Showing posts with label Surat. Show all posts
Showing posts with label Surat. Show all posts

Friday, December 14, 2012

गावात सीएनजी रिक्षा नि क्राँकीटचे रस्ते

अमन शांतीचा मुस्लिमांनाही विश्वास

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन एव्हाना चार दिवस होऊन गेले होते. सुरतमध्ये लिंबायत हा शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही भाग असलेला मतदारसंघ सोडला तर ग्रामीण भागामध्ये फारसं जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आम्ही व़डोदरापासून साधारण तीस किलोमीटरवरील डभोईला जायचं ठरविलं. म्हणजे ग्रामीण भागात काय माहोल आहे ते कळेल आणि मोदींच्या विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे का, हे ही समजेल.

सो सकाळी सकाळी डभोईच्या दिशेनं निघालो. डभोई हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे चिरंजीव सिद्धार्थभाई पटेल यांचा मतदारसंघ. चिमणभाई यांच्या पत्नी उर्मिलाबेन यांचे हे मूळ गाव. त्यामुळे सिद्धार्थभाई येथून निवडणूक लढवितात. २००२ चा म्हणजे गोध्रा दंगलीनंतरच्या निवडणुकीचा अपवादवगळता प्रत्येक वेळी डभोईने सिद्धार्थभाईंना साथ दिली आहे. यंदाच्या वेळेस भाजपने बाळकृष्णभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पंचवीस वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


गंमत म्हणजे वडोदरा ग्रामीणमधील भाजपला अनुकूल अशा ७० मतदारयाद्या डभोईमध्ये जोडण्यात आल्या आहेत. म्हणजे जवळपास सात हजार मतदान नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. शिवाय दिलीप पटेल या काँग्रेस नेत्याने बंडाचा झेंडा फडकाविल्यामुळेही सिद्धार्थ पटेल यांची डोकेदुखी वाढली आहे. दरवेळी स्वतःच्या  मतदारसंघाची जबाबदारी कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांच्या जीवावर टाकून सिद्धार्थ पटेल हे वाघोडिया, पादरा, सावली आणि छोटा उदयपूर अशा वडोदरा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये फिरायचे आणि प्रचार करायचे. मात्र, यंदा भाजपने त्यांच्याच मतदारसंघामध्ये टाईट करून टाकले आहे. तेव्हा सिद्धार्थभाई यांना बाहेर पडण्याची संधीच पक्षाने दिलेली नाही.

डभोई हे साधारण एक लाख किंवा सव्वा लाख लोकसंख्या असलेले गाव. अगदी जुने गाव. शहराच्या चार दिशांना चार मोडकळीस आलेले किल्ले आहेत. डभोईच्या राजाने ते किल्ले बांधले होते, असे म्हणतात. डभोईची नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. गावात काँक्रीटचे रस्ते आहेत. पाणी आणि विजेचा प्रॉब्लेम नाही. गावामध्ये फक्त सीएनजी रिक्षा आहे. फक्त सीएनजी रिक्षा असून उपयोग नाही. रिक्षात सीएनजी भरण्यासाठी पंपही गावाजवळच एक किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाच-सहा तास लाईनमध्ये थांबण्याची वेळ रिक्षा चालकांवर येत नाही.

२००२ च्या दंगलीत हे गावही दंगलीत होरपळले होते. तेव्हाच सिद्धार्थ पटेलही पराभवामध्ये होरपळून निघाले होते. मात्र, आता अमन आणि शांती आहे, असं मुस्लिम नागरिकही मान्य करतात. गावामध्ये साधारण तीस हजारच्या आसपास मुस्लिमांची संख्या आहे. बाजारपेठेतून फिरताना अनेक ठिकाणी मुस्लिमांची दुकानं ठळकपणे दिसून येतात. गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीचा पेहराव पाहून आणि त्यांच्या दुकानात लावलेल्या तसबिरींवरून. पण ब-याच दुकानांमध्ये मोदी यांच्या विकास कामांची प्रसिद्धी करणारे कॅलेंडरही लावलेले दिसते. आता यामागे उत्स्फूर्तता किती आणि सक्ती किती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही.

