Showing posts with label Nitish Kumar. Show all posts
Showing posts with label Nitish Kumar. Show all posts

Wednesday, July 26, 2017

ढोंगी आणि दुटप्पीपणाः भाग दोन

दीड वर्षांनंतर आठवला भ्रष्टाचार

काडीचीही नीतीमत्ता नसलेल्या, भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या आणि चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी बिहारमधील जनतेच्या साक्षीने संयुक्त जनता दलाच्या नितीशकुमार यांनी थाटलेला संसार अवघ्या दीड वर्षात संपुष्टात आला आहे. स्वतःहूनच हा संसार मोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे नितीशकुमार हे भोंदू, आणि दुटप्पी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी जेव्हा नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर असलेले सत्तासंबंध संपुष्टात आणले होते, तेव्हाही याच शब्दांमध्ये नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी वापरलेले भोंदू आणि दुटप्पी हे शब्द योग्यच असल्याचे नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 


नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाने प्रचार समितीचे अध्यक्ष केले म्हणून नितीशकुमार यांचा प्रचंड जळफळाट झाला असावा आणि म्हणून त्यांनी चार वर्षांपूर्वी भाजपबरोबरचा घरोबा संपुष्टात आणला. कारण दिले होते गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीचे. २००२मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाची नव्हे, तर त्यानंतरच्या उसळलेल्या दंगलीची दाहकता समजायला नितीशकुमार यांना २०१३ उजाडले, ही त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करायला लावणारी गोष्टच म्हटली पाहिजे. बरं, दरम्यानच्या काळात त्यांनी एकदा रेल्वेमंत्रीपद आणि दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवून घेतले होते. तेव्हा मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उसळलेल्या दंगलीची धग नितीशना जाणवली नव्हती. अचानकपणे २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना ही धग जाणवली आणि त्यांनी भाजपबरोबरचे संबंध संपुष्टात आणले. 

नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. स्वतःच्याच पक्षाचे जीनत राम मांझी यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदी बसविले. मात्र, सूत्रे सर्व स्वतःच्याच हातात ठेवली. मांझी हे भाजपच्या बाजूला झुकत आहेत आणि आपले ऐकेनासे होत आहेत, हे समजल्यानंतर नितीश यांनी स्वतः केलेली चूक सुधारली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वतःकडे घेतली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाचा सुपडा साफ झाल्यानंतर मग नितीशकुमार यांनी महागठबंधनची स्वप्ने पडू लागली. अर्थातच, स्वतःचे आणि स्वतःच्या राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी. 


तेव्हा नरेंद्र मोदी द्वेषाने पछाडलेल्या नितीशकुमार यांना भाजपला येनकेन प्रकारेण भाजपला अस्मान दाखवायचे होते. त्यातूनच महागठबंधनची निर्मिती झाली आणि कधीकाळी काँग्रेसला शिव्या देणारे नितीशकुमार काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. चारा घोटाळ्यात शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत त्यांनी निवडणूकपूर्व युती करण्याचे निश्चित केले आणि बिहारमध्ये काँग्रेस, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलाची अभद्र युती अस्तित्वात आली. 

लालूप्रसाद यादव यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, हे नितीशकुमार यांना दिसले नाही की त्यांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी तीन ऑक्टोबर २०१३मध्येच पाच वर्षांसाठी कारावास ठोठावला होता. म्हणजेच महागठबंधन अस्तित्वात येण्यापूर्वीच ही शिक्षा जाहीर झाली होती आणि लालूप्रसाद यांच्या भ्रष्ट कृत्यांवर कायदेशीर शिक्कामोर्तबही झाले होते. मग असे असतानाही नितीशकुमार यांनी लालूंच्या भ्रष्ट कारकिर्दीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केलाच का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या झंझावाताला रोखण्यासाठी आपण एकटे पुरे पडणार नाही, हे त्यांना पुरेपूर माहिती होते. म्हणूनच त्यांनी काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव या एकेकाळच्या स्वतःच्या कट्टर विरोधकांच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला. काँग्रेस ना धुतल्या तांदळासारखी होती ना लालूप्रसाद. हे माहिती असूनही नितीश त्यांच्यासोबत गेले. 

