Showing posts with label Mumbai. Show all posts
Showing posts with label Mumbai. Show all posts

Friday, November 23, 2012

बाळासाहेब… देशातील महाराष्ट्राची ओळख



 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटी इथंगेलो होतो. २००७ मध्ये. त्यावेळी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय असलेले पोलॉक महंत नावाचे एक गृहस्थ भेटले होते. वय साधारण चाळीस असेल. ते तिथल्या ट्रान्सपोर्ट कमिटीचे अध्यक्ष होते. मी महाराष्ट्रातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी विचारलेला पहिलाच प्रश्न मला बुचकळ्यात टाकणारा होता. ‘अरे, आपके बालासाहब कैसे है…’ मला प्रश्न पडला, की याला लेकाला बाळासाहेबांची एकदम आठवण येण्याचे कारण काय. तेव्हा त्यानं सांगितलेला किस्सा एकदम अफलातून होता.
महंत हे तिसरी चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेले होते. त्यावेळी दादरजवळ गर्दीमध्ये ते हरविले. लहान असल्यामुळे त्यांना तसे काहीच कळत नव्हते आणि घरचे सोबत नाही, म्हटल्यावर त्यांना रडू कोसळले. तेव्हा ही गोष्टी शिवसैनिकांनी पाहिली. त्यांनी महंत यांना एका शिवसैनिकाच्या घरी नेले. तिथे त्यांची विचारपूस केली. का रडत आहे किंवा कुठून आले वगैरे. नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये महंत हे त्यांच्या आई-वडिलांच्या जवळ होते.
‘ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. त्यामुळेच माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबध आहे. त्यामुळेच मी विचारले, बाळासाहेब कसे आहेत?’ असे महंत यांनी सांगितल्यानंतर थोडासा धक्काच बसला.

दुसरा अनुभव आला पुदुच्चेरीमध्ये. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा पुदुच्चेरीलाही गेलो होतो. तिथे रस्त्यावरून फिरत असताना एल गणपती नावाचे एक अॅडव्होकेट भेटले. साधारण पन्नाशीकडे झुकलेले. बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि काँग्रेसला ठणकावून सांगणारे नेते म्हणून गणपती यांना बाळासाहेब आवडायचे. बाळासाहेबांनी आवाज दिला, की पाकिस्तानमध्येही त्याची दखल घेतली जाते इतकी त्यांची दहशत आहे, वगैरे भरभरून बोलत होते. जे पटत नाही, त्याविरोधात आवाज देण्याचा बाळासाहेबांचा गुण गणपती यांना विशेष भावत होता.
पुदुच्चेरीचे तेव्हाचे माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कसा त्रास दिला किंवा सोनिया गांधी यांनीही कट्टर कार्यकर्त्याकडे कसे दुर्लक्ष केले, यावर गणपती भरभरून बोलत होते. काँग्रेसमध्ये सगळे असेच लोक आहेत. त्यांना वठणीवर आणणारा एखादा नेता आम्हालाही हवा आहे. कदाचित बाळासाहेबच हे काम करू शकतील. म्हणूनच शिवसेनेची शाखा पुदुच्चेरीमध्ये उघडायला हवी, अशी गणपती यांची मागणी होती.
 
यासह इतर विषयांवरही गप्पा झाल्या आणि मग मी त्यांचा निरोप घेतला. अर्थात, बाळासाहेबांच्या राज्यातून आलेल्या माणसाला भेटलो आणि त्याच्याशी भेटलो याचेच कदाचित त्यांना समाधान होते. आशिष चांदोरकर भेटल्याचे कमी. 


 
महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. अगदी आंडू, पांडू आणि झंडू नेत्यांपासून ते राष्ट्रीत नेते म्हणून मिरविणा-यापर्यंत अनेक नेत्यांची रांगच आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर त्यापैकी एकाही नेत्याची ओळख महाराष्ट्राचा नेता म्हणून नाही. कोणतेही पद किंवा सत्ता न उपभोगलेल्या बाळासाहेबांना हे भाग्य कसे लाभले, हाच विचार माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. बाळासाहेब गेल्यानंतर तोच विचार अधिक प्रकर्षानं जाणवायला लागला. मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्यानंतर चाहत्यांचा उसळलेला अतिमहाप्रचंड जनसागर पाहिला आणि तेव्हापासून तोच विचार मनात घोळतोय.

राजकारणात असलेल्या एखाद्या माणसावर इतकं निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम करणारे इतके चाहते असू शकतात, ही गोष्टच आश्चर्यकारक वाटते. म्हणजे दक्षिणेत एन. टी. रामाराव किंवा एम. जी. रामचंद्रन या कलाकारांना जी लोकप्रियता लाभली, त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकप्रिय बाळासाहेब आहेत, याचं यथार्थ दर्शन रविवारी घडलं. महासागर लोटला म्हणजे काय, याचा अर्थ माझ्या आणि नंतरच्या मंडळींना त्यादिवशीच ख-या अर्थाने कळला.

विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यातील शेतक-यापासून ते मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या एखाद्या गर्भश्रीमंत धनाढ्यापर्यंत, अमिताभ बच्चन-अनिल अंबानी यांच्यापासून ते एखाद्या तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत आणि गांधी टोपीवाल्या म्हाता-या माणसापासून ते थ्री फोर्थ घातलेल्या तरुण ललनांपर्यंत सर्वांचीच या जनसागरात उपस्थिती होती. त्यापैकी बाळासाहेबांचे थेट उपकार असलेले राजकारणी, त्यांच्या सान्निध्यात आलेले विविध क्षेत्रातील महनीय आणि सामान्य शिवसैनिक सोडले तर बाकीचे लोक कोण होते… बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारे निस्वार्थी चाहते होते. आपलं जवळचं कोणीतरी गेलं आहे आणि त्याचं अंत्यदर्शन घेतल्याशिवाय चैन पडणार नाही, अशाच भावनेने मुंबईत महासागर लोटला होता.

तुमच्या आमच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब होते. आपल्या अन्याय-अत्याचाराविरूद्ध असलेली चीड, एखाद्या घटनेबद्दलचा रोष ते आपल्या शब्दांतच व्यक्त करायचे. भडव्यांनोपासून ते यडझव्यापर्यंत बोलीभाषेतील अनेक शिव्या ते अगदी सहजपणे भाषणांमधून देत. पण त्यातून त्यांचा राग व्यक्त होत असे. उगाच भाषणांत रंगत आणायची म्हणून किंवा स्टाईल जपायची म्हणून त्या नसायच्या. उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा झालेल्या भाषणात त्यांनी तेव्हाचे मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकेल लिंगडोह यांचा ‘कोण रे तो डोहात लिंग बुडवून बसलेला…’ असा उल्लेख पोट धरून हसायला लावणारा होता. बाळासाहेब असेच बिनधास्त होते, बेधडक होते आणि जसे होते तसेच होते. आतून एक आणि भाषणात एक अशी भानगड नव्हती. लोकांसमोर होते. म्हणूनच ते लोकप्रिय झाले. 


