Showing posts with label Bhel. Show all posts
Showing posts with label Bhel. Show all posts

Sunday, February 17, 2008

पत्र्या मारुतीजवळ मिळेल...

पॅटिस आणि वाटाण्याचा अस्सल रगडा

"रगडा पॅटिस'. हा पदार्थ मला पाणीपुरी इतकाच आणि भेळपेक्षा जास्त आवडतो. अगदी लहानपणी सारसबागेत असलेल्या विविध भेळेच्या स्टॉलवर गेल्यानंतर भेळ की रगडा पॅटिस असा प्रश्‍न विचारल्यानंतर माझं हमखास उत्तर असायचं रगडा पॅटिस!
थोडक्‍यात काय मला रगडा पॅटिस अगदी मनापासून आवडते. त्यामुळे पुण्यात विविध ठिकाणी कोठे काय चांगले मिळते, याचा शोध घेत असताना मला रगडा पॅटिस मिळण्याचे एक अप्रतिम ठिकाण सापडले. पत्र्या मारुतीजवळ उभ्या असलेल्या एका भेळेच्या गाडीवर भेळेपेक्षाही रगडा पॅटिसच अधिक चविष्ट असते.
गेल्या अनेक वर्षांपासून अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर दहा वर्षांपासून आम्ही पत्र्या मारुतीजवळ असलेल्या त्या भेळेच्या गाडीवर नित्यनियमाने भेट देत आहोत. रमणबागेच्या चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जायला लागलो की, पहिल्याच चौकात (पत्र्या मारुतीच्या) तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्यात सुरवातील भेळेच्या दोन गाड्या, नंतर कच्छी दाबेलीची एक गाडी आणि सर्वात शेवटी नीरा व सरबतांचा एक स्टॉल आहे.
भेळेची पहिली गाडी सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तिकडे फक्त भेळच चांगली मिळते. पण दुसरी गाडी मात्र, एकदम अष्टपैलू आहे. भेळ, रगडा पॅटिस, रगडा पुरी, एसबीडीपी आणि अगदी पाणीपुरीही लय भारी!साधारण साठीच्या आसपास असलेले वडील आणि त्यांची दोन अफलातून मुलं गाडीवर असतात. पण वैशिष्ट्य असं की, गाडीवर कोणीही असलं तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. इतर गाड्यांवर मिळतात ते सर्व पदार्थ मिळत असले तरी तुम्ही आवर्जून रगडा पॅटिस टेस्ट करा. आम्ही इतके वर्ष "टेस्ट' करतो आहोत म्हणूनच सांगतोय.
अनेक ठिकाणी रगडा पॅटिसमध्ये जो बटाटा किंवा वाटाणे असतात ते पूर्णपणे शिजलेले नसतात. त्यामुळे ते चावताना त्रास होतो. तसेच गोड नाही पण तिखट पाण्याची चवही रगडा पॅटिसमध्ये महत्वाची असते. रगड्याची ही भट्टी या गाडीवर अगदी जबरदस्तपणे जमलेली आहे. रगडा आणि पॅटिस हे पूर्णतः शिजलेले असल्यामुळे दोन्ही वाटाणे आणि पॅटिस एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि रगडा एकदम "झकास' होतो. त्यात गोड आणि तिखट पाणी, तिखट, मीठ, मसाला व चाट मसाला यांचे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे पदार्थाला येणारी चव अगदी अप्रतिम असते.
एकदा का रगड्याने भरलेली ही डिश तुमच्या पुढे आली की, ती व्यवस्थितपणे कालवून घ्या आणि एक-दोन चमचे "टेस्ट' करा. मग तुम्हाला कळेल खरे रगडा पॅटिस कशाला म्हणतात. दोन-तीन चमचे खाल्ल्यानंतर पुन्हा थांबा. थोडे तिखट आणि गोड पाणी त्यात मिसळा. पुन्हा रगडा व्यवस्थित कालवा. चव आणखी सुधारली आहे, असे तुम्हाला जाणवले. एका प्लेटमध्ये इतके रगडा पॅटिस येते की, तुम्ही कितीही खादाड असाल तरी तुमची भूक नक्कीच भागते. इतर ठिकाणी हे समाधान क्वचितच मिळते.
रगडा पॅटिसननंतर पाणीपुरीची एक प्लेट जरुर घ्या. एकट्याला एक जाणार असेल तर उत्तमच. पण नसेल तर दोघा-तिघांमध्ये एक तरी अवश्‍य घ्या. पाणीपुरी झाल्यानंतर गाडीवर असलेला माणूस तुम्हाला तिखट-गोड पाणी हवे का, असे विचारेल. नेहमी घेत नसाल तरी येथे जरुर पाणी प्या. सरते शेवटी इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही मसाला पुरी मागायला विसरु नका. हे सर्व झाल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त नाही झाला तरच नवल.

