Showing posts with label Panipuri. Show all posts
Showing posts with label Panipuri. Show all posts

Sunday, February 17, 2008

पत्र्या मारुतीजवळ मिळेल...

पॅटिस आणि वाटाण्याचा अस्सल रगडा

"रगडा पॅटिस'. हा पदार्थ मला पाणीपुरी इतकाच आणि भेळपेक्षा जास्त आवडतो. अगदी लहानपणी सारसबागेत असलेल्या विविध भेळेच्या स्टॉलवर गेल्यानंतर भेळ की रगडा पॅटिस असा प्रश्‍न विचारल्यानंतर माझं हमखास उत्तर असायचं रगडा पॅटिस!
थोडक्‍यात काय मला रगडा पॅटिस अगदी मनापासून आवडते. त्यामुळे पुण्यात विविध ठिकाणी कोठे काय चांगले मिळते, याचा शोध घेत असताना मला रगडा पॅटिस मिळण्याचे एक अप्रतिम ठिकाण सापडले. पत्र्या मारुतीजवळ उभ्या असलेल्या एका भेळेच्या गाडीवर भेळेपेक्षाही रगडा पॅटिसच अधिक चविष्ट असते.
गेल्या अनेक वर्षांपासून अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर दहा वर्षांपासून आम्ही पत्र्या मारुतीजवळ असलेल्या त्या भेळेच्या गाडीवर नित्यनियमाने भेट देत आहोत. रमणबागेच्या चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जायला लागलो की, पहिल्याच चौकात (पत्र्या मारुतीच्या) तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्यात सुरवातील भेळेच्या दोन गाड्या, नंतर कच्छी दाबेलीची एक गाडी आणि सर्वात शेवटी नीरा व सरबतांचा एक स्टॉल आहे.
भेळेची पहिली गाडी सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तिकडे फक्त भेळच चांगली मिळते. पण दुसरी गाडी मात्र, एकदम अष्टपैलू आहे. भेळ, रगडा पॅटिस, रगडा पुरी, एसबीडीपी आणि अगदी पाणीपुरीही लय भारी!साधारण साठीच्या आसपास असलेले वडील आणि त्यांची दोन अफलातून मुलं गाडीवर असतात. पण वैशिष्ट्य असं की, गाडीवर कोणीही असलं तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. इतर गाड्यांवर मिळतात ते सर्व पदार्थ मिळत असले तरी तुम्ही आवर्जून रगडा पॅटिस टेस्ट करा. आम्ही इतके वर्ष "टेस्ट' करतो आहोत म्हणूनच सांगतोय.
अनेक ठिकाणी रगडा पॅटिसमध्ये जो बटाटा किंवा वाटाणे असतात ते पूर्णपणे शिजलेले नसतात. त्यामुळे ते चावताना त्रास होतो. तसेच गोड नाही पण तिखट पाण्याची चवही रगडा पॅटिसमध्ये महत्वाची असते. रगड्याची ही भट्टी या गाडीवर अगदी जबरदस्तपणे जमलेली आहे. रगडा आणि पॅटिस हे पूर्णतः शिजलेले असल्यामुळे दोन्ही वाटाणे आणि पॅटिस एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि रगडा एकदम "झकास' होतो. त्यात गोड आणि तिखट पाणी, तिखट, मीठ, मसाला व चाट मसाला यांचे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे पदार्थाला येणारी चव अगदी अप्रतिम असते.
एकदा का रगड्याने भरलेली ही डिश तुमच्या पुढे आली की, ती व्यवस्थितपणे कालवून घ्या आणि एक-दोन चमचे "टेस्ट' करा. मग तुम्हाला कळेल खरे रगडा पॅटिस कशाला म्हणतात. दोन-तीन चमचे खाल्ल्यानंतर पुन्हा थांबा. थोडे तिखट आणि गोड पाणी त्यात मिसळा. पुन्हा रगडा व्यवस्थित कालवा. चव आणखी सुधारली आहे, असे तुम्हाला जाणवले. एका प्लेटमध्ये इतके रगडा पॅटिस येते की, तुम्ही कितीही खादाड असाल तरी तुमची भूक नक्कीच भागते. इतर ठिकाणी हे समाधान क्वचितच मिळते.
रगडा पॅटिसननंतर पाणीपुरीची एक प्लेट जरुर घ्या. एकट्याला एक जाणार असेल तर उत्तमच. पण नसेल तर दोघा-तिघांमध्ये एक तरी अवश्‍य घ्या. पाणीपुरी झाल्यानंतर गाडीवर असलेला माणूस तुम्हाला तिखट-गोड पाणी हवे का, असे विचारेल. नेहमी घेत नसाल तरी येथे जरुर पाणी प्या. सरते शेवटी इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही मसाला पुरी मागायला विसरु नका. हे सर्व झाल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त नाही झाला तरच नवल.

