Showing posts with label Chimanbhai Patel. Show all posts
Showing posts with label Chimanbhai Patel. Show all posts

Friday, December 14, 2012

गावात सीएनजी रिक्षा नि क्राँकीटचे रस्ते

अमन शांतीचा मुस्लिमांनाही विश्वास

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन एव्हाना चार दिवस होऊन गेले होते. सुरतमध्ये लिंबायत हा शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही भाग असलेला मतदारसंघ सोडला तर ग्रामीण भागामध्ये फारसं जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आम्ही व़डोदरापासून साधारण तीस किलोमीटरवरील डभोईला जायचं ठरविलं. म्हणजे ग्रामीण भागात काय माहोल आहे ते कळेल आणि मोदींच्या विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे का, हे ही समजेल.

सो सकाळी सकाळी डभोईच्या दिशेनं निघालो. डभोई हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे चिरंजीव सिद्धार्थभाई पटेल यांचा मतदारसंघ. चिमणभाई यांच्या पत्नी उर्मिलाबेन यांचे हे मूळ गाव. त्यामुळे सिद्धार्थभाई येथून निवडणूक लढवितात. २००२ चा म्हणजे गोध्रा दंगलीनंतरच्या निवडणुकीचा अपवादवगळता प्रत्येक वेळी डभोईने सिद्धार्थभाईंना साथ दिली आहे. यंदाच्या वेळेस भाजपने बाळकृष्णभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पंचवीस वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


गंमत म्हणजे वडोदरा ग्रामीणमधील भाजपला अनुकूल अशा ७० मतदारयाद्या डभोईमध्ये जोडण्यात आल्या आहेत. म्हणजे जवळपास सात हजार मतदान नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. शिवाय दिलीप पटेल या काँग्रेस नेत्याने बंडाचा झेंडा फडकाविल्यामुळेही सिद्धार्थ पटेल यांची डोकेदुखी वाढली आहे. दरवेळी स्वतःच्या  मतदारसंघाची जबाबदारी कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांच्या जीवावर टाकून सिद्धार्थ पटेल हे वाघोडिया, पादरा, सावली आणि छोटा उदयपूर अशा वडोदरा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये फिरायचे आणि प्रचार करायचे. मात्र, यंदा भाजपने त्यांच्याच मतदारसंघामध्ये टाईट करून टाकले आहे. तेव्हा सिद्धार्थभाई यांना बाहेर पडण्याची संधीच पक्षाने दिलेली नाही.

डभोई हे साधारण एक लाख किंवा सव्वा लाख लोकसंख्या असलेले गाव. अगदी जुने गाव. शहराच्या चार दिशांना चार मोडकळीस आलेले किल्ले आहेत. डभोईच्या राजाने ते किल्ले बांधले होते, असे म्हणतात. डभोईची नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. गावात काँक्रीटचे रस्ते आहेत. पाणी आणि विजेचा प्रॉब्लेम नाही. गावामध्ये फक्त सीएनजी रिक्षा आहे. फक्त सीएनजी रिक्षा असून उपयोग नाही. रिक्षात सीएनजी भरण्यासाठी पंपही गावाजवळच एक किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाच-सहा तास लाईनमध्ये थांबण्याची वेळ रिक्षा चालकांवर येत नाही.

२००२ च्या दंगलीत हे गावही दंगलीत होरपळले होते. तेव्हाच सिद्धार्थ पटेलही पराभवामध्ये होरपळून निघाले होते. मात्र, आता अमन आणि शांती आहे, असं मुस्लिम नागरिकही मान्य करतात. गावामध्ये साधारण तीस हजारच्या आसपास मुस्लिमांची संख्या आहे. बाजारपेठेतून फिरताना अनेक ठिकाणी मुस्लिमांची दुकानं ठळकपणे दिसून येतात. गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीचा पेहराव पाहून आणि त्यांच्या दुकानात लावलेल्या तसबिरींवरून. पण ब-याच दुकानांमध्ये मोदी यांच्या विकास कामांची प्रसिद्धी करणारे कॅलेंडरही लावलेले दिसते. आता यामागे उत्स्फूर्तता किती आणि सक्ती किती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही.

गावामध्येही मोदी यांच्याच नावाचा जप चाललेला दिसतो. काँग्रेसकडे नेता नाही आणि मोदी यांनी कामे केली आहेत, असे लोकांचे म्हणणे असते. वीज, पाणी आणि रस्ते यापुरताच गावकरी विकासाकडे पाहत असल्याचे जाणवते. बाकी किती उद्योग आले किंवा रोजगार किती मिळाला, यात त्यांना विशेष रस नसतो. डभोईमध्ये तसा कोणताही मोठा उद्योग नाही किंवा रोजगाराच्या संधी नाहीत. पण त्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करताना दिसत नाहीत.  

डभोईत भरपूर फेरफटका मारल्यानंतर मग तिथून पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावली येथे नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी गेलो. गुजरातेत येऊन कव्हर केलेली ही त्यांची तिसरी सभा. पहिली सभा २००२ मध्ये मणिनगर येथे. दुसरी २००७ मध्ये बापूनगर येथे आणि तिसरी सावली येथे. पूर्वीच्या दोन्ही सभा शहरातील होत्या. पण ही गावाकडची पहिलीच. त्यामुळे मलाही खूप उत्सुकता होती.
सभेसाठी मोदी येण्यापूर्वीचे वातावरण आणि नंतरचे वातावरण यात जमीन अस्मानाचे अंतर असते. पूर्वी मैदानही भरलेले नसते. पण मोदी यांचे हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालू लागल्यानंतर लोकांची संख्या आणि उत्सुकता दोन्ही वाढली. मोदी व्यासपीठावर येताच हारतु-यांचा कार्यक्रम होतो. मग कोणतेही सोपस्कार पार न पाडता मोदी थेट माईकचा ताबा घेतात आणि उपस्थित जनतेचाही. 


उपस्थितांशी संवाद साधत ते सभेवर पूर्णपणे कब्जा मिळवितात. सोनिया मॅडम, राहुलबाबा अशी ठेवणीतील विशेषणे वापरून लोकांच्या टाळ्या मिळवितात. राज्यात तुम्हाला विकासकामे दिसतात की नाही किंवा आपल्या गुजरातचा ताबा तुम्हाला अनोळखी नि अज्ञात लोकांच्या हातात द्यायचा आहे का... असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे लोकांकडूनच काढून घेतात. गुजरातचा चौकीदार असून तुमच्या सुरक्षिततेसाठी मी गांधीनगर येथे बसतो आहे, असे वाक्य फेकतात. सध्या निवडणुकीत भावनिक मुद्दा नसल्यामुळे मग सर क्रीकचा मुद्दा काढून काँग्रेस आणि पंतप्रधानांना लक्ष्य करतात. सर क्रीक पाकिस्तानच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तसे झाले तर पाकिस्तान थेट गुजरातच्या घरात येईल, असे सांगून लोकांच्या मनात भीतीचे पिल्लू सोडून देतात.

सभेच्या शेवटी कमळाच्या चित्रावर शिक्का मारायला सांगतात. कमळाला मत म्हणजे फक्त उमेदवाराला मत नाही, तर गुजरातच्या विकासाला मत वगैरे सांगतात. मात्र, भाजपच्या उमेदवाराचे नाव घेत नाहीत. फक्त भाजपला आणि कमळाला मत देण्याचे आवाहन करतात. नरेंद्र मोदींच्या स्वभावातील मै अगदी थोड्या स्वरूपात का होईना पण इथंही दिसून येतो.