Showing posts with label Advertising. Show all posts
Showing posts with label Advertising. Show all posts

Friday, May 02, 2014

मोदी आनेवाला है...

लाखभर गावांत प्रचार रथांचा माहोल

भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घवघवीत यश मिळविणे आवश्यक आहे, हे नरेंद्र मोदी यांनी ओळखले आणि अमित शहा यांच्यावर महत्त्वपूर्ण अशा उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली. मोदी यांचे अत्यंत जवळचे असलेल्या अमित शहा यांनी प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांची अदलाबदली केली. त्यांना 'कट टू साइज' केले. मात्र, एवढेच करून भागणार नव्हते. फक्त एवढेच करून यश मिळणार नाही, हे त्यांना माहिती होते. गावागावांपर्यंत जाऊन आणि नरेंद्र मोदींचे नाव पोहोचविण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागणार होते. भाजपची यंत्रणा आणि नेटवर्क होतेच. मात्र, त्याच्यावर अवलंबून राहण्यास अमित शहा तयार नव्हते. त्यांना त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावागावांपर्यंत पोहोचायचे होते. त्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आली सीएजी... अर्थात, सिटीझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स... अमित शहा आणि सुनील बन्सल यांच्या डोक्यातून ही आयडिया आली आहे. उत्तर प्रदेशात जर खरोखरच पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्यास त्याचे निम्मे श्रेय सीएजीला देण्याइतपत जबरदस्त काम त्यांनी केले आहे. 



सीएजीने असं काय काम केलंय बुवा... काही माध्यमांमध्ये याबद्दल थोडेफार छापून आले आहे. काही प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली आहे. थोडे अधिक सविस्तर सांगणे उचित आहे, असे मला वाटते म्हणून हा ब्लॉग. शंभर ते दीडशे उच्चशिक्षित व्यावसायिकांनी एकत्रित येऊन सीएजी ही संस्था सुरू केली आहे. यात सॉफ्टवेअर इंजीनिअर, आयआयटीयन्स, आयआयएम झालेले, माध्यमांचे प्रतिनिधी, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकिल, जाहिरात क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, सेफॉजॉलिस्ट असे विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये आहेत. एक वर्ष मोदींसाठी, एक वर्ष उत्तम सरकारच्या निर्मितीसाठी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मंडळींनी व्यावसायिक कारकिर्दीचं एक वर्ष संस्थेसाठी देण्याचं निश्चित केलं. देशभरात संस्थेचे दहा ते पंधरा हजार स्वयंसेवक आहेत. चाय पे चर्चा, मोदींच्या थ्री डी सभा, स्टॅच्यु ऑफ युनिटी, युनिटी दौड वगैरे कार्यक्रमही याच संस्थेच्या मार्फत राबविण्यात आले होते. 

उत्तर प्रदेशातील 80 हजार गावांपर्यंत पोहोचण्याचं प्लॅनिंग या संस्थेनं केलं. या गावांमध्ये पोहोचण्यासाठी सुमारे चारशे ते साडेचारशे  'मोदी आनेवाला है...'  रथांची निर्मिती करण्यात आली. मोदी आनेवाला है... म्हणजे तुमच्या गावात मोदी येणार आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे देशभरातही मोदीच येणार आहे असाही अर्थ. बिहारमध्येही अशाच पद्धतीने रथ तयार करण्यात आले असून त्याचे नाव मात्र, वेगळे देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील 80 हजार गावांची निवड करण्यात आली. टप्प्या टप्प्यानुसार हे रथ कोणत्या गावांमध्ये जाणार याचे प्लॅनिंग करण्यात आले. कोणत्या दिवशी कोणता रथ कोणत्या गावात असेल, तो कोणत्या मार्गाने जाईल, संबंधित गावामध्ये प्रचार केल्यानंतर तो कोणत्या मार्गाने कुठे जाईल, रात्री कुठे थांबेल याचे सविस्तर नियोजन करून त्याची माहिती 15 मार्च 2014 रोजीच निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. रथामध्ये कोणकोण असेल, ते कुठले आहेत, वगैरेची माहिती देण्यात आली होती. पूर्वी असे रथ तयार व्हायचे. मात्र, निवडणूक आयोगाची मान्यता वेळेत न मिळाल्याने ते तसेच पडून रहायचे, असा अनुभव होता. त्यामुळे आम्ही आधीच सर्व प्लॅनिंग करून मान्यता मिळविली, असे या टीमचा प्रमुख सदस्य असलेल्या ऋषिराज सिंह याने सांगितले.  


 प्रत्येक रथामध्ये एक एलईडी किंवा एलसीडी, जनरेटर, स्पीकर, माईक आणि भाजपचे प्रचार साहित्य जसे उपरणी, टोप्या, पत्रके, स्टीकर्स, पॉकेट कॅलेंडर, झेंडे वगैरे वगैरे आहे. हा प्रचार रथ गावात गेल्यानंतर गावात फिरून तो नागरिकांना गावातील एका ठिकाणी येण्याचे आवाहन करतो. मोदी आणि भाजपच्या प्रचाराची गाणी लावण्यात आलेली असतात. विशिष्ट ठिकाणी मंडळी एकत्र आल्यानंतर मग त्यांच्यासमोर मोदींच्या भाषणाची सोळा मिनिटांची क्लिप दाखविली जाते. त्यामध्ये मोदी मी इथे का आलो, मी गुजरातमध्ये काय केले आहे, देशात काय करायचे आहे, मला मत द्या वगैरे वगैरे मुद्दे मांडतात. नंतर आलेल्या लोकांना प्रचार पत्रके आणि इतर साहित्याचे वाटप होते. एका गावात असा प्रचार केल्यानंतर हा रथ दुसऱ्या गावात मार्गस्थ होतो. 