Sunday, February 03, 2008

शनिवारवाड्याजवळ "दिल्ली चाट'


पाणीपुरी प्रेमींसाठी नवा "स्पॉट'

भेळेच्या गाडीवर गेल्यानंतर तुम्ही रगडा पॅटिस, रगडा पुरी, भेळ किंवा एसबीडीपी (शेव बटाटा दहीपुरी) यापैकी काहीही खा पण सर्वात शेवटी एक प्लेट पाणीपुरी होणारच. पाणीपुरी हा पदार्थ आवडत नाही, अशी व्यक्ती अगदी विरळ. माझ्या ओळखीत आहेत एक-दोन जण असे पण बहुतेक सर्वांनाच पाणीपुरी आवडते.
तुम्ही जर पाणीपुरीचे अगदी "डाय हार्ड' फॅन असाल तर शनिवार वाड्याजवळ उभ्या असणाऱ्या भेळ-पाणीपुरीच्या अनेक गाड्यांपैकी "दिल्ली चाट' अशी पाटी असलेल्या गाडीवर जाऊन पाणीपुरी खाच. तुम्ही जर अस्सल चाहते असाल तर फक्त एक प्लेट खाऊन तुम्ही स्वस्थ बसूच शकणार नाही. दुसरी प्लेटही पाहता पाहता संपून जाईल.
बालगंधर्व पुलावरील गाडी, पत्र्या मारुतीजवळील गाड्यांपैकी लक्ष्मी रस्त्याकडील गाडी, पेशवाईच्या चौकातील गाडी, एसएनडीटीजवळ किंवा बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर असलेली "कल्याण भेळ', सारसबागेतील भेळ व चाटची तमाम दुकाने, डेक्कन- संभाजी बाग परिसरातील तमाम गाड्या व इतर भागांमध्ये मिळणाऱ्या पाणीपुरीच्या तुलनेत शनिवारवाड्याजवळ उभ्या असलेल्या या गाडीवरील पाणीपुरी नक्कीच वरचढ आहे, असा दावा मी छातीठोकपणे करु शकतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या ठिकाणची पाणीपुरी खाऊन हे शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. फक्त मीच नाही तर आमच्या ऑफिसमधील अनेकांनी हे मान्य केले आहे.
पाणीपुरीचा आत्मा असतो पुदीना चटणीचे पाणी. पाणीपुरीतील पुरी सर्व ठिकाणी सारखीच असते. शिजविलेले वाटाणेही सगळीकडेच असतात. पण "दिल्ली चाट'च्या पाणीपुरीत जे तिखट पाणी टाकतात, त्याला तोडच नाही. मिरचीचा ठेचा व पुदीना चटणी यांचे जे काही अफलातून मिश्रण असते ते प्रत्यक्ष चव चाखूनच पाहिले पाहिजे. पाणीपुरी तयार करणारा जो "चाचा' आहे तो स्वतः ते पाणी तयार करतो. त्यामुळे रोज पाण्याची चव सारखीच असते.
शिवाय तुम्हाला तिखट किंवा गोड पाणीपुरी जशी पाणीपुरी हवी असेल त्यानुसार अप्रतिम "कॉम्बिनेशन' तुम्हाला मिळते. चिंच-गुळाचे गोड पाणी व मिरची-पुदीनाचे तिखट पाणी यांची चव इतर ठिकाणपेक्षा येथे अगदी "हटके' आहे. त्यामुळेच एकदा येथे येऊन गेलेला खवय्या पुन्हा फिरकला नाही, असे होणारच नाही.

पाणीपुरीसाठी कोठेही जायची तुमची तयारी असेल तर मग एकदा शनिवारवाड्याजवळ येऊन जाच!

Saturday, August 18, 2007

भारताचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ कोणता?

