Sunday, June 16, 2013

भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता

नितीशही दुटप्पी नि भोंदू




‘भारत हा ढोंगी आणि संधीसाधू राजकारण्यांचा देश आहे, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नरेंद्र मोदी यांचा बागुलबुवा करीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दबावामुळे संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भारतीय जनता पक्षाबरोबरील १७ वर्षांचा संसार मोडला आणि नितीशकुमार यांचा ढोंगी आणि सत्तापिपासू चेहरा पहिल्यांदा देशासमोर आला. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हाच नितीशकुमार यांना काडीमोड घ्यायचा होता. मात्र, निमित्त लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याचे झाले आणि नितीशकुमार यांनी नैतिकतेचा थयथयाट करीत भाजपबरोबरील युतीला अलविदा केला. झाले ते बरेच झाले. नैतिकतेच्या नावाखाली सत्तांधतेचा आणि ढोंगीपणाचा बुरखा वावरून हिंडणाऱ्या नितीशकुमार यांचे वस्त्रहरण झाले असून नीतिमूल्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे.

नरेंद्र मोदी यांना फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही. मोदी हे देशभरात लोकप्रिय आहेत. मध्यमवर्गीय, तरुण आणि महिलांची त्यांना विशेष पसंती आहे. गुजरातच्या निवडणुकीत फेसबुक-टि्वटरपासून ते थ्रीडी सभांपर्यंत वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा त्यांना आणि अर्थातच, पक्षालाही झाला. त्यांची हीच दूरदृष्टी आणि लोकप्रियता यांचा फायदा मिळविण्यासाठी त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद दिले तर बिघडले कुठे? मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांचा जळफळाट होण्याचे कारण काय?

नितीशकुमार यांना दोनवेळा बिहारच्या जनतेने निवडून दिले आहे, तर मोदी यांना तीनवेळा गुजरातच्या नागरिकांनी जनादेश दिला आहे. नितीशकुमार हे भाजपबरोबर युती करून निवडून आले आहेत. तर मोदी यांनी स्वबळावर सत्ता खेचून आणली आहे. एखाद वर्षाचा कालावधी वगळता १९९४ पासून गुजरात हे राज्य भाजपच्याच पाठिशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे मोदी काल राजकारणात आले आणि आज त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद मिळाले नाही, अशी परिस्थिती नाही. बिहारमध्ये महापूर आला तेव्हा, नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारने मोठ्या मनाने मदत पाठविली. पण ती मदत हेकेखोर नितीशकुमार यांनी नाकारली. वास्तविक पाहता, ती मदत मोदी यांनी स्वतःच्या खिशातून पाठविलेली नव्हती. त्यामुळे ती स्वीकारायला काहीच हरकत नव्हती. पण नितीशकुमार यांनी गुजरातची मदत नाकारून स्वतःच्या कोत्या मनाचेच दर्शन घडविले. 

राहता राहिली गोष्ट नरेंद्र मोदी यांच्यावरील गोध्रा दंगलीच्या ठपक्याची. जे झाले ते सर्व लोकांसमोर आहे. स्वयंसेवी संस्थांपासून ते सीबीआयपर्यंत आणि काही आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते केंद्रातील सरकारपर्यंत अनेक जण पिसाटल्यासारखे मोदी यांच्या मागे लागले आहेत. मात्र, कोणालाही मोदी यांच्याविरोधात काहीही सापडलेले नाही. मोदी यांचा गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हात आहे, हे कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. कायद्याच्या दृष्टीने ते निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ठपका नाही. मग असे जर असेल तर त्यांचे नाव ऐकताच अंगाचा तिळपापड व्हायचे कारण काय? महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळणारे किंवा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नवी दिल्लीत शिखांची घरे जाळणारे, शिंखांचे शिरकाण कोण आहेत, हे उघड गुपित आहे. मात्र, त्यापैकी अद्यापही कोणीही कायदेशीरदृष्ट्या दोषी सिद्ध झालेले नाही. अशी मंडळी उजळ माथ्याने राजकारण आणि समाजकारणात वावरत आहेत. असे असताना मोदी यांच्यावरील तथाकथित आरोप सिद्धही झालेले नसताना त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्याचे कारण काय?

आणि नितीशकुमार यांना नरेंद्र मोदी यांच्या नावाची इतकीच शिसारी आणि घृणा आहे, तर गेली अकरा वर्षे ते का गप्प बसले होते? गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर दंगल उसळली होती. तेव्हा केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असलेल्या नितीशकुमार यांनी नितीमत्तेचा आदर्श घालून राजीनामा का नाही दिला? त्यानंतरही भाजपशी सत्तासोबत करून नितीशकुमार दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री बनले. तथाकथित दंगलखोर नरेंद्र मोदी हे ज्या भाजपचे नेते आहेत, त्याच भाजपशी नितीशकुमार यांना चक्क सात वर्षे सत्तेसाठी घरोबा ठेवला. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी बाजूला व्हायचे होते. त्यामुळे कोणाची ताकद किती हे स्पष्ट झाले असते. भाजपला बिहारमध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ९१ जागा मिळाल्या आहेत. संयुक्त जनता दलामुळे भाजपचा फायदा झाला की भाजपमुळे नितीशकुमारांचा हे कळले असतेच. मात्र, आता ती आपल्या नेतृत्वाची लाट होती, अशा गैरसमजात आहेत. देशभर आपली लाट आहे, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा सल्ला नितीशकुमार मोदी यांना देत आहेत. मात्र, तोच सल्ला त्यांना बिहारसाठी लागू आहे, हे विसरू नये.