व्यंगचित्रकार म्हणून ते महान होते, उत्तम पत्रकार होते, राजकारणात राहून पदाचा मोह त्यांना झाला नाही, कर्तृत्व, नेतृत्व आणि वर्क्तृत्व यामध्ये अजोड होते आणि बरेच काही होते. पण त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायचा तो त्यांच्या मोकळेढाकळेपणामुळे. इतका मोठा नेता असूनही आपल्यासारखेच बोलतो, वागतो यामुळे. बोललेला शब्द फिरवित नाही म्हणून. संघ परिवाराने जबाबदारी टाळल्यानंतरही ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे अगदी बिनधास्तपणे जाहीर करतो म्हणून. हिंदुत्त्ववादी म्हणून मिरवणा-यांनी पाठ फिरविल्यानंतरही ‘साध्वी प्रज्ञासिंहला सर्व कायदेशीर मदत करण्यासाठी शिवसेना तयार आहे,’ असे सांगणा-या संघटनेचे प्रमुख होते म्हणून. पाकड्यांना खेळू देणार नाही म्हणजे नाही, हा शब्द शेवटपर्यंत पाळला म्हणून. मुंबईत शिवतीर्थावर जो अथांग जनसागर उसळला तो यामुळेच. एखादा राजकारणी आपल्याला सोडून गेला म्हणून लोक आनंद व्यक्त करतात. पण इथे लाखोंच्या डोळ्यात अश्रू होते. हीच बाळासाहेबांची श्रीमंती होती. पुण्याई होती. 

बाळासाहेब गेले, हे मानायला मन तयार नाही. अजूनही असं वाटतं, की कधीतरी लुंगीपुचाट चिदंबरम यांना बाळासाहेब ‘सामना’तून दम भरतील. ‘शिवसेनाप्रमुखांच्या इशा-यामुळे पाकिस्तानची हातभर फाटली’ असं शीर्षक पुन्हा एकदा ‘सामना’मध्ये वाचायला मिळेल. छोट्या-मोठ्या कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत कोणतरी आज मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, असा फोटो पहायला मिळेल. शिवसेनाप्रमुखांची आज अमक्या अमक्या वाहिनीवर मुलाखत, अशी जाहिरात पहायला मिळेल. साहेबांची संजय राऊत साहेबांनी घेतलेली मॅरेथॉन मुलाखत तीन-चार महिन्यांनी वाचायला मिळेल. ‘सामना’तून साहेबांच्या शुभेच्छा किंवा एखादं निवेदन वाचायला मिळेल. पण… आता यापैकी काहीच घडणार नाही.

Wednesday, October 27, 2010

खा खा खादाडी भाग २

दादर-परळमदली काही राहिलेली ठिकाणं आणि पूर्वी साम मराठीमध्ये काम करत असताना बेलापूरमध्ये काही ठिकाणी चाखलेली वेगवेगळ्या पदार्थांची तोंडओळख इथं करुन देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक गोष्ट चांगली चविष्ट असतेच असं नाही आणि प्रत्येक पदार्थ आपण खातोच असंही नाही. पण जेजे उत्तम चविष्ट सुंदर तेते देण्याचा हा प्रयत्न...



मराठमोळी मिसळ...

मराठमोळ्या वरळीमध्ये अस्सल मराठमोळी मिसळ खाण्याचा योग साम मराठीचा जुना सहकारी पराग खरात याच्यामुळे आला. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो म्हणाला तुम्ही वैशालीची मिसळ खाल्ली की नाही. एक नंबर मिसळ आणि झणझणीत रस्सा. मग निवांत वेळ काढून वैशालीत पोचलो. नुसती मिसळच नाही तर दही मिसळ, वडा, भजी या मराठी पदार्थांप्रमाणेच विविध गुजराती आयटम्स (खाण्याचे), फरसाण आणि सरते शेवटी फक्कड चहा असं सर्व काही मिळणारं हे मस्त रेस्तराँ म्हणजे वैशाली.

मिसळ खाण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे आम्ही मिसळच घेतली. फक्त फरसाण आणि त्यावर वाटाण्याची उसळ ही मुंबईतली मिसळची व्याख्या असल्यामुळे इथं फारसं वेगळं दृष्य नव्हतं. तरीही फरसाणच्या जाड-बारीक शेव, नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा असं वैविध्य होतं. पण रस्सा मात्र, इतरांच्या तुलनेत जरा हटके होता. थोडासा मालवणी स्टाईलचा किंवा नाशिकच्या काळ्या तिखटाच्या मिसळीच्या जवळ जाईल असा. जाळ निघेल असा झणझणीत नसला तरी घाम आला. त्यामुळं येणं फुकट गेलं, असं वाटलं नाही. शिवाय जांबोरी मैदानावरुन जाताना मंचेकर वडापाव आणि त्याच्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या (साई की तत्सम काहीतरी) वडापावच्या आठवणी ताज्या झाल्या.



म्हैसूर मसाला...

दादरला परळ एसटी डेपोकडून पोर्तुगीज चौकाकडे जायला लागलं की दुस-या चौकात संध्याकाळी डोशाची एक गाडी लागते. सैतान चौकीच्या इथला चौक हे मला माहिती असलेलं नाव. इथं डोसा-उत्तप्पाचे काही प्रकार मिळतात. त्यापैकी म्हैसूर मसाला डोसा अप्रतिम. साध्या डोशावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा-टोमॅटो, किसलेले बिट, थोडी खोब-याची चटणी असा स्मॅश केलेला रगडा. एकदम स्वादिष्ट म्हैसूर डोसा तयार. सोबत सांबार आणि चटणी. त्यातही सांबार नसले तरी चालू शकेल, असा पद्धतीचे. पण ती उणिव चटणी भरुन काढते. त्यामुळे दिलखुश्श. इतर ठिकाणी साधा किंवा मसाला डोसा बारा रुपयांना असला तरी इथं मात्र, म्हैसूर मसाला डोसा अवघ्या बारा रुपयांना मिळतो.

शिवाय फुकटचा टाईमपास म्हणजे शिवसेना की मनसे की नारायण राणे यावर चौकातल्या तज्ज्ञांची चर्चा कानावर पडतेच. सातनंतर गेलात तर नक्कीच.



टीटीचा शिववडा...
दादर टीटीच्या (पूर्व) जवळ अशोक नावाचं हॉटेल आहे. तिथून पुढे स्वामीनारायण मंदिराकडे जायला लागलं की, कॉर्नरलाच शिववड्याची एक गाडी दिसेल. थोडी आतल्या बाजूला आहे. आतापर्यंत मी जे काही पाच-सहा ठिकाणचे शिववडा पाव आवर्जून खाल्ले त्यापैकी द बेस्ट शिववडा इथलाच. बाकीच्या ठिकाणांबद्दल न लिहिलेलंच बरं. पण इथला वडा मस्त गरमागरम असतो. पावही मऊ आणि चटणीही झणझणीत. त्यामुळे वडापावची दुसरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसविणारच नाही.