गावामध्येही मोदी यांच्याच नावाचा जप चाललेला दिसतो. काँग्रेसकडे नेता नाही आणि मोदी यांनी कामे केली आहेत, असे लोकांचे म्हणणे असते. वीज, पाणी आणि रस्ते यापुरताच गावकरी विकासाकडे पाहत असल्याचे जाणवते. बाकी किती उद्योग आले किंवा रोजगार किती मिळाला, यात त्यांना विशेष रस नसतो. डभोईमध्ये तसा कोणताही मोठा उद्योग नाही किंवा रोजगाराच्या संधी नाहीत. पण त्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करताना दिसत नाहीत.  

डभोईत भरपूर फेरफटका मारल्यानंतर मग तिथून पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावली येथे नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी गेलो. गुजरातेत येऊन कव्हर केलेली ही त्यांची तिसरी सभा. पहिली सभा २००२ मध्ये मणिनगर येथे. दुसरी २००७ मध्ये बापूनगर येथे आणि तिसरी सावली येथे. पूर्वीच्या दोन्ही सभा शहरातील होत्या. पण ही गावाकडची पहिलीच. त्यामुळे मलाही खूप उत्सुकता होती.
सभेसाठी मोदी येण्यापूर्वीचे वातावरण आणि नंतरचे वातावरण यात जमीन अस्मानाचे अंतर असते. पूर्वी मैदानही भरलेले नसते. पण मोदी यांचे हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालू लागल्यानंतर लोकांची संख्या आणि उत्सुकता दोन्ही वाढली. मोदी व्यासपीठावर येताच हारतु-यांचा कार्यक्रम होतो. मग कोणतेही सोपस्कार पार न पाडता मोदी थेट माईकचा ताबा घेतात आणि उपस्थित जनतेचाही. 


उपस्थितांशी संवाद साधत ते सभेवर पूर्णपणे कब्जा मिळवितात. सोनिया मॅडम, राहुलबाबा अशी ठेवणीतील विशेषणे वापरून लोकांच्या टाळ्या मिळवितात. राज्यात तुम्हाला विकासकामे दिसतात की नाही किंवा आपल्या गुजरातचा ताबा तुम्हाला अनोळखी नि अज्ञात लोकांच्या हातात द्यायचा आहे का... असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे लोकांकडूनच काढून घेतात. गुजरातचा चौकीदार असून तुमच्या सुरक्षिततेसाठी मी गांधीनगर येथे बसतो आहे, असे वाक्य फेकतात. सध्या निवडणुकीत भावनिक मुद्दा नसल्यामुळे मग सर क्रीकचा मुद्दा काढून काँग्रेस आणि पंतप्रधानांना लक्ष्य करतात. सर क्रीक पाकिस्तानच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तसे झाले तर पाकिस्तान थेट गुजरातच्या घरात येईल, असे सांगून लोकांच्या मनात भीतीचे पिल्लू सोडून देतात.

सभेच्या शेवटी कमळाच्या चित्रावर शिक्का मारायला सांगतात. कमळाला मत म्हणजे फक्त उमेदवाराला मत नाही, तर गुजरातच्या विकासाला मत वगैरे सांगतात. मात्र, भाजपच्या उमेदवाराचे नाव घेत नाहीत. फक्त भाजपला आणि कमळाला मत देण्याचे आवाहन करतात. नरेंद्र मोदींच्या स्वभावातील मै अगदी थोड्या स्वरूपात का होईना पण इथंही दिसून येतो.

Wednesday, December 12, 2012

तीन मुस्लिमांची कहाणी


खुबसुरत सूरतमधील भन्नाट अनुभव

गुजरातमध्ये मुस्लिम नागरिकांची म्हणजेच मुस्लिम मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. अगदी गुजरातच्या दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये बसल्यापासून हा अनुभव येऊ लागतो. बुरखा घातलेल्या महिला किंवा पांढरी जाळीची टोपी घातलेले पुरुष किंवा टिपिकल बोहरी मंडळींची संख्या वाढलेली सहजपणे लक्षात येते. अगदी द्वारकेपर्यंत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मग सुरतही त्याला कसा अपवाद असणार. सुरतमध्ये दोन दिवस फिरलो. त्यावेळचे हे काही अनुभव...



