Monday, September 09, 2013

बाप्पा आम्हाला माफ कर...

विघ्यहर्त्याच्या रक्षणास काळी बाहुली?



दुष्प्रवृत्तींचा नायनाट करणाऱ्या आणि असुरांचे मर्दन करणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे सोमवारी थाटामाटात आगमन झाले. आपल्यावर आलेल्या सर्व संकटांचे निर्दालन करण्यासाठी आपण अखेर बाप्पाकडेच धाव घेतो. त्यामुळेच गणरायाच्या आरतीमध्येही ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे...’ असा उल्लेख आढळतो. थोडक्यात म्हणजे तमाम भक्तांची काळजी एकट्याने वाहणारा सर्वशक्तिमान श्री गणराय स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ आहे, असे मानण्यास कोणाचाही आक्षेप नसावा.

तरीही अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाच्या मूर्तीला नजर लागू नये म्हणून त्याच्या हातामध्ये कसले कसले धागे बांधतात. काळे गंडेदोरे बांधतात. पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या हाताला बांधलेली काळी बाहुली हा अशाच भंपक प्रथेतील एक प्रकार म्हटला पाहिजे. मुळात गणराय इतरांचे रक्षण करतो, अशी जर आपल्या सर्वांची श्रद्धा असेल तर त्याचे रक्षण करण्यासाठी किंवा त्याला नजर लागू नये म्हणून (मुळात नजर लागते का, हा प्रश्न आहेच) असल्या बाहुल्या-बिहुल्या बांधण्याची आवश्यकता काय? आणि जर स्वतःचे रक्षण करण्यास ‘श्री’ समर्थ नाहीत, असा आपला समज असल्यास मग बोलणेच खुंटले. त्यामुळे असले गंडेदोरे बांधून किंवा काळ्या बाहुल्या लटकावून काहीही होत नाही, हे कार्यकर्त्यांना आणि मंडळांना कधी समजणार. पुण्यातील मानाचे मंडळही या अंधश्रद्धेतून सुटले नाही, हे पाहून खंत वाटली. म्हणून हा ब्लॉगप्रपंच...

अंधश्रद्धा मानणाऱ्या अशा अनेक मंडळांप्रमाणेच पुण्यात अंधश्रद्धा पसरविणारेही असेच एक मंडळ आहे. ‘नवसाला पावणारा, नवसाला पावणारा’ अशी जाहिरातबाजी करून हे मंडळ आपल्या तुंबड्या भरते. मुळात अशी जाहिरातबाजी करण्याचे कारण नाही. उद्या मला पंतप्रधान कर रे महाराजा, असा नवस मी किंवा तुमच्यापैकी कोणीही बोललं तर तो आयुष्यात पूर्ण होणार आहे का? उगाच काहीतरी जाहिरातबाजी करतात. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती हा जितका भोंदूपणा आहे, तितकाच भोंदूपणा म्हणजे गणपतीच्या हातात काळी बाहुली बांधणे हा आहे. आपण जितक्या लवकर आपण हे सत्य स्वीकारू तितके आपल्याच फायद्याचे आहे.


अन्यथा काही दिवसांनी उत्सवादरम्यान गणपती मंडपाच्या शेजारी काहीसे असे बोर्ड लावलेले दिसतील. ‘आमच्या मंडळामध्ये दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेत दृष्ट काढली जाईल’, ‘येथे दृष्ट काढून मिळेल’, ‘आमच्याकडे नजर सुरक्षा कवच म्हणून वापरता येईल अशी मंतरलेली लिंबू-मिरची मिळेल’, ‘आमच्या काळ्या बाहुल्या घ्या आणि बिनधास्त रहा’ वगैरे वगैरे. अशी जाहिरातबाजी दिसू नये, अशी आपला इच्छा आहे. त्यामुळेच गणरायाच्या हातात काळे गंडे, दोरे आणि असल्या बाहुल्या न बांधण्यापासून आपण याची सुरुवात करायला हरकत नाही. पहा पटतंय का ते...

Tuesday, August 20, 2013

निष्ठेची, तपश्चर्येची हत्या

ध्येयवादी सुधारक हरपला...



नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातल्या ओंकारेश्वरजवळील पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी ऐकली आणि धक्काच बसला. नुकताच अमेरिकेत गेलेल्या योगेश ब्रह्मेचा फोन आल्यामुळं सकाळी खडबडून उठलो आणि त्याच्याकडून ही बातमी ऐकताच माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. अरे काही तरीच काय बोलतोय. तीन-चार दिवसांपूर्वी तर आमच्या ऑफिसमध्ये आले होते. लेखासंदर्भात संपादकांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळीच ते दिसले होते. आज अचानक असं कसं शक्य आहे. उगाच कशाला असं कोण त्यांच्यावर हल्ला करेल. असं म्हणत म्हणत मराठी न्यूज चॅनल लावला आणि पाहतो तर तोंडातून पुढचा शब्द बाहेरच पडेना… योगेशलाही तिथं मराठी न्यूज चॅनल सापडला, मग लगेचच आमचा फोन बंद झाला.

दाभोलकर गेल्याचं ऐकलं, पाहिलं आणि धक्काच बसला. मनापासून हलल्यासारखं झालं. वास्तविक पाहता, नरेंद्र दाभोलकर यांचा आणि माझा तसा थेट काहीही संबंध नाही. ओळख सोडा तोंडओळखही नव्हती साधी. उलट ते मांडायचे त्यापैकी अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी त्या दान करा किंवा तलावांमध्ये विसर्जन करा, हे मुद्दे मात्र, मनापासून पटले होते. मात्र, त्यांचे इतर विचार अजिबात पटण्यासारखे नव्हते. इतकं सगळं असूनही दाभोलकरांच्या हत्येमुळं खूप गलबलल्यासारखं झालं. का झालं असावं असं…

कदाचित त्यांची त्यांच्या समाजवादी विचारांवर असलेल्या निष्ठेमुळं असेल. ध्येयानं पछाडलेला माणूस पंधरा-वीस वर्षांपासून एकाच विचारासाठी किंवा विधेयकासाठी लढा देतो, ही गोष्ट महत्त्वाची वाटत असावी म्हणून कदाचित दाभोलकर यांच्याबद्दल मनात सॉफ्ट कॉर्नर असावा. भले त्यांचे विचार कितीही न पटणारे किंवा माझ्या विचारांच्या विरोधातील असले तरीही ते त्यांचा विचार प्रामाणिकपणे मांडत आले होते. त्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती. आंदोलन, उपोषण, निषेध, लेखन, भाषण, विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी, सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा, वारकरी आणि विरोधी विचारांच्या मंडळींशी चर्चा अशा अनेक स्तरांवर दाभोलकर काम करीत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेल्या सॉफ्ट कॉर्नरचं रुपांतर होऊन कामाबद्दल आदर वाटू लागला होता.