पुरीभाजी, सामोसा की पाणीपुरी

भारताचा राष्ट्रध्वज ः तिरंगा, राष्ट्रगीत ः जन गण मन, राष्ट्रीय पक्षी ः मोर, राष्ट्रीय प्राणी ः वाघ, राष्ट्रीय खेळ ः हॉकी, राष्ट्रीय फूल ः कमळ आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थ ः ? नाही ना माहिती. खरं सांगायाचं झालं तर मलाही माहिती नाही आणि असा कुठलाच खाद्यपदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून निश्‍चित झालेला नाही. पण माझं मत विचाराल तर पुरीभाजी, पाणीपुरी किंवा सामोसा हे तीन पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यताप्राप्त होण्यास अडचण नाही.
महाराष्ट्रातील बाभळेश्‍वर (जि. नगर) येथील एका टपरीपासून ते भारताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुवाहाटीतील (आसाम) एका हातगाडीपर्यंत सर्वच ठिकाणी चहा आणि कॉफीप्रमाणे मिळणारा खाद्यपदार्थ म्हणजे पुरीभाजी आणि सामोसा!वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या विविध भागांमध्ये गेल्यानंतर अगदी सहजपणे आणि स्वस्तात उपलब्ध होणारे दोन पदार्थ अशी पुरीभाजी आणि सामोसा यांची ओळख करुन द्यावी लागेल.

भारताच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, चाट, भेळ आणि पाणीपुरी तसेच चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. पण तरीही त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरती किंवा विशिष्ट राज्यांपुरतीच आहे. भेळ हा आणखी एक पदार्थ या स्पर्धेत उतरु शकला असता. पण भारतातील सर्वच ठिकाणी भेळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हैद्राबादमध्ये सहजासहजी भेळ मिळत नाही. अगदी एखाद-दोन ठिकाणी मिळते. त्यामुळे भेळ हा पदार्थ यादीत घेऊ नये, असं मला वाटतं.

पुरीभाजी, पाणीपुरी व सामोसा या पदार्थांची ओळख एखाद्याच राज्यापुरती मर्यादित नाही. ते काही महाराष्ट्रीयन नाहीत, दाक्षिणात्य नाहीत वा पंजाबीही नाहीत. पण तरीही भारतभर हे पदार्थ अगदी सहजपणे मिळतात, म्हणूनच त्या पदार्थांना "राष्ट्रीय' म्हणावेसे वाटते. अभिजीत कांबळे नावाच्या माझ्या मित्राचं लग्न नगर जिल्ह्यातील बाभळेश्‍वर जवळच्या एका गावात होतं. त्या निमित्तानं बाभळेश्‍वरला मुक्कामाची संधी मिळाली. त्यावेळी सकाळी टपरीवर चहा पिण्याच्या हेतूनं गेलो. पाहतो तर काय चहावाला मस्त पुरीचा घाणा काढत होता. त्याला म्हटलं भाजी कोणती आहे. तेव्हा नवाच प्रकार पहायला मिळाला. कांदा-बटाट्याची परतून केलेली भाजी (डोसा) त्यानं डिशमध्ये घेतली आणि त्यावर झणझणीत तर्री असलेली मटकीची उसळ अक्षरशः ओतली. वेगळ्या डिशमध्ये पुरी देऊन माझ्यासमोर ठेवत म्हटलं "घ्या साहेब'.

नाही म्हटलं तरी पुण्या-मुंबईतल्या हॉटेलांमध्येही पुरीभाजी मिळतेच की. "पुरीभाजी'ची "ऑर्डर' दिली की पुरीसोबत येते बटाट्याची परतून केलेली भाजी आणि पातळ भाजी हवी असेल तर "ऑर्डर' द्या "कुर्मापुरी'ची. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि औरंगाबादपासून ते सोलापूरपर्यंत पुरीभाजी किंवा कुर्मापुरी मिळत नसलेलं हॉटेल शोधून सापडणं अवघड!

हैद्राबादमध्ये असताना तशी सगळीकडेच पुरीभाजी मिळायची. पण आमचा एक ठरलेला चाचा होता. त्याच्याकडे कांदा, बटाटा, टॉमेटो व इतर काही अगम्य भाज्या घालून "कुर्मा'सारखी भाजी केलेली असायची. थोडीशी आंबट चव (चिंचेमुळे) असलेली भाजी चवीला काही निराळीच! अगदी उडुपी दुकांनांमधून वा रस्त्यांवरील गाड्यांवरही पुरीभाजीची विक्री व्हायची. पाच रुपयांमध्ये चार पुऱ्या आणि "अनलिमिटेड' भाजी. तिकडं बटाट्याच्या परतून भाजीची बात नश्‍शे. एक-दोन दुकांनांमध्ये "डोसाभाजी'ची रस्साभाजी मिळायची. पण खरं सांगांयचं तर एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा ती रस्सा "डोसाभाजी' खायची इच्छाच झाली नाही.

