Friday, August 17, 2012

एक साली मख्खी....



इगा इगा इगा

एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है... नाना पाटेकरचा एक प्रचंड गाजलेला डायलॉग. त्या डायलॉगची आठवण करून देणारा एक अफलातून पिक्चर सध्या तेलुगूमध्ये धुमाकूळ घालतोय... त्याचं नाव इगा. इगा म्हणजे माशी.

नेहमीच्या कथानकापेक्षा हटके स्टोऱ्या घेऊन प्रेक्षकांपर्यंत जाणं ही दाक्षिणात्य चित्रपटांची खासियत. इगा चित्रपटांत त्याचा अगदी मस्त अनुभव येतो. अर्थात, तेलुगू पिक्चरची माहिती ब्लॉगवर देऊन फायदा काय, असा विचार मनात येऊ शकतो. पण लवकरच हा पिक्चर हिंदीमध्ये डब करण्यात येत असून हृतिक रोशन वगैरे मंडळींचा आवाज चित्रपटाला असणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वांनाच हा चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वास्तविक पाहता, तेलुगू समजत नसेल तरी चित्रपट अगदी व्यवस्थित समजतो. चित्रपट हे दृष्य माध्यम असल्यामुळे शब्दांविना अडत नाही. त्यामुळेच ई टीव्हीत काम करीत असताना जवळपास वीस ते पंचवीस तेलुगू चित्रपट पाहिले होते. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ चित्रपट पाहून पाहून समजायला लागतात. त्यामुळे भाषेचे प्राथमिक ज्ञानही हळूहलू वाढत जाते. तेव्हा सध्याचा तुफान गर्दी खेचणारा इगा पाहण्याची संधी मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा सोडली नाही. आमच्या दिलसुखनगर भागातच असलेल्या मेघा थिएटरवर अवघ्या चाळीस रुपयांमध्ये मस्त एसीत बसून चित्रपट पाहिला. स्वस्त तिकिटे आणि मस्त थिएटर हे हैदराबादचे किंवा एकूणच दाक्षिणात्य राज्यांचे वैशिष्ट्य.

नानी आणि त्याच्या घरासमोर राहणाऱ्या बिंदू नावाच्या एका मुलीची ही गोष्ट. नानी हा फटाक्यांची रोषणाई वगैरे करणारा एक होतकरू तरुण आणि ती एका शैक्षणिक एनजीओमध्ये काम करणारी कन्यका म्हणजे बिंदू. सुरुवातीच्या साधारण अर्ध्या तासात दोघांमध्ये प्रेम फुलत जातं. त्या दोघांमध्ये अपेक्षेप्रमाणे एक व्हिलन एन्ट्री मारतो. व्हिलनची भूमिका कन्नड अभिनेता सुदीपनं उत्तम वठवलीय. रग्गड श्रीमंत असलेला सुदीप पैशांच्या जोरावर बिंदूकडून प्रेमाची अपेक्षा करीत असतो. (चित्रपटातील व्हिलनचे प्रेम म्हणजे शरीरसंबंध हे ओघानं आलंच.)



असा हा सुदीप बिंदूवर मरणाऱ्या नानीचा खून करतो. ते सुद्धा बिंदू जेव्हा त्याच्या प्रेमाला होकार देणार असते अगदी तेव्हा. नानी मेल्यानंतर बिंदू आपलीच होणार, अशा थाटात सुदीप वावरत असतो. मात्र, नानी एका माशीच्या रुपाने पुनर्जन्म घेतो आणि बदला घेण्यासाठी सज्ज होतो. जसे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है..., एक मुंगी हत्तीला लोळवू शकते तसेच एक माशी व्हिलनला कशी नेस्तनाबूत करते, हे चित्रपटातून अगदी समर्थपणे दाखविण्यात आले आहे. अर्थातच, ऍनिमेशनच्या सहाय्याने.

माशी म्हणून तिला जन्मल्यानंतर येणाऱ्या अडचणी, व्हिलनचा मुकाबला करताना जाणविणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करून लढविलेल्या विविध क्लृप्त्या अशा एक से बढकर एक गोष्टींमुळे चित्रपट रंजक आणि पाहणेबल झाला आहे. आता इगा कोणकोणत्या क्लृप्त्या लढविते आणि कसे कसे व्हिलनला चरफडविते, हे वाचण्यापेक्षा पाहण्याचाच अनुभव अधिक भारी आहे. नानी म्हणजे सुदीपला मेटाकुटीस आणणारी माशी आहे, हे बिंदूला समजते का, एका छोट्याशा माशीला मारून टाकण्यासाठी सुदीप कसे कसे प्रयत्न करतो, त्यांना इगा कशी पुरून उरते, हे प्रत्येकाने अगदी जरुर जरुर पाहण्यासारखे आहे.

भारतातही इतके चांगल्या दर्जाचे ऍनिमेशन असलेले चित्रपट तयार होऊ शकतात, हे रोबोटने दाखवून दिले होते. आता इगानेही त्याच पंक्तीत जाऊन बसण्याची कामगिरी केली आहे. तेव्हा हिंदीमध्ये इगा येईल तेव्हा अगदी जरूर पहा. तो पर्यंत यू ट्यूबवरील गाण्यांवर आणि ट्रेलरवर समाधान माना...


Thursday, August 02, 2012

खोडसाळपणाच... पण कुणाचा?

असं म्हणतात, की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
अन् दोन-पाचशे मेल्याशिवाय पोलिसांना घटनेचं गांभीर्य कळत नाही...

पुण्यात झाले फक्त चार स्फोट,
अन् अवघा एक जण जखमी झाला,
तरीही मिडीयावाल्यांचा आरडाओरडा
आणि देशभर चर्चेला हुरूप आला...

...एसआयटी आणि एनआयएसह आणखी
पाच पन्नास संस्था पुण्यात थडकल्या,
तरी पण पोलिसांच्या प्रमुखाला चार स्फोट
म्हणजे खोडसाळपणा आणि बाता वाटल्या...

एखाद्या स्फोटानंतर कसं बोलावं, काय बोलावं
याचेही आता क्लासेस उघडावे लागतील,
आणि आर आर आबांच्या “हादसा”च्या कहाण्या
पोलिसांना समजावून द्याव्या लागतील...

अहो, माहिती येण्यापूर्वी प्लीज
वाट्टेल ते बडबडू नका,
माईक दिसला म्हणून
लोकांच्या जखमेवर मीठ चोळू नका...

स्फोट जरी किरकोळ असले तरी,
लोकांची चांगली चार हात फाटली,
लोकांच्या भावनांशी खेळताना
पोलिसांनो, तुम्हाला लाज नाही वाटली...

कदाचित रोजच्या स्फोटांमुळे
पोलिसांच्या मेल्या असतील संवेदना,
नि मृतांच्या आकड्यावरून
ठरत असतील अधिकाऱ्यांच्या भावना...

धागेदोरे सापडले आहेत, काही जण ताब्यात आले आहेत,
अशी वाक्यही नेहमीचीच असली तरी बरी वाटतात...
पण खोडसाळपणाच्या भाषा तुमच्याबद्दलच्या
उरल्यासुरल्या सन्मानाची वाट लावतात...

म्हणूनच असं म्हणतात, की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
अन् दोन-पाचशे मेल्याशिवाय पोलिस घटनेकडे गांभी्र्यानं पहात नाही...

Friday, June 15, 2012

मेकिंग ऑफ संत तुकाराम




चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ नावाचा चित्रपट पहायला जाणार असाल, तर पहिली आणि एकमेव अट म्हणजे, 1936 मध्ये निर्मिती होऊनही मराठी माणसाच्या मनात अगदी ताजा असलेला आणि विष्णुपंत पागनीस यांची भूमिका असलेल्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटाशी त्याची अजिबात तुलना करू नका. अन्यथा सध्याचा तुकाराम तुम्हाला कधीच आवडणार नाही. कारण या चित्रपटाची निर्मिती करण्यामागचा दृष्टीकोनच फार वेगळा आहे, असे माझे मत आहे.

अगदी चित्रपटाचे नाव ‘संत तुकाराम’ असे न ठेवता फक्त ‘तुकाराम’ ठेवण्यापासून या वेगळेपणाची सुरूवात होते. पूर्वी मेकिंग ऑफ महात्मा गांधी नावाचा चित्रपट आला होता. त्याच धर्तीवर हा मेकिंग ऑफ संत तुकाराम अशा स्वरुपाचा चित्रपट आहे. वडिलांची मस्त चाललेली सावकारी आणि बक्कळ पैसा-अडका असूनही तुकारामांना विरक्ती आली, हे सर्व पाश तोडून त्यांनी देवाचा धावा का केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘तुकाराम’मधून मिळतात. तसेच संत म्हणून असलेली तुकारामांची बरीच माहिती आपल्याला आहे. पण माणूस म्हणून ते कसे घडले, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, याची खूपच अल्प माहिती सर्वसामान्यांना आहे. वारकरी मंडळींना त्याबद्दल अधिक ज्ञान असू शकेल. पण सामान्य माणूस त्यापासून कोसो दूर आहे.

म्हणजे तुकाराम महाजारांचे वाण्याचे दुकान होते, त्यांची शेती होती, ही माहिती आहे. पण त्यांचे वडील मोठे सावकार होते, त्यांची सावकारी उत्तम चालली होती, तुकारामांनीही सुरूवातीला सावकारीत अगदी उत्तम जम बसविला होता, त्यांना दोन बायका होत्या, अशी बरीच माहिती चित्रपटातून मिळते. तुकारामांची आई-वडील, एक मोठा आणि एक छोटा भाऊ, वहिनी, पुतणे, आजूबाजूचे लोक यांच्याबद्दलच्या माहितीचे बरेच पदर चित्रपटातून हळूहळू उलगडत जातात. तोच चित्रपटाचा यूएसपी (युनिक सेलिंग प्रेपोझिशन) आहे.

संत तुकाराम चित्रपटात चमत्कार आणि तुकारामांचे संतपण मोठ्या विस्ताराने चर्चिले गेले आहे. त्यामुळे त्या चित्रपटात तुकारामांच्या वाटेला आलेली दुःख, यातना, कष्ट यांचे म्हणावे तितके दर्शन घडत नाही. उलट बुडालेली गाथा वर येते, छत्रपती शिवरायांची शत्रूपासून सुटका करताना शिवरायांची अनेक रुपे निर्माण होऊन झालेला चमत्कार, वैकुंठगमन असे चमत्कारच जास्त लक्षात राहतात. त्यांच्यातील माणसाचे दर्शन घडत नाही. कारण संत झाल्यानंतरच्याच गोष्टीत त्यात आहेत. तुकाराममध्ये मात्र, माणूस म्हणून तुकाराम कसे होते, हे पहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या वाटेला येणारी दुःख, यातना, वेदना, कष्ट, हालअपेष्टा हे सारे तुकारामांनाही सोसावे लागले होते आणि त्याचे यथार्थ चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

अत्यंत ऐश्वर्यसंपन्न घरातील असून आणि कुटुंब वत्सल असूनही त्यांनी प्रपंचाच्या मार्गावरून परमार्थाची वाट का धरली, हे पाहणे खूप रंजक आहे. महाजनाचं पोर, हरामखोर या लहानपणी एका मित्राने सुनाविलेल्या शब्दांचा सल त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतो. त्यामुळंच चांदीचं कडं नदीत फेकून देण्याची कृती त्यांच्याकडून घडली. शिवाय मोठ्या भावाच्या विरक्त वृत्तीचा परिणामही त्यांच्यावर कदाचित झाला असावा.

तराजू जरी आपल्या हातात असला, तरी तोलणारा तो आहे...

त्यांच्या वस्तू आपल्याकडे गहाण असल्यामुळे आपण श्रीमंत वाटत असलो, तरी खरं म्हणजे आपली पोटंच त्यांच्याकडे गहाण पडली आहेत...

हे तुकारामांचे थोरले बंधू सावजी यांच्या तोंडचे संवाद मनाचा ठाव घेतात. आपल्या आणि तुकारामांच्याही. त्यामुळेच सावकारी करतानाही त्यांच्या मनातील माणुसकी तसूभरही कमी झालेली नसते, हे सतत जाणवते. एकदा वसुलीसाठी गेलेले असताना, परतल्यावर वडिल गेल्याची बातमी त्यांना समजते. त्यानंतर मग ते आईला आणि मोठ्या वहिनीला गमावतात. असे संसाराचे एकेक पाश कमी होत असतानाच प्रचंड भीषण दुष्काळ पडतो.

दुष्काळ पडल्यानंतर त्यात पहिला बळी माणुसकीचा पडतो, या एका म्हाता-या गावक-याच्या तोंडातील वाक्याचा अर्थ तुकारामांना हळूहळू समजू लागतो. तेराव्याच्या जेवणालाही अत्यंत ताव मारून जेवणारे गावकरी, चोरून तेराव्याचे लाडू नव-यासाठी घरी नेणारी जवळचीच व्यक्ती, धान्याच्या राशी लोकांना खुल्या केल्यानंतर त्यावर जनावरांसारखी तुटून पडणारी माणसं, पोटात आग पडली असताना चटणी-भाकरीसाठी सोन्याच्या दागिन्यांची करावी लागलेली मोड, अशा सर्व गोष्टी तुकारामांना विरक्तीच्या वाटेवर नेतात. आपत्तीत कामास न येणारी संपत्ती काय कामाची... असे सांगून तुकाराम त्यांच्या मनातील व्यथा व्यक्त करतात. तेव्हापासून तुकाराम बोल्होबा आंबिले यांचा संत तुकाराम होण्यास प्रारंभ होतो. त्या भीषण दुष्काळाचा तुकारामांच्या संतपणापर्यंत पोहोचण्यात सिंहाचा वाटा आहे, असा निष्कर्ष आपण चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच काढू शकतो.