हल्ली समाजात बुवाबाजी, महाराज, गंडेदोरे, अंगठ्या-खडे वगैरेंच प्रस्थ भलतेच वाढले आहे. म्हणजे जणू काही ही मंडळीच सर्व दुनियेचे व्यवहार हँडल करीत असतात, अशा थाटात यांची दुकानदारी सुरू असते. त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलणे आवश्यकच आहे. कुणीतही पेपरमध्ये जाहिरात देऊन सांगतो, की मी बोलते ते कायम सत्य होते वगैरे. तुला जर सगळ्या दुनियेची खबर असेल आणि कोणाचे लग्न कधी जमणार, पोरं कधी होणार हे तुलाच माहिती असेल तर तूच भविष्यात येणाऱ्या भूकंप, अपघात, प्रलय, त्सुनामी वगैरेची माहिती देत जा ना… पण असली आव्हाने स्वीकारायला ही मंडळी तयार नसतात. अशा भोंदू बाबा-महाराजांविरोधात दाभोलकरांनी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडलेली आघाडी अगदी योग्य आणि स्वागतार्हच होती. लाथा घालून रोग मिटविणारे, हात लावताच पाणी गोड करणारे, अंगारे-धुपारे, पुड्या, उदी वगैरे देऊन रोग बरे होतील, अशी बतावणी करणाऱ्या सर्व भोंदू बाबांना लाथा घालून ताळ्यावर आणले पाहिजे. तेच काम दाभोलकर कायदेशीर मार्गांनी करत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर होता.

सध्या कपडे बदलतात, तशा पद्धतीनं मंडळी विचार बदलू लागली आहेत. त्यामुळे अशा वैचारिक अधिष्ठान असलेल्या लोकांबद्दल आदर वाटत होता. अन्यथा डॉक्टर असलेले दाभोलकर साताऱ्यात किंवा अगदी पुण्यातही मस्त प्रॅक्टिस करून रग्गड पैसा कमावू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ही त्यागी वृत्ती आजच्या घडीला दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक हिंदुत्त्ववादी संघटना त्यांच्यावर परदेशातून मदत स्वीकारल्याचा किंवा परदेशी ‘एनजीओं’कडून खोऱ्याने पैसा ओढत असल्याचे आरोप करीत होत्या. त्यात तथ्य आहे किंवा नाही, याच्या तपशीलात आता जाण्याची गरज नाही. मात्र, त्यांना जर परदेशातून तसा पैसा येत असला, तरीही ते तो पैसा अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच वापरत असावेत, हा विश्वास अगदी मनात ठाम होता. त्यामुळंच अशा आरोपांचा त्यांच्या प्रतिमाभंजनासाठी कधीच उपयोग झाला नाही.


शिवाय एखाद्याचा विचार पटत नसला तरीही तो विचार मांडणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्याची भाषा करणारे किंवा थेट हत्या करणारे लोक कधीच पटले नाहीत. मागे साम मराठीमध्ये असताना संघाच्या एका प्रचारकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सोलापुरातील रेल्वेट्रॅकवर सापडला होता. इतर वृत्तपत्रे किंवा चॅनेलनी त्याची विशेष दखल घेतली नव्हती. कदाचित तो संघवाला होता, म्हणून असेल. पण साम मराठी म्हणून आम्ही त्या घटनेची गंभीर दखल घेतली होती. कारण एखाद्या विचारासाठी जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील दोन-तीन वर्षे खर्ची घालते, त्या व्यक्तीचा खून होऊन त्याचा मृतदेह अशा पद्धतीने रेल्वेट्रॅकवर आढळावा, ही गोष्टी शाहू, फुले, आंबेडकर, रानडे, कर्वे, टिळक, आगरकर, सावकरकर यांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद होती. आज ही वेळ संघाच्या कार्यकर्त्यावर आलेली वेळ कदाचित नंतर समाजवादी किंवा कम्युनिस्ट कार्यकर्त्यावरही येऊ शकते. त्यामुळेच आम्ही ती घटनेचा फॉलोअप घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. तशी वेळ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरच यावी, यापेक्षा महाराष्ट्राचे आणखी दुर्दैव कोणते?

‘मला जर कोणी पिस्तूल आणून दिली, तर मी सर्वप्रथम नरेंद्र मोदींना गोळ्या घालून ठार मारेन,’ असे म्हणणारे विजय तेंडुलकरही असेच असहिष्णुतेने पछाडले होते की काय, असे वाटले होते. पु्ण्यातील भांडारकर संस्थेवर केलेला हल्लाही तशाच असहिष्णू आणि अविवेकी लोकांनी केलेला होता हे ठाम मत होते आणि आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश इतकाच, की कोणत्याही (अर्थातच, देशविघातक किंवा दहशतवादी नसलेल्या) विचारासाठी मनापासून काम करण्याऱ्या व्यक्तीचे विचार तुम्हाला कितीही न पटो, ते विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही, ही भूमिका ठाम आहे. मग ते लेखन स्वातंत्र्य असो, भाषण स्वातंत्र्य असो किंवा विचार स्वातंत्र्य असो… अर्थात, प्रत्येक वेळी हे शक्य असतेच असे नाही. तरीही अनेक जण आपला प्रामाणिक विचार तितक्याच प्रामाणिकपणाने मांडत असतात.

दाभोलकर हे असेच विचारांशी, तत्त्वांशी आणि ध्येयाशी प्रामाणिक असल्यामुळे कदाचित त्यांचा तो ध्येयवेडेपणा मला भावला होता. त्यामुळंच कोणत्या तरी दळभद्री माथेफिरूनं त्यांची गोळ्या घालून हत्या केली, हे ऐकल्यानंतर संतापाची तिडीक आली. दुर्दैवाने विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याची कुवत नसलेल्या मंडळींनी दाभोलकर यांना पाठीमागून गोळ्या घातल्या. दाभोलकर यांच्यासारख्या ध्येयवेडाने पछाडलेल्या व्यक्तीला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य वेड्या आणि विकृत मनोवृत्तीच्या हल्लेखोरांमध्ये झाले नसावे. म्हणूनच त्यांनी कदाचित पाठिमागून हल्ला केला असावा.

