Saturday, July 02, 2011

ती आणि मी...

झालं संपलं सगळं. गेल्या पाच-सहा महिन्यांपासूनचा ऋणानुबंध संपुष्टात आला. तसं पहायला गेलं तर गेल्या आठ-दहा महिन्यांपूर्वीच आमचा स्नेह जुळला होता. दोघांनाही एकमेकांची इतकी सवय झाली होती, की विचारता सोय नाही. दोघांनाही एकमेकांवाचून करमायचं नाही. दोघांनी कधीच एकमेकांना एकटं सोडलं नव्हतं. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपासून ते ऑफिसातील सहकाऱ्यांपर्यंत सगळेच तिची आपुलकीनं विचारपूस करायचे. काय, कधीपासून, कशामुळे अशी बित्तंबात काढून घ्यायचे. अगदी सामनात असल्यापासून ती माझ्या बरोबर होती. पण महाराष्ट्र टाइम्समध्ये आल्यानंतर मला तिला कायमचं दूर करावंच लागलं.

अहो, भलतासलता विचार मनात आणू नका. मी बोलतोय ते माझ्या हनवटीखाली आलेल्या एका गाठीबद्दल. सामना वृत्तपत्रात असताना शेवटच्या काही दिवसांमध्ये मला त्या गाठीचं अस्तित्त्व जाणवत होतं. सुरुवातीला वाटलं, की वजन वाढल्यामुळं हनवटीखाली हनवटी (डबल चीन) आली की काय. त्यामुळं सुरुवातीला त्याकडं दुर्लक्ष झालं. पण नंतर हळूहळू ती गाठ असल्याचं स्पष्ट होत गेलं. मग ऑपरेशन करुन ती गाठ काढेपर्यंत जवळपास रोज मला त्या गाठीबद्दलचं एक्सप्लेनेशन कोणाला ना कोणाला तरी द्यावं लागायचं. पण दोन आठवड्यापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यामुळं सगळेच प्रश्न निकाली निघाले. शिवाय, तुमच्या गाठीचा प्रश्न कायमचा सुटला आहे आणि आता पुन्हा तसं काही होणार नाही, असं आश्वासन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिल्यामुळे खरोखरच हा प्रश्न कायमचाच निकाली निघाला आहे.

वास्तविक पाहता त्या गाठीचा मला तसा काही त्रास नव्हता. सर्व तपासण्या आणि चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये काहीही गंभीर नसल्याचे रिपोर्ट होते. पाण्यामुळं किंवा कुठल्या तरी लिक्विडमुळं (फ्लुईड) गाठ झाली असावी, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. शिवाय ती गाठ बाहेरून आलेली होती. तेव्हा खाता-पिताना किंवा बोलतानाही काहीही त्रास व्हायचा नाही. तिला हात लावला तरीही दुखायचं नाही. गाठीचा मला काहीच त्रास नव्हता. फक्त दिसायला खराब दिसायचं आणि दाढी करताना थोडा त्रास व्हायचा. कारण रेझर मारताना अधिक काळजी घ्यावी लागत होती. इतकंच. दाढी करताना त्रास व्हायचा म्हणून कित्येक आठवडे दाढीही करायचो नाही. मग दाढी का केली नाही, याचं स्पष्टीकरण ओघानं आलंच. पण हे समजण्यासारखं आहे. (तसाही नियमित दाढी करण्याचा मला कंटाळाच आहे. दाढी ही काय रोज करण्याची गोष्ट आहे, असं मला अजिबात वाटत नाही.)

पण त्या गाठीमुळं मला लोकांनी जो त्रास दिलाय ना, तो जास्त तापदायक होता. अर्थात, बरीच जवळची मंडळी आपुलकीनं चौकशी करायची, हे समजू शकतो. पण ज्यांच्याशी साधी तोंड ओळखही नाही ते उगाच फालतू चौकशा करुन डोक्यात जायचे.
गाठ कशी आली, कधी आली, आयुर्वेदीक उपचार करा, हे औषध घ्या, ते औषध घ्या, ह्या डॉक्टरला भेटा, त्या बाबाला भेटा, ऑपरेशन हा काही उपाय नाही किंवा तोच एकमेव उपाय आहे, असं समजू नका इइ एक ना दोन शंभर फुकटचे सल्ले मंडळी द्यायची. त्यातील काही खवट पुणेकर तर काय कॅन्सर बिन्सर नाही ना, असं विचारून खात्री करून घ्यायचे. पहा, नीट चेक करुन घ्या. हल्ली कोणाला काय होईल, सांगता येत नाही, असं सांगून उगाच भीती निर्माण करायचे. त्यामुळं गाठ चालेल पण प्रश्न आवर, अशी परिस्थिती झाली होती.

