Saturday, June 28, 2014

उत्तर प्रदेश… उत्तम प्रदेश

दिलदार लोकांचा शानदार प्रदेश

लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशला जाण्याचे निश्चित केले होते. संस्थेनं पाठविलं तर संस्थेकडून अन्यथा स्वतःहून जायचं. मुळात उत्तर प्रदेश आणि बिहारचे निकाल यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी खूपच निर्णायक होते, हे एक कारण नि दुसरे म्हणजे उत्तर प्रदेश नेमका कसा आहे, हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. त्यानुसार उत्तर प्रदेशच्या दिशेनं निघालो.


‘उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगार इथं महाराष्ट्रात येऊन सगळी वाट लावत आहेत’, ‘एक बिहारी सौ बिमारी’, ‘इथे येऊन राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केलात, तर याद राखा,’ ‘छटपूजा नव्हे हटपूजा,’ अशा अनेकांची अनेक वक्तव्य डोक्यात होती. शिवाय तिथल्या गुंडाराजच्या बातम्या पेपरात आणि टीव्हीवर सातत्यानं झळकत असतातच. त्यामुळं अशा गोष्टींमधून उत्तर प्रदेशची अत्यंत वाईट प्रतिमा मनात तयार झाली होती. त्या पार्श्वभूमीवर तो प्रदेश कसा आहे, हे जाणून घेण्याची खूप इच्छा होती.


अखेर पुणे-लखनऊ एक्स्प्रेसनं निघालो. कानपूरचे अॅडव्होकेट राजशेखर माझे सहप्रवासी होते. त्यांनी बोलता बोलता सहज एक सल्ला दिला, की लखनऊच्या स्टेशनवर उतरल्यानंतर मोबाइल वगैरे जरा सांभाळून ठेवा. एखाद्याला तुमचा स्मार्टफोन आवडला तर तुम्ही तुमचा मोबाइल गमावून बसाल वगैरे वगैरे. बापरे, परिस्थिती इतकी गंभीर असेल, तर बारा-पंधरा दिवस आपली वाटच लागेल, असा विचार करून स्टेशनवर पाऊल ठेवलं.

पुण्याहून लखनऊला आलेला अभिषेक नावाचा एक मुलगा माझ्या मदतीला धावून आला. विप्रो की कुठल्याशा आयटी कंपनीत तो एका आठवड्यापूर्वीच जॉइन झाला होता. शिफ्टिंगसाठी तो लखनऊला आला होता. मला जायचं होतं, त्याच परिसरात त्यालाही जायचं होतं. मग त्याच्या बरोबरच नव्यानं वसविण्यात आलेल्या गोमतीनगर परिसरात पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती. त्यामुळं आराम करून दुसऱ्या दिवशीपासून फिरणं सुरू करायचं असं ठरविलं होतं. लखनऊ शहर, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, मोहनलालगंज, सुलतानपूर, फैझाबाद, अयोध्या, आझमगढ आणि वाराणसी असं बरंच फिरलो. अगदी सहजपणे भेटणार असतील तर राजकारण्यांची भेट घेतली. गावातील लोकांना अधिक भेटलो, त्याच्यांशी बोललो. त्याच गाठीभेटी अधिक उपयुक्त ठरतात, असा माझा अनुभव आहे.

रायबरेलीला जाताना हिंदीचे निवृत्त शिक्षक जयद्रथ चौधरी भेटले. ते देखील रायबरेलीला जात होते. ‘रायबरेली आणि परिसराला निसर्गाचे वरदान आहे. इथं खूप पाऊस पडतो. त्यामुळं इथं प्रामुख्यानं भाताची शेती होते. पिकं चांगली येत असल्यानं शेतकरी सधन आहे. रायबरेली आणि परिसरात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहे. बहुतांश मुली किमान दहावीपर्यंत शिकतात. मुली अभ्यासात हुशार आहेत…’ अशा विविध विषयांवर ते माहिती देत होते.

नरेंद्र मोदींची लाट आणि गांधी परिवार अशा राजकीय विषयांवरही ते दिलखुलासपणे बोलत होते. मोदींची लाट इथंही जाणवते आहे. मात्र, सोनिया गांधी यांनाच मी मत देणार. आम्ही नेहमी त्यांनाच देतो. त्यांचे आणि इथल्या नागरिकांचे भावनिक नाते आहे वगैरे वगैरे. गप्पा मारता मारता कधी रायबरेलीला पोहोचलो ते कळलंच नाही. एसटीतून उतरल्यानंतर ते म्हणाले, ‘चलिए…’. मी म्हटलं, ‘कहा?’ तेव्हा म्हणाले, ‘हमारे घर. भोजन का समय हो गया है. खाना खिलाए बगैर में आपको जाने नही दूँगा. आप हमारे गांव में पहली बार आए है. आप हमारे मेहमान है.’ मला धक्काच बसला. मग त्यांना समजावून सांगितलं, की मला फिरायचं आहे. लोकांशी बोलायचं आहे. प्रियांका गांधी यांच्या रॅलीमध्ये जायचं आहे. जेवण्यात खूप वेळ जाईल. 


मग संध्याकाळी तरी जेवायला जरूर या, अशी गळ ते घालू लागले. मला त्यांचा आग्रह मोडवत नव्हता. पण मला खरंच जमणार नव्हतं. मग ते म्हणाले, ‘ठीक है. चलिए लस्सी ही पी लेते है.’ शेवटी मस्त मलईदार लस्सी पिऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मला सांगा, एसटीत भेटलेल्या एखाद्या माणसाला आपण तरी कधी इतका आग्रह करतो का? किमान मी तर आतापर्यंत कधी केलेला नाही. महाराष्ट्रातून एक जण आपल्या प्रदेशात काहीतरी कामासाठी आलाय. आपण त्याची खातिरदारी केली पाहिजे, ही जयद्रथ चौधरी यांची भावनाच माझ्यासाठी पुरेशी होती.

उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात फिरताना जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे इथले लोक खूप गरीब असले, तरीही मनानं खूप श्रीमंत आहेत. म्हणजे राजकारण्यांनी ग्रामीण भागातील लोकांना मुद्दामून गरीब, अशिक्षित नि अविकसित ठेवलं आहे. ही मंडळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडेच येतील. मग आपण दरवेळी उपकार केल्याच्या थाटात एखादा तुकडा टाकून त्यांना खूष करू, अशी अत्यंत नीच भावना इथल्या सत्ताधारी राजकारण्यांची आहे… हे मत माझं नाही. हे मत आहे अमेठीत भेटलेल्या राजन पासीचं. माजी आमदार रामलखन पासी यांचा हा पुतण्या. ड्रायव्हर म्हणून काम करतो. 


