Thursday, October 04, 2012

जातीय तेढ नसलेला इतिहास

गृहखात्यानेच लिहावा…


 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे पोलिसांच्या लेखणीतून फेरलेखन होणे आवश्यक आहे. म्हणजे पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे तरी तसाच संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आहे. शिवाजी महाराजांनी ज्या नरराक्षसाचा कोथळा काढला, त्याचे पोस्टर्स किंवा प्रतिमा लावण्यात येऊ नयेत, पुण्याच्या लाल महालात महाराजांनी ज्या सरदाराची बोटे छाटली, त्याचा उल्लेख गणपतीच्या देखाव्यातून वगळण्यात यावा, शिवरायांची भव्य प्रतिमेला गणेशोत्सव मिवरणुकीत आणण्यात येऊ नये, अन्यथा दंगल भडकेल, असले भन्नाट जावईशोध राजमान्य राजश्री आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याने लावले आहेत. 

अशा परिस्थितीत, कदाचित भविष्यात जातीय तेढ वाढू नये, म्हणून महाराजांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहिण्याचे काम आर. आर. आबांना पार पाडावे लागेल. भाषणांच्या पुस्तकाप्रमाणेच आबांनी एखादे सुविचारांचे पुस्तक लिहावे, असा सल्ला अजितदादा पवार यांनी दिलाच आहे. त्यालाच जोडून आमची विनंती आहे, की आबांनी शिवरायांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहावा, म्हणजे उगाच महाराष्ट्रात धार्मिक तेढ बिढ निर्माण होणा्र नाही आणि पोलिसांच्या डोक्यालाही ताप राहणार नाही. तेव्हा आबा तुम्ही हे कार्य तातडीने हाती घ्याच…

आबांनी किंवा त्यांच्या पोलिसी खात्याने हा इतिहास लिहावयास घेतला, तर तो काहीसा असा असेल…

प्रसंग पहिला… 


छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कोण करतो, असा सवाल विजापूरच्या एका राजाच्या दरबारात उपस्थित केला गेला. तेव्हा अ नावाच्या एका सरदाराने महाराजांना जेरबंद करण्याचा विडा उचलला. शिवाजी महाराजांना जेरबंद करण्यासाठी ‘अ’ हा सरदार महाराष्ट्रावर चाल करून आला. लाखो सैनिक, घोडदळ, पायदळ, तोफा आणि बऱ्याच महिन्यांची रसद घेऊन मदमस्त ‘अ’ चालून आला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे मंदिर त्याने फोडले. मंदिराप्रमाणेच मूर्तीचीही विटंबना केली. एकावेळी आख्खा बोकड संपविणाऱ्या या नरराक्षसाने महाराष्ट्रातील अनेक मठमंदिरांवर हल्ला चढविला. 

चिडून शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून येतील आणि भल्यामोठ्या सैन्याच्या जोरावर आपण त्यांचा अगदी सहजपणे पराभव करू, अशा धुंदीत हा ‘अ’ राहिला. मात्र, शिवराय हे पण काही कच्च्या गुरूचे शिष्य नव्हते. त्यांनी ‘अ’ला जावळीच्या खोऱ्यात ओढून आणले. शिवरायांची भेट घेण्यासाठी ‘अ’ प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे शामियान्यात ‘अ’ने महाराजांना गळाभेटीसाठी बोलाविले. शिवरायांची मान बगलेत दाबून ‘अ’ने महाराजांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. शिवरायांनी पोलादी अंगरखा म्हणजेच संरक्षक कवच घातले होते. त्यामुळे या हल्ल्यातून महाराज बचावले. ‘अ’चा वार फुका गेला. महाराजांनी वाघनखे काढली आणि ‘अ’च्या पोटात खुपसून थेट त्याचा कोथळाच काढला. महाराजांनी इतक्या त्वेषाने प्रतिहल्ला चढविला, की ‘या xx’ असे म्हणज धिप्पाड ‘अ’ क्षणार्धात जमिनीवर कोसळला.

प्रसंग दुसरा…


औरंगाबादहून नगरमार्गे बारामती, अशी मजल दरमजल करीत ‘शा’ पुण्यात दाखल झाला. डोंगरी किल्ल्यांमध्ये महाराजांची मक्तेदारी मोडून काढणे, आपल्याला जमणार नाही, हे ‘शा’ने ओळखले होते. त्यामुळे त्याने मैदानातच महाराजांशी दोन हात करण्याचे ठरविले आणि पुण्याच्या लाल महालात ‘शा’ने आपला डेरा टाकला. त्याने बंदोबस्त वाढविला. पुण्याच्या आतमध्ये प्रवेश करणे जिकीरीचे बनले होते. ‘शा’च्या सैन्याशी समोरासमोर युद्ध करणे शक्य नाही, हे महाराजांनी ताडले होते. त्यांनी अत्यंत धाडसी योजना आखली. लाल महालाचा कोपरा न कोपरा शिवरायांना माहिती होता. त्यामुळे लाल महालावर हल्ला करून थेट ‘शा’चाच मुडदा पाडायचा, असा महाराजांचा गनिमी कावा होता. त्यानुसार एका संध्याकाळी लग्नाच्या वरातीत खुद्द महाराज आणि त्यांचे काही निवडक सरदार सहभागी झाले. सर्वांनी इतके बेमालूम वेषांतर केले होते, की कोणाला या काव्याचा थांगपत्ताही लागला नाही. 

लाल महालापाशी येताच शिवराय आणि सर्व मावळे एका ठिकाणी जमा झाले. तेथे महाराजांनी सरदारांना आणि मावळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडा न खडा माहिती होता. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तेथून महाराज ‘शा’च्या शयनकक्षात घुसले. महाराज आणि त्यांचे सरदार लाल महालात घुसले आहेत, हे कळताच ‘शा’ची चांगलीच तंतरली. त्याच्या अंगात कापरं भरलं. तो घामाघूम झाला. आपला जीव कसा वाचवायचा, याचा विचार तो करू लागला. खिडकीतून पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या ‘शा’वर महाराजांची तलवार चालली. ‘शा’च्या उजव्या हातांची बोटे तुटली आणि तिथून ‘शा’ थेट जनानखान्यात पळाला. महाराज तिथे पोहोचले. जनानखान्यात बुरख्यामध्ये असलेल्या ‘शा’ला महाराजांनी ओळखलेच आणि पुणे सोडून जाण्याच्या अटीवर त्याला जीवदान दिले. ‘शा’ पाय लावून पळत सुटला आणि थेट औरंगजेबाच्या दरबारात पोहोचला. एव्हाना महाराज आणि त्यांचे सरदार सिंहगडच्या दिशेने पसार झाले.

प्रसंग तिसरा…
‘मु’ सम्राट ‘औ’चा सरदार असलेला मिर्झाराजे जयसिंह आणि ‘दि’ हे स्वराज्यावर चालून आले. ‘मु’  सैन्य आणि शिवरायांचे मावळे यांच्यात घनघोर युद्ध झाले. ‘मु’च्या सैन्याने पुरंदरच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. मुरारबाजी देशपांडे यांनी ‘मु’च्या सैन्याला पळता भुई थोडी करून ठेवली होती. मात्र, ‘मु’च्या सैन्याची संख्या आणि ताकद प्रचंड असल्यामुळे पुरंदरची बाहेरची तटबंदी भेदली गेली. तरीही लढवय्या मुरारबाजींनी हार मानली नाही. मुरारबाजी यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून ‘दि’ चकितच झाला आणि त्यांच्याकडे पाहतच बसला. ‘दि’ने मुरारबाजी यांच्यासमोर तहाचा प्रस्ताव ठेवला आणि ‘मु’लांच्या सैन्यात मोठे सरदार पद देऊ केले. मात्र, महाराजांशी आणि पर्यायाने स्वराज्याशी प्रतारणा करणे मुरारबाजींना बाप जन्मात शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठीही वेळ दवडला नाही आणि युद्ध सुरूच ठेवले. 

