Sunday, June 16, 2013

भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता

नितीशही दुटप्पी नि भोंदू




‘भारत हा ढोंगी आणि संधीसाधू राजकारण्यांचा देश आहे, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नरेंद्र मोदी यांचा बागुलबुवा करीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दबावामुळे संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भारतीय जनता पक्षाबरोबरील १७ वर्षांचा संसार मोडला आणि नितीशकुमार यांचा ढोंगी आणि सत्तापिपासू चेहरा पहिल्यांदा देशासमोर आला. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हाच नितीशकुमार यांना काडीमोड घ्यायचा होता. मात्र, निमित्त लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याचे झाले आणि नितीशकुमार यांनी नैतिकतेचा थयथयाट करीत भाजपबरोबरील युतीला अलविदा केला. झाले ते बरेच झाले. नैतिकतेच्या नावाखाली सत्तांधतेचा आणि ढोंगीपणाचा बुरखा वावरून हिंडणाऱ्या नितीशकुमार यांचे वस्त्रहरण झाले असून नीतिमूल्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे.

नरेंद्र मोदी यांना फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही. मोदी हे देशभरात लोकप्रिय आहेत. मध्यमवर्गीय, तरुण आणि महिलांची त्यांना विशेष पसंती आहे. गुजरातच्या निवडणुकीत फेसबुक-टि्वटरपासून ते थ्रीडी सभांपर्यंत वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा त्यांना आणि अर्थातच, पक्षालाही झाला. त्यांची हीच दूरदृष्टी आणि लोकप्रियता यांचा फायदा मिळविण्यासाठी त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद दिले तर बिघडले कुठे? मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांचा जळफळाट होण्याचे कारण काय?

नितीशकुमार यांना दोनवेळा बिहारच्या जनतेने निवडून दिले आहे, तर मोदी यांना तीनवेळा गुजरातच्या नागरिकांनी जनादेश दिला आहे. नितीशकुमार हे भाजपबरोबर युती करून निवडून आले आहेत. तर मोदी यांनी स्वबळावर सत्ता खेचून आणली आहे. एखाद वर्षाचा कालावधी वगळता १९९४ पासून गुजरात हे राज्य भाजपच्याच पाठिशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे मोदी काल राजकारणात आले आणि आज त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद मिळाले नाही, अशी परिस्थिती नाही. बिहारमध्ये महापूर आला तेव्हा, नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारने मोठ्या मनाने मदत पाठविली. पण ती मदत हेकेखोर नितीशकुमार यांनी नाकारली. वास्तविक पाहता, ती मदत मोदी यांनी स्वतःच्या खिशातून पाठविलेली नव्हती. त्यामुळे ती स्वीकारायला काहीच हरकत नव्हती. पण नितीशकुमार यांनी गुजरातची मदत नाकारून स्वतःच्या कोत्या मनाचेच दर्शन घडविले. 

राहता राहिली गोष्ट नरेंद्र मोदी यांच्यावरील गोध्रा दंगलीच्या ठपक्याची. जे झाले ते सर्व लोकांसमोर आहे. स्वयंसेवी संस्थांपासून ते सीबीआयपर्यंत आणि काही आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते केंद्रातील सरकारपर्यंत अनेक जण पिसाटल्यासारखे मोदी यांच्या मागे लागले आहेत. मात्र, कोणालाही मोदी यांच्याविरोधात काहीही सापडलेले नाही. मोदी यांचा गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हात आहे, हे कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. कायद्याच्या दृष्टीने ते निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ठपका नाही. मग असे जर असेल तर त्यांचे नाव ऐकताच अंगाचा तिळपापड व्हायचे कारण काय? महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळणारे किंवा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नवी दिल्लीत शिखांची घरे जाळणारे, शिंखांचे शिरकाण कोण आहेत, हे उघड गुपित आहे. मात्र, त्यापैकी अद्यापही कोणीही कायदेशीरदृष्ट्या दोषी सिद्ध झालेले नाही. अशी मंडळी उजळ माथ्याने राजकारण आणि समाजकारणात वावरत आहेत. असे असताना मोदी यांच्यावरील तथाकथित आरोप सिद्धही झालेले नसताना त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्याचे कारण काय?

आणि नितीशकुमार यांना नरेंद्र मोदी यांच्या नावाची इतकीच शिसारी आणि घृणा आहे, तर गेली अकरा वर्षे ते का गप्प बसले होते? गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर दंगल उसळली होती. तेव्हा केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असलेल्या नितीशकुमार यांनी नितीमत्तेचा आदर्श घालून राजीनामा का नाही दिला? त्यानंतरही भाजपशी सत्तासोबत करून नितीशकुमार दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री बनले. तथाकथित दंगलखोर नरेंद्र मोदी हे ज्या भाजपचे नेते आहेत, त्याच भाजपशी नितीशकुमार यांना चक्क सात वर्षे सत्तेसाठी घरोबा ठेवला. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी बाजूला व्हायचे होते. त्यामुळे कोणाची ताकद किती हे स्पष्ट झाले असते. भाजपला बिहारमध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ९१ जागा मिळाल्या आहेत. संयुक्त जनता दलामुळे भाजपचा फायदा झाला की भाजपमुळे नितीशकुमारांचा हे कळले असतेच. मात्र, आता ती आपल्या नेतृत्वाची लाट होती, अशा गैरसमजात आहेत. देशभर आपली लाट आहे, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा सल्ला नितीशकुमार मोदी यांना देत आहेत. मात्र, तोच सल्ला त्यांना बिहारसाठी लागू आहे, हे विसरू नये.