काही गावात गुंडामार्फत धमक्या द्यायच्या. ‘आम्हाला मतं दिली नाहीत, तर तुमचे हातपाय तोडू.’ कुठं रस्ता, वीज किंवा शाळा सुरू करू, अशी लालूच दाखवायची. कुठं आणखी काही आश्वासनं देऊन वेळ मारून न्यायची, असं करून ही मंडळी वर्षानुवर्ष सत्तेवर आहेत. विकास नावालाही नाही. ही झाली काँग्रेसवाल्यांची रणनिती. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते-कार्यकर्ते सत्तेवर आल्यानंतर गुंडागर्दी करण्यात आणि रुबाब गाजविण्यात मग्न असतात. तर मायावती यांना आंबेडकर पार्क, शाहू पार्क, कांशीराम पार्क आणि स्वतःचे पुतळे यांच्यावर काही शेकडो कोटी रुपये खर्च करण्यातून लोकांकडे पहायला वेळच मिळत नाही.

लोकांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, चांगले रस्ते, २४ तास वीज आणि मुबलक पाणी हवंय. मात्र, त्यांच्या या मागण्या बधीर राजकारणी मनावर घ्यायलाही तयार नाहीत. भाजपची ही परिस्थिती काही वेगळी नाही. भाजपचे आधीचे नेते एकमेकांच्या तंगड्या ओढण्यातच मग्न होते. त्यांनाही लोकांकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपला तिथं संजीवनी मिळाली. मोदी यांनी गुजरातमध्ये खूप काही विकासकामे केली आहेत. तिथं २४ तास वीज असते. चांगला रोजगार आहे. गुंडागर्दी नाही. उत्तर प्रदेशातील आहोत, म्हणून हिडीसफिडीस नाही. अशा अनेक कथा नि अनुभव गुजरातेत काम करणाऱ्या कामगारांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावात ऐकविल्या होत्या. त्यामुळेच मोदी या माणसाला एकदा संधी देऊन तर बघू. गुजरातचा विकास केला म्हणतात. पाहू या, उत्तर प्रदेशचा कसा विकास करतो. या आणि केवळ या एकाच आशेवर उत्तर प्रदेशातील पिचलेल्या आणि गांजलेल्या मतदारांनी मोदींच्या पारड्यात भरभरून मते टाकली. ‘नरेंद्र मोदी से बहुत उम्मीद है…’ हे वाक्य जवळपास प्रत्येक ठिकाणी कानावर पडत होतं. आता बोला.

रिक्षावाल्यावरून आठवलं. उत्तर प्रदेशात सायकल रिक्षा सगळीकडेच आहेत. तिथं रिक्षा म्हणजे सायकर रिक्षाच. आपण जिला रिक्षा म्हणतो, तिला तिथं ऑटो म्हणतात. साधारण एका चौकासाठी पाच ते दहा रुपये इतके पैसे ही मंडळी घेतात. रिक्षा चालविणारे बरेच जण शेतमजूर आहेत. शेतीची कामं नसतील, तेव्हा घर चालविण्यासाठी ही मंडळी रिक्षा चालवितात. लखनऊमध्ये दोन-तीन जणांशी सहज बोलल्यानंतर ही माहिती कळली.


माणुसकी पिळवटून टाकणाऱ्या अशा रिक्षामध्ये बसणं मला फारसं इष्ट वाटत नाही. त्यामुळं लखनऊ आणि इतर गावांमध्ये मी सायकल रिक्षांमध्ये बसणं टाळलं. मात्र, वाराणसीमध्ये असताना मला जिथं जायचं होतं तिथपर्यंत या सायकल रिक्षाच जातात. त्यामुळं नाईलाजानं मला त्यात बसणं भागच होतं. सायकल सुरू झाली आणि आमचंही बोलणंही. अजूनही तो संवाद माझ्या कानात घुमतोय. तो संवाद आठवला, की आजही अंगावर शहारे येतात.

तो रिक्षावाला आधी वाराणसीत साड्यांवर नक्षीकाम आणि कलाकुसर करणारा कलाकार होता. मात्र, कम्प्युटरवर वेगवेगळी डिझाइन्स तयार करण्यात येऊ लागल्यानंतर अशा कलाकारांचं महत्त्व कमी झालं. खूप फिरून, इकडे तिकडे हात मारून पाहिले. मात्र, शेवटी कुठंच काही मिळेना. शेवटी एके दिवशी सगळे कुटुंबीय उपाशी राहिले. शेवटी ठरविलं, जगण्यासाठी सायकल रिक्षा चालविण्यावाचून पर्याय नाही. तेव्हापासून रिक्षा चालवितोय… भोलू सांगत होता.

‘किती मुलं आहेत तुम्हाला. शिकतात ना ते सगळे,’ मी.

‘सहा मुलं आहेत. तीन मुलं आणि तीन मुली. एकीचं या जानेवारी महिन्यात लग्न झालं. बाकीचे सगळे शिकत आहेत. मला माझ्या परीनं जेवढं शिकविता येईल तेवढं शिकवतोय त्यांना साहेब,’ इ भोलू.

सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ४५ डिग्री सेल्सियसमध्ये मरमर करून सायकल चालविल्यानंतर त्याला कसेबसे साडेचारशे रुपये मिळणार. त्यापैकी चाळीस रुपये भाड्याचे. म्हणजे अवघ्या चारशे रुपयांत हा माणूस आठ जणांच्या संसाराचा गाडा कसा ओढत असेल, या विचारानंच मला गलबलून गेलं. 


जानेवारीत त्याच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यासाठी त्यानं तब्बल पाच-सहा लाख रुपये खर्च केला होता. साग्रसंगीत लग्न लावून द्यायचं. बारा ते पंधरा तोळे सोने. जावयाला डिस्कव्हर गाडी. शिवाय घरात रंगीत टीव्ही, फ्रीज, फर्निचर इ. इ. हे सगळं ऐकून मला वेड लागायची वेळ आली होती.