हेच नितीशकुमार यांचा दुटप्पी आणि ढोंगीपणा सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे. आता तेजस्वी यादव यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी नितीशकुमार राजीनामास्त्राचा वापर करीत आहेत. मात्र, भ्रष्ट लालूप्रसादांशी सलगी करताना तुम्हाला त्यांचा भ्रष्टाचार दिसला नव्हता का? की ‘कंदिला’चा प्रकाश मंद असल्याने तुम्हाला त्याची जाणीव झाली नव्हती? लालूप्रसाद यादव हे काय आहेत, हे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. मग असे असतानाही फक्त सत्ता मिळविण्यासाठी तुम्ही लालूप्रसादांच्या पक्षाशी विवाह केला. दीड वर्षे मजा मारली आणि आता स्वतःवर बदफैलीचे शिंतोडे उडू नये, म्हणून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहात. मुळात ज्या व्यक्तीने स्वतःचे चारित्र्य बाजारात विकले आहे, अशा व्यक्तीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेणे हाच मूर्खपणा आहे. माहिती असतानाही अशा व्यक्तीशी विवाह करायचा आणि दीड वर्षानंतर तो कसा चारित्र्यहीन आहे, याचा दाखला देत वेगळे व्हायचे, हे एक तर मूर्खपणाचे लक्षण आहे. किंवा ढोंगी आणि दुटप्पीपणाचे. तुम्ही त्यापैकी दुसऱ्या गटातील आहात, असे निश्चितपणे वाटते. 


स्वतःची प्रतिमा विकासपुरुष अशी रंगविण्यासाठी धडपडणाऱ्या नितीशकुमारांचे वर्णन ढोंगी पुरुष असेच करावेसे वाटते. विचारांचा आणि तत्वांचा फारसा मुलाहिजा न बाळगता सत्तेसाठी किंवा वैयक्तिक इर्ष्येसाठी राजकीय सोयरिक करणारा दुटप्पी राजकीय नेता हीच नितीशकुमार यांची ओळख असल्याचे दुसऱ्यांदा स्पष्ट झाले आहे. फरक इतकाच की, तेव्हा भारतीय जनता पक्षाची आणि नरेंद्र मोदी यांची साथ सोडल्यामुळे नितीशकुमार भाजप कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवकांच्या टीकेचे धनी झाले होते. आज त्यांनी लालूप्रसादांना अलविदा केल्यामुळे ते राजदच्या आणि तमाम तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या टीकेचे धनी झाले आहेत. 

नितीश हे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत असून, गुरुवारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संयुक्त बैठक होत आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षांचा संसार पुन्हा एकदा सुरू होणार आहे. गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर कोणताही आरोप नव्हताच. तरीही त्या मुद्द्याचा थयथयाट करून नितीश यांनी मुख्यमंत्रीपद सोडले होते नि भाजपसोबतची सोयरिक संपुष्टात आणली होती. मग आता नितीश हे कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी सूत जुळवून घेत आहेत. २०१३ आणि २०१७ च्या परिस्थितीत असा काय बदल झाला आहे. गुजरात दंगल आणि मोदी यांच्या अनुषंगाने काहीही घडामोडी घडलेल्या नाहीत. असे असतानाही नितीश यांनी नरेंद्रच्या मोदींना मिठी मारण्याचे धाडस केले आहे.

वास्तविक पाहता, भाजपने त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था काय केली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. असे असतानाही नितीश हे भाजपच्या गोटात सहभागी होत आहेत. मित्रपक्षांना संपविण्याचा विडा उचलणाऱ्यांच्या कवेत स्वतःहून जाणाऱ्या नितीशकुमार यांना भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा… सरड्याइतकेच रंग बदलणारे नितीशकुमार उद्या फायद्यासाठी मोदींनाही टांग दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे नितीशकुमार यांना आपल्या गोटात घेऊन काँग्रेसी आणि तिसऱ्या आघाडीची कशी जिरविली, अशा भ्रमात भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी अजिबात राहू नये.

....
नितीश यांनी भाजपबरोबरचा संसार मोडल्यानंतरचा ब्लॉग वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा...

भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता

Sunday, June 16, 2013

भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता

नितीशही दुटप्पी नि भोंदू




‘भारत हा ढोंगी आणि संधीसाधू राजकारण्यांचा देश आहे, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नरेंद्र मोदी यांचा बागुलबुवा करीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दबावामुळे संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भारतीय जनता पक्षाबरोबरील १७ वर्षांचा संसार मोडला आणि नितीशकुमार यांचा ढोंगी आणि सत्तापिपासू चेहरा पहिल्यांदा देशासमोर आला. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हाच नितीशकुमार यांना काडीमोड घ्यायचा होता. मात्र, निमित्त लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याचे झाले आणि नितीशकुमार यांनी नैतिकतेचा थयथयाट करीत भाजपबरोबरील युतीला अलविदा केला. झाले ते बरेच झाले. नैतिकतेच्या नावाखाली सत्तांधतेचा आणि ढोंगीपणाचा बुरखा वावरून हिंडणाऱ्या नितीशकुमार यांचे वस्त्रहरण झाले असून नीतिमूल्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे.

नरेंद्र मोदी यांना फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही. मोदी हे देशभरात लोकप्रिय आहेत. मध्यमवर्गीय, तरुण आणि महिलांची त्यांना विशेष पसंती आहे. गुजरातच्या निवडणुकीत फेसबुक-टि्वटरपासून ते थ्रीडी सभांपर्यंत वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा त्यांना आणि अर्थातच, पक्षालाही झाला. त्यांची हीच दूरदृष्टी आणि लोकप्रियता यांचा फायदा मिळविण्यासाठी त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद दिले तर बिघडले कुठे? मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांचा जळफळाट होण्याचे कारण काय?

नितीशकुमार यांना दोनवेळा बिहारच्या जनतेने निवडून दिले आहे, तर मोदी यांना तीनवेळा गुजरातच्या नागरिकांनी जनादेश दिला आहे. नितीशकुमार हे भाजपबरोबर युती करून निवडून आले आहेत. तर मोदी यांनी स्वबळावर सत्ता खेचून आणली आहे. एखाद वर्षाचा कालावधी वगळता १९९४ पासून गुजरात हे राज्य भाजपच्याच पाठिशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे मोदी काल राजकारणात आले आणि आज त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद मिळाले नाही, अशी परिस्थिती नाही. बिहारमध्ये महापूर आला तेव्हा, नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारने मोठ्या मनाने मदत पाठविली. पण ती मदत हेकेखोर नितीशकुमार यांनी नाकारली. वास्तविक पाहता, ती मदत मोदी यांनी स्वतःच्या खिशातून पाठविलेली नव्हती. त्यामुळे ती स्वीकारायला काहीच हरकत नव्हती. पण नितीशकुमार यांनी गुजरातची मदत नाकारून स्वतःच्या कोत्या मनाचेच दर्शन घडविले. 

राहता राहिली गोष्ट नरेंद्र मोदी यांच्यावरील गोध्रा दंगलीच्या ठपक्याची. जे झाले ते सर्व लोकांसमोर आहे. स्वयंसेवी संस्थांपासून ते सीबीआयपर्यंत आणि काही आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते केंद्रातील सरकारपर्यंत अनेक जण पिसाटल्यासारखे मोदी यांच्या मागे लागले आहेत. मात्र, कोणालाही मोदी यांच्याविरोधात काहीही सापडलेले नाही. मोदी यांचा गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हात आहे, हे कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. कायद्याच्या दृष्टीने ते निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ठपका नाही. मग असे जर असेल तर त्यांचे नाव ऐकताच अंगाचा तिळपापड व्हायचे कारण काय? महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळणारे किंवा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नवी दिल्लीत शिखांची घरे जाळणारे, शिंखांचे शिरकाण कोण आहेत, हे उघड गुपित आहे. मात्र, त्यापैकी अद्यापही कोणीही कायदेशीरदृष्ट्या दोषी सिद्ध झालेले नाही. अशी मंडळी उजळ माथ्याने राजकारण आणि समाजकारणात वावरत आहेत. असे असताना मोदी यांच्यावरील तथाकथित आरोप सिद्धही झालेले नसताना त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्याचे कारण काय?