इतकी वर्षे भाजपशी सत्तासंगत केल्यानंतर अचानक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश यांना काडीमोड घ्यावासा वाटतो, हे सत्तेचे संधीसाधू राजकारण नाही तर काय? त्यामुळेच आता नितीशकुमारांना विचारावेसे वाटते, की ‘नितीशकुमार, तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म. तेव्हा कुठे गेली होती तुमची मूल्ये? त्यावेळीच सत्तेचा त्याग करून वेगळे का नाही झालात? इतकी वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर का ठाण मांडून होता?’

आता लोकसभा निवडणूक ज‍वळ आली आहे आणि नितीशकुमार यांना कदाचित पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. भारतीय राजकारणात एक गोष्ट मस्त आहे. इथे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या घातल्या, की लोक लगेच धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर होतात. जसं आयुष्यभर केलेली पापं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर धुवून निघतात, अशी लोकांची भाबडी आशा असते. तसेच काहीसे भारतीय राजकारणाचे आहे. भाजपशी शय्यासोबत करून सत्तेची खुर्ची पटकवायची. दुसरीकडे संधी आहे, असे लक्षात येताच भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आणि काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी घरोबा करुन पुन्हा सत्तेत सहभागी व्हायला मोकळे. मुख्य म्हणजे भाजपची साथ सोडणे, हाच सेक्युलर असण्याची प्रमुख अट आहे. ती अट पूर्ण केली की इतर सर्व पक्ष मैत्रीचा हात पुढे करण्यास मोकळे.

भारतात सेक्युलर असण्याची अट प्रचंड भंपक आणि बोगस आहे, की विचारता सोय नाही. पोलिसांना दूर ठेवा आणि आम्हाला पंधरा मिनिटे द्या, हिंदूंचे ‘कतले आम’ करून टाकतो, अशी भाषा करणारा हैदराबादमधील ‘एमआयएम’ हा धर्मांध मुस्लिमांचा पक्ष काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. तरीही काँग्रेस मात्र, सेक्युलर. केरळमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची मैत्री आहे. तरीही काँग्रेस धर्मनिरपेक्ष. ही काय भानगड आहे कळत नाही. म्हणजे भाजपशी वैर हीच सेक्युलर असण्याची मूळ आणि मुख्य अट आहे की काय, अशीच परिस्थिती आहे. ती अट पूर्ण करण्यासाठी नितीशकुमार यांना १७ वर्षांचा घरोबा मोडला.

आता ते कधी काळी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि अशा अनेक प्रादेशिक पक्षांची मोट बांधून पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून तयार होतील. कदाचित ज्या काँग्रेसविरोधात ते बिहारमध्ये लढले आणि लढत आहेत, त्या काँग्रेसचा पाठिंबाही घेतील. आतून नाही घेतला तर बाहेरून तरी घेतील. कारण ते स्वबळावर मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवू शकतील. मात्र, पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना भाजप किंवा काँग्रेसचाच आधार लागणार आहे. आता भाजप हा धर्मांध आणि जातीयवाद्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांचा पाठिंबा घेणे नितीशकुमार पसंत करणार नाहीत. त्यामुळे गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांच्या हत्या झाल्या तेव्हा सत्तेवर असलेल्या सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून नितीशकुमार नवा संसार थाटतील.

त्यांच्या या भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

Tuesday, June 11, 2013

अडवाणींचे प्रतिमाभंजन


शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर असतानाचा किंवा युतीची सत्ता नुकतीच गेली, तेव्हाचा काळ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये काहीतरी वादग्रस्त विधान करून वादाचा धुरळा उडविलेला. मग त्यावर वाद आणि प्रतिक्रियांचा जोरदार प्रतिध्वनी उमटत होता. त्यामध्ये चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांची आज इतक्या वर्षांनंतरही लक्षात राहिलेली प्रतिक्रिया... ‘बाळासाहेब, आमच्या मनामध्ये तुमची जी प्रतिमा आहे, तिला धक्का पोहोचविण्याचा अधिकार खुद्द तुम्हालाही नाही...’ सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या एकूणच वर्तनाबद्दल पक्षातील त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते यांची भावनाही नानापेक्षा वेगळी असण्याची शक्यता नाही. ‘अडवाणी, आमच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे, तिला धक्का लावण्याचा अधिकार खुद्द तुम्हालाही नाही. त्यामुळे असे कोणतेही पाऊल उचलू नका, ज्यामुळे गेल्या ६५ वर्षांत निर्माण झालेल्या तुमच्या प्रतिमेचे भंजन होईल.’