‘अरे, बाबा इतका खर्च कशाला करायचा. साधं लग्न लावून द्यायचं ना…’ माझं वाक्य संपतं ना संपत तोच भोलू म्हणाला, ‘साहेब, माझ्या मुलीला रिकाम्या हातानं पाठविलं असतं तर सासरकडच्यांनी तिला एक दिवस पण ठेवून घेतलं नसतं. परत पाठवून दिलं असतं. साधं लग्न लावून द्यायचं म्हणायला बरंय. पण समोरच्यांना ते नाही चालत. वाईट आहे, पण उत्तर प्रदेशात हीच प्रथा आहे. मी एकटा काही करू शकत नाही. चार लोकं करतात, तेच मला करावं लागतं.’ देवा… आता तो दिवसाला चारशे रुपये कमविणारा भोलू सहा लाखांचं कर्ज फेडणार कसं आणि उर्वरित दोन मुलींचं लग्न लावणार कसं, ही कल्पनाच मला अस्वस्थ करून टाकत होती.

‘साहेब, ऊन-पाऊस कशाचीच पर्वा न करता सायकल चालवावी लागते. अंगात ताप असेल तरी एखादी गोळी-औषध घेऊन सायकल चालवावीच लागते. नाहीतर रात्री घरी चूल पेटत नाही. जेवायचं काय हा प्रश्न पडतो…’

‘बहोत ही मेहनत का काम है ये. सायकल चलाना आसान काम नही है साहब. ये सायकल खून चुसती है खून.’ भोलूचं हे वाक्य इतकं खतरनाक होतं, की आजही त्याचा तो आवाज आणि ते वाक्य मधूनच कानात घुमतं.

‘भगवान सबका भला कर, लेकिन शुरूवात मुझसे कर,’ असं गमतीगमतीत आपण म्हणतो. मात्र, नरेंद्र मोदी सरकारमुळे जर खरेच ‘अच्छे दिन येणार असतील, तर त्याची सुरूवात भोलू नि उत्तर प्रदेशातील अशा लाखो गरीब, बेरोजगार, अशिक्षित लोकांपासून व्हावी,’ असे माझे साकडे आहे. रेल्वेच्या भाड्यात १४ टक्के वाढ केली म्हणून गळा काढणाऱ्यांकडे नंतरही लक्ष देता येईल. मात्र, जो खरोखरच वर्षानुवर्षे पिचलेला आहे, त्याला प्राधान्य द्यायला हवे. किमान इतका दिलदारपणा तरी आपण नक्कीच दाखवू शकतो.


लखनऊत समाजवादी पार्टीच्या कार्यालयात राजेंद्र चौधरी भेटले. समाजवादी पार्टीचे प्रमुख प्रवक्ते. जितके समाजवादी विचारांचे कट्टर तितकेच मुलायमसिंह यांचे भक्त. म्हणजे त्यांचा फोटा काढतानाही त्यात मुलायमसिंह यांचे पोस्टर यावं, अशी त्यांची इच्छा होती. ‘नेताजी के पोस्टर के साथ हमारी तस्वीर आएगी तो बेहतर रहेगा.’ खादीचा कुर्ता पायजमा. खुरटी दाढी आणि प्रसन्न, हसतमुख मुद्रा. आणीबाणीच्या काळात आमदार असलेल्या चौधरी यांना भेटायला एक कार्यकर्ता आला होता. त्याच्या तोंडात मावा की तंबाखू काही तरी होतं. हसतहसत चौधरी त्याला म्हणाले, ‘तुम्ही कसे कार्यकर्ते आहात. इतक्या वर्षात मी साधी सुपारीही खाल्लेली नाही. पानसुपारी तर सोडाच, मी पेप्सी नि कोकाकोलाही प्यायलेला नाही…’ 

समाजवादी विचारांच्या शिकवणीनंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. उत्तर प्रदेशात रोजगार निर्मिती का केली जात नाही. इथल्या लोकांना कामासाठी बाहेर पडण्याची वेळ का येते, हा माझा प्रश्न त्यांना कदाचित अपेक्षितच असावा. ‘हे बघा, चांदोरकर. इथली बरीचशी जमीन सुपीक आहे. तिथं शेती होते. त्यामुळं सुपीक जमिनीवर शेती बंद करून कारखाने लावणं योग्य नाही, असं आमचं मत आहे. शिवाय आमची लोकसंख्याच इतकी आहे, की तुम्ही कितीही कारखाने आणि उद्योगधंदे सुरू केलेत, तरी लोक पोटापाण्यासाठी बाहेर जाणारच. आमचे लोक कष्ट करणारे आहेत. मेहनती आहेत. शांतपणे राहणारे आहेत. मग तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही उत्तर प्रदेशकडे मजूर किंवा कामगार पुरविणारा प्रदेश म्हणून पाहिले, तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही.’ त्यांच्या उत्तरानं माझं पूर्ण नाही, तरी काहीसं समाधान झालं होतं.


मग त्यांनी चांदोरकर या नावाचा नेमका अर्थ काय. तेंडुलकर, मंगेशकर, गावस्कर अशा नावांची कहाणी काय याची विचारणा केली. राहण्याची काय व्यवस्था आहे की करायची आहे, वगैरे विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे कामगार कुठेही गेले तरी जास्त दमबाजी करणार नाहीत. बिहारचे मजूर मात्र, दादागिरी नि गुंडागर्दी यात थोडे अग्रेसर असतात. तुलनेनं आमच्या कामगारांमध्ये ती वृत्ती कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वाक्याचा प्रत्यय मला वाराणसीत आला. तिथं सायकल रिक्षा चालविणारे आणि अनेक मजूर-कामगार हे बंगाल नि बिहारमधील होते. मात्र, बिहारी लोकांनी तिथंही दमबाजी करण्यास प्रारंभ केला. मग स्थानिकांनी त्यांना पिटाळून लावलं, हे समजताच मला चौधरींची आवर्जून आठवण झाली.

उत्तर प्रदेशात आलेला आणखी एक अनुभव म्हणजे मी महाराष्ट्रातून आलो आहे, हे माहिती असूनही एकानं देखील शिवसेना किंवा मनसेबद्दल तक्रार केली नाही. त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले नाहीत. किंवा टीका केली नाही. त्यांच्या मनात या संघटनांबद्दल राग असता तर बोलताना या ना त्या पद्धतीने व्यक्त झालाच असता. मात्र, पंधरा दिवसांच्या काळात तो कधीच मला जाणवला नाही. ना मी महाराष्ट्रातील आहे, म्हणून मला वाईट वागणूक मिळाली.