मात्र, एका भाल्याने मुरारबाजी यांचा वेध घेतलाच. मात्र, शिर धडापासून वेगळे झाल्यानंतरही मुरारबाजी यांची तलवार काही मिनिटे तशीच सपासप फिरत होती, असे इतिहासकार सांगतात. इतका त्वेष आणि जोश त्यांच्यामध्ये होता. पुरंदरच्या या लढाईत मुरारबाजींनी प्राणांची बाजी लावली. महाराजांना पराभव स्वीकारावा लागला. स्वराज्यातील २३ किल्ले ‘मु’ना द्यावे लागले आणि युवराज संभाजीराजे यांच्यासह ‘औ’च्या भेटीसाठी आग्र्याला जाण्याची मिर्झाराजे जयसिंह यांची अट मान्य करावी लागली.

प्रसंग चौथा… 


मान्य केलेल्या अटीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. त्याठिकाणी ‘औ’चा मोठा दरबार भरला होता. वास्तविक पाहता, शिवराय हे मराठ्यांच्या साम्राज्याचे राजे. त्यामुळे त्यांचा मान पहिल्या रांगेत असायला हवा होता. मात्र, पराभूत आणि पळपुट्या सरदारांच्या मागील रांगेत शिवरायांना स्थान देऊन ‘औ’ने महाराजांचा पाणउतारा केलाच. स्वाभिमानी शिवरायांना हा अपमान सहन होणे शक्यच नव्हते. ‘आमचा अपमान करण्यासाठीच ‘औ’ने आम्हाला येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे का,’ असा थेट सवाल करीत महाराज तेथून त्यांच्या कक्षाकडे रवाना झाले. 

‘औ’ने महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला. शिवराय नजरकैदेत अडकले. आता येथून बाहेर कसे पडायचे, याच्याच विवंचनेत महाराज होते. अखेरीस महाराजांना शक्कल सुचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचे नाटक केले. महाराजांची तब्येत सुधारावी, म्हणून साधूसंत, फकीर, मौलवी मंडळींना सुकामेवा, मिठाई तसेच फळफळावळीचे पेटारे पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आला. ‘औ’नेही त्याला मान्यता दिली. काही दिवस असेच जाऊ दिल्यानंतर महाराजांनी एका दिवशी स्वतः पेटाऱ्यातून ‘औ’च्या हातावर तुरी देण्याचे निश्चित केले. योजनेनुसार एका पेटाऱ्यात स्वतः शिवराय आणि दुसऱ्या पेटाऱ्यात युवराज संभाजीराजे बसले आणि पाहता पाहता ‘औ’च्या नजरबंदीतून पसार झाले. महाराजांना नजरकैदेत ठेवून तिथेच त्यांचा खात्मा करण्याचे ‘औ’चे मनसुबे महाराजांनी उधळून लावले आणि शिवराय सुखरुप स्वराज्यामध्ये पोहोचले.

(महाराजांवर चालून आलेल्या काही सरदारांची नावे ही खऱ्याखुऱ्या इतिहासातील म्लेंच्छ नावांशी साधर्म्य राखणारी वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि उगाच डोक्यात राग घालून घेऊन धार्मिक तेढ पसरवू नये.)

छत्रपती शिवरायांचा इतिहास लवकरात लवकर म्लेंच्छमुक्त केला पाहिजे. जेणेकरून त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. अर्थात, या खानावळीचा सध्याच्या मंडळींना पुळका का यावा… त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या किंवा वास्तव सांगितले तर चालू स्थितीत कोणाच्या पोटात शूळ का उठावा… मिरवणुकांमध्ये अशा पोस्टर्स आणि छायाचित्रांचे प्रदर्शन जर होत असेल तर काहींच्या छातीत जळजळ होऊन गरळ का बाहेर पडावी… हे कोणालाही न उलगडलेले कोडे आहे. अफझलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्दी जौहर आणि मुघल, आदिलशाही, निजामशाही यांच्यातील तमाम सरदार हे पोटात कळ येणाऱ्यांचे बापजादे होते किंवा जावई होते, अशा थाटात महाराजांच्या जीवावर उठलेल्या खानावळीचे समर्थन करण्याची अहमहिका मंडळींमध्ये सुरू आहे.

वेळीच हे थांबावे, अशी आवश्यकताही कोणाला वाटत नाही. उलट धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नावाखाली शिवरायांच्या कार्यकर्त्यांनाच चेपण्याचे प्रयत्न सुरू असतात. आता शिवरायांवर आक्रमण करणारी मंडळी मुसलमान होती, हा काही महाराजांचा दोष नाही ना. शिवाय ते कोणत्याही जाती-धर्माचे असले तरीही तुम्ही शिवरायांच्या बाजूने आहात, की अफझलखानाच्या बाजूने, हे विचारण्याची हिंमत कोणाच्यातही नाही. कारवाईचा ढोस मात्र, शिवरायांच्या मावळ्यांनाच. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कितपत योग्य आहे. 

काही वर्षांपूर्वी डोंबविली येथील एका मंडळाने अफझलखानाचा कोथळा काढणारे शिवाजी महाराज असा देखावा मिरवणुकीसाठी केला होता. अर्थातच, धार्मिक तेढ निर्माण होईल, या कारणाखाली पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला. त्याविरोधात हे कार्यकर्ते न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. ‘छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, हे ऐतिहासिक सत्य मुस्लिमांना स्वीकारावेच लागेल…’

तेव्हा लवकरात लवकर महाराजांचा इतिहास म्लेंच्छमुक्त करून टाकावा, म्हणजे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही आणि दंगलीही भडकणार नाहीत. बघा पटतंय का...

Friday, September 07, 2012

पाच वर्षांनंतर…


पुन्हा एकदा हैदराबाद

बऱ्य़ाच वर्षांनंतर म्हणजे बरोब्बर पाच वर्षांनी हैदराबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अगदी सुरुवातीला केसरी सोडून ई टीव्ही जॉईन केलं होतं. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा सुळसुळाट झाला नव्हता. मराठीमध्ये तर एकमेव ई टीव्ही वरील बातम्याच सर्वाधिक विश्वासार्ह आणि गावागावापर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ई टीव्हीची प्रचंड क्रेझ होती. अर्थातच, बातम्यांसाठी. कारण कार्यक्रमांसाठी ही वाहिनी कधीच ओळखली गेली नाही आणि आताही जात नाही. असो. 

तेव्हापासूनचे ऋणानुबंध ई टीव्ही आणि पर्यायाने हैदराबादशी जोडले गेलेले आहेत. जून २००३ पासून. त्यामुळे हैदराबादला जाणं, ही गोष्ट खूपच आनंददायी आणि गतस्मृती जागविणारी असते. मध्यंतरी दोन-तीन दिवस लागून सुटी आल्यामुळे मग ‘चलो हैदराबाद’चा नारा दिला. हुसेनसागर एक्स्प्रेसनं निघालो. सोलापूर सोडल्यानंतर मग गुलबर्गा, वाडी, तांडूर, निझामाबाद वगैरे ओळखीची स्टेशन्स मागं टाकत अखेरीस हैदराबाद आलं. संपूर्ण प्रवासात (कदाचित फक्त) वाडी येथे उत्तम नाश्ता मिळत असल्यानं तिथंच रेमटून नाश्ता केला. इथं मिळणारा नाश्ता म्हणजे इडली, मेदूवडा आणि भरपूर चटणी. क्वचित कधीतरी डाळवडा किंवा घावन. एका केळीच्या पानावर चार इडल्या आणि त्यावर ओतलेली चटणी. अशा अगदी भरपेट नाश्त्यानं हैदराबादपर्यंत साथ दिली. 

हैदराबाद अगदी होतं तस्संच आहे. म्हणजे जो परिसर माझ्या परिचयाचा आहे, तो अगदी आहे तस्सा आहे. हैदराबादची बससेवा अगदी पूर्वीसारखीच विश्वासार्ह आणि स्वस्त आहे. रस्त्यावरील गाड्यांवर मिळणारा इडली-डोसा तितकाच स्वादिष्ट असून वाढत्या महागाईच्या झळा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. बाकी ट्रॅफिकची बेशिस्त, ‘ऐसा क्या कर रहेला तू’ असं उर्दूमिश्रीत हिंदी, रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवरील पुंगू, मिरची भजी, इडली, मेदूवडा नि पुरी तसेच बटाट्याची पातळ डोसाभाजी, गल्लोगल्ली उगविलेल्या शिक्षण संस्था आणि छोटी-मोठी हॉस्पिटल्स आणि पाचशे मीटरच्या अंतरावर असलेली थिएटर्स. सर्व काही जसेच्या तसेच. फक्त मी रहायचो त्या दिलसुखनगरमध्ये अनेक बदल झाले आहेत. इतकाच काय तो फरक.
 