Friday, July 26, 2013

‘फ्लिपकार्ट’चा ‘फ्लॉपकार्ट’ अनुभव



लाइनवर आणणारी खरेदी

ऑनलाइन खरेदी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि एकूणच ऑनलाइन व्यवहार यांच्याबाबत अनेकांना वाईट अनुभव आलेले असतात. खरं तर त्यामुळंच मी यापासून चार हात दूर रहायचो. पण एक सोपा पर्याय म्हणून मी त्याकडे वळलो आणि दुसऱ्याच प्रयत्नात फसलो. ऑनलाईन खरेदीसाठी हा अनुभव मला मिळावा, यासाठी लोकप्रिय असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ या वेबसाईटनं महत्त्वाची भूमिका बजाविली. त्यामुळं संबंधित वेबसाइटचं नवे बारसे ‘फ्लॉपकार्ट’ असे का करू नये, असा विचार माझ्या मनातही तरळून गेला. अर्थात, खमकेपणा दाखविला तर संबंधित कंपन्या ताळ्यावर येतात, असा धडा शिकलो आहे. खरं तर शिकविला. कदाचित असेच अनुभव आपल्यापैकीही अनेकांना आलेले असतील. म्हणूनच हे शेअरिंग…



अगदी सहजसोपा आणि बसल्या बसल्या खरेदी करता येते, म्हणून खरं तर मी ऑनलाईन खरेदीकडे वळलो. चांगली, स्वस्त आणि जी सहजपणे दुकांनांमध्ये मिळू शकत नाहीत, अशी आपल्या आवडीच्या विषयाची पुस्तकं (विशेषतः इंग्रजी भाषेतील) वेबसाइट्सवर अगदी सहजपणे उपलब्ध असतात. त्यामुळं ऑनलाइन खरेदीचं आकर्षण. त्यातल्या त्यात चारचौघांच्या बोलण्यात असल्यामुळं आणि मिळणाऱ्या पुस्तकांची यादी उत्तम असल्यामुळं मी ‘फ्लिपकार्ट’कडे वळलो. सर्वात पहिल्यांदा ‘फॉलोइंग फिश’ हे पुस्तक ‘फ्लिपकार्ट’ वरून मागविलं होतं. पुस्तक पाठविण्यातील तत्परता, बऱ्यापैकी डिस्काउंट आणि उत्तम सेवा यामुळं पहिला अनुभव चांगला होता. त्यामुळंच पुन्हा एकदा ‘फ्लिपकार्ट’वरूनच आणखी दोन पुस्तक खरेदी केली.

पहिलं पुस्तक म्हणजे ‘अ हिस्टॉरिकल डिक्शनरी ऑफ इंडियन फूड’ आणि ‘द इलस्ट्रेटेड फूड्स ऑफ इंडिया’. भारतातील खाद्यसंस्कृती या विषयामध्ये ज्यांचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं, त्या के. टी. आचार्य यांची ही दोन्हीही पुस्तकं. ऑक्सफर्ड प्रकाशनानं प्रकाशित केलेली. दोन्ही पुस्तकांची नावं, प्रकाशनाचे वर्ष आणि ‘फ्लिपकार्ट’च्या वेबसाईटवर दिलेली पुस्तकांची माहिती यांच्यामध्ये कोणतेही साम्य नाही. साम्य फक्त लेखकांच्या नावाचं आणि प्रकाशन संस्थेचं. त्यामुळं दोन चांगली पुस्तकं खरेदी केल्याच्या आनंदात आणि कधी एकदा ती मिळतात, या प्रतीक्षेत होतो.

पहिल्या दिवशी एक पुस्तक आलं आणि दुसऱ्या दिवशी दुसरं पुस्तक आलं. पहिल्यामध्ये साधारण काय मजकूर आहे, याचा अंदाज पुस्तक आल्या आल्या लगेच घेतला होता. त्यामुळं दुसरं पुस्तक कोणत्या विषयावर आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दुसऱ्या दिवशी दुसरं पुस्तक आलं. उघडून पाहतो, तर काय दोन्ही पुस्तकातील मजकूर एकच. अनुक्रमणिकेपासून ते शेवटच्या पानापर्यंत सर्वकाही सारखेच. मुखपृष्ठ फक्त वेगळे आणि पुस्तकातील शब्दांचा टाईप आणि रचना वेगळी. एक पुस्तक आधी प्रकाशित केलेले आणि दुसरे त्याची सुधारित आवृत्ती. सत्यानाश झाला.

दोन पुस्तकांचे पैसे देऊन एकच पुस्तक मिळाल्यामुळं मला चांगलाच मनस्ताप झाला होता. पुस्तक हाताळून खरेदी करण्यातली मजा काही औरच… वगैरे विचारही मनात येऊन गेले होते. पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. काय करावे कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी कंपनीला अशा पद्धतीने गल्लत झाल्याचा इ-मेल पाठविला आणि एक पुस्तक बदलून द्या, अशी विनंती केली. एक पुस्तक मला हवेच होते आणि दुसरे पुस्तक परत पाठवून त्याऐवजी वेगळे पुस्तक घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, पाचव्या मिनिटाला त्यांच्याकडून प्रतिसाद आला, की अशाप्रकारे पुस्तक बदलून देण्याची कोणतीही पॉलिसी ‘फ्लिपकार्ट’ची नाही. त्यामुळे दोन्ही पुस्तके तुम्हाला तुमच्याकडेच ठेवावी लागतील. आम्ही तुम्हाला झालेल्या मनस्तापाबद्दल, त्रासाबद्दल दिलगीर आहोत. पुढच्या वेळेपासून आम्ही या पॉलिसीमध्ये काही बदल करता येतील का, याचा विचार करू वगैरे वगैरे. अत्यंत गोड शब्दांमध्ये समोरच्याला कसे गुंडाळून ठेवायचे, ही कला ‘सर्व्हिस इंडस्ट्री’मधल्या लोकांना चांगली माहिती असते. त्यामुळे त्यांनी त्याचा पुरेपूर वापर उत्तर देताना केला होता.