मध्य आणि उत्तर भारतात भोपाळ, ग्वाल्हेर, झॉंशी, मथुरा, आग्रा आणि खुद्द दिल्लीतही अगदी सक्काळी सक्काळी भरपेट नाश्‍ता करण्याची पद्धत आहे. गरमा-गरम दूध, जिलेबी आणि पकोडे या नाश्‍त्याच्या सोबतीला स्टॉलवर किंवा हॉटेलांमध्ये मिळते ते पुरीभाजी! तिथली भाजीही रस्सा भाजीकडे झुकलेली आणि पुऱ्या आकाराला अंमळ मोठ्या व भटुऱ्याच्या जवळ जाणाऱ्या. चना-भटुरा हा देखील पुरीभाजीच्याच जवळ जाणारा आणखी एक खाद्यपदार्थ. गुजरातेतही सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि राजकोटवासियांनाही हा पदार्थ नवीन नाही. सुरतची पुरीभाजी तर अगदी सुप्रसिद्ध होती. आता इतरही पदार्थ आल्यानं तिची लोकप्रियता घटली असावी.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटीला जाणं झालं व पश्‍चिम बंगाल तसंच आसाममध्येही हा पदार्थ अगदी सहजपणे मिळत असल्याचं स्पष्ट झालं. हावडा स्टेशनसमोर असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलवर सकाळी पुऱ्यांचा घाणा निघत असतो. गुवाहाटीमध्ये सकाळी चहाबरोबर नाश्‍त्याला पुरीभाजी तसंच सामोसा हे दोन पदार्थ हमखासपणे मिळतात. इतकंच काय तर एका अण्णाच्या हॉटेलवरही पुरीभाजीचा "मेन्यू'मध्ये समावेश असल्याचं दिसतं. चव मात्र, अगदी आपल्या महाराष्ट्रात मिळते तशीच!
तमिळनाडू आणि केरळमध्ये जाणं झालं नाही, पण आमचा दाक्षिणात्य मित्र देविदास देशपांडे यानं सांगतिलेल्या माहितीनुसार केरळ आणि तमिळनाडूतही पुरीभाजी अगदी सर्रास उपलब्ध असते. फक्त तिकडं पुऱ्या मैद्याच्या असतात. पण त्यात काही विशेष नाही आसाम, बंगाल आणि अगदी हैद्राबादेतही पुऱ्या मैद्याच्याच असतात. तसंच केरळ आणि तमिळनाडूत भाजीमध्ये धने पावडर मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. त्यामुळं तिथल्या भाजील जराशी निराळी चव असते. मेघालयाची राजधानी शिलॉंगमध्येही पुरीभाजी मिळते. (अधिका माहिती म्हणजे तिकडं तिथं वडापाव देखील मिळतो.)

पाणीपुरी पण स्पर्धेत...
पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडलीच तर ती व्यक्ती संशोधानाचा विषय होऊ शकते. पाणीपुरीला काही ठिकाणी (विशेषतः उत्तर भारतात) गोलगप्पे म्हणून संबोधलं जातं. पण नाव बदललं म्हणून चव बदलत नाही. शिजवलेल्या वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा रगडा, पुदीना आणि मिरचीच्या ठेच्यापासून बनविलेलं तिखट पाणी तसंच चिंच आणि गूळ यांच्यापासून बनविलेलं आंबटगोड पाणी यांचं अफलातून मिश्रण म्हणजे पाणीपुरी. आता भारतातल्या काही भागात फक्त तिखट पाणीच पाणीपुरीमध्ये टाकलं जातं. तर काही ठिकाणी पाणीपुरी खाताना बरोबर बारीक चिरलेला कांदा दिला जातो. पाणीपुरी मिळाल्यानंतर काही शौकिन कांदा टाकून आस्वाद घेतात.
पाणीपुरी देण्याची पद्धतही औरच असते. बहुतांश ठिकाणी प्लेटनुसार पाणीपुरी दिली जाते व प्लेटमधील पाच, सहा किंवा आठ पुऱ्या संपल्यानंतर विक्रेता आपल्याला एक प्लेट झाल्याची सूचना देतो. त्यानंतर हवी असेल तर दुसरी प्लेट सुरु करतो. गुजरातमध्ये अनेक भागात आपण पुरे म्हणेपर्यंत विक्रेता आपल्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवत असतो. तिकडे प्लेटची बात नसतेच. आपण जितक्‍या पुऱ्या खाऊ त्याचे तो आठ आण्याप्रमाणे पैसे आकारतो. आहे की नाही गंमत.