चित्रपटात आणखी एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. संसारात मन रमत नसताना किंवा फक्त देवाधर्माचीच आवड असताना लग्न केले, तर त्या कुटुंबाची कशी वाताहत होते, हा मुद्दाही चित्रपटात प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आला आहे. तुकारामांचे ज्येष्ठ बंधू सावजी यांची प्रथमपासूनच विठ्ठलावर भक्ती. सोन्या-चांदीत राहूनही त्यांचे मन त्यात रमेना. आई-वडिलांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना कधीच सावकारी जमली नाही. अशात त्यांचे लग्न होते. लग्नाच्या पहिल्या रात्री बायको शेजारी असूनही ईश्वराचे नामस्मरण करणे न सोडणारा माणूस संसारात अजिबात रमत नाही. फक्त नावापुरती लग्नाची बायको असलेल्या त्याच्या सहचरणीची व्यथा हेलावून टाकणारी आहे. प्रपंच करावा नेटका, असे संतांनी सांगून ठेवले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. त्यातील काम ही एक सहज भावना आहे आणि ती गरजही आहे. पण देवाधर्माच्या मार्गावर जाणाऱ्या अनेकांना त्याचा विसर पडतो आणि त्याची झळ त्यांच्या संसाराला कशी बसते, हे अगदी समर्पकपणे चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

शिवाय पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती होत नाही, म्हणून तुकाराम दुसरे लग्न करतात. तेव्हा तुकारामांची आई पहिल्या बायकोच्या त्यागाचे गोडवे गाते. तेव्हा तुकारामांच्या मोठ्या भावजयीने व्यक्त केलेली खंत हेलावून टाकते. नवऱ्याच्या संसारात न रमण्याच्या वृत्तीमुळे किती मोठा त्याग मी अनेक वर्षे करीत आली आहे, याचे तुम्हाला कधीच कौतुक वाटले नाही... ही तिची खंत अत्यंत योग्य आणि क्लेशदायक वाटते. म्हणजे तुकारामांना पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती होत नाही, म्हणून ते दुसरी बायको आणतात. पण नवऱ्यापासून कसलेच सुख मिळत नसतानाही त्यांच्या मोठ्या भावजयीला बोलायचीही सोय नाही. दुसरे लग्न वगैरे तर विचारही नाही. तुकारामांच्या मोठ्या भावाचा आणि भावजयीचा त्यांची आई गेल्यानंतरचा एक प्रसंग फारच बोलका आहे. त्यामुळे परमार्थाचा मार्ग धरताना प्रपंचातील जबाबदाऱ्या टाळल्या जाणार नाहीत, याची जबाबदारी संबंधिताने घ्यायला हवी. कदाचित या सर्व वेदना तुकारामांपर्यंत पोहोचल्या असल्यामुळेच त्यांनी परमार्थाचा मार्ग धरताना प्रपंचाकडे दुर्लक्ष केले नाही.

पत्नीचे निधन झाल्यामुळे तुकारामांचा मोठा भाऊ घर सोडून निघून जातो. प्रपंचातून बाहेर पडल्यावर तरी आपल्याला देव भेटेल, अशी भाबडी आशा त्याला असते. पुढे एका वारीत तुकारामांना त्यांचा मोठा भाऊ भेटतो. तेव्हा तुकाराम हे संतपदापर्यंत पोहोचलेले असतात. त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचलेली असते. घर सोडून मी वणवण हिंडलो, पण मला काही देव भेटला नाही. तू मात्र प्रपंचात राहूनही तुला देव भेटला... हा मोठ्या भावाच्या तोंडचा संवाद खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि वास्तववादी वाटतो. तेव्हा उगाच परमार्थाच्या मागे लागून फायदा नाही. सुखी संसार करूनही परमार्थ प्राप्ती होऊ शकते. एका पौराणिक कथेतील, घरच्या मंडळींना दूध देऊन तृप्त केल्यानंतर उरलेले वाटीभर दूध शिव मंदिरात ओतणाऱ्या माऊलीचे उदाहरण या बाबतीत चपखल वाटते. थोडक्यात म्हणजे, आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्वांच्या इच्छांची पूर्तता झाल्यावरच देव प्रसन्न होतो. अतृप्तीतून नाही. एखाद्या गोष्टीचा हव्यास करू नये, हे जितके खरे तितकेच आहे, त्या गोष्टीचा परमार्थासाठी उगाच त्यागही करू नये. कदाचित तुकारामांनाही हेच वाटत असावे. त्यामुळेच त्यांनी प्रपंच सोडला नाही.

बाकी चित्रपट उत्तम. संवाद, गाणी आणि संगीत फारच छान. गन्या, मन्या, तुका... संतू, दामा, पका... हे गाणे अत्यंत उत्तम आणि प्रभावी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या गण्याची चाल बदलण्याचा प्रयोग बऱ्यापैकी जमला असला तरीही ती चाल लक्षात रहात नाही. जितेंद्र जोशी याने वठविलेली तुकारामाची भूमिका अत्यंत प्रभावी वाटते. जितेंद्र तुकाराममय झाल्याचे त्यात वेळोवेळी जाणवते. चित्रपटात कोणताही चमत्कार नाही. तुकारामांची गाथा बुडविल्यानंतर ती वर येत नाही, तर पंचक्रोशीतील मंडळींची गाथा पाठच असते. मुखोद्गत असते. त्यातूनच तुकारामांची गाथा कायम राहते, ही पुलंनी मांडलेली थिअरी या चित्रपटात दाखविलेली आहे. (कदाचित पुलंच्या आधीही कोणीतरी ती मांडली असावी. मला माहिती नाही.) 

जसे ग्रंथांची पाने फाडल्यामुळे शब्द नष्ट होत नाहीत, धडे गाळल्यामुळे इतिहास बदलता येत नाही, पत्र फाडल्यामुळे भावना संपत नाहीत किंवा पुतळे हलविल्यामुळे त्या व्यक्तीचे इतिहासातील योगदान संपुष्टात येत नाही. तसेच गाथा बुडविल्याने तिचा प्रभाव किंवा कार्य संपत नाही. कदाचित हेच तुकारामांना दाखवून द्यायचे होते.

चित्रपटातील तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत प्रभावहीन वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या नटाला तर महाराजांचे व्यक्तिमत्त्व अजिबात साकारता आलेले नाही. शिवाय कुठल्या तरी किल्ल्याच्या बुरूजावर बसून छत्रपती शिवराय आणि तुकाराम यांच्यातील चर्चा तर अत्यंत पुस्तकी आणि छापील स्वरुपाची आहे. हा एक प्रसंग आणि इतर एक-दोन किरकोळ गोष्टी वगळल्या तर तुकाराम खूप छान जमला आहे.

पहिल्या आजारी पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे प्रेमळ तुकाराम, अवार्च्च भाषेत आरडाओरडा करणाऱ्या आवलीच्या चिडचिडीला सामोरे जाणारा टिपिकल नवरा असलेले तुकाराम,  भले देऊ गांडीची लंगोटी... असे रोखठोक बजाविणारे तुकाराम, धर्मपीठाला वेद, शास्त्र आणि उपनिषदांचे दाखले देणारे अभ्यासू तुकाराम, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अभंगांमध्ये किंवा ओव्यांमध्ये समावेश कर म्हणजे लोकांना त्या सहजपणे समजतील आणि अपिल होतील, असा उपदेश देणारे साधे आणि संतपणाचा कुठेही बडेजाव न मिरवणारे तुकाराम, अशी त्यांची अनेक रुपं आपल्याला चित्रपटातून पहायला मिळतात.

तुकारामांच्या काळातील ब्राह्मण मंडळींवर चित्रपटात आसूड ओढण्यात आले असले तरीही तुकाराम हे सर्वसमावेशक संत होते. त्यांच्या मनात कोणाच्याबद्दल राग किंवा द्वेष नव्हता. त्यामुळेच तुकारामांना एखाद्या जातीपुरते, समाजापुरते किंवा संप्रदायापुरते मर्यादित न ठेवता तुका आकाशाएवढा एवढी तरी किमान गोष्ट त्यांच्या पाठिराख्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कारण संत हे कोणत्याच विशिष्ट जाती, समुदाय, पंथ किंवा संप्रदायापुरते मर्यादित नसतात. माळी, कोळी, शिंपी, ब्राह्मण, तेली, महार, चांभार, एससी, एसटी, ओबीसी, मराठा अशा जातींमध्ये संत महात्मे आणि महापुरुषांना अडकवून ठेवणे म्हणजे हा त्यांच्या कार्याचाच अपमान आहे. हाच तुकारामांचा संदेश आहे. आणि तो सगळ्यांनीच ध्यानात ठेवला पाहिजे...

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय...



फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा संत तुकारामशी तुलना करू नका. अन्यथा पस्तावाल.

अधिक माहितीसाठी संपर्क - http://www.tukaramthefilm.com/

आमचे मित्र सचिन परब यांनीही याच विषयावर ब्लॉग लिहिला आहे... त्याची लिंक पुढीलप्रमाणे...
http://parabsachin.blogspot.in/

Sunday, June 10, 2012

मुक्काम पोस्ट हरिहरेश्वर

मस्त बंगला, स्वादिष्ट भोजन आणि स्वच्छ बीच

अनेक दिवसांपास्नं हरिहरेश्वरला जायचं होतं, अखेरीस मे महिन्यात तो योग आला. वास्तविक पाहता, आमच्या घरातील मंडळी अनेकदा हरिहरेश्वरला भेट देऊन आलेली आहेत. मात्र, मला कधीच जायला जमलं नव्हतं. माणगांवपर्यंत आम्ही गेलो होतो. पण हरिहरेश्वर राहिलंच होतं. त्यामुळं हरिहरेश्वरबद्दल ऐकलेलं बरंच प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी आतूर झालो होतो.

माणगांवला गेलो होतो, तेव्हा मी आणि माझा मित्र योगेश ब्रह्मे आम्ही बाईकवर गेलो होतो. त्यामुळं ताम्हिणी घाट वगैरे याबद्दल माहिती होतीच. पण त्यालाही आता बरीच वर्ष उलटल्यामुळं पुन्हा एकदा तो निसर्ग डोळ्यात साठवून घ्यायचा होता. यंदा ‘हम पाँच’ सॅन्ट्रोतनं निघालो. मी, चुलत भाऊ सपत्नीक आणि दोन बहिणी. ताम्हिणी घाटातील जंगल आणि घनदाट हिरवाई कधी एकदा पाहतोय, असं झालं होतं. मुळशी धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेनं जात होतो. मुळशी किती मोठं आहे आणि किती आटलं आहे, हे प्रथमच पहायला मिळत होतं. पाहता पाहता ताम्हिणी घाटात कधी पोहोचलो कळलंच नाही. पण रस्ता एकदम बकवास. म्हणजे प्रत्येक शंभर मीटरला रस्त्याची अवस्था बदललेली. कधी गुळगुळीत तर कधी एकदम खड्डेमय. त्यामुळं गाडी चालविणं, हा भलताच मनस्ताप होऊन बसला होता. कदाचित टोल भरा नाहीतर असेच भिक्कारडे रस्ते सहन करा, असा संदेशच महाराष्ट्र सरकारला द्यायचा असेल.


ताम्हिणी घाटातील वळणं वळणं, हेअर पिन टर्न्स, भरदुपारी संध्याकाळचं वातावरण वाटावं अशी घनदाट जंगल आणि माथ्यावर पोहोचता क्षणी होणारं कोकणाचं दर्शन सर्व काही भन्नाट. पुणे जिल्ह्याची हद्द संपली आणि रायगड जिल्ह्याची हद्द लागली. तेव्हा रस्ता खूपच गुळगुळीत आणि मस्त असल्याचं जाणवलं. (पालकमंत्री अजित पवार याकडे लक्ष देतील का) घाट उतरायला फारसा वेळ लागला नाही. मग निजामपूर आणि माणगांव मागे टाकून हरिहरेश्वरच्या रस्त्याला लागलो. तरी तिथून ५०-६० किलोमीटर अंतर होतं. पण थोडाफार भाग वगळता सर्व रस्ता वळणावळणांचा असल्यामुळं अंतर कापायला वेळ लागत होता. परत रस्त्याची साथ होतीच असं नाही. खड्ड्यांनी तर वैताग आणला होता. मला सांगा पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते इतके भंगार, मग कोणते पर्यटक बाहेरून महाराष्ट्रात येणार...

असो. कोकणच्या हिरवाईनं मात्र, सरकारच्या निलाजरेपणाला आणि उदासीनतेला कधीच पराभूत केलं होतं. त्यामुळंच खडबडीत रस्त्यांपेक्षाही हिरवकंच कोकणच आम्हाला अधिक लक्षात राहिलं. कोकण म्हणजे काय याचा सुखद अनुभव हरिहरेश्वरच्या रस्त्यावर लागल्यानंतर येऊ लागला. फक्त खंडाळ्याच्याच नव्हे तर कोकणातील प्रत्येक घाटासाठीच या ओळी अगदी शंभर टक्के लागू आहेत.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट,
सांगवो चेडवा दिसता कसो, खंडाळ्याचो घाट


मजल दरमजल करीत हरिहरेश्वरला पोहोचलो. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांचे मामे बंधू यशोधन जोशी यांनी हरिहरेश्वरजवळील मारळ या गावी मस्त दुमजली बंगला बांधला आहे. आठ-दहा गुंठ्यांचा परिसर. त्यापैकी साधारण तीन गुठ्यांवर बांधकाम. खास चिपळूणहून आणलेल्या लाल चिऱ्यांपासून बांधलेला बंगला. बाहेरुन दिसायला अगदी कोकणातील घरासारखा. पण आतून अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असतील अशा सोयी-सुविधा. दोन बेडरुम, एक हॉल आणि स्वयंपाकघर. अगदी बारीकसारीक विचार केल्याचं बंगल्यात शिरल्यानंतर ठायीठायी दिसतं. बंगल्याच्या मागील बाजूस मस्त बाग. चिक्कू, आंबा, केळी, अननस, करवंद, जांभळ वगैरे सगळा कोकणातील मेवा तिथं पहायला मिळतो. बागेच्या मध्यभागी एक झोपडी बांधलेली. त्यामुळं रात्री शेकोटी करायला किंवा बार्बेक्यू लावून मस्त कबाब वगैरे खायला अगदी उपयुक्त.