आणि नितीशकुमार यांना नरेंद्र मोदी यांच्या नावाची इतकीच शिसारी आणि घृणा आहे, तर गेली अकरा वर्षे ते का गप्प बसले होते? गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर दंगल उसळली होती. तेव्हा केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असलेल्या नितीशकुमार यांनी नितीमत्तेचा आदर्श घालून राजीनामा का नाही दिला? त्यानंतरही भाजपशी सत्तासोबत करून नितीशकुमार दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री बनले. तथाकथित दंगलखोर नरेंद्र मोदी हे ज्या भाजपचे नेते आहेत, त्याच भाजपशी नितीशकुमार यांना चक्क सात वर्षे सत्तेसाठी घरोबा ठेवला. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी बाजूला व्हायचे होते. त्यामुळे कोणाची ताकद किती हे स्पष्ट झाले असते. भाजपला बिहारमध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ९१ जागा मिळाल्या आहेत. संयुक्त जनता दलामुळे भाजपचा फायदा झाला की भाजपमुळे नितीशकुमारांचा हे कळले असतेच. मात्र, आता ती आपल्या नेतृत्वाची लाट होती, अशा गैरसमजात आहेत. देशभर आपली लाट आहे, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा सल्ला नितीशकुमार मोदी यांना देत आहेत. मात्र, तोच सल्ला त्यांना बिहारसाठी लागू आहे, हे विसरू नये.



इतकी वर्षे भाजपशी सत्तासंगत केल्यानंतर अचानक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश यांना काडीमोड घ्यावासा वाटतो, हे सत्तेचे संधीसाधू राजकारण नाही तर काय? त्यामुळेच आता नितीशकुमारांना विचारावेसे वाटते, की ‘नितीशकुमार, तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म. तेव्हा कुठे गेली होती तुमची मूल्ये? त्यावेळीच सत्तेचा त्याग करून वेगळे का नाही झालात? इतकी वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर का ठाण मांडून होता?’

आता लोकसभा निवडणूक ज‍वळ आली आहे आणि नितीशकुमार यांना कदाचित पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. भारतीय राजकारणात एक गोष्ट मस्त आहे. इथे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या घातल्या, की लोक लगेच धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर होतात. जसं आयुष्यभर केलेली पापं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर धुवून निघतात, अशी लोकांची भाबडी आशा असते. तसेच काहीसे भारतीय राजकारणाचे आहे. भाजपशी शय्यासोबत करून सत्तेची खुर्ची पटकवायची. दुसरीकडे संधी आहे, असे लक्षात येताच भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आणि काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी घरोबा करुन पुन्हा सत्तेत सहभागी व्हायला मोकळे. मुख्य म्हणजे भाजपची साथ सोडणे, हाच सेक्युलर असण्याची प्रमुख अट आहे. ती अट पूर्ण केली की इतर सर्व पक्ष मैत्रीचा हात पुढे करण्यास मोकळे.

भारतात सेक्युलर असण्याची अट प्रचंड भंपक आणि बोगस आहे, की विचारता सोय नाही. पोलिसांना दूर ठेवा आणि आम्हाला पंधरा मिनिटे द्या, हिंदूंचे ‘कतले आम’ करून टाकतो, अशी भाषा करणारा हैदराबादमधील ‘एमआयएम’ हा धर्मांध मुस्लिमांचा पक्ष काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. तरीही काँग्रेस मात्र, सेक्युलर. केरळमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची मैत्री आहे. तरीही काँग्रेस धर्मनिरपेक्ष. ही काय भानगड आहे कळत नाही. म्हणजे भाजपशी वैर हीच सेक्युलर असण्याची मूळ आणि मुख्य अट आहे की काय, अशीच परिस्थिती आहे. ती अट पूर्ण करण्यासाठी नितीशकुमार यांना १७ वर्षांचा घरोबा मोडला.

आता ते कधी काळी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि अशा अनेक प्रादेशिक पक्षांची मोट बांधून पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून तयार होतील. कदाचित ज्या काँग्रेसविरोधात ते बिहारमध्ये लढले आणि लढत आहेत, त्या काँग्रेसचा पाठिंबाही घेतील. आतून नाही घेतला तर बाहेरून तरी घेतील. कारण ते स्वबळावर मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवू शकतील. मात्र, पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना भाजप किंवा काँग्रेसचाच आधार लागणार आहे. आता भाजप हा धर्मांध आणि जातीयवाद्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांचा पाठिंबा घेणे नितीशकुमार पसंत करणार नाहीत. त्यामुळे गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांच्या हत्या झाल्या तेव्हा सत्तेवर असलेल्या सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून नितीशकुमार नवा संसार थाटतील.

त्यांच्या या भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…