक्षा बाहेरची मंडळी जास्त येतायेत. असं असलं तरी सकाळी किंवा रात्र यापैकी एकदा तरी पुणेकर इथं लॉगईन होतातच. मग त्याला वयाचं बंधन नसतं. अगदी चार वर्षांच्या चिमुरडीपासून सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वजण इथं रंगतात. मला तर इथं लॉगईन झाल्याशिवाय चैनच पडत नाही. तुम्हीही इथं लॉगईन होऊन पहा, आवडलं तर पुन्हा पुन्हा लॉगईन व्हा्. अन्यथा पुन्हा लॉगईन होऊ नका... पहा हे प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक आवडतंय का ते...
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
एकदम मस्त. छान जमलीय भट्टी.
महोदय, पोस्ट छान लिहिली आहे. पण फोटो स्वत:चे वापरावेत. क्रमांक तीनचा फोटो घेतला त्या सुहासची संमती आहे काय? असल्यास तशी नोंद फोटोखाली असणे अपेक्षित आहे.
हा मूळ फोटो.
http://www.flickr.com/photos/simplysuhas/2856502906/
MAST MAST MAST
लेका, मस्त झालाय. फेसबुकातले मीत्र मिळवलेस.
परत तुझाल सहजी लिहण्याचा मूड सांभालळा गेलाय.
झकास....
आशिष सर तुम्ही भन्नाट आहात ...गणपती आणि ओर्कुट, फेसबूक...भारीच की...!
अनिल पौलकर,
लातूर.
sir,
otkut, facebookla khari olakh dili ase vatate. khoop chyan.
Bhimashankar Waghmare...
मीही पुढील वर्षीपासून इथे लॉगीन करणार आहे
तसा मी एक दोन वेळा लॉगीन केले होते परंतु रेगुलर नाही जमले पण पुढील वर्षीपासून नक्की
मस्त लिहिले आहे आवडली पोस्ट
Vikram Ghatge
Arre Ashish....stop doing this ...it feels like just go back to India asap and enjoy all this....
thanks for refreshing old memories
Milind Kolapkar
Post a Comment