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क...

http://wikimapia.org/11324238/Joshiwadi-Maral-Yashodhan-Suchitra-Joshi-s-beach-house


अर्थात, आम्ही जेवण तयार करण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही. आम्ही मस्त फ्रेश होऊन. मोहन कुटुंबे यांच्याकडे उदरभरणासाठी गेलो. कुटुंबे यांच्याकडे गेलो आणि अगदी तृप्त झालो. अगदी घरी जेवल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर झळकत होता. घडीच्या पोळया, आमटी-भात, भेंडीची परतून भाजी, मटकीची उसळ, पापड आणि ताक असा अगदी साग्रसंगीत मेन्यू कुटुंबेंनी तयार ठेवला होता. सकाळपासून गाडी चालविल्यामुळं मजबूत भूक लागली होती. त्यामुळं तुडुंब जेवलो आणि मगच पानावरुन उठलो. जेवण झाल्यानंतर कुटुंबे काकांनी उकडीचे मोदक आणि साजूक तूप यांनी भरलेलं ताट आमच्यासमोर आणलं. बोट लावेपर्यंत जेवल्यानंतरही उकडीचे मोदक पाहून कोणालाच राहवलं नाही आणि प्रत्येकानं साधारण दोन-दोन मोदक हाणलेच. त्यामुलं हरिहरेश्वरला गेलात, तर मोहन कुटुंबे यांच्याकडेच जेवा आणि यशोधन जोशी यांच्या बंगल्यातच रहा. तृप्त मनानं आणि भरल्या पोटानं मग बंगल्या मागं असलेल्या मोकळ्या जागेत मस्त गप्पांचा फड रंगला. सोबतीला होती फक्त शांतता आणि सागराची गाज. (लाटांचा येणारा आवाज)



दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि पुन्हा एकदा कुटुंबे यांच्याकडे थडकलो नाश्त्यासाठी. आधीच सांगितल्यानुसार काकूंनी मस्त आंबोळीचा बेत केला होता. तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, नावापुरते गहू, मेथी आणि एक-दोन जिन्नस एकत्र दळून आंबोळीचं पिठ तयार होतं. मग ते रात्री किंवा सकाळी भिजवायचं आणि आंबोळ्या करायच्या. आंबोळी म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर घावन. सोबतीला कच्च्या करवंदांची वा खोबऱ्याची चटणी. दोन्हीतील समानता एकच म्हणजे लसणाचं प्रमाण खूपच अधिक. मागं पालीला गेलो होतो, तेव्हा विलास चांदोरकर यांच्या घरी आंबोळी आणि कच्च्या करवंदांच्या चटणीचा योग जुळून आला होता. किमान चार आंबोळ्या तरी नक्की खाल्ल्या जातात. बाकी मग तुमच्या तब्येतीनुसार.



सकाळचा भरपेट नाश्ता केल्यानंतर मग समुद्रावर गेलो. हरिहरेश्वरच्या मंदिरामागचा आणि बाजूचा किनारा धोकादायक असला तरी मारळचा समुद्र स्वच्छ, निर्मनुष्य आणि शांत आहे. त्यामुळं तो मला अधिक आवडला. नाहीतर उगाचच पुण्यासारखी गर्दी समुद्र किनाऱ्यावर असेल तर मग मजा येत नाही. साधारण दोन-अडीच तास डुंबलो. आधी पाण्यात फार जाण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला रोखू शकलो नाही. मग अडीच तास वगैरे सागरीस्नान झालं. एव्हाना सूर्य डोक्यावरून पुढं सरकायला लागला होता आणि वाळू भट्टीसारखी तापली होती. त्यामुळं अधिक वेळ न दवडता तिथून निघालो आणि बंगल्यावर येऊन पुन्हा फ्रेश झालो. चालत अवघ्या चार मिनिटांवर जोश्यांचा बंगला आहे.

नंतर दुपारचं जेवणाची वेळ झाली. पुन्हा कुटुंबे यांच्याकडे न जाता मासे खाण्यासाठी प्रधान यांच्या घरी पोहोचलो. पण त्यांच्याकडे मासे नव्हते आणि कोकणात जाऊन चिकन खाण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मग हरिहरेश्वर मंदिराच्या मार्गावर असलेल्या कुठल्याशा हॉटेलात मासे खाल्ले. मासे चांगले होते, पण पुण्याचा रेट त्यानं लावला होता. त्यामुळं कोकणात मासे खाल्ल्यासारखं वाटलंच नाही. शिवाय जास्त व्हरायटीही नव्हती. अखेरीस सुरमईवर समाधान मानून मस्त्याहार केला.





पोटोबा झाल्यानंतर मग विठोबा. हरिहरेश्वर मंदिरात गेलो. पारंपरिक पद्धतीनं दर्शन वगैरे झालं. म्हणजे काळभैरव, हरिहरेश्वर आणि आणखी एक-दोन देव. त्यानंतर मग प्रदक्षिणेसाठी निघालो. प्रदक्षिणेच्या मार्गावर असलेल्या घळीतून दिसणारा समुद्र म्हणजे वेडच लागायचं राहिलं होतं. निसर्गासारखा दुसरा कोणताही कलाकार असूच शकत नाही, हे पाहण्यासाठी तरी हरिहरेश्वरला जायला हवं. सागरापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद खिंडीतून असलेल्या पायऱ्या आणि सागराच्या लाटांमुळे तयार झालेली दगडांवरील नक्षी पाहून तिथं आल्याचं सार्थक झालं.







दगडांवर आदळणाऱ्या सागराच्या लाटा पाहूनच हृदयात धडकी भरेल, अशी परिस्थिती. मग समुद्र खवळल्यावर काय होत असेल, याचा विचारच केलेला बरा. आता अशा समुद्राच्या नादाला काही अतिउत्साही, आगाव आणि मूर्ख लोक का लागतात, या प्रश्नाचं उत्तर कधीच न मिळणारं आहे. सागराच्या वाटेला गेलेले लोक बुडून मेल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात. पण इतका भयंकर समुद्र असूनही लोकं मृत्यूच्या तोंडात का शिरतात, हे त्यांचं त्यांनाच ठावूक.



हरिहरेश्वरला प्रदक्षिणा मारल्यानंतर मग पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि निघालो पुण्याच्या दिशेनं. साधारण पाचच्या सुमारास निघालो. येतानाच रस्ता पाठ झाला होता. त्यामुळं जाताना चुकाचुकी आणि इतर भानगडी झाल्या नाहीत. पण वळणावळणाचा रस्ता असल्यामुळं कमी अंतर असूनही तुलनेनं जास्त वेळ लागत होता. माणगांवला चहासाठी थांबून मग रात्रीच्या किर्र अंधारात ताम्हिणीतून निघालो. एखादा तरी प्राणी वगैरे दिसेल, अशी आशा होती. पण काहीच दिसलं नाही. तुलनेनं वाहनांची वर्दळ जास्त होती. खड्ड्यांमधील रस्त्यांमुळे नुसती चीड नाही, तर वैताग, फ्रस्ट्रेशन सर्व काही आलं होतं. अखेर मजल दरमजल करीत रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यात पोहोचलो.

हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा, प्रदक्षिणा मार्ग, यशोधन जोशी यांचा बंगला आणि मोहन कुटुंबे यांचे जेवण या गोष्टी मनात अगदी घर करून राहिल्या आहेत. हीच आमच्या ट्रीपची फलनिष्पत्ती होती. निदान माझ्यासाठी तरी...

Wednesday, May 09, 2012

हृदयस्पर्शी काकस्पर्श




सुंदर कथा, हृदयस्पर्शी संवाद, उत्तम अभिनय, कथेला साजेशी आणि तेव्हाच्या परिस्थितीला अनुरूप वातावरण निर्मिती, कोकणातील पारंपरिक वाटेल इतके चपखल संगीत आणि निसरड्या वाटेवरील गंभीर विषय असूनही कुठेही न ओलांडलेली सीमारेषा... अशा सर्वच जमेच्या बाजू असल्यामुळे महेश वामन मांजरेकर यांचा ‘काकस्पर्श’ हा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून पहावा, असाच आहे. अगदी सुरूवातीपासूनच शेवटपर्यंत चित्रपट मनाचा ठाव घेतो.

कोकणातील एका ब्राह्मण कुटुंबातील साधारण 1930 ते 1950 च्या सुमारास घडणारी ही कथा आहे. अत्यंत बोल्ड विषय उत्तम पद्धतीने हाताळल्यामुळे कथेचे गांभीर्य अधिकच वाढल्यासारखे वाटते. आपल्या धाकट्या भावाच्या निधनानंतर तिच्या पत्नीवर जडलेल्या अव्यक्त प्रेमाची ही कथा आहे. पण त्याला कुठेही वासनेचा किंवा शारिरीक संबंध किंवा स्पर्शाचा लवलेशही नाही.

हरी (सचिन खेडेकर) नावाची एक व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाभोवती चित्रपटाची कथा फिरते. हरीच्या लहान भावाचे म्हणजेच महादेवाचे (अभिजीत केळकर) लग्न उमा म्हणजेच केतकी माटेगांवकरशी निश्चित होते. उमाला पहायला गेल्यानंतर सारा कार्यक्रम आटोपतो. त्यात महादेव गप्पच असतो. हरीच उमाला दोन-चार प्रश्न विचारतो. त्यामुळे रूबाबदार हरी हाच आपला भावी नवरा आहे, असाच उमाचा गैरसमज होतो. चित्रपटातील पुढील कथानकाची हीच नांदी ठरते.

लग्नानंतर काही महिन्यांतच महादेवचे निधन होते. उमा वयात आलेली नसल्यामुळे म्हणजेच फणस पिकलेला नसल्यामुळे महादेव आणि उमा यांचे लग्नानंतर मीलन न होताच तो मुंबईला जातो. त्यानंतर एकदिवस उमाचे नहाणं येते. त्यामुळं तिचा फलशोधनाचा कार्यक्रम निश्चित होतो. त्या कार्यक्रमानंतर दोघांमधील अंतर संपुष्टात येणार, अशी पद्धत. पण फलशोधन कार्यक्रमाच्या दिवशीच महादेवाची प्रकृती प्रचंड खालावते आणि त्या रात्रीच म्हणजे पहिल्या रात्रीच तो जातो. त्यामुळे फलशोधनाचा अर्थ म्हणजे नक्की काय, त्या रात्री काय होते, याबाबत काहीच कल्पना उमाला येत नाही. कुठेही उथळपणा किंवा सवंगपणा न दाखविता सर्व प्रसंगांचे दाखविलेले आहेत.

त्यानंतर मग उमाचे केशवपन (सोवळी करणे) इइ सर्व प्रथा परंपरा मागे लागतात. पण प्रत्येकवेळी हरी उमाला त्यापासून वाचवितो. हरीची पत्नी तारा आजारी पडली असताना घराची जबाबदारी उमाच हाताळत असते. हरीच्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि घराची जबाबदारी ती लिलया हाताळते. हरी आणि उमा हे परस्परांना खूप आवडतात, हे ताराला समजलेले असते. त्यांच्यातील संबंध कोणत्या स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत, याची शहानिशा करण्यासाठी अवघडलेली तारा बिछान्यावरून बाहेर येते आणि चक्कर येऊन पडते. त्यातून ती बरी होतच नाही आणि मृत्युला कवटाळते. तेव्हा ती हरी आणि उमा यांनी लग्न करावे, असा प्रस्ताव हरीसमोर ठेवते. मात्र, हरी तसे काहीच नसल्याचे सांगून त्याला स्पष्ट शब्दात नकार देतो. त्यानंतर त्या दोघांमधील अव्यक्त, अस्पर्शित आणि विलक्षण अशी प्रेम कहाणी पुढे सरकते. ती कशी ते वाचण्यापेक्षा पडद्यावर थेट पाहण्यातच खरी गंमत आहे.

देवाच्या उत्सवाला खऱ्या रेड्याऐवजी पिठापासून तयार केलेल्या रेड्याचा बळी देण्याचा विचार हरी समर्थपणे मांडतो. तो सुधारक विचारांचा असतो. पण तोच हरी आपला लहान भाऊ आणि पत्नी गंभीर झाल्यानंतर देव पाण्यात ठेवून त्यावर अभिषेक करायला सुरूवात करतो. माणूस कितीही सुधारक असला तरी अनेकदा त्याला देवाचाच आधार असतो, ही परिस्थिती चित्रपटातून अत्यंत उत्तमप्रकारे उलगडली आहे.

फलशोधनाचा कार्यक्रम काय असतो, मला त्याची गंमत कधी कळलीच नाही गं, ऐन तारूण्यामध्ये किती वर्ष दिवसातून दोन दोन – तीन तीन वेळा गार पाण्याने आंघोळ करायची. मीच काय केलंय, माझा काय दोष हा उमाच्या (प्रिया बापट) तोंडचा संवाद तेव्हाच्या बालविधवांच्या किंवा तारूण्यात वैधव्य आलेल्या तरुणींची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुरेसा बोलका आणि प्रभावी आहे. अक्षरशः तो संवाद आणि प्रसंग पाहून अंगावर काटा आल्यावाचून रहात नाही.



चित्रपटातील अनेक संवाद खूपच बोल्ड स्वरुपाचे आहेत. पण तरीही मर्यादा न ओलांडल्यामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा गल्लाभरू आणि छछोर चित्रपटांच्या यादीतच त्याचे नाव समाविष्ट झाले असते. पण सर्व सीमा सांभाळण्यात मांजरेकर आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे. खऱ्या अर्थाने बोल्ड आणि वेगळ्या विषयावरील उत्तम चित्रपट निर्माण केल्याबद्दल महेश वामन मांजरेकर आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन.

ता. क. – चित्रपटातील जन्म बाईचा गं बाईचा खूप घाईचा हे गीत फारच छान लिहिलेले आहे. आणि चित्रिकरणही छान झाले आहे.

दुसरे म्हणजे महादेवाचे आजारपण, ताराचे तारापण आणि अखेरीस उमाचे आजारपण या साधारण पंधरा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधीत अनेक कलाकार लहानाचे मोठे होतात. मोठ्येच वृद्ध होतात. पण गावातील वैद्यबुवा मात्र, आहे तसेच दाखविलेले आहेत. वैद्यबुवा इतकी वर्षे स्वतःची प्रकृती कशी काय बुवा तशीच ठेवतात, हे आम्हाला न उलगडलेले कोडे आहे. कदाचित वैद्य असल्यामुळेच त्यांनी स्वतःचे आरोग्य जपले असावे. पण न थकलेले वैद्यबुवा आम्हाला खटकले. बाकी सर्व उत्तम.

जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा... गाण्याची लिंक
http://www.youtube.com/watch?v=818YYByaDtA&noredirect=1

Sunday, May 06, 2012

धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची...



भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं घामाघूम व्हायला होतं. घामाच्या धारा वहायला लागतात. पण तरीही उन्हाळ्यामध्ये कोकणात आमची वारी ठरलेलीच असते. मला जरी जायला नाही मिळालं, तरी आमच्या घरची मंडळी हमखास कोकण गाठतातच. निमित्त असते, हनुमान जयंतीला होणाऱ्या आमच्या गावच्या उत्सवाचे. म्हणजेच पालीच्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या उत्सवाचे.

लक्ष्मी पल्लीनाथ हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाली या गावचे ग्रामदैवत. मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूरकडे जाणारा फाटा जिथे फुटते, तिथेच पाली हे गाव आहे. पुण्यापासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर. रत्नागिरीपासून 22 किलोमीटरवर. दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत श्री लक्ष्मी पल्लीनाथाचा उत्सव मोठ्या उत्साहात पण अगदी साधेपणाने साजरा होतो. भपका कमी असल्यामुळेच तो तो अधिक भावतो.

काही कऱ्हाडे ब्राह्मण मंडळींचे श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे कुलदैवत आहे. त्यामुळे कऱ्हाडे मंडळींपैकीच एखाद्या कुटुंबाने किंवा दोन-चार कुटुंबे एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची जबाबदारी घेतात. म्हणजे उत्सवादरम्यान घ्यावयाचे कार्यक्रम, भोजन आणि इतर व्यवस्था, मनुष्यबळ आणि आर्थिक गणितं, या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित मंडळींना पार पाडावी लागते. मंदिर व्यवस्थापनानं भक्तांच्या सोयीसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सात-आठ खोल्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या भक्तांची तिथं व्यवस्था होते. तिथं नाहीच झाली तर मग मंदिराच्या आजूबाजूलाच राहणाऱ्या गुरव मंडळींच्या घरी राहता येते. तीही व्यवस्था नाही झाली तर मग नेहमी येणारी मंडळी ओळखी पाळखीतूनच पाली गावातली घरं गाठतात. जसं आम्ही यंदाच्या वर्षी विलास चांदोरकर या आमच्या नात्यानं खूप खूप खूप खूप लांबच्या पण चांगल्या ओळखीच्या घरी राहिलो होतो.

उत्सवातील सकाळचा जरा जास्तच धार्मिक स्वरूपाचा असतो. अभिषेक, रुद्र, पूजा, आरती आणि मग महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्यामुळे सकाळच्या आरतीला आणि भंडाऱ्याला येणाऱ्या मंडळींची संख्या अधिक. जेवणाला फार मोठा मेन्यू नसतो. साधा भात आणि आमटी, तोंडी लावायला मिक्स भाजी किंवा उसळ आणि ताक. मसाले भात असेल तर कढी आणि जिरा राईस असेल तर टोमॅटोचं सूप. मिक्स भाजी आणि उसळ कायम. सकाळ आणि संध्याकाळी बहुतेक वेळी यापैकीच काहीतरी मेन्यू असतो. शेवटच्या दिवशी मात्र, साग्रसंगीत पान असतं. पुऱ्या-कुर्मा भाजी, उसळ, भात, आमटी, ताक आणि शिरा, जिलेबी किंवा गुलाबजाम यापैकी एखादा गोडपदार्थ. अर्थात, एकदम साधं असलं तरी त्या जेवणाचा स्वाद काही औरच असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर येणारी तृप्तता अवर्णनीयच म्हटली पाहिजे.


असो. पण या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते, ते संध्याकाळी होणारी आरती आणि रात्रीचा प्रदक्षिणा तसेच भोवत्यांचा कार्यक्रम. गणपती, शंकर, देवी, हनुमान, दत्त, पांडुरंग यांच्यासह आणखी तीन-चार देवांच्या आरत्या तुम्हाला येत असतील ती त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणजे संध्याकाळी जेव्हा आरत्या सुरू होतात, त्यावेळी भलत्याच देवांच्या आणि भलत्याच वेगळ्या आरत्या म्हटल्या जातात. म्हटल्या म्हणण्यापेक्षा गायल्या जातात, असं म्हणणं जास्त योग्य. गणपती, देवी, शंकर, सूर्यनारायण, महालक्ष्मी, पल्लीनाथ, लक्ष्मी रमणा, त्रिभुवन सुंदर दशावतार, श्रीकृष्ण आणि अशा अनेक. तबला, पेटी आणि टाळ यांच्या संयोगातून निर्माण झालेला विलक्षण आवाज आणि सोबतीला पाच-पन्नास जणांच्या स्पष्ट पण उच्च रवातील आरती. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. कानाची भूक कधी भागते कळतंही नाही.


बरं, कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे तबला, पेटी आणि टाळ वाजविण्यात जवळपास प्रत्येक जण अगदी माहीर. आपण पानावर जितक्या सहजतेनं बसतो, तितक्या सहजतेनं ही मंडळी पेटी किंवा तबला वाजवायला बसतात. बरं, नुसतं पेटी वाजवली असं नाही. काळी एक, काळी दोन वगैरेची चर्चाही तिथं रंगते. मग कुठला सूर कुठे कसा कमी पडला किंवा जास्त झाला, याच्या खाणाखुणाही होत असतात. टाळ कुटणे हा वाक्प्रचार कसा पडला असेल, याचे उत्तर आपल्याला या आरतीच्या वेळी मिळतं. ही मंडळी इतक्या खुबीनं आणि इतकं मन लावून टाळ वाजवितात, की धन्य व्हायला होतं. टाळ नावाचं छोटेखानी वाद्य हे ताल, लय आणि आवाज यासाठी इतकं आकर्षक असू शकतं, हे फक्त कोकणातल्या त्या आरत्यांच्या वेळीच कळतं.

आरत्या झाल्या, की मग रात्रीचं जेवण, त्यानंतर एखाद्या बुवांचं भजन किंवा कीर्तन आणि मग प्रदक्षिणा अन् भोवत्या. प्रदक्षिण म्हणजे छबिना. देवाचा मुखवटा सजविलेल्या पालखीत ठेवण्यात येतो आणि मग मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या समोरून प्रदक्षिणा सुरू होते.

‘’धाव रे गणराया, पाव रे गणराया, मंगलमूर्ती तू मोरया, मूर्ती तू मोरया’’ या पारंपरिक गीतानं प्रदक्षिणेची सुरूवात होते. सोबतीला टाळ आणि टिमकी असतातच. भजन, भक्तिगीत, देवादिकांवरील गाणी वगैरे यावेळी म्हटली जातात. एक जण पहिल्यांदा सांगतो आणि मग बाकीचे लोक त्यामागून म्हणतात, अशी पद्धत. ही प्रदक्षिणा चार भागांमध्ये होते. मंदिरासमोरून ते डाव्या हाताच्या मध्यापर्यंत. तिथून मंदिराच्या मागेपर्यंत. मागपासून ते उजव्या भागाच्या मध्यापर्यंत आणि मग तिथून मंदिराच्या समोरपर्यंत. एका प्रदक्षिणेत चार भजनं किंवा देवाची गाणी होतात. जेव्हा पालखी चारवेळा थांबते तेव्हा आपण नेहमी म्हणतो त्या देवांच्या आरत्या म्हटल्या जातात. प्रत्येकवेळी थांबल्यावर एक कडवं म्हटलं जातं. म्हणजे देवळाच्या डावीकडे थांबल्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, देवाच्या पाठिमागे थांबल्यानंतर रत्नखचितफरा तुज गौरीकुमरा आणि उजवीकडे थांबल्यानंतर लंबोदर पितांबर फणिवर वंदना... प्रत्येक आरतीच्या वेळी अशीच पद्धत.




एक प्रदक्षिण पूर्ण झाल्यानंतर मग भोवत्या होतात. एका रात्रीत पाच प्रदक्षिणा आणि पाच भोवत्या होतात. भोवत्या म्हणजे देवळासमोरच्या मोकळ्या जागेत भक्तगण गोल रिंगण करून तालबद्ध फेर धरतात. एखादं भजन किंवा एखादं गाणं किंवा एखाद्या मंत्रावर भोवत्यांसाठी ताल धरला जातो. म्हणजे ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः, या मंत्रावर सुद्धा भोवत्या पार पडतात. यावेळी वेगवेगळ्या पदन्यासांद्वारे नृत्याचा फेर धरला जातो. लोकांच्या उत्साहानुसार वीस-पंचवीस मिनिटं प्रत्येक भोवतीचा खेळ चालतो. नृत्याचा वेगही मग कमी जास्त केला जातो. सुरुवातीला हळूहळू नंतर वेगाने आणि नंतर पुन्हा हळूहळू अशा क्रमाने भोवत्यांचा फेर धरला जातो. पंधरा वीस मिनिटं मजबूत घाम निघाल्यानंतर मंडळी पुन्हा ताज्या दमानं नव्या प्रदक्षिणेसाठी तयार. हा प्रदक्षिणा आणि भोवत्यांचा हा खेळ पहाटे अडीच-तीनपर्यंत चालतो. ‘’धन्य हो प्रदक्षिणा पल्लीनाथाची...’’ हे प्रदक्षिणेत म्हटलं जाणारं शेवटचं भजन. त्यानंतर मग पल्लिनाथाची आरती आणि त्यानंतर मंडळी घरी जातात.

शेवटच्या दिवशी प्रदक्षिणा आणि भोवत्यानंतर मग लळिताचं किर्तन चालतं. ते पहाटे पाच साडेपाचपर्यंत चालतं. अगदी लहानथोरांपासून मंडळी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. सर्व कार्यक्रमांमध्ये रवी भाट्ये यांची उपस्थिती उत्साहवर्धक असते. प्रचंड पाठांतर, तबला, पेटीची इतकी जाण, भजनाला लागणारा आवाज या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळंच उत्सवाचं नियोजन कोणाकडेही असलं तरी सर्व उत्सवाचे कर्ते धर्ते तेच असतात. आरत्या, प्रदक्षिणा किंवा भोवत्या यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्याविना अगदी अपूर्ण वाटते.


उत्सवाचं हेच आकर्षण प्रत्येकाला दरवर्षी तिथं खेचून आणतं. अगदी अवघड असेल तरी एखाद्या दिवशी उत्सवाला हजेरी लावून जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कोकणातल्या प्रत्येक गावातच असे उत्सव साजरे होत असतील, त्यामुळं त्या मंडळींना या उत्सवाचं फारसं अप्रूप नसणार. पण जन्मापासून आतापर्यंत घाटावरच किंवा मुंबईत राहिलेल्या माझ्यासारख्या अनेक जणांना हा उत्सव म्हणजे पर्वणीच वाटतो.

Sunday, April 01, 2012

शाळेची आठवण देणारी 'शाळा'


शाळा हा पिक्चर रिलीज झाला आणि कधी एकदा जाऊन पाहतोय, असं झालं होतं. पण पुस्तक वाचल्याशिवाय पिक्चर पाहू नकोस, असा मौलिक सल्ला अनेक जणांनी दिल्यामुळं सर्वप्रथम अवघ्या काही दिवसांत मिलिंद बोकील यांचं शाळा वाचून काढलं आणि नंतरच चित्रपट पाहिला. शाळा हे इतकं लयभारी पुस्तक आहे, ते आपण इतकी वर्षे का नाही वाचलं, याचं खरंच दुःख मला झालं. त्याची भाषा, मोकळेपणा, एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात नेण्याची लेखकाची हातोटी आणि तुमच्या आमच्या मनात असलेले भाव लेखकानं अत्यंत योग्यपणे पुस्तकात मांडले आहेत. पुस्तक वाचताना हसून हसून प्रचंड लोळायला होतं. एकटेच आपण वेड्यासारखे हसत सुटतो. इतक्या प्रभावी पद्धतीनं बोकील यांनी पुस्तक लिहिलंय. त्यामुळंच पिक्चर पहायची खूप उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस ती इच्छा पूर्ण झाली.

शाळा चित्रपटात मुक्या आणि शिरोडकर यांच्याप्रमाणेच इतरांच्या भूमिका उत्तम झाल्या आहेत. पात्रांची निवड, त्यावेळची परिस्थिती, वेशभूषा, केशभूषा, संवाद, ठिकाणांची निवड आणि अनेक प्रसंग अगदी उत्तम रितीनं मांडण्यात आले आहेत. पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर सगळी शाळा जशी डोळ्यासमोर उभी राहते, तशीच शाळा आपल्याला चित्रपटातून दिसते. हे सर्व क्रेडिट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचं आहे. मुक्या आणि शिरोडकरनं अभिनयाची कमाल गाठली आहे. त्यांचं वागणं बोलणं, संवाद फेकण्याची लकब पुस्तकात वाचल्यासारखीच.


थोडक्यात म्हणजे चित्रपट पाहताना पुस्तकच वाचतोय आणि पुस्तक वाचताना चित्रपटच पाहतोय, असा होणारा भास म्हणजे दोन्ही कलाकृती परस्परांना पूरक, तरीही परस्परांशी स्पर्धा करणारे. चित्रपटात फक्त एकच गोष्ट मिसिंग वाटते आणि ती म्हणजे पुस्तक वाचताना असलेला ओघ आणि एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात नेण्याची लेखकाची हातोटी. फक्त काही प्रसंग एकापाठोपाठ एक जोडून चित्रपट केल्यासारखा वाटतो. त्यामुळे ज्या मंडळींनी पुस्तक न वाचता चित्रपट पाहिला असेल, त्यांना तो पुस्तक वाचलेल्या मंडळींपेक्षा एकतर अधिक आवडेल किंवा अजिबातच समजणार नाही. कारण पुस्तकातील कथेची लय आणि सुसूत्रता चित्रपटात तुलनेने कमी आहे. टीका करण्याचा हेतू नाही. फक्त पुस्तक वाचल्यानंतर तातडीनं पिक्चर बघितला म्हणून जाणवलेला एक छोटासा मुद्दा शेअर करावासा वाटला म्हणून...


जाणवणलेली आणखी एक गोष्ट म्हणजे मांजरेकर सरांचा किस्सा. आंबेकर त्यांच्यावर मरायची वगैरे आणि नंतर घडलेल्या घटना यासंदर्भात पुस्तकात रंगविलेले चित्र आणि चित्रपटातील चित्र किंचित वेगळे वाटते. शाळा पुस्तक वाचल्यानंतर मांजरेकर सर एकदम निर्दोष आहेत आणि आंबेकरचीच एकटीची चूक आहे, आहे जाणवते. मात्र, चित्रपटात त्या दृष्यामध्ये (आंबेकर वर्गात इंग्रजीत ओरडून सरांना सांगतो तो शॉट) आंबेकरप्रमाणेच सराचां पायही त्यात अडकलेला असावा आणि त्यांचाही त्यात दोष असावा, असे राहून राहून वाटते. अर्थात, बदल करण्याचा हक्क चित्रपट निर्मात्याचा आहे. आपण त्यावर कशाला उगाच बोला. दिसलं, जाणवलं म्हणून सांगितलं.