... आणि सामोसाही!
सामोश्‍याबद्दल तर काहीच बोलायला नको. हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात मिळतो. त्यातही इराण्यांच्या दुकानात मिळणारा सामोसा थोडासा निराळा. त्याच्या सारणात कोबीचा भरणा अधिक. इतर ठिकाणच्या सामोश्‍यात बटाटा आणि मटार (किंवा वाटाणा) यांची मक्तेदारी. आता काही ठिकाणी पट्टीचे सामोसेही मिळू लागले आहेत. पण त्यात फारसा दम नाही. सारण कमी आणि चावण्याचेच श्रम जास्त.
तुम्हाला काय वाटतं कोणता पदार्थ भाराताच राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास अधिक पात्र आहे. या तीनपैकी एखादा पदार्थ असावा की आपल्या मतानुसार आणखी एखादा पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास लायक आहे. तुमची प्रतिक्रिया "कॉमेंट्‌स'मध्ये नक्की लिहा.

Thursday, August 09, 2007

खाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये


कडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊन जाते. अनेकदा सुरवात कशानं करावी, हे देखील समजत नाही. फक्त गुजराती जेवताना अशी परिस्थिती होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण तुम्ही गुजराती खाद्यपदार्थांच्या एखाद्या दुकानात गेला तर विविध खाद्यपदार्थांच रेलचेल व एकाच पदार्थाचे विविध प्रकार पाहिल्यानंतर गुज्जू भाईंच्या आस्वादक वृत्तीचा प्रत्यय येईल.

काही कारणानिमित्तानं बडोदा (वडोदरा) इथं जाणं झालं. तशी धावतीच भेट झाली. पण तरीही आवर्जून वेळ काढून टिपिकल गुजराती पदार्थ मिळणाऱ्या बडोद्यातील एखाद्या दुकानात भेट देणं ओघानं आलंच. प्रतिष्ठित अलकापुरी भागातील "पायल' नावाचं दुकान विशेष लोकप्रिय असल्याचं समजलं आणि थेट दुकान गाठलं. एका दुकानाचे तीन भाग करुन एका भागात गरमागरम ताजे पदार्थ, दुसऱ्या भागात खारा माल आणि तिसऱ्या बाजूला गोड पदार्थ असं विभागणी करुन येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाच्या आवडी-निवडीची काळजी घेण्यात आली होती.

लज्जतदार खाकरे...
पाच पंचवीस प्रकारचे खाकरे, पन्नास प्रकारच्या आणि जाडीच्या शेव, स्पेशल गुजराती मठिये, विविध प्रकारचे वेफर्स आणि चिवडे अशी जवळपास शे-सव्वाशे रकाने नुसत्या खाद्यपदार्थांच्या "व्हरायटी'ने भरलेले होते. खाकरा म्हणजे पापडाच्या जाडीची कडक पुरी. लसण शेव, पालक शेव, मेथी शेव, लसण-पालक, पालक-मेथी आणि मेथी-लसण अशा विविध चवींमध्ये शेव उपलब्ध होते. हेच प्रकार जाड शेव, बारीस शेव, गाठी शेव अशा स्वरुपातही उपलब्ध होते. खाकऱ्याचीही गोष्ट काही वेगळी नव्हती. लसूण घातलेला, न घातलेला, पालक, मेथी व इतर अनेक चवींमधील खाकरे ग्राहकांची आशेनं वाटत पाहत होते. यांच्या जोडीला बटाट्याचा आणि मक्‍याचा चिवडा, केळ्याचे नि बटाट्याचे तिखट-बिनतिखट वेफर्स अगदी तय्यारीत होते.