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला लालकृष्ण अडवाणी यांनी मारलेली दांडी आणि नंतर दिलेला तीन संसदीय पदांचा राजीनामा. आजवरच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीला अनुपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. मुळात अडवाणी हे खरोखरच आजारी होते की त्यांचा आजार राजकीय होता, याबद्दल चर्चा करण्याचे काहीच कारण नाही. कारण दुसऱ्याच दिवशी सत्य समोर आले. शिवाय ८५ वर्षीही एकदम तंदुरुस्त असणारे अडवाणी नेमके बैठकीच्या तीन दिवसांतच आजारी पडले, म्हणजे नक्की काय, हे सूज्ञ मंडळींना समजले होतेच. 

मुद्दा आहे अडवाणी यांच्या प्रतिमेचा. भाजपच्या आजवरच्या वाटचालीत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोनच नेते असे आहेत, की ज्यांचे स्थान कोणालाही घेता येणार नाही. अगदी नरेंद्र मोदी यांनाही ते शक्य नाही. शून्यातून पक्ष उभा करणे म्हणजे काय, हे या दोघांनी करुन दाखविले आहे. त्यामुळेच वाजपेयी आणि अडवाणी यांना एकमेकांपासून वेगळे करणे शक्य नाही. वाजपेयी-अडवाणी हे भाजप कार्यकर्त्यांसाठी एका अर्थाने जोडशब्दच आहेत. एक घेतला की ओघाने दुसरा आलाच. हे दोघे सर्वप्रथम १९४८ मध्ये भेटले. त्यानंतर पाच वर्षांनंतरची म्हणजे १९५३ची घटना. अडवाणी यांनी स्वतःच सांगितलेली. 

दिल्लीच्या पालिका निवडणुकीत जनसंघाला यश मिळावे म्हणून वाजपेयी-अडवाणी खूप झटत होते. मात्र, जनसंघाला त्या निवडणुकीत दणकून पराभव पत्करावा लागला. निकाल जाहीर झाल्यानंतर पराभवाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ते दोघे पहाडगंज येथील टॉकीजमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेले. योगायोगाने तो सिनेमा होता, राजकपूर यांचा ‘फिर सुबह होगी.’ त्यानंतर जवळपास ४३ वर्षांनी भाजप देशात सत्तेवर आला आणि भाजपसाठी खऱ्या अर्थाने ‘सुबह’ झाली. ती केवळ वाजपेयी-अडवाणी यांच्या जोडगोळीमुळेच. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे, यात शंकाच नाही. पण भाजपला सत्तेपर्यंत नेण्यात या दोघांचाच सिंहाचा वाटा आहे, हे विधान सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

तेव्हा वाजपेयी-अडवाणी यांनी पक्षासाठी घेतलेले परिश्रम आणि वारंवारच्या पराभवातूनही पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची त्यांची जिद्द नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे त्यांना वगळले तर भाजप भले मोठे शून्य आहे. असे असतानाही सध्याची परिस्थिती अडवाणी यांच्या पंतप्रधान बनण्यासाठी अजिबात अनुकूल नाही, हे सत्य त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. अनेक दशके राजकारणात असूनही अडवाणी यांची निष्कलंक प्रतिमा आणि या वयातही तंदुरुस्त राहून राजकारणात सक्रिय राहण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे. विचारांवरील निष्ठांबद्दल शंका घेण्याचे धाडस काँग्रेस नेतेही करणार नाहीत. मात्र, वय त्यांच्या बाजूने नाही. भाजपचे कार्यकर्ते नसलेल्या देशभरातील तमाम तरुणांना आणि कुंपणावरील मतदारांना आकर्षित करेल, अशी वाणी आणि व्यक्तिमत्त्व अडवाणी यांच्याकडे नाही. जे वाजपेयी यांच्याकडे होते आणि कदाचित मोदी यांच्याकडे आहे. हे सत्य ८५ वर्षांच्या अडवाणी यांनी मोठ्या मनाने स्वीकारून तरुण नेतृत्त्वासाठी जागा करून दिली पाहिजे.

वास्तविक पाहता, २००९ मध्ये अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या जागा वाढण्याऐवजी घटल्या होत्या आणि काँग्रेसने बऱ्याच वर्षांनी दोनशेचा टप्पा पार केला होता. तेव्हा भाजपचा पराभव का झाला? तो अडवाणी यांच्यामुळेच झाला का? वगैरे चर्चा करण्याची ही वेळ नाही. मात्र, तेव्हा अडवाणी यांना संधी मिळाली होती आणि त्याचे सत्तेत रुपांतर करण्याचे कसब अडवाणी यांना जमले नाही, हा इतिहास आहे. त्याला कोणीही नाकारणार नाही. इतिहासात अनेकांना संधीच मिळत नाही. अडवाणी यांना मात्र, ती मिळाली होती. तिचे सोने करणे त्यांना जमले नाही.