जाऊ दे पुस्तक नाही बदलून देत तर सोडून देऊ आणि दुसरे पुस्तक एखाद्या मित्राला देऊन टाकू, असा विचार माझ्या मनात आला होता. पण नंतर पुन्हा जाणवलं, की पॉलिसी नाही आणि पुढच्या वेळी असं झालं तर विचार करू, हे उत्तर कसं असू शकतं. आताच ही मंडळी विचार का करणार नाहीत. शिवाय मला मित्राला पुस्तक गिफ्ट द्यायचं असेल तर मी ते स्वतः मुद्दामून खरेदी करून देईन. माझ्याकडे एक्स्ट्रॉ आहे, म्हणून देण्यात काय हशील आहे. सो ‘फ्लिपकार्ट’ला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या इ-मेलला प्रत्युत्तर पाठविले.

तरीही त्यांचा तोच रिप्लाय. ‘आमची पॉलिसी नाही. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आमच्या धोरणात या नंतर योग्य तो बदल करू आणि साखरेमध्ये घोळलेले असे अनेक शब्द.’ शिवाय चप्पल-बूट, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपडे बदलून देण्याची परवानगी यांची पॉलिसी देते, तर मग पुस्तकांनीच असं काय घोडं मारलं आहे, हा प्रश्न अनुत्तरितच होता. शिवाय संयम बाळगा वगैरे सल्लेही दिले होते. शेवटी त्यांच्याकडून तोचतोच प्रतिसाद मिळू लागल्यानंतर मी वैतागलो. संयम संपत चालला. अखेरीस ऑफिसमधील सहकारी वंदना घोडेकर (कोर्ट बीट) हिला काय करता येईल, याबाबत विचारणा केली. पुण्यात ग्राहक मंच चळवळीचे संत म्हणून एक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यास तिने सांगितले. त्यानंतर संत यांच्याशी बोलून काय करता येईल, याची माहिती घेतली.

माझी पुस्तकांच्या खरेदीच्या दुप्पट रक्कम ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली असती तर खर्च झाली असती. त्यामुळे कंपनीला धडा मिळाला, असता पण आपला वेळ आणि पैसा नाहक वाया गेला असता. या प्रकरणी कलम ४२० (फसवणूक) खाली पोलिसांकडे तक्रार नोंदविता येऊ शकेल, असे सांगितले. एकदा तक्रार नोंदविल्यानंतर कंपनी आपोआप ताळ्यावर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार कंपनीला पुन्हा एकदा मेल पाठविला. ‘तुम्ही तुमची पॉलिसी हवी तेव्हा बदला. मला पुस्तकं बदलून हवी आहेत. अन्यथा मी ग्राहक न्यायालय किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी जायला मोकळा आहे.’ हा इ-मेल पाठविल्यानंतरही त्यांची भाषा तशीच होती.

Hello Mr.Chandorkar,
OD ID: OD30625075848
I regret for the inconvenience caused and apologise for the same.
However, I request you to login to our web site page regularly for the products updates and information.
Please noter that the exchange of size can be done only for apparels and foot wares only.
I value your time and appreciate your patience in this regard.


शेवटी त्यांना पुन्हा एकदा खरमरीत इ-मेल पाठविला. ‘बाबांनो, तुमची पॉलिसी तुमच्याकडे ठेवा. मला उद्यापर्यंत तुमचा जो कोणी वरिष्ठ किंवा साहेब असेल त्याला विचारून सांगा, पुस्तकं बदलून देणार की नाही. उद्याही तुमचा नकार आला असेल तर मग माझा निर्णय घ्यायला मी मोकळा आहे.’ शेवटी दुसऱ्या व्यक्तिचा इ-मेल आला. ’माझे वरिष्ठांशी बोलणे झाले, असून तुम्ही दोन्ही पुस्तके ओरिजनल पॅकिंगमध्ये पॅक करून ठेवा. आमचा माणूस येऊन ती पुस्तके घेऊन जाईल आणि नंतर आम्ही त्या पुस्तकांची रक्कम तुमच्या ‘फ्लिपकार्ट’च्या खात्यावर जमा करू,’ असा त्या इ-मेलचा आशय होता. आता एका पुस्तकाचे ओरिजनल पॅकिंग होते. पण आधीच्या पुस्तकाचे पॅकिंग कुठून आणणार, हा प्रश्नच होता. त्याला रिप्लाय केला, बाबा एकाचं पॅकिंग आहे आणि दुसऱ्याचं ओरिजनल नाही. तरीही व्यवस्थित पॅक करून देतो.


थोडक्यात काय, तर ही मंडळी या ना त्या मार्गाने कोंडीत पकडण्यासाठी तयारच असतात. आपण किती खमकेपणानं त्यांना सामोरे जातो आणि किती ठाम राहतो, यावर सर्वकाही अवलंबून असते. आपण जर कच खाल्ली किंवा जाऊ दे, पुढच्या वेळी आपणच जास्त खबरदारी घेऊ, असं म्हटलं तर मग असा कंपन्यांचं फावतं. अखेरीस पाच दिवसांनी का होईना, कुरियरवाला घरी आला. त्यानं ती पुस्तक व्यवस्थित पॅक करून घेतली आणि योग्य त्या स्थळी पोहोचविण्यासाठी तो रवाना झाला. संध्याकाळपर्यंत दोन पुस्तकांचे पैसे माझ्या ‘फ्लिपकार्ट’च्या खात्यावर जमा झाले होते आणि नव्या तीन पुस्तकांची माझी खरेदीही झाली होती. अर्थातच, यावेळी तीनमध्ये एकाच पुस्तकाच्या जुळ्या भावंडाची ‘डिलिव्हरी’ होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी मी माझ्या पातळीवर बाळगली होती.

Sunday, June 16, 2013

भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षता

नितीशही दुटप्पी नि भोंदू




‘भारत हा ढोंगी आणि संधीसाधू राजकारण्यांचा देश आहे, हे रविवारी पुन्हा एकदा सिद्ध झाले. नरेंद्र मोदी यांचा बागुलबुवा करीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दबावामुळे संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भारतीय जनता पक्षाबरोबरील १७ वर्षांचा संसार मोडला आणि नितीशकुमार यांचा ढोंगी आणि सत्तापिपासू चेहरा पहिल्यांदा देशासमोर आला. वास्तविक पाहता, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हाच नितीशकुमार यांना काडीमोड घ्यायचा होता. मात्र, निमित्त लालकृष्ण अडवाणी यांच्या राजीनाम्याचे झाले आणि नितीशकुमार यांनी नैतिकतेचा थयथयाट करीत भाजपबरोबरील युतीला अलविदा केला. झाले ते बरेच झाले. नैतिकतेच्या नावाखाली सत्तांधतेचा आणि ढोंगीपणाचा बुरखा वावरून हिंडणाऱ्या नितीशकुमार यांचे वस्त्रहरण झाले असून नीतिमूल्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे.