Wednesday, August 01, 2007

दम बिर्याणी, मूँग डोसा आणि चाट


काही कारणानं हैद्राबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला. अडीच वर्षांपूर्वी अत्यंत जड अंतःकरणानं हैद्राबादला निरोप दिला होता. त्यामुळं हैद्राबादला गेल्यानंतर शक्‍य तितक्‍या ठिकाणांना पुन्हा भेट देण्याचं निश्‍चित केलं होते. खाण्याची ठिकाणं त्यात अग्रस्थानी होती हे सांगायला नकोच...

हैद्राबादचं खास आकर्षण म्हणजे बिर्याणी. त्यातही जुन्या हैद्राबादमध्ये मदिना, पिस्ता किंवा शादाब तसंच सिकंदराबादमध्ये "डायमंड' ही बिर्याणीची अगदी मोजकीच पण तितकीच चविष्ट ठिकाणं. त्यातही मला अधिक आवडते ती चारमिनारपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शादाबची बिर्याणी. जुन्या जमान्यातील इराणी कॅफे असतात तसं दुमजली हॉटेल. इतर चकमकीत हॉटेलपेक्षा थोडसं कळकटलेलंच! खालच्या मजल्यावर एकटी-दुकटी मंडळी चहा-बिस्कुट खात किंवा तंगड्या तोडत बसलेली असतात. तर तुलनेने प्रतिष्ठित आणि कुटुंब कबिला बरोबर असलेली मंडळी दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढतात.

इतर ठिकाणी मिळणाऱ्या बिर्याणीच्या तुलनेत इथं मिळणारी बिर्याणी काही औरच. चिकन, मटण किंवा अंडा कुठलीही बिर्याणी असो त्याचा स्वाद भातामध्ये इतक्‍या नैसर्गिकरित्या मिसळलेला असतो की काही विचारु नका. शिवाय ज्या मसाल्यामध्ये हे "पिसेस' घोळवलेले असतात तो मसालाच बिर्याणीची जान आहे. (अर्थात, मी हे सांगण्याची गरज नाही) त्यातच सारे पैसे वसूल. सोबत मिळालेली "करी' किंवा दह्यातून आलेले सॅलेड देखील भातात मिसळू नये, असं वाटण्याइतपत बिर्याणी "द ग्रेट' असते. (करी आणि सॅलेड फुकट मिळत असूनही खावंसं वाटत नाही)

बिर्याणी घ्यावी आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून हात चालविण्यास सुरवात करावी, हा आमचा नेहमीचा रिवाज. यंदाही अगदी तसंच. सकाळपासून विशेष खाणं झालं नसल्यामुळं एक चिकन बिर्याणी आणि एक मटण बिर्याणी आम्ही दोघांनी अगदी सहजपणे चापली. त्यानंतर हाफ-हाफ लस्सीचाही कार्यक्रम झाला. त्यानंतर "कुर्बानी का मिठा' नामक पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होती. पण शक्‍यच नव्हतं. "कुर्बानी का मिठा' हा पदार्थ खास "बकरी ईद'च्या दिवशी बनविला जातो, असं सांगण्यात येतं. माझ्या माहितीनुसार खजूर (कौमुदी काशीकरच्या मते ओले अक्रोड) दोन-तीन दिवस गुलाबाच्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर त्यात साखरेचा पाक, सुकामेवा, क्रिम आणि इतर अनेक पदार्थ मिसळून "चेरी'सह हा "कुर्बानी का मिठा' एका कुंडा सदृश भांड्यातून तो "सर्व्ह' केला जातो. पण आम्हाला बिर्याणीसाठई "कुर्बानी का मिठा'ची कुर्बानी द्यावी लागली. मग नेहमीप्रमाणे "मिनाक्षी पान' खाण्याचा कार्यक्रम पार पडला.