पहिला अनुभव एका चहावाल्याचा. सुरत टेक्सटाईल मार्केटमध्येच एका ठिकाणी चहा खूप चांगला मिळतो, असं समजलं. म्हणून मग तिथं चहा प्यायला गेलो. चहावाला मुस्लिम होता. ते आधी मा्हिती असतं तरी गेलोच असतो. चाळीशी-पंचेचाळिशी पार केलेला. डोक्यावर नेहमीची टोपी, पांढ-या रंगाची दाढी आणि नेहमीचा पेहराव. चहा एकदम फक्कड बनविला होता. खरोखरच मस्त.   

काय यंदा काय माहोल आहे, असं अगदी नेहमीचं वाक्य फेकल्यानंतर तो सुरू झाला. साहब, इस बार रंग बदलेगा... हे एकच मोजकं वाक्य बोलून स्वतःच्या चातुर्याचं दर्शन त्यानं घडविलं. मग आम्हीही सुरु झालो. म्हटलं भाई, क्यो बदलेगा रंग... तेव्हा त्याचं उत्तर खूप भारी होतं. म्हटला, अब बहुत हो गया. (वाजपेयी यांच्यापेक्षा छोटा पॉझ) महंगाई कितनी बढ गई है... अब बस हो गया. (मला वाटलं, की मोदींची राजवट खूप झाली असं त्याला म्हणायचं आहे. त्यासाठीच तो बस हो गया असं म्हणत असावा. खरंतर त्याला तेच म्हणायचं होतं. पण त्यानं ते चतुराईनं टाळलं.) त्याच्या मनात मोदींबद्दल कदाचित राग असावा, पण त्यानं तो व्यक्त करणं कौशल्यानं टाळलं. अगदी हसतहसत.

नंतर एक कडवट मोदी विरोधक पाहिला तो भाजपच्या एका रॅलीत. भाजपच्या लिंबायत मतदारसंघातील मराठी उमेदवार संगीता पाटील यांच्या रॅलीत आम्हीही सहभागी झालो होतो. माहोल अनुभवण्यासाठी. हा मतदारसंघ सुरत स्टेशनपासून चार-पाच किलोमीचटवर. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांची संख्या जाणवण्याइतपत आहे. यामध्ये फिरत असताना मुस्लिम नागरिकांची वस्ती असलेल्या मोहल्ल्यातून भाजपची रॅली जात होती. रॅली पुढे पुढे सरकत होती आणि वस्ती अधिकाधिक दाट होत होती.

एका ठिकाणी एका गल्लीतून एक एम ८० वाला समोर येऊन थांबला. बेकरी वगैरेचा व्यवसाय असावा. एम ८० वर दोन पिशव्या लटकविल्या होत्या. त्यावरून मी अंदाज बांधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भगवे टी-शर्ट घातले होते आणि उपरणी परिधान केली होती. आम्हीच फक्त भगव्या रंगाशिवाय होतो. आम्ही त्यांच्यापैकीच एक आहोत, असं समजून आमच्याकडे पाहून अत्यंत त्वेषानं तो म्हणाला, मोदीने कुछ बॉटल बिटल भेजा है क्या... एकच वाक्य बोलला पण काय बोलला. एकच बोला लेकिन क्या बोला... मोदींबद्दलचा राग, द्वेष, चीड, संताप, खुन्नस त्याच्या शब्दात आणि प्रश्न विचारण्याच्या शैलीत अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. पण त्याचे डोळे अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

नंतर रॅली फक्त मुस्लिमांच्या वस्तीतून फिरत होती. तेव्हा भाजपच्या घोषणांना त्या वस्तीतील छोटी छोटी शेंबडी पोरं जोरदार प्रत्युत्तर देत होती. कमल जिताओ... या घोषणेला पंजा जिताओ... किंवा वच्चा रे वच्चा कमल वच्चा (आलं रे आलं कमळ आलं) या घोषणेला वच्चा रे वच्चा पंजा वच्चा अशी प्रत्युत्तर मिळत होती. पंजाचे झेंडे फडकाविणं किंवा पंजाच्या नावानं घोषणा देणं, हे काम होतं शेंबडी पोरं करत होती. शाळेत किंवा मदरशात जसं शिक्षण मिळतं तसंच मोदी किंवा भाजपविरोधाचं अथवा काँग्रेस प्रेमाचं शिक्षण या मुलांना घरात किंवा परिसरात मिळत असावं.   