भाजपमधीलच अनेक नेत्यांनी हे सत्य स्वीकारले आहे. भाजपचे प्रदेश पातळीवर महत्त्वाची भूमिका बजविणारे एक आमदार गेल्या वर्षी भेटले होते. ते यासंदर्भात भरभरून बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘वाजपेयी-अडवाणी हे आजही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय नेते आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आम्ही येथे आहोत, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वाजपेयी-अडवाणींचा नाही, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. परिस्थिती बदलली आहे. त्याप्रमाणे पक्ष तसेच नेतृत्त्वाने बदलले पाहिजे. हे दोन्ही नेते सध्याच्या परिस्थितीसाठी योग्य नाहीत. त्यामुळेच आज अडवाणी काय, वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालीही निवडणूक लढविली असती, तरी यश मिळालेच असते अशी खात्री देता येणार नाही.’

तेव्हा तुमचे पक्षातील अतुलनीय योगदान लक्षात घेऊन सुद्धा ‘तुमच्याऐवजी दुसरा’ असा निर्णय भाजप घेणार असेल तर त्यात काहीही चूक नाही. परिवारातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही ते मोकळ्या मनाने स्वीकारता, की रुसून बसता हे महत्त्वाचे आहे. कोणता शिक्का बसेल याची पर्वा न करता, रामजन्मभूमी आंदोलनात झोकून देणारे विचारनिष्ठ अडवाणी लोकांनी पाहिले आहेत. हवालाच्या डायरीमध्ये फक्त ‘एल. के.’ अशी अद्याक्षरे आढळल्यानंतर निर्दोष सिद्ध होईपर्यंत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणारे तत्त्वनिष्ठ अडवाणी लोकांनी पाहिले आहेत. आता मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःच्या शिष्यासाठी मनापासून बाजूला होणारे अडवाणी लोकांना पहायचे आहेत. तसे झाले तरच अडवाणी यांच्या प्रतिमेचे भंजन होणार नाही. 

(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीत ११ जून रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)

Wednesday, April 17, 2013

'त्या' गीताचं काय करायचं?

जवळपास सात वर्षांनंतर दुसरा ब्लॉग सुरू केला आहे. परममित्र निलेश बने यांचा प्रचंड आग्रह मोडणे मला शक्य झाले नाही. सर‘मिसळ’ असे ब्लॉगचे नाव असून तो महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. जे सुचेल, जे दिसेल ते लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा वाचा आणि व्यक्त व्हा... धन्यवाद.
 
एखाद्या ओळखीच्या माणसाला खूप दिवसांनी पाहिलं तर कसं मस्त वाटतं. खूप वर्षांपासून ओळख असेल आणि अनेक दिवस भेट झाली नसेल तर भेटल्यावर बरं वाटतं. पण मी तिला खूप दिवसांनी काल पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं. तिचं तसं दिसणं मनाला अगदी चटका लावून गेलं

तीम्हणजे गीता देशपांडेमला रस्त्यावर भटकताना दिसली. विस्कटलेले केस, खूप दिवस आंघोळ केल्यामुळं काळवंडलेली त्वचा, मळलेल्या पंजाबी ड्रेसचा फक्त टॉप आणि तोही कुठं कुठं फाटलेला, एका हातात प्लॅस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हातात छोटीशी काठी अशा अगदी विपन्नावस्थेत गीता मला दोन-चार दिवसांखाली दिसली. एकटीच स्वतःशी काहीतरी बडबड करत डेक्कनच्या सिग्नलजवळून चालत होती. मी गाडीवर होतो, त्यामुळं अर्धा-एक मिनिट तिचं दर्शन झालं आणि काळीज हेलावलं.

गीता ही अगदी सात-आठ वर्षांपर्यंत आमच्या कॉलनीत राहणारी. माझ्या मागच्याच इमारतीमध्ये. माझ्यापेक्षा साधारण दहा-बारा वर्ष मोठी असेल. तिची आई आणि माझी आई मैत्रिणी किंवा चांगल्या ओळखीच्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं माझं तिच्या घरी आणि तिचं माझ्या घरी जाण येणं अगदी नेहमीचंच. कधी तरी मला एखादं चॉकलेट दे किंवा काय रे अभ्यास करतोस ना, असं विचारणं. किंवा कधी आमच्याकडे काही विशेष केलं तर तो पदार्थ त्यांच्याकडे नेऊन देणं आणि त्यांच्याकडील पदार्थ आमच्याकडे येणं असं चालायचं. इतकीच आमची ओळख.

भारतात सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगची नुकतीच सुरुवात व्हायला लागल्यानंतर म्हणजे १९९० च्या आसपास ती सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि मुंबईमध्ये जॉबला लागली. त्यानंतर आमच्यातील संपर्क खूप कमी झाला आणि नंतर मग तो तुटलाच. मुंबईत नोकरीला असताना तिचं कोणाशी तरी सूत जुळलं होतं. पण त्यानं तिचा ‘फायदा’ घेतला आणि नंतर झिडकारलं, असं कानावर आलं होतं. त्यानं अव्हेरल्यानंतर ती बिथरल्यासारखी वागायची. हे सगळं घडत असतानाच आधी तिची आई गेली आणि नंतर लगेचच एक-दोन वर्षांत वडीलही गेले. मानसिक परिस्थिती ढासळल्यामुळं तिचा जॉबही गेला असावा आणि मग ती पुन्हा पुण्यामध्ये तिच्या घरात येऊन राहू लागली.