मूग डोसा द बेस्ट!
हैद्राबादचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोसा, इडली, उत्तप्पा, उप्पीट, उप्पीट-डोसा आणि मूग डोसा... पुण्या-मुंबईत वडापावच्या गाड्या जितक्‍या बक्कळ तितक्‍याच इडली-डोसाच्या गाड्या हैद्राबादेत भरपूर. हॉटेलांमध्येही हे पदार्थ इथल्या तुलनेत स्वस्त असतात. आठ रुपयांमध्ये इडली-चटणी-सांबार अगदी नको नको म्हणेपर्यंत. शिवाय "एक्‍स्ट्रा'चे पैसे नाहीत. इडलीचा आकार "वाडेश्‍वर'च्याही तोंडात मारेल असा.

या सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांच्या भाऊ गर्दीत आपल्या येथे न मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे "मूँग डोसा'. उडीद डाळ आणि मूग डाळ भिजत घालून त्याचे पिठ करायचे आणि त्या पिठापासून डोसा करायचा. त्याला खोबऱ्याची पांढरी आणि लाल तिखट चटणी फासायची. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी टाकायची किंवा मग गरमागरम उप्पीट घालायचे. काही अण्णा मंडळी उप्पीट किंवा बटाट्याची भाजी त्यावर फासतात आणि कट डोसाप्रमाणे खातात. पण इतका काला करण्याचे आपले धाडस होत नाही.


गंमत चाटची
पाणीपुरी आणि चाट हे पदार्थही इथं हातगाडीपासून ते दुकानांपर्यंत सर्वत्र मिळतात. भेळ हा पदार्थ मात्र, मोजक्‍याच काही ठिकाणी मिळतो. त्यातही इथल्या भेळची आणि पाणीपुरीची चव अगदीच वेगळी आणि तितकीशी चांगली देखील नाही. मुंबईत जसे भय्या लोक भेळमध्ये उकडलेला बटाटा घालतात. त्याचप्रमाणे हैद्राबादेत भेळमध्ये काकडी घालण्याची पद्धत आहे. भेळही फार कमी ठिकाणी मिळते. आम्ही रहायचो तेथे (दिलसुखनगर) मराठवाडा येथून आलेले एक मामा आहेत. त्यांच्या दुकानात महाराष्ट्रात मिळते तशी भेळ आणि पाणीपुरी मिळते. इतरत्र सारेच अवघड. पाणीपुरी करताना चिंच-गुळाचे पाणी वापरले जात नाही. उकडलेल्या वाटाण्याचे सारण आणि सोबतीला फक्त पुदीन्याचे तिखट पाणी यावरच तुमची हौस भागवावी लागते. हैद्राबादमध्ये चिंच-गुळाच्या पाण्याची बात नस्से. त्यामुळे पाणीपुरी म्हणावी तितकी चविष्ट होत नाही.

हैद्राबादेत कोटी येथे गोकुळ नावाचे चाट सेंटर आहे. एका उत्तर भारतीय व्यक्तीकडून गोकुळ नावाचे तब्बल चार मजली दुकान आहे. सदैव भरगच्च असलेले हे दुकान चवीच्या बाबतीत अगदीच अप्रतिम आहे. मग छोले-भटुरे असो, भेळ पुरी असो किंवा रगडा पॅटिस असो... कचोरी असो किंवा दही वडा सारं कसं झक्कास. त्यामुळे कधी हैद्राबादला गेलात तर "गोकुळ'ला भेट द्यायला विसरु नका.

तिथं काही मोजक्‍या ठिकाणी चहा करण्याची पद्धतही न्यारीच आहे. कोरा चहा आणि कोरी कॉफी दोन निरनिराळ्या भांड्यांमध्ये उकळत असते. तर तिसऱ्या पातेल्यात गरम दूध ठेवलेले असते. तुम्हाला फिका चहा-कॉफी हवी किंवा कडक कॉफी-चहा पाहिजे, हे लक्षात घेऊन तो हॉटेलवाला तुम्हाला हवा तसा चहा तुमच्यासमोर पेश करतो. काहीसा कडवट आणि कडक असा हा चहा चांगलाच लक्षात राहतो. वडापाव आणि कच्छी दाबेली हे पुण्या-मुंबईत जागोजागी मिळणारे पदार्थ इथं मात्र, नजरेसही पडत नाहीत. अगदी सिकंदराबाद किंवा अमीरपेट सारख्या हैद्राबादी संस्कृतीपासून थोडंसं वेगळ्या असलेल्या ठिकाणी गेलं की तिथं हे पदार्थ चाखायला मिळतात. पण तेथेही शोधल्यानंतरच या पदार्थांचा शोध लागतो.

मग कधी जाताय हैद्राबादला?????