हे तर पत्रकारितेतील ‘व्यंग’
‘शार्ली हेब्दो’ या फ्रान्समधील व्यंग्यसाप्ताहिकाच्या पॅरिसमधील कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात व्यंगसाप्ताहिकाचे संपादक, तीन व्यंग्यचित्रकार आणि दोन पोलिसांसह एकूण बारा जण ठार झाले. या घटनेने साऱ्या जगाला हादरवून टाकले. कदाचित युरोपमधील देशांना अशा पद्धतीने प्रथमच दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागल्यामुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसला असवा. किंवा अशा पद्धतीने पत्रकारांवर किंवा नियतकालिकावर हल्ला करून इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणल्यामुळे सारे जग हादरून गेले असावे.
‘शार्ली हेब्दो’वरील हल्ल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, पत्रकारांचे स्वातंत्र्य अशा मुद्द्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मला याच मुद्द्यावर लिहायचं आहे. मला जो मुद्दा मांडायचा आहे, तो बहुधा कोणीच मांडलेला नाही किंवा मला जसा मांडायचा आहे, तसा कोणाकडूनही मांडला गेलेला नाही. त्यामुळेच मला लिहावंसं वाटतंय. लेखामध्ये विविध मुद्द्यांची चर्चा सुरू करण्यापूर्वीच एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे, दहशतवाद्यांनी जे हत्याकांड घडवून आणले आणि प्रतिक्रिया दिली, ती पद्धती पूर्णपणे चूक आहे. त्याला समर्थन अजिबात नाही. अशा पद्धतीने हल्ले करून आणि हत्या करून आपली बाजू मांडण्याची वृत्ती घोर निंदनीय आहे. त्यामुळेच त्याचे समर्थन करण्यासाठी हे लिखाण आहे, असा अर्थ कोणीही काढण्याची आवश्यकता नाही.
हे निमित्त घेऊन मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. ‘शार्ली हेब्दो’चे सर्व व्यंग्यचित्रकार आणि संपादक वगैरे मंडळी खूप अत्युच्च दर्जाची व्यंग्यचित्रकार आहेत आणि त्यांच्या तोडीचे व्यंग्यचित्रकार जगात आजपर्यंत कोणीही कधीही झाले नाहीत, ही गोष्ट आपण सर्वप्रथम मान्य करून टाकू. असे असले तरीही आपल्या कलेची वा अभिव्यक्तीची खुमखुमी जिरविताना किंवा खाज भागविताना दुसऱ्या धर्माच्या, पंथाच्या किंवा समुदायाच्या भावनांवर आघात तर होत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे कोणासच वाटत नाही का? मग तो व्यंग्यचित्रकार असो, लेखक असो, कवी असो किंवा कोणत्याही प्रकारची कला सादर करणारा कलाकार असो...
‘शार्ली हेब्दो’ हे निधर्मी आणि डाव्या विचारसरणीचा कट्टर पुरस्कार करणारे व्यंग्यसाप्ताहिक आहे. कडव्या विचारसरणीवर रेषांचे फटकारे ओढणारे, सामाजिक-धार्मिक धारणेची व्यंग्यातून चिरफाड करणारे निर्भीड साप्ताहिक ही ‘शार्ली हेब्दो’ची ओळख आहे. ‘आम्हाला कट्टरपंथीयांचे हसू येते. मुस्लिम असो, ज्यू किंवा कॅथलिक...धार्मिक असणे गैर नाही; पण कट्टर विचार आणि तशीच कृती आम्हाला मान्य नाही.’ हे त्या साप्ताहिकाचे ब्रीद होते. २००६मध्ये डेन्मार्कच्या ‘जिलँड्स पोस्टेन’चे प्रेषित महंमदावरील कार्टून ‘शार्ली एब्दो’ने पुन्हा प्रसिद्ध केले होते. नोव्हेंबर, २०११मध्ये ‘चेरिया एब्दो’ नावाने अंक काढून त्या अंकाचे पाहुणे संपादक म्हणून प्रेषित महंमद यांचे नाव प्रकाशित केले. त्याच अंकात प्रेषिताचे कार्टूनही प्रसिद्ध केले होते. हत्याकांड घडवून आणल्यानंतर बाजारात आलेल्या नव्या अंकातही त्यांनी प्रेषित महंमद यांचे कार्टून प्रसिद्ध केले आहे.