नरेंद्र मोदी यांना फक्त भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही. मोदी हे देशभरात लोकप्रिय आहेत. मध्यमवर्गीय, तरुण आणि महिलांची त्यांना विशेष पसंती आहे. गुजरातच्या निवडणुकीत फेसबुक-टि्वटरपासून ते थ्रीडी सभांपर्यंत वेगवेगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा त्यांना आणि अर्थातच, पक्षालाही झाला. त्यांची हीच दूरदृष्टी आणि लोकप्रियता यांचा फायदा मिळविण्यासाठी त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद दिले तर बिघडले कुठे? मोदी यांना प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांचा जळफळाट होण्याचे कारण काय?

नितीशकुमार यांना दोनवेळा बिहारच्या जनतेने निवडून दिले आहे, तर मोदी यांना तीनवेळा गुजरातच्या नागरिकांनी जनादेश दिला आहे. नितीशकुमार हे भाजपबरोबर युती करून निवडून आले आहेत. तर मोदी यांनी स्वबळावर सत्ता खेचून आणली आहे. एखाद वर्षाचा कालावधी वगळता १९९४ पासून गुजरात हे राज्य भाजपच्याच पाठिशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे मोदी काल राजकारणात आले आणि आज त्यांना प्रचार समितीचे प्रमुखपद मिळाले नाही, अशी परिस्थिती नाही. बिहारमध्ये महापूर आला तेव्हा, नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारने मोठ्या मनाने मदत पाठविली. पण ती मदत हेकेखोर नितीशकुमार यांनी नाकारली. वास्तविक पाहता, ती मदत मोदी यांनी स्वतःच्या खिशातून पाठविलेली नव्हती. त्यामुळे ती स्वीकारायला काहीच हरकत नव्हती. पण नितीशकुमार यांनी गुजरातची मदत नाकारून स्वतःच्या कोत्या मनाचेच दर्शन घडविले. 

राहता राहिली गोष्ट नरेंद्र मोदी यांच्यावरील गोध्रा दंगलीच्या ठपक्याची. जे झाले ते सर्व लोकांसमोर आहे. स्वयंसेवी संस्थांपासून ते सीबीआयपर्यंत आणि काही आयपीएस अधिकाऱ्यांपासून ते केंद्रातील सरकारपर्यंत अनेक जण पिसाटल्यासारखे मोदी यांच्या मागे लागले आहेत. मात्र, कोणालाही मोदी यांच्याविरोधात काहीही सापडलेले नाही. मोदी यांचा गोध्रानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हात आहे, हे कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. कायद्याच्या दृष्टीने ते निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ठपका नाही. मग असे जर असेल तर त्यांचे नाव ऐकताच अंगाचा तिळपापड व्हायचे कारण काय? महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळणारे किंवा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नवी दिल्लीत शिखांची घरे जाळणारे, शिंखांचे शिरकाण कोण आहेत, हे उघड गुपित आहे. मात्र, त्यापैकी अद्यापही कोणीही कायदेशीरदृष्ट्या दोषी सिद्ध झालेले नाही. अशी मंडळी उजळ माथ्याने राजकारण आणि समाजकारणात वावरत आहेत. असे असताना मोदी यांच्यावरील तथाकथित आरोप सिद्धही झालेले नसताना त्यांच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्याचे कारण काय?

आणि नितीशकुमार यांना नरेंद्र मोदी यांच्या नावाची इतकीच शिसारी आणि घृणा आहे, तर गेली अकरा वर्षे ते का गप्प बसले होते? गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर दंगल उसळली होती. तेव्हा केंद्रामध्ये रेल्वेमंत्री असलेल्या नितीशकुमार यांनी नितीमत्तेचा आदर्श घालून राजीनामा का नाही दिला? त्यानंतरही भाजपशी सत्तासोबत करून नितीशकुमार दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री बनले. तथाकथित दंगलखोर नरेंद्र मोदी हे ज्या भाजपचे नेते आहेत, त्याच भाजपशी नितीशकुमार यांना चक्क सात वर्षे सत्तेसाठी घरोबा ठेवला. विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी बाजूला व्हायचे होते. त्यामुळे कोणाची ताकद किती हे स्पष्ट झाले असते. भाजपला बिहारमध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ९१ जागा मिळाल्या आहेत. संयुक्त जनता दलामुळे भाजपचा फायदा झाला की भाजपमुळे नितीशकुमारांचा हे कळले असतेच. मात्र, आता ती आपल्या नेतृत्वाची लाट होती, अशा गैरसमजात आहेत. देशभर आपली लाट आहे, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा सल्ला नितीशकुमार मोदी यांना देत आहेत. मात्र, तोच सल्ला त्यांना बिहारसाठी लागू आहे, हे विसरू नये.



इतकी वर्षे भाजपशी सत्तासंगत केल्यानंतर अचानक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश यांना काडीमोड घ्यावासा वाटतो, हे सत्तेचे संधीसाधू राजकारण नाही तर काय? त्यामुळेच आता नितीशकुमारांना विचारावेसे वाटते, की ‘नितीशकुमार, तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म. तेव्हा कुठे गेली होती तुमची मूल्ये? त्यावेळीच सत्तेचा त्याग करून वेगळे का नाही झालात? इतकी वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर का ठाण मांडून होता?’

आता लोकसभा निवडणूक ज‍वळ आली आहे आणि नितीशकुमार यांना कदाचित पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. भारतीय राजकारणात एक गोष्ट मस्त आहे. इथे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या घातल्या, की लोक लगेच धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर होतात. जसं आयुष्यभर केलेली पापं गंगेमध्ये स्नान केल्यानंतर धुवून निघतात, अशी लोकांची भाबडी आशा असते. तसेच काहीसे भारतीय राजकारणाचे आहे. भाजपशी शय्यासोबत करून सत्तेची खुर्ची पटकवायची. दुसरीकडे संधी आहे, असे लक्षात येताच भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आणि काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी घरोबा करुन पुन्हा सत्तेत सहभागी व्हायला मोकळे. मुख्य म्हणजे भाजपची साथ सोडणे, हाच सेक्युलर असण्याची प्रमुख अट आहे. ती अट पूर्ण केली की इतर सर्व पक्ष मैत्रीचा हात पुढे करण्यास मोकळे.