तिसरी व्यक्ती भेटली नरेंद्र मोदी समर्थक. भाजपचे नवसारीचे खासदार सी. आर. पाटील (हे देखील मराठीच आहेत.) यांच्या संपर्क कार्यालयात दक्षिण गुजरातसाठी मिडीया सेल स्थापन केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते माधव भंडारी हे त्याचे प्रमुख आहेत. मराठीमध्ये अत्यंत प्रभावीपणे बोलणारे भंडारी हे गुजरातीतूनही तितकाच अस्खलित आणि सहज संवाद साधू शकतात, हे तिथं कळलं.

तर त्याच कार्यालयात दक्षिण गुजरात विद्यापीठात मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम करणारी सेरा शेख ही विद्यार्थिनी भेटली. ती या मिडीया सेलमध्ये भंडारी यांची असिस्टंट म्हणून काम करीत होती. मकरंद जोशी नावाचा मराठी युवकही तिथं असिस्टंट म्हणून कार्यरत होता. ही सेरा शेख दिसायला एकदम मॉडर्न. टकाटक. जीन्सची पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा लूज टॉप. मनातील स्टिरिओटाईप प्रतिमांमुळंहिचं नाव शेख असेल असं मनातही आलं नसतं.

तिचं नाव सेरा शेख असल्याचं समजल्यानंतर माझी उत्सुकता चाळविली. मग नंतर थोड्या वेळानं तिला विचारलं, तुला किंवा तुझ्या घरातील व्यक्तींना मोदींबद्दल काय वाटतं किंवा मुस्लिम समाजाचे ते विरोधक आहेत, असं वाटत का... त्यावर तिचं उत्तर मार्मिक होतं. मोदी यांना विकासाचे ध्येय आहे. मुस्लिमविरोधक म्हणून त्यांचे चित्र रंगविले जात असले तरी मला किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये कोणालाच तसे वाटत नाही. जी मंडळी कमी शिकलेली आहेत किंवा जे विचार न करता बोलतात त्यांना कदाचित ते मुस्लिमविरोधक वाटत असतील. पण आम्हाला त्यांचे काहीच वावडे नाही. तिला आणि तिच्या घरच्यांना मोदींचा राग नाही, हे आम्हालाही माहिती होतंच. अन्यथा ती भाजपच्या कार्यालयात मिडीया असिस्टंट म्हणून रुजू झालीच नसती.

सुरतमध्ये आलेले हे तीनही अनुभव खूपच बोलके होते आणि लक्षात राहण्यासारखे. नरेंद्र मोदींनी कितीही सदभावना यात्रा आणि दौरे केले तरी हा द्वेष आणि संताप कमी होईल का, याबद्दल अजिबात साशंकता नाही. ती कमी होणारच नाही.

Tuesday, December 11, 2012

भाई, ये केशुभाई किधर है...

सुरतमध्ये 'परिवर्तन'ची हवा नाही
२००२, २००७, २०१२... सलग तिस-यांदा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये सोमवारी सकाळीच दाखल झालो. वातावरण खूप तापलं असेल किंवा प्रचार शिगेला पोहोचला असेल, अशाच समजुतीनं सुरतमध्ये पोहोचलो. पण वातावरण काहीच तापलेलं नव्हतं. कुठेही पदयात्रा दिसत नव्हत्या, घरोघरी संपर्क साधण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसत नव्हती. पक्षांच्या झेंड्यांची संख्या चांगलीच रोडावली होती, प्रमुख पक्षांची कार्यालयांमध्येही चहलपहल नव्हती. प्रचाराचा शेवटून दुसरा दिवस असला तरीही त्याचं प्रतिबिंब शहरात कुठेही उमटलेलं दिसत नव्हतं.





मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती केशुभाई पटेल यांच्या पक्षाला किती जनसमर्थन आहे, हे जाणून घेण्याची. यंदाच्या निवडणुकीत तर गुजरात परिवर्तन पार्टीसारखा काँग्रेसला मोठ्या आशा असलेला पक्षही उतरला आहे. सुरत आणि दक्षिण गुजरातमध्येही अनेक भागात पटेल समाजाचे वर्चस्व आहे. सुरतमध्ये तर पटेल समाज मोठ्या संख्येने आहे. हिरे व्यापारी आणि टेक्सटाईल मार्केटमध्ये काम करणारे अनेक कामगार हे सौराष्ट्र भागातील आहेत. त्यामुळेच केशुभाई यांना इथे चांगला पाठिंबा मिळत असेल, अशी समजूत होती. केशुभाई यांचे दिवंगत सहकारी आणि सुरतचे माजी खासदार कांशीराम राणा हे सुरतचेच. त्यामुळे नाही म्हणायला सुरतमध्ये केशुभाईंच्या पक्षाचा विशेष जोर असेल, अशी माझी धारण होती. मात्र, परिस्थिती निराळीच निघाली. प्रचाराचे फक्त दोनच दिवस बाकी असताना, गुजरात परिवर्तन पार्टीचे ना कुठे बोर्ड दिसत होते ना कुठं प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसत होत्या. नना कुठल्या मोठ्या नेत्याची जाहीर सभा किंवा प्रचार फेरी लावण्यात आली होती.

जीपीपीचे (गुजरात परिवर्तन पार्टी... गुपप हा शॉर्ट फॉर्म वाचायला कसा तरी वाटतो) दक्षिण सुरत प्रभारी, सुरतचे माजी महापौर आणि महानगरपालिका फायनान्स बोर्डाचे माजी अध्यक्ष फकीरभाई चौहान यांच्याकडे गेलो. हे केशुभाईंचे कट्टर समर्थक आणि संघ-जनसंघाचे जुने कार्यकर्ते. साधारण ६५ किंवा ७० वर्षांची वामनमूर्ती. घरात गेल्यानंतर भिंतीवर जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे दोन मोठे फोटो लावलेले दिसले. समोरच सोफ्यावर फकीरभाई आरामात बसलेले. सुरत जिल्ह्यातील कोणत्या तरी गावाहून आलेल्या पक्ष कार्यकर्त्याशी संवाद साधत होते. निवडणुकीच्या धामधुमीत फक्त एकच कार्यकर्ता पाहून धक्काच बसला. किमान पाच-पंचवीस कार्यकर्ते तरी त्यांच्या आजूबाजूला असतील आणि रणनिती ठरविली जात असेल, असे चित्र माझ्या डोळ्यासमोर होते. पण तसे काहीच दिसले नाही.



आम्ही गेलो आणि त्या कार्यकर्त्याची जागा आम्ही घेतली. फकीरभाई संवाद साधताना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. अर्थातच, सौम्य प्रकृतीचे असल्याने सौम्य शब्दांतच. नरेंद्र मोदींच्या राज्यात कार्यकर्ते, भाजपचे नेते आणि भाजपचे चाहते यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते. मी म्हणतो, तीच पूर्वदिशा, माझे म्हणणे ऐका किंवा माझ्याबरोबर येऊ नका, अशी त्यांची वृत्ती आहे. एकतर तुम्ही माझे चाहते व्हा नाहीतर मी तुमचा शत्रू होतो, अशीच मोदींची कार्यशैली आहे आणि तीच पक्षाला घातक आहे. त्यामुळेच केशुभाई आणि आम्ही त्यांच्यापासून दूर झालो, असे सांगून फकीरभाईंनी भडास काढली. सौम्य शब्दांत.

केशुभाईंच्या वयाचा मुद्दा भाजपकडून उपस्थित कसा करण्यात आला नाही. कारण मोदी एकदम तरुण तुर्क आणि केशुभाई वयस्कर. हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला नाही का, असे आम्ही विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, की सुरुवातीला हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला होता. केशुभाईंचे वय देवाचे नामस्मरण करण्याचे आहे, निवडणुकीत उतरण्याचे नाही, असा त्या प्रचाराचा सूर होता. मात्र, नंतर केशुभाईंची लोकप्रियता खूप असल्याने त्या प्रचाराला कोणीच धूप न घातल्याने भाजपला तो मुद्दा थांबवावा लागला, असे फकीरभाई यांनी सांगितले. मात्र, कदाचित हाच मुद्दा केशुभाई यांच्याविरोधात जाईल, हे सांगायला नकोच.