बेलापूर गावातली मिसळ...

बेलापूर गावात मी जिथं राहतो (किंवा रहायचो) तिथं तळ्याशेजारी (राम मंदिराजवळ) मिळणारी मिसळ नवी मुंबई आणि मुंबईतील मला सर्वाधिक आवडलेली मिसळ आहे. एकदम छोटं झोपडीवजा टपरी. तीन बाकडी. त्यावर जेमतेम सात-आठ लोकं बसतील इतकीच जागा. पण चवीला बाप. रस्सा आणि तर्री पाहूनच पोट भरतं. फक्त फरसाण असलं तरी रस्सा बाकीची जबाबदारी पार पाडतो. कधीकधी गरमागरम रस्सा-वडाही भाव खाऊन जातो. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणही तिथं मिळतं. पण मी काही जेवलेलो नाही. पण मिसळ मात्र, एक नंबर.



स्टेशनजवळची पाणीपुरी...

साम मराठीमध्ये असताना या पाणीपुरीवाल्याची दोस्ती झाली होती. स्टेशनकडून आल्यानंतर बाहेर पडताना उजवीकडे हा पाणीपुरीवाला असतो. संध्याकाळी साधारण सहानंतर. पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर पित रहावं असं वाटतं. (दुस-या दिवशीचा विचार करुन जास्त पिणं होत नाही, हा भाग अलहिदा) गरमागरम रगडा आणि फक्त तिखट पाणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त. खजूराचं गोड पाणी नाही घेतलं तरी चालेलसं. साममध्ये असताना आठवड्यातून सहावेळा तरी जाणं व्हायचं. त्या परिसरता किमान पाच ते सहा ठिकाणी पाणीपुरी मिळते. महागड्या हॉटेलांमधूनही मिळते. पण इथली चव त्याला नाही.



स्टेशनवरचा सामोसा...

बेलापूर स्टेशनवर जर तुम्ही बेलापूरहून सुटणारी गाडी पकडली तर ए गरम सामोसे... असं ओरडत एक मनुष्य चढतो. क्वचित कधीतरी हा योग जुळून आला तर त्याच्या कडचे सामोसे नक्की खा. दहा रुपयांत दोन सामोसे मिळतात. चवीला एकदम उत्तम असतात. शिवाय एकदम गरम. चटणी नसली तरी ते कोरडे वाटत नाहीत, हे विशेष. पाहता पाहता सामोसे कधी संपतात ते कळतही नाही.

बसस्टँडचा वडा...
बेलापूर बस डेपोच्या आवारातच एक छोटं दुकान आहे. तिथं स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे मिळतात. तिथं सक्काळी सक्काळी गरमागरम बटाटे वडा मिळतो. पुण्यात जसा रौनक जवळ वडे, सामोसे, पॅटिससाठी गर्दी असते. तशीच गर्दी सक्काळी सक्काळी इथं वडा खाण्यासाठी असते. मुख्य म्हणजे फक्त वडा (पाव नाही) खाणा-यांचं प्रमाण अधिक. चटणी आणि वडा हे समीकरण इतकं फिट्ट आहे की बस्स. पण वड्यानंतर चहा मात्र, पिऊ नका. नाहीतर सगळी गंमत निघून जाईल.



सरतेशेवटी पान...
बेलापूरला पाम बीच रोडला अश्विथ नावाचं एक मध्यमवर्गीयांना परवडेल, असं चांगलं हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानाची टपरी आहे. लकलकीत पितळी भांड्यांच्या साक्षीनं तो पानं लावत असतो. त्याच्याकडे मसाला पानापासून ते १२०-३०० पर्यंत कोणतेही पान खा दिलखूष झालंच म्हणून समजा. तुम्ही त्याच्याकडे वारंवार येताय म्हटल्यावर साधा फुलचंद, रिमझिमवाला फुलचंद, डबल किवाम, हरीपत्ती सल्ली सुपारी, कात-चुना-किवाम लवंग जला के... असं काहीही भन्नाट कॉम्बिनेशन असलं तरी ते त्याच्या लक्षात असायचं. आपण गेल्यानंतर आपण काहीही न सांगता आपल्याला हवं असलेलं पान आपल्यासमोर ठेवेल तो खरा पानवाला, या पुलंच्या व्याख्येत हा पानवाला १०० टक्के बसणारा. कधी जर गेलात तर नक्की रसास्वाद घ्या.

Saturday, October 23, 2010

दादर-परळमधील खादाडी...

बेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच नामांकित हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये पूर्वी अनेकदा गेलेलो आहे. पण गेल्या वर्षभरात खादाडीचे अनेक नवे अड्डे सापडले. त्यातील बरेच अड्डे हे रस्त्यावरचे आहेत. पण अशा अड्ड्यांवरच चांगलं आणि चविष्ट खायला मिळतं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ते खात गेलो आणि एन्जॉय करत गेलो.



शिरा-पोहे...
परळ स्टेशनकडून सामना कार्यालयाकडे जात असताना परळ एसटी डेपोच्या चौकात कोप-यावर (मुंबईच्या भाषेत नाक्यावर) एक शिरा-पोह्याचा स्टॉल असतो. अर्थात, पहाटे पावणे चार ते सकाळी आठ-नऊ या कालावधीत. सक्काळी सक्काळी स्वादिष्ट पोहे आणि मस्त शिरा इथं मिळतो. अवघ्या सात रुपयांत. शिरा-पोहे असं कॉम्बिनेशनही मिळतं. तेवढ्याच किंमतीत. पोहे जास्त तेलकट नसतात आणि शिरा चवीला जरा जास्त गोड असतो, त्यामुळं मला ते आवडतात. (शिवाय सामनातून सकाळी पुण्याला निघताना पोटाला आधार मिळतो, हा भाग दुसरा.)
सोबतीला शेजारीच गरमागरम कडक चहाही आहे. तो पण स्पेशल चहाच्या तोडीस तोड.


उपवासाची पुरी-भाजी...
जिथे सकाळी शिरा-पोहे मिळतात त्याच्याच डायगोनली ऑपोझिट प्रकाश नावाचं एक छोटेखानी दुकान आहे. दादरमध्ये प्रकाश नावाचं एक खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. ते निराळं. हे वेगळं. हे हॉटेल मुंबईत आहे, असं आत गेल्यावर जराही वाटत नाही. आत शिरतानाच ठेवलेली दुधाची कढई. आत विविध प्रकारच्या पाट्या. इथे सर्व प्रकारच्या नागरिकांना मुक्त प्रवेश आहे वगैरे वगैरे. या पाट्या आता फारशा दिसत नाहीत. कारण सर्व ठिकाणी सर्वांना प्रवेश हे सर्वमान्य आहे. शिवाय बुंदीचा लाडू, दाण्याचा लाडू, शेव-चिवडा, पापडी, अगदी बाबा आदमच्या काळातलं सोसयो हे शीतपेयं असा अगदी गावाकडच्या टपरीवरचा फिल इथं येतो. पदार्थांचे भावही हातानं लिहून चिटकविलेले. एक जुन्या जमान्यातलं हॉटेल वाटावं, असं वातावरण. मस्तच...
मला इथला सर्वाधिक आवडणारा पदार्थ म्हणजे राजगि-याच्या पु-या आणि उपवासाची बटाट्याची भाजी. पाच की सहा पु-या आणि गरमागरम झणझणीत भाजी. उपवासाला दिलखुश. मिसळ, वडा-उसळ पण मिळते, पण मला तशी मिसळ विशेष आवडत नाही. वेळेला केळं... म्हणून ठीक आहे. पण आवडीनं नाही. इथला साधा चहाही स्पेशल चहा इतकाच मस्त आणि कडक.


