
बटाटा, पनीर, मिक्स व्हेज किंवा इतर अनेक गोष्टींचं सारण घातलेला गरमागरम पराठा, त्यावर इकडं तिकडं पसरत जाणारं बटर, सोबत छोले किंवा एखादी पंजाबी भाजी, लोणचं आणि कोशिंबीर असं पोटभर "कॉम्बिनेशन' जिथं मिळतं अशा "हॉट स्पॉट'कडं खवय्याची पावलं वळालीसुद्धा आहेत. फर्ग्युसन रस्त्यावरचं चैतन्य, लक्ष्मी रस्त्यावर हमजेखान चौकाजवळचं शाहजीज् पराठा हाऊस व ढोले-पाटील रस्त्यावरचं "नन्दू'ज पराठा हाऊस इथं गेल्यानंतर पराठ्याच्या लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येतो.
नन्दू'ज पराठा
पुण्यात पराठा लोकप्रिय कोणी केला, असा प्रश्न विचाराल तर "नन्दू'ज पराठा हाऊस'नं असं उत्तर साहजिकपणे येतं. नंदकुमार थदानी यांचा पराठा खाऊ घालण्याचा व्यवसाय यापूर्वी पोलिस आयुक्त कार्यालयासमोरील "गीता ज्यूस बार' किंवा नेहरु मेमोरियल हॉल समोरील "कैलास सेंटर' इथं सुरु होता. तिथून पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ढोले-पाटील रस्त्यावर "नन्दू'ज पराठा हाऊस सुरु केलं.
छोट्या जागेत आणि दिखाऊपणावर विशेष भर न देता चविष्ट पदार्थ देण्यावर थदानी यांचा भर आहे. आलू, पनीर, चीज या पारंपरिक पराठ्यांबरोबरच कॉर्न, कॅप्सिकम आणि चीज पराठा हे "नन्दू'जचं वैशिष्ट्यं! मक्याचे दाणे, ढोबळी मिरची आणि चीज यांच्या एकत्रिकरणातून आलेली भन्नाट चव खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. गरमागरम पराठा, चमचाभर बटर, सोबतीला गोड दही आणि कांदा-टॉमेटो यांचं सॅलेड अशी खचाखच भरलेली डिश समोर आली की पराठा संपविल्याशिवाय अक्षरशः थांबवत नाही.
"नन्दू'जकडे राजमा, छोले, आलूमटर, मटार, वांग्याचे भरीत, मलई कोफ्ता, पनीर कुर्मा, पनीर शाही, चीज करी आणि काजू करी अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून तयार केलेले पराठेही उलब्ध आहेत. "काजू करी' पराठा हा थोडासा हटकेच म्हटला पाहिजे.
शाहजीज पराठा हाऊस
एकावेळी चार "स्टफ' पराठे खा व बिल देऊ नका. सोबतीला घरापासून हॉटेलपर्यंत व परतीचे रिक्षाचे भाडेही मिळवा, अशी योजना राबविणारे हॉटेल म्हणजे शाहजीज पराठा हाऊस. शाहजीजचा एक पराठा सहजपणे संपतो. पण दुसरा पराठा कसाबसा संपवावा लागतो. अशा परिस्थितीत तब्बल चार-चार पराठे खाणारे वीस पुणेकर शाहजीजच्या जयदीप मनचंदा यांना मिळाले आहेत. पण केवळ या "स्किम'मुळे हॉटेल प्रसिद्ध नाही. तर तेथील खाद्यपदार्थांची चव एकदा चाखली की त्याच्या प्रेमातच पडायला होतं.
पराठा थाळी, अमृतसरी नान थाळी, छोले-भटुरे, दही भल्ले आणि पतियाळा लस्सी असे उत्तर भारतातील वैविध्यपूर्ण पदार्थ येथे मिळतात. इथलं वेगळेपण म्हणजे पापड आणि राईस पराठा. आलू, गोबी, मेथी, कांदा, मुळा, पनीर, चीज यापैकी एक पराठा, दाल माखनी, एक भाजी, बुंदी रायता, लोणचं, रायता, चटणी आणि बटरचा एक "क्यूब' अशी भरगच्च थाळी म्हणजे पराठा थाळी. अमृतसरी नान थाळी हा इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार. दोन "स्टफ' नान (कुलचे), दाल माखनी, चना मसाला, बुंदी रायता, रायता, सॅलाड, चटणी आणि बटर "क्यूब' यांचा या थाळीत अंतर्भाव असतो. पतियाळा लस्सी तर चौघांमध्ये एक पुरते.
दहीभल्ले म्हणजे "किंग ऑफ चाट' असं मनचंदा म्हणतात. उडीद डाळीपासून थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनविलेले वडे, मैद्यापासून बनविलेली पापडी, छोले, त्यावर घट्ट व गोड दही, चवीला हिरवी आणि कैरी-कोकम यांच्यापासून बनविलेली लाल चटणी! हे सर्व पदार्थ मनचंदा यांच्या आईच्या कल्पनेतून तयार झालेले आहेत. त्यांची आई अजूनही येऊन भटारखान्यात लक्ष ठेवते. "शाहजीज'मधील चार पराठे खाण्याची स्पर्धा तात्पुरती बंद होती. पण आता ती पुन्हा सुरु करण्यात येणार असून ग्राहकांनी पूर्वसूचना देऊनच येण्याची विनंती करण्यात आली आहे.
चैतन्य पराठा हाऊस
पुण्यामध्ये "कॉम्बिनेशन' पराठा देण्याची सुरवात प्रथम केली ती चैतन्यनं. आलू-चीज, गोबी-चीज, मेथी-कॉर्न, कॉर्न-चीज, मेथी-चीज, कांदा-राजमा अशी अफलातून "कॉम्बिनेशन'चे पराठे येथे आपल्याला मिळतात. इथल्या पराठ्याचा आकार अंमळ जास्त मोठा आहे. नेहमीचे पराठे, अस्सल पंजाबी चवीच्या भाजी, अमृतसरी पनीर, पतियाळा थाळी, दाल माखनी, असा भरगच्च मेन्यू आपल्याला चैतन्यमध्ये मिळतो.
चव तर आहेच पण प्रशस्त जागा आणि निवांतपणा हे इथलं वैशिष्ट्य. राजेश मांगिरा आणि समीरा भगली यांच्या भागीदारीतून चैतन्य पराठा हाऊस सुरु झाले. फर्ग्युसन रस्त्याप्रमाणेच आता कोथरुड आणि कोरेगाव पार्क येथील खवय्यांच्या सेवेला ही मंडळी रुजू झाली आहेत. शिवाय पराठा हाऊस शेजारीच सामिष भोजन आवडणाऱ्यांसाठी स्वतंत्र हॉटेल चैतन्यनं सुरु केलं आहे. अर्थात, दोन्हीचे भटारखाने व बल्लव वेगवेगळे असल्याने अगदी बिनधास्तपणे जायला हरकत नाही. काही खासगी बॅंकांना दुपारचं जेवण पुरविण्याचं कंत्राटही "चैतन्य'कडं आहे.
इथं जाणवणारं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथं बडीशेप बरोबर गूळही दिला जातो. भरपेट जेवल्यानंतर गूळ पाचकाचे काम करतो. त्यामुळे पंजाबमध्ये किंवा उत्तर भारतात जेवल्यानंतर गूळ खाण्याची पद्धत आहे. तीच पद्धत ते इथंही राबवत आहेत.
Nandu's Paratha House - (020) 26054366
Shahji's Paratha House - (020) 24477810, 24463000.