भारतात सेक्युलर असण्याची अट प्रचंड भंपक आणि बोगस आहे, की विचारता सोय नाही. पोलिसांना दूर ठेवा आणि आम्हाला पंधरा मिनिटे द्या, हिंदूंचे ‘कतले आम’ करून टाकतो, अशी भाषा करणारा हैदराबादमधील ‘एमआयएम’ हा धर्मांध मुस्लिमांचा पक्ष काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. तरीही काँग्रेस मात्र, सेक्युलर. केरळमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची मैत्री आहे. तरीही काँग्रेस धर्मनिरपेक्ष. ही काय भानगड आहे कळत नाही. म्हणजे भाजपशी वैर हीच सेक्युलर असण्याची मूळ आणि मुख्य अट आहे की काय, अशीच परिस्थिती आहे. ती अट पूर्ण करण्यासाठी नितीशकुमार यांना १७ वर्षांचा घरोबा मोडला.

आता ते कधी काळी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि अशा अनेक प्रादेशिक पक्षांची मोट बांधून पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून तयार होतील. कदाचित ज्या काँग्रेसविरोधात ते बिहारमध्ये लढले आणि लढत आहेत, त्या काँग्रेसचा पाठिंबाही घेतील. आतून नाही घेतला तर बाहेरून तरी घेतील. कारण ते स्वबळावर मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवू शकतील. मात्र, पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना भाजप किंवा काँग्रेसचाच आधार लागणार आहे. आता भाजप हा धर्मांध आणि जातीयवाद्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांचा पाठिंबा घेणे नितीशकुमार पसंत करणार नाहीत. त्यामुळे गांधी हत्येनंतर ब्राह्मणांच्या आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांच्या हत्या झाल्या तेव्हा सत्तेवर असलेल्या सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून नितीशकुमार नवा संसार थाटतील.

त्यांच्या या भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…

Tuesday, June 11, 2013

अडवाणींचे प्रतिमाभंजन


शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर असतानाचा किंवा युतीची सत्ता नुकतीच गेली, तेव्हाचा काळ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये काहीतरी वादग्रस्त विधान करून वादाचा धुरळा उडविलेला. मग त्यावर वाद आणि प्रतिक्रियांचा जोरदार प्रतिध्वनी उमटत होता. त्यामध्ये चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांची आज इतक्या वर्षांनंतरही लक्षात राहिलेली प्रतिक्रिया... ‘बाळासाहेब, आमच्या मनामध्ये तुमची जी प्रतिमा आहे, तिला धक्का पोहोचविण्याचा अधिकार खुद्द तुम्हालाही नाही...’ सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या एकूणच वर्तनाबद्दल पक्षातील त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते यांची भावनाही नानापेक्षा वेगळी असण्याची शक्यता नाही. ‘अडवाणी, आमच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे, तिला धक्का लावण्याचा अधिकार खुद्द तुम्हालाही नाही. त्यामुळे असे कोणतेही पाऊल उचलू नका, ज्यामुळे गेल्या ६५ वर्षांत निर्माण झालेल्या तुमच्या प्रतिमेचे भंजन होईल.’

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तीन दिवसीय बैठकीला लालकृष्ण अडवाणी यांनी मारलेली दांडी आणि नंतर दिलेला तीन संसदीय पदांचा राजीनामा. आजवरच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीला अनुपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. मुळात अडवाणी हे खरोखरच आजारी होते की त्यांचा आजार राजकीय होता, याबद्दल चर्चा करण्याचे काहीच कारण नाही. कारण दुसऱ्याच दिवशी सत्य समोर आले. शिवाय ८५ वर्षीही एकदम तंदुरुस्त असणारे अडवाणी नेमके बैठकीच्या तीन दिवसांतच आजारी पडले, म्हणजे नक्की काय, हे सूज्ञ मंडळींना समजले होतेच. 

मुद्दा आहे अडवाणी यांच्या प्रतिमेचा. भाजपच्या आजवरच्या वाटचालीत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोनच नेते असे आहेत, की ज्यांचे स्थान कोणालाही घेता येणार नाही. अगदी नरेंद्र मोदी यांनाही ते शक्य नाही. शून्यातून पक्ष उभा करणे म्हणजे काय, हे या दोघांनी करुन दाखविले आहे. त्यामुळेच वाजपेयी आणि अडवाणी यांना एकमेकांपासून वेगळे करणे शक्य नाही. वाजपेयी-अडवाणी हे भाजप कार्यकर्त्यांसाठी एका अर्थाने जोडशब्दच आहेत. एक घेतला की ओघाने दुसरा आलाच. हे दोघे सर्वप्रथम १९४८ मध्ये भेटले. त्यानंतर पाच वर्षांनंतरची म्हणजे १९५३ची घटना. अडवाणी यांनी स्वतःच सांगितलेली. 

दिल्लीच्या पालिका निवडणुकीत जनसंघाला यश मिळावे म्हणून वाजपेयी-अडवाणी खूप झटत होते. मात्र, जनसंघाला त्या निवडणुकीत दणकून पराभव पत्करावा लागला. निकाल जाहीर झाल्यानंतर पराभवाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ते दोघे पहाडगंज येथील टॉकीजमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेले. योगायोगाने तो सिनेमा होता, राजकपूर यांचा ‘फिर सुबह होगी.’ त्यानंतर जवळपास ४३ वर्षांनी भाजप देशात सत्तेवर आला आणि भाजपसाठी खऱ्या अर्थाने ‘सुबह’ झाली. ती केवळ वाजपेयी-अडवाणी यांच्या जोडगोळीमुळेच. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान आहे, यात शंकाच नाही. पण भाजपला सत्तेपर्यंत नेण्यात या दोघांचाच सिंहाचा वाटा आहे, हे विधान सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