मांसाहारी गिरीश...
टिपिकल मालवणी (किंवा कोकणी) चवीचं आणि अगदी सामान्यांच्या खिशालाही परवडेल, असं हॉटेल म्हणजे गिरीश. परळमधल्या जयहिंद हॉटेलच्या समोरच हे गिरीश आहे. जयहिंदमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मी एकदा गिरीशमध्ये गेलो आणि नंतर प्रेमातच पडलो. पापलेट, सुरमई, हलवा, बोंबील, मांदेली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीपासून ते खिमा, मटण-चिकन हंडी, मसाला अशा सर्व प्रकारच्या वैविध्यानं गिरीश भरलेलं आहे. अस्सल मालवणी म्हटल्यावर सोलकढीही आलीच. काही ठिकाणी सोलकढी ही आपली अशीच असते. पण इथली सोलकढी कायम लक्षात राहिल, अशीच म्हटली पाहिजे.
महत्त्वाचं म्हणजे इथले दरही अगदी माफक आहेत. दोन जण अगदी पोट फाटेपर्यंत जेवलो तर बिल १६० रुपयांच्या वर जात नाही.


प्रभादेवीचा वडापाव...
वरळीकडून प्रभादेवीकडे जाऊ लागलो की रवींद्र नाट्य मंदिराकडे वळण्याआधीचा जो चौक आहे (नाव काही लक्षात नाही बुवा...) त्या चौकात एक गाडी लागते. आई-वडील आणि दोन मुलं अशी त्या गाडीवर असतात. त्या गाडीवर वडापाव खाल्ला की, बाकीचं सारं विसरुन जायला होतं. इथल्या वडापावची चव खरोखरच वेगळी आहे. तसंच दोन-तीन प्रकारच्या चटण्यांमुळं त्याची लज्जत आणखीनच वाढते. वडापाव प्रमाणेच पॅटिस आणि सामोसे ही तितकेच चटकदार असतात. पॅटिस आणि वड्यासाठी वापरलं जाणारं सारण वेगवेगळं असतं. नाहीतर काही ठिकाणी एकच सारण दोन्हीत वापरुन फसवणूक केली जाते. शिवाय इथला खप आणि ग्राहकांचा राबता इतका आहे की, विचारु नका. कधीही जा तुम्हाला अगदी गरमागरम वडा मिळणारच. आणखी काय हवंय.
सामनामध्ये आम्ही कधी-कधी (आठवड्यातून जवळपास पाचवेळा) वडापाव, भजी, दालवडा किंवा इतर खाद्यपदार्थ मागवायचो, त्यातून मला या माणसाचा शोध लागला. संधी मिळेल तसं त्याला भेट देणं व्हायचं.

मधुराची मिसळ...
संकष्टी चतुर्थीला एकदा प्रकाशमध्ये जाण्याऐवजी मधुरामध्ये गेलो. (थँक्स टू माय बॉस मि. विद्याधर चिंदरकर) मधुरात उपवासाची मिसळ खूप छान मिळते, असं त्यांनी सांगितलं. मग मी काय थांबणार होतो. मिशन मधुरा. त्यांनीच मला मधुरात सोडलं. एक प्लेट उपवासाची मिसळ मागितली आणि तृप्त झालो. उपवासाचा बटाट्याचा गोड चिवडा, उपवासाची बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, किसलेली (किंवा चोचलेली) काकडी, दाण्याचं कूट आणि वरुन मस्त दाण्याची आमची. व्वा क्या बात है... हे सारं कालवून राडा करायचा आणि मग ओरपायचं. स्वर्गीय सुख. तोड नाही हो. इतकं चांगलं खायला मिळणार असेल तर कोणी रोजही उपवास करेल. उपवासाची मिसळ खाऊन झाली की, मग पियूष, ताक, लस्सी किंवा कडक चहा काही पण घ्या.
इतर मराठी रेस्तराँमध्ये मिळतात तसे आळूची वडी, थालिपीठ, भाजणीचे वडे, खर्वस इइ अस्सल मराठमोळे पदार्थही इथं मिळतात. दादरमध्ये प्लाझाच्या लाईनमध्ये शिवाजी मंदिर समोर असल्यामुळं दर थोडे अधिक वाटतात. पण तृप्त होऊन बाहेर पडल्यानंतर सगळं वर्थ वाटतं.

इडली-डोसा...
परळ स्टेशनवरुन उतरलं बाहेर आलं की, समोर एक बोगद्यासारखं आहे. त्या बोगद्याखाली एक इडली-डोशाची गाडी लागते. मला वाटतं सकाळी पावणे सात ते दुपारी दोन-अडीच. दहा रुपयांत तीन इडल्या किंवा तीन मेदू वडे (काहींच्या भाषेत मेंदू वडा) किंवा दोन साधे डोसे (घावन). दोन (क्वचित प्रसंगी एक) प्लेट मारल्या की, पोट भरलं. इथं सांबार फारसं चांगलं मिळत नाही. म्हणजे जी टिपिकल दक्षिण भारतीय चव असते ना, ती इथं नाही. त्यामुळं सांबार नाही घेतलं तरी चालेल. पण इथली खोब-याची चटणी तसंच टॉमेटो आणि लाल मिरचीपासून तयार केलेली लाल चटणी एकदम टॉप्प. इडली किंवा घावन काहीही घ्या पण चटणीबरोबर खाल्लं तर अधिक चांगलं लागतं. माझा अनुभव. तुम्हाला सांबार आवडलं तर खाऊ शकताच की...