लखनऊला जात असताना चौधरी कुटुंबीय माझे सहप्रवासी होते. ते देखील कानपूरचेच. ते पुण्यात पर्सिस्टंटमध्ये कामाला होते. त्यांची पत्नी सहजपणे बोलता बोलता म्हणाली, ‘आमच्या इमारतीमध्ये कानपूरचेच एक जण आहेत. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं, की तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात, असं अजिबात सांगू नका. दिल्लीचे आहात, असं काहीतरी सांगून टाका. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल खूप घृणा आहे. त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं.’ सॉफ्टवेअर कंपनीत काही लाख रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या कुटुंबाला त्यांची मूळ ओळख लपवावी, असं वाटत असेल तर त्यांच्या मनात महाराष्ट्राचे काय चित्र निर्माण झाले असेल याचा विचारच न केलेला बरा.

वास्तविक पाहता, अशी परिस्थिती नाही. सर्वांना अगदी सहजपणे सामावून घेणारा आणि कोणत्याही प्रांतात अगदी सहजपणे मिळून मिसळून राहणारा समाज ही मराठी माणसाची ओळख आहे. मात्र, तरीही काही दळभद्री ‘राज’कारण्यांमुळे महाराष्ट्राचे वेगळे आणि चुकीचे चित्र उत्तरेत निर्माण झाले आहे. गुजरातमध्ये दौऱ्याची नौटंकी करणाऱ्यांनी एकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन परिस्थिती पाहिली पाहिजे. तिथली गरिबी जवळून पहावी. त्यांच्याशी बोलावं. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. म्हणजे कितीही संख्येनं ते आले तरी त्यांच्यावर हात उचलण्याची इच्छा होणार नाही. 




उत्तर प्रदेशात इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची फार चांगली परिस्थिती नाही. मुलायमसिंह सरकार तर इंग्रजीच्या विरोधातच आहे. अनेक तरूणांची संगणकाशी तोंडओळखही नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी विविध परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील, असे फलक लावलेले दिसतात. एक तर इंग्रजीची बोंब आणि दुसरे म्हणजे कम्प्युटर शिक्षणाचा अभाव. व्यावसायिक शिक्षणासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक. त्या नाहीत, म्हटल्यावर फक्त पारंपरिक पदव्यांचाच पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतो. फक्त एमए, एमकॉम आणि एमएस्सी झाल्यानंतर नोकऱ्या अगदीच मर्यादित. शाळेत किंवा कॉलेजात शिक्षक. नाहीतर सरकारी नोकरीत शिपायापासून ते क्लार्कपर्यंत काहीही. एक तर शेती नाहीतर सरकारी नोकरी. म्हणूनच ही मंडळी रेल्वे, पोस्ट, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या परीक्षा अधिक संख्येनं देतात. कारण पर्याय अगदीच मर्यादित. त्यामुळं महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात कुठंही सरकारी नोकरीची परीक्षा असेल तर ही मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात. त्याचे कारण हे आहे. सुरुवातीपासून सर्वांना इंग्रजी आणि कम्प्युटर शिक्षण सक्तीचे केले तर तिथली परिस्थितीही नक्कीच बदलेल, असं मला वाटतं. त्या मंडळींना बदडून काढून समस्या अजिबात सुटणार नाही.

उत्तर प्रदेश जवळून पाहण्याची माझी इच्छा पूर्ण झाली होती. वैयक्तिक माझा अनुभव खूप चांगला होता. उत्तर प्रदेशात गरिबी असली तरीही इथली माणसं मनानं खूप श्रीमंत आहेत, हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो. ती माणसं दिलदार आहेत. आदरातिथ्य करण्यात खूप पुढं आहेत. मोकळीढाकळी आहेत. मला तर उत्तर प्रदेश एकदम उत्तम प्रदेश वाटला. फक्त एकच इच्छा आहे, की मनानं श्रीमंत असलेली ही माणसं पैशानं, मानानं, शिक्षणानं, विकासानं आणि सोयी-सुविधांनी श्रीमंत व्हावीत. नरेंद्र मोदी ही परिस्थिती निर्माण करतील, अशी आशा आहे. पाहूया काय होतं ते…

Thursday, May 22, 2014

धर्मापलिकडची ‘चाह’

उत्तर प्रदेशातील महान चहावाला


उत्तर प्रदेशात निवडणुकीचा माहौल अनुभवण्यासाठी जाण्यापूर्वीच काही गोष्टी ठरविल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ऐकूलाल या लखनऊमधील चहाविक्रेत्याची आवर्जून भेट घ्यायची. ‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राइम पॅट्रोल–दस्तक’ या कार्यक्रमात ऐकूलाल या चहाविक्रेत्याचा एपिसोड पाहिला होता. ज्यांनी ज्यांनी हा एपिसोड पाहिला असेल त्यांना त्या माणसाच्या मोठेपणाची महती यापूर्वीच कळली असेल. खूप मोठं काम करणाऱ्या सामान्य माणसाला भेटण्याची इच्छा तीव्र होती. त्यामुळे लखनऊला गेल्यानंतर दोन दिवसांपैकी एक दिवस इतर गोष्टींप्रमाणेच ऐकूलाल यांच्यासाठी राखून ठेवला.


लखनऊमधील कैसरबाग या मुस्लिमबहुल भागात ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल आणि त्यांच्या मागेच झोपडीवजा घर आहे. ‘आगे दुकान पिछे मकान स्टाइल’. टीव्हीवर झळकलेला असून देखील ऐकूलाल या चहावाल्याला कैसरबाग परिसरात कोणीही ओळखत नव्हतं, याचं खरं तर आश्चर्य वाटलं. चहावाले, पानवाले, रिक्षावाले, सायकल रिक्षावाले, इतकंच काय कैसरबाग पोलिस चौकीत जाऊनही चौकशी केली. पण ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल नेमका कुठं आहे, त्याबद्दल कोणालाच काहीही सांगता येईना. अनेकांना ऐकूलाल कोण हे देखील माहिती नव्हतं.