चविष्ट मठिये...
मठिये हा खास गुजराती पदार्थ गुजराती तसंच बिगर गुजराती ग्राहकांचंही आकर्षण होता. गुजरातीत मटकीला मठ असं म्हणतात. त्यामुळं मटकीच्या पिठापासून केलेल्या पाणीपुरीच्या आकाराइतक्‍या तिखट-मिठाच्या पुऱ्या म्हणजे मठिये. तिखट-मीठ असूनही थोडे गोडाकडं झुकणारे मठिये तोंडाला वेगळीच चव देणारे आहेत.

सुरळीची वडीही...
ताज्या पदार्थांमध्येही सुरळीची वडी, साधा आणि तिखट ढोकळा, सॅंडविच ढोकळा, तिखट कचोरी, उपवासाची कचोरी, बटाट्याचे पॅटिस, पंजाबी सामोसा, इटुकला-पिटुकला सामोसा, आलू वडा (म्हणजे आपल्या बटाटा वड्याच्या जवळपासही न फिरकणारा पदार्थ) आणि पालक, मेथी, कांदा तसंच बटाटा भजी... इतकं वैविध्य पाहिल्यानंतर पटकन सांगता येईल काय खायचं आणि काय नाही ते! या सर्व पदार्थांबरोबर मिळणारी ढोकळ्याच्या चुऱ्यापासून बनविलेली हिरवी चटणी खासच. नुसती चटणीही तितकीच चांगली. आणि हो एक राहिलंच की, गुजरातची खासियत म्हणजे गरमागरम फाफडा. डाळीच्या पिठापासून तयार केलेला आकाराने लांबडा पदार्थ. गरमागरम चटणीसह खायला एकदम उत्तम.

फुल्ल खादाडी...
अर्थात गुजराती माणसाला किंमतीकडं पाहून खरेदी करण्याची सवय नसल्यानं पदार्थांच्या किंमतीही थोड्याशा चढ्याच. पण पदार्थ खाल्ल्यानंतर पैसा वसूल. त्यामुळं जादा पैसा गेल्याचं दुःख नाही. शेवची भाजी, गाठीची भाजी, शेव टॉमेटो भाजी हे पदार्थ अस्सल गुजराती. आपल्याकडं जशा वडापावच्या गाड्या असतात, तशा तिथं शेवऊसळच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत असतात. वाटाण्याची उसळ, वरुन शेव आणि सोबतीला पुरी किंवा पाव ही गुजराती लोकांची आवडती डिश!

मसाला डोसा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थ, भेळ, रगडा पॅटिस आणि पाणीपुरीसह चाटचे विविध प्रकार, पंजाबी डिशेस, चायनीज खाद्यपदार्थ यांच्या गाड्यांचीही रेलचेलही आपल्याला रस्त्यारस्त्यांवर दिसते. त्या गाड्यांभोवती असलेली तुडुंब गर्दी पाहिली की गुज्जू लोकांच्या "तबियत का राज' समजतं. पण हे सारं आपल्याकडंही अगदी मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं तिकडं फिरकण्याचा प्रश्‍नच नव्हता.

भरुचनी सेंग...
रेल्वेनं येताना भरुच नावाचं स्टेशन लागतं. हे ठिकाण खारे शेंगदाणे आणि फुटाणे यांच्यासाठी प्रसिद्ध! मुंबईहून जाताना नर्मदा नदीवरील जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल ओलांडला की गाडी थेट भरुच स्थानकात घुसते. तिथं स्टेशनवर किंवा आपण मोटारीनं जात असलो की "हायवे'वर असंख्य विक्रेते आपल्यापुढं खारे शेंगादाण्याचे पुडे घेऊन उभे असतात. त्यातही दोन-तीन प्रकार आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारावरुन शेंगादाण्याच्या किंमती ठरतात. मध्यम आकाराचा शेंगादाणाही भलताच मोठा असतो. किलोला साधारण 80 ते 100 रुपये पडतात.

भरुचमध्ये शेंगादाणे पिकत नाहीत. ते येतात सौराष्ट्राहून. पण भरुचचे कारागिर उत्तम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं इथले खारे शेंगादाणे अधिक प्रसिद्ध आहेत. मोठाल्या कढईतील रेतीमध्ये भाजण्याच्या आदल्या रात्री हे शेंगदाणे रात्रभर खाऱ्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चांगले भाजले जातात आणि त्यावेळी पुन्हा त्यावर खाऱ्या पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळं भरुचच्या शेंगादाण्यांची चव अगदीच न्यारी वाटते. रोज भरुचमध्ये जवळपास 20 टन शेंगादाणे सौराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भरुचमध्ये येतात. थोडा माल "एक्‍सपोर्ट' होतो आणि काही माल भारताच्या इतर भागांमध्ये पाठविला जातो. पण बाकी सारा माल भरुच आणि गुजरातमध्येच खपतो.