हैदराबादमध्ये गेल्यानंतर पहिलं काम केलं म्हणजे, दिलसुखनगर भागत अगदी मनसोक्त फिरलो. आम्ही जिथं दीड वर्ष राहिलो, त्या श्रीनगर कॉलनीतल्या घरी जाऊन आलो. नुसतं त्या मार्गावरून फिरत असतानाही जुन्या आठवणी अगदी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून तरळत होत्या. आम्ही रहायचो ती गल्ली म्हणजे ई टीव्ही लेनच झाली होती. ई टीव्हीतले जवळपास दहा-बारा लोक आजूबाजूला रहायचे. त्यामुळे गुढीपाडव्याला अगदी गुढ्या-तोरणं उभारण्याचा कार्यक्रम आम्ही केला होता. ते सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. पण आता ई टीव्ही मराठीचीच अवस्था अगदी वाईट असल्यामुळं आमच्या ई टीव्ही लेनमध्येही कोणीही उरलेलं नाही. योगायोग इतकाच, की आम्ही रहायचो त्या घरी मराठी कुटुंबच सध्या रहात आहे. इतकंच.

दिलसुखनगरमधील सर्वाधिक दुःखदायक घटना म्हणजे आमच्या एका मुस्लिम चाचाचं बंद झालेलं दुकान. ज्या चाचाच्या पुरीभाजी, पान आणि चहावर आम्ही हैदराबादमधील दिवस काढले तो चाचा तिथून गायब झालाय. म्हणजे त्याच्या हॉटेलाच्या जागी आता मस्त एअरसेलची शोरूम थाटण्यात आलेली आहे. ई टीव्हीत असताना नाईट शिफ्ट (रात्री १०.२० ते सकाळी ९) करून आल्यानंतर सक्काळी मस्त गर्रमागर्रम भाजी आणि फुगलेल्या पुऱ्य़ा अशी एक दीड प्लेट जिरविल्यानंतर ते स्वर्गसुखच वाटायचं. पुरीभाजीनंतर इराण्याकडे मिळतो तशा स्वादाचा कडक चहा. हे सगळं पोटात गेल्यानंतर मग रात्रभर जागून सकाळचं बुलेटिन काढल्याचा ताण डोळ्यावर येऊ लागायचा. घरी गेल्यानंतर मस्त ताणून द्यायची, की मग थेट तीन-चार वाजताच उठायचं. 

चाचाची दुसरी गोष्ट म्हणजे दुपारची शिफ्ट (२.२०) असो किंवा रात्रीची (१०.२०). चाचाकडून मिनाक्षी पान घेतल्याशिवाय बसमध्ये चढायचो नाही. मग आज कोणाला तरी मुंडक्यावर टाक, उद्या दुसऱ्य़ाला मुंडक्यावर टाक, कधी स्वतः पैसे दे, असं करीत आमचा पानाचा शौक पूर्ण व्हायचा. पान अगदी स्वस्त होतं. म्हणजे केवळ दोन रुपयाला. त्यामुळं हा शौक अगदी परवडण्यासारखा होता. क्वचित कधीतरी पाहुण्या कलाकारालाही मुंडक्यावर टाकण्यास आम्ही मागेपुढे पहायचो नाही. त्यामुळे नवा चेहरा दिसला, की त्यालाही कळलेलं असायचं, की आजचा बकरा हा आहे. मग चाचा स्वतःहून आम्हाला विचारायचा, ‘आज ये बडा साहब लगते है…’ असं. मग सगदळीकडे हशा… त्यामुळं चाचाचं हॉटेल बंद झाल्याचं पाहिलं आणि मन उदास झालं.

दिलसुखनगरच्या बसस्टॉपसमोरच्या आमच्या मराठी काकूंची गाडी अजूनही सुरू आहे आणि त्यावर तितकीच गर्दी असल्यानं बरं झालं. बिदरच्या असल्यामुळं त्यांना मराठी येतं. त्यांना मराठी येतं, हा आम्हाला आमच्या हैदराबादमधील सुरूवातीच्या काळात खूप दिलासा होता. ऑफिसमधले सहकारी सोडून इतर कोणीतरी आमच्याशी मराठीतून बोलतोय, हा आमच्यासाठी धक्काच असायचा. मग हळूहळू आम्ही कोनार्क थिएटरजवळचा जिलेबीवाला, राजधानी थिएटरच्या गल्लीतील भेळवाला वगैरे असे मराठी लोकं शोधून काढले. पण बिदरच्या या काकू सर्वात पहिल्या. मूग डोसा आणि पेस्सेरातू ही त्यांची खासियत. काकूंकडे दोन दिवस मस्त सकाळचा नाश्ता करून क्षुधाशांती केली आणि मगच पुढे गेलो. 
 

ई टीव्हीमधील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं आता माझ्या ओळखीची आहेत. त्यापैकी माधुरी गुंटी, स्वाती कुलकर्णी आणि धनंजय तथा काका कोष्टी यांची मनाप्रमाणे अगदी मस्त भेट झाली. महत्प्रयासानं माधुरीचा फोन नंबर आणि मग तिथं घर शोधून काढलं. तिच्या हातच्या भाकरी, शेवग्याच्या शेंगेची भाजी आणि सांबार-भात खाऊन हैदराबादला गेल्याचं सार्थक झालं, असंच मनात झालं. हैदराबाद मुक्कामी असताना पोळी-भाजी, चिकन किंवा संपूर्ण जेवण करावसं वाटलं तर आमची हक्काची सुगरण असायची माधुरी उर्फ अम्मा. हैदराबादमध्ये तीच आमची बहिण होती आणि तीच अम्मा. त्यामुळं सात वर्षांनंतर अम्माच्या हातचं जेवण जेवून अगदी तृप्त झालो.
 
स्वाती पण अगदी तशीच हक्काची बहिण. एखाद्या सुटी दिवशी किंवा संध्याकाळी निवांत असलो तर मग आमीरपेटमधील स्वातीच्या घरी जाऊन तुडुंब जेवण हे अगदी ठरलेलंच असायचं. मी हैदराबाद सोडलं, तेव्हा जवळपास एक महिन्यांनंतर सर्व सहकाऱ्य़ांनी मला मुंबईला एक पत्र पाठविलं होतं. त्यामध्ये स्वातीनं लिहिलं होतं, ‘जाड्या तू मुंबईला गेल्यानंतर मी घरामध्ये रेशनच भरलेलं नाही.’ ते अगदी खरं होतं. त्या स्वातीच्या घरी जाऊन थोडंसं रेशन संपवून आलो. सोबतीला आमची नेहमीची लाडकी दिल्लीवाल्याची जिलेबी होतीच. ‘खाण तशी माती आणि आई तशी स्वाती’ ही म्हण तिच्या मुलीच्या बाबतही तंतोतंत खरी आहे. तिची मुलगी तिच्यापेक्षा बडबडी आहे इतकंच. अर्थातच, तिच्या इतकीच किंवा तिच्यापेक्षा हुश्शार.
शेवटच्या दिवशी भेटलो आमच्या काकांना. ई टीव्हीमध्ये असताना सुरुवातीला ज्या दोन-तीन जणांकडून बुलेटिन काढायला शिकलो त्यापैकी एक म्हणजे काका. उर्वरित दोघे म्हणजे आमचे मेघराज पाटील आणि नरेंद बंडवे उर्फ बंडू. हैदराबादमध्ये काकांबरोबर आमची भट्टी अगदी मस्त जमायची. बाहेर जेवायला वगैरे जायचं असो किंवा एखादा चित्रपट पहायचा असो. मी हैदराबाद सोडल्यानंतर काका आमच्या घरीच रहायचे. त्यांच्या वनस्थळीपुरममधील घरी जाऊन फक्कड चहा घेतला आणि आमची स्वारी निघाली सिकंदराबादला. हैदराबादला येऊन बिर्याणी खाल्ली नाही, तर पाप लागलं, असं कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय. पूर्वी आम्ही पिस्ता बिर्याणी किंवा शादाबमध्ये जाऊन आस्वाद घ्यायचो. पण काकांच्या आग्रहास्तव थेट पॅराडाईज गाठलं. नाव सार्थ ठरविणारी बिर्याणी. 

