Showing posts with label Din Din Diwali. Show all posts
Showing posts with label Din Din Diwali. Show all posts

Friday, October 16, 2009

दिन दिन दिवाळी...!



दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या कालावधीत "लोकसत्ता'मध्ये एक अग्रलेख आला होता. विषय अर्थातच, दिवाळीचा होता. प्रकाशाचा उत्सव, जल्लोषाचा आणि उत्साहाचा सण, फटाके, फराळ, दिवाळी अंक आणि दिवाळीच्या अनुषंगानं येणारे नेहमीचेच इतर मुद्दे त्यामध्ये होते. पण त्यातला एक मुद्दा नवीन होता आणि त्यामुळंच कायम लक्षात राहण्याजोगा होता. त्याचा काही अंश असा...

"आपलं रोजचं आयुष्य हातावरच्या किंवा भिंतीवरच्या घड्याळाभोवती फिरत असतं. पण आपल्या कुटुंबाचं आयुष्य हे एका वेगळ्याच घड्याळाभोवती फिरत असतं. त्या घड्याळाचं नाव आहे "दिवाळी! हो दिवाळी!! घराला रंग द्यायचा असो, गाडी घ्यायची असो, इंटिरियर चेंज करायचं असो किंवा टीव्ही, फ्रीज किंवा सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असोत. या खरेदीसाठी दिवाळीपेक्षा सर्वोत्तम मुहूर्त नसतो. त्यामुळेच एखादी महत्वाची खरेदी असेल तर ""... दिवाळीला घेऊयात की...'' असे संवाद आपल्याला घरातून ऐकू येतात. अशा या दिवाळीच्या घड्याळाभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. आपलं कुटुंब फिरत असतं....''

अश्‍शी ही दिवाळी. दिवाळी येण्यापूर्वी जवळपास महिनी दीड महिना तिची चाहूल लागते. घरातल्या भांड्याकुंड्यांची स्वच्छता होते. घराची पण साफसफाई होते. मग कोणाला कोणते कपडे घ्यायचे किंवा यंदा दिवाळीला काय घ्यायचं याच्यावर चर्चा सुरु होते. पगार आणि बोनस (अर्थातच, मंदीच्या जमान्यात मिळाला तर...) झाल्यावर कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरु होते. आकाशकंदिल, पणत्या विकत घेतल्या जातात. दिवाळीला आठवडा राहिला असताना घराघरातून फराळाच्या पदार्थांचे सुगंध दरवळू लागतात. हल्ली धावपळीच्या जगातही किमान एखादा तरी पदार्थ घरी केला जातोच. मग ती चकली असेल, लाडू असेल, ओल्या नारळाची करंजी असेल किंवा शेव-चिवडा असेल. फराळाचं आटोपलं आणि दिवाळीला एक-दोन दिवस बाकी असताना. मोती साबण आणि प्रवीणच्या उटण्याची खरेदी होते. (मोती साबण ही दिवाळीची खरी ओळख. मोती साबणाच्या आंघोळीशिवाय दिवाळी असल्याचं वाटतंच नाही.) फटाक्‍यांची खरेदी पार पडते. अशा पद्धतीनं सर्व प्रकारची खरेदी करुन आपण जय्यत तयारीनिशी दिवाळीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

पूर्वी दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या "दिवाळी बंपर'चं तिकिट बहुतांश घरांमध्ये खरेदी केलं जायचं. बाबाही ते कायम खरेदी करायचे. आम्हाला ते कधीच लागलं नाही, ही गोष्ट सोडून द्या. पण दिवाळीच्या वेळी लॉटरीचं तिकिट हे मोती साबणाइतकंच घट्ट रुजलेलं समीकरण होतं. आता कदाचित ते तितकसं राहिलेलं नाही. पण दिवाळीचा आनंद आणि उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दिवाळीत घरासमोर पहिला फटाका कोण वाजवणार यासाठी लागणारी स्पर्धा. त्यासाठी सक्काळी सक्काळी लवकर उठून अभ्यंगस्नान करुन तयार होणं, फटाके वाजवून झाल्यावर सारसबागेत किंवा एखाद्या देवळात दर्शनाला जाणं, त्यानंतर घरी येऊन दाबून फराळ करणं आणि सरतेशेवटी गादीवर लोळत दिवाळी अंकातला एखादा लेख वाचून काढणं... हे सारं आहे तसं सुरु आहे.

