Showing posts with label Girgaon. Show all posts
Showing posts with label Girgaon. Show all posts

Friday, January 08, 2010

अस्सल मराठमोळं जेवण...



तांबे उपहारगृह

गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कारप्रमाणेच किंवा सत्कारपेक्षाही अधिक लोकप्रिय आणि नावाजलेलं आणखी एक उपहारगृह म्हणजे तांबे उपहारगृह. मरीन लाईन्स रेल्वेस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर व सीएसटीपास्नं टॅक्सीनं फक्त तेरा ते पंधरा रुपये अंतरावर. त्यामुळं इच्छित स्थळी पोहोचणं फारसं अवघड नाही. (आणि जरी अवघड असलं तरी खरा खवय्या कसंही करुन इथं आल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला नकोच.)

अफलातून चव...
तांबे उपहारगृहाची खरी ओळख म्हणजे इथल्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची अफलातून चव. कोथिंबीर वडी, आळू वडी, भाजणीच्या पिठाचं थालिपीठ आणि लोणी, डाळिंब्यांची (सोललेल्या कडव्या वालाची) उसळ, आळूची पातळ भाजी (आळूचं फदफदं), उकडलेल्या बटाट्याची डोसा भाजी (घरगुती पद्धतीनं केलेली उडप्यासारखी नव्हे...) मूग आणि मटकीची उसळ, कढी-भात, कढी- मूगडाळ खिचडी, चवळी-पालक आणि इतर अनेक चविष्ट पदार्थ. ओल्या काजूची (काजूगराची) उसळ हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य!

औरंगाबाद सकाळचे मुख्य वार्ताहर अभय निकाळजे, मुंबई सकाळमधील सहकारी अभय न. जोशी तसंच मंगेश मधुकर कुलकर्णी आणि मी असे आम्ही चौघे तांबे उपहारगृहामध्ये गेलो होतो. सकाळचे चौघे तांबे उपहारगृहामध्ये जाऊन अक्षरशः खूष झालो. तिथल्या जेवणावर दिलखूष झालं. कुठं जायचं कुठं जायचं असं ठरत असतानाच तांबे उपहारगृहाचं नाव पुढे आलं आणि सर्वांनीच त्याला पसंती दिली. मग सकाळच्या फोर्ट कार्यालयातनं ठाकूरद्वार गाठलं.

ब्राह्मणी जेवण...
ब्राह्मणी पद्धतीचं मराठी जेवण इथं फर्स्ट क्लास मिळतं. ब्राह्मणी कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं तिखट बेताचंच आणि गुळाचा वापर सढळ हाताने असतो, त्याच पद्धतीची चव इथं चाखायला मिळते. कमी तिखट असलं तरी हे मराठी पदार्थ कमी तिखट असले तरच किंवा थोडेसे गूळचट असले तरच चांगले लागतात, हे सांगायला नको. आळूची भाजी त्याच पठडीतली. पण आळूच्या भाजीला लाल मिरच्यांची फोडणी दिलेली असते. हे इथलं वेगळेपण. त्यामुळंच चवही थोडीशी वेगळी.



डाळिंब्याची उसळ...
इथं गेल्यानंतर आवर्जून खायची गोष्ट म्हणजे डाळिंब्याची उसळ. एकदम घट्ट (रस्सा एकदम कमी) अशी ही उसळ पुण्यातल्या कोहिनूर मंगल कार्यालय किंवा ज्ञानल मंगल कार्यालयातल्या उसळीची आठवण करुन देते. डाळिंब्याची उसळही थोडीशी गोड असेल तर अधिक चांगली लागते. तांबेंनीही हे जाणलंय. पालक पनीरपेक्षा पालक-चवळी असं वेगळंच कॉम्बिनेशन इथं चाखायला मिळतं. शिवाय झुणका-भाकर आहेच. अर्थात, झुणका हा तिखट नाही, हे वेगळं सांगायला नकोच. पण झुणका झणझणीत असेल तरच चांगला लागतो. त्यामुळं इथं झुणका-भाकरी न खाणंच उत्तम. इतर पदार्थ ट्राय केले तर उत्तम.

