Showing posts with label Egg Curry. Show all posts
Showing posts with label Egg Curry. Show all posts

Wednesday, July 25, 2007

चला खाऊया "अंडा राईस'...



















खाणारे काय श्रावणातही खातात. पण आम्ही मात्र श्रावण पाळतो, असं म्हणत लोकं आषाढात मांसाहाराचा फडशा पाडतात. अंडी, कोंबडी, बकरी, मेंढी, "पोर्क' आणि बरंच काही! आम्ही तर आसाममध्ये असताना बदकही हाणलं होतं. त्याची गोडी काही औरच. पण तूर्तास आषाढाचं स्वागत करताना अंड्यापासून सुरवात करावी, असं ठरवून नेहमीच्या अड्ड्यांकडे धाव घेतली.

अंडा ऑम्लेट, भुर्जी आणि "हाफ फ्राय' या पदार्थांप्रमाणंच गेल्या काही वर्षांपासून "अंडा राईस' हा पदार्थही अधिक लोकप्रिय झाला आहे. म्हणजे मला अधिक आवडू लागला आहे. तरी त्याला आता सहा-सात वर्ष झाली असतील. कुमठेकर रस्त्यावर शिक्षण संशोधन परिषदेबाहेर अशोक नावाचा माणूस अंडा भुर्जीची गाडी लावायचा. त्या गाडीवर भुर्जीप्रमाणेच राईसही चांगला मिळतो, असं समजल्यानंतर थेट धडकलोच.
प्रचंड गर्दी हे अशोकच्या गाडीची ओळख. कांदा मस्त बारीक चिरुन तेलात टाकायचा. अर्थातच, भुर्जीला लागते त्यापेक्षा थोडं जास्त तेल कढईत टाकायचं. कांदा मस्त "फ्राय' झाला की त्यात गरजेनुसार तिखट-मीठ टाकायचं व गिऱ्हाईकाच्या ऑर्डरप्रमाणं एक किंवा दोन अंडी फोडायची. मग अंडी, कांदा आणि मसाला हे मिश्रण तेलात मस्त खमंग होईपर्यंत "फ्राय' करुन घ्यायचं. खमंग भाजल्यानंतर त्यात आधीच शिजवून ठेवलेला भात टाकायचा आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. त्यावर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं. झालं चांगलं परतून झाल्यानंतर भात डिशमध्ये काढून "सर्व्ह' करण्यासाठी तयार. भातावर वरुन बारीक कोथिंबीर पेरायची. सोबतीला कांदा आणि लिंबू. आपण आडवा हात (चमचा!) मारण्यास तयार. अंडा आणि कांदा जितका "फ्राय' केलेला तितकी चव उत्कृष्ट हे समजून चालायचं.

अशोकचा राईस हे अजब मिश्रण आहे. एकदा का अशोककडील अंडा राईसची चटक लागली की त्यापासून दूर जाणं अवघड. सारं काही अचूक. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की अशोकच्या गाडीवर काही खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी घसा खवखवला आहे किंवा त्रास झालाय, असं कधीच आठवत नाही. अंडा भुर्जीच्या इतर गाड्यांवर खाल्लं की दुसऱ्या दिवशी घसा धरलाच म्हणून समजा. कारण अशोक रिफाईंड तेलात पदार्थ करतो. हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. पण ते सत्य आहे.

अजून एका ठिकाणी तुम्हाला चांगला अंडा राईस मिळेल. सणस क्रीडांगणाच्या बाहेरील रस्त्यावर (कल्पना-विश्‍व हॉटेलच्या समोरील) तुम्हाला तीन-चार गाड्या आढळतील. त्यापैकी जास्त गर्दी असलेली लोखंडी गाडी म्हणजे गणेशची गाडी. अंड्याच्या पदार्थांप्रमाणेच बांगड्याचा "फिश राईस' देखील तुम्हाला या गाडीवर मिळेल. राईस करण्याची अशोकची पद्धत आणि गणेशची पद्धत यामध्ये प्रचंड फरक आहे. त्यामुळेच चवीत फरक आलाच.

