Tuesday, January 10, 2012

नृसिंहवाडीची शान


सचिन सोमण भोजनालय
खूप दिवसांपासून नृसिंहवाडीला जजायचं जायचं असं चाललं होतं. अखेर तो योग जुळून आला. खूप वर्षांपूर्वी गेलो होतो. पण अगदी लहान असताना. त्यामुळं अगदी पुसट पुसट आठवत होतं. पण नेमकं काहीच लक्षात नव्हतं. सकाळी साडेसात आठला निघालो आणि दुपारी एकच्या आसपास नृसिंहवाडीत पोहोचलो. पुण्यापासून साधारण अडीचशे किलोमीटरवर असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी किंवा नरसोबावाडी किंवा नुसती वाडी.

पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना पेठ नाक्यावर डावीकडे (म्हणजेच इस्लामपूर, आष्टा आणि सांगलीच्या दिशेने) आत वळायचं. मुंबई-बेंगळुरू महामार्गापासून आत सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर नृसिंहवाडी आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्ग जितका चांगला. तितका सांगलीकडे जाणारा रस्ता खराब. स्वतःची गाडी असेल तर साधारणपणे पाच तासांमध्ये पुण्याहून नृसिंहवाडीला पोहचता येतं. आम्ही दुपारी एक-दीडच्या सुमारास नृसिंहवाडीला पोहोचलो.

नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा महापूर येतो तेव्हा तेव्हा नृसिंहवाडीचं मंदिर प्रथम पाण्याखाली जातं. त्यामुळं दर पावसाळ्यात नृसिंहवाडी हे गाव चर्चेत येतं ते महापुरामुळं. पण नृसिंह सरस्वतींचे गाव ही नृसिंहवाडीची खरी ओळख. कृष्णेच्या पाण्यात हात पाय धुतल्यानंतर मग नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं. देऊळमध्ये जसं दाखवलंय तसा बाजारूपणा इथं नाही, हे अगदी ठळकपणे जाणवतं.

दर्शनानंतर जेवण कुठं करायचं, यासाठी शोधाशोध सुरु झाली. वास्तविक पाहता, देवाच्या (किंवा संतांच्या ) घरी जेवणं अधिक इष्ट असं समजलं जातं. त्यामुळं एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर बाहेरच्या हॉटेलमध्ये न जेवता तिथं मिळणारा भंडारा किंवा प्रसाद हेच जेवण समजून घेण्यात खरी मज्जा असते. पण आमचं दर्शन होईपर्यंत प्रसादाची वेळ संपली होती. मग आम्हाला शोधाशोध करण्यावाचून पर्यायच नव्हता.
अखेरीस दोन-तीन ठिकाणी चौकशी करून मग नृसिंहवाडीतीलच सोमण भोजनालय गाठले. भोजनालय किंवा खाणावळ म्हणणे त्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. अगदी घरगुती आणि आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एकदम माफक किंमतीत घरच्यासारखे जेवण देणारे घर, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे भविष्यात जर कोणी नृसिंहवाडीला गेलात आणि प्रसाद उपलब्ध नसेल तर मग कोणताही विचार न करता थेट सोमण भोजनालय गाठायला हरकत नाही. सचिन सोमण यांचे भोजनालय कुठे ते विचारा. कारण नृसिंहवाडीत आणखी एक सोमण भोजनालय आहे. पण ते तितके स्वादिष्ट नाही, असे स्थानिक सांगतात।

वीस ते पंचवीस लोक एकावेळी जेवायला बसतील अशी व्यवस्था. लग्नातील पंक्तीप्रमाणे तिथं पंगत बसते. मुळ्याचा चटका, लाल मिरचीचा खर्डा (किंवा ठेचा), फ्लॉवर-टोमॅटो-बटाटा रस्सा भाजी, वाल आणि वांगी यांची रस्सा भाजी, तर्रीबाज आमटी, साधा पांढरा भात, वरण, तुपाची धार, मसाले भात, घरच्यासारख्या घडीच्या मऊसूद पोळ्या आणि नरसोबाच्या वाडीची मस्त बासुंदी. (अर्थात, माझे काका आणि आता भाऊ करतात त्या बासुंदीला तोड नाही. वीस लीटर दूध आटवून घोटून आठ लीटर बासुंदी तयार करतात. म्हणजे ती किती घट्ट आणि किती गोड होईल, याचा विचारच केलेला बरा.) जेवणाच्या सुरूवातीलाच आंबटगोड ताक वाढलं जातं. आणि संपूर्ण जेवणात अधून मधून ते वाढलं जात असल्यानं पाण्याऐवजी ताकावरच भर जास्त राहतो.

एकदम गरमागरम आणि इतक्या आग्रहानं वाढलं जाणारं जेवण म्हणजे फुल टू धम्माल. कोल्हापुरी मसाल्यांचा स्वादाला पाहुणचाराची जोड म्हणजे अजोड. वांग आणि वाल हे कॉम्बिनेशन तर आयुष्यात पहिल्यांदाच खाण्यात आलेलं. पण चव सगळं तारून नेते. दोन्ही भाज्यांचे मसाले अगदी एकाच पद्धतीचे. तरीही दोन्हीही भाज्यांवर ताव मारला जातोच. इथलं जेवण इतकं अप्रतिम आहे, की वाडीला येताना थोडंसं पोट रिकाम ठेवूनच या, म्हणजे जेवणाचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीनं घेता येईल. अगदी चटणी-कोशिंबिरीपासून ते भाजी-आमटीपर्यंत प्रत्येक पदार्थ वारंवार वाढला जातो. अगदी पोळ्यांचा आग्रहही होतो. नाही म्हणता म्हणता, सोमण यांचा आग्रह असतोच. मग अगदी घरच्यासारखा आग्रह करून अर्धी पोळी किंवा थोडा भात, मसाले भात, आमटी वाढली जातेच. बरं, गरमागरम जेवण असल्यानं दोन-चार घास अगदी आवर्जून जास्त जातात. कोणत्याही खाणावळीत वा भोजनालयात इतक्या आग्रहानं वाढलं गेलेलं मी पाहिलेलं नाही. त्यामुळंच अशा आग्रहाचं आम्हाला कौतुकं. त्यातून आडनाव सोमण. त्यामुळं दुप्पट कौतुक. (हे आपलं विनोदानं बरं का...)