इतकं सॉफ्ट चिकन की विचारू नका. नुसत्या दोन चमच्यांच्या सहाय्यानं सहज तुटेल, अशी तंगडी किंवा पिसेस आणि दम भरलेली बिर्याणी हे पॅराडाईजचं वैशिष्ट्यं. गेल्यावेळी शादाबला गेलो होतो तेव्हा तिथंही बिर्याणीमधील एकदम लुसलुशीत चिकनचा आस्वाद घेतला होता. त्यापेक्षाही वरच्या दर्जाची बिर्याणी पॅराडाईजमध्ये खायला मिळाली. आजूबाजूच्या किंवा अलिकडच्या पलिकडच्या टेबलवर बिर्याणी सर्व्ह करायला लागले, की त्याचा स्वाद नाकात घुसलाच. इतका दम त्या बिर्याणीमध्ये ठासून भरलेला. मग आपल्या टेबलवर बिर्याणी सर्व्ह केल्यानंतर काय हालत होत असेल विचार करा. कधी एकदा तुटून पडतोय, असं होतं. सोबतीला रायता आणि शोरबा. खूप भूक असेल तर दोघांत एक बिर्याणी अगदी सहजपणे पुरते. (श्रावण ठरवून पाळत नसल्यामुळे चिकन बिर्याणी खाताना फारशा याताना झाल्या नाहीत.)

मनसोक्त बिर्याणी हाणल्यानंतर मग ‘खुब्बानी का मिठा’ खायलाचचचचच हवा. हैदराबाद असल्यामुळं असेल कदाचित, पण या पदार्थाचे नाव ‘कु्र्बानी का मिठा’ असे मला वाटायचे. कौमुदी काशीकरने योग्य नाव सांगितले होतेच. पण पॅराडाईजमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले. मस्त भिजविलेले जर्दाळू मध वगैरे गोष्टींमध्ये घालून तयार झालेला गोड पदार्थ म्हणजे ‘खुब्बानी का मिठा’. (मागे एका हॉटेलमध्ये भिजविलेले खजूर घालून आम्हाला चक्क फसविण्यात आल्याचे आमच्या उशीरा निदर्शनास आले होते.) हवे असल्यास ‘खुब्बानी का मिठा’वर आइस्क्रिम घालूनही सर्व्ह केले जाते. असा हा खास पदार्थ खाल्ल्याशिवाय हैदराबादची सफर संपूर्ण होत नाही, इतकेच ध्यानात ठेवणे इष्ट.

सिकंदराबादहून हैदराबादला येताना टँकबंड म्हणजेच हुसेनसागर तलाव पाहिला. शहराच्या मध्यवर्ती भागात इतका भव्यदिव्य तलाव हेच शहराचे वैशिष्ट्य आहे. तलावाच्या एका बाजूला हैदराबाद तर दुसरीकडे सिकंदराबाद. हुसेनसागरच्या एका बाजूला हैदराबादमधील कर्तृत्ववान मंडळींचे पुतळे उभारून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मात्र, तेलंगणाच्या आंदोलनात यातील काही पुतळे शहीद पडले असून तेलंगणाव्यतिरिक्तच्या उर्वरित आंध्रातील (रायलसीमा आणि किनारपट्टी) व्यक्तींचे पुतळे अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. काहींची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे विकृत लोकांची मानसिकता संपूर्ण देशभर एकच असल्याचे पुन्हा एकदा दिसून येते.

हैदराबादमध्ये गेल्यानंतर चारमिनार, मक्का मशीद आणि मोतीबाजार इथं चक्कर टाकली नाही, तर शहरातील वातावरणाचा फिलच येत नाही. शिवाय मी गेलो तेव्हा रमझान सुरु असल्यामुळं इथं जाण क्रमप्राप्तच होतं. शादाब हॉटेलपासून चारमिनारपर्यंत जाताना ईदचा मस्त माहोल अनुभवला आणि अखेरीस मक्का मशिदीपर्यंत पोहोचलो. आता जाऊन थोडीशी चक्कर मारल्यानंतर मोतीबाजारात फेरफटका मारला आणि थोडीफार खरेदी करून मग तिथून निघालो. कारण पुन्हा एकदा पुण्याकडे प्रयाण करायचे होते.

तीन दिवस असूनही कराची बेकरी, बिर्ला मंदिर, ज्वार रोटी (दाक्षिणात्य आणि मराठी भोजनाचा मिलाफ असलेले रेस्तराँ), अॅबिड्स, रामोजी फिल्म सिटीतील ई टीव्हीचे ऑफिस, लुम्बिनी गार्डन, गोकुळ चाट, गोवळकोंडा किल्ला आणि अशा अनेक ठिकाणी जाणे शक्यच झाले नाही. तरीही हैदराबादची ट्रीप संस्मरणीय ठरली आणि आठवणी जागविणारी ठरली.

(सौजन्यः आमचे बंधू योगेश चांदोरकर यांनी दिलसुखनगर भागातील गड्डीअन्नरम भागात प्राणिक हिलिंगच्या उपचारांसाठी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमुळे ट्रीप अधिक दिलासादायक ठरली.)

Friday, August 17, 2012

एक साली मख्खी....



इगा इगा इगा

एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है... नाना पाटेकरचा एक प्रचंड गाजलेला डायलॉग. त्या डायलॉगची आठवण करून देणारा एक अफलातून पिक्चर सध्या तेलुगूमध्ये धुमाकूळ घालतोय... त्याचं नाव इगा. इगा म्हणजे माशी.

नेहमीच्या कथानकापेक्षा हटके स्टोऱ्या घेऊन प्रेक्षकांपर्यंत जाणं ही दाक्षिणात्य चित्रपटांची खासियत. इगा चित्रपटांत त्याचा अगदी मस्त अनुभव येतो. अर्थात, तेलुगू पिक्चरची माहिती ब्लॉगवर देऊन फायदा काय, असा विचार मनात येऊ शकतो. पण लवकरच हा पिक्चर हिंदीमध्ये डब करण्यात येत असून हृतिक रोशन वगैरे मंडळींचा आवाज चित्रपटाला असणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वांनाच हा चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वास्तविक पाहता, तेलुगू समजत नसेल तरी चित्रपट अगदी व्यवस्थित समजतो. चित्रपट हे दृष्य माध्यम असल्यामुळे शब्दांविना अडत नाही. त्यामुळेच ई टीव्हीत काम करीत असताना जवळपास वीस ते पंचवीस तेलुगू चित्रपट पाहिले होते. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ चित्रपट पाहून पाहून समजायला लागतात. त्यामुळे भाषेचे प्राथमिक ज्ञानही हळूहलू वाढत जाते. तेव्हा सध्याचा तुफान गर्दी खेचणारा इगा पाहण्याची संधी मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा सोडली नाही. आमच्या दिलसुखनगर भागातच असलेल्या मेघा थिएटरवर अवघ्या चाळीस रुपयांमध्ये मस्त एसीत बसून चित्रपट पाहिला. स्वस्त तिकिटे आणि मस्त थिएटर हे हैदराबादचे किंवा एकूणच दाक्षिणात्य राज्यांचे वैशिष्ट्य.

नानी आणि त्याच्या घरासमोर राहणाऱ्या बिंदू नावाच्या एका मुलीची ही गोष्ट. नानी हा फटाक्यांची रोषणाई वगैरे करणारा एक होतकरू तरुण आणि ती एका शैक्षणिक एनजीओमध्ये काम करणारी कन्यका म्हणजे बिंदू. सुरुवातीच्या साधारण अर्ध्या तासात दोघांमध्ये प्रेम फुलत जातं. त्या दोघांमध्ये अपेक्षेप्रमाणे एक व्हिलन एन्ट्री मारतो. व्हिलनची भूमिका कन्नड अभिनेता सुदीपनं उत्तम वठवलीय. रग्गड श्रीमंत असलेला सुदीप पैशांच्या जोरावर बिंदूकडून प्रेमाची अपेक्षा करीत असतो. (चित्रपटातील व्हिलनचे प्रेम म्हणजे शरीरसंबंध हे ओघानं आलंच.)