बाकी सर्व एक नंबर जमलंय. त्यामुळंच पुस्तक वाचताना आणि पिक्चर पाहताना आमच्या शाळेतील काही किश्श्य़ांची आठवण आल्यावाचून राहिली नाही. हे मिलिंद बोकील आणि शाळाच्या निर्मात्यांचंच यश म्हटलं पाहिजे.

(ता. क. : शाळा चित्रपटातील सुऱ्या हा आमच्या वर्गातील ढेकणेसारखा दिसतो. आमच्या शाळेतील किस्से आणि ढेकणे या व्यक्तिमत्त्वाबद्दल लवकरच नव्या ब्लॉग लिहीन. लग्नात मुंज उरकण्यात अर्थ नाही.)

Wednesday, March 21, 2012

कुछ मिठा हो जाए...

जंगली महाराज रस्त्यावर आलेला एक खूप छोटा पण काळजाला भिडणारा अनुभव... वास्तविक पाहता, असे अनेक छोटे छोटे अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात येत असतात. पण अनेकदा ते आपल्या नजरेतून निसटतात आणि नजरेतून निसटले नाहीत, तरी आठवणींच्या कप्प्यातून हळूहळू नाहीसे होतात. हा अनुभवही काहीसा तशाच पद्धतीचा...


दोन-चार दिवसांपूर्वीची घटना. योगेश ब्रह्मे आणि वनबंधू बिंदूमाधव वैशंपायन या दोन मित्रांबरोबर जंगली महाराज रस्त्यावर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. चायनीज खायचं असल्यानं ते दोघे चायना गेट या हॉटेलमध्ये गेले होते. माझं जेवण झालं होतं त्यामुळं नंतर मी दोघांना जॉईन झालो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा टप्पा करीत जेवण वगैरे आटोपलं. कदाचित आम्हीच त्यांच्याकडचे अखेरचे ग्राहक होतो. साधारण इतका उशीर झाला होता.

झालेल्या बिलाचे पैसे दिल्यानंतर वेटरनं उरलेले पेसे आणि एक पाच रुपयांची डेरी मिल्क कॅडबरी आणून दिली. कदाचित त्याच्याकडे पाच रुपये सुटे नसावेत किंवा टोल नाक्यावर ज्या पद्धतीने तुमच्या गळ्यात चॉकलेट वगैरे मारतात, तसा ट्रेंड आता हॉटेलवाल्यांनीही आत्मसात केला असावा. कारण काहीही असो पण त्यानं उगाचच आमच्या गळ्यात ती कॅडबरी मारली होती. काय टोल नाक्यावर जाऊन आला का, असा अकारण हिणकस शेरा मराठीतून मारत आम्ही टेबलावरून उठलो. (वास्तविक पाहता, तिथली बरीच मंडळी दार्जिलिंगची आहेत. त्यामुळं आम्ही काय म्हणालो, हे त्यांना घंटा कळलं नसणार. पण तरीही मताची पिंक टाकण्याची प्रवृत्ती थोडीच थांबणार आहे.)

ब्रह्मे महाशयांनी ती कॅडबरी वरच्या खिशात ठेवली होती. आम्ही चायना गेट समोरच्या फूटपाथवर दोन-पाच मिनिटं गप्पा मारत थांबलो होतो. तेवढ्यात तिथं एक छोटा मुलगा आला. छोटा म्हणजे आठ-दहा वर्षांचा असावा. त्याच्या एका हातात फुगे होते आणि कडेवर त्याच्यापेक्षा छोटीशी बहिणी होती. तीन ते चार वर्षांची असावी. फुगे विकणारी अशी अनेक मुलं फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर दिसत असतात. फुगे विकायचे (विकले गेले नाहीतर गळ्यात मारायचे) हा त्यांचा उद्योग. गेल्या अनेक वर्षांपासून ही मुलं आणि त्यांचे आई-वडील रस्त्यांवरून फिरताना दिसतात. त्यामुळं त्यांच्याबद्दल कधीच फारसं काही वाटत नाही.


‘साहब कुछ दे दो ना... कुछ दे दो ना...’ अशी विनवणी तो करीत होता. वास्तविक पाहता, अशा लोकांची मला विलक्षण चीड येते. त्या दोघांचीही अवस्था फार वेगळी नसावी. पण नुकतंच पोटभर जेवण झालेलं असल्यामुळं म्हणा किंवा त्याच्या कडेवर बसलेल्या बहिणीकडे पाहून असेल म्हणा, आम्ही त्याला काहीच बोललो नाही. आम्ही काहीही देत किंवा बोलत नाही, हे पाहूनही त्या मुलानं पैसे मागणं सोडलं नाही. अखेरीस योगेशनं त्याच्या खिशातली कॅडबरी त्या मुलाच्या हातात दिली. कॅडबरी मिळताच, तो मुलगा खूपच सुखावला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी त्या अंधारातही दिसत होता. तो मुलगा दोन पावलं देखील पुढं गेला नसेल, त्यानं ती कॅडबरी अगदी सहजपणे त्याच्या त्या लहानगया बहिणीच्या हातात देऊन टाकली आणि त्या बहिणीनंही आपल्या भावानं दिलेली ती भेट हसत हसत स्वीकारली.

क्षणभर मनात विचार आला, मानवी भावना या किती सारख्या असतात ना. लहान भावा किंवा बहिणीबरोबर आपल्याकडे असलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं किंवा खाऊचं शेअरिंग करणं, ही गोष्ट किती समान आहे, असाच विचार काहीवेळ मनात घोळत होता. तो मुलगा कोणत्या प्रांतातून आला असेल, त्याचं शिक्षण किती झालं असेल, आई-वडिलांनी त्याच्यावर लहानपणी काही संस्कार केले असतील किंवा नसतीलही, त्याची जात-धर्म-पथ कोणता असेल, यापैकी कोणतीही माहिती आम्हाला नव्हती. असण्याचं कारणही नव्हतं. पण मानवी भावना या सर्वांच्या पलिकडे असतात आणि बऱ्याचदा त्या सारख्याच असतात, असं अगदी प्रकर्षानं जाणवलं.


ते भाऊ-बहिण कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा प्रांतातील असते तरी कदाचित त्या घटनेचीच पुनरावृत्ती पहायला मिळाली असती. त्यामुळंच कॅडबरी न खाताही आम्हाला ‘कुछ मिठा हो जाए’चा अनुभव आला.

Thursday, February 02, 2012

आदर्श यांचा घ्या...

सच्चे मुसलमान मुझफ्फर हुसेन



 

२६ जानेवारीच्या दुपारी दोन-अडीच वाजता एक फोन आला. वास्तविक पाहता, सुटीच्या दिवशी दुपारी झोपण्याच्या वेळी म्हणजे दोन-अडीचला फोन आला, की टाळकंच सटकतं. इन्श्य़ुरन्स हवाय का, पॉलिसी घेणार का, क्रेडिट कार्ड हवंय का किंवा काय मित्रा, बऱ्याच दिवसांनी फोन नाही केलास, काय करतोयस वगैरे वगैरे मंडळींच्या फोनमुळं डोकंच उठतं. जे खूप जवळचे आहेत, त्यांचे फोन आले तर बिघडत नाही. पण या मंडळींना दुपारच्या वेळी फोन करू नये, हा सेन्स असतो.

थोडक्यात काय तर दुपारी फोन आले तर डोकं फिरतं. पण २६ जानेवारीला दुपारी अडीच वाजता फोन आल्यानंतर डोकं फिरण्याऐवजी खूष व्हायला झालं. त्याचं कारणही तसंच होतं. ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान तसेच मुस्लिम जगताचे अभ्यासक श्री. मुझफ्फर हुसेन यांच्या भेटीचं निमंत्रण आलं होतं. ते सुद्धा ध्यानीमनी नसताना... इतकी चांगली संधी स्वतःहून चालून आल्यावर आनंद होणार नाही तर काय... सामनाचे स्तंभलेखक म्हणून त्यांची मला ओळख होती. त्यांचे लेख खरंच अभ्यासूपणे लिहिलेलेल आणि वेगळ्या विषयांवरचे असतात. ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे त्यांचे पुस्तकही मी खरेदी करून वाचलेले आहे. इतकीच माझी त्यांच्याशी ओळख. त्यामुळे अशा अभ्यासू लेखकाला भेटण्यासाठी मी खूपच आतूर होतो.


मुझफ्फर हुसेन हे गरवारे कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. तो कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता वगैरे होता. त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्यातील काही पत्रकारांसमवेत गप्पांचा फड रंगवावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली आणि माझ्यासह आणखी चार-पाच जणांना फोन करून विचारण्यात आलं, येऊ शकाल का. २६ जानेवारी असल्यानं बरेच जण पुण्यात नव्हते, काही जण गाढ झोपले होते. त्यामुळे मी आणि मटातीलच सहकारी मंगेश कुलकर्णी, असे आम्ही दोघे मुझफ्फर हुसेन उतरले होते तिथं त्यांना भेटायला गेलो आणि चालत्या बोलत्या विकिपिडियाची भेट घडल्याचा अनुभव आला.

काश्मीर, पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम संबंध, देशातील राजकीय परिस्थिती, चीनचे वाढत चाललेले दडपण, भारतातील राजकीय अराजकता, कणाहीन नेतृत्त्वाचा सर्वच पक्षांमध्ये असलेला अभाव, नरेंद्र मोदी आणि मुस्लिम समाज यांच्याबद्दल अनेक किस्से, बापजन्मात न ऐकलेली माहिती आणि भविष्यात काय होऊ शकते, यावर व्यक्त केलेली मार्मिक प्रतिक्रिया हे सर्व ऐकण्यात दीड-दोन तास कसे निघून गेले ते कळलंही नाही.

पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिक (कट्टरपंथी नव्हे) हा तिथल्या राजकीय आणि लष्करी हुकुमशाहीला वैतागला असून लवकरच म्हणजे येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये पाकिस्तानची फाळणी निश्चितपणे होणारच आहे, असा दावा हुसेन यांनी केला. वास्तविक पाहता, सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तसे दुःख त्यांनी भारतीय नेत्यांकडे व्यक्त केले देखील होते. पण भारताचे राष्ट्रपिता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजही बलुचिस्तान आणि फ्रंटियरमधील लोकांना पाकिस्तानात राहण्यात काडीचाही रस नाही. म्हणूनच ते लवकरात लवकर पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडतील. मग त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे यासाठी इराण, अफगाणिस्तान आणि रशिया यांच्यात संघर्ष निर्माण होईल. त्याचवेळी पाकिस्तानमधील सिंध आणि पंजाब प्रांतांनी स्वतंत्रपणे अस्तित्त्व ठेवण्याऐवजी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती फलद्रूप झाली तर आश्चर्याचा धक्का बसायला नको, असेही हुसेन यांनी स्पष्ट केले.

भारताचे पहिले गृहमंत्री आणि ज्यांच्या खमकेपणामुळेच भारताचा आजचा नकाशा तयार झाला आहे, ते लोहपुरूष (लोहपुरूष एकच दुसरे लोहपुरुष कोणीही नाहीत.) वल्लभभाई पटेल यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा संदर्भ हुसेन यांनी दिला. त्यावेळी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा वाद पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पटेल म्हणाले, की बाप आपल्या मुलाला एखादा व्यवसाय काढून देण्यासाठी भांडवल म्हणून काही पैसे देतो. जर मुलाचा व्यवसाय चालला नाही, तर तो पुन्हा घरी परततो आणि आपल्या बापाच्या व्यवसायात सहभागी होऊन जातो. आज माझ्या मनात काहीशी तशीच भावना आहे. वेगळा व्यवसाय करण्याचा हट्ट आहे म्हणून आम्ही भांडवल देतो आहोत. व्यवसाय नीट चालला तर बघा. नाहीतर बापाचे दरवाजे तुम्हाला सदैव उघडेच आहेत... वल्लभभाई यांच्याबद्दल ही माहिती आतापर्यंत कधीच पुढे आली नव्हती. दहा-पंधरा वर्षांनंतर जर हुसेन म्हणतात, तसे घडले तर वल्लभभाईंच्या दूरदृष्टीची कमालच म्हणावी लागेल.

पाकिस्तानप्रमाणेच चीनबद्दलही एक किस्सा त्यांनी सांगितला. अर्थात, या गोष्टीचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात केला होता, हा भाग अलहिदा. (आम्ही तो वाचलेला नव्हता, हे ओघाने आलेच.) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्यांपैकी २५ ते २८ क्रीडापटू हे हरियाणाचे होते आणि त्यापैकी बहुतांश खेळाडू हे शाकाहारी होते. हरियाणातील दुग्धपुरवठ्यापैकी सर्वाधिक दूध हे मुर्रा नामक एक अव्व्ल जातीच्या म्हशीपासून मिळते. यामध्ये फॅट आणि इतर घटक हे अगदी वरच्या दर्जाचे असतात. या मुर्रा म्हशी दिवसाला १८ ते ३५ लिटर्सपर्यंत दूध देतात. त्यामुळे हरियाणाचे खेळाडू (अगदी पहिलवान आणि मुष्टीयोद्धे सुद्धा) फक्त दुधावर आणि पौष्टिक आहारावर मजबूत तब्येत कमावू शकतात. ही गोष्ट चीनने हेरली नसती तरच नवल. मुर्रा म्हशीचे वैशिष्ट आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर चीनने जवळपास पाच हजार मुर्रा म्हशींची अवैध मार्गांनी तस्करी केली. आणि मुर्रा म्हशींचे ब्रीड करून आणखी दर्जेदार स्वरूपाचे दुधाचे उत्पादन कसे करता येईल यावर चीनमध्ये जोरदार संशोधन सुरू आहे. भविष्यात पाच हजारांच्या पन्नास हजार म्हशी करून त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा स्वस्त दरात पुरवठा भारताला करण्याचे डावपेच चीनकडून आखले जात आहेत. हे ऐकून तर वेडंच लागायची वेळ आली होती. चीन काय करू शकेल, बरंच काही ऐकलं होतं. पण ते असंही असू शकेल, हा विचारही कधी मनात आला नव्हता. त्यामुळंच आणखी एक धक्का बसला.