नृसिंहवाडीची बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. बाहेरगावाहून आलेले लोक अगदी आवर्जून इथली बासुंदी खातात. काही लोक घरी पार्सलही नेतात. अर्थात, बासुंदी चांगली होती, यात वादच नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे यापूर्वी अनेक वेळा घरची चांगली बासुंदी खाल्ल्याने तिथल्या बासुंदीचे मला विशेष कौतुक वाटले नाही.
तेव्हा पुन्हा जेव्हा केव्हा नृसिंहवाडीस जाल तेव्हा सचिन सोमण यांच्या आग्रहाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद अगदी आवर्जून घ्या. आम्ही दुपारी दोन अडीचच्या सुमारास गेलो होतो. तेव्हापर्यंत आणि त्यानंतरही भुकेली मंडळी त्यांच्याकडे जेवण्यासाठी येत होते. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत ते सुरू असतं, असं समजायला अजिबात हरकत नाही.
(नृसिंहवाडीला प्रसाद म्हणून पेढे मिळतातच. पण त्या जोडीला मिळणारी कवठाची बर्फी खूपच छान असते. तिचा रंग पाहूनच प्रेमात पडायला होतं. चवीमुळं प्रेमात पडणं नंतरची गोष्ट.)

11 comments:

InnerCircle said...

Very Nice.. Keep up the good work

Anonymous said...

Mastach!! Mala pan javasa wattay ata... Baghu.. Apanach Javu ekda....

Chan lihilay.. Tondala pani sutla...


Regards,

S.K

Waman Parulekar said...

नरसोबाच्या वाडीला भेट दिली की आवर्जून आम्ही या भोजनालयात जातो. यंदा मे मध्ये जायचं आहे. पुन्हा भेट देईन.

moving quote moving said...

Hi you are doing a great job. I was looking for this information. I found it on your page its really amazing.I am sure that these are your own views. I hear exactly what you’re saying and I’m so happy that I came across your blog. You really know what you’re talking about, and you made me feel like I should learn more about this. Thanks for sharing useful information; I’m officially a huge fan of your blog.

Gayatri Pathak said...

majhya gavat gela hota tumhi. sangayche tari jevnachi nakki vyavsta jhali asti. gavakade mhantat ki konhi narsobavadila gela ki tyala namskar karayche. tasa tumhala naskar. ani kavthachi barfi anla asal tar prasad vatun kha. (mhanje mlahi dya)

Dee Kay said...

आशिष, छान..मी जूनमध्ये कोल्हापूरला गेलो होतो. जाताना सांगलीतच सकाळी शासकीय विश्रामगृहावर फ्रेश झालो..सकाळचे सगळे कार्यक्रम आटोपून मित्राच्या कारनं नृसिंहवाडी गाठली..यापूर्वी तिथं जावं अशी खूप इच्छा होती..पण गुरुमाऊलींचं बोलावणं आलं नाही..पण जूनमध्ये तसा बेत झाला आणि बायको तसच दोन लहान मुलांसह मला गुरुमाऊलीचं दर्शन एकदम छान झालं..कोल्हापूरला लग्नाला जायचं होतं म्हणून लवकरच निघालो..पण मला तो परिसर आवडला दत्तगुरुंनी आवाज दिला की पुन्हा जरुर भेट देईन..तोपर्यंत या ब्लॉगवरुन दत्तगुरुला साष्टांग नमस्कार..

Tveedee said...

सोमण यांच्या भोजनालया बद्दल मला हि लिहायचे होते ... मी ह्या भोजनालया च्या प्रेमात पडलो होतो... फक्त एक अजून जेवण करता यावं म्हणून एक दिवस मुक्काम वाढवला होता !!
जगभरात अनेक ठिकाणी मी जेवलो आहे.. पण ह्या भोजनालया सारखी चव कुठे हि नाही ... शिवाय माफक दर हे सुद्धा महत्वाचे ... लेख आवडला !
खवय्यांनी फक्त जेवण करण्या साठी म्हणून नृसिंहवाडी ला सोमण भोजनालयात जावे....खमंग पानाचा विडा हि जवळच मिळतो ...तो घेण्यास विसरू नये !

Divakarmegha said...

अतिशय उत्कृष्ट तुमची लेखन शैली आहे मला खूप आवडली

Divakarmegha said...

अटलजी विषयी आपले विचार लाखो भारतीय माणसाचे आहेत मी पण त्यातील एक आहे आपल्या विचारला माझा सलाम

VIVEKARANJIKAR said...

सचिन सोमण भोजनालायबद्दल खूप ऐकले आहे. येत्या रविवारी जाण्याचा योग येणार आहे. अत्यन्त माफक दरात उत्कृष्ट जेवण देतात असं ऐकलं वाचलं आहे.आता प्रत्यक्ष अनुभव घेईन

Nitesh S Khandare said...

(छानमाहिती) खूप सुरेख लेखन 🙏🙏🙏