थोड्याशा निराश मनानंच तिथून निघण्याचं ठरवलं. पण म्हटलं अजून एकदा नेटवर सर्च करून पाहूयात, कुठं नेमका पत्ता मिळतो का ते. नेटवर सर्च केल्यानंतर काही बातम्या वाचल्या, पण कोणीही कैसरबाग या पलिकडे जाऊन पत्ता दिलेला नव्हता. अखेर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनं माझं काम फत्ते केलं. त्या बातमीमध्ये कैसरबागमधील बारादरी परिसरातील लखनऊ पार्क येथे ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल आहे, असा स्पष्ट उल्लेख होता. खरा बातमीदार अखेर ‘इंडियन एक्स्प्रेस’चाच निघाला. बाकीच्यांच्या बातम्या फक्त पोकळच. 
 
एकदा सविस्तर पत्ता कळल्यानंतर मग ऐकूलाल यांचा स्टॉल शोधून काढणं फार काही अवघड नव्हतं. पाचच मिनिटांमध्ये त्यांच्या चहाच्या स्टॉलवर गेलो. टीव्हीवर आपले नाव ऐकून थेट महाराष्ट्रातून एक जण आपल्याला भेटायला आला आहे, यामुळं त्यांनाच भरून आलं. खरं तर त्या माणसाच्या मोठेपणामुळं मलाच भरून आल्यासारखं झालं होतं. फक्कड चहा पाजून त्यांनी माझं स्वागत केलं. मग गप्पा सुरू झाल्या. 

लखनऊमधील हजारो चहावाल्यांपैकी एक चहावाला ही ऐकूलाल यांची ओळख नाहीच. आपल्या चहाच्या गाडीजवळच्या पार्कमध्ये सापडलेल्या अडीच वर्षाच्या मुस्लिम मुलाचा सांभाळ करणारा हिंदू पिता, ही त्यांची खरी ओळख. धर्मांचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नाही, असं अनेकांना वाटू शकतं. मात्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ही घटना घडल्यामुळं धर्मांचा उल्लेख मला आवश्यक वाटतो आहे. तसंही दोन्ही धर्मांमधील एकूणच संबंध पाहता, भारतात कुठंही ही घटना घडली असती तरी धर्मांचा उल्लेख करावाच लागला असता. ऐकूलाल यांनी खूप मोठे काम अगदी सहजपणे केले आहे. 


… तर ही घटना आहे २००२ मधली. फेब्रुवारी महिन्यात ऐकूलाल यांना सकाळच्या सुमारास लखनऊ पार्कमध्ये एक मुलगा सापडला. तो तेव्हा साधारण अडीच वर्षांचा असावा. तो स्वतःचं नाव अकबर सांगत होता. त्याला फक्त अम्मी, अब्बू आणि अकबर हे तीनच शब्द माहिती होते. त्यावेळी ऐकूलाल यांनी त्याला घरी आणलं. त्याला खाऊपिऊ घातलं. मग पोलिसांकडे जाऊन अकबर सापडला असल्याची माहिती दिली. काही आठवडे, काही महिने उलटल्यानंतरही पोलिस अकबरच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात अकबर ऐकूलालकडेच आनंदानं रहात होता. 

अकबरला अनाथालयात देऊन टाक, असा सल्ला शेजारच्या पाजारच्यांनी, मित्रांनी दिला. मात्र, ऐकूलाल यांच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती. त्यामुळे अकबरचे खरे आई-वडील मिळेपर्यंत स्वतःच त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. अकबर मिळाला तेव्हा तो खूपच अशक्त होता. त्याच्या हात-पाय तिरके होते. त्याला लिव्हरचा त्रास होता. त्यामुळं त्याचं पोट काही खाल्लं-प्यायलं की फुगायचं. त्याला मलेरियाही झाला होता. होतं नव्हतं ते सगळं विकून पैसा उभा केला आणि ऐकूलाल यांनी त्याच्यावर प्रचंड उपचार केले. त्याला सुदृढ बनविलं. 


पाहता पाहता काही वर्ष उलटली तरीही पोलिसांना त्याचे खरे आई-वडील कोण, याचा पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी लखनऊसह उत्तर प्रदेशात अकबरचा फोटो आणि सर्व माहिती पाठविली. कुठे मिसिंगची कम्प्लेंट नोंदविलण्यात आली आहे का, हे पाहिलं. पण तशी नोंद कुठंच नव्हती. मुळात अकबरच्या वडिल अलाहाबाद इथं राहणारे. गुत्त्यावर जाऊन दारू पिल्यानंतर ते अकबरला तिथं विसरून आले. आधीही दोनदा ते आपल्या पोटच्या पोराला दारुच्या गुत्त्यावर विसरले होते. मात्र, सुदैवानं त्यांना अकबर सापडला. तिसऱ्यांदा मात्र, अकबर पुन्हा त्यांच्याकडे परतलाच नाही. इकडे ऐकूलालनंही आसपासच्या मशिदींमध्ये अकबरच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्यांपैकी कोणाचा मुलगा हरवला आहे का, हे विचारून पाहिलं. पोलिसांप्रमाणेच त्यालाही यश आलं नाही. 

अकबर ऐकूलालकडे राहूनच मोठा होत होता. ऐकूलालनं घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी अकबरचा धर्म आणि नाव बदललं नाही. त्याचा धर्म मुस्लिमच ठेवला. अकबरला मुस्लिम पद्धतीनं शिक्षण मिळेल, याची व्यवस्था केली. त्याला कुराण शिकविलं जाईल, मुस्लिम धर्मानुसार चांगली तालीम मिळेल, मुस्लिम धर्मानुसार जे काही संस्कार असतील ते त्याच्यावर होतील, याची खबरदारी घेतली. तो नियमितपणे नमाज पढेल, याची काळजी घेतली. मात्र, अकबरला शाळेत घालण्याच्या वेळी अडचण आली. त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव यामध्ये विसंगती असल्यानं शाळेनं त्याला सुरुवातीला प्रवेश नाकारला. अशा मुलाला शाळेत इतर कोणीही स्वीकारणार नाही वगैरे वगैरे. पण अखेरीस सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर शाळेनंही अकबरला प्रवेश दिला. 