मुझफ्फर हुसेन हे फक्त नावाचे मुसलमान म्हणायचे. त्यांचे विचार आणि लेखन हे इतकं स्वतंत्र आणि व्यापक आहे, की भारतातील सर्व मुसलमानांनी त्यांचा आदर्श ठेवला तर दंगली घडणारच नाहीत आणि राजकीय पक्षांना लांगुलचालन करण्याची संधी मिळणारच नाही. आपण हिंदू लोक असं करत नाही, आपण हिंदू लोक तसं करत नाही... असं म्हणूनच त्यांच्या अनेक वाक्यांची सुरूवात होत होती. गेल्या पंधरा वर्षांपासून हुसेन हे स्वतः शाकाहारी बनले आहेत आणि ‘इस्लाम आणि शाकाहार’ या विषयावर पुस्तक लिहित आहेत किंवा लिहिले आहे. ते जितक्या अभिमानानं कुराण पठण करतात तितक्याच अभिमानानं वंदे मातरम म्हणतात. ते जितके सच्चे मुसलमान आहेत तितकेच सच्चे सावरकरभक्त आहेत. सावरकरांचा हिंदुत्त्ववाद भारताच्या राष्ट्रीयत्वाशी जोडला गेलेला आहे, हे त्यांनी अगदी मनापासून मान्य केलेले आहे. त्यामुळेच ते स्वतःला आपण हिंदू लोक, असं म्हणतात.

तुम्हाला मुस्लिम कट्टरवाद्यांकडून किंवा जहाल मतवाद्यांकडून धमक्या येत नाहीत का, तुमच्या बहिष्कार टाकला जात नाही का, धर्मातून निलंबित वगैरे करण्याची भीती वाटत नाही का... अशा बऱ्याच प्रश्नांना त्यांचं उत्तर एकच होतं. ‘मी जे लिहितो ते नेहमी अभ्यास आणि पुराव्यांच्या आधारेच लिहितो. लोकांशी चर्चा केल्याशिवाय किंवा पुस्तकांमधील उतारे दिल्याशिवाय लिहित नाही. त्यामुळेच माझे मुस्लिम मित्र आणि विरोधकही लेखनाचा आदर करतात. जरी त्यांच्याविरूद्ध असलं तरीही.’ शिवाय धर्मातून निलंबित होण्याची किंवा बहिष्कार टाकला जाण्याची भीती मला कधीच वाटत नाही. त्यामुळे माझा अभ्यास आणि लेखन अव्याहतपणे सुरू आहे.

हुसेन यांचं वाचन आणि भ्रमंती प्रचंड आहे, सर्वज्ञातच आहे. त्यांच्याशी बोलताना त्याचा अगदी मिनिटामिनिटाला प्रत्यय येतो. आपने ये किताब तो पढी होंगी... आपने ये तो पढाही होगा... असं म्हणत त्यांनी दीड तासांत तब्बल वीस ते पंचवीस पुस्तकांचे दाखले दिले. कुठलं पुस्तक भारतातलं होतं, कुठलं स्पेनचं, कुठलं इराणचं आणि काही पाकिस्तानमधली. आता आमचं वाचन कुठं आलंय इतकं. शाळा पिक्चर आल्यानंतर मिलिंद बोकील यांचं शाळा पुस्तक वाचायला घेणारे आम्ही इतकी पुस्तकं कशाला वाचतोय. पण आपली झाकली मूठ म्हणून मी फक्त माना डोलावत होतो.

मोहम्मद अली जीना यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आणि शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक व्यक्ती, प्रसंग आणि घटनांबद्दल त्यांच्याशी गप्पा झाल्या. काही ऑन तर काही ऑफ द रेकॉर्ड. त्यामुळे एका मोठ्या आणि अभ्यासू माणसाला भेटल्याचा आनंद घरी परतताना मनात होता.

Tuesday, January 10, 2012

नृसिंहवाडीची शान


सचिन सोमण भोजनालय
खूप दिवसांपासून नृसिंहवाडीला जजायचं जायचं असं चाललं होतं. अखेर तो योग जुळून आला. खूप वर्षांपूर्वी गेलो होतो. पण अगदी लहान असताना. त्यामुळं अगदी पुसट पुसट आठवत होतं. पण नेमकं काहीच लक्षात नव्हतं. सकाळी साडेसात आठला निघालो आणि दुपारी एकच्या आसपास नृसिंहवाडीत पोहोचलो. पुण्यापासून साधारण अडीचशे किलोमीटरवर असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी किंवा नरसोबावाडी किंवा नुसती वाडी.

पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना पेठ नाक्यावर डावीकडे (म्हणजेच इस्लामपूर, आष्टा आणि सांगलीच्या दिशेने) आत वळायचं. मुंबई-बेंगळुरू महामार्गापासून आत सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर नृसिंहवाडी आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्ग जितका चांगला. तितका सांगलीकडे जाणारा रस्ता खराब. स्वतःची गाडी असेल तर साधारणपणे पाच तासांमध्ये पुण्याहून नृसिंहवाडीला पोहचता येतं. आम्ही दुपारी एक-दीडच्या सुमारास नृसिंहवाडीला पोहोचलो.

नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा महापूर येतो तेव्हा तेव्हा नृसिंहवाडीचं मंदिर प्रथम पाण्याखाली जातं. त्यामुळं दर पावसाळ्यात नृसिंहवाडी हे गाव चर्चेत येतं ते महापुरामुळं. पण नृसिंह सरस्वतींचे गाव ही नृसिंहवाडीची खरी ओळख. कृष्णेच्या पाण्यात हात पाय धुतल्यानंतर मग नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं. देऊळमध्ये जसं दाखवलंय तसा बाजारूपणा इथं नाही, हे अगदी ठळकपणे जाणवतं.

दर्शनानंतर जेवण कुठं करायचं, यासाठी शोधाशोध सुरु झाली. वास्तविक पाहता, देवाच्या (किंवा संतांच्या ) घरी जेवणं अधिक इष्ट असं समजलं जातं. त्यामुळं एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर बाहेरच्या हॉटेलमध्ये न जेवता तिथं मिळणारा भंडारा किंवा प्रसाद हेच जेवण समजून घेण्यात खरी मज्जा असते. पण आमचं दर्शन होईपर्यंत प्रसादाची वेळ संपली होती. मग आम्हाला शोधाशोध करण्यावाचून पर्यायच नव्हता.
अखेरीस दोन-तीन ठिकाणी चौकशी करून मग नृसिंहवाडीतीलच सोमण भोजनालय गाठले. भोजनालय किंवा खाणावळ म्हणणे त्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. अगदी घरगुती आणि आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एकदम माफक किंमतीत घरच्यासारखे जेवण देणारे घर, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे भविष्यात जर कोणी नृसिंहवाडीला गेलात आणि प्रसाद उपलब्ध नसेल तर मग कोणताही विचार न करता थेट सोमण भोजनालय गाठायला हरकत नाही. सचिन सोमण यांचे भोजनालय कुठे ते विचारा. कारण नृसिंहवाडीत आणखी एक सोमण भोजनालय आहे. पण ते तितके स्वादिष्ट नाही, असे स्थानिक सांगतात।

वीस ते पंचवीस लोक एकावेळी जेवायला बसतील अशी व्यवस्था. लग्नातील पंक्तीप्रमाणे तिथं पंगत बसते. मुळ्याचा चटका, लाल मिरचीचा खर्डा (किंवा ठेचा), फ्लॉवर-टोमॅटो-बटाटा रस्सा भाजी, वाल आणि वांगी यांची रस्सा भाजी, तर्रीबाज आमटी, साधा पांढरा भात, वरण, तुपाची धार, मसाले भात, घरच्यासारख्या घडीच्या मऊसूद पोळ्या आणि नरसोबाच्या वाडीची मस्त बासुंदी. (अर्थात, माझे काका आणि आता भाऊ करतात त्या बासुंदीला तोड नाही. वीस लीटर दूध आटवून घोटून आठ लीटर बासुंदी तयार करतात. म्हणजे ती किती घट्ट आणि किती गोड होईल, याचा विचारच केलेला बरा.) जेवणाच्या सुरूवातीलाच आंबटगोड ताक वाढलं जातं. आणि संपूर्ण जेवणात अधून मधून ते वाढलं जात असल्यानं पाण्याऐवजी ताकावरच भर जास्त राहतो.

एकदम गरमागरम आणि इतक्या आग्रहानं वाढलं जाणारं जेवण म्हणजे फुल टू धम्माल. कोल्हापुरी मसाल्यांचा स्वादाला पाहुणचाराची जोड म्हणजे अजोड. वांग आणि वाल हे कॉम्बिनेशन तर आयुष्यात पहिल्यांदाच खाण्यात आलेलं. पण चव सगळं तारून नेते. दोन्ही भाज्यांचे मसाले अगदी एकाच पद्धतीचे. तरीही दोन्हीही भाज्यांवर ताव मारला जातोच. इथलं जेवण इतकं अप्रतिम आहे, की वाडीला येताना थोडंसं पोट रिकाम ठेवूनच या, म्हणजे जेवणाचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीनं घेता येईल. अगदी चटणी-कोशिंबिरीपासून ते भाजी-आमटीपर्यंत प्रत्येक पदार्थ वारंवार वाढला जातो. अगदी पोळ्यांचा आग्रहही होतो. नाही म्हणता म्हणता, सोमण यांचा आग्रह असतोच. मग अगदी घरच्यासारखा आग्रह करून अर्धी पोळी किंवा थोडा भात, मसाले भात, आमटी वाढली जातेच. बरं, गरमागरम जेवण असल्यानं दोन-चार घास अगदी आवर्जून जास्त जातात. कोणत्याही खाणावळीत वा भोजनालयात इतक्या आग्रहानं वाढलं गेलेलं मी पाहिलेलं नाही. त्यामुळंच अशा आग्रहाचं आम्हाला कौतुकं. त्यातून आडनाव सोमण. त्यामुळं दुप्पट कौतुक. (हे आपलं विनोदानं बरं का...)

नृसिंहवाडीची बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. बाहेरगावाहून आलेले लोक अगदी आवर्जून इथली बासुंदी खातात. काही लोक घरी पार्सलही नेतात. अर्थात, बासुंदी चांगली होती, यात वादच नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे यापूर्वी अनेक वेळा घरची चांगली बासुंदी खाल्ल्याने तिथल्या बासुंदीचे मला विशेष कौतुक वाटले नाही.
तेव्हा पुन्हा जेव्हा केव्हा नृसिंहवाडीस जाल तेव्हा सचिन सोमण यांच्या आग्रहाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद अगदी आवर्जून घ्या. आम्ही दुपारी दोन अडीचच्या सुमारास गेलो होतो. तेव्हापर्यंत आणि त्यानंतरही भुकेली मंडळी त्यांच्याकडे जेवण्यासाठी येत होते. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत ते सुरू असतं, असं समजायला अजिबात हरकत नाही.
(नृसिंहवाडीला प्रसाद म्हणून पेढे मिळतातच. पण त्या जोडीला मिळणारी कवठाची बर्फी खूपच छान असते. तिचा रंग पाहूनच प्रेमात पडायला होतं. चवीमुळं प्रेमात पडणं नंतरची गोष्ट.)

Saturday, December 24, 2011

एकच अटलजी...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर. राजकारणी असूनही ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. कवी, रसिक आहेत. त्यामुळेच राजकारणी असूनही ते गेंड्याच्या कातडीचे नेते नाही. विरोधी पक्षातील लोकही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करीत नाही. अटलजी आप अच्छे हैं लेकिन आपकी पार्टी गलत है... एक अटलजी बाकी सब शटलजी, फक्त इतकीच माफक टीका विरोधक करायचे. त्यामुळेच अटलजी हे अटलजी आहेत. त्यांची सर कोणत्याही नेत्याला येणार नाही. म्हणूनच आज ते सक्रिय राजकारणात नसले आणि चर्चेत नसले तरी वाजपेयी यांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मावळत्या सूर्याला कोणीही नमन करीत नाही. पण वाजपेयींचा करिष्मा इतका आहे, की आजही त्यांचा प्रभाव चाहत्यांवर टिकून आहे. मीही त्यापैकीच एक.

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ...

या कवितेप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी यांचे आयुष्य होते. अटलजींचा जन्म एका सर्वसामान्य शिक्षकाच्या घरी झाला. २५ डिसेंबर १९२४. अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक होते. आपल्या पोरानं तेव्हा प्रतिष्ठेची असलेली सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मुलाला एक वर्षे जास्त नोकरी करता यावी, यासाठी त्यांच्या वडिलांनी अटलजींची जन्मतारीख १९२४ ऐवजी १९२५ अशी लिहिली. पण काळाच्या पोटात काय दडले आहे, ते कोणालाच ठाऊक नसते. मग ते कृष्णबिहारी यांना तरी कसे ठाऊक असणार. आपला पोरगा सरकारी नोकरी करणार नाही तर चक्क सरकार चालविणार आहे, हे कोणाला ठाऊक असणार. पण अटलजींनी स्वतःच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर जे काही साध्य केले, ते सर्वांनाच अचंबित करणारे आहे.

अटलजी म्हणजे वक्तृत्तवाचा अमोघ झरा आणि निर्मळ मनाचा मनुष्य. विषय कोणताही असो त्यावर अभ्यासपूर्ण आणि लोकांची मने जिंकेल, असे भाषण हे अटलजींचे वैशिष्ट्य. मग विषय गीतरामायणाचा असो, भारत-चीन संबंध असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी असो... अटलजींच्या मुखातून अक्षरशः सरस्वती बोलते आहे, असाच प्रत्यय यायचा. त्यामुळेच अटलजींचे जिथे कुठे भाषण असेल तिथे जाऊन ते ऐकायचे किंवा टीव्हीवर असेल तेव्हा कान तृप्त होईपर्यंत ऐकायचे, हे अगदी लहानपणापासून सुरु होतं. भाषणाला अगदी थोडा जरी उशीर झाला तरी ‘मैं देर से आया हूँ लेकिन बहोत दूर से आया हूँ’ हा अटलजींचा डायलॉग अगदी ठरलेला. तो त्यांनी प्रत्येकवेळी जरी म्हटला तरी त्यांच्या हिंदीमध्ये जी मिठास होती, ती कानावर पडली की टाळ्याच वाजायच्या. वक्तृत्त्वाच्या जोरावरच अटलजींनी हजारो सभा जिंकल्या.

