
भारताची खरी खेलरत्न...
खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचा असलेला राजीव गांधी खेलरत्न पुररस्कार आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. सर्वात महत्वाची आणि नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तीन जणांना विभागून (त्रिभागून) दिला गेला. ऑलिंपिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देणारा मल्ल सुशीलकुमार व मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग तसंच सलग चारवेळा महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विश्वविजेतेपद पटकाविणारी मेरिकोम अशा तिघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. मुख्य म्हणजे क्रिकेटपटूंची मक्तेदारी यावेळी देशी तसंच इतर खेळांनी मोडून काढली. ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नामुष्की पत्करावी लागलेल्या भारतीय संघातल्या फक्त गौतम गंभीरचीच अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली.
क्रिकेटचा दुस्वास करण्याचे काहीच कारण नाही. पण नेहमी इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय यावेळी दूर झाला. भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे धर्म मानणारे लोक आहेत. क्रिकेटवेड्यांची संख्या काही कमी नाही. पण त्यामुळे इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय प्रचंड आहे. प्रायोजक, जाहिराती मिळण्यापासून ते प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बातम्या येण्यापर्यंत. सर्वच स्तरावर अन्याय, अन्याय आणि अन्याय. पण यावेळी परिस्थिती बदलली. मुख्य म्हणजे तीनही खेळाडूंची कामगिरी नजरेत भरणारीच होती. त्यामुळं त्यांना डावलून इतर खेळाडूंना (किंवा क्रिकेटपटूंना) पुरस्कार देण्याची हिंमत क्रीडा खात्याची झाली नसणार.
इराण किंवा रशियाचे मल्ल तसंच क्युबाच्या मुष्टीयोद्ध्यांचं आव्हान परतवून लावत कांस्यपदकापर्यंत मजल मारणं ही काही खाण्याची गोष्ट नाही. ऑलिंपिक स्पर्धेत तर नाहीच नाही. त्यातून भारतात या खेळांसाठी मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षण, प्रायोजक आणि प्रसिद्धी या सर्वांपासून ही मंडळी दूर असतात. दिवसाचा रोजचा खुराक मिळाला तरी पुरे, असं म्हणण्याची परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर मात करुन ऑलिंपिकच्या कांस्यपदकापर्यंत मजल मारणं हे आव्हान महाकठीण. त्यामुळेच आपले खेळाडू चमकले ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या खेळाडूंची नावेही माहिती नव्हती. किंवा आता कोणी कांस्यपदक जिंकले असं विचारलं तर त्यांची नावे आठवणारही नाहीत. पण क्रीडाप्रेमींसाठी हे खेळाडू दैवतांच्या रांगेत विराजमान झाले आहेत.

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी आणखी एक मुष्टीयोद्धा म्हणजे मेरिकोम. एम. सी. मेरिकोम. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात गेल्या अनेक वर्षांपास्नं ही वर्चस्व गाजवते आहे. सलग चारवेळा तिनं विश्वविजेतेपद पटकाविलं आहे. विश्वविजेतेपद म्हणजे क्रिकेटपटूंनी सलग चार वेळा विश्वकरंडक जिंकण्यासारखेच आहे. पण तिच्या कामगिरीचं कौतुक कोणाला आहे. मेरिकोमचं वैशिष्ट्य असं की, तिनं मिळविलेलं चौथं विजेतेपद हे तिच्या डिलिव्हरीनंतर मिळविलेलं आहे. तिला जुळ्या मुली झाल्या आणि त्यानंतर दोन आठवड्यांमध्येच तिनं पुन्हा सरावाला सुरवात केली. बॉक्सिंगला वाहून घेणं म्हणजे काय हे मेरिकोमकडून शिकलं पाहिजे. त्यामुळं तिचा सन्मान व्हायलाच हवा होता. थोडा उशीरच झाला, असं म्हटलं तरी चालेल. पण 'देर आये दुरुस्त आये...' हे 'आये ही नही...' या गोष्टीपेक्षा कधीही चांगलं.
भारतीय क्रीडा जगतामध्ये आणखी एक नाव चांगलंच गाजतंय. ते नाव म्हणजे साईना नेहवाल. गेल्या वर्षी मलेशियन ओपन आणि या वर्षी इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून साईनानं सगळ्यांनाच वेड लावलंय. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून तिनं सगळ्यांच्याच आशा उंचावल्या आहेत. पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा, यंदाची विश्वकरंडक बॅडमिंटन स्पर्धा आणि आशियाई तसंच ऑलिंपिक स्पर्धा या सर्वांमध्येच तिच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत तिनं सहाव्या स्थानावर झेप घेतलीय. साईनाच्या वडिलांनी भविष्य निर्वाह निधीवर (प्रॉव्हिडंट फंड) कर्ज काढून साईनाचं प्रशिक्षण केलंय. तिला प्रोत्साहन दिलंय. त्यामुळंच यंदाच्या वर्षी मिळालेला अर्जुन पुरस्कार तिच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. साईनाची एकूण वाटचाल पाहता भविष्यात ती बॅडमिंटनच्या क्षितीजावर चमकणार, अशी सध्या तरी आशा आहे.
महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पंकज शिरसाट या मराठमोळ्या कबड्डीपटूला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. जवळपास पंधरा-वीस वर्षांनंतर मराठमोळ्या खेळाडूला हा पुरस्कार मिळालाय, कबड्डी या खेळासाठी. यापूर्वी सांगलीच्या राजू भावसार या कबड्डीपटूला पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर कोणत्याही मराठी कबड्डीपटूला हा पुरस्कार मिळाला नाही. आता पंकजनं तो पटकावलाय.
क्रिकेटच्या झंझावातामध्ये इतर खेळ पार कोलमडून जातात. खो-खो आणि कबड्डीसारखे देशी खेळ तर पार मरणासन्न अवस्थेत आहेत. आट्यापाट्या सारखा खेळ तर कधीच इतिहासजमा झालाय. भविष्यात कबड्डी आणि खो-खो यांचीही तीच परिस्थिती झाली तर नवल वाटू नये, अशीच परिस्थिती आहे. टेनिसमध्ये पेस-भूपती आणि सानिया मिर्झा, बिलियर्डस-स्नूकरमध्ये गीत सेठी आणि पंकज अडवाणी, बुद्धिबळात 'द ग्रेट' विश्वनाथन आनंद, दोन वेळा कॅरमचा विश्वविजेता आणि नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविणारा ए. मारिया ईरुदयम, टेबल टेनिसमध्ये भारताचं नाव रोशन करणारा आणि आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारा कमलेश मेहता, ऑल इंग्लड बॅडमिंटन जिंकून देणारा गोपीचंद आणि आधुनिक युगातला ध्यानचंद अशी पदवी मिळविणारा धनराज पिल्ले... अशी एक ना अनेक नावं इथं घेता येतील. ज्यांची कामगिरी खरं तर दखलपात्र होती पण माध्यमांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. किंवा माध्यमांनी जरी लक्ष दिलं तरी भारतीयांनी त्यांना तितकसं प्रेम दिलं नाही.
पण उशिरा का होईना या साऱ्यांना सरकार दरबारी स्थान मिळतंय. कदाचित उशिरा का होईना पण भविष्यात सामान्य नागरिकही या खेळाडूंना आपलंसं करतील. फक्त स्पर्धा जिंकल्यानंतरच नाही तर नेहमीच. खेळाडूंच्या पडत्या काळातही आणि उभरत्या काळातही. तरच भारतात खऱ्या अर्थानं क्रीडा संस्कृती रुजली, असं म्हणता येईल.