असा हा सुदीप बिंदूवर मरणाऱ्या नानीचा खून करतो. ते सुद्धा बिंदू जेव्हा त्याच्या प्रेमाला होकार देणार असते अगदी तेव्हा. नानी मेल्यानंतर बिंदू आपलीच होणार, अशा थाटात सुदीप वावरत असतो. मात्र, नानी एका माशीच्या रुपाने पुनर्जन्म घेतो आणि बदला घेण्यासाठी सज्ज होतो. जसे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है..., एक मुंगी हत्तीला लोळवू शकते तसेच एक माशी व्हिलनला कशी नेस्तनाबूत करते, हे चित्रपटातून अगदी समर्थपणे दाखविण्यात आले आहे. अर्थातच, ऍनिमेशनच्या सहाय्याने.

माशी म्हणून तिला जन्मल्यानंतर येणाऱ्या अडचणी, व्हिलनचा मुकाबला करताना जाणविणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करून लढविलेल्या विविध क्लृप्त्या अशा एक से बढकर एक गोष्टींमुळे चित्रपट रंजक आणि पाहणेबल झाला आहे. आता इगा कोणकोणत्या क्लृप्त्या लढविते आणि कसे कसे व्हिलनला चरफडविते, हे वाचण्यापेक्षा पाहण्याचाच अनुभव अधिक भारी आहे. नानी म्हणजे सुदीपला मेटाकुटीस आणणारी माशी आहे, हे बिंदूला समजते का, एका छोट्याशा माशीला मारून टाकण्यासाठी सुदीप कसे कसे प्रयत्न करतो, त्यांना इगा कशी पुरून उरते, हे प्रत्येकाने अगदी जरुर जरुर पाहण्यासारखे आहे.

भारतातही इतके चांगल्या दर्जाचे ऍनिमेशन असलेले चित्रपट तयार होऊ शकतात, हे रोबोटने दाखवून दिले होते. आता इगानेही त्याच पंक्तीत जाऊन बसण्याची कामगिरी केली आहे. तेव्हा हिंदीमध्ये इगा येईल तेव्हा अगदी जरूर पहा. तो पर्यंत यू ट्यूबवरील गाण्यांवर आणि ट्रेलरवर समाधान माना...


Thursday, August 02, 2012

खोडसाळपणाच... पण कुणाचा?

असं म्हणतात, की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
अन् दोन-पाचशे मेल्याशिवाय पोलिसांना घटनेचं गांभीर्य कळत नाही...

पुण्यात झाले फक्त चार स्फोट,
अन् अवघा एक जण जखमी झाला,
तरीही मिडीयावाल्यांचा आरडाओरडा
आणि देशभर चर्चेला हुरूप आला...

...एसआयटी आणि एनआयएसह आणखी
पाच पन्नास संस्था पुण्यात थडकल्या,
तरी पण पोलिसांच्या प्रमुखाला चार स्फोट
म्हणजे खोडसाळपणा आणि बाता वाटल्या...

एखाद्या स्फोटानंतर कसं बोलावं, काय बोलावं
याचेही आता क्लासेस उघडावे लागतील,
आणि आर आर आबांच्या “हादसा”च्या कहाण्या
पोलिसांना समजावून द्याव्या लागतील...

अहो, माहिती येण्यापूर्वी प्लीज
वाट्टेल ते बडबडू नका,
माईक दिसला म्हणून
लोकांच्या जखमेवर मीठ चोळू नका...

स्फोट जरी किरकोळ असले तरी,
लोकांची चांगली चार हात फाटली,
लोकांच्या भावनांशी खेळताना
पोलिसांनो, तुम्हाला लाज नाही वाटली...

कदाचित रोजच्या स्फोटांमुळे
पोलिसांच्या मेल्या असतील संवेदना,
नि मृतांच्या आकड्यावरून
ठरत असतील अधिकाऱ्यांच्या भावना...

धागेदोरे सापडले आहेत, काही जण ताब्यात आले आहेत,
अशी वाक्यही नेहमीचीच असली तरी बरी वाटतात...
पण खोडसाळपणाच्या भाषा तुमच्याबद्दलच्या
उरल्यासुरल्या सन्मानाची वाट लावतात...

म्हणूनच असं म्हणतात, की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
अन् दोन-पाचशे मेल्याशिवाय पोलिस घटनेकडे गांभी्र्यानं पहात नाही...

Friday, June 15, 2012

मेकिंग ऑफ संत तुकाराम




चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ नावाचा चित्रपट पहायला जाणार असाल, तर पहिली आणि एकमेव अट म्हणजे, 1936 मध्ये निर्मिती होऊनही मराठी माणसाच्या मनात अगदी ताजा असलेला आणि विष्णुपंत पागनीस यांची भूमिका असलेल्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटाशी त्याची अजिबात तुलना करू नका. अन्यथा सध्याचा तुकाराम तुम्हाला कधीच आवडणार नाही. कारण या चित्रपटाची निर्मिती करण्यामागचा दृष्टीकोनच फार वेगळा आहे, असे माझे मत आहे.

अगदी चित्रपटाचे नाव ‘संत तुकाराम’ असे न ठेवता फक्त ‘तुकाराम’ ठेवण्यापासून या वेगळेपणाची सुरूवात होते. पूर्वी मेकिंग ऑफ महात्मा गांधी नावाचा चित्रपट आला होता. त्याच धर्तीवर हा मेकिंग ऑफ संत तुकाराम अशा स्वरुपाचा चित्रपट आहे. वडिलांची मस्त चाललेली सावकारी आणि बक्कळ पैसा-अडका असूनही तुकारामांना विरक्ती आली, हे सर्व पाश तोडून त्यांनी देवाचा धावा का केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘तुकाराम’मधून मिळतात. तसेच संत म्हणून असलेली तुकारामांची बरीच माहिती आपल्याला आहे. पण माणूस म्हणून ते कसे घडले, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, याची खूपच अल्प माहिती सर्वसामान्यांना आहे. वारकरी मंडळींना त्याबद्दल अधिक ज्ञान असू शकेल. पण सामान्य माणूस त्यापासून कोसो दूर आहे.

म्हणजे तुकाराम महाजारांचे वाण्याचे दुकान होते, त्यांची शेती होती, ही माहिती आहे. पण त्यांचे वडील मोठे सावकार होते, त्यांची सावकारी उत्तम चालली होती, तुकारामांनीही सुरूवातीला सावकारीत अगदी उत्तम जम बसविला होता, त्यांना दोन बायका होत्या, अशी बरीच माहिती चित्रपटातून मिळते. तुकारामांची आई-वडील, एक मोठा आणि एक छोटा भाऊ, वहिनी, पुतणे, आजूबाजूचे लोक यांच्याबद्दलच्या माहितीचे बरेच पदर चित्रपटातून हळूहळू उलगडत जातात. तोच चित्रपटाचा यूएसपी (युनिक सेलिंग प्रेपोझिशन) आहे.

संत तुकाराम चित्रपटात चमत्कार आणि तुकारामांचे संतपण मोठ्या विस्ताराने चर्चिले गेले आहे. त्यामुळे त्या चित्रपटात तुकारामांच्या वाटेला आलेली दुःख, यातना, कष्ट यांचे म्हणावे तितके दर्शन घडत नाही. उलट बुडालेली गाथा वर येते, छत्रपती शिवरायांची शत्रूपासून सुटका करताना शिवरायांची अनेक रुपे निर्माण होऊन झालेला चमत्कार, वैकुंठगमन असे चमत्कारच जास्त लक्षात राहतात. त्यांच्यातील माणसाचे दर्शन घडत नाही. कारण संत झाल्यानंतरच्याच गोष्टीत त्यात आहेत. तुकाराममध्ये मात्र, माणूस म्हणून तुकाराम कसे होते, हे पहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या वाटेला येणारी दुःख, यातना, वेदना, कष्ट, हालअपेष्टा हे सारे तुकारामांनाही सोसावे लागले होते आणि त्याचे यथार्थ चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

अत्यंत ऐश्वर्यसंपन्न घरातील असून आणि कुटुंब वत्सल असूनही त्यांनी प्रपंचाच्या मार्गावरून परमार्थाची वाट का धरली, हे पाहणे खूप रंजक आहे. महाजनाचं पोर, हरामखोर या लहानपणी एका मित्राने सुनाविलेल्या शब्दांचा सल त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतो. त्यामुळंच चांदीचं कडं नदीत फेकून देण्याची कृती त्यांच्याकडून घडली. शिवाय मोठ्या भावाच्या विरक्त वृत्तीचा परिणामही त्यांच्यावर कदाचित झाला असावा.