गणेश प्रथम तेलात मीठ-मसाला-तिखट टाकून कांदा परतून घेतो. मग त्यात अंडी टाकण्याऐवजी प्रथम भात टाकतो. भात परतून घेतल्यानंतर त्यावर अंडी फोडतो. त्यामुळं अंडी वेगळी आणि भात वेगळा अशा पद्धतीनं "अंडा राईस' तयार होत नाही. तर भाताच्या अनेक शिंताभोवती अंड्यांचा अंश लागतो आणि मग तो खमंग परतला जातो. त्यामुळे त्याची चव काही औरच होते. हा भात खमंग परतल्यानंतर त्याला आणखी चव येण्यासाठी त्यावर चटण्यांची हलकी फवारणी करण्यात येते. मग हा भात काढून त्यावर कोथिंबीर आणि कोबी यांची सजावट केली जाते. अर्थातच, तुम्हाला कोबी आवडत असेल तर! मग त्यावर लिंबू पिळलं आणि सोबतीला कांदा घेतला की, आस्वाद घेण्यासाठी अंडा राईस तयार.


तिसऱ्या प्रकारचा अंडा राईस मी नुकताच "एमएमसीसी'समोर (मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज) एक मुस्लिम चाचा गाडी लावतो. त्याकडं अंड्याच्या पदार्थांची बरीच विविधता आहे. अंडा सॅंडविचपासून अंडा करीपर्यंत सारे काही त्याच्याकडं मिळतं. अंडा पराठा या तुलनेने वेगळ्या पदार्थाची चवही तुम्हा इथं चाखू शकता. या चाचाकडं एका पातेल्यात करी तयार असते. अंडा राईस करताना तो प्रथम सर्वांप्रमाणे कांदा, तिखट-मीठ आणि तेल परतून घेतो. त्यानंतर त्यात अंड फोडतो. पण हे मिश्रण तो खूप परतत नाही. थोडंस परतल्यानंतर तो त्यात करी टाकतो. ही "अंडाकरी' थोडीशी गरम झाल्यानंतर चाचा त्यामध्ये शिजविलेला भात घालतो आणि मग तो खमंग होईपर्यंत परततो. पहिल्या दोन "अंडा राईस'पेक्षा ही चव काही औरच आहे.

अशोककडे "सिंगल अंडा' राईसची किंमत आहे 15 रुपये आणि "डबल अंडा' राईसची 25 रुपये. तर गणेशकडे एका प्लेटमध्ये दोन अंडी घातलेला राईस मिळतो आणि त्याची किंमत आहे फक्त 20 रुपये. चाचाचा राईसचा दर आणखीनच वेगळा आहे. "हाफ' राईससाठी 16 रुपये आणि नीट आठवत नाही पण "फुल' राईससाठी 30 की 32 रुपये.


एक मात्र खरं की तिघांचेही राईसचे दर वेगळे आणि चवही निराळी. मात्र, तिघांची चवही तोडीस तोड आहे. मला तर अजूनही कळत नाही, कोणाचा "अंडा राईस' अधिक चांगला आहे. तुम्ही मला यामध्ये मदत कराल का? शक्‍य झालं तर तुम्हीही याठिकाणी जाऊन एकदा चव घेऊन पहा आणि ठरवा कोण अधिक चांगला आहे ते! अन्‌ मला पण सांगा तुम्हाला कोणाचा "राईस' अधिक चांगला वाटला. तुमच्याही आवडीचा एखादा "अंडा राईस'वाला असेल तर मला सांगा. तिकडंही भेट देता येईल. 

(सूचनाः एमएमसीसी समोरील अतिक्रमणे हटविण्याच्या नादात रेश्मा म्हणजेच चाचाची गाडी हटविण्यात आली होती. तीच गाडी आता आबासाहेब गरवारे कॉलेजसमोर सुरू आहे. आता गाडीचा विस्तार झाला असून छोटेखानी फूड जॉइंटचे स्वरुप त्याला आला आहे.)