नरेश पटेल हे पटेल समाजाचे फार मोठे नेते. राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या जाहीर  द्र मोदी आणि त्यांचे संबंध फार मधुर नाहीत, अशी परिस्थिती. मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धूने गुजरातेत येऊन टोलेबाजी केली. क्रिकेट कॉमेंट्री आणि जाहीर सभेतील भाषण एकाच शैलीत करता येत नाही, हे त्याला कोण सांगणार. बोलता बोलता, तो केशुभाई हे देशद्रोही आहेत, म्हणाला. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळी केशुभाई हे देशद्रोही नाहीत, अशी जाहीर  प्रतिक्रिया नरेश पटेल यांनी दिली होती. पटेल समाजाचे १०० टक्के मतदान व्हायला पाहिजे, म्हणून  ते प्रयत्नशील आहेत. फक्त कोणासाठी मतदान करायचे, हे जाहीरपणे सांगायला ते तयार नाहीत.

अशा सर्व परिस्थितीत सुरत किंवा दक्षिण गुजरातमध्ये गुजरात परिवर्तन पार्टीचा म्हणावा, तितका जोर जाणवला नाही. कदाचित तो सौराष्ट्रापुरताच मर्यादित असू शकतो. त्यामुळेच केशुभाईंच्या पक्षाने सुरत किंवा दक्षिण गुजरातमधील ३६ जागांसाठी विशेष रणनिती अवलंबिली नसावी. त्याचमुळे दक्षिण गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच सामना असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा दावा जीपीपीचे नेते करीत असले तरीही त्या दाव्यावर माझा तरी विश्वास बसला नाही. कारण प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळेच सांगत होती.

Thursday, July 14, 2011

दळभद्री नालायकांनो



भारतात काय स्पिरीटचा कारखाना आहे...

नेमेचि येतो मग पावसाळा या धर्तीवर आता भारतामध्ये नेमेचि होतात मग बॉम्बस्फोट अशी पद्धत सुरु झाली आहे. भारतात कुठे ना कुठे तरी बॉम्बस्फोट होतात. मग कधी जयपूर, कधी वाराणसी, कधी पुणे, कधी दिल्ली, कधी सुरत, कधी बेंगळुरू, कधी अहमदाबाद, कधी गुवाहाटी आणि नेहमी मुंबई.

बॉम्बस्फोट होतात, मग नेहमीप्रमाणे एनआयएचे पथक स्फोटाला भेट देते. सर्व पुरावे गोळा करते, मग गृहमंत्री येतात. कधी पॅण्ट सांभाळतात कधी लुंगी सांभाळणारे असतात. तो येऊन लोकांना उगाच अक्कल शिकवतात. उगाचच बाहेर पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, एकी बाळगा, सदैव जागरुक रहा इइ. फक्त गृहमंत्री येत नाहीत, विरोधी पक्षनेत्यांची भेट होते, मूड असेल तर पंतप्रधानही येऊन जातात. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधीही येण्याची शक्यता असते. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यांचे नेते यांच्याही भेटी होतात. मिडीयाला बाईट देऊन तेही टीव्हीवर झळकतात. विरोधी पक्ष सरकारवर टीका करतात. सरकार म्हणतं विरोधी पक्षांनी स्फोटांचं राजकारण करु नये. हे नेहमीचंच झालं आहे.

लोकांना उगाचच अक्कल शिकवून मग काथ्याकूट होतो ते हा स्फोट कोणी घडवून आणला त्यावर. कोणी म्हणतं लष्करै तैय्यबा, कोण म्हणतं अल कायदा. सध्या इंडियन मुजाहिदीनचा जोर आहे. मग त्यासाठी आरडीएक्स वापरलं की अमोनियम नायट्रेट वापरलं याच्यावर चर्चा झडतात. मग बसस्टॉपला टार्गेट का केलं, रेल्वेला टार्गेट का केलं, यावर टीव्ही चॅनेल्सवर वादसंवाद रंगतो. जुन्या स्फोटांच्या तारखा आणि घडलेल्या घटना यांच्या आठवणी या निमित्ताने निघतात. सरकार आणि पोलीस काय करतात, यावर चर्चा रंगते. सरकारने काय करायला पाहिजे, याबद्दल तज्ज्ञ त्यांची त्यांची मतं मांडतात. कोणी पोलिसांच्या नावानं बोटं मोडतात, कोणी इंटेलिजन्सच्या नावानं खडे फोडतं. इंटरनेट, ट्वीटर, फेसबुक यांच्यावर देशप्रेमाचा उमाळा येतो.