तराजू जरी आपल्या हातात असला, तरी तोलणारा तो आहे...

त्यांच्या वस्तू आपल्याकडे गहाण असल्यामुळे आपण श्रीमंत वाटत असलो, तरी खरं म्हणजे आपली पोटंच त्यांच्याकडे गहाण पडली आहेत...

हे तुकारामांचे थोरले बंधू सावजी यांच्या तोंडचे संवाद मनाचा ठाव घेतात. आपल्या आणि तुकारामांच्याही. त्यामुळेच सावकारी करतानाही त्यांच्या मनातील माणुसकी तसूभरही कमी झालेली नसते, हे सतत जाणवते. एकदा वसुलीसाठी गेलेले असताना, परतल्यावर वडिल गेल्याची बातमी त्यांना समजते. त्यानंतर मग ते आईला आणि मोठ्या वहिनीला गमावतात. असे संसाराचे एकेक पाश कमी होत असतानाच प्रचंड भीषण दुष्काळ पडतो.

दुष्काळ पडल्यानंतर त्यात पहिला बळी माणुसकीचा पडतो, या एका म्हाता-या गावक-याच्या तोंडातील वाक्याचा अर्थ तुकारामांना हळूहळू समजू लागतो. तेराव्याच्या जेवणालाही अत्यंत ताव मारून जेवणारे गावकरी, चोरून तेराव्याचे लाडू नव-यासाठी घरी नेणारी जवळचीच व्यक्ती, धान्याच्या राशी लोकांना खुल्या केल्यानंतर त्यावर जनावरांसारखी तुटून पडणारी माणसं, पोटात आग पडली असताना चटणी-भाकरीसाठी सोन्याच्या दागिन्यांची करावी लागलेली मोड, अशा सर्व गोष्टी तुकारामांना विरक्तीच्या वाटेवर नेतात. आपत्तीत कामास न येणारी संपत्ती काय कामाची... असे सांगून तुकाराम त्यांच्या मनातील व्यथा व्यक्त करतात. तेव्हापासून तुकाराम बोल्होबा आंबिले यांचा संत तुकाराम होण्यास प्रारंभ होतो. त्या भीषण दुष्काळाचा तुकारामांच्या संतपणापर्यंत पोहोचण्यात सिंहाचा वाटा आहे, असा निष्कर्ष आपण चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच काढू शकतो.



चित्रपटात आणखी एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. संसारात मन रमत नसताना किंवा फक्त देवाधर्माचीच आवड असताना लग्न केले, तर त्या कुटुंबाची कशी वाताहत होते, हा मुद्दाही चित्रपटात प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आला आहे. तुकारामांचे ज्येष्ठ बंधू सावजी यांची प्रथमपासूनच विठ्ठलावर भक्ती. सोन्या-चांदीत राहूनही त्यांचे मन त्यात रमेना. आई-वडिलांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना कधीच सावकारी जमली नाही. अशात त्यांचे लग्न होते. लग्नाच्या पहिल्या रात्री बायको शेजारी असूनही ईश्वराचे नामस्मरण करणे न सोडणारा माणूस संसारात अजिबात रमत नाही. फक्त नावापुरती लग्नाची बायको असलेल्या त्याच्या सहचरणीची व्यथा हेलावून टाकणारी आहे. प्रपंच करावा नेटका, असे संतांनी सांगून ठेवले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. त्यातील काम ही एक सहज भावना आहे आणि ती गरजही आहे. पण देवाधर्माच्या मार्गावर जाणाऱ्या अनेकांना त्याचा विसर पडतो आणि त्याची झळ त्यांच्या संसाराला कशी बसते, हे अगदी समर्पकपणे चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

शिवाय पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती होत नाही, म्हणून तुकाराम दुसरे लग्न करतात. तेव्हा तुकारामांची आई पहिल्या बायकोच्या त्यागाचे गोडवे गाते. तेव्हा तुकारामांच्या मोठ्या भावजयीने व्यक्त केलेली खंत हेलावून टाकते. नवऱ्याच्या संसारात न रमण्याच्या वृत्तीमुळे किती मोठा त्याग मी अनेक वर्षे करीत आली आहे, याचे तुम्हाला कधीच कौतुक वाटले नाही... ही तिची खंत अत्यंत योग्य आणि क्लेशदायक वाटते. म्हणजे तुकारामांना पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती होत नाही, म्हणून ते दुसरी बायको आणतात. पण नवऱ्यापासून कसलेच सुख मिळत नसतानाही त्यांच्या मोठ्या भावजयीला बोलायचीही सोय नाही. दुसरे लग्न वगैरे तर विचारही नाही. तुकारामांच्या मोठ्या भावाचा आणि भावजयीचा त्यांची आई गेल्यानंतरचा एक प्रसंग फारच बोलका आहे. त्यामुळे परमार्थाचा मार्ग धरताना प्रपंचातील जबाबदाऱ्या टाळल्या जाणार नाहीत, याची जबाबदारी संबंधिताने घ्यायला हवी. कदाचित या सर्व वेदना तुकारामांपर्यंत पोहोचल्या असल्यामुळेच त्यांनी परमार्थाचा मार्ग धरताना प्रपंचाकडे दुर्लक्ष केले नाही.

पत्नीचे निधन झाल्यामुळे तुकारामांचा मोठा भाऊ घर सोडून निघून जातो. प्रपंचातून बाहेर पडल्यावर तरी आपल्याला देव भेटेल, अशी भाबडी आशा त्याला असते. पुढे एका वारीत तुकारामांना त्यांचा मोठा भाऊ भेटतो. तेव्हा तुकाराम हे संतपदापर्यंत पोहोचलेले असतात. त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचलेली असते. घर सोडून मी वणवण हिंडलो, पण मला काही देव भेटला नाही. तू मात्र प्रपंचात राहूनही तुला देव भेटला... हा मोठ्या भावाच्या तोंडचा संवाद खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि वास्तववादी वाटतो. तेव्हा उगाच परमार्थाच्या मागे लागून फायदा नाही. सुखी संसार करूनही परमार्थ प्राप्ती होऊ शकते. एका पौराणिक कथेतील, घरच्या मंडळींना दूध देऊन तृप्त केल्यानंतर उरलेले वाटीभर दूध शिव मंदिरात ओतणाऱ्या माऊलीचे उदाहरण या बाबतीत चपखल वाटते. थोडक्यात म्हणजे, आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्वांच्या इच्छांची पूर्तता झाल्यावरच देव प्रसन्न होतो. अतृप्तीतून नाही. एखाद्या गोष्टीचा हव्यास करू नये, हे जितके खरे तितकेच आहे, त्या गोष्टीचा परमार्थासाठी उगाच त्यागही करू नये. कदाचित तुकारामांनाही हेच वाटत असावे. त्यामुळेच त्यांनी प्रपंच सोडला नाही.

बाकी चित्रपट उत्तम. संवाद, गाणी आणि संगीत फारच छान. गन्या, मन्या, तुका... संतू, दामा, पका... हे गाणे अत्यंत उत्तम आणि प्रभावी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या गण्याची चाल बदलण्याचा प्रयोग बऱ्यापैकी जमला असला तरीही ती चाल लक्षात रहात नाही. जितेंद्र जोशी याने वठविलेली तुकारामाची भूमिका अत्यंत प्रभावी वाटते. जितेंद्र तुकाराममय झाल्याचे त्यात वेळोवेळी जाणवते. चित्रपटात कोणताही चमत्कार नाही. तुकारामांची गाथा बुडविल्यानंतर ती वर येत नाही, तर पंचक्रोशीतील मंडळींची गाथा पाठच असते. मुखोद्गत असते. त्यातूनच तुकारामांची गाथा कायम राहते, ही पुलंनी मांडलेली थिअरी या चित्रपटात दाखविलेली आहे. (कदाचित पुलंच्या आधीही कोणीतरी ती मांडली असावी. मला माहिती नाही.) 

