
सध्या तुम्ही दिवाळीच्या फराळाचा फडशा पाडत असणार...! होऊ द्या व्यवस्थित फराळ...पण फराळाचे खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर चवीत थोडासा "चेंज' तुम्हाला नक्कीच हवासा वाटेल. फराळाच्या गोडधोड पदार्थांनंतर चटकदार असे काही तरी पाहिजेच ना? मग अगदी बिनधास्तपणे "सिगरी'मध्ये जा!
ढोले-पाटील रस्त्यावर हे "रेस्तरॉ' आहे. "स्पेशालिटी रेस्तरॉ ग्रुप'ने 2006 मध्ये सुरू केलेल्या "सिगरी'चे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक इंटिरियर, शेगडीतील प्रज्वलित अग्नी भासावा अशा पद्धतीने केलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशरचना, मंद प्रकाशाच्या जोडीला हळुवार आवाजातील मधुर संगीत, अत्यंत सुटसुटीत आसनव्यवस्था व तत्पर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणारे आदरातिथ्य!
शिवाय संध्याकाळी "एसी'ऐवजी मोकळ्या हवेत बसून खाण्याचा आस्वाद घेण्याची सुविधाही "सिगरी'मध्ये आहे. संध्याकाळी "बार्बेक्यू'चा पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. "बार्बेक्यू' म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एका टेबलच्या खालच्या बाजूने मध्यभागी कोळशाची शेगडी ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. त्या शेगडीवर तुम्ही तुम्हाला हवे तशा पद्धतीने कबाब भाजून खाऊ शकता. हेच बार्बेक्यू.
"सिगरी'ची खासियत असलेल्या "कबाब'वरच तुम्ही अधिक ताव मारावा, अशा स्वरूपाची योजना आखण्यात आली आहे. ही योजना म्हणजे, "बार्बेक्यू'मध्ये तुमच्या आवडीचे कबाब हवे तितके भाजून मनसोक्त खा. "अनलिमिटेड' कबाब खाल्ल्यानंतर जर तुम्हाला, एखादी रोटी, "ग्रेव्ही'युक्त व्हेज अथवा नॉनव्हेज पदार्थ व बिर्याणी खायची असेल तर तुम्हाला नव्याने "ऑर्डर' देण्याची गरज नाही. तुमच्यासाठी "बुफे' तय्यार! "सिटिंग' व "स्टॅंडिंग' अशा दोन्ही प्रकारात "बुफे' उपलब्ध आहे. "अनलिमिटेड' कबाब खाल्ल्यानंतर "बुफे'मध्ये तुमच्यासाठी दोन व्हेज सब्जी, एक नॉनव्हेज पदार्थ, रोटी, लच्छा पराठा, दाल, व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी आणि एक "डेझर्ट' किंवा "फ्रुट प्लेट' असा भरगच्च मेनू ठेवण्यात आला आहे.
उत्तर भारतीय पदार्थ ही "सिगरी'ची खासियत. पण त्यातही पसंती द्या कबाबलाच! मखमली मकई सिक, मुलतानी चाट, पनीर रावळपिंडी, शबनम कस्तुरी यांच्यासह दहा ते बारा "व्हेज' व अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब तयार आहेत. शाकाहारी पदार्थांच्या यादीत तवा सब्जी, काश्मिरी दम आलू, जाफरानी मलई कोफ्ता, पिंड दा चना व कुरकुरी भिंडी यांच्यासह अनेक पदार्थांची रेलचेल आहे. पण "दाल सिगरी' नक्की "ट्राय' करा. मसुरीची डाळ, टोमॅटो प्युरी व लोणी यांच्यापासून तयार केलेली "दाल सिगरी' खाण्यासाठीच काही जण येथे येतात.
दही मेथी मछली, कोलकत्याहून खास येणाऱ्या माशापासून बनविलेला तंदुरी बेटकी मसाला, गोश्त लजीज, मुर्ग खुर्चन यांच्याप्रमाणेच "धनिया मुर्ग' ही "सिगरी'ची "स्पेशालिटी'. धने व कोथिंबीर यांच्या "गेव्ही'पासून बनविलेल्या "धनिया मुर्ग'चा स्वाद काही औरच! "डेझर्ट'च्या यादीत काश्मिरी "फिरनी', कमळाच्या बिया वापरून बनविलेले "मखनावाली आइस्क्रीम' आणि "मालपुवा विथ रबडी' या थोडाशा "हट के' पदार्थांचा समावेश आहे.
सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 ते रात्री अकरा या वेळेत "सिगरी' सुरू असते. ढोले-पाटील रस्त्यासारख्या "पॉश' वस्तीमधील हे "चकाचक' रेस्तरॉ इतरांपेक्षा अंमळ महागच आहे; पण "बोनस'युक्त दिवाळीनिमित्त हा वेगळा अनुभव घ्यायला काय हरकत आहे?
सिगरी रेस्तरॉ,
"सिटी टॉवर्स' इमारत,
ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.