तेव्हा वाजपेयी-अडवाणी यांनी पक्षासाठी घेतलेले परिश्रम आणि वारंवारच्या पराभवातूनही पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची त्यांची जिद्द नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे त्यांना वगळले तर भाजप भले मोठे शून्य आहे. असे असतानाही सध्याची परिस्थिती अडवाणी यांच्या पंतप्रधान बनण्यासाठी अजिबात अनुकूल नाही, हे सत्य त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. अनेक दशके राजकारणात असूनही अडवाणी यांची निष्कलंक प्रतिमा आणि या वयातही तंदुरुस्त राहून राजकारणात सक्रिय राहण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे. विचारांवरील निष्ठांबद्दल शंका घेण्याचे धाडस काँग्रेस नेतेही करणार नाहीत. मात्र, वय त्यांच्या बाजूने नाही. भाजपचे कार्यकर्ते नसलेल्या देशभरातील तमाम तरुणांना आणि कुंपणावरील मतदारांना आकर्षित करेल, अशी वाणी आणि व्यक्तिमत्त्व अडवाणी यांच्याकडे नाही. जे वाजपेयी यांच्याकडे होते आणि कदाचित मोदी यांच्याकडे आहे. हे सत्य ८५ वर्षांच्या अडवाणी यांनी मोठ्या मनाने स्वीकारून तरुण नेतृत्त्वासाठी जागा करून दिली पाहिजे.

वास्तविक पाहता, २००९ मध्ये अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या जागा वाढण्याऐवजी घटल्या होत्या आणि काँग्रेसने बऱ्याच वर्षांनी दोनशेचा टप्पा पार केला होता. तेव्हा भाजपचा पराभव का झाला? तो अडवाणी यांच्यामुळेच झाला का? वगैरे चर्चा करण्याची ही वेळ नाही. मात्र, तेव्हा अडवाणी यांना संधी मिळाली होती आणि त्याचे सत्तेत रुपांतर करण्याचे कसब अडवाणी यांना जमले नाही, हा इतिहास आहे. त्याला कोणीही नाकारणार नाही. इतिहासात अनेकांना संधीच मिळत नाही. अडवाणी यांना मात्र, ती मिळाली होती. तिचे सोने करणे त्यांना जमले नाही.

भाजपमधीलच अनेक नेत्यांनी हे सत्य स्वीकारले आहे. भाजपचे प्रदेश पातळीवर महत्त्वाची भूमिका बजविणारे एक आमदार गेल्या वर्षी भेटले होते. ते यासंदर्भात भरभरून बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘वाजपेयी-अडवाणी हे आजही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय नेते आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आम्ही येथे आहोत, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, सध्याची परिस्थिती वाजपेयी-अडवाणींचा नाही, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. परिस्थिती बदलली आहे. त्याप्रमाणे पक्ष तसेच नेतृत्त्वाने बदलले पाहिजे. हे दोन्ही नेते सध्याच्या परिस्थितीसाठी योग्य नाहीत. त्यामुळेच आज अडवाणी काय, वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालीही निवडणूक लढविली असती, तरी यश मिळालेच असते अशी खात्री देता येणार नाही.’

तेव्हा तुमचे पक्षातील अतुलनीय योगदान लक्षात घेऊन सुद्धा ‘तुमच्याऐवजी दुसरा’ असा निर्णय भाजप घेणार असेल तर त्यात काहीही चूक नाही. परिवारातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही ते मोकळ्या मनाने स्वीकारता, की रुसून बसता हे महत्त्वाचे आहे. कोणता शिक्का बसेल याची पर्वा न करता, रामजन्मभूमी आंदोलनात झोकून देणारे विचारनिष्ठ अडवाणी लोकांनी पाहिले आहेत. हवालाच्या डायरीमध्ये फक्त ‘एल. के.’ अशी अद्याक्षरे आढळल्यानंतर निर्दोष सिद्ध होईपर्यंत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणारे तत्त्वनिष्ठ अडवाणी लोकांनी पाहिले आहेत. आता मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःच्या शिष्यासाठी मनापासून बाजूला होणारे अडवाणी लोकांना पहायचे आहेत. तसे झाले तरच अडवाणी यांच्या प्रतिमेचे भंजन होणार नाही. 

(‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीत ११ जून रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)

Wednesday, April 17, 2013

'त्या' गीताचं काय करायचं?

जवळपास सात वर्षांनंतर दुसरा ब्लॉग सुरू केला आहे. परममित्र निलेश बने यांचा प्रचंड आग्रह मोडणे मला शक्य झाले नाही. सर‘मिसळ’ असे ब्लॉगचे नाव असून तो महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. जे सुचेल, जे दिसेल ते लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा वाचा आणि व्यक्त व्हा... धन्यवाद.
 
एखाद्या ओळखीच्या माणसाला खूप दिवसांनी पाहिलं तर कसं मस्त वाटतं. खूप वर्षांपासून ओळख असेल आणि अनेक दिवस भेट झाली नसेल तर भेटल्यावर बरं वाटतं. पण मी तिला खूप दिवसांनी काल पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं. तिचं तसं दिसणं मनाला अगदी चटका लावून गेलं

तीम्हणजे गीता देशपांडेमला रस्त्यावर भटकताना दिसली. विस्कटलेले केस, खूप दिवस आंघोळ केल्यामुळं काळवंडलेली त्वचा, मळलेल्या पंजाबी ड्रेसचा फक्त टॉप आणि तोही कुठं कुठं फाटलेला, एका हातात प्लॅस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हातात छोटीशी काठी अशा अगदी विपन्नावस्थेत गीता मला दोन-चार दिवसांखाली दिसली. एकटीच स्वतःशी काहीतरी बडबड करत डेक्कनच्या सिग्नलजवळून चालत होती. मी गाडीवर होतो, त्यामुळं अर्धा-एक मिनिट तिचं दर्शन झालं आणि काळीज हेलावलं.

गीता ही अगदी सात-आठ वर्षांपर्यंत आमच्या कॉलनीत राहणारी. माझ्या मागच्याच इमारतीमध्ये. माझ्यापेक्षा साधारण दहा-बारा वर्ष मोठी असेल. तिची आई आणि माझी आई मैत्रिणी किंवा चांगल्या ओळखीच्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं माझं तिच्या घरी आणि तिचं माझ्या घरी जाण येणं अगदी नेहमीचंच. कधी तरी मला एखादं चॉकलेट दे किंवा काय रे अभ्यास करतोस ना, असं विचारणं. किंवा कधी आमच्याकडे काही विशेष केलं तर तो पदार्थ त्यांच्याकडे नेऊन देणं आणि त्यांच्याकडील पदार्थ आमच्याकडे येणं असं चालायचं. इतकीच आमची ओळख.