Wednesday, August 01, 2007

दम बिर्याणी, मूँग डोसा आणि चाट


काही कारणानं हैद्राबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला. अडीच वर्षांपूर्वी अत्यंत जड अंतःकरणानं हैद्राबादला निरोप दिला होता. त्यामुळं हैद्राबादला गेल्यानंतर शक्‍य तितक्‍या ठिकाणांना पुन्हा भेट देण्याचं निश्‍चित केलं होते. खाण्याची ठिकाणं त्यात अग्रस्थानी होती हे सांगायला नकोच...

हैद्राबादचं खास आकर्षण म्हणजे बिर्याणी. त्यातही जुन्या हैद्राबादमध्ये मदिना, पिस्ता किंवा शादाब तसंच सिकंदराबादमध्ये "डायमंड' ही बिर्याणीची अगदी मोजकीच पण तितकीच चविष्ट ठिकाणं. त्यातही मला अधिक आवडते ती चारमिनारपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शादाबची बिर्याणी. जुन्या जमान्यातील इराणी कॅफे असतात तसं दुमजली हॉटेल. इतर चकमकीत हॉटेलपेक्षा थोडसं कळकटलेलंच! खालच्या मजल्यावर एकटी-दुकटी मंडळी चहा-बिस्कुट खात किंवा तंगड्या तोडत बसलेली असतात. तर तुलनेने प्रतिष्ठित आणि कुटुंब कबिला बरोबर असलेली मंडळी दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढतात.

इतर ठिकाणी मिळणाऱ्या बिर्याणीच्या तुलनेत इथं मिळणारी बिर्याणी काही औरच. चिकन, मटण किंवा अंडा कुठलीही बिर्याणी असो त्याचा स्वाद भातामध्ये इतक्‍या नैसर्गिकरित्या मिसळलेला असतो की काही विचारु नका. शिवाय ज्या मसाल्यामध्ये हे "पिसेस' घोळवलेले असतात तो मसालाच बिर्याणीची जान आहे. (अर्थात, मी हे सांगण्याची गरज नाही) त्यातच सारे पैसे वसूल. सोबत मिळालेली "करी' किंवा दह्यातून आलेले सॅलेड देखील भातात मिसळू नये, असं वाटण्याइतपत बिर्याणी "द ग्रेट' असते. (करी आणि सॅलेड फुकट मिळत असूनही खावंसं वाटत नाही)

बिर्याणी घ्यावी आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून हात चालविण्यास सुरवात करावी, हा आमचा नेहमीचा रिवाज. यंदाही अगदी तसंच. सकाळपासून विशेष खाणं झालं नसल्यामुळं एक चिकन बिर्याणी आणि एक मटण बिर्याणी आम्ही दोघांनी अगदी सहजपणे चापली. त्यानंतर हाफ-हाफ लस्सीचाही कार्यक्रम झाला. त्यानंतर "कुर्बानी का मिठा' नामक पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होती. पण शक्‍यच नव्हतं. "कुर्बानी का मिठा' हा पदार्थ खास "बकरी ईद'च्या दिवशी बनविला जातो, असं सांगण्यात येतं. माझ्या माहितीनुसार खजूर (कौमुदी काशीकरच्या मते ओले अक्रोड) दोन-तीन दिवस गुलाबाच्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर त्यात साखरेचा पाक, सुकामेवा, क्रिम आणि इतर अनेक पदार्थ मिसळून "चेरी'सह हा "कुर्बानी का मिठा' एका कुंडा सदृश भांड्यातून तो "सर्व्ह' केला जातो. पण आम्हाला बिर्याणीसाठई "कुर्बानी का मिठा'ची कुर्बानी द्यावी लागली. मग नेहमीप्रमाणे "मिनाक्षी पान' खाण्याचा कार्यक्रम पार पडला.