फालुदा...
मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्टेशन इथं आमचे परममित्र मंगेश वरवडेकर उर्फ राजा यांच्या सहकार्याने मी खास फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. सब्जा, शेवया, घट्ट गुलाबपाणी, मावा, घट्ट दूध आणि वरुन आईस्क्रीम घालून तयार केलेला फालुदा लय भारी. मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर अंडा-भुर्जीच्या गाड्यांच्या बाजूला ही गाडी उभी असते. अस्लम की रशीद की सुलेमान असं काहीसं नाव आहे त्याचं. हाफ फालुदा १५ आणि फुल्ल २०. आम्ही आईस्क्रीम खाऊन गेलो होतो म्हणून हाफ घेतला. पण इतक्या लांब गेल्याचं सार्थक झालं.
वांद्रयाच्या स्टेशनबाहेरील फालुदाही चांगला आहे. तो पण मुबारक की तत्समच. इथलाही फालुदा चांगला. पण इथं मावा वरुन घालण्याची पद्धती बहुधा नसावी. त्यामुळे दूधाला किंवा त्या फालुद्याला घट्टपणा येत नाही. हा ड्रॉबॅक सोडला तर चव तशीच. दर मात्र, दहा रुपयांनी जास्त. फुल्ल फालुदा ३० रुपये. तीस रुपयांमध्ये फालुदा आणखी गोष्ट मोफत मिळते. फार खूष होऊ नका हात पुसायला टिश्शू पेपर मिळतो.. हा हा हा...


एलफिन्स्टनचा सामोसा...
प्रत्यक्ष स्टेशनवर जाऊन किंवा तिथं बाहेर कुठं मिळतो तिथं जाऊन मी हा सामोसा खाल्लेला नाही. पण वरवडेकर राजे यांनी दोन-तीन वेळा हा सामोसा सामनामध्ये आणला होता. तेव्हापासून मला त्याची चटकच लागलीय, असं म्हणा ना. सुकी किंवा ओली चटणी नसली तरी चालेल असा हा वेगळाच सामोसा आहे. सामोशाचीच चव इतकी खल्लास आहे की, त्याला इतर गोष्टींची जोड लागतच नाही. फक्त पाच रुपयांत मिळणारा हा गरमागरम सामोसा इतका भारी आहे की, तुम्ही त्याच्या प्रेमात नक्की पडाल.


पूजा चणे भांडार...
सयानी रोडवर भूपेश गुप्ता भवनच्या अलिकडे थोडंसं हे पूजा चणे भांडार लागेल. असंच फिरत असताना मला त्याचा शोध लागला. सामना समोरही एक भैय्या भेल आणि तत्सम पदार्थ विकतो. पण हा भैय्या त्यापेक्षा शेकडो पटीनं भारी आहे. इथं मिळणारी गिली (म्हणजेच ओली) भेळ पुण्यातल्या भेळच्या गाडीवरच्या भेळेची आठवण करुन देणारी. हा भैय्या पण भेळमध्ये बटाटा टाकतोच. असो. पण गूळ आणि चिंचेचं पाणी मी मुंबईतच त्याच्याकडेच पाहिलं. बाकीचे भैय्ये खजूर आणि चिंचेचं पाणी वापरतात. त्यामुळं ही भेळ इतरांपेक्षा वेगळी लागते. जे भेळचं तेच पाणीपुरीचं. पाणी एकदम झकास. चाट मसाला आणि पुदीना यांचं अत्यंत योग्य मिश्रण इथं असतं. त्यामुळं पाणी उग्र किंवा जास्त जळजळीत नसतं.
भेळ आणि पाणीपुरी हेच पदार्थ चाखले आहेत. अजून शेवपुरी, रगडापुरी, रगडापॅटिस आणि जे काही मिळतं ते खायचं आहे. कोरडी भेळही चांगली असावी, असा माझा अंदाज आहे. ती करण्याची पद्धत पाहून उगीच तसं वाटलं.

किर्तीमहलचा चहा...
मुंबई सकाळला असताना परळ टीटीच्या किर्तीमहल इथं चहा प्यायला जाणं व्हायचं. महापालिकेच्या कुठल्याशा ऑफिसच्या खालीच हे रेस्तराँ आहे. इथला चहा एकदम फक्कड. चव थोडीशी इराण्याच्या अंगानं जाणारी. पण हा इराणी नाही. हा बहुतेक उडुपी आहे. पण इथं इतर काही खाण्यापेक्षा चहा पिण्यासाठीच लोक मोठ्या संख्येने आलेले असतात. आम्ही त्यात असायचो. इथला चहा प्याच.

सामनात असताना केलेली खादाडी आत्ता सांगितली. बेलापूरला साम मराठीमध्ये असताना त्या परिसरात केलेली खादाडी लवकरच...

Thursday, January 28, 2010

शंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर!



खमंग आणि रुचकर वडापाव

मध्यंतरीच्या काळात माझ्या ब्लॉगवर (http://ashishchandorkar.blogspot.com) "वडापाव'वर एक लेख लिहिला होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणहून काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील सर्वात वेगळी आणि आनंददायक प्रतिक्रिया होती ती अमेरिकेतल्या संदीप नावाच्या एका ब्लॉग वाचकाची. संदीप म्हणतो, ""तुमचा लेख मला खूपच आवडला. तुमचा लेख वाचल्यानंतर मला अमेरिकेतील शिकागो शहरातील एका दुकानाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. त्या ठिकाणी सुखाडिया नावाच्या माणसाने एक भव्य दुकान थाटलेय. "शॉपिंग मॉल'च म्हणा ना. तिथल्या "रेस्तरॉं'च्या "मेन्यू कार्ड'वर "बॉम्बे वडापाव'चा उल्लेख आहे. हा "बॉम्बे वडापाव' तीन डॉलर्सला मिळतो.''

शंभर टक्के मुंबईचा असलेला वडापाव आता फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे; तर परदेशातही मिळू लागला आहे आणि तिथेही त्याचे नाव नुसते वडापाव असे न राहता "बॉम्बे वडापाव' असे नोंदले गेले आहे. त्यातच वडापावची लोकप्रियता लक्षात येते. तसेच वडापाव आणि मुंबई यांचे किती अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मुंबईने महाराष्ट्राला काय दिले, असा प्रश्‍न विचारल्यानंतर अनेकांची अनेक उत्तरे असतील. कोणी म्हणेल बाळासाहेब ठाकरे, कोणी म्हणेल सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर, कोणी म्हणेल "फायटिंग स्पिरीट', कोणी म्हणेल बॉलीवूडची मायानगरी इ.इ. पण मला विचारले तर माझे उत्तर असेल- मुंबईने महाराष्ट्राला "वडापाव' दिला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मराठमोळा आणि 100 टक्के मुंबईकर. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकत्तापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसेनेच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबई वडापाव) मिळू लागलाय. भारतातील बहुतांश राज्यात वडापाव मिळतो आहे. प्रांतानुरूप आणि तिथल्या चवीनुरूप काही किरकोळ बदल झाले आहेत. म्हणजे गुजरातमध्ये कापलेला कांदा, बीट आणि कोबी यांच्या सलाडबरोबर वडापाव "सर्व्ह' करतात. तर हैदराबादमध्ये "आलू बोंडा' म्हणून ब्रेडच्या स्लाईसबरोबर वडा दिला जातो. प्रत्येक ठिकाणची चव आणि स्वरूप वेगळे; पण वडापाव तोच अस्सल मराठमोळा.