दुसऱ्या गावातही अशाच पद्धतीने प्रचार. अर्थात, प्रचार रथ व्यवस्थितपणे काम करतो आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी त्रिस्तरीय किंवा चार स्तरीय यंत्रणा उभारण्यात आली आहे. प्रचार रथामध्ये तीन जण असतात. एक ड्रायव्हर, एक भाजपचा कार्यकर्ता आणि एक सीएजीचा स्वयंसेवक. गावात गेल्यानंतर प्रचार रथाने काय काय केले, त्याचा गावकऱ्यांवर काय परिणाम झाला, त्यांना मोदींचे भाषण ऐकून काय वाटले, याचा फॉलोअप घेण्यासाठी कॉलसेंटरची व्यवस्था आहे. मोदींच्या त्या भाषणासाठी उपस्थित असलेल्यांचे संपर्क क्रमांक घेऊन ते मुख्य ऑफिसकडे पाठविले जातात. गावातील काही जणांचे क्रमांक आधीच जमा केलेले आहेत. अशा दोघांशीही संपर्क साधून भाषण आणि एकूणच आयडिया कशी वाटली, याचा फॉलोअप घेतला जातो. प्रचार रथ येऊन गेल्यानंतर गावातील वातावरण कसे होते, याची माहिती घेतली जाते.


दुसरे म्हणजे ड्रायव्हर आणि सीएजीच्या स्वयंसेवकांशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली जाते. लोकांचा प्रतिसाद कसा आहे, हे त्यांच्याकडूनही जाणून घेण्यात येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व गाड्यांना जीपीएस यंत्रणा आहे. त्यामुळे सध्या वाहन ठरलेल्या नियोजनाप्रमाणे काम करते आहे किंवा नाही, मोदी प्रचार रथ कुठे आहे, प्रचार रथ चालविताना ड्रायव्हर ओव्हरस्पिडिंग करतो का... अशी इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मुख्य कार्यालयात बसलेल्या मंडळींना मिळत असते. गाडीला चावी लागली आहे किंवा नाही, इतकी बारीक माहिती मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. आता बोला. 

इतकेच नाही, तर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात भाजप कुठे मजबूत आहे आणि कुठे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोणत्या बूथवर आपले मतदार अधिक आहेत आणि तिथून सर्वाधिक मतदान व्हायला पाहिजे इतकी बारीकसारीक माहिती सीएजीने गोळा केली आहे आणि वेळोवेळी त्याचा उपयोग केला जातो आहे. भाजप कार्यकर्त्यांना ती पुरविली जाते आणि त्यातून पुढील नियोजन केले जाते, असे ऋषिराज सिंहने सांगितले. 


आताच जवळपास 80 हजार गावांपर्यंत संपर्क झाला असून आणखी वीस हजार म्हणजे एकूण एक लाख गावांपर्यंत आम्ही पोहोचू, असे ऋषिराज सांगतो. गावात पोहोचल्यानंतर शक्यतो कोणीही विरोध करीत नाही. लोक ऐकून घेतात, आवडीने पाहतात. एकूण 80 हजार गावांपैकी फक्त पंधरा ते वीस गावांमध्येच आम्हाला विरोध झाला आणि मोदींच्या भाषणाची टेप लावू दिली नाही. काही ठिकाणी रथावर दगडफेक झाली. टीव्ही फोडण्यात आले इत्यादी इत्यादी. मात्र, दोन तासांमध्ये सर्व साहित्य रिप्लेस करण्याची व्यवस्था आम्ही तयार ठेवली आहे. त्यामुळे प्रचार रथ पुढे जातच राहतो, खोळंबून राहत नाही.

उत्तर प्रदेशातील फक्त दोन टप्पे बाकी असून राज्यातील सर्व मोदी वाहन आता त्या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या गावांमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. गाडीपासून ते एलईडी-एलसीडी आणि इतर साहित्य भाड्याने घेण्यात आलेले असून निवडणुकीनंतर ते परत करण्यात येणार आहे. त्यामुळे ते पुढे सांभाळण्याची जबाबदारी पक्षावर किंवा संस्थेवर असणार नाही. वर्षाखेरीस महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात मोदी आनेवाला है.. रथाला घवघवीत यश मिळाले तर कदाचित महाराष्ट्रातही अशा पद्धतीने गावागावांमध्ये भाजपचे रथ पोहोचताना नक्की दिसू शकतील. 


एक मात्र नक्की की उत्तर प्रदेशात मिशन फिफ्टी प्लस... चे ध्येय गाठण्यासाठी मोदी आनेवाला है... रथाचा पुरेपूर उपयोग झालेला आहे.