इतकी वर्षे भाजपशी सत्तासंगत केल्यानंतर अचानक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश यांना काडीमोड घ्यावासा वाटतो, हे सत्तेचे संधीसाधू राजकारण नाही तर काय? त्यामुळेच आता नितीशकुमारांना विचारावेसे वाटते, की ‘नितीशकुमार, तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म. तेव्हा कुठे गेली होती तुमची मूल्ये? त्यावेळीच सत्तेचा त्याग करून वेगळे का नाही झालात? इतकी वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर का ठाण मांडून होता?’

आता लोकसभा निवडणूक ज‍वळ आली आहे आणि नितीशकुमार यांना कदाचित पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. भारतीय राजकारणात एक गोष्ट मस्त आहे. इथे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या घातल्या, की लोक लगेच धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर होतात. जसं आयुष्यभर केलेली पापं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर धुवून निघतात, अशी लोकांची भाबडी आशा असते. तसेच काहीसे भारतीय राजकारणाचे आहे. भाजपशी शय्यासोबत करून सत्तेची खुर्ची पटकवायची. दुसरीकडे संधी आहे, असे लक्षात येताच भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आणि काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी घरोबा करुन पुन्हा सत्तेत सहभागी व्हायला मोकळे. मुख्य म्हणजे भाजपची साथ सोडणे, हाच सेक्युलर असण्याची प्रमुख अट आहे. ती अट पूर्ण केली की इतर सर्व पक्ष मैत्रीचा हात पुढे करण्यास मोकळे.

भारतात सेक्युलर असण्याची अट प्रचंड भंपक आणि बोगस आहे, की विचारता सोय नाही. पोलिसांना दूर ठेवा आणि आम्हाला पंधरा मिनिटे द्या, हिंदूंचे ‘कतले आम’ करून टाकतो, अशी भाषा करणारा हैदराबादमधील ‘एमआयएम’ हा धर्मांध मुस्लिमांचा पक्ष काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. तरीही काँग्रेस मात्र, सेक्युलर. केरळमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची मैत्री आहे. तरीही काँग्रेस धर्मनिरपेक्ष. ही काय भानगड आहे कळत नाही. म्हणजे भाजपशी वैर हीच सेक्युलर असण्याची मूळ आणि मुख्य अट आहे की काय, अशीच परिस्थिती आहे. ती अट पूर्ण करण्यासाठी नितीशकुमार यांना १७ वर्षांचा घरोबा मोडला.

आता ते कधी काळी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि अशा अनेक प्रादेशिक पक्षांची मोट बांधून पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून तयार होतील. कदाचित ज्या काँग्रेसविरोधात ते बिहारमध्ये लढले आणि लढत आहेत, त्या काँग्रेसचा पाठिंबाही घेतील. आतून नाही घेतला तर बाहेरून तरी घेतील. कारण ते स्वबळावर मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवू शकतील. मात्र, पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना भाजप किंवा काँग्रेसचाच आधार लागणार आहे. आता भाजप हा धर्मांध आणि जातीयवाद्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांचा पाठिंबा घेणे नितीशकुमार पसंत करणार नाहीत. त्यामुळे गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांच्या हत्या झाल्या तेव्हा सत्तेवर असलेल्या सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून नितीशकुमार नवा संसार थाटतील.

त्यांच्या या भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

12 comments:

Unknown said...

The People Betrayed (part 2)

Anonymous said...

truth and only truth

Anonymous said...

हे सर्व खरय मित्रा.. परंतु आतापर्यंत ते तुम्हाला ढोंगी का वाटले नाही.. तुमच्या बरोबर होते म्हणून??? तुमच्यापासून वेगळे झाले की ते ढोंगी आणि तुमच्या सोबत आले की ते मात्र खरे.. रामदास आठवले हे जोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर होते तो पर्यंत त्यांना शिव्या घातल्या. आता ते युतीत आल्याबरोबर ते चांगले झाले हे कसे काय बुवा.. अशा वेळेस खरे ढोंगी कोण हे कसे ठरविणार???
महत्त्वाचे म्हणजे आता भाजपमध्ये जो कोणी मोदींना विरोध करेल तो विरोधी होतोय.. जर नितीशकुमार ढोंगी असतील तर मा. अडवणीजीचाही मोदींना विरोध आहे. मग त्यांना तु्‌म्ही काय म्हणणार...

मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांचा जळफळाट होण्याचे कारण काय? हाच प्रश्न अडवाणीजींना मोदी प्रेमी विचारतील काय?? हा खरा प्रश्न आहे..

Anonymous said...

very good article.

Anonymous said...

अडवाणींचे मत लक्षात न घेताच त्यांचा मोदींना विरोध आहे असे म्हणणे हे 'भाजपला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षता' असे म्हणण्याइतकेच भम्पकपणाचे आहे……आशिष असल्या प्रतिक्रियांकडे तू दुर्लक्ष करशीलच …………बाकी लेख अतिशय सुंदर आणि रोखठोक!

Anonymous said...

harami nitish. shevati biharipana dakhavlach salanye

Anonymous said...

स्वतःचे नाव लपवून ठेवून कॉमेंट लिहिणाऱ्या व्यक्तींकडे मी नेहमीच दुर्लक्ष करतो... नाव देऊन प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर चर्चा करता आली असती... असो नाव देऊन प्रतिक्रिया व्यक्त करा. मग बोलता येईल.

आशिष चांदोरकर

Anonymous said...

Rajkaran.......... only Rajkaran..........! is the final Answer...!

Sanjay Miskin

Anonymous said...

भगवा 'केतकर'!

Devidas Deshpande

Anonymous said...

लेख अतिशय सुंदर आणि रोखठोक! हा मटा ने छापला तर ते खरे निष्पक्षपाती होवू इच्छितात असे दिसेल.

Nikhil Deo

Anonymous said...

:v :v B|

Anonymous said...

:v