आता मात्र गीता पूर्णपणे बदलली होती. बदलली म्हणजे काय तर ठार वेडीच झाल्यासारखं तिचं वागणं होतं. घरामध्ये आदळआपट, भाड्यांची फेकाफेक, जोरजोरात किंचाळणं, शिव्यांची लाखोली वाहणं (ज्यानं फसविलं त्याला आणि तो ज्या जातीचा होता त्या जातीला), विक्षिप्तपणे वागणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास देणं (जिन्यामध्ये तेल ओतणे वगैरे…) असले प्रकार वाढले होते. तिचं वागणं असं झाल्यामुळं नातेवाईकांनीही तिला कधीच झिडकारलं होतं. शेजारी पाजारीही तिला टरकून असायचे आणि फारसं काही बोलायचे नाहीत. अनेक जण तिला त्रास मात्र द्यायचे. म्हणजे उगाचच तिच्या घराला कडी लाव, रस्त्यामध्ये दिसली तर तिला दगड मार किंवा तिला विनाकारण चिडव वगैरे प्रकार वाढले होते.

काही जण तिच्या त्रासाला कंटाळून पोलिसांना बोलवायचे. मात्र, पोलिसांशी ती व्यवस्थित इंग्रजीतून संवाद साधायची आणि त्यांना परतवून लावायची. विक्षिप्त आणि वेडसर वागण्यामुळं तिच्याशी बोलणं किंवा नुसती ओळख दाखविण्याचीही भीती वाटायची. तरीही कधी कधी ती मला भर रस्त्यात ओळख द्यायची. काय करतोस किंवा सध्या कुठे वगैरे विचारायची. आई कशी आहे विचारायची. बरं, अगदी भणंगावस्थेत आहे, म्हणून माझ्याकडे कधी पैसे मागितले आहेत, असं झालं नाही.

तिच्या घराला कोणी बाहेरून कडी लावली असेल तर मला ती काढण्यासाठीही खिडकीतून आवाज द्यायची. त्यावेळी पोटात गोळाच यायचा. कडी काढायला गेलो आणि हिनं काही केलं तर या कल्पनेनंच घाम फुटायचा. पण तरीही जीव मुठीत धरून मी तिच्या घराची कडी काढायला जायचो. पण तिनं कधीच मला काही केलं नाही. तिच्यासाठी काहीतरी करावं, असं खूप वाटायचं. पण काय करावं हे सुचायचं नाही आणि कसा मार्ग शोधावा, हे कळत नव्हतं. तसा मी खूप मोठाही नव्हतो.

नंतर मात्र, तिनं आमच्या इमारतीमध्ये राहणं सोडलंच. का सोडलं, कशामुळं सोडलं हे कोणालाच माहिती नाही. पण नंतर ती घरामध्ये दिसायचीच नाही. फक्त कधी तरी रस्त्यावर दिसायची. मळलेला टी-शर्ट आणि जीन्सच्या पॅण्टमध्ये. अर्थात, तिचं दर्शन नियमितपणे व्हायचं. म्हणजे रोज नसलं तरी आठवड्यातून दोन-तीनदा तरी. म्हणजे ती कॉलनीमध्ये यायची. इकडं तिकडं भटकायची आणि परत गायब व्हायची. मात्र, नंतर काही वर्षं मी ई टीव्ही आणि साम मराठीच्या निमित्तानं हैदराबाद आणि मुंबईमध्ये असल्यामुळं तिची ‘भेट’ व्हायची नाही. सुटीसाठी कधी पुण्यात आल्यानंतर क्वचित तिचं दर्शन व्हायचं.

गेल्या तीन वर्षांपासून मात्र, ती कॉलनीमध्ये कधीच दिसली नाही. सहा-आठ महिन्यांनी कोणीतरी सांगायचं अरे आज मला अमुक तमुक ठिकाणी गीता दिसली. मला पण दोन-एक वर्षांत ती दिसली नव्हती. चार-पाच दिवसांपूर्वी मला ती दिसली आणि हा सगळा प्रवास डोळ्यांसमोरून पुढे सरकला. दोन-तीन दिवस तिचाच विचार करीत होतो. आमच्याच कॉलनीतील कमलेशला त्याच परिसरात गीता दिसली. दोघांनी काही करता येईल का, अशी चर्चा केली. फक्त पैसे किंवा कपडे देऊन काहीच उपयोग नाही. तिला सुधारणं किंवा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणणं आता शक्य आहे का, याबाबत आमचं बोलणं झालं.