अफझल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो, कसाब कसा बिर्याणी झोडतोय, यावर टीका होते. मग बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांचे काय हा मुद्दा चर्चेत येतो. सारीच वांझोटी चर्चा. आपण फक्त वांझोट्या चर्चाच करतो. सरकारला सामान्य माणसाचं काहीच देणंघेणं नाही. राजकीय पक्षांनाही काही पडलेली नाही. ऐसे हादसे होतेही रहते हे, असं राज्याचा गृहमंत्री म्हणतो. तर काँग्रेसचा युवराज म्हणतो हल्ले होतच राहणार. बोला आता तुम्ही आम्ही करणार काय. म्हणूनच सामान्य माणूस फेसबुर ट्वीटर रिअॅक्ट होत राहतो, टीव्हीवर चर्चा करत राहतो. त्यातून काहीही साध्य होत नाही. पण हे सोपस्कार पडत राहतात.

स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लोक कसे कामावर आले, शाळा कशा नेहमीप्रमाणे भरल्या, कॉलेज कट्टे कसे फुलून गेले, लोकल कशा भरभरून वाहताहेत, अशी दृष्य आणि बातम्या दाखवून न्यूज चॅनेल्स मुंबईच्या स्पिरीटची चर्चा करतात. अहो, कसलं स्पिरीट प्रत्येकाला उद्याची चिंता आहे. उद्या कामावर नाही गेलो तर एक दिवसाचा पगार कापला जाणार, शाळेत-कॉलेजात नाही गेलो आणि मार्क कमी पडले तर उद्या अॅडमिशन कोण देणार, या विवंचनेत तो घराबाहेर करतो. त्यामुळं हे काही स्पिरीट फिरीट नाही. ही हतबलता आहे. अहो, मुंबईच नाही तर इतर सर्व शहरे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या व्यवहारांमध्ये गुंतून जातात. कारण त्यांना जगायचं आहे. मुंबईत आणि शहरांमध्ये काय स्पिरीटचा कारखाना आहे, सारखं स्पिरीट स्पिरीट करायला. ही हतबलता आहे, दुसरा पर्यायच नाही. त्याला काय करणार. खरं, तर हे स्पिरीट स्पिरीट करणाऱ्यांवरच या स्पिरीटचा उपयोग केला पाहिजे.

वाढलेल्या महागाईत रुपया रुपया कमाविण्यासाठी रोज मरावं लागतं. सामान्य माणूस रोजच मरतोय. या एसीमध्ये बसलेल्या राजकारण्यांना त्याचा काय पत्ता. त्यांचा काय समजणार हे. रोज मरणं आणि एकदाचं कायमचं मरणं, यातला फरकही आता मिटून चालला आहे. नालायक राजकारणी आणि निर्लज्ज यंत्रणा असलेल्या भारतात जन्माला आलो ते मरण्यासाठीच. त्यामुळे सामान्य माणसाला मरणाची भीती नाहीये. तो घरातून बाहेर पडतो तेच मरण्यासाठी.

असो. आता ११-७ झाले. २६-११ झाले. १३-२ झाले. काल १३-७ झाले. आता पुन्हा कोठे आणि कधी स्फोट होणार याची वाट पाहत बसण्यापेक्षा आणि त्यात आपण आणि आपले जवळचे नसावेत, यासाठी देवाचा धावा करत बसण्यापलिकडे सामान्यांच्या हातात काहीही नाही. कारण आपण सर्वसामान्य आहोत. अतिरेक्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहोत. निलाजऱ्या राजकारण्यांसाठी मतांची पेटी आहोत. महागाईच्या भस्मासुराचे भक्ष्य आहोत. नक्षलवद्यांचे लक्ष्य आहोत. कारण आपण सर्वसामान्य आहोत.


भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात सर्वसामान्य माणसाचे हे हाल, हे मजबूत लोकशाहीचेच 'लक्षण' आहे. एकीकडे आपण लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे हीच लोकशाही सर्वसामान्य माणसाचा गळा घोटणार.


जय हिंद, जय लोकशाही...