Friday, May 29, 2009

व्वा! व्वा!! अगाथा...


अप्रूप राष्ट्रभाषेतून शपथ घेतल्याचे...

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार काही दिवसांपूर्वी पार पडला. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांना मिळालेलं महत्व आणि उत्तर प्रदेशातनं 21 खासदार निवडून येऊनही तिथला एकही कॅबिनेट मंत्री न करणं या गोष्टी चटकन डोळ्यात भरणाऱ्या होत्या. राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जाणारे जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रतीक पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं याचंही काही जणांना अप्रूप वाटतंय. या सर्व गदारोळात मला मात्र, अधिक भावल्या त्या पूर्णो संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा. वय वर्षे फक्त 28. मेघालयातल्या तुरा मतदारसंघातून त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. आपले वडील आणि दोन भाऊ यांच्याप्रमाणेच अगाथाही आता राजकारणात रमल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

मनमोहनसिंग मंत्रिमंडळातल्या किंवा आतापर्यंतच्या सर्वाधिक तरुण मंत्री ही अगाथा संगमा यांची आणखी एक ओळख. यापूर्वी कुमारी सैलजा या आतापर्यंतच्या सर्वाधिक तरुण मंत्री होत्या. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात 1991-92 मध्ये त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला होता. पण आता त्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहेत. आता हा विक्रम अगाथा संगमा यांच्या नावावर नोंदला गेलाय. पण पी. ए. संगमा यांची कन्या किंवा सर्वाधिक तरुण मंत्री यापेक्षा मला भावलेली गोष्ट म्हणजे हिंदी ही त्यांची मातृभाषा नसतानाही त्यांनी हिंदीतून घेतलेली शपथ. महाराष्ट्रातले प्रतिक पाटलांसारखे मंत्री कदाचित "इम्प्रेशन' मारण्यासाठी घाबरत घाबरत का होईना पण इंग्रजीतून शपथ घेतात. आणि दुसरीकडे मेघालयासारख्या ईशान्य भारतातल्या राज्यातून आलेली अगाथा संगमा हिंदीतून शपथ घेते, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये (आसामवगळता) हिंदी भाषेला फारसे महत्व मिळत नाही. उलट हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी तिथल्या स्थानिक भाषांमधूनच सर्व व्यवहार चालतात. मेघालयमध्ये गारो, खासी आणि जयंतिया तीन जमाती प्रामुख्यानं अस्तित्वात आहेत. त्याशिवाय कोच, हाजॉंग, दिमासा, ह्मार, कुकी, लाखर, मिकीर, राभा आणि नेपाळी या छोट्या छोट्या जमातीही अस्तित्वात आहेत. त्यांची संस्कृती, राहणीमान आणि भाषा या विभिन्न आहेत. खासी आणि गारो याच इथल्या प्रमुख भाषा. इथं ख्रिश्‍चन धर्मियांची संख्या जवळपास 70 टक्के आहे. त्यामुळंच हिंदी ही भाषा मेघालयातल्या कोणालाही जवळची नाही. अशा परिस्थितीत अगाथा यांनी हिंदीतून शपथ घेणं हे नक्कीच अनुकरणीय आहे.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं गुवाहाटी इथं गेलो होतो. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही मेघालयाची राजधानी शिलॉंग इथं गेलो होतो. त्यावेळी मेघालयाच्या संस्कृतीची पुसटशी का होईना पण जवळून ओळख झाली होती. आपण मुंबईतल्या फोर्ट भागात, किंवा पुण्यातल्या कॅम्प भागात किंवा पणजीतल्या एखाद्या भागात आलो आहोत की काय असं वाटावं, अशी परिस्थिती. जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट-टॉप्स घातलेल्या तरुणी, शॉपिंगसाठी मोठी बाजारपेठ आणि थंडगार हवामान... कोणालाही आवडेल, असं हिल स्टेशन.

अशा या मेघालयाला त्यांची कोणतीही एक अशी राज्यभाषा नव्हती. खासी ही तिथली प्रमुख भाषा असली तरी ती बोली भाषा होती. तिची लिपी नव्हती. पण मेघालयची स्थापना झाल्यानंतर राज्यभाषा कोणती हा प्रश्‍न पडला आणि मग खासी भाषेची लिपी निश्‍चित करण्यात आली. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी देवनागरी लिपी खासी भाषेसाठी निवडण्यात आली नाही. तर रोमन लिपीचा वापर खासी भाषा लिहिण्यासाठी करण्याचे निश्‍चित झाले. म्हणजेच सोनिया गांधी हिंदीतून भाषण करताना जसे इंग्रजीत भाषण लिहून हिंदीत वाचतात तसे. हिंदीची अशी शोचनीय परिस्थिती असताना संगमा यांनी अडखळत का होईना हिंदीतूनच शपथ घेतली, ही गोष्ट मनाला खूपच स्पर्शून गेलीय.

तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकातले मंत्री इंग्रजीतूनच शपथ घेतात. दाक्षिणात्य मंत्र्यांचे (आणि नागरिकांचेही) हिंदी प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्यांना हिंदीची ऍलर्जीच नाही तर हिंदीची लाज वाटते की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. बी. के. हॅंडिक किंवा पाला यांच्यासारखे ईशान्य भारतातले मंत्रीही त्यांचाच कित्ता गिरवतात. त्यामुळंच आपले वडिल पूर्णो संगमा यांच्याप्रमाणेच हिंदीलाच प्राधान्य देणाऱ्या अगाथा यांना सोनिया गांधी यांनीही जोरात टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतःकरण किंवा विषय असे आपल्याला सोपे वाटणारे शब्द उच्चारताना त्या बराच वेळ अडखळल्या. पण तरीही न डगमगता त्यांनी हिंदी सुरुच ठेवले. त्यामुळेच सदनामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकामध्ये अगाथा यांच्या हिंदीतून शपथ घेण्याचीच चर्चा होती.

काश्‍मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारतात भाषा वैविध्य आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती, पेहराव, खाद्यसंस्कृती, हवामान, उत्सव आणि भाषा या गोष्टी निरनिराळ्या आहेत. पण तरीही भारताला जोडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये हिंदी या भाषेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राज ठाकरे यांच्या पुराव्यानुसार हिंदी ही फक्त एका मताने राष्ट्रभाषा झाली असली तरी "जो जिता वोही सिकंदर' या न्यायाने तिला राष्ट्रभाषा मानावीच लागेल. हिंदी ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभाषा होईल की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. पण अगाथा संगमा यांच्यासारख्या अनुभवांमुळे ही थोडासा दिलासा मिळतो इतकंच!

2 comments:

Deepak Salunke said...

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही !

ती आपली primary official language (प्राथमिक कार्यालयीन भाषा) आहे, National Language(राष्ट्रभाषा) नव्हे !

बाकी अगाथाचे अभिनंदन !

Ein Fuhrer said...

पी. चिदंबरम गेली कित्येक वर्षे केंद्रात मंत्री आहेत. त्यांना कधी नाही वाटलं की हिंदीतुनच शपथ घ्यावी. पण पहिल्यांदाच खासदार झालेल्या अगाथा ह्यांनी हिंदीतून शपथ घेऊन सर्व हिंदीद्वेष्ट्यांना चांगलीच चपराक दिली आहे.

अगाथा, तुमचे अभिनंदन.