आक्षेप याच गोष्टीला आहे. तुम्हाला जे काही लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे ते व्हा. मात्र, दुसऱ्यांच्या भावनांवर आणि श्रद्धांवर आघात करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली. जर इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. मुस्लिमांना महंमद पैगंबर यांचे चित्र, व्यंग्यचित्र, मूर्ती किंवा कोणत्याही दृष्य स्वरुपातील रुप साकारणे मान्य नाही, तर त्या धर्माचा आणि त्या धर्माची उपासना करणाऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. अगदी तो कितीही मोठ्या ताकदीचा कलावंत असला तरीही नाही. दुसऱ्यांच्या श्रद्धा आणि देवदेवता हा टिंगलटवाळीचा, चेष्टेचा किंवा कुत्सितपणे थट्टा करण्याचा विषय कसा होऊ शकतो. मुस्लिमच नाही, तर कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या किंवा मोठ्या समुदायाच्या श्रद्धेचा आदर करून जर अभिव्यक्त होता येत असेल तर अशा घटना घडणारच नाहीत. किंवा कमी प्रमाणात घडतील, असे मानायला हरकत नाही.
त्यामुळे ‘शार्ली हेब्दो’च्या सर्व व्यंग्यचित्रकारांनी आपले मरण स्वतःहून ओढवून घेतलेले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि ज्यांनी स्वतःचे मरण किरकोळ आणि फालतू कारणासाठी ओढवून घेतले, त्यांच्यासाठी आख्ख्या जगाने शोक व्यक्त करायची गरज आहे असे वाटत नाही. पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांचा जीव घेतला. ते सर्व मुस्लिमच होते. तरीही त्यांना निर्दयीपणे ठार मारले. भारतातल्या प्रत्येकाचा जीव त्या हत्याकांडामुळे हळहळला. बिचाऱ्या विद्यार्थ्यांचा अजिबात अपराध नसताना त्यांचा बळी गेला. इथे मात्र, व्यंग्यचित्रकारांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्यांना प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांनी त्यांचा जीव घेतला, हे अगदी मान्य. त्याचा लाखो वेळा निषेध. मात्र, व्यंग्यचित्रकारांचे कृत्यच इस्लामी दहशतवाद्यांना उद्युक्त करणारे होते. त्यामुळे या संघर्षाकडे इस्लामी दहशतवादी आणि त्यांना आव्हान देणारे पश्चिमेकडील वा युरोपातील ख्रिश्चन धर्मीय अशा पद्धतीने का पाहू नये? हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेवरील हल्ल्यापेक्षाही मुस्लिम मूलतत्ववाद्यांना काहीही कारण नसताना डिवचल्यामुळे झालेला हल्ला आहे. मुद्दामून डिवचले नसते, तर कदाचित ही वेळच ओढविली नसती. मग स्वतःहून दुसऱ्याची खोडी काढणाऱ्याबद्दल इतका शोक आणि आक्रोश व्यक्त करण्याचे कारण काय? मला तरी हे पटत नाही.
आपल्याकडेही अशाच धर्तीवरचे एक बोलके उदाहरण आहे. एम. एफ. हुसेन हे भारतात जन्मलेले जागतिक किर्तीचे चित्रकार. अगदी आपल्या पंढरपुरात जन्मलेले कलावंत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार ही त्यांची खरी ओळख. मात्र, त्यांची भारतीयांना असलेली त्यांची ओळख म्हणजे हिंदू देवदेवतांची आक्षेपार्ह नि नग्न छायाचित्रे काढणारे चित्रकार. अशी ओळख निर्माण होण्याचे कारण ते स्वतःच होते. त्यांनी हिंदू देवदेवतांची म्हणजे सरस्वती, हनुमान, राम-सीता वगैरे देवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे काढली. भारतमातेचे नग्न चित्र काढून वाद निर्माण केला. मुद्दामून वाद निर्माण व्हावा, यासाठी तशी चित्रे काढली की त्यांच्यातील कलावंताला जसे स्फुरले तसे चित्र कॅनव्हासवर उतरत गेले, हा मुद्दा गौण वाटतो.