ऐकूलाल आणि अकबर यांच्यावर एका चॅनेलनं स्टोरी केली. ती स्टोरी अकबरच्या खऱ्या आई-वडिलांनी पाहिली आणि त्यांनी मग ऐकूलालकडे त्याचा ताबा मागण्यासाठी धाव घेतली. नंतर अकबरच्या ताब्यासाठी ते सेशन कोर्टात गेले. अकबरने ऐकूलाल हेच त्याचे वडिल आहेत आणि मला त्यांच्याकडेच रहायचे आहे, असं स्पष्टपणे सांगितल्यामुळं खऱ्या पालकांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण देव आणि दैव ऐकूलालच्या बाजूनं होतं. प्रथम सेशन कोर्टानं आणि नंतर हायकोर्टानंही ऐकूलालच्या बाजूनंच निकाल दिला. ऐकूलालची आर्थिक परिस्थिती आणि इतर गोष्टी लक्षात घेतल्या तर ही केस लढणं देखील त्यांना मुश्किल होतं. पण संकटाच्या समयी अनेक हात मदतीला धावून येतात, तसे अनेक मदतीचे हात ऐकूलालच्या दिशेनं पुढे आले. वकिलांनी रुपयाही न घेता ही केस लढली. अनेकांनी अकबरच्या पालन पोषणासाठी आर्थिक मदत केली इइ.


ऐकूलालकडेच अकबरचा ताबा राहील, असा निकाल देताना कोर्टानं खूप छान मत व्यक्त केलंय. आपल्या देशाच्या कायद्यात किंवा घटनेमध्ये हिंदू पिता मुस्लिम पाल्याचा (म्हणजेच एका धर्माचा पालक आणि दुसऱ्या धर्माचा पाल्य) सांभाळ करू शकत नाही, असे लिहिलेले नाही. शिवाय भारतासारख्या धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणाऱ्या देशामध्ये अशा घटनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला पाहिजे. आंतरधर्मीय विवाह आपण सहजपणे स्वीकारतो, तशाच पद्धतीनं अशा घटनांकडे पाहिलं पाहिजे नि स्वीकारलं पाहिजे, असं सांगत हायकोर्टानं निकाल ऐकूलालच्या बाजूनं दिला. सध्या सुप्रीम कोर्टात ही केस सुरू आहे. 

अकबर सध्या दहावीत शिकत असून त्याचं वय चौदा वर्षे आहे. आजही त्याला ऐकूलालकडेच राहण्याची इच्छा आहे. त्याचे आई-वडील पोराच्या ओढीनं काही महिन्यांनी भेटायला येतात. ऐकूलालच्याच घरी राहतात. ऐकूलालची गरिबी आणि खऱ्या आई-वडिलांची श्रीमंती अशी परिस्थिती असूनही अकबरला ऐकूलाल यांच्याकडेच रहायचे आहे. त्यांच्याकडेच तो वडिल म्हणून पाहतो आहे. त्याला मूळ आई-वडिलांकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही.  
या संपूर्ण खटल्यामध्ये एक साक्ष महत्त्वाची ठरली, ती म्हणजे ऐकूलालच्या भावाची. ऐकूलाल या माणसाचं आयुष्य चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेलं. चौधरी मूर्तझा हुसेन यांना अडीच-तीन वर्षांचा एक मुलगा घराजवळ सापडला. एक तारखेला सापडला म्हणून नाव ठेवलं ऐकूलाल. मूर्तझा हुसेन यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. त्यांनी त्याला हिंदूच ठेवले. इतकंच नाही, तर स्वतःच्या घरीही त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक होईल, अशी व्यवस्था केली. मूर्तझा हुसेन आणि त्यांच्या पत्नीचे यावरून अनेकदा खटके उडायचे. मात्र, हुसेन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मूर्तझा यांनी त्याचा सांभाळ केल्यामुळं ऐकूलालचं आयुष्यच बदलून गेलं. 


अखेरच्या दिवसांमध्ये हुसेन यांनी दोन्ही मुलांमध्ये संपत्तीची समान वाटणी करण्याचे ठरविले. हुसेन यांनी ऐकूलालचा सांभाळ कर्तव्य म्हणूनच केला होता. मात्र, आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ऐकूलाल यांना होती. त्यामुळं ऐकूलालनं त्यांची चहाची गाडी चालविण्याची परवानगी द्या, इतकीच मागणी केली आणि बाकीच्या संपत्तीवर दावा केला नाही. नंतर वडील गेले, आईही गेली नि ऐकूलालचा भाऊ परदेशात नोकरी करण्यासाठी निघून गेला. तो लखनऊत आला होता. त्यानं सांगितलेल्या या घटनेमुळं खटल्याला वेगळीच दिशा मिळाली आणि अकबरचा ताबा ऐकूलाल यांच्याकडेच राहिला.

अशा ऐकूलाल आणि अकबरची भेट घेण्याची खूप इच्छा होती. त्यामुळंच इतका सव्यापसव्य करून शोधून काढलं. अगदी छोटंसं घर. त्यामध्ये एका बाजूला चहाचा स्टोव्ह पेटलेला. तिथंच दोन खुर्च्या टाकून एकावर ऐकूलाल बसलेले. खोलीच्या दुसऱ्या बाजूला पलंग, बाजूला पाण्याचं पिंप आणि आतल्या बाजूला थोडीशी मोकळी जागा. हाच ऐकूलाल यांचा संसार. ‘मागेल त्या प्रत्येकाला मी चहा पाजतो. त्यापैकी काही जणांकडे पैसे नसतात. तरीही त्यांना चहा देतो. त्यापैकी अनेक जण सायकल रिक्षावाले किंवा कष्टकरी असतात. अनेक जण मग नंतर जमतील तसे पैसे आणून देतात,’ असं ते सांगत होते. थोडक्यात काय तर देत जायचं हा त्यांचा स्वभाव आहे. अकबरचं पालनपोषण ते कसं करीत असतील, हा प्रश्नच आपल्याला पडतो. मात्र, आजपर्यंत मला कधीही पैसा कमी पडला नाही. जेव्हा गरज पडली, तेव्हा पैसे आणि माणसं कायमच माझ्या बाजूनं उभी राहिली, असं ऐकूलाल सांगतात.
सहज गप्पांमध्ये नरेंद्र मोदी यांचा विषय निघाला. मोदींनी कधी काळी चहा विकलेला आणि ऐकूलाल आयुष्यभर चहा विकत आहेत. हिंदू आणि मुस्लिम या दोन शब्दांमुळेच दोघेही चर्चेत आलेले. एक लोकप्रियतेच्या झोतात, तर दुसरा वादाच्या भोवऱ्यात. त्यामुळं ऐकूलाल यांना मोदी यांच्याबद्दल काय वाटतं, ते जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. 