दिवाळी निमित्तानं मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक एकत्र येऊन कल्ला करणं किंवा जुन्या आठवणी काढून हास्यकल्लोळात बुडून जाणं, यामध्ये जराही खंड नाही. जगणं बदलतंय असं आपण म्हणतो. पण अजूनही लहानग्यांना दिवाळीच्या किल्ल्यांचं आकर्षण आहेच. ते किल्ले करतात. कदाचित तुमच्या-माझ्याकडून यामध्ये क्वचित प्रसंगी खंड पडला असेलही. तरी पण आपल्यासारख्या इतर अनेकांकडून ही परंपरा पार पाडली जात आहे, पुढे नेली जात आहे. हेच तर दिवाळीचं वैशिष्ट्य आहे.

दिवाळी आणि "पोस्त' हे तर कधीच एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. मग तो इमारतीचा वॉचमन असो, परिसरात गस्त घालणारा गुरखा असो, घरात काम करणाऱ्या मावशी असोत, महापालिकेचे कर्मचारी असो किंवा संदेशवाहक पोस्टमन असो. प्रत्येकालाच "दिवाळी' हवी असते. मग आपणही त्यांना फारसा विरोध करत नाही. आपल्याला शक्‍य असेल तितकी "दिवाळी' त्यांना देऊनच टाकतो. घरातली कामवाली आणि पत्र घेऊन येणारा पोस्टमन यांना दिली जाणारी "पोस्त' ही काहीशी अधिक खुषीनं दिली जाते. इतरांना दिल्या जाणाऱ्या "दिवाळी'त आपुलकीचा ओलावा कदाचित नसेलही. पण "पोस्टमन'च्या कामातला प्रामाणिकपणा आणि त्याची चिकाटी लक्षात घेतली तर तो मागेल तितकी "पोस्ट' आपण त्याला देतोच. तिथं आपण कमीजास्तचा विचार करत नाही.

पूर्वी दिवाळीसारखा उत्सव वर्षातून एकदा यायचा. त्यावेळी भरभरुन खरेदी व्हायची. अनेकांकडे तर दिवाळी आणि वाढदिवस अशी दोनच वेळा खरेदी व्हायची. काही ठिकाणी अजूनही होत असेल. पण कितीही मंदी असली किंवा पगार कितीही कमी असले तरी प्रत्येक घरात दिवाळीचा तोच आनंद असतो, दिवाळी साजरी करण्यात तोच उत्साह असतो. स्वरुपातला फरक इथं गौण ठरतो. जागतिकीकरणामुळं आता अनेक कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णपणे बदललीय. पूर्वीइतकी गरीबी त्यांच्याकडे नाही. अनेकांना गलेलठ्ठ पगार आहेत. त्यामुळं वर्षभरात कधीही काहीही खरेदी करण्याची क्षमता ते बाळगून असतात. पण अशाही परिस्थितीत दिवाळीचं महत्व पूर्वीइतकंच आहे. कारण फक्त पैसा आणि खरेदी म्हणजेच दिवाळी नाही. श्रीमंती आणि ऐश्‍वर्य म्हणजे दिवाळी नाही. घराबाहेर एखादा आकाशकंदील आणि दोन-चार पणत्या लावल्या तरी घराचं आणि दिवाळीचं वेगळेपण त्यातनं स्पष्टपणे जाणवतं.

सो बी हॅप्पी आणि हॅप्पी दिवाली... शुभ दीपावली...!!!