चित्र म्हणून ही चित्रे कितीही जागतिक दर्जाची आणि अफलातून असली तरीही त्या चित्रांमुळे जर एखाद्या मोठ्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार असतील, तर सर्वसामान्यांसाठी ती चित्रे कवडीमोल किंवा मातीमोल ठरतात. कलावंत म्हणून तो माणूस कितीही महान असला, तरीही त्याची समाजमान्यता आणि समाजातील लोकप्रियता शून्य असते. कुठेही गेले तरी त्यांना रोष आणि आंदोलनांचाच सामना करावा लागतो. जसा हुसेन यांना करावा लागला आणि आयुष्याचा शेवट भारताबाहेर करावा लागला.
सुदैवाने त्यांनी फक्त हिंदू देवदेवतांचीच नग्न चित्रे चितारली. हिंदू समाज मुस्लिमांच्या तुलनेत बराच सहिष्णू आहे. त्यामुळे हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन उधळून लावण्याच्या घटना, जाळपोळ, हुसेन यांना धक्काबुक्की किंवा किरकोळ मारहाण एवढ्यावरच निभावले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला नाही. हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमधून मुस्लिम धर्माच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला असता, तर कदाचित ‘शार्ली हेब्दो’च्या बाबतीत झालेली घटना हुसेन यांच्याबाबतही घडू शकली असती. मुस्लिम समाज सहिष्णू आहे किंवा असहिष्णू आहे, या वादात पडायचे नाही. मात्र, श्रद्धास्थानांवर हल्ला झाला किंवा इस्लामविरोधात कोणी बोलले किंवा लिहेले, तर ते कोणालाही सोडत नाहीत. सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. तेव्हा हुसेन हे देखील ‘शार्ली हेब्दो’च्याच परंपरेतील होते, असे मानायला हरकत नाही. मुद्दाम एखाद्या समुदायाच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करण्यात कसली आलीय निर्भिडता आणि कसले आलेय अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. शीख पंथाचे लोक देखील तसे कर्मठ आणि कट्टर. भारताचे गृहमंत्रिपद भूषविलेल्या बुटासिंग यांना शीख पंथातून बहिष्कृत करण्याचे काम शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (एसजीपीसी) केले होते. सुवर्णमंदिर परिसरात कारवाई करून अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर सुवर्णमंदिराच्या डागडुजीचे काम केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत होते. अकाल तख्ताचा त्याला विरोध होता. हे काम करसेवेच्या माध्यमातून शीख समाजाच्या लोकांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सरकारने त्याला नकार दिला. त्यामुळे बुटासिंग आणि तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांच्यावर शीख समाज नाराज होता. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. अखेर झैलसिंग यांनी माफी मागितली. मात्र, बुटासिंग यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे ते बहिष्कृतच राहिले. अखेर नंतरच्या काळात बुटासिंग यांनी माफी मागून गुरुद्वारात सेवा केल्यानंतर त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेण्यात आला.
दुसरी उदाहरण अलिकडचे. अरुण जेटली यांच्या पराभवाचे… अमृतसर या अत्यंत सुरक्षित जागेवर अरुण जेटली यांना शीख पंथाच्या कट्टरपणामुळे हार पत्करावी लागली. आख्ख्या देशभरात मोदी लाट असताना अरुण जेटली थोड्या थोडक्या नव्हे लाखोंच्या फरकाने आपटले. कारण होते, अकाली दलाच्या मजिठिया नावाच्या मंत्र्याने ‘गुरुवाणी’मध्ये बदल करण्याचे महापाप करण्याचे. ‘निश्चय कर अपनी जीत करू’ ऐवजी ‘निश्चय कर अरुण जेटली की जीत करू’ असा बदल गुरुवाणीमध्ये केला आणि तशी पत्रके अमृतसरमध्ये घराघरात वाटली. त्यामुळे जेटली दणदणीत आपटले. तेव्हा आपल्या श्रद्धांवर आघात करणाऱ्यांना लोक धडा शिकविताच. प्रवृत्तीनुसार त्याचे स्वरुप बदलते. इतकेच.