देशात परिवर्तनाची हवा तर जाणवतेच आहे. एक चहावाला जर देशाचा पंतप्रधान झाला, तर मलाही अभिमान वाटेल. कोणाचे नशीब कधीही पालटू शकते, असे म्हणतात. मोदी यांच्याबद्दल अनेत वाद-प्रवाद आहेत. मला त्यात जायचे नाही. मात्र, मी माझ्या अकबरच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले, तसे उदार धोरण त्यांनी सरकार चालविताना स्वीकारले तर मग देशभरअमन आणि शांतीचा माहौल निर्माण होईल,’ अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. खूपच मोजकं पण महत्त्वाचं बोलले ऐकूलाल.

सुरुवातीला खूप त्रास झाला. अनेकांनी मला अकबरचा सांभाळ करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. अनाथालयात दाखल करा वगैरे सांगितलं. पण मी ते मानलं नाही. मला जे मिळाले ते परत देण्याची संधी ईश्वरानं मला दिली होती. ती संधी मला गमवायची नव्हती. मानवतेच्या दृष्टिकोनातून मी अकबरला सांभाळतो आहे. माझ्या वडिलांनी जसे मला वाढविले, तोच आदर्श माझ्यासमोर आहे. एक प्रकारे मला माझ्यावरील उपकारांची परतफेड करण्याची संधी ईश्वराने दिली. त्याबद्दल मी ईश्वराचा खूप ऋणी आहे,’ असं ऐकूलाल म्हणतात.


पत्रकारांनी आणि टीव्हीवाल्यांनी मला खूप प्रसिद्धी दिली, असं म्हणून जुन्या बातम्यांची कात्रण वगैरे उत्साहानं दाखवत होते. कोर्टाच्या निकालाची प्रतही दाखविली. गप्पांच्या ओघात आणखी दोन कप चहा झाला. मग मात्र, मला पुढच्या कार्यक्रमासाठी निघणं भाग होतं. त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात आलात, तर आवर्जून पुण्याला या, असं निमंत्रण दिलं. माझी लखनऊभेट सार्थकी लागल्याचा आनंद घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

Saturday, May 17, 2014

अंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…

अरे, अर्धी चड्डीवाले आले की!

१६ मे २०१४… भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा दिवस. भारतीय जनता पक्ष या दिवशी स्वबळावर सत्तेवर आला. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे पहिल्या निवडणुकीत तीन, तर १९८० साली स्थापन झालेल्या भाजपचे १९८४ मध्ये अवघे दोन खासदार संसदेत पोहोचले होते. त्याच भाजपने १६ मे रोजी स्वबळावर दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न साकार केले आहे.



भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल ३३७ जागा मिळाल्या. पैकी भाजपच्या एकट्याच्या जागा आहेत २८३. भगवा रंग अंगावर घेण्यास लाज वाटत नाही, अशा भाजप, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचे जवळपास तीनशेहून अधिक खासदार लोकसभेत पोहोचले. अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना नरेंद्र मोदींना रोखता आले नाही. अखेरीस भाजपचे सरकार सत्तेवर आलेच. आश्चर्य म्हणजे आयुष्यभर अर्धी चड्डी अभिमानाने घालणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार यांच्यासारख्या निष्ठेतील न देखील माहिती नसलेल्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी शेवटी मोदी दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपच्याही किमान निम्म्याहून अधिक खासदारांना ‘अर्धी चड्डी’ घालण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. त्यामुळे भारतीय जनतेने मोठ्या निर्धास्तपणे ‘अर्ध्या चड्डी’च्या हाती देश सोपविला आहे.

आयुष्यभर ज्यांनी विचार सर्वतोपरी मानले, संघटनेचा आदेश शिरसावंद्य मानला, असे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ही गोष्ट भाजपसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे. भाजपचा हा विजय नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामुळे साकारला आहे, यात वादच नाही. तरीही मला वाटतं, हा विजय भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, स्थापनेपासून आतापर्यंत भाजप आणि संघपरिवारासाठी रक्ताचे पाणी केलेल्या नेत्यांचा-अधिकाऱ्यांचा आणि सामान्य भारतीय जनतेचा आहे.

जनसंघाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना किती आनंद झाला असता आजचा हा सुवर्णदिन पाहून. ‘एक देश में दोन विधान, दोन निशान, दो प्रधान… नही चलेंगे नही चलेंगे…’ असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन करताना तुरुंगात गेलेल्या श्यामाप्रसाद यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. दीनदयाळ यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडला. दोन्ही मृत्यू नैसर्गिक नव्हतेच कदाचित. ती राजकीय हत्याच असावी. त्या दोन्ही नेत्यांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल. 

या आधी भाजपचे सरकार आले नव्हते का? तर आले होते. तब्बल तीनवेळा आले होते. पण त्यावेळी सरकार स्वबळावर नव्हते. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी तीनवेळा भारताचे पंतप्रधान बनले. मात्र, प्रत्येक वेळी सहकारी पक्षांच्या कुबड्या घेऊन. त्याच सहकारी पक्षांनी वेळोवेळी त्यांना बेजार केले. हैराण केले. मात्र, यंदा नरेंद्र मोदी यांनी भाजपला स्वबळावर सत्तेत आणले आहे. त्यामुळेच मुखर्जी-उपाध्याय यांना १६ मेच्या दिवशी मुक्ती मिळाली असेल, असे मानायला हरकत नाही. अर्थात, फक्त मुखर्जी-उपाध्यायच नाही. तर भाजपचे असे कितीतरी नेते होते ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आणि सत्तेचा घास हाता-तोंडाशी आला असताना त्यांचे वय झाले होते. 
के. आर. मलकानी, सुंदरसिंह भंडारी, कृष्णलाल शर्मा, भाई महावीर, मध्य प्रदेशात कुशाभाऊ ठाकरे, महाराष्ट्रात वसंतराव भागवत आणि उत्तमराव पाटील, तमिळनाडूत जना कृष्णमूर्ती, केरळमध्ये ओ. राजगोपाल अशी प्रत्येक राज्यातील भाजप नेत्यांची असंख्य नावे काढता येतील. अर्थातच, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या तिघांच्या उल्लेखाशिवाय भाजपचा इतिहास केवळ अपूर्ण आहे. मात्र, त्यांना त्यांच्या कष्टांचे फळ पुरेसे मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. उत्तर प्रदेशात फिरताना एक उत्तम घोषणा ऐकायला मिळाली, ‘भाजपा की तीन धरोहर… अटल, अडवाणी और मनोहर’. किती योग्य आहे ही घोषणा. संघटनेने आदेश दिला म्हणून पक्षाचे काम करायला लागले आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय निरलस भावनेने काम करीत राहिले. त्या सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती १६ मे रोजी झाली, असे म्हणायला हरकत नाही. 