खरंच हे शक्य आहे का आणि असेल तर कशा मार्गानं हे शक्य आहे. मुळात तिचा ठावठिकाणा नाही. क्वचित कधीतरी दिसते. त्यामुळं शोधणं कठीण. शिवाय तिची जबाबदारी घेईल, असं सध्या तरी कोणी नाही. तिला सुधारण्याची जबाबदारी समजा कोणी घेतल्यानंतर जितकं लक्ष द्यायला लागेल तितकं लक्ष द्यायलाही कोणी नाही. आर्थिक भार उचलायचा असेल, तर त्याचंही फारसं नियोजन नाही. अशा परिस्थितीत तिला आयुष्यात परत आणणं शक्य आहे का, याची चाचपणी तर आम्ही सुरू केलीय. पाहू त्यात यश येतं का ते. कारण तिचं आयुष्य पूर्वपदावर यावं, असं कुठंतरी आतून वाटतंय.

Sunday, March 31, 2013

‘धान्य दान’ मोहीम सुफळ संपूर्ण


धान्य पोहोचले, समाधान लाभले...

साने गुरूजी तरुण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. परममित्र धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोहीम राबविली गेली. त्या मोहिमेच्या निमित्ताने नोंदविलेली काही निरीक्षणे आणि आलेले काही अनुभव… 

धान्य दान मोहिमेची अगदी प्राथमिक चर्चा सुरू असते. अजून काहीच नक्की असे झालेले नसते घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या कानावर ती चर्चा पडते. ती दुसऱ्या दिवशी तिच्या घरातून एक किलो धान्य दुष्काळग्रस्तांसाठी घेऊन येते आणि ‘बाईसाहेब, तुम्ही काल बोलत होता ना, त्यासाठी माझं हे एक किलो धान्य...’

दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी केलं पाहिजे, या विचारातून साकारलेल्या धान्यदान मोहिमेमध्ये पहिलं माप टाकणारी व्यक्ती असते एक मोलकरीण.  त्यानंतर मग धान्याच्या राशीच्या राशी जमा होतात आणि हजारो दुष्काळग्रस्तांपर्यंत त्या पोहोचविल्याही जातात. दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी नुसतेच उसासे टाकत बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे, या विचारातून या मोहिमेला सुरूवात झाली. मग कुठं कशाची मदत लागेल वगैरे याची चाचपणी सुरू झाली. 
 
बालपणीपासूनचा मित्र धीरज घाटे हा पाच वर्ष संघाचा पूर्णवेळ प्रचारक असताना काही काळ बीड जिल्ह्याला प्रचारक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये काय मदत करता येऊ शकेल, याचीच चाचपणी केली. पाणी आणि चारा या गोष्टींची प्रामुख्याने गरज आहे, हे स्पष्ट होतेच. पण अनेक तालुक्यांमध्ये पुढील काही महिने धान्याचीही अडचण भासणार आहे, हे तिथं जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजलं आणि मग त्यातून धान्यदान मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. 

शहरातील बड्या व्यक्ती, संस्था आणि संघटना यांना अॅप्रोच न होता घराघरातून मदत गोळा करायची आणि अधिकाधिक नागरिकांना यात सहभागी करून घ्यायचं हे सुरूवातीपासूनच ठरलं होतं. त्यानुसार प्रत्येक इमारती, वाडे, सोसायट्या, चाळी, शाळा आणि महाविद्यालयांमधून या मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली. काही आय टी कंपन्यांमध्येही मोहिमेचा प्रसार करण्यात आला. फेसबुक आणि ई-मेलच्या माध्यमातूनही धान्यदान मोहीम सर्वदूर पोहोचविण्यात आली. 

आशिष शर्मा यांनी त्यांच्या परदेशातील मित्रांपर्यंत ही योजना पोहोचविली आणि त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. काही दानशूर नागरिकांनी विशिष्ट दुकानांमधून पाच किंवा दहा हजार रुपयांपर्यंत धान्य खरेदी करण्यास सांगितले. अनेक शाळांमधून एक मूठ धान्यदान संकल्पना राबविली गेली. त्यातून प्रत्येकी सातशे ते आठशे किलो धान्य गोळा झाले. हास्यसंघासारख्या संघटनांनीही मदतीचा हात पुढे केला. कर्वेनगर-कोथरुड सारख्या भागात संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये धान्य गोळा करण्याची यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे या भागातूनही जवळपास वीस ते पंचवीस हजार किलो धान्य जमा झाले. नियोजनबद्धरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल ६० ते ६५ हजार किलो धान्य जमा झाले. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी असे धान्य लोकांकडून दान म्हणून स्वीकारण्यात आले. आमचे प्रयत्न २१ हजार किलोंसाठी सुरू होते. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो…’ हा अनुभव आला आणि पाहता पाहता ६० हजार किलोचा आकडा कधीच ओलांडला गेला.