अनेक पर्याय...
द बेस्ट गोष्ट म्हणजे इथं लिमिटेड किंवा अनलिमिटेड स्वरुपात थाळी मिळतेच. पण तुम्हाला थाळी नको असेल तर भाज्या आणि उसळी यांच्यासाठी प्लेट सिस्टीमही आहे. त्यामुळं आवडीच्या दोन-चार भाज्या, भाकरी किंवा पोळ्या, सोबतीला आळूवडी किंवा कोथिंबीर वडी, एखादं थालिपीठ अशी ऑर्डर दिली तर मग विचारायलाच नको. शिवाय भाजी किंवा उसळीची क्वांटीटी दोघांना पुरेल इतकी असते. त्या अंदाजानं आपण ऑर्डर देऊ शकतो. शेवटी मूगडाळ खिचडी आणि कढी किंवा पांढरा भात आणि कढी हा मेन्यू बेस्ट. एक प्लेट भात किंवा खिचडी दोघांना पुरते. त्यामुळं इथंही अंदाज घेऊनच ऑर्डर देऊ शकतो. इतकं सगळं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात थोडी जागा असेल तर एक ग्लास सोलकढी प्या. (आम्ही प्यायली होती, हे आलंच)

स्वच्छता आणि टापटीप....
इथली आणखी एक ओळख म्हणजे इथली स्वच्छता आणि टापटीप. स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण इथले वेटरही एकदम स्वच्छ आहेत. शिवाय टिपिकल मराठी उपहारगृहांमध्ये ग्राहकाकडे ज्या तुच्छतेनं पाहिलं जातं तो अनुभव इथं येत नाही. फक्त काहीवेळा पदार्थ लवकर संपलेले असतात. त्याला पर्याय नाही, असं म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. इथले दरही खूप जास्त आहेत, असं नाही. माफक दर आणि उत्तम चव असं वर्णन करायला हरकत नाही. चार जणांनी यथेच्छ हादडल्यानंतर साधारणपणे तीनशे रुपयांपर्यंत बिल येतं, असा अनुभव आहे. साधारण तीन-चार वेळचा. त्यामुळं जास्त चिंता करु नका आणि ओरपा...


तांबे उपहारगृह
२७७, मापला महल,
जे. एस. मार्ग, ठाकूरद्वार,
गिरगांव, मुंबई – ४००००४
०२२-२३८९९००९
०२२-२३८६४२२३

Tuesday, February 24, 2009

"मांदेली फ्राय' जरुर ट्राय करा...


गिरगावातला "सत्कार'!!!

बऱ्याच दिवसांपास्नं लिहायचं होतं. पण आज मुहूर्त मिळाला असंच म्हटलं पाहिजे. शेवटी हा सत्कार समारंभ पार पाडलाच पाहिजे, असं ठरवून आज ब्लॉग लिहितोय. एकदा का एखाद्या ठिकाणची चव जिभेवर रुळली की पुन्हा पुन्हा तिथं जायचं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा ही जुनी खोड. त्यामुळंच मुंबईत आलं आणि गिरगावातल्या सत्कार हॉटेलात गेलो नाही, असं कधीच झालं नाही. अगदी अप्रतिम चवीचे मासे याठिकाणी तुम्हाला मिळतील. पापलेटपासून ते बांगड्यापर्यंत बरीच "व्हरायटी' इथे मिळते. सत्कार हे थोडंसं खानावळीच्या अंगानं जाणारं असलं तरी अगदी घरगुती पद्धतीनं बनवलेलं (बहुधा मालवणी पद्धतीनं) जेवण ही इथली खासियत. त्यामुळे दुपारी दोनपूर्वी आणि संध्याकाळी आठनंतर अगदी बिनदिक्कतपणे तुम्हाला इथं आडवा हात मारु शकाल.

अगदी सुरवातीला म्हणजे "ई टीव्ही'मध्ये काम करत असताना (जवळपास तीन वर्षांपूर्वी) विश्‍वनाथ गरुड, अजय खापे आणि स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ या "रानडे'तल्या मित्रांबरोबर पहिल्यांदा सत्कारमध्ये गेलो होतो. तेव्हापास्नं अजूनही गिरगावाकडे पावलं वळतात. मग जेव्हा जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तेव्हा इथं जाणं व्हायचं. सध्या मुंबईतच आहे. पण फक्त एकदाच सत्कारची पायरी चढलीय. आता कधी एकदा तिथं जाऊन "फिश करी' ओरपतोय, असं झालंय.
वेस्टर्न लाईनच्या मरीन लाईन्स स्टेशनला उतरायचं. चर्चगेटच्या दिशेनं जाऊ लागलो की, अखेरच्या ब्रिजवरनं उतरायचं आणि डावीकडे वळून थेट चालायला लागायचं. पहिला चौक ओलांडला डाव्या हातालाच सत्कार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनंही इथं यायला बसेस आहे. अगदी टॅक्सीनं यायचं म्हटलं तरी वीस-पंचवीस रुपयांपेक्षा जास्त मीटर पडणार नाही.