माझ्यासारखे कोट्यवधी नागरिक त्यांच्या भाषणाचे चाहते आहेतच. पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील वाजपेयींच्या भाषणांचे चाहते होते. वाजपेयी त्यावेळी अगदी युवा खासदार होते. त्यामुळे त्यांना भाषणाची संधी शेवटी शेवटी मिळे. पण परराष्ट्र धोरण आणि इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी पंडितजी आवर्जून उपस्थित रहायचे. इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी हे माझे आवडते वक्ते आहेत, असे खुद्द नेहरू यांनी म्हटल्याचे उल्लेख सापडतात. अशी वाजपेयींच्या वाणीची मोहिनी होती.


सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट दूरदर्शनवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तेव्हापासून तर वाजपेयींच्या भाषणाची पर्वणी अधूनमधून मिळतच गेली. १९९६ साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा केंद्रात सरकार आले. पण ते अवघे १३ दिवसच टिकले होते. त्यावेळी अटलजींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेले भाषण अजूनही कानात आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. १९७७ मध्येही जनता पक्षाचे सरकार असताना हाच मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हाही आमची भूमिका तीच होती आणि आजही तीच आहे. संघाशी आमचे असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि ते नाकारण्याचा संबंधच नाही. आमच्याकडे बहुमत नाही आणि बहुमतासाठी घोडेबाजार करण्याचा किंवा आपल्या विचारांशी प्रतारणा करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळेच मी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी निघालो आहे... ’ असे अगदी ठामपणे सांगणारे वाजपेयी आजही अगदी जशेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. त्यानंतर त्यांना दोनदा भारताचे पंतप्रधान होण्याची संधी भारतीयांनी दिली. कदाचित १९५२ पासून एकाच विचारांशी निष्ठा बाळगल्याबद्दल तमाम भारतीयांनी त्यांना दिलेले हे बक्षिसच होते.

सी. के. जाफर शरीफ हे नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. त्यावेळी कोणत्या तरी विषयावरून संघाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी जाफर शरीफ त्यांच्या भाषणात म्हणाले होते, की लहानपणी मी संघात जायचो. पण आता माझा संघाशी काहीही संबंध नाही. तेव्हा माझ्यावरही संघाचे संस्कार झालेले आहेत, असे तुम्ही म्हणाल का? त्यावर वाजपेयी यांनी क्षणाचाही विलंब न करत उत्तर दिले होते, वन्स अ स्वयंसेवक इज ऑलवेज अ स्वयंसेवक... त्यामुळे तुम्ही आजही संघाचे स्वयंसेवक आहात, असेच संघ मानत असेल. वाजपेयींच्या या उत्तरानंतर जाफर शरीफ यांची अवस्था काय झाली असेल, त्याचा अंदाज आला असेलच.

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गीता मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजलनी वाहणारी भाषणे लोकसभेत सुरु होती. त्यावेळी वाजपेयी यांनी कम्युनिस्ट नेत्याचे भरभरून केलेले कौतुक अविस्मरणीय असेच आहे. वाजपेयी म्हणाले होते, की गीता मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कम्युनिस्ट पक्षाचाच कोणतरी उमेदवार निवडून येईल. तो त्यांची जागा घेईल. पण एक चांगल्या संसदपटू आणि अभ्यासू वक्त्या म्हणून आमच्या हृदयामध्ये त्यांची जी जागा आहे, ती कोण घेणार. असे एक ना दोन असंख्य प्रसंग आणि त्यांच्या वक्तृत्वाचे शेकडो किस्से इथे सांगता येतील. अशी त्यांची शैली होती.

अटलजी त्यांच्या भाषणांमधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर कडाडून टीका करीत असत. प्रसंगी त्यांच्यावरही जोरदार आसूड ओढत. पण बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आपल्या विरोधकांचेही प्रसंगी कौतुक करण्याचा दिलदारपणा त्यांच्यात होता. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्येही त्यांचे मित्र होते. चंद्रशेखर तर त्यांना माझे राजकीय गुरु असेच म्हणायचे. अशी अटलजींची महती होती, आहे आणि राहणार.



अटलजी कविमनाचे असले तरी देशाचे नेतृत्व करताना त्यांचे हे कविमन आड आले नाही. पोखरणमध्ये ११ आणि १३ मे रोजी केलेले अणुस्फोट असोत किंवा कारगिलमध्ये पाकिस्तानला चारलेली धूळ असो, अटलजींचा कणखरपणाच वेळोवेळी दिसून आला. त्यांनी कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही. मग ते नरेंद्र मोदी का असेना. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय... ही संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांची आवडती कविता करणारे अटलजी हळव्या मनाचे असले तरी ते प्रसंगी कठोरही होत. भिवंडीत उसळलेल्या दंगलीनंतर त्यांनी संसदेत भाषण करताना ‘अब हिंदू मार नही खाएगा,’ असे ठणकावून सांगितले होते. पण वाजपेयी हे आंधळे किंवा झापडबंद हिंदुत्वावादी नाहीत. मुळात ते अडवाणी किंवा उमा भारती यांच्यासारखे कडवे तर नाहीतच. एकदम खुल्या दिलाचे आणि विचारांचे आहेत. त्यामुळेच गोध्रा दंगलीनंतर ‘राजधर्माचे पालन करा’ असे मोदींना निक्षून सांगण्याची हिंमत त्यांनी दाखविली. ती कदाचित आजही भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे किंवा संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे नाही.

दुसरीकडे प्रमोद महाजन यांनाही त्यांनी एका फटक्यात जमिनीवर आणले होते. त्यावेळी महाजन हे अटलजींचे डावे-उजवे दोन्ही हात होते. त्यामुळेच त्यांच्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान आणि दूरसंचार अशी अगदी महत्त्वाची खाती होती. प्रमोद महाजन म्हणजे पीएम. भाजपचे पुढील प्राईम मिनिस्टर असे त्यांचे वर्णन केले जायचे. त्यावेळी महाजनांनी एका जाहीर सभेत सोनिया गांधी यांची तुलना बिल क्लिंटन यांचे संबंध असलेल्या मोनिका ल्युवेन्स्की हिच्याशी केली होती. त्यावेळी वाजपेयी यांना ही हीन दर्जाची टीका अजिबात रुचली नव्हती. योग्य ती वेळ साधून वाजपेयी यांनी महाजनांची दोन्ही खाती काढून घेतली होती, तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची सूचना केली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आपल्या जवळचा वगैरे असा विचार करून त्यांनी दोषी व्यक्तीला पाठिशी घातले नाही.

तीनवेळा भारताचे पंतप्रधान होणारे वाजपेयी हे एकमेव गैरकाँग्रेसी नेते. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्यांना ही संधी मिळाली होती. पण गैरकाँग्रेसी नेत्यांच्या स्वप्नातही येणार नाही, अशी कामगिरी वाजपेयी यांनी करून दाखविली. अर्थात, वैचारिकदृष्ट्या भाजपशी किंवा संघ परिवाराशी आयुष्यात कधी जमले नाही, अशा चंद्राबाबू नायडू, जॉर्ज फर्नांडिस, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती आणि फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांची मोट वाजपेयी यांनी बांधली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात आणले. वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले आणि भाजपच्या नेतृत्त्वाची काय वाताहत झाली आहे आणि कोणकोणत्या राजकीय पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे, हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात वाजपेयी यांचे किती महत्त्वाचे योगदान होते, हेच यावरून स्पष्ट होते.

पुण्यातही १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडी यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता। त्यावेळी त्यांच्या विरोधात अविनाश धर्माधिकारी यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन कार्यवाह आणि धर्माधिकारी यांचे सासरे अनंतराव गोगटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर एक पत्र प्रसिद्ध करण्याचा मुद्दा त्यावेळी खूप चर्चेत आला होता.

संघाच्या स्वयंसेवकांवर कोणत्याही विशिष्ट उमेदवाराचे काम करण्याचे बंधन नसते, असा त्या पत्राचा आशय होता। म्हणजे संघाच्या लोकांनी धर्माधिकारी यांचे काम करावे, हा त्यातील छुपा अर्थ. पण फक्त अटलजींच्या एका शब्दावर भाजपच्या निष्ठांवत मतदारांनी धर्माधिकारी नव्हे तर कलमाडींना मत टाकले होते आणि धर्माधिकारी यांना अवघ्या ३५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.

असे वाजपेयी २५ डिसेंबर २०११ मध्ये ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे आज अटलजी जरी समोरच्या व्यक्तीला ओळखण्याच्या किंवा त्याच्याशी बोलण्याच्या परिस्थितीत नसले ते आहेत, हाच त्यांच्या चाहत्यांना दिलासा आहे. वाजपेयींवर ईश्वराची कृपादृष्टी कायम रहावी, अशीच त्याच्याकडे प्रार्थना.

Tuesday, November 29, 2011

श्री गुरुदेव दत्त संतप्त...


दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचं दूध... या गाण्यामुळे आधीच चर्चेत आलेला देऊळ नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला। एका चांगल्या आणि जळजळीत विषयाला तोंड फोडल्याबद्दल कुलकर्णी बंधूंचे सर्वप्रथम अभिनंदन.

मध्यंतरी शिर्डीला गेलो होतो. शिर्डीचा जो बाजार झालाय तो पाहून भाव, भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शे-पाचशे रुपयांना अगदी सहज मिळू शकतात, हे जाणवलं. शिर्डीचे साईबाबा काय, तिरुपतीचा बालाजी काय, प्रभादेवीचा सिद्धीविनायक काय, आणि कुठले कुठले देव काय. सगळेच भक्तीचे भुकेले. पण त्या मंदिरांच्या ट्रस्टचे काम पाहणारी मंडळी मात्र, वेगळ्याच भावाचे भुकेले असतात. त्यामुळेच काही हजार रुपये मोजले, की तातडीचे दर्शन. थोडे कमी पैसे दिले, की आणखी जास्त वेळ. अशा गुणोत्तराने दर्शनाची वेळ वाढत जाते. अगदी सर्वसामान्य म्हणून जो भक्त असतो, तो तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभा आणि पैसेवाली मंडळी दोन मिनिटांच दर्शन घेऊन मोकळे. चहापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी दामदुपटीने विकून भक्तगणांना चक्क लुटणारी मंडळी आणि भक्तीचा मांडलेला बाजार. डोकं उठतं. त्यावर कोणी ना कोणी तरी आसूड ओढणे गरजेचेच होते. ते काम कुलकर्णी द्वयांनी केले. त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

चित्रपटाचे संवाद एक नंबर आहेत. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी यांना शंभरपैकी दोनशे मार्क दिले पाहिजेत. चित्रपटातील संवादामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा प्रेक्षकांवर किती अत्याचार झाले असते त्याचा विचारच करता येत नाही. काही ठिकाणी पातळी सोडल्याचे जाणवते. उदा. ठासली जाणे, गोट्या कपाळात जाणे इइ. पण इतके चालणारच.

पण चित्रपटाबद्दल सर्वाधिक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे निवडण्यात आलेला देव। देवाची निवड चुकलीच म्हणायची. कारण गुरुदेव दत्त हा देव अजूनही बाजारापासून दूर आहे. नरसोबाची वाडी, गाणगापूर, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, नवनाथ किंवा शेगांवचे गजानन महाराज या सर्वांचा बाजार मांडलेला नाही. खरीखुरी भक्ती तिथं अजूनही टिकून आहे. शिर्डीला जा आणि एकदा शेगांवला जा. दोन्हीमधला फरक वर्णन न करता येण्याजोगा आहे. शिवाय दत्त या देवाची ख्याती वेगळी असल्यानं त्याच्या वाटेला शक्य तो कोणी जात नाही. गुरुचरित्र वाचायलाही काही नियमावली असते. ती पूर्ण केली नाही तर गुरुचरित्राचे फायदे मिळत नाहीत. असा हा कडक देव. त्यामुळं दत्ताचा बाजार मांडण्याचे धाडस अजूनही कोणी केलेले नाही. खरा बाजार झालाय तो फकीर म्हणून आयुष्य काढलेल्या साईबाबांचा. महागड्या बालाजीचा आणि सिद्धीविनायकाचा.

वरीलपैकी कोणत्या तरी एकाही देवाविरुद्ध चित्रपट काढला असता तर तो थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये चढण्यापूर्वीच त्याचा बाजार उठला असता. म्हणूनच, की काय कुलकर्णी द्वयांनी दत्त या साध्या भोळ्या आणि शांत देवाचा बाजार मांडून चूकच केली. किंवा त्यांच्यात खराखुरा बाजार झालेल्या देवांची कथा खरं तर व्यथा मांडण्याची हिंमत नसावी, इतकाच निष्कर्ष आपण काढू शकतो. शेवटी संस्कृतमध्ये म्हटलेच आहे,
वाघाचा सिंहाचा बळी दिला जात नाही। बोकडाचाच बळी दिला जातो. कारण तो शांत असतो, प्रतिकार करू शकत नाही. तसाच दत्ताचा बळी या चित्रपटात देण्यात आला आहे.

दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे, चित्रपटात झालेली कलाकारांची बजबजपुरी। दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून ते विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम आणि स्वतः गिरीश कुलकर्णी यांच्यापर्यंत बऱ्याच नटनच्यांचा गोतावळा चित्रपटांत जमविण्यात आला आहे. पण त्यामुळेच कोणत्याच नटाची छाप त्यामध्ये पडत नाही. दिलीप प्रभावळकर सुद्धा तीन-चार प्रसंगांमधूनच दिसतात. त्यांचे अगदी थोडेच संवाद प्रभावी आहेत. प्रभावळकर आणि नाना यांचा म्हणावा तसा उपयोग चित्रपटात झालेलाच दिसत नाही. कदाचित गिरीश कुलकर्णी यांची भूमिका त्यांच्या भूमिकेपुढे दुबळी वाटू नये, म्हणूनच दोघांनाही तोंडी लावण्यासाठी घेतले, की काय असे वाटते. तसे जर असेल तर तो त्यांचा अपमानच म्हटला पाहिजे.