अर्थात, चांगल्या योजनेला अपशकुन करण्याची मराठी माणसाची परंपरा या वेळी पाळली गेली नाही असं नाही. विघ्नांशिवाय उत्तम कामे पार पडल्याचं ऐकिवात नाही, अन अनुभवानतही.  मुळात दुष्काळग्रस्त भागांमध्ये फक्त पाणी आणि चाऱ्याची आवश्यकता आहे. तेथे धान्य मुबलक आहे, धान्याची अजिबात जरूरी नाही, असे ई-मेल फिरविण्यात आले. ‘व्हिस्परिंग कॅम्पेन’ करण्यात आले. धान्य जमा करणारे कसे मूर्ख आहेत, अशी चर्चा घडविण्यात आली. पण तेथे धान्याची आवश्यकता आहे, याची आधीच खात्री करून घेतल्यामुळे आंम्हाला असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे फरक पडत नव्हता. आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मग्न होतो. (उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५ हजार नागरिकांनी रक्तदान केले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांनी अपशकुन करीत या उपक्रमावर अत्यंत वाईट शब्दात टीका केली होती.)

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे. तुलनेने अंबाजोगाई, परळी, खुद्द बीड शहर आणि केज वगैरे भागांत दुष्काळाच्या झळा कमी आहेत. आष्टी तालुक्यातील कडा, दादेगाव, बीड सांगवी, नांदूर आणि इतर दोन-पाच गावांमध्ये आम्ही मदत करण्याचे निश्चित केले होते. मात्र, २१ हजार किलो धान्य गोळा करण्याचे निश्चित केले होते, तेव्हा या गावांची निवड करण्यात आली होती. पण आमच्याकडील धान्य ६० हजार किलोंच्या पुढे गेलो होते. त्यामुळे आणखी अनेक गावांना देता येईल एवढे धान्य आमच्याकडे होते. अर्थात, अशा गावांची यादी बीडमधील कार्यकर्त्यांकडे तर तयारच होती. त्यामुळे त्याचाही प्रश्न उरला नव्हता.

गुरूवारी सकाळी आम्ही आष्टीच्या दिशेने निघालो. चार ट्रक भरतील इतके धान्य गोळा झाले होते. जवळपास ७०-८० कार्यकर्ते आणि धान्याचे चार ट्रक असे मार्गस्थ झालो. ‘मोबाईल किंग’ आणि ‘टेलिफोन शॉपी’चे मालक आशिष शर्माही आमच्या सोबत आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही कडा येथे पोहोचलो. अॅडव्होकेट बाबूराव अनारसे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमसह आमची वाट पाहत होते. बीडमधील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधरपंत सहस्रबुद्धे देखील आवर्जून उपस्थित होते. वय वर्षे ७७. झुपकेदार मिशा, ठणठणीत तब्येत आणि खणखणीत आवाज, ही वैशिष्ट्ये. गोपीनाथ मुंडे हे अजूनही ज्या मोजक्या लोकांच्या पाया पडतात आणि मान देतात, त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधरपंत. कडक शिस्तीचे पण तितकेच सहजपणे लोकांमध्ये मिसळून जाणारे.


पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि ओळखी झाल्या. मग धान्याचे कोणते ट्रक कुठे न्यायचे, कुठं किती धान्य उतरवून घ्यायचं याचं नियोजन करण्यात आलं. एक ट्रक आष्टी गावात पाठविण्यात आला. काही धान्य कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात उतवरून घेण्यात आलं. काही धान्य दादेगाव आणि नांदूरमध्ये पाठविण्यात आलं. नियोजनानुसार सर्व काही पार पडल्यानंतर आम्ही दादेगावच्या दिशेनं निघालो. तिथं धान्य वाटपाचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती हे धान्य वाटप करण्याची काय यंत्रणा लावण्यात आली आहे, हे जाणून घेण्याची. मुळात पाऊसच झाला नसल्यामुळे आसपासच्या तीन-चार तालुक्यांमध्ये शेतीची कामे नव्हतीच. शेतकाम नसल्यामुळे मजुरांच्या हाताला काहीच काम नाही. दुष्काळामुळे बांधकामे करण्यास बंदी घातलेली. त्यामुळे बांधकामावरील मजुरांच्या (विशेषतः वडार समाज) रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला. अनेक गावांतील तरुण मंडळी कामं शोधण्यासाठी इतर गावांच्या दिशेने गेलेली. त्यामुळे शेकापूरसारख्या अनेक गावांमध्ये फक्त म्हातारे-कोतारे आणि लहान मुलं एवढेच शिल्लक राहिलेले. बाकी गाव ओसाड. आता तर रेशनवर मिळणाऱ्या गव्हाचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. शिवाय रेशनवर धान्य मिळण्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि अनियमितता यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी गत झाली आहे. अशा सर्व लोकांपर्यंत जमा केलेले धान्य पोहोचणार होते. त्यामुळे रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना वणवण करीत दुसऱ्यासमोर हात पसरायला लागणार नव्हते. 