सामनामधील मित्र राजेश शेलार यानं अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं, की ती गाठ आहे. ऑपरेशन केल्याशिवाय ती जाणार नाही. वेळीच डॉक्टरकडून तपासण्या करून घ्या आणि ऑपरेशन करून टाका. पण मुंबईत वेळही नव्हता आणि मुंबईत ऑपरेशन करणं शक्यही नव्हतं. त्यामुळं तेव्हापासून ते पुढं ढकललं गेलं. पण पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर दीनानाथला जाऊन तपासण्या केल्या आणि ऑपरेशनचा निर्णय पक्का झाला. पण काही ना काही अडचणी येतच होत्या. त्यामुळं ते पुढं ढकलावं लागत होतं. अर्थात, काही सिरीयस नाही, असं सांगितल्यामुळं मी पण थोडा रिलॅक्स होतो. पण मैत्री किंवा नातं नसलेली मंडळी उगाचच घाबरवून सोडायची. (आता मी गाठीला घाबरलो नाही, तर त्यांना काय घाबरणार, हा भाग अलहिदा.)

दोन आठवड्यांपूर्वी ऑपरेशन झालं आणि गाठ काढून टाकली. जवळपास सहा सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर अशा आकाराची ती गाठ होती. जी इतके दिवस माझ्या शरीरात होती तिला पहायचं भाग्य मला मिळालं नाही. मला शुद्ध येण्यापूर्वीच डॉक्टरांनी अधिक तपासण्यांसाठी तिला धाडलं होतं. पण रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साधारण अंदाज आला. एक आठवडा जखमेवर स्टेप्लरच्या पिना मारल्या होत्या. हल्ली टाके असेच असतात असं म्हणतात. ते काढल्यानंतरही हनवटीखाली थोडा जडपणा जाणवत होता. पण आता जवळपास पूर्ण रिकव्हर झाल्यासारखं वाटत आहे. कारण ती आयुष्यातून निघून गेल्यामुळं निर्माण झालेली ‘पोकळी’ आता पूर्णपणे ‘भरुन’ आली आहे.

15 comments:

Sachin Deshpande said...

pan Aata Gatha bandha.

Anonymous said...

मी आपल्याला पुण्यात भेटलो होतो तेव्हा मला ती गाठ दिसली होती...पण मी तिच्याविषयी काही विचारले नाही तो निर्णय किती योग्य होता हे मला ब्लोग वाचल्यावर लक्षात आले. असो तुमची आणि त्या सारख्या गाठीची पुन्हा गाठ पडू नये या शुभेच्या..
--------
अनिल पौलकर
--------

Anonymous said...

chala azun ek aathavda sampla... gaath prakran sampun... mast zaale mhanayche... fakt paavsachya paanyaat bhiju nako azun thode divas (mofat salla) :)

Pann tu kashala ghabarto te mala kaahi ithe bolaayche naahi... HAHAHAHA :)

ek gammat... :)

- Prasad

अमित भिडे said...

नेते उत्तम झाले ती गेली एकदाची.. तुमच्या मागची पिडा संपली... :)

आम्हाला फार बरे वाटले

Anonymous said...

Pan Aata Gatha Bandha Raje.

Sachin Deshpande

Anonymous said...

Sundar... Gath nahi, Tumche liKhan.

Onkar Dharmadhikari

Anonymous said...

Namsakr nete.

Amit Patil

Anonymous said...

Chyayala .. Bhari lihito re to .. pakkya gathicha patrakaar ahes .. Khup Khup Shubhechcha!

Ganesh Puranik

Anonymous said...

गाठी लागे जीवा..न लागावी आस...

आषाढी येतेय. आशिषजी भरपूर खा...श्रावण येईलच..खाण्यासाठी...गाठींच​ काय..गुजरातीत गाठीया हा खाण्यासाठीचा पदार्थ आहे. तो तुम्ही न आजमावल्यानं..रागे..रागे.. बहुधा त्यांनं तुमच्याशी गाठ बांधली होती. गाठ या शब्दाला मर...ाठीत खूप अर्थ आहेत. त्यामुळं लोक म्हणतात गाठ माझ्याशी आहे. गाठ पडली. गाठ बांधीन...आणखी बरचं काही मी काही शब्द व्युत्पत्तीकार नाही...पण असो. माझ्या गाठी मला काही म्हणायचे..होते. तुम्हाला गाठीचे यापुढे भय न पडो. ही ईश्वरचरणी प्रार्थना...देवालाही सांगतो...गाठ आमच्याशी आहे, बाबा. पुन्हा गाठीची गाठ पडू देवू नको..अन्यथा...

Nishikant Todkar.

Anonymous said...

Bar zal ti geli...

Dinesh Supekar

Anonymous said...

तू कधीपासून ब्लॉगची जाहिरात करायला लागलास ? तुला गरजच काय?

Amit Joshi

Anonymous said...

मस्तच...आपली कधी 'गाठ' पडतेय बघुया.

Yogesh Mehendale

Anonymous said...

Nice I like

Balasaheb More

Nima said...

हाहाहाहा. एका गाठीची कथा. लई भारी!!!

Anonymous said...

Amhi yenar hoto tya divshi tula discharge milala hota hospital madun.... anyways take rest and take care