आणखी एक म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? याच प्रश्नावरून सध्याचे ‘धर्मयुद्ध’ पेटलेले आहे, असे मला वाटते. पश्चिम आशियात ‘श्रेष्ठ धर्म कोणता’ यावरूनच ‘इस्लाम वि. ज्यू’ आणि युरोपात ‘इस्लाम वि. ख्रिश्चन’ असा संघर्ष पेटलेला आहे. पॅलेस्टाइन विरुद्ध इस्रायल यामुळे इस्लाम आणि ज्यू संघर्षात ठिणगी पडली आहे. तर अमेरिकेने इराकवर दोनवेळा केलेले आक्रमण, सद्दाम हुसेन यांची घडवून आणलेली हत्या आणि अफगाणिस्तानमध्ये केलेली अनावश्यक लुडबूड यामुळे ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यात धर्मयुद्धाचा बॉम्ब पडला आहे. या मागील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध गणितं कदाचित असतीलही. मात्र, सर्वसामान्यपणे दिसणारं एकमेव कारण हे ‘कोणता धर्म सर्वश्रेष्ठ’ या अहमहमिकेतून हा रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे.
‘शार्ली हेब्दो’ने येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्मावरही व्यंग्यचित्राद्वारे आसूड ओढले होते, असे काही जण म्हणतील. मात्र, ख्रिश्चन समाज कोणतेही काम शांततेनेच करतो. म्हणजे सेवा नि शिक्षणाचे कामही शांतपणेच करतो, धर्मांतराचे कामही शांततेने करतो आणि निषेधही शांततामय मार्गांनीच करतो. ‘दा विन्सी कोड’ या पुस्तकाला तसेच चित्रपटालाही त्यांनी हिंसात्मक मार्गाने विरोध केल्याचे ऐकिवात नाही. ख्रिश्चन धर्मियांनी भारतातही ‘द सीन्स’ या ख्रिश्चन धर्मगुरुंवर ताशेरे ओढणाऱ्या चित्रपटालाही हिंसात्मक आंदोलन करून विरोध केला नव्हता. त्यामुळे ही मंडळी ‘शार्ली हेब्दो’च्या विरोधात काही करतील, असे वाटत नाही.
ज्यू धर्मावरही ‘शार्ली हेब्दो’ने आसूड ओढले होते. मात्र, ज्यू धर्मीय हे इस्रायलवर अधिक प्रेम करणारे आहेत. ज्यू धर्माचे गुरू किंवा धर्मप्रमुख वगैरे यांच्यापेक्षाही त्यांचा जीव इस्रायलमध्ये अधिक गुंतलेला आहे. इस्रायलवर हल्ला करणाऱ्यांचा ते मुडदा पाडतात. पॅलेस्टाइनला सर्व अरब देशांचे समर्थन आहे. मात्र, एकटा इस्रायल सर्वांना पुरून उरला आहे. नुसता उरला नाही, पॅलेस्टाइनच्या छाताडावर बसला आहे. तेव्हा प्रत्येक जण स्वभावानुसार विरोध, निषेध आणि प्रतिक्रिया व्यक्त करतो.
प्रत्येक मुस्लीम हा पूर्णतः असहिष्णू नसला तरी मुस्लिम धर्मातील अनेक गट हे प्रचंड असहिष्णू आहेत. त्यांच्याकडे सहनशीलता अजिबात नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मुस्लिमविरोधात काहीही झाले, तरी ही मंडळी आपापल्या देशात ‘इस्लाम खतरे में’ म्हणत एकत्र येतात. आसाममध्ये बांगलादेशी मुस्लिमांना ठार केल्यानंतर मुंबईत मुस्लिमांनी धुडगूस घातला. अमेरिकेने इराकवर आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला म्हणून मुंबईत मोर्चे निघतात. ही त्याचीच उदाहरणे. त्यामुळे कोणी मान्य करो अथवा ना करो, मुस्लिम धर्मियांना तुम्ही जेवढे अधिक डिवचाल, तितके ते त्वेषाने पेटून उठतात आणि प्रतिक्रिया देतात. हा आजवरचा इतिहास आहे. तो इतिहास बदलणे बाप जन्मात शक्य नाही.