साबुदाणा खिचडी, थालिपीठ, झुणका-भाकरी, मटारच्या करंज्या, खारी पॅटीस, झणझणीत मिसळ आणि इतरही अनेक पदार्थांच्या तुलनेत वडापाव हा अधिक झपाट्याने महाराष्ट्रभर रुजला आणि सामोसा किंवा कचोरीच्या स्पर्धेतही टिकला. बटाट्यापासून केलेले सारण हाच बटाटा वड्याचा खरा आत्मा. त्याची चव जितकी चांगली तितका वडापाव रुचकर. सोबतीला गोड किंवा तिखट अशी ओली चटणी, कांदा लसूण मसाला किंवा सुकी चटणी असा लवाजमा असतो. पण खरी चव असते ती नुसत्या वड्याचीच. मग तो किती झणझणीत आहे, त्यातील मसाला कसा आहे, त्यात लिंबाचा रस मिसळला आहे का, अशा अनेक गोष्टींवर वड्याची चव ठरते. मग तो वडा नुसता खाल्ला काय किंवा पावाबरोबर खाल्ला काय, एकदम जन्नत. बरोबर तळलेली लवंगी मिरची मात्र हवी. मग गोड-तिखट चटण्या असो किंवा नसो.

मुंबईतील छबिलदास जवळच्या "श्रीकृष्ण'चा अतिमहागडा वडा, कीर्ती कॉलेजजवळचा खमंग वडापाव (हा विक्रेता चुरापाव विकूनही पैसे वसूल करतो), हुतात्मा चौकातील (टेलिफोन एक्‍स्चेंजजवळचा) वडापाव, परळच्या भोईवाडा चौकातील वडापाव, सीएसटीसमोरचा आरामचा वडापाव, ठाण्यातील कुंजविहारचा वडापाव, कर्जतचा दिवाडकरचा वडा, पुण्यातील जोशींचा वडा, सहकारनगरचा कृष्णा किंवा कॅम्पातील फेमस वडापाव, औरंगाबादचा भोला वडापाव, कोल्हापूरचा दीपकचा वडा इ.इ. ही यादी आणखी खूप वाढत जाईल आणि अनेक जण त्यामध्ये नवे नवे स्पॉट्‌स नमूद करता येतील. थोडक्‍यात म्हणजे मुंबईत उगम
पावलेल्या वडापावची ओळख आणि चव सगळीकडे पोचलीय.

फार लवाजमा नसल्यामुळे अगदी गल्लोगल्लीच्या गाड्यांवरही वडापाव दिसू लागला. तयार करायला सोपा आणि ग्राहकही पुष्कळ त्यामुळे "वडापाव' लवकरच सर्वदूर पोचला. गरिबातील गरीबापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला खमंग वडापाव आवडतो. मग तो सचिन तेंडुलकर का असेना. वडाभाव हा त्याचा "वीक पॉईंट' असतो. त्यामुळे गल्लोगल्ली गाड्यांवर मिळणाऱ्या वडापावलाही "हायजिनिक' स्वरूप देण्याच्या नादात "वडापाव' दुकानांमध्ये गेला. मग तो "प्लॅस्टिक'चे ग्लोव्हज घालून तयार करण्यात येणारा जम्बो किंग वडापाव असो, गोली वडा असो किंवा शिवसेनेचा "शिववडा'. पुण्यातील जोशी वडेवाले असो किंवा रोहित वडेवाला. शिवसेनेनेही आता चौकाचौकांत "शिववडा'च्या गाड्या टाकून ब्रॅंडिंगचा प्रयत्न सुरू केला आहे. वडापावची देखील साखळी पद्धतीची दुकाने निघतील, याची कल्पना कोणीच केली नव्हती. पण आता ती वस्तुस्थिती आहे.

"फक्त एका रुपयात वडापाव' अशा जाहिरातीपासून सुरू झालेले मार्केटिंग आता "हायजिनिक वडापाव'पर्यंत येऊन पोचले आहे. पण कोणी कितीही आणि काहीही म्हटले तरी गाडीवर कढईतल्या उकळत्या तेलात तळले जाणारे गरमागरम खमंग वडे खाण्याची मजा काही औरच. मग थोडंसं तोंड भाजलं तरी त्याचं काही वाटत नाही. आणि एकदा तोंड खवळलं की दुसरा वडापाव खाल्ल्याशिवाय आपण तिथून हलत नाही. अशा वडापावची चव नेहमी आपल्या जिभेवर रेंगाळायला लावण्याचे श्रेय दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचे नसून या मुंबापुरीचे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच मुंबई बाहेरच्या मंडळींना मुंबईत गेलो आणि वडापाव खाल्ला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ते त्यामुळेच.


(मुंबई सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त निघालेल्या विशेष पुरवणीतील लेख...)

Sunday, May 24, 2009

मनसेने मुंबईतला अंदाज चुकविला...

महाराष्ट्रातही वातावरण फिरले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत प्रभाव पडेल पण तो शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना पाडण्याइतका असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळेच मुंबईतला आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अंदाज चुकला. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक इथं मनसेनं युतीला दणका दिला नसता तर कदाचित मी वर्तवलेलं भाकित खरं ठरु शकलं असतं. पण राजकारणात जर-तर याला स्थान नाही. जे झालं ते मान्य केलंच पाहिजे. त्यामुळंच आपले अंदाज चुकले हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.
धन्यवाद...

Tuesday, February 24, 2009

"मांदेली फ्राय' जरुर ट्राय करा...


गिरगावातला "सत्कार'!!!

बऱ्याच दिवसांपास्नं लिहायचं होतं. पण आज मुहूर्त मिळाला असंच म्हटलं पाहिजे. शेवटी हा सत्कार समारंभ पार पाडलाच पाहिजे, असं ठरवून आज ब्लॉग लिहितोय. एकदा का एखाद्या ठिकाणची चव जिभेवर रुळली की पुन्हा पुन्हा तिथं जायचं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा ही जुनी खोड. त्यामुळंच मुंबईत आलं आणि गिरगावातल्या सत्कार हॉटेलात गेलो नाही, असं कधीच झालं नाही. अगदी अप्रतिम चवीचे मासे याठिकाणी तुम्हाला मिळतील. पापलेटपासून ते बांगड्यापर्यंत बरीच "व्हरायटी' इथे मिळते. सत्कार हे थोडंसं खानावळीच्या अंगानं जाणारं असलं तरी अगदी घरगुती पद्धतीनं बनवलेलं (बहुधा मालवणी पद्धतीनं) जेवण ही इथली खासियत. त्यामुळे दुपारी दोनपूर्वी आणि संध्याकाळी आठनंतर अगदी बिनदिक्कतपणे तुम्हाला इथं आडवा हात मारु शकाल.