भारतात सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगची नुकतीच सुरुवात व्हायला लागल्यानंतर म्हणजे १९९० च्या आसपास ती सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि मुंबईमध्ये जॉबला लागली. त्यानंतर आमच्यातील संपर्क खूप कमी झाला आणि नंतर मग तो तुटलाच. मुंबईत नोकरीला असताना तिचं कोणाशी तरी सूत जुळलं होतं. पण त्यानं तिचा ‘फायदा’ घेतला आणि नंतर झिडकारलं, असं कानावर आलं होतं. त्यानं अव्हेरल्यानंतर ती बिथरल्यासारखी वागायची. हे सगळं घडत असतानाच आधी तिची आई गेली आणि नंतर लगेचच एक-दोन वर्षांत वडीलही गेले. मानसिक परिस्थिती ढासळल्यामुळं तिचा जॉबही गेला असावा आणि मग ती पुन्हा पुण्यामध्ये तिच्या घरात येऊन राहू लागली.

आता मात्र गीता पूर्णपणे बदलली होती. बदलली म्हणजे काय तर ठार वेडीच झाल्यासारखं तिचं वागणं होतं. घरामध्ये आदळआपट, भाड्यांची फेकाफेक, जोरजोरात किंचाळणं, शिव्यांची लाखोली वाहणं (ज्यानं फसविलं त्याला आणि तो ज्या जातीचा होता त्या जातीला), विक्षिप्तपणे वागणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास देणं (जिन्यामध्ये तेल ओतणे वगैरे…) असले प्रकार वाढले होते. तिचं वागणं असं झाल्यामुळं नातेवाईकांनीही तिला कधीच झिडकारलं होतं. शेजारी पाजारीही तिला टरकून असायचे आणि फारसं काही बोलायचे नाहीत. अनेक जण तिला त्रास मात्र द्यायचे. म्हणजे उगाचच तिच्या घराला कडी लाव, रस्त्यामध्ये दिसली तर तिला दगड मार किंवा तिला विनाकारण चिडव वगैरे प्रकार वाढले होते.

काही जण तिच्या त्रासाला कंटाळून पोलिसांना बोलवायचे. मात्र, पोलिसांशी ती व्यवस्थित इंग्रजीतून संवाद साधायची आणि त्यांना परतवून लावायची. विक्षिप्त आणि वेडसर वागण्यामुळं तिच्याशी बोलणं किंवा नुसती ओळख दाखविण्याचीही भीती वाटायची. तरीही कधी कधी ती मला भर रस्त्यात ओळख द्यायची. काय करतोस किंवा सध्या कुठे वगैरे विचारायची. आई कशी आहे विचारायची. बरं, अगदी भणंगावस्थेत आहे, म्हणून माझ्याकडे कधी पैसे मागितले आहेत, असं झालं नाही.

तिच्या घराला कोणी बाहेरून कडी लावली असेल तर मला ती काढण्यासाठीही खिडकीतून आवाज द्यायची. त्यावेळी पोटात गोळाच यायचा. कडी काढायला गेलो आणि हिनं काही केलं तर या कल्पनेनंच घाम फुटायचा. पण तरीही जीव मुठीत धरून मी तिच्या घराची कडी काढायला जायचो. पण तिनं कधीच मला काही केलं नाही. तिच्यासाठी काहीतरी करावं, असं खूप वाटायचं. पण काय करावं हे सुचायचं नाही आणि कसा मार्ग शोधावा, हे कळत नव्हतं. तसा मी खूप मोठाही नव्हतो.

नंतर मात्र, तिनं आमच्या इमारतीमध्ये राहणं सोडलंच. का सोडलं, कशामुळं सोडलं हे कोणालाच माहिती नाही. पण नंतर ती घरामध्ये दिसायचीच नाही. फक्त कधी तरी रस्त्यावर दिसायची. मळलेला टी-शर्ट आणि जीन्सच्या पॅण्टमध्ये. अर्थात, तिचं दर्शन नियमितपणे व्हायचं. म्हणजे रोज नसलं तरी आठवड्यातून दोन-तीनदा तरी. म्हणजे ती कॉलनीमध्ये यायची. इकडं तिकडं भटकायची आणि परत गायब व्हायची. मात्र, नंतर काही वर्षं मी ई टीव्ही आणि साम मराठीच्या निमित्तानं हैदराबाद आणि मुंबईमध्ये असल्यामुळं तिची ‘भेट’ व्हायची नाही. सुटीसाठी कधी पुण्यात आल्यानंतर क्वचित तिचं दर्शन व्हायचं.

गेल्या तीन वर्षांपासून मात्र, ती कॉलनीमध्ये कधीच दिसली नाही. सहा-आठ महिन्यांनी कोणीतरी सांगायचं अरे आज मला अमुक तमुक ठिकाणी गीता दिसली. मला पण दोन-एक वर्षांत ती दिसली नव्हती. चार-पाच दिवसांपूर्वी मला ती दिसली आणि हा सगळा प्रवास डोळ्यांसमोरून पुढे सरकला. दोन-तीन दिवस तिचाच विचार करीत होतो. आमच्याच कॉलनीतील कमलेशला त्याच परिसरात गीता दिसली. दोघांनी काही करता येईल का, अशी चर्चा केली. फक्त पैसे किंवा कपडे देऊन काहीच उपयोग नाही. तिला सुधारणं किंवा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणणं आता शक्य आहे का, याबाबत आमचं बोलणं झालं.

खरंच हे शक्य आहे का आणि असेल तर कशा मार्गानं हे शक्य आहे. मुळात तिचा ठावठिकाणा नाही. क्वचित कधीतरी दिसते. त्यामुळं शोधणं कठीण. शिवाय तिची जबाबदारी घेईल, असं सध्या तरी कोणी नाही. तिला सुधारण्याची जबाबदारी समजा कोणी घेतल्यानंतर जितकं लक्ष द्यायला लागेल तितकं लक्ष द्यायलाही कोणी नाही. आर्थिक भार उचलायचा असेल, तर त्याचंही फारसं नियोजन नाही. अशा परिस्थितीत तिला आयुष्यात परत आणणं शक्य आहे का, याची चाचपणी तर आम्ही सुरू केलीय. पाहू त्यात यश येतं का ते. कारण तिचं आयुष्य पूर्वपदावर यावं, असं कुठंतरी आतून वाटतंय.