‘शार्ली हेब्दो’ नवा अंक बाजारात आला आहे. त्यावरही प्रेषित महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र रेखाटले आहे. त्याबाबत इजिप्तमधील एका सुन्नी संघटनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती खूपच बोलकी आहे. ‘अल अझर’ या संघटनेचा पदाधिकारी म्हणतो, ‘यापुढे आणखी व्यंगचित्रे छापण्यामुळे फक्त आणि फक्त द्वेषच वाढेल.’ फ्रान्समधील मुस्लिम संघटनांनी समाजबंधवांना शांत राहण्याचा आणि भावनिक प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, फ्रान्समधील किंवा युरोपमधील मुस्लिम शांत राहिले, तरी पश्चिम आशियातील आणि आशियातील मुस्लिम शांत राहतील का? प्रतिक्रिया कुठे ना कुठे उमटतच राहील. कदाचित ती यापेक्षाही भयंकर आणि तीव्र असेल…
तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याखाली उगाच मुस्लिमांना डिवचणे पहिल्यांदा थांबविले पाहिजे. विशेषतः युरोप आणि पश्चिम आशियात. हे कोणी ‘शार्ली हेब्दो’च्या वारसांना सांगणार आहे का? कारण असे डिवचण्यात कोणताही पुरुषार्थ नाही, ना पत्रकारितेचा कोणता मोठा धर्म तुम्ही निभावत आहात. तेव्हा उगाच मरणाला साद घालण्यात हशील नाही, हे वेळीच ओळखलेले बरे.
7 comments:
Nice article. Laxman, Sabnis, Bharat Dabholkar, Balaasaaheb he dekhil chimte kaadhoon vyang dakhavaychech kee! Apriy bolane aani tawali karne, kucheshtaa karne yaat farak asto (visheshta: dharmik shraddhanvar).
Ravi Godbole
असहमत. हुसेन आणि या साप्ताहिकाची तुलना अस्थानी. व्यंगचित्र आणि चित्र यात फरक आहे. अजूनही बरेच मुद्दे चर्चेत आणता येतील...
Datta Joshi
.....
नक्कीच या बाजूने विचार झाला पाहिजे.
हत्या निदंनीयच आहे पण हे करायला संधी देण अतिउत्साहीपणाच..
Sachin Kasabe
.....
I like your writing.
Mandar Parkhi
.....
टोकाला जावून भावना दुखावू नये एवढाच मुद्दा सहमत...इतर ठिकाणी चर्चा होवू शकते...कार्टून आणि चित्रात फरक आहेच. चित्रकाराच्या पलिकडे व्यंगचित्रकार असतो...
Dilip Tiwari
.....
कसे आहे आशीष, लोकांची अभिव्यक्ति वाढली आहे, माहितीच्या देवाण घेवाणिची साधने वाढली तसाच माय वे ऑर हायवे दृष्टिकोण वाढला आहे. अशा परिस्थितीत माध्यमे, त्यातील लोक याबाबत सकारात्मक-नकारात्मक बाबी चर्चिल्या जाणार हे अपेक्षित आहे. आपण विवेक न सोडता आपल्या मताचा ठाम प्रचार करत राहणे महत्वाचे ठरते अशा परिस्थितीत. आणि भारतातालि बहुसंख्य माध्यमे ते करतात याचा मला अभिमान वाटतो.
Prasanna Keskar
.....
आशिष, सर्वप्रथम अभिनंदन. छान अभ्यासपूर्वक लिहिलं आहेस. लोकांना आपापला धर्म प्रिय असतो, हे मान्य... पण तरीही चार्ली हेब्दोनं स्वतःच्या हातानं मरण ओढवून घेतलं हे पटत नाही. इस्लाममध्ये चित्रांना परवानगी नाही हे बरोबर आहे. पण तशी ती संगीतालाही नाही. पण ती कुठे पाळली जाते? याचा अर्थ उठसूठ मोहम्मद पैगंबरांचं चित्र काढत सुटावं असं मला म्हणायचं नाही. पण कधी कोणी काही कारणामुळे काढलं तर त्यासाठी हातात शस्त्र घेण्याचं काहीच कारण नाही. आज इतर कशाहीपेक्षा जास्त गरज आहे ती सर्व धर्मीयांनी moderate होण्याची. त्यात अर्थातच मुस्लीमही आलेच. चार्ली हेब्दो हे साप्ताहिक वेगळ्या धर्तीचं आहे, त्यांचा मोटो वेगळा आहे आणि ते कोणत्याच धर्माची ठेवत नाहीत. ज्यांना मान्य नाही त्यांनी दुर्लक्ष करावं. याच कारणामुळे मला एम एफ हुसेनच्या चित्रांचंही काही वाटलं नाही. दुर्लक्ष केलं. त्याऐवजी एखाद्या प्रत्यक्ष स्त्रीचा अपमान केला तर मी संतापते. त्यामुळे कुठे दुर्लक्ष करायचं आणि कुठे लक्ष द्यायचं याचा सगळ्यांनीच विचार करायची गरज आहे. चार्ली हेब्दोमुळे हा धडा मिळतो. आणि त्यांचं लेटेस्ट कार्टुन तर मला आवडलंच. मोहम्मद पैगंबर हातात फलक घेऊन म्हणतात 'मी सुद्धा चार्ली'... त्यातून संदेश मिळतो तो हाच की 'मोहम्मद पैगंबर आमचेही आहेत'... तो जास्त महत्त्वाचा आहे...