पापलेट किंवा सुरमई थाळी हा इथला "द बेस्ट' ऑप्शन. अगदी "मेन्यू कार्ड' देखील पहायची काहीही आवश्‍यकता नाही. "सत्कार'मध्ये शिरल्यानंतर तुम्ही थेट एखाद्या थाळीची "ऑर्डर' देऊन टाका. "फिश करी'चा स्वाद हे इथलं वैशिष्ट्य. थाळीमध्ये एक सुका फिश, एक करी फिश आणि चपात्या येतात. "फिश करी' खूपच चविष्ट असल्यानं ती ओरपलीच जाते. त्यामुळे दोन-तीन वेळा तरी इथं करी मागवावी लागते. त्याचे स्वतंत्र पैसे पडत नाही. पण जादा पैसे पडत असले तरी हरकत नाही. पुन्हा पुन्हा "करी' हवीच. मासा कोणताही असला तरी तो इतका ताजा असतो (त्यामुळेच सॉफ्टही असतो) की जणू काही तो नुकताच समुद्रातनं पकडून आपल्याला "सर्व्ह' केलाय की काय, अशी शंका येते. अगदी लुसलुशीत मासा आणि अप्रतिम चवीची "फिश करी' यामुळे पाहता पाहता किती चपात्या संपतात ते कळतही नाही.

कोणतीही फिश थाळी मागविली तरी त्याच्या जोडीला "मांदेली फ्राय' ही डिश हवीच. "बोंबिल फ्राय' असेल तर तो "ऑप्शन'ही "ट्राय' करायला हरकत नाही. पण मला विचाराल तर "मांदेली फ्राय' हाच उत्तम पर्याय आहे. एका "प्लेट'मध्ये किमान बारा ते पंधरा मांदेली नक्की असतात. दोन जणांमध्ये एक "प्लेट' अगदी सहज संपते. इथली मांदेली इतकी मस्त आहे की, रत्नागिरीतल्या "शुभम' शिवाय इतकी सुंदर मांदेली दुसरीकडे कुठेच मिळालेली नाही. किमान मला तरी! (कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा) जास्त लोक असतील तर त्या प्रमाणात तुम्ही "ऑर्डर' द्या. चपात्या आणि "फिश'वर भरपेट ताव मारल्यानंतर एक प्लेट भात तुमची वाट पाहत असेल. तो खाण्याची क्षमता तुमच्यात असेल तर भात खा; अन्यथा त्याबदल्यात एक-दोन चपात्या आणखी घ्या. माशांची चव जिभेवर रेंगाळत ठेवायची असेल तर मग तुम्ही थेट बिल मागवा. नाहीतर इथली "सोलकढी' पण चांगली असते. किमान मी तरी "सोलकढी' घेतल्याशिवाय इथनं बाहेर पडत नाही. तुम्हीपण शक्‍यतो "सोलकढी' घ्याच.
दोन फिश थाळी, भरपूर चपात्या, "मांदेली फ्राय' किंवा "बोंबिल फ्राय'ची प्लेट आणि नंतर एक-दोन ग्लास "सोलकढी' हे झालं दोन जणांचं भरपेट जेवण आणि बिलाची रक्कम अवघी पावणेदोनशे दोनशे रुपये. बिल देऊन बाहेर पडल्यानंतर फक्त एक रस्ता क्रॉस केला की, समोरच पानाचा एक ठेला आहे. मसाला (मिठा) पानापासून ते फुलचंदपर्यंत सर्वप्रकारची पानं तिकडं मिळतात. फुलचंदही चांगलं कडक असतं. त्यामुळं तुम्ही पानाचे "शोकिन' असाल तर "सत्कार'समोरच्या पानवाल्यालाही "व्हिझिट' कराच.