वडार, वैदू, शेतमजूर, मागासवर्गीय, दलित आणि रोजचे रोज कमावून खाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असलेली जवळपास तीस गावे निश्चित करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक गावामध्ये खरोखरच धान्य वाटप करण्याची आवश्यकता कोणाला आहे, याची यादी गावातील प्रमुख मंडळींनीच तयार केली होती. जेणेकरून हे धान्य गरज नसलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊ नये. इतकी यंत्रणा लागल्यानंतर आमचे काम होते, ते फक्त गावांमध्ये जाऊन गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्याचे.
त्यानुसार आम्ही दादेगाव आणि नांदूर या गावांमध्ये गेलो. दोन्ही ठिकाणी दीडशे ते दोनशे लोक उपस्थित होते. दोन्ही गावांमध्ये ७० ते ८० जणांची यादी सर्वानुमते तयार करण्यात आलेली. त्यापैकी प्रत्येकी दोन जणांना जाहीर कार्यक्रमांमध्ये पन्नास-पन्नास किलो धान्य देण्यात आले आणि उर्वरित सर्वांना घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात येणार होते. एव्हाना ते झाले असेलही. इतर गावांमध्येही संपर्क सुरू झाला आहे. गरजूंपर्यंत धान्य पोहोचते आहे. 

ज्या लोकांना दादेगावमध्ये धान्य दिले त्यापैकी एक म्हणजे तुळसाबाई. जख्खड म्हातारी. वय वर्षे साधारण ७५ पेक्षा अधिक असेल. मुलगी नगरमध्ये स्थायिक झालेली आणि आतापर्यंत तिच्याजवळ राहणारा तिचा नातू लग्नानंतर आष्टीमध्ये रहायला गेलेला. त्यामुळे म्हातारी दादेगावमध्ये एकटीच. इतके दिवस तिला नातवाचा आधार होता. पण आता तोही नाही. त्यामुळे लोक त्यांच्याकडे उरलेलं शिळंपाकं अन्न तिला आणून द्यायचे आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा. पूर्वी ती लोकांकडे जाऊन पडेल ते काम करायची. आता वयोमानाप्रमाणे तेही जमत नाही. पण आता तिला धान्य मिळाल्यामुळं ती स्वतःचं स्वतः करून खाऊ शकते. ‘तुमचे खूप उपकार झाले भाऊ. तुमच्यामुळं मला लोकांपुढं भीक मागायची वेळ येणार नाही…’ हे तिचे उद्गार.


कड्यामध्ये पोहोचल्यानंतर रखरखीत दुष्काळात मदतीचा सुखद झरा सापडला. आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ३८ चारा छावण्या आहेत. त्यांमध्ये ५६ ते ५७ हजार जनावरे आश्रयासाठी आलेली आहेत. जनावरांसाठी एका व्यक्तीला या छावणीत २४ तास थांबावेच लागते. ही मंडळी सकाळी गावातून निघतात. त्यांचे दुपारचे जेवण सोबत आणलेले असते. पण सकाळी घरातून निघताना बरोबर घेतलेली रात्रीची शिदोरी उन्हा‍ळ्यामुळे खराब होते. त्यामुळं धानोरा येथील परमेश्वर शेळके या चारा छावणी मालकानं निवास करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रात्रीच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. २० जानेवारीपासून त्याने अन्नदानाचे पुण्यकर्म सुरू केले आहे. नावातच परमेश्वर असलेले शेळके हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खऱ्याखुऱ्या परमेश्वरासारखे धावून आले आहेत.


रोज जवळपास ७०० शेतकरी रात्रीच्या वेळी जेवायला असतात. एकावेळी ७०० लोकांना भात देण्यासाठी त्यांना ७० किलोच्या आसपास तांदूळ लागतो. शेतकऱ्यांना आमटी-भात, कधीमधी लापशी, भात-पातळ भाजी, क्वचित कधीतरी भाकरी असे जेवण दिले जाते. परमेश्वर शेळके यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता इतर दोन-चार चारा छावणी मालकांनीही रात्रीच्या जेवणाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणारी ही देवमाणसंच म्हटली पाहिजेत.
शेतकऱ्यांना रात्रीचे जेवण देण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या चारा छावणी मालकांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन महिने लागेल तितके धान्य देण्याची आमची तयारी आहे. भविष्यात जर त्यांना धान्याची कमतरता भासत असेल तर अजूनही धान्य गोळा करून देण्याचे आश्वासन आम्ही त्यांना दिले आहे. शेवटी काय शेतकऱ्यांकडून आपल्याला जे मिळते आहे, तेच आपण त्यांना परत करतो आहोत, हीच भावना मनात होती...

दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी करायचं हे मनात ठरवून आम्ही उपक्रमाला सुरूवात केली होती. यशस्वी होणार याची खात्री होतीच. पण प्रतिसाद कसा मिळेल, काय होईल, याबाबत काहीच सांगता येत नव्हतं. मात्र, ईश्वर कृपेने सर्व काही उत्तम झाले. गावांमध्ये धान्य वाटप केल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर असलेल्या समाधानापेक्षा अधिक समाधान आमच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तेच समाधान मनात ठेवून आम्ही पुन्हा पुण्याच्या वाटेने मार्गस्थ झालो...

अधिक माहितीसाठी संपर्कः 
धीरज घाटेः ९८२२८७१५३० 
अॅडव्होकेट बाबूराव अनारसेः ९४२३१७२६८२
परमेश्वर शेळकेः ९४२१३३९५२२