मूग डोसा द बेस्ट!
हैद्राबादचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोसा, इडली, उत्तप्पा, उप्पीट, उप्पीट-डोसा आणि मूग डोसा... पुण्या-मुंबईत वडापावच्या गाड्या जितक्‍या बक्कळ तितक्‍याच इडली-डोसाच्या गाड्या हैद्राबादेत भरपूर. हॉटेलांमध्येही हे पदार्थ इथल्या तुलनेत स्वस्त असतात. आठ रुपयांमध्ये इडली-चटणी-सांबार अगदी नको नको म्हणेपर्यंत. शिवाय "एक्‍स्ट्रा'चे पैसे नाहीत. इडलीचा आकार "वाडेश्‍वर'च्याही तोंडात मारेल असा.

या सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांच्या भाऊ गर्दीत आपल्या येथे न मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे "मूँग डोसा'. उडीद डाळ आणि मूग डाळ भिजत घालून त्याचे पिठ करायचे आणि त्या पिठापासून डोसा करायचा. त्याला खोबऱ्याची पांढरी आणि लाल तिखट चटणी फासायची. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी टाकायची किंवा मग गरमागरम उप्पीट घालायचे. काही अण्णा मंडळी उप्पीट किंवा बटाट्याची भाजी त्यावर फासतात आणि कट डोसाप्रमाणे खातात. पण इतका काला करण्याचे आपले धाडस होत नाही.


गंमत चाटची
पाणीपुरी आणि चाट हे पदार्थही इथं हातगाडीपासून ते दुकानांपर्यंत सर्वत्र मिळतात. भेळ हा पदार्थ मात्र, मोजक्‍याच काही ठिकाणी मिळतो. त्यातही इथल्या भेळची आणि पाणीपुरीची चव अगदीच वेगळी आणि तितकीशी चांगली देखील नाही. मुंबईत जसे भय्या लोक भेळमध्ये उकडलेला बटाटा घालतात. त्याचप्रमाणे हैद्राबादेत भेळमध्ये काकडी घालण्याची पद्धत आहे. भेळही फार कमी ठिकाणी मिळते. आम्ही रहायचो तेथे (दिलसुखनगर) मराठवाडा येथून आलेले एक मामा आहेत. त्यांच्या दुकानात महाराष्ट्रात मिळते तशी भेळ आणि पाणीपुरी मिळते. इतरत्र सारेच अवघड. पाणीपुरी करताना चिंच-गुळाचे पाणी वापरले जात नाही. उकडलेल्या वाटाण्याचे सारण आणि सोबतीला फक्त पुदीन्याचे तिखट पाणी यावरच तुमची हौस भागवावी लागते. हैद्राबादमध्ये चिंच-गुळाच्या पाण्याची बात नस्से. त्यामुळे पाणीपुरी म्हणावी तितकी चविष्ट होत नाही.

हैद्राबादेत कोटी येथे गोकुळ नावाचे चाट सेंटर आहे. एका उत्तर भारतीय व्यक्तीकडून गोकुळ नावाचे तब्बल चार मजली दुकान आहे. सदैव भरगच्च असलेले हे दुकान चवीच्या बाबतीत अगदीच अप्रतिम आहे. मग छोले-भटुरे असो, भेळ पुरी असो किंवा रगडा पॅटिस असो... कचोरी असो किंवा दही वडा सारं कसं झक्कास. त्यामुळे कधी हैद्राबादला गेलात तर "गोकुळ'ला भेट द्यायला विसरु नका.

तिथं काही मोजक्‍या ठिकाणी चहा करण्याची पद्धतही न्यारीच आहे. कोरा चहा आणि कोरी कॉफी दोन निरनिराळ्या भांड्यांमध्ये उकळत असते. तर तिसऱ्या पातेल्यात गरम दूध ठेवलेले असते. तुम्हाला फिका चहा-कॉफी हवी किंवा कडक कॉफी-चहा पाहिजे, हे लक्षात घेऊन तो हॉटेलवाला तुम्हाला हवा तसा चहा तुमच्यासमोर पेश करतो. काहीसा कडवट आणि कडक असा हा चहा चांगलाच लक्षात राहतो. वडापाव आणि कच्छी दाबेली हे पुण्या-मुंबईत जागोजागी मिळणारे पदार्थ इथं मात्र, नजरेसही पडत नाहीत. अगदी सिकंदराबाद किंवा अमीरपेट सारख्या हैद्राबादी संस्कृतीपासून थोडंसं वेगळ्या असलेल्या ठिकाणी गेलं की तिथं हे पदार्थ चाखायला मिळतात. पण तेथेही शोधल्यानंतरच या पदार्थांचा शोध लागतो.

मग कधी जाताय हैद्राबादला?????