अगदी सुरवातीला म्हणजे "ई टीव्ही'मध्ये काम करत असताना (जवळपास तीन वर्षांपूर्वी) विश्‍वनाथ गरुड, अजय खापे आणि स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ या "रानडे'तल्या मित्रांबरोबर पहिल्यांदा सत्कारमध्ये गेलो होतो. तेव्हापास्नं अजूनही गिरगावाकडे पावलं वळतात. मग जेव्हा जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तेव्हा इथं जाणं व्हायचं. सध्या मुंबईतच आहे. पण फक्त एकदाच सत्कारची पायरी चढलीय. आता कधी एकदा तिथं जाऊन "फिश करी' ओरपतोय, असं झालंय.
वेस्टर्न लाईनच्या मरीन लाईन्स स्टेशनला उतरायचं. चर्चगेटच्या दिशेनं जाऊ लागलो की, अखेरच्या ब्रिजवरनं उतरायचं आणि डावीकडे वळून थेट चालायला लागायचं. पहिला चौक ओलांडला डाव्या हातालाच सत्कार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनंही इथं यायला बसेस आहे. अगदी टॅक्सीनं यायचं म्हटलं तरी वीस-पंचवीस रुपयांपेक्षा जास्त मीटर पडणार नाही.

पापलेट किंवा सुरमई थाळी हा इथला "द बेस्ट' ऑप्शन. अगदी "मेन्यू कार्ड' देखील पहायची काहीही आवश्‍यकता नाही. "सत्कार'मध्ये शिरल्यानंतर तुम्ही थेट एखाद्या थाळीची "ऑर्डर' देऊन टाका. "फिश करी'चा स्वाद हे इथलं वैशिष्ट्य. थाळीमध्ये एक सुका फिश, एक करी फिश आणि चपात्या येतात. "फिश करी' खूपच चविष्ट असल्यानं ती ओरपलीच जाते. त्यामुळे दोन-तीन वेळा तरी इथं करी मागवावी लागते. त्याचे स्वतंत्र पैसे पडत नाही. पण जादा पैसे पडत असले तरी हरकत नाही. पुन्हा पुन्हा "करी' हवीच. मासा कोणताही असला तरी तो इतका ताजा असतो (त्यामुळेच सॉफ्टही असतो) की जणू काही तो नुकताच समुद्रातनं पकडून आपल्याला "सर्व्ह' केलाय की काय, अशी शंका येते. अगदी लुसलुशीत मासा आणि अप्रतिम चवीची "फिश करी' यामुळे पाहता पाहता किती चपात्या संपतात ते कळतही नाही.

कोणतीही फिश थाळी मागविली तरी त्याच्या जोडीला "मांदेली फ्राय' ही डिश हवीच. "बोंबिल फ्राय' असेल तर तो "ऑप्शन'ही "ट्राय' करायला हरकत नाही. पण मला विचाराल तर "मांदेली फ्राय' हाच उत्तम पर्याय आहे. एका "प्लेट'मध्ये किमान बारा ते पंधरा मांदेली नक्की असतात. दोन जणांमध्ये एक "प्लेट' अगदी सहज संपते. इथली मांदेली इतकी मस्त आहे की, रत्नागिरीतल्या "शुभम' शिवाय इतकी सुंदर मांदेली दुसरीकडे कुठेच मिळालेली नाही. किमान मला तरी! (कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा) जास्त लोक असतील तर त्या प्रमाणात तुम्ही "ऑर्डर' द्या. चपात्या आणि "फिश'वर भरपेट ताव मारल्यानंतर एक प्लेट भात तुमची वाट पाहत असेल. तो खाण्याची क्षमता तुमच्यात असेल तर भात खा; अन्यथा त्याबदल्यात एक-दोन चपात्या आणखी घ्या. माशांची चव जिभेवर रेंगाळत ठेवायची असेल तर मग तुम्ही थेट बिल मागवा. नाहीतर इथली "सोलकढी' पण चांगली असते. किमान मी तरी "सोलकढी' घेतल्याशिवाय इथनं बाहेर पडत नाही. तुम्हीपण शक्‍यतो "सोलकढी' घ्याच.
दोन फिश थाळी, भरपूर चपात्या, "मांदेली फ्राय' किंवा "बोंबिल फ्राय'ची प्लेट आणि नंतर एक-दोन ग्लास "सोलकढी' हे झालं दोन जणांचं भरपेट जेवण आणि बिलाची रक्कम अवघी पावणेदोनशे दोनशे रुपये. बिल देऊन बाहेर पडल्यानंतर फक्त एक रस्ता क्रॉस केला की, समोरच पानाचा एक ठेला आहे. मसाला (मिठा) पानापासून ते फुलचंदपर्यंत सर्वप्रकारची पानं तिकडं मिळतात. फुलचंदही चांगलं कडक असतं. त्यामुळं तुम्ही पानाचे "शोकिन' असाल तर "सत्कार'समोरच्या पानवाल्यालाही "व्हिझिट' कराच.

Monday, December 08, 2008

प्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...


अनुभवला थरार दहशतवादाचा ...

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं सारं जग हादरलं. भारत तर पुरता कोलमडून गेला. अशा पद्धतीनं हल्ला होईल, अशी अपेक्षाही कोणाला नव्हती. गुप्तचर संस्था आणि सुरक्षा रक्षकांचं अपयश किती महाग पडू शकतं, याचा अनुभव भारतानं घेतला. भारताची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली गेली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर अतिरेक्‍यांनी केलेला अंदाधुद गोळीबार, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय तसंच हॉटेल ताज इथं सुरु असलेली कारवाई चक्रावून टाकणारी होती.

मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी पुण्यात होतो. माझी सुटी संपत असल्यानं दुसऱ्या दिवशी बेलापूरला जायचं होतं. त्यानुसार मी 27 नोव्हेंबरला सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास बेलापूरला पोचलो. पण ही कारवाई संपण्याचं नाव घेईना. मी येण्यापूर्वी संपूर्ण रात्र आमच्या टीमनं तासातासाला अपडेट बुलेटिन काढली होती. तसंच कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोईसुविधा असतानाही आम्ही झगडत होतो. बेलापूरला पोचल्यानंतर तो संपूर्ण दिवस "डेस्क'वरच होतो. संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा असं साडेचार तास "लाईव्ह' करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्‍यक मुलाखती आणि इतर बातम्या मागावून घेतल्या. तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचे फोनो आणि अधूम मधून अँकरमध्ये डिस्कशन अशापद्धतीनं साडेचार तास अक्षरशः खेचून काढलं. पण मजा आली. अशा पद्धतीनं काहीही तयारी नसताना प्रथमच इतक्‍या मोठी "रिस्क' आम्ही घेतली होती. पण तरीही वेळ मारुन नेली.

रात्रभरात कारवाई संपेल आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं आमचे वार्ताहर सांगत होते. त्यामुळं मी रात्री ऑफिसमध्येच थांबलो होतो. कदाचित ऐनवेळी रात्री विशेष बातमीपत्र काढावं लागलं असतं. त्यामुळं मी ऑफिसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. पण तसं झालंच नाही आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजेच 28 तारखेलाही हे रण सुरुच होतं. मुंबईमध्ये चकमक सुरु आहे आणि मी तिथं जाऊ शकत नाही, हे माझ्या मनाला खटकत होतं. यावेळी मला ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचं एक वाक्‍य आठवतं. जगात जिथे जिथे काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडत असतील तिथं बातमीदार म्हणून मला जावंसं वाटतं, असं गडकरी म्हणायचे. ही गोष्ट कायम माझ्या मनात असते. त्यामुळंच मी परवानगी घेऊन मुंबईत रिर्पोंटिगसाठी गेलो.