Nima Patil
.....
Khupach mast !!!
Priyankka Deshpande
.....
Mastch lihile aahes re. aani ek vegali baaju pan aamchyasamor yete....
Sagar Nene
.....
असहमत. हे म्हणजे हिंदुंना गाय मातेसमान म्हणून जगात कोणीही गोमंस खाऊ नये म्हणण्यासारखे आहे.
जगाताली सगळी डुकरे मारुन टाका आता. अन्यथा तुमच्या "गरीब बिचाऱ्या" "बांधवाना" मनःशान्ती मिळणार नाही.
http://m.timesofindia.com/india/Keep-pigs-pork-out-of-textbooks-Oxford-University-Press-tells-writers/articleshow/45892269.cms
Arvind Marathe
.....
चांदोरकर साहेब, अशाच भावना काळ TV९ वर निवृत्त ब्रिगेडीयर शेकटकर साहेबांनी व्यक्त केल्या होत्या.
Abhay Angchekar
श्रीमान आशिष चांदोरकर, मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाही. तुमचे हे मत अगदी ‘टिपिकल इंडियन’, गांधीवादी, अहिंसावादी, नेभळटवादी, पुचाटवादी आहे. युरोपातील खिश्चन देशांमध्ये महंमदाचे चित्र काढण्याची हिंमत आहे. त्याची किंमत चुकविण्याचीही त्यांची हिंमत आहे. त्याउलट भारतात तस्लिमा नसरीनला ठार मारण्याचा फतवा काढणाऱ्या मौलव्यांना घाबरून पश्चिम बंगालच्या डाव्या, ‘क्रांतीकारी’ सरकारने पार्श्वभागात शेपूट घातले. काँग्रेसवाल्या ‘सेक्युलरां’नी अल्पसंख्याकवाद पोसण्याचे, त्याला खतपाणी घालण्याचे ‘ऐतिहासिक’ कार्य केले आहे. असो. तेव्हा, ‘टिपिकल इंडियन पुचाटपणा’ आता पुरे झाला. पार्श्वभागात शेपूट घालून सामंजस्याची षंढ भाषा आता पुरे झाली.
‘ आय अॅम शार्ली हेब्दो’ ! पाहू किती गोळ्या घालता ते!
- विश्वास डिग्गीकर.
एक पत्रकार असून तुम्ही हे लिहिले आहे याचे आश्चर्य वाटते. मुळात तुमच्या भावना दुखावल्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला नाही आवडत तर चार्ली हेब्डो वाचू नका. तुम्हाला पुस्तक आवडल नाही तर वाचू नका,चित्रपताने भावना दुखावतात तर बघू नका. तुमच्या भावनांसाठी इतरांनी अभिव्यक्ती का सोडावी?आणि तुमच्या भावना कशानेही दुखावतील ,म्हणुन काय इतरांनी बोलणे सोडावे?एलिझाबेथ एकादशी,सिंग इज किंग ,लव्ह आजकल या चित्रपटांमुळेही लोकांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या म्हणे. आता याच्यात भावना दुखावण्यासारख काय होत?तरीही हे चित्रपट बंद करायचे का? गेलिलिओनी पृथ्वी गोल आहे असे म्हटल्याने ख्रिस्ती लोकांच्या भावना दुखावल्या होत्या,ज्ञानेश्वरान्नी गीता मराठीत सांगितली म्हणुनही धार्मिक भावना दुखावलेल्या,तुकारामांनी ब्राहमण नसतानाही श्रुती सांगितल्या म्हणुनही लोकांच्या भावना दुखावल्या होत्या . तुम्ही दिलेल्या लोजिकप्रमाणे तुम्ही गेलिलिओ ,ज्ञानेश्वर,तुकाराम यांना विरोध करणार्या टोळीबरोबर गेला असता असे वाटते.
Post a Comment