पण सरकार सत्तेवर आले तरीही अजूनही काही ठिकाणी भाजप शून्यच आहे. तिथे आजही भाजप रुजविण्याचे कार्य सुरूच आहे. अनेक ठिकाणी दगडावर डोके आपटून घेण्यासारखीच परिस्थिती आहे. तरीही कार्यकर्ते तिथं जीव तोडून मेहनत घेत आहेत. हेच पाहा ना. केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ओ. राजगोपाल एकाकी झुंजत आहेत. मुस्लिम-ख्रिश्चन यांची प्रचंड लोकसंख्या आणि काँग्रेस तसेच डाव्या आघाडीमध्ये होणारी हिंदू मतांची विभागणी यामुळे तिथे भाजपला यश मिळणे केवळ अशक्य आहे. तरीही ते लढत आहेत. यंदा तर त्यांचा विजय अवघ्या बारा हजार मतांनी हुकला. जी गोष्ट केरळची तीच तमिळनाडूची. तिथे हिंदू मुन्नानीचे पाँडी राधाकृष्ण अथक मेहनत घेऊन लढत आहेत.

अर्थात, फक्त भाजपचेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कितीतरी नेते संघ स्थापनेपासून देशभर प्रचारासाठी गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या एका शब्दासाठी दत्तोपंत ठेंगडी उठून केरळमध्ये गेले आणि आज तिथं संघाचे सर्वाधिक काम आहे. गायकीचा अभ्यास सोडून यादवराव जोशी यांनी कर्नाटकात आज बिनतोड काम निर्माण केले आहे. भाऊराव देवरस उत्तर प्रदेशात गेले नि तीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. शिवरामपंत जोगळेकर तमिळनाडूत गेले आणि तिथे संघाचे काम शिखरावर नेले. बाळासाहेब देशपांडे यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी आयुष्य अर्पण केले. उच्चविद्याविभूषित असलेल्या अशोक सिंघल यांनी त्यांचे सारे आयुष्य विश्व हिंदू परिषदेच्या संवर्धनात खर्ची घातले. ही काही पटकन डोळ्यासमोर येणारी नावे असली तरीही अशी असंख्य अगणित नावे. 

अर्थात, भाजपला सत्तेवर आणणे हे काही संघाचे काम नाही. संघ त्यासाठी काम करीतही नाही. मात्र, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, असे लक्षात आल्यानंतर परिवार पूर्णपणे झोकून रणांगणात उतरतो. त्याचाच प्रत्यय आज आला. भाजपप्रमाणेच संघ आणि परिवारातील अशा अनेक असंख्य पदाधिकाऱ्यांच्या कष्टांचे काही प्रमाणात चीज झाले, असे म्हणायला हरकत नाही. 

जनसंघाच्या स्थापनेनंतर किंवा भाजपच्या निर्मितीनंतर अनेकांना माहिती होते, की आपल्याला पडण्यासाठीच उभे रहायचे आहे. भाजपच्या पक्क्या मतदारांनाही माहिती होते, की आपला उमेदवार काही जिंकत नाही. तरीही त्यांनी पडणाऱ्या उमेदवारावर निष्ठेने वर्षानुवर्षे शिक्के मारले. डावीकडे नाव न पाहता उजवीकडे शिक्के मारत राहिले. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि मतदार पक्षाशी एकनिष्ठ राहिले, अशा कोट्यवधी लोकांच्या जीवावरच भाजपला आजचे हे सुगीचे दिवस पहायला मिळाले आहेत.  

आणखी एक गोष्ट म्हणजे सामान्य मतदाराला याचे श्रेय देण्यापासून कोण रोखू शकेल. सामान्य मतदार सर्वाधिक हुशार आणि चतुर आहे. अनेकदा राजकारणी त्याला गृहित धरतात. मात्र, तो आपली ताकद निवडणुकीमध्ये दाखवूनच देतो. भाजपच्या अनेक उमेदवारांचे लाखांच्या फरकाने झालेले विजय हे त्याचेच द्योतक आहे. इतक्या फरकाने उमेदवार जिंकतील, हे खुद्द उमेदवारांनाही आणि राजकीय विश्लेषकांनाही वाटत नव्हते. मात्र, तसे झाले आहे. ते केवळ आणि केवळ मतदारराजाच्या इच्छेमुळे. सत्ताधारी नको आणि मोदीच हवा, या एका आणि एकाच इच्छेमुळे प्रचंड बहुमतांनी त्यांनी भाजपला विजयी केले आहे. 

सर्वात शेवटी म्हणजे भाजपचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता. कोणत्याही हेतूशिवाय तो काम करीत राहिला. ना त्याला दिवसाच्या पाचशे रुपयांच्या आमिषाची हाव होती, ना बिर्याणी-दारूची. ज्याने आयुष्यभर पोस्टर्स चिटकविली, भिंती रंगविल्या, आयुष्यभर स्लिपा वाटल्या नि गमतीने म्हणतात तसं सतरंज्या घातल्या, त्या सामान्य कार्यकर्त्यामुळंच भाजपला आज हे दिवस आले आहेत. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता अशी कामं करायचा. हाच कार्यकर्ता आता फेसबुक, ट्वीटर नि सोशल मीडियावर भाजपचा प्रचार करतो. स्वतःची पदरमोड करून लष्कराच्या भाकऱ्या भाजतो. त्याला पक्षाकडून काहीही अपेक्षा नसते. भाजपच्या ह्याच सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यामुळे नरेंद्र मोदी सत्तेचा सोपान स्वबळावर चढले आहेत. 

मुख्य म्हणजे नरेंद्र मोदीही ही गोष्ट आनंदानं मान्य करतील. पराभव झाला तर सामूहिक जबाबदारी आणि विजयी झालो तर फक्त माझ्यामुळे ही काँग्रेसी परंपरा भाजपमध्ये नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांचे श्रेय मोदीही मान्य करतीलच.
तेव्हा नरेंद्र मोदी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...