प्रथम आनंद गायकवाड याच्यासह नरिमन हाऊस इथं जाऊन तिथं परिस्थिती कशी आहे, हे पाहून आलो. तिथली कारवाई सर्वाधिक अवघड होती. नरिमन हाऊस हे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांच्या वसाहतीमध्ये वसलेले आहे. त्यामुळं तिथं कारवाई सुरु असताना नागरिक क्रिकेटच्या मॅचला जमतात तसे जमले होते. शिवाय काही अतिउत्साही पत्रकार "लाईव्ह'चा थरार अनुभवण्यासाठी पुढे पुढे करत होते. इथली कारवाई लवकर संपेल, असं चित्र होतं. तसंच तिथं आनंद असल्यामुलं मी ताज इथं "रिर्पोटिंग'साठी गेलो. तिथं साधारण रात्री साडेसातच्या सुमारास पोचलो. तेव्हापासून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत अनुभवला थरार, थरार आणि फक्त थरार.

""माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु, जिंकू किंवा मरू...'' हे समरगीत मी फक्त ऐकलं किंवा पाहिलं होतं. ते अनुभवण्याची संधी मला त्या रात्री मिळाली. आपण जणू काही दिवाळीतल्या फटाक्‍यांचे आवाज ऐकतोय, अशा पद्धतीनं गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरु होते. रात्री बारा ते साडेतीन या कालावधीत सारं कसं शांत शांत होतं. त्यानंतर मात्र, पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु झाली. मध्यरात्रीनंतर चकमक थांबली असली तरी पत्रकारांचे गोळीबार सुरुच होते. एका पत्रकारानं तर फोनो देताना अकलेचे तारेच तोडले होते. ""ताजमध्ये सहा अतिरेकी आहेत. त्यापैकी दोन महिला अतिरेकी आहेत. त्यांनी नुकतंच रात्रीचं जेवण केलंय आणि आता पुन्हा एकदा ते चकमक करण्यासाठी सज्ज झाले आहेत...'' अशी बडबड ऐकल्यानंतर मला तर सुन्न व्हायला झालं. मुळात संबंधित पत्रकाराला ही माहिती दिली कोणी आणि इतकी "डिटेल' माहिती याच्याकडे असेल तर मग त्याला गुप्तचर खात्यातच नोकरी दिली पाहिजे, असा विचार माझ्या मनाला शिवला. पण अशी फेकचंदगिरी करणाऱ्या पत्रकाराला जोड्यानं का मारु नये, असंही मला वाटलं.

शायना एन. सी. नामक भाजपची एक चकमो नेता आहे. ती लग्नाला आल्यासारखी "गेट वे ऑफ इंडिया'जवळ आली होती, रात्री दीड वाजता. आपला कोणी बाईट घेईल किंवा मुलाखत घेईल का, याचा अंदाज शायना एन. सी. घेत होत्या. पण त्यांना फारसं कोणी विचारत नव्हतं. अखेर "लाईव्ह इंडिया' नामक वाहिनी तिच्या चमकोगिरीला बळी पडली आणि वाहिद खान नावाच्या अतिउत्साही पत्रकारानं तिची मुलाखत घेतली, अवघी पंधरा मिनिटं. ऍलेक पद्‌मसी हे ऍड विश्‍वातलं हे नामांकित व्यक्तिमत्व. हे महाशय पण रात्री अडीचच्या सुमारास तिथं आले. "बीबीसी'च्या एका पत्रकाराक डून त्यांनी आधी माहिती घेतली आणि मग तीच माहिती दुसऱ्या एका वाहिनीच्या मुलाखतीत सांगितली. त्यामुळं या महाशयांचे टीव्ही प्रेमही उघड झाले. हवशे, नवशे आणि गवशे असे असंख्य नागरिक-पत्रकार तिथं होते.

पहाटे साडेतीनच्या सुमारास चकमक पुन्हा सुरु झाली आणि आता ती वेगानं सुरु होती. अतिरेक्‍यांची एखादी गोळी आपल्या दिशेनं येऊ नये किंवा ग्रेनेडचे तुकडे फुटून आपल्या अंगावर येऊ नयेत, अशी प्रार्थना करुन आम्ही तिथं थांबलो होतो. माझ्या परिस्थितीवरुन तिथं लढणारे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या धैर्याची कल्पना मला येत होती. त्यामुळंच त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे, अशी माझी भावना आहे. सकाळी सकाळी म्हणजे साडेसातच्या सुमारास ही चकमक अंतिम टप्प्यात असल्याचं जाणवलं. कारण गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यांचा वेग वाढला होता. ताजच्या डाव्या कोपऱ्यातल्या तळ मजल्याला आगा लागली. ती प्रचंड वेगानं पसरत होती. पहिल्या मजल्याचा काही भागही आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. ही आग अतिरेक्‍यांनीच लावली, असा आमचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र, ही आग लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करुन लावली होती. पण तेव्हा साधारण अंदाज आला होता की, ही चकमक काही मिनिटांतच संपुष्टात येणार आहे. झालंही तसंच. साडेआठ पावणे नवाच्या सुमारास सारं काही शांत शांत झालं. एक व्यक्ती ताज हॉटेलच्या खिडकीतनं बाहेर पडताना सगळ्यांना दिसला. तोच ताजमधला शेवटचा अतिरेकी आणि त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं होतं.

त्यानंतर जवान आणि कमांडो अगदी रिलॅक्‍स दिसत होते. अग्निशामक दलाचे जवानही अगदी बिनधास्तपणे आग विझवत होते. शिवाय ज्या पहिल्या आणि तळ मजल्यावर संघर्ष सुरु होता, तिथं आता जवानांनी ताबा मिळवला होता. त्यामुळं कारवाई स्पष्ट झाल्याचं जाणवतं होतं. हो कारवाई संपलीच होती. कारवाई पार पडल्यानंतर विश्रांती घेत असलेल्या एका "एनएसजी' कमांडोशी गप्पा मारत असताना त्यांच्यातल्या आत्मविश्‍वाचा प्रत्यय आला. ही कारवाई थोडी अवघड होती, असं नाही वाटत का? या माझ्या प्रश्‍नावर त्यानं नकारार्थी उत्तर दिलं. "एनएसजी'साठी कोणतीच कारवाई अवघड नाही. आम्ही कोणाचाही सामना करु शकतो आणि देश वाचवू शकतो. हे अतिरेकी अद्ययावत आणि फिट होते, त्यामुळं आम्हाला अंदाज यायला थोडा वेळ लागला. पण अखेरीस ते संपलेच. आम्ही कोणापुढेही हार पत्करत नाही... असं त्या कमांडोनं सांगितल्यानंतर मला धन्य झाल्यासारखं वाटलं.