जसे ग्रंथांची पाने फाडल्यामुळे शब्द नष्ट होत नाहीत, धडे गाळल्यामुळे इतिहास बदलता येत नाही, पत्र फाडल्यामुळे भावना संपत नाहीत किंवा पुतळे हलविल्यामुळे त्या व्यक्तीचे इतिहासातील योगदान संपुष्टात येत नाही. तसेच गाथा बुडविल्याने तिचा प्रभाव किंवा कार्य संपत नाही. कदाचित हेच तुकारामांना दाखवून द्यायचे होते.

चित्रपटातील तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत प्रभावहीन वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या नटाला तर महाराजांचे व्यक्तिमत्त्व अजिबात साकारता आलेले नाही. शिवाय कुठल्या तरी किल्ल्याच्या बुरूजावर बसून छत्रपती शिवराय आणि तुकाराम यांच्यातील चर्चा तर अत्यंत पुस्तकी आणि छापील स्वरुपाची आहे. हा एक प्रसंग आणि इतर एक-दोन किरकोळ गोष्टी वगळल्या तर तुकाराम खूप छान जमला आहे.

पहिल्या आजारी पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे प्रेमळ तुकाराम, अवार्च्च भाषेत आरडाओरडा करणाऱ्या आवलीच्या चिडचिडीला सामोरे जाणारा टिपिकल नवरा असलेले तुकाराम,  भले देऊ गांडीची लंगोटी... असे रोखठोक बजाविणारे तुकाराम, धर्मपीठाला वेद, शास्त्र आणि उपनिषदांचे दाखले देणारे अभ्यासू तुकाराम, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अभंगांमध्ये किंवा ओव्यांमध्ये समावेश कर म्हणजे लोकांना त्या सहजपणे समजतील आणि अपिल होतील, असा उपदेश देणारे साधे आणि संतपणाचा कुठेही बडेजाव न मिरवणारे तुकाराम, अशी त्यांची अनेक रुपं आपल्याला चित्रपटातून पहायला मिळतात.

तुकारामांच्या काळातील ब्राह्मण मंडळींवर चित्रपटात आसूड ओढण्यात आले असले तरीही तुकाराम हे सर्वसमावेशक संत होते. त्यांच्या मनात कोणाच्याबद्दल राग किंवा द्वेष नव्हता. त्यामुळेच तुकारामांना एखाद्या जातीपुरते, समाजापुरते किंवा संप्रदायापुरते मर्यादित न ठेवता तुका आकाशाएवढा एवढी तरी किमान गोष्ट त्यांच्या पाठिराख्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कारण संत हे कोणत्याच विशिष्ट जाती, समुदाय, पंथ किंवा संप्रदायापुरते मर्यादित नसतात. माळी, कोळी, शिंपी, ब्राह्मण, तेली, महार, चांभार, एससी, एसटी, ओबीसी, मराठा अशा जातींमध्ये संत महात्मे आणि महापुरुषांना अडकवून ठेवणे म्हणजे हा त्यांच्या कार्याचाच अपमान आहे. हाच तुकारामांचा संदेश आहे. आणि तो सगळ्यांनीच ध्यानात ठेवला पाहिजे...

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय...



फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा संत तुकारामशी तुलना करू नका. अन्यथा पस्तावाल.

अधिक माहितीसाठी संपर्क - http://www.tukaramthefilm.com/

आमचे मित्र सचिन परब यांनीही याच विषयावर ब्लॉग लिहिला आहे... त्याची लिंक पुढीलप्रमाणे...
http://parabsachin.blogspot.in/

Sunday, June 10, 2012

मुक्काम पोस्ट हरिहरेश्वर

मस्त बंगला, स्वादिष्ट भोजन आणि स्वच्छ बीच

अनेक दिवसांपास्नं हरिहरेश्वरला जायचं होतं, अखेरीस मे महिन्यात तो योग आला. वास्तविक पाहता, आमच्या घरातील मंडळी अनेकदा हरिहरेश्वरला भेट देऊन आलेली आहेत. मात्र, मला कधीच जायला जमलं नव्हतं. माणगांवपर्यंत आम्ही गेलो होतो. पण हरिहरेश्वर राहिलंच होतं. त्यामुळं हरिहरेश्वरबद्दल ऐकलेलं बरंच प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी आतूर झालो होतो.

माणगांवला गेलो होतो, तेव्हा मी आणि माझा मित्र योगेश ब्रह्मे आम्ही बाईकवर गेलो होतो. त्यामुळं ताम्हिणी घाट वगैरे याबद्दल माहिती होतीच. पण त्यालाही आता बरीच वर्ष उलटल्यामुळं पुन्हा एकदा तो निसर्ग डोळ्यात साठवून घ्यायचा होता. यंदा ‘हम पाँच’ सॅन्ट्रोतनं निघालो. मी, चुलत भाऊ सपत्नीक आणि दोन बहिणी. ताम्हिणी घाटातील जंगल आणि घनदाट हिरवाई कधी एकदा पाहतोय, असं झालं होतं. मुळशी धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेनं जात होतो. मुळशी किती मोठं आहे आणि किती आटलं आहे, हे प्रथमच पहायला मिळत होतं. पाहता पाहता ताम्हिणी घाटात कधी पोहोचलो कळलंच नाही. पण रस्ता एकदम बकवास. म्हणजे प्रत्येक शंभर मीटरला रस्त्याची अवस्था बदललेली. कधी गुळगुळीत तर कधी एकदम खड्डेमय. त्यामुळं गाडी चालविणं, हा भलताच मनस्ताप होऊन बसला होता. कदाचित टोल भरा नाहीतर असेच भिक्कारडे रस्ते सहन करा, असा संदेशच महाराष्ट्र सरकारला द्यायचा असेल.


ताम्हिणी घाटातील वळणं वळणं, हेअर पिन टर्न्स, भरदुपारी संध्याकाळचं वातावरण वाटावं अशी घनदाट जंगल आणि माथ्यावर पोहोचता क्षणी होणारं कोकणाचं दर्शन सर्व काही भन्नाट. पुणे जिल्ह्याची हद्द संपली आणि रायगड जिल्ह्याची हद्द लागली. तेव्हा रस्ता खूपच गुळगुळीत आणि मस्त असल्याचं जाणवलं. (पालकमंत्री अजित पवार याकडे लक्ष देतील का) घाट उतरायला फारसा वेळ लागला नाही. मग निजामपूर आणि माणगांव मागे टाकून हरिहरेश्वरच्या रस्त्याला लागलो. तरी तिथून ५०-६० किलोमीटर अंतर होतं. पण थोडाफार भाग वगळता सर्व रस्ता वळणावळणांचा असल्यामुळं अंतर कापायला वेळ लागत होता. परत रस्त्याची साथ होतीच असं नाही. खड्ड्यांनी तर वैताग आणला होता. मला सांगा पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते इतके भंगार, मग कोणते पर्यटक बाहेरून महाराष्ट्रात येणार...

असो. कोकणच्या हिरवाईनं मात्र, सरकारच्या निलाजरेपणाला आणि उदासीनतेला कधीच पराभूत केलं होतं. त्यामुळंच खडबडीत रस्त्यांपेक्षाही हिरवकंच कोकणच आम्हाला अधिक लक्षात राहिलं. कोकण म्हणजे काय याचा सुखद अनुभव हरिहरेश्वरच्या रस्त्यावर लागल्यानंतर येऊ लागला. फक्त खंडाळ्याच्याच नव्हे तर कोकणातील प्रत्येक घाटासाठीच या ओळी अगदी शंभर टक्के लागू आहेत.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट,
सांगवो चेडवा दिसता कसो, खंडाळ्याचो घाट


मजल दरमजल करीत हरिहरेश्वरला पोहोचलो. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांचे मामे बंधू यशोधन जोशी यांनी हरिहरेश्वरजवळील मारळ या गावी मस्त दुमजली बंगला बांधला आहे. आठ-दहा गुंठ्यांचा परिसर. त्यापैकी साधारण तीन गुठ्यांवर बांधकाम. खास चिपळूणहून आणलेल्या लाल चिऱ्यांपासून बांधलेला बंगला. बाहेरुन दिसायला अगदी कोकणातील घरासारखा. पण आतून अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असतील अशा सोयी-सुविधा. दोन बेडरुम, एक हॉल आणि स्वयंपाकघर. अगदी बारीकसारीक विचार केल्याचं बंगल्यात शिरल्यानंतर ठायीठायी दिसतं. बंगल्याच्या मागील बाजूस मस्त बाग. चिक्कू, आंबा, केळी, अननस, करवंद, जांभळ वगैरे सगळा कोकणातील मेवा तिथं पहायला मिळतो. बागेच्या मध्यभागी एक झोपडी बांधलेली. त्यामुळं रात्री शेकोटी करायला किंवा बार्बेक्यू लावून मस्त कबाब वगैरे खायला अगदी उपयुक्त.

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क...

http://wikimapia.org/11324238/Joshiwadi-Maral-Yashodhan-Suchitra-Joshi-s-beach-house


अर्थात, आम्ही जेवण तयार करण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही. आम्ही मस्त फ्रेश होऊन. मोहन कुटुंबे यांच्याकडे उदरभरणासाठी गेलो. कुटुंबे यांच्याकडे गेलो आणि अगदी तृप्त झालो. अगदी घरी जेवल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर झळकत होता. घडीच्या पोळया, आमटी-भात, भेंडीची परतून भाजी, मटकीची उसळ, पापड आणि ताक असा अगदी साग्रसंगीत मेन्यू कुटुंबेंनी तयार ठेवला होता. सकाळपासून गाडी चालविल्यामुळं मजबूत भूक लागली होती. त्यामुळं तुडुंब जेवलो आणि मगच पानावरुन उठलो. जेवण झाल्यानंतर कुटुंबे काकांनी उकडीचे मोदक आणि साजूक तूप यांनी भरलेलं ताट आमच्यासमोर आणलं. बोट लावेपर्यंत जेवल्यानंतरही उकडीचे मोदक पाहून कोणालाच राहवलं नाही आणि प्रत्येकानं साधारण दोन-दोन मोदक हाणलेच. त्यामुलं हरिहरेश्वरला गेलात, तर मोहन कुटुंबे यांच्याकडेच जेवा आणि यशोधन जोशी यांच्या बंगल्यातच रहा. तृप्त मनानं आणि भरल्या पोटानं मग बंगल्या मागं असलेल्या मोकळ्या जागेत मस्त गप्पांचा फड रंगला. सोबतीला होती फक्त शांतता आणि सागराची गाज. (लाटांचा येणारा आवाज)



दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि पुन्हा एकदा कुटुंबे यांच्याकडे थडकलो नाश्त्यासाठी. आधीच सांगितल्यानुसार काकूंनी मस्त आंबोळीचा बेत केला होता. तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, नावापुरते गहू, मेथी आणि एक-दोन जिन्नस एकत्र दळून आंबोळीचं पिठ तयार होतं. मग ते रात्री किंवा सकाळी भिजवायचं आणि आंबोळ्या करायच्या. आंबोळी म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर घावन. सोबतीला कच्च्या करवंदांची वा खोबऱ्याची चटणी. दोन्हीतील समानता एकच म्हणजे लसणाचं प्रमाण खूपच अधिक. मागं पालीला गेलो होतो, तेव्हा विलास चांदोरकर यांच्या घरी आंबोळी आणि कच्च्या करवंदांच्या चटणीचा योग जुळून आला होता. किमान चार आंबोळ्या तरी नक्की खाल्ल्या जातात. बाकी मग तुमच्या तब्येतीनुसार.



सकाळचा भरपेट नाश्ता केल्यानंतर मग समुद्रावर गेलो. हरिहरेश्वरच्या मंदिरामागचा आणि बाजूचा किनारा धोकादायक असला तरी मारळचा समुद्र स्वच्छ, निर्मनुष्य आणि शांत आहे. त्यामुळं तो मला अधिक आवडला. नाहीतर उगाचच पुण्यासारखी गर्दी समुद्र किनाऱ्यावर असेल तर मग मजा येत नाही. साधारण दोन-अडीच तास डुंबलो. आधी पाण्यात फार जाण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला रोखू शकलो नाही. मग अडीच तास वगैरे सागरीस्नान झालं. एव्हाना सूर्य डोक्यावरून पुढं सरकायला लागला होता आणि वाळू भट्टीसारखी तापली होती. त्यामुळं अधिक वेळ न दवडता तिथून निघालो आणि बंगल्यावर येऊन पुन्हा फ्रेश झालो. चालत अवघ्या चार मिनिटांवर जोश्यांचा बंगला आहे.

नंतर दुपारचं जेवणाची वेळ झाली. पुन्हा कुटुंबे यांच्याकडे न जाता मासे खाण्यासाठी प्रधान यांच्या घरी पोहोचलो. पण त्यांच्याकडे मासे नव्हते आणि कोकणात जाऊन चिकन खाण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मग हरिहरेश्वर मंदिराच्या मार्गावर असलेल्या कुठल्याशा हॉटेलात मासे खाल्ले. मासे चांगले होते, पण पुण्याचा रेट त्यानं लावला होता. त्यामुळं कोकणात मासे खाल्ल्यासारखं वाटलंच नाही. शिवाय जास्त व्हरायटीही नव्हती. अखेरीस सुरमईवर समाधान मानून मस्त्याहार केला.





पोटोबा झाल्यानंतर मग विठोबा. हरिहरेश्वर मंदिरात गेलो. पारंपरिक पद्धतीनं दर्शन वगैरे झालं. म्हणजे काळभैरव, हरिहरेश्वर आणि आणखी एक-दोन देव. त्यानंतर मग प्रदक्षिणेसाठी निघालो. प्रदक्षिणेच्या मार्गावर असलेल्या घळीतून दिसणारा समुद्र म्हणजे वेडच लागायचं राहिलं होतं. निसर्गासारखा दुसरा कोणताही कलाकार असूच शकत नाही, हे पाहण्यासाठी तरी हरिहरेश्वरला जायला हवं. सागरापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद खिंडीतून असलेल्या पायऱ्या आणि सागराच्या लाटांमुळे तयार झालेली दगडांवरील नक्षी पाहून तिथं आल्याचं सार्थक झालं.







दगडांवर आदळणाऱ्या सागराच्या लाटा पाहूनच हृदयात धडकी भरेल, अशी परिस्थिती. मग समुद्र खवळल्यावर काय होत असेल, याचा विचारच केलेला बरा. आता अशा समुद्राच्या नादाला काही अतिउत्साही, आगाव आणि मूर्ख लोक का लागतात, या प्रश्नाचं उत्तर कधीच न मिळणारं आहे. सागराच्या वाटेला गेलेले लोक बुडून मेल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात. पण इतका भयंकर समुद्र असूनही लोकं मृत्यूच्या तोंडात का शिरतात, हे त्यांचं त्यांनाच ठावूक.



हरिहरेश्वरला प्रदक्षिणा मारल्यानंतर मग पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि निघालो पुण्याच्या दिशेनं. साधारण पाचच्या सुमारास निघालो. येतानाच रस्ता पाठ झाला होता. त्यामुळं जाताना चुकाचुकी आणि इतर भानगडी झाल्या नाहीत. पण वळणावळणाचा रस्ता असल्यामुळं कमी अंतर असूनही तुलनेनं जास्त वेळ लागत होता. माणगांवला चहासाठी थांबून मग रात्रीच्या किर्र अंधारात ताम्हिणीतून निघालो. एखादा तरी प्राणी वगैरे दिसेल, अशी आशा होती. पण काहीच दिसलं नाही. तुलनेनं वाहनांची वर्दळ जास्त होती. खड्ड्यांमधील रस्त्यांमुळे नुसती चीड नाही, तर वैताग, फ्रस्ट्रेशन सर्व काही आलं होतं. अखेर मजल दरमजल करीत रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यात पोहोचलो.

हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा, प्रदक्षिणा मार्ग, यशोधन जोशी यांचा बंगला आणि मोहन कुटुंबे यांचे जेवण या गोष्टी मनात अगदी घर करून राहिल्या आहेत. हीच आमच्या ट्रीपची फलनिष्पत्ती होती. निदान माझ्यासाठी तरी...