हे दोन झाले प्रमुख आक्षेप। बाकी दिग्दर्शनाचे म्हणाल, तर अनेक पुरावे देता येतील. मुख्य म्हणजे गावांतल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर लागलेले जयोस्तुते हे गाणे. भारतातील तमाम शाळांमध्ये तिरंगा फडकल्यानंतर राष्ट्रगीत म्हणजे जन गण मनच लागते. वंदेमातरम लाही अजून तो मान मिळालेला नाही. त्यामुळे जयोस्तुते लावणे चूकच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे लाडके राष्ट्रपुरुष आहेत. जयोस्तुते हे उत्तम गीतही आहे. पण राष्ट्रगीताची जागा ते घेऊ शकत नाही. त्यामुळे इतकी गंभीर चूक होऊनही एकाही चित्रपट परीक्षकाने त्यावर बोट ठेवलेले नाही, याचे आश्चर्यच वाटते. आता गाणे घाईगडबडीत चुकून लागले आहे, असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल तर तो संदेश अजिबात पोहोचत नाही.

नंतर खटकणारी गोष्ट म्हणजे सकाळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश मिळत नाही। सुरक्षारक्षक त्याला हाकलवून लावतात. मग रात्रीच्या वेळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश कसा मिळतो आणि तो मंदिरातील दत्ताची मूर्ती चोरून पळून कसा जातो, या चमत्काराची कथा प्रेक्षकांना अजिबात कळत नाही. गिरीश कुलकर्णी हे दत्ताची मूर्ती कसा चोरतो, हे जर अधिक स्पष्टपणे दाखविले असते, तर मायबाप प्रेक्षकांवर उपकार झाले असते, असे ऍज अ प्रेक्षक म्हणून वाटते हं.

नंतर गिरीष कुलकर्णी जेव्हा दत्ताची मूर्ती पाण्यात बुडवितो तेव्हा ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तेव्हा एक तर ती मूर्ती दगडाची असते, संमगरवरी असते, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते किंवा शाडूची असते. चित्रपटात दाखविलेली दत्ताची मूर्ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. म्हणजे ती फायबरची असावी असे दिसते. दत्ताचे देवस्थान जर जागृत असेल तर तिथे फायबरची मूर्ती असूच शकत नाही. शिवाय मूर्तीचे विसर्जन करताना पाणी खळखळत असते पण नंतर ते अचानक शांत होते, असे दृष्यातून दिसते. खूप मोठ्या चुका आहेत, असे नाही. पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर जाणवते. तेव्हा कुलकर्णी मंडळींनी पुढील वेळी या बारीकसारीक गोष्टींचा जरूर विचार करावा.

ज्या गावामध्ये पोस्टमनही येत नाही, त्या गावात दिलीप प्रभावळकरच्या घरी इंटरनेट पोहोचलेले असते, दत्ताची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पत्रकार किशोर कदम महासंग्राममधून आयबीएन लोकमतमध्ये पोहोचतो, हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. शिवाय काही दृष्यांमध्ये फिल्टर वापरून रात्र करण्याची चोरी जाणकार मंडळींच्या लगेच लक्षात येते.

चित्रपटात काही गोष्टी उगाच घुसडल्यासारख्या वाटतात। पहिली म्हणजे वेलकम राया ही लावणी कम आयटम साँग. आता त्यात निवडलेली आयटम इतकी बकवास आहे, की झक मारली आणि लावणी पाहिली, असे वाटते. गायिकेचा आवाज आणि लावणीचे शब्द सोडले तर लावणीत मादकता अजिबात नाही. प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट काय, नाईट क्रिकेट काय, उचलून मारा, हळूवार मारा, अलगद मारा... ही म्हणजे अकलेची दिवाळखोरी वाटते. प्रेक्षक खिळवूनच ठेवायचे असेल तर एखादे सेक्स साँग किंवा कॅब्रे डान्सच टाकायचा ना. साईड साईडने कशाला खेळता. थेटच भिडा.

तीच गोष्ट नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सागरगोट्यांच्या दृष्याची. अजिबात आवश्यकता नसलेले आणि सोनाली कुलकर्णीला गुरुदेव गच्च दाखविणारे ते उठवळ दृष्य असेच प्रेक्षकांना चळवायला चित्रपटात घेतले आहे, की काय अशी शंका येते.

जाता जाता आणखी एक। नसिरुद्दीन शाह यांचा विनाकारण घुसडलेला प्रसंग। मुळात त्या प्रसंगाची आवश्यकता काय, की मोठा कलावंत मराठीत आणण्याचा अट्टहास, याचे उत्तर मिळत नाही. करडीच्या पायाला झालेली दुखापत तसेच नसिरुद्दीनच्या पायाला झालेली दुखापत, यातून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हे समजत नाही. करडीच नसिरुद्दीन शहाच्या रुपाने तिथे आलेली असते, असे तर सुचवायचे नाही ना. तसे जर असेल तर हा अंधश्रद्धा पसरविण्याचाच प्रकार आहे. म्हणजे एका वाईट बाजूवर कोरडे ओढायचे आणि आपणच दुसरी वाईट बाजू उचलून धरायची, असे झाले. दिग्दर्शकाला त्या प्रसंगातून काय दाखवायचे हे समजत नाही. पण मी म्हणतो, तसे दाखवायचे असेल तर एक हजार वेळा निषेध.

तेव्हा अशा काही सुधारणा झाल्या असत्या तर देवळात अधिक प्रसन्न वाटले असते. बाकी देवा तुला शोधू कुठे आणि दत्त दत्त दत्ताची गाय ही गाणी एकदम झक्कास. एका चांगल्या विषयाला भिडल्याबद्दल अभिनंदन.

Tuesday, November 15, 2011

चार हजार कोटींची भीक मागणारा

उधळ्या उद्योगपती

भारतातील क्रमांक दोनची एअरलाईन्स सेवा असलेल्या किंगफिशरचे विमान जमिनीवर आदळले आहे. चार हजार कोटी रुपयांचा संचित तोटा किंगफिशर एअरलाईन्सला झाला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कंपनीची गेल्या काही दिवसांपासून उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. किंगफिशरचा शेअरही धपकन उतरला आहे. कर्जाची परतफेड करता येत नाही, म्हणून ज्या बँकांनी त्यांचे शेअर्स ताब्यात घेतले, त्या बँकाची चांगल्या धास्तावल्या आहेत. कारण शेअरचे भाव गडगडल्यामुळे त्यांची किंमत खूप कमी झाली आहे. प्राप्त परिस्थितीत कंपनीला आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने आम्हाला बेल आऊट पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी केली आहे।

मुळात, असे पॅकेज देण्यात यावे किंवा कसे, याबाबत भारताचे मुखदुर्बळ पंतप्रधान आणि स्वतः अर्थतज्ज्ञ असूनही सामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे डॉ. मनमोहनसिंग काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. टूजी तसेच राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारे पंतप्रधान याबाबत तोंड उघडतात की नेहमीप्रमाणे मौनीबाबा होतात, यावर अब्जावधी रुपयांचा सट्टा लागला आहे, असे नुकतेच ऐकिवात आले आहे.

असो. आजचा विषय तो नाही. मुख्य प्रश्न आहे, मद्यमहर्षि विजय मल्ल्या यांना अशी आर्थिक मदत करावी, की नाही. मुळात मल्ल्या यांची एकूण लाईफस्टाईल पाहता त्यांची कंपनी तोट्यात येणार हे सांगायला मनमोहनसिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. अगदी फुटकळ माणूसही ते छातीठोकपणे सांगू शकला असता. मुळात आपली औकात नाही, तर शंभर गाढवं अंगावर घ्यायची कशाला. झेपतंय तेवढंच करावं. पण मल्ल्या यांना हे कोण सांगणार।

पूर्वी फक्त बिअर व दारुपुरताच किंगफिशर हा ब्रँड मर्यादित होता. पण नंतर हवाई उद्योगात प्रवेश करतानाच मल्ल्या यांनी स्वतःचा बडेजाव मिरवित फॉर्म्युला वनची भारतीय टीम विकत घेतली. आयपीएलमध्ये बेंगळुरुची टीम खरेदी केली. त्यापूर्वीर्ही काही वर्षे त्यांनी परदेशातून टिपू सुलतानची तलवार अब्जावधी रुपये मोजून ताब्यात घेतली. त्यानंतर ते राजकारणात शिरले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तिकिटावर राज्यसभेतही पोहोचले।

टिपू सुलतानची तलवार हे एकवेळ समजू शकतो. मुळात तो लोकांच्या भावनेचा विषय होता आणि त्यासाठी मल्ल्या यांनी साडेतीन ते चार अब्ज रुपये मोजले होते. तेही स्वतःच्या खिशांतून. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात आणण्यात येणार असेल तर त्यासाठी मराठी माणूस कितीही पैसे मोजू शकतो. त्यामुळे टिपू सुलतानची तलवार भारतात आणण्यासाठी खर्च केलेले पैसे हा विषय वेगळा आहे. त्याचा इतर दोन गोष्टींची संबंध जोडण्याची आवश्यकता नाही।

राहता राहिला मुद्दा फोर्स वनची टीमचा आणि बेंगळुरुच्या संघाचा. मल्ल्या यांनी साडेपाचशे कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मोजून बेंगळुरुची टीम खरेदी केली. तर मल्ल्या यांनी मायकेल मोल यांच्याशी भागीदारीमध्ये साधारण साडेसहाशे कोटी रुपये खर्च करुन फोर्स वन ही एफ वन रेसमधील भारतीय टीम खरेदी केली. दरवर्षी त्यावर होणारा खर्च किंवा इतर गोष्टींच्या तपशीलामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अगदी स्पष्टच बोलायचे झाले, तर भारतामध्ये फॉर्म्युला वन रेस लोकप्रिय असली तरी फारशी रुजलेली नाही. नरेन कार्तिकेयन आणि करुण चंडोक ही दोन नावे सोडली तर भारतात त्या रेसमध्ये सहभागी होऊ शकेल असा एकही एफ वन ड्रायव्हर नाही. फोर्स वनचे दोन्ही ड्रायव्हर्स परदेशी आहेत. त्यामुळे मल्ल्या यांनी फोर्स वन टीम खरेदी करुन भारताची शान वाढविली असे काही क्षण जरी वाटत असले तरी त्यांनी हरणाऱ्या घोड्यावर पैसे लावले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली असून ज्यात तोटात तोटा दिसतो आहे, तिथे पैसा लावला आहे।

प्रत्येक वेळी मल्ल्या यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक मोठी झाली असली तरी मल्ल्या यांची झोळी रिकामी होत गेली आहे. मल्ल्या यांनी हाच पैसा पद्धतशीरपणे किंगफिशरमध्ये लावला असता तर त्यांच्यावर ही वेळ ओढविलीच नसती, हे सांगायला मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांची आवश्यकता नाही. दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत, इकडचा पैसा तिकडे कसा फिरविणार वगैरे आक्षेप असू शकतात, पण टूजीचे हजार कोटी इकडे तिकडे फिरविणाऱ्या मंडळींना हे पैसे फिरविण्याइतके अर्थज्ञान नक्कीच असू शकेल. तेव्हा मल्ल्या यांनी आधीपासूनच जर योग्य व्यवसाय केला असला तर हवाई वाहतुकीच्या धंद्यासाठी केंद्र सरकारपुढे भिकाऱ्यासारखे हात पसरण्याची वेळ आली नसती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुरेश कलमाडी यांना मर्सिडिजमधील भिकारी म्हणाले होते. त्या धर्तीवर मल्ल्या यांना विमानवाला भिकारी म्हटले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा तुम्हाला धंदा चालविता येत नसेल तर धंदा बंद करुन टाका. विमानसेवा कंपनीला टाळा लावा आणि दारुचा महापूर वाढवून कसा पैसा ओढता येईल, याच्या नव्यानव्या कल्पना शोधून काढा. पण धंदा तुमचा आणि पैसा सरकारचा (पर्यायाने लोकांचा) हा आतबट्ट्याचा व्यवहार सांगितला कोणी. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी बेल आऊट पॅकेज देण्यास विरोध केला आहे.

आता चार हजार कोटी रुपयांचे बेल आऊट पॅकेज मिळाले तर मल्ल्या यांची चांदीच आहे. दोन-पाच वर्षांत ते पैसेही फुकून पुन्हा एकदा भिकाऱ्यासारखे सरकारपुढे हात पसरायला मोकळे. काही वर्षांपूर्वी सहारा एअरवेज ही कंपनी तोट्यात आली होती. ती नरेश गोयल यांच्या जेट कंपनीने विकत घेतली. त्याच धर्तीवर मल्ल्या यांनी त्यांची किंगफिशर कंपनी फुकून टाकावी आणि मोकळे व्हावे, म्हणजे सरकारपुढे वारंवार हात पसरण्याची वेळच ओढविणार नाही. तेव्हा मुळातच सरकारने किंगफिशरला बेल आऊट पॅकेज वगैरे देण्याच्या फंदात पडूच नये. आणि जरी अशाप्रकारे पॅकेज देण्याचा निर्णय घ्यायचा विचार सरकारने केला तरी त्याबदल्यात संपूर्ण किंगफिशर कंपनी ताब्यात घ्यावी.

मात्र, जर कंपनी आणि कामगार वाचविण्यासाठी बेलआऊट पॅकेज वगैरे जाहीर केले, तर सरकारपुढे महासंकटच उभे राहिल. भारतीयांची मानसिकता लक्षात घेता, भविष्यात आणखी काही कंपन्या स्वतःला दिवाळखोर जाहीर करुन पैसे लाटण्यासाठी नक्की पुढे येतील, यात वाद नाही. शिवाय, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पैशांची मदत करायला वर्षानुवर्षे लावणारे सरकार मद्यमहर्षी विजय मल्ल्या यांच्या कंपनीला तातडीने मदत देऊ लागले तर सरकारच्या दळभद्रीपणाचा कळसच होईल, असे म्हणावे लागेल.

समिती बसवा, चर्चा करा, आढावा घ्या, तज्ज्ञांना आढावा घेण्यास सांगा, असे न करु नका. तेव्हा मनमोहना, आता तरी तोंड उघडा आणि मल्ल्यांना स्पष्ट शब्दात नाही म्हणा. नाही तर तुम्ही तुमच्या अगम्य इंग्रजीत तोंडातल्या तोंडात नाही म्हणाल आणि मल्ल्या मात्र, सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत राहतील. तेव्हा खणखणीत नकार द्या